शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात कार्य करणा-या देशातील विविध राज्यांसह
महाराष्ट्रातील अधिका-यांसाठी राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे सलग दुस-या वर्षी
यशस्वी आयोजन करून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत
कार्य करणा-या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राने नवा इतिहास घडवला. या
इतिहासास लकाकी आणणारा क्षण ठरला तो म्हणजे या कार्यशाळेचे झालेले लाईव्ह
वेबकास्टींग आणि त्यामाध्यमातून देश- विदेशातील जनतेपर्यंत पोहचलेला हा अभिनव उपक्रम.
राजधानी दिल्लीतील हॉटेल रॉयल प्लाझा येथे दिनांक २३ ते २६
फेब्रुवारी २०१६ दरम्यान आयोजित आणि विविध राज्य व महाराष्ट्रातील ३८ अधिका-यांचा
समावेश असलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या हस्ते आणि
माहिती संचालक शिवाजी मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यशाळेचा समारोप
राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या
मार्गदर्शनाने झाला.
महासंचालक श्री. ओक यांनी उदघाटनपर संबोधनात, ‘प्रसार माध्यमांच्या स्पर्धेत शासनाचे काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नव्या माध्यमांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे’ असे आवाहन उपस्थितांना
केले. ते म्हणाले, देशात ९० च्या दशकापर्यंत मुद्रीत माध्यमांचा प्रभाव होता,
नंतर दूरचित्रवाणीचा प्रवेश होऊन देशात वृत्तवाहिन्या आल्या. आता सामाजिक माध्यामांद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. शासकीय जनसंपर्कातही आता सामाजिक माध्यमांसह अन्य नव्या माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग व्हावा अशी
अपेक्षा व्यक्त करत राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने यादिशेने सुरुवात केली
असल्याचेही त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असेही ते म्हणाले .
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने मागील वर्षापासून देशाच्या राजधानीत राष्ट्रीय कार्यशाळेच्या आयोजनास सुरुवात झाली असून देशात असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. यावर्षीही या कार्यशाळेच्या माध्यमातून देशातील व माजमच्या अधिकारी वर्गाला याचा उपयोग होणार असून विचारांच्या देवाण-घेवानीतून परस्परांना लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी केलेल्या प्रास्ताविकात भाषणात सांगितले, बदलत्या माध्यामांच्या जगात प्रभावीपणे शासकीय जनसंपर्क होण्यास या चार दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचा उत्तम उपयोग होईल.
प्रथमच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण
उदघाटन सोहळयाचे थेट प्रक्षेपण महासंचालनालयाच्या www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर आणि सर्व प्रकारच्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी
दिल्ली हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागाचे
पहीले कार्यालय ठरले.
जे अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित राहू शकले नाही अशा अधिका-यांनी आपआपल्या मोबाईल
वर आणि कार्यालयांमधे मोठ मोठया स्क्रिन लाऊन हा उपक्रम याची देही याची डोळा बघीतला.
विविध राज्यांच्या माहिती जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांनीही या उपक्रमाचा लाभ
घेतला व उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मिडीयाद्वारे
कार्यशाळेच्या प्रत्येक सत्राचे लाईव्ह कव्हरेज देण्यात आले. कार्यशाळेच्या तीनही
दिवसांचे रेकॉर्डेड वेबकास्ट www.mahanews.gov.in या संकेतस्थळावर एक महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले .
महाराष्ट्र
परिचय केंद्र ठरले पहीले आयएसओ कार्यालय
महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली, हे कार्यालय आएसओ
९००१:२००८ प्रमाणीत झाले आहे.
कार्यशाळेच्या उदघाटन सोहळयात महासंचालकांच्या हस्ते परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद काबळे यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या बरोबरच परिचय केंद्र हे आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त महाराष्ट्र
शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे पहीले कार्यालय ठरले .
उदघाटन
सोहळयानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘समाज माध्यम आणि जनसंपर्क’ या
विषयावर राष्ट्रीय माध्यम केंद्राचे(एनएमसी) संचालक बी. नारायणन यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली. त्यानंतर
सुनीता बिड्डू यांनी ‘ब्लॉगीग आणि पर्सनल ब्रॅडींग’ या विषयी माहिती दिली. पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात श्री. राजनिल
यांनी ‘सध्याच्या मोबाईल विश्वातील सामग्री वितरण’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. या सत्रानंतर सर्व अधिकाऱ्यांचा
एकमेकांशी परिचय करुन देण्यात आला.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी
संचालक श्री. मानकर यांनी महासंचालनालयाची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती
दिली. पहिल्या सत्रात प्रसिध्द संवाद आणि राजकीय मोहीम सल्लागार म्हणून ख्याती
असलेले दिलीप चेरियन यांनी ‘‘जनसंपर्क आणि प्रतिमा बांधणी’’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर ‘‘डिजीटल ब्रॅडींग’’
यावर प्रतिक शाह यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात चित्रपट
निर्मात्या आणि माध्यम सल्लागार आरती जैन यांनी ‘‘जनसंपर्कातील दृकश्राव्य माध्यमांचा वापर’’ यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या तिसऱ्या
दिवशी दिल्ली मेट्रोचे कार्यकारी संचालक अनुज दयाल यांनी ‘‘ब्रॅडींग ऑफ दिल्ली मेट्रो’’
याविषयी सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक अजय आंबेकर यांनी ‘‘प्रभावी
आणि कार्यप्रवण माध्यमांची उभारणी’’ या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन कामाने आलेली मरगळ आणि
नैराश्य झटकण्यासाठी आवश्यक प्रेरणा
निर्माण करणा-या राजेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शन सत्राने तिस-या दिवसाचा समारोप
झाला.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी ‘माझा उत्तम जनसंपर्क प्रयोग’ या
विषयावर कार्यशाळेत सहभागी अधिका-यांनी
सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल, उपसंचालक यशवंत भंडारे ,वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, किशोर
गांगुर्डे, वर्षा आंधळे यांनी महासंचालनालयाच्या विविध
शाखांच्या कार्याबाबत विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर उपस्थित अन्य विविध
राज्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीबाबत व त्यांच्या राज्यांमधे राबविण्यात येत
उपक्रमांबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
दुपारच्या सत्रात
आयोजित कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी
अधिका-यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.
देसाई म्हणाले, आधुनिक माध्यमांच्या बदलत्या काळात शासनाच्या योजनांची
माहिती प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते. जनतेसाठी शासन उत्तमोत्तम योजना तयार करते.
त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने केले जाते. मात्र, दिवसेंदिवस प्रसार
माध्यमांचा होत असलेला विस्तार बघता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व
पध्दती विकसीत करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते.
महाराष्ट्र परिचय केंद्राने
या दिशेने सकारात्मक पाऊल उचलत देशाच्या राजधानीत राष्ट्रीय जनसंपर्क कार्यशाळेचे
आयोजन करून अभिनव सुरुवात केली आहे. कार्यशाळेत सहभागी विविध राज्यांतून व
महाराष्ट्रातून आलेल्या अधिका-यांना याचा फायदा होणार असून अशा कार्यशाळांमुळे
विचारांची आदान- प्रदान होऊन कार्यशैली विकसित करण्यास मदत होते असेही ते म्हणाले.
जनतेसाठी एखादी योजना तयार करताना तिच्या प्रसिध्दीसाठी निधींचे नियोजन करण्याची
गरजही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या ‘मेक
इन इंडिया’ सप्ताहाच्या यशस्वीतेबाबतही श्री. देसाई यांनी यावेळी माहिती दिली.
राष्ट्रीय कार्यशाळेत
महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क विभागातील १४ अधिका-यांसह राजस्थान, झारखंड,
उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गोवा, गुजरात,
मध्यप्रदेश, तेलंगाना,कर्नाटक, तामीळनाडू, आसाम, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, नागालँड, अंदमान व निकोबार या राज्य व
केंद्रशासीत प्रदेशांतील माहिती व जनसंपर्क विभागाच्या २३ अधिका-यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment