‘आई, बहीण आणि पत्नी म्हणून
‘स्त्री’ च असणं स्वीकाहार्य या व्यतिरीक्त ‘स्त्री’च अस्तीत्व हे पुरुषांच्या
मनमानी विचारांवर अवलंबून अर्थात पराबलंबी आहे. समाजाची ही मानसिकता जोवर कृतीशीलरित्या
बदलणार नाही तोवर महिला अत्याचाराच्या घटनांना
पूर्ण विराम लागणार नाही. आणि त्याची सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरातून व्हावी लागेल’,असं
माझं प्राजंळ व सुस्पष्ट मत (तेच फक्त मी व्यक्त करू शकतो आणि कृती करू शकतो).
हा विषय आज खरडायला तशा दोन प्रातिनिधिक
घटना कारणीभूत ठरल्या. केरळ उच्च न्यायालयाने
‘रेहाना फातिमा केस’ मध्ये ‘महिलांचे शरीर हे त्यांची स्वायत्त मालकी’ असल्याची
बाब नोंदवत तथाकथित संस्कृती रक्षकांना चपराक लगावली आहे. तर दुसरी मनाला हेलावून टाकणारी
घटना आहे अकोल्याच्या पत्रकाराची मुंबईत शिकणारी मुलगी वसतीगृहात मृतावस्थेत आढळल्याची .
केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील
रेहाना फातिमा या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मॉडेलही
आहेत. त्यांनी २०२०मध्ये सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती. फातिमा यांच्या शरीराच्या वरील
निर्वस्त्र भागावर त्यांच्या मुला-मुलींनी पेंटींग केल्याची ही पोस्ट. या कृत्याविरोधात
तथाकथीत संस्कृतिरक्षकांनी कोर्टात केस केली. जिल्हा सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्याअंतर्गत
रेहाना फातिमा यांना दोषी ठरवल. रेहाना यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे खटकवले. आणि
सरतेशेवटी 6 जून 2023 रोजी न्या. कौसर इडप्पागाथ
यांच्या खंडपिठाने निर्णय दिला,‘ आईच्या शरीराच्या
वरच्याभागावर तिच्या स्वत:च्या मुलांनी केलेले पेंटींग हा एक कला प्रकल्प असून यास
वास्तव किंवा लैंगिंक भावना उद्दीप्त करणारी कृती समजू नये. स्वत:च्या शरीराबद्दल निर्णय
घेण्यासाठी महिला स्वायत्त असून हा मूलभूत अधिकाराचा गाभा आहे जो लैंगिक समानता आणि गोपनियता प्रदान करतो. ’
मुंबईत शिक्षणासाठी गेलेली अकोल्याच्या
एका पत्रकाराची मुलगी शासकीय वसतीगृहात वास्तव्यास होती. नामांकित संस्थेतून ती पॉलिटेक्नीकचे
शिक्षण पूर्ण करीत होती. अचानक 6 जून 2023 रोजी वसतीगृहात त्या मुलीचा विवस्त्र मृतदेह
आढळला.आणि त्याच वसतीगृहातील सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची बाबही पुढे आली आहे.
या दोन्ही घटनांमध्ये महिलांकडे
समाजाचा बघण्याचा व त्यांच्यासोबतच्या वागणुकीचा किडसवाना परिचय येतो. पहिल्या घटनेत
रेहाना फातिमा यांची कृती संस्कृतीला मारक
असल्याचा टेंभा मिरवून संस्कृतीरक्षणासाठी कोर्टात जाण्याचा घाट घालणारा समाज आपणास
ठसठसीतपणे दिसून येतो. रेहाना यांनी केलेली कृती ही त्यांची वैयक्तिक बाब म्हणून न स्वीकारता संस्कृतीवरील संकट समजणारा समाज जेव्हा
ही कृती सार्वजनिक करतो तेव्हा त्यास जबाबदार समाज म्हणावे का? असा प्रश्न निर्माण
होतोच.पण अशा शक्तींना अडवून धरण्यासाठी न्यायव्यवस्थेने या मनोवृत्तीला वेळीच घातलेली
वेसण महत्वपूर्ण ठरते.
दुसऱ्या घटनेची पूर्ण माहिती अजून
पुढे आलेली नाही. पण वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून ही बाब स्पष्ट आहे की
वसतीगृहात मुलीवर बलात्कार झाला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आता ही कृती किती
भयानक आहे याचा विचार करूया.आपल्या मुलीला शिक्षण व नोकरीसाठी अन्य शहरात पाठविणाऱ्या पालकांच्या पायाखालची जमीन
खसकवणारीही आहे. मुलींच्या वसतीगृहात मुलीवरच बलात्कार आणि हत्या होत असेल तर वसतीगृह
प्रशासनावर आणि इथे नोकरीवर असणाऱ्या पुरुषांवर तरी विश्वास ठेवावा का?. मग असा विचार
करता समाजात प्रत्येक ठिकाणी स्त्रिया व पुरुष असणारच तर पुरुषांकडून अशी वागणूक मिळण ही सुद्धा एक सामाजिक
समस्या म्हणून जन्माला येत असल्याचेही प्रतित होते.
या विषयाच्या अनुषंगाणे काही संदर्भही देणे उचित ठरेल. त्यासाठी
दोन दशके मागे जावूया देशाच्या इशान्येकडील राज्यात. १० जुलै २०१४ च्या रात्री मनीपूर राज्यातील
बैमन कॅम्पू मयई भागात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ॲक्ट (ASPA) नुसार रात्री एका
घराला १७,असम रायफलच्या तुकडीने घेराव घातला.यानंतरचा घडलेला प्रकार हा मानवतेला काळीमा
फासणारा आहे. थंगजम मनोरमा ही या घटनेतील पिडीता.एका घरात आसम रायफल तुकडीचे जवान गेले
व छोटया मुलाला त्याच्या बहिणीविषयी चौकशी करु लागले.घरात पुढे शिरून मुलीच्या आईला
विचारणा सुरु असतानाच थंगजम मनोरमा आली अशात
जवान तिला फरफटत घराच्या एका भागात घेवून गेले.चाकुने तिचे कपडे फाडले व तिला
स्थानिक नक्षलीगटाला सहकार्य करणारी सदस्य म्हणून कबुली देण्यास भाग पाडू लागले. थंगजमच्या
मांडीवर चाकुचे वार करण्यात आले कहर तर तेव्हा
झाला जेव्हा तिच्या गुप्तांगामध्ये बंदुकीच्या गोळया घालण्यात आल्या. थंगजम साठी या
राज्यातील जनता रस्त्यावर आली रक्षकच भक्षक
होतानाचा अनुभव येथील महिलांनी घेतला.
जाताजाता आणखी इतिहासातील दोन संदर्भ. हा संदर्भ
आहे दोन विदुषींचा. कर्नाटकातील अक्क महादेवी
आणि जम्मू आणि काश्मिर मधील लाल डेड. ११३० मध्ये कर्नाटकाच्या
शिमोगा जिल्ह्यातील उडुतरी गावात अक्क महादेवी या मुलीचा जन्म झाला. चेन्नमल्लिकार्जुन
अर्थात शंकराची ती भक्त होती . अक्क महादेवीच्या रुपावर भाडून स्थानिक जैन राजा कौशीकने
तिच्या वडीलांकडे अक्कला विवाहासाठी मागणी केली व लहान वयातच तिचा विवाह झाला. शंकरालाच
मनोमन पती माननाऱ्या अक्क महादेवीचे संसारात मन रमत नव्हते राजाने भरवलेल्या दरबारात
तिने शंकरालाच आपण पती मानत असल्याची कबुली दिली. क्रोध अनवार होवून राजाने दिलेले
आभुषणे व वस्त्रही अक्क महादेवीकडून काढून घेतले. दरबारातून विवस्त्रावस्थेतच अक्क
महादेवी शंकराच्या शोधात निघाली. याच अवस्थेत जंगलात तपश्चर्येनंतर तिला आत्मानुभव
झाला व लिंगैक्य होवून चेन्नमल्लिकार्जुनासोबत
ती एकाकार झाल्याची घटना सांगितली जाते. ही घटना श्री शैल येथे घडल्याने तिथे चेन्नमल्लिकार्जुनाचे मंदिर बांधण्यात आले. या घटनेतूनही
महिलेला वस्तू समजण्याचा समाजाचा दृष्टीकोण अधोरेखित होतो.
लाल डेड यांचा कार्यकाळ १३२० ते १३५५ दरम्यानचा
आहे.काश्मीरातील पंडेरेथन गावात एका काश्मीरी पंडीत कुटुंबात लाल डेड उर्फ लल्लेश्वरीचा
जन्म झाला. 12 व्या वर्षीचा तिचा विवाह झाला व सासरी खूप छळ सुरु झाला. सासरचा सततचा
छळाला कंटाळून आणि आत्मीक शांतीच्या शोधातच ती शंकराच्या भक्तीत लीन झाली. पुढे २६ व्या वर्षी
संसाराचा व वस्त्रत्याग करून ती जंगलांमध्ये
भटकू लागली. कविता ,छंद रचू लागली. लाल डेड ने मोठया प्रमाणात साहित्य रचना केली. बुद्धीमान
स्त्री म्हणून आणि काश्मीरची शेक्सपियर म्हणून
तिची ओळख निर्माण झाली.
अक्क महादेवी आणि लाल डेड या दोन्ही
विदुषींचा घरच्या मंडळींनीच छळ केला मात्र, त्यांनी परिस्थितीशी निकराचा लढा देवून
आपले अस्तित्व निर्माण केले. आज आमच्या तथाकथित आधुनिक समाजात महिलांनी काय परिधान
करावे, कसे वर्तन करावे असे विचार थोपवले जातात, या दोन विदुषींनी तर ११ व्या आणि १३व्या शतकात अंगावरील
वस्त्रांचा त्याग केला व अदभूत कार्य करून
दाखविले. हाच समाज त्यांना आता देवत्वाचे रुप प्रदान करतो. एवढच काय तर समाजात दुर्गा,शारदा
म्हणून महिलेचे उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात. मात्र,माणूस म्हणून तिला वागणूक
नाकारतो. अशा समाजाचा भाग असल्याचा अभिमान बाळगून आम्हीही भिड का हिस्सा होतो या पेक्षा
दुर्देव ते काय असणार !
00000
