Monday, February 5, 2024

सुर्योदय' योजनेतून घरावर होणार ऊर्जानिर्मिती ; ग्राहक होणार वीज निर्माता


 

स्वच्छ आणि प्रदुषण विरहीत ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणून सौर ऊर्जा सर्वज्ञात आहे. याचा सामान्य जनतेला उपयोग व्हावा म्हणून केंद्र शासनाने जानेवारी २०२४ मध्ये 'सुर्योदय' योजना जाहीर केली.या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. केंद्राकडून सौर पॅनेलसाठी ४० टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार असल्याने  वीज ग्राहकांसाठी ही फायदेशीर ठरू शकते.

  प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी देशात एक कोटी घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याच्या या योजनेचा उद्देश आहे.या योजनेत राज्यातील पुणे,नाशिक ,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर,नागपूर आणि अकोला जिल्ह्याचा समावेश. सोलर पॅनल खरेदीसाठी ग्राहकांना ४० टक्के अनुदान सौरऊर्जा निर्मितीसाठी 'सुर्योदय' रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून ४० टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅट क्षमते पर्यंतचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख ५७ हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ५४,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास १ लाख ३ हजार रुपये खर्च येतो.

         सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी-कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

      सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर २० टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करीत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

रूफ टॉप सोलरसाठी बँक कर्ज देते :-

      सुर्योदय योजनेत छतावर रूफ टॉप सोलर बसविण्यासाठी कोणत्याही बँकेकडून  हप्त्यावर (EMI) कर्ज उपलब्ध होऊ शकते. रूफ टॉप सोलर बसविल्यामुळे शुन्य होणारे वीज बिलाचे पैसे ग्राहक बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतने आर्थिक भुर्दंडाविना रूफ टॉप सोलर बसविता येऊ शकते.

योजनेची वैशिष्ट्ये

१. घरगुती बिलात मोठी बचत

२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा  लाभ

३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान

४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान

५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान.

६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार.

००००