आज-काल आपल्या अवतीभवती लिहावं असं खूप आहे. मात्र,
ते लिहिण्यासाठी आतून प्रेरित व्हावं असं फार कमी घडतं. ही बाब अधिक स्पष्ट करण्यासाठी
रामनवमी निमित्त टाकरखेडा-संभू येथील राम मंदिराला दिलेली भेट हे ठसठशीत उदाहरणच ठरेल.
अमरावती शहरापासून परतवाडा रस्त्यावर आष्टी फाट्याहून थोड पुढे ( आत जवळपास ४ कि.मी.
अंतरावर) हे गाव आहे (अमरावती पासून २२ कि.मी. अंतर).आमचे सन्मित्र श्री. दिनेश बकाले
यांच्यामुळे या मंदिराला भेट देण्याचा व दर्शनाचा योग आला. मंदिरात प्रवेश करताच येथील
राम, लक्ष्मण आणि जानकी अर्थात सीता यांच्या
संगमरवरी दगडातील लोभस व सुंदर आखीव व रेखीव मुर्त्या बघून प्रथमतः चित्त प्रसन्न
होत. मंदिराचा गाभारा सागवान लाकडाचा. अगदी सुंदर नक्षीकाम केलेला. त्यावर एक गच्चीसदृश्य
माळा. हे सर्व बघून आमच्या अचलपूर शहरातील सुलतानपुरा येथील दत्त मंदिराची अर्थात चखाभूलीच्या
मंदिराचीच आठवण झाली. चखाभुली मंदिराची डिट्टो कॉपी ठराव एवढं हे मंदिर सेम टू सेम.
बरं, टाकरखेडा-संभू हे गाव म्हणजे आमचे प्रिय दादा श्री. संदीप गणगणे, श्री. सचिन गणगणे
आणि सौ.वर्षाताई गणगणे-दहीकर यांचं आजोळ. याचंही लगेच स्मरण झालं. एकदम मनात विचार
आला या भावंडही या मंदिरात आपल्या बालपणीचे सुंदर क्षण जगले असतील. म्हणून लगेच फोटो
काढून ते आमच्या ‘नातेसंबंध’ या व्हाट्सअप
ग्रुप वरही शेअर केले. आणि यात तिघाही भावंडांना फोटोतील हे मंदिर ओळखण्याची विनंती
केली. त्यांनीही तितक्याच तत्परतेने सकारात्मक
उत्तर दिले. तेव्हा या गोष्टीवरील विश्वास अधिक घट्ट झाला की, आपण ज्या वास्तू, शहर
व गावात काही अनमोल क्षण घालवलेले असतात ते आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आठवणीच्या
कुप्पीत जपून ठेवलेले असतात.
गावातील तरुणांच ‘राममंदिर’ व ‘रामनवमीउत्सवाचं’ प्रेम
मंदिरात निवांत बसलो असता चार तरुण मुलं तिथे आले. त्यांचा संवाद आपसूक कानावर पडत होता. त्यांनी या उत्सवासाठी नागपूर, पुणे, मुंबईतील शिक्षण व नौकरी निमित्ताने हलवलेला तळ आता टाकरखेडा-संभू या आपल्या गावी ठोकला होता. या मुला- मुलींनीनी मंदिरावरील रात्रीची विद्युत रोषणाई आणि उत्तम- उत्तम फोटो आणि व्हिडिओ यांची सोशल मीडियावर रील, स्टेटस व अन्य माध्यमातून केलेली प्रसिद्धी ते आपसात शेअर करत होते. आधुनिक काळातही तरुणांना आपलं गाव, आपले उत्सव, सण याविषयी असणारा जिव्हाळा पाहून एक सकारात्मक विश्वास दुणावला.
मंदिर परिसरातच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल
कलाम यांच्या नावाने वाचनालय आहे. वाचनालयाचा फलक बघून खरोखर मंदिरातून अशी वाचनालये
निर्माण होत राहिल्यास या वास्तुंचा खरा सदुपयोग होईल हा कित्येक वर्षांपासूनचा माझ्या मनातला विचार प्रत्यक्ष मूर्त
स्वरूप घेतानाचं चित्र मनाला खूपच भावलं. इथेच दुसरं फलक होता 'मंदिरात दानपेटी नाही
आणि ( between the line- कोणाला दान देण्याची बळजबरीही नाही) दान द्यावयाचे असल्यास
स्वखुशीने पावती फाडावी' .मंदिरातील दानपेटी हा विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी
आपल्या भजनातून जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला 'मनी नाही भाव, म्हणे देवा मला
पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे....' या प्रसिद्ध भजनातच काय तो सार आपणा सर्वांना
कळेल. 'देवाला पैसे दान करून, सोनं वाहून आपण
मोठे होतो की देव!' हे एक मला नेहमीच पडलेल कोडं सुटायच्यादिशेने दानपेटी विरहित मंदिर
हे एक आश्वासक पाऊल ठरेल.
सप्ताहानिमित्ताने स्तुत्य उपक्रमांचे
आयोजन
गावोगावी हरिनामसप्ताह होतात. पण टाकरखेडा संभूचा
रामनवमी सप्ताह काही औरच भासला. कार्यक्रम पत्रिकेत विषय होते 'शेतकऱ्यांना मार्गदर्शन,
आदर्श गावच्या सरपंचाचे (जिल्हा संभाजीनगर ( जुने औरंगाबाद)) मार्गदर्शन, नेत्र तपासणी
शिबिर. आणि या सप्ताहाचे काल्याचे किर्तन माझे सन्मित्र आणि एका शिबिरात आम्ही शिकलेले
विद्यार्थी दर्यापूर येथील ह.भ.प. सागर महाराज परिहार यांचं नाव वाचून तर या सर्व सकारात्मक
ऊर्जेचा कळसच गाठल्याचा सुखद अनुभव शिदोरी रुपात घेवून आम्ही या गावाचा निरोप
घेला.
००००००




