कृपया लिंक ओपन करा👇
https://youtu.be/7VbkSAqL52Y?si=HZitQoPAxkHpck0D
कुटुंबापेक्षा समाजातील गोर-गरिब व गरजूंना आपला वेळ देणारे व त्यांच्या दुःखात सदैव मदतीला खंबीरपणे उभे राहणारे आमचे बाबा.समाज,व्यवसाय आणि माणसं वाचत आयुष्य जगणारे बाबा म्हणजे चालता बोलता माहिती कोष व अनुभवाच मोठ गाठोड. त्यांनी आपल्या कार्यातून व जगण्यातून आम्हाला दिलेली संस्काराची शिदोरी आमची पॉवर बँक आहे. त्यांच्या सहवासाला आम्ही आज कायमचे मुकलो आहोत. आमचे प्रिय बाबा मोतीरामजी गुलाबराव भुयार (वय ७०) यांची गेल्या १० वर्षांपासून पॅरालिसीस आजाराशी सुरू असलेली झुंज अखेर आज १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता संपली.
लहानपणी ज्यांच्या प्रेमाला पारखे झाल्याची खंत आता आम्हाला उरली नव्हती. आणि त्यांच्या दराऱ्यासहीत हा माणूस सर्वांनी मनोभावे स्वीकारला हेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचं गमक होत. गेल्या १० वर्षांपासून पॅरालिसीस आजाराने ग्रस्त असतानाही त्यांचा वट काही कमी नव्हता. ६० वर्ष जो माणूस सामाजिक व वैयक्तीक आयुष्य आपल्या पद्धतीने जगतो त्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध एका आजाराच्या विळख्यात जातो हे त्यांच्यासह आम्हा सर्वांना क्लेशदायक होत. पत्नीला समर्थ जोडीदार, मुलांना मार्गदर्शक व नेतृत्व देणारे वडील,सुनांना सासरे आणि नातवंडांना एक स्वस्थ व आनंदी आजोबा म्हणून बाबा तुम्ही हवे होतात.
आजही आठवते मी पुण्याला पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात मला टूव्हिलरची गरज असताना तुम्ही नवीन गाडी घेऊन दिली व स्वत: 'अचलपूर ते पुणे' असं अंतर गाडी चालवत आलात व मला गाडी सुपूर्द केली. पुणे सोडून ध्येय प्राप्तीसाठी दिल्लीकडे कुच करताना मला आवश्यक असलेली आर्थिक मदत करून मुलाच्या ध्येयाची पायाभरणी करणारे वडील म्हणून मला तुम्ही सदैव प्रियच राहिलात. दिल्लीहून गावी आलो तेंव्हा परतताना टू व्हिलरने मला ट्रॅव्हल्सवर किंवा कधी मधी बैतुलच्या जवळपर्यंत पोहचवून देणारा प्रेमळ बाप माझ्या वाटयाला आला. तसाच माझ्या लग्नावेळी मुली बघण्यापासून देखना व आटोपशीर विवाह सोहळा संपन्न करण्याचं कर्तव्य तुम्ही खूपच उत्तम पद्धतीने पार पाडल विशेष म्हणजे तोच आमच्या कुटुंबातील मुलांच्या फळीतील पहिला विवाह सोहळा ठरला.
आमच्याकडील राजदूत गाडीवर (टू व्हिलर) वडिलांनी आम्हा भावंडांना सैर घडविल्याची आठवणही आम्ही जपली आहे. चांगल्या हॉटेलमध्ये आम्हाला घेवून जात वेगवेगळया मेन्यूंचा परिचय करून दिला तसाच आमच्या काळात अचलपूरच्या देवडीभागात मोठया दिमाखात व हाऊस फुल्ल शो चालणारी श्री टॉकीज व या टॉकीजमध्ये कितीतरी चित्रपटांच्या बारी आम्हाला बाबांकडून थेट थिएटरमध्ये बसून मिळत असल्याच्या आठवणी हा मोठा ठेवाच आहे.आजारपणाच्या तिव्रतेकडे दुर्लक्ष केल्याने पॅरालिसीसने तुम्हाला ग्रासले आणि मग वाघासारखा राबता व स्वत:चा वेगळा दरारा असणारे तुमचे व्यक्तीमत्व वॉकर आणि बिछान्याचे सोबती झाले. मात्र, पॅरालिसीसलाही हरविण्याची तुमची जिद्द आणि जगण्याची विल पावर आम्ही या काळात अनुभवली.
नागपूर येथील पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या उपचारासहीत तीगावच तेल, तेल्हाऱ्याचे इंजेक्शन आणि विविध काढे, वनौषधी, आयुर्वेदीक औषधी, मालिश, फिजिओथेरपी असे सर्व प्रयोग तुम्हाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी थोरला मुलगा मनिष (मनिष दादा) यांच्या नेतृत्वात झाले. इनफॅक्ट आमच्या वहिनी निकीता आणि आई अशा तिघांनी बाबांची खूप सेवा केली. या सेवेत खंड पडू नये म्हणून दादाचे कुठेच फटकणे होत नव्हते तर आई व वहिनी यांना कुणाकडे जाण्याची किंवा माहेरी चार दिवस थांबण्याची सोयच उरली नव्हती. या तिघांनी बाबांची खूप सेवा केली ती अनमोल आहे.
वडीलांच्या आजारपणात दोन मोठया दुखापती झाल्यात. एकदा तोलजाऊन घरा बाहेर पडले तेव्हा २२ टाके आणि नंतर एकदा घरातच तोलजावून पडल्याने ९ टाके पडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करावे लागले. यावेळी थोरला भाऊ मनिष दादा, आमचे मोठे वडिल प्रभाकरराव भुयार, भावंड आशिषदादा, स्वप्निल आणि अंकुश यांनी आपल्या डयुटया ठरवून हॉस्पिटलमध्ये बाबांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ सेवा दिली. यानंतर कॅथेड्रर निघाल्याने बाबांवर पुन्हा शस्त्रक्रिया झाली. आधीच आजाराने खंगलेले शरीर आणि त्यात लागोपाठ शस्त्रक्रिया अशाने शरीर अशक्त होत गेले आणि शेवटचे तीन वर्ष तर हालचालच बंद झाली व सर्वकाही बिछानाच त्यांच कार्यक्षेत्र ठरल. अशात नौकरीमध्ये पदोन्न्ती मिळाल्याने गावाकडे आल्याच्या आनंदाने पत्नी सोनाली व मुलगा स्वरित यांच्यासोबत बाबांच्या भेटीला येण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद काही औरच होता. माझ्यासोबत या दोघांनाही बाबांच्या भेटीतून ऊर्जा मिळत असल्याचा मला मनोमन आनंद होत. या भेटीत बाबांकडील अनुभव व ज्ञानाच्या मोठया पुतडीतून आम्हाला आपसुकच सैल हाताने प्रेम माया व ज्ञान मिळाले. प्रत्येक भेटीत दाडी करण्याचा नित्यक्रम त्यांच्या शेवटच्या दाढी व आंघोळी पर्यंत पाडता आला याचे खूप समाधानही आहेच.
कृतकृत्यता
शिक्षण व मग नोकरीसाठीचा माझा संघर्ष सुरू असतानाच प्रयत्नांना यश येऊन २०१३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात शासकीय नोकरीत आलो. अशात दिल्लीला कार्यरत असताना आई-बाबांना बोलावलं. माझ्या ऑफिसमध्ये दोघेही आले आणि माझ्या केबिनमध्ये आई- वडिलांना माझ्या संघर्षाअंती यशाचे प्रतीक असलेल्या खुर्चीत बसवले. तो क्षण म्हणजे 'कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो....' (संत तुकाराम महाराज यांचा अभंग) असाच ठरला. त्यावेळी आई-बाबा दोघेही माझ्याकडे साधारण महिनाभर थांबले .यावेळी राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,पंजाब या राज्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. हा सर्व टूर मी प्लॅन करू शकलो सर्व प्रवास एसी ट्रेन व तत्सम वाहनाने व्हावा याची पूर्ण काळजी घेतली. ऑफिस सांभाळून इतर वेळी माझा प्रिय मित्र नीलकंठ महल्ले याच्या सोबतीने हा टूर पूर्ण केला. शासकीय नोकरीत आल्यानंतर आई-बाबांसोबत घालवलेला हा सर्वोत्तम वेळ ठरला. 'या टूरची सांगता ही आई-बाबांना विमानाने दिल्ली ते नागपूर प्रवास घडवून केली', याचेही मला खूप समाधान आहे.
दिल्लीतून पदोन्नतीने महाराष्ट्रात आलो तेव्हा माझ्या अमरावतीच्या राहत्या फ्लॅटमध्ये बाबांना घेऊन आलो साधारण तीन आठवडे ते आमच्या सोबत होते. सुट्टी काढून पूर्ण वेळ आई बाबांसोबत सहपरिवार राहण्याचा उत्तम योग आला. ( या फ्लॅटमध्ये रहायला येण्याआधी झालेल्या वास्तू पूजेत बाबा आवर्जून आले त्यावेळी त्यांना नुकताच पॅरालीसीस आजार जडला होता.) यात त्यांचा वाढदिवसही साजरा केला आमच्या काकू प्रतिभा भुयार ,भाऊ अनुप्रीत आणि बाबांचे लाडके भाचे प्रवीण सिनकर यांना खास आमंत्रित केले होते.
आम्हा दोघा भावांपैकी माझे लग्न आधी झाले आणि या लग्नाचे संपूर्ण नियोजन आणि लग्न समारंभ बाबांनी थाटात पार पाडला. थोरला भाऊ मनीष दादाचा साखरपुडा बाबांच्या कुशल नेतृत्वात पार पडला आणि त्यानंतर दोन दिवसातच बाबांना पॅरालिसिसने ग्रासले. दादाच्या लग्नाचे सर्व नियोजन आई व दादाने कुशलतेने करून देखणा विवाह सोहळा पार पाडला. येथूनच बाबांच्या प्रकृती अस्वास्थामुळे घराची संपूर्ण धुरा आई आणि दादांच्या खांद्यावर आली. या दोघांच्या दिमतीला आता आमच्या वाहिनी निकिता मनिष भुयारही होत्या. वहिनींनी लग्न झाल्यापासून आमच्या वडिलांची अंतिम क्षणापर्यंत सुश्रुषा केली व संपूर्ण काळजी घेतली, ही अत्यंत समाधानाची व कौतुकाची बाब आहे.(पॅरालिसिस सोबत बाबांनी ९ वर्ष १० महिने झुंज दिली.).
आमच्या घरात 'स्वरित' (माझा मुलगा) च्या रूपाने बाबांना पहिल्या नातवाचे मुख बघायला मिळाले तेंव्हा बाबा या आजाराने ग्रस्तच होते त्याच वर्षी माझा पुतण्या 'कैवल्य' याचा ही जन्म झाला. म्हणजे एकाच वर्षी (वर्ष २०१७(एप्रिल - ऑगस्ट) बाबांना आपल्या दोन्ही नातवांचे मुख बघून त्यांना आशीर्वाद देण्याचा सुयोग लाभला. मुलांचे लग्न, सुन्मुख आणि नातवंडांना आशीर्वाद देण्याचं भाग्य त्यांना लाभलं मात्र, नातवंडांना खेळवण्याचं व सुनांना आपले धडधाकट सासरे व त्यासोबत मायेची पाखर मिळण्याची खंत तेवढी राहिली. अशात बाबांची प्रकृती ठीक असती तर आमच्या कुटुंबाला खूप मोठा आधार मिळाला असता. दादाला शेतीत व घरात चांगली मदत झाली असती व पर्यायाने आमच्या लौकिक प्रगतीलाही गती मिळाली असती हे तितकेच खरे.
जस तुम्ही आम्हाला पोरक करून गेलात तस तुम्हा एकूण ५ भावंडांमध्ये दोन थोरल्या बहिणी नंतर (आमच्या आत्या स्व. शांताबाई अंबाडकर (अचलपूर) आणि स्व. ताईबाई मेहरे (करजगाव) ) शेंडेफळ अर्थात भावंडांमध्ये सर्वात लहान असून हे जग सोडून जाण्यात तुम्ही तिसराच क्रमांक लावला. भावंडांमध्ये चौथा क्रमांक असणारे आमचे मोठे वडील श्री. प्रभाकरराव भुयार (७६) आणि आमची आत्या शकुंतलाबाई सिनकर (७३) यांनाही तुम्ही एकट टाकून गेलात. तीनही आत्या व मोठे वडील यांचं तुमच्यावर विशेष प्रेम व जिव्हाळा होता ते त्यांच्या वागण्यातून आम्हाला आपसुकच कळायचं. याआजारपणात तुम्हाला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनाही हळहळ वाटत असे.
मरावे परी किर्ती रूपे उरावे
वडिलांच्या आजारपणात ते बहुतेक वेळ टिव्ही बघायचे. त्यात सकाळच्यावेळी आवर्जून मराठी वाहिन्यांवरील किर्तन ते बघत असत. कधी नव्हे तो त्यांच्या आयुष्यात सतत किर्तन ऐकण्याचा योग आला. यातील बोधपर गोष्टी, तत्वज्ञान व प्रबोधन त्यांनी आत्मसात केले तसे त्यातील ज्ञानातून त्यांनी मरणोत्तर करावयाचे संकल्पही करून ठेवले. पहिला संकल्प होता मृत्यूनंतर आपल्या डोळयातून एखाद्याला ही सुंदर सृष्टीदिसावी म्हणून केलेला नेत्रदानाचा संकल्प तर दुसरा संकल्प होता की, मृत्यू नंतर आपल्या शरीराची राख व अस्थी अन्य कोण्या तिर्थस्थळी विसर्जित न करता आपल्या शेतात पुराव्यात आणि त्यावर झाड लावावी या माध्यमातून मी माझ्याच शेतात कायम विसावेल. शेवटच्या काळात ते या संकल्पांची आम्हाला सारखी आठवण करून देत असत. त्यांच्या संकल्पानुसार त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांचे नेत्रदान केले.त्यासाठी आमचे मामेभाऊ श्री. संदीप गणगणे यांनी सर्व समन्वय सांभाळून डॉ.गोतमारे यांच्याकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यापासून ते हरिना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची मंडळी अमरावती येथीलच शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या टिमशी संपर्क साधून आमच्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान पार पाडले. हरिना फाऊंडेशनचे पंकज गुप्ता यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते व मरणोत्तर नेत्रदानाचे हे पुण्यकर्म जनतेपर्यंत पोचावे यासाठी त्यांनी श्रध्दांजली सभाही घेतली.
अंत्य विधीच्या दुसऱ्या दिवशी वडिलांच्या संकल्पानुसार आम्ही त्यांची रक्षा आणि अस्थि सोबत घेवून आमच्या शेतात गेलो व विहिरी शेजारीच ही रक्षा व अस्थि पुरून त्यावर दशेहरी आंबा,बारमाही आंबा ,चिकु आणि जांभुळ ही चार झाड लावली. आम्ही सर्व भुयार कुटुंबातील भावंड आणि आमची मुल यांनी हा सर्व प्रसंग अनुभवला . ‘बाबा’, आता आमच्या शेतात या झाडांच्या माध्यमातून कायमच आमच्या सोबत असणार असून ते मुक मार्गदर्शन करणार आहेत .आम्हीही त्यांच्या शेजारी बसून मनोमन गुज गोष्टी करू आणि त्याची व्यवस्था बाबांनी संकल्पाद्वारे करून ठेवली होती यातून त्यांची सकारात्मक व दूरदृष्टी दिसून येते.
बाबांच्या निधनापासून दशक्रियेच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही घरात खूप खेळीमेळीच व धार्मिक वातावरण ठेवल. दुसऱ्याच दिवसापासून (१६ एप्रिल २०२६) ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ पारायण सुरु केले. एकही दिवस खंड पडू न देता (२३ एप्रिल २०२६ रोजी सकाळ पर्यंत) ज्ञानेश्वरीचे संपूर्ण १८ अध्याय एकूण ९हजार ३७ ओव्या आणि श्रीमद्भ्गतवगीतेचे ९०७ श्लोकांचे पठण केले, माझ्यासोबत आमच्या काकु प्रतिभा नामदेवराव भुयार, मामी भारती अविनाश पोटदुखे आणि माझी पत्नी सोनाली व मुलगा स्वरित यांनी मिळून हे पारायण यशस्वीपणे पूर्ण केले. श्रोत्यांमध्ये आमची आत्या शकुंतलाबाई सिनकर, माझी आई ,मोठी आई सुलोचनाबाई व सरलाबाई , काकु सुनिता भुयार,मनकरनाबाई काळे यांचा समावेश असे. नियमित 'सांप्रदायीक हरिपाठ' आणि गुरुदेव सेवा मंडळाची 'सामुदायिक प्रार्थना'ही आम्ही सर्वमिळून केली.
या कालावधीत भजनी मंडळींची दोन भजनाचे कार्यक्रम आणि आमच्या नातेवाईक मंडळींच्या भजनाचा एक कार्यक्रमही आम्ही आयोजित केला.दशक्रियेच्या आदल्या दिवशी वडिलांना समर्पित प्रवचनसेवाही मी देवू शकलो. या सर्व कालावधीत आमचं दु:ख कमी व्हाव म्हणून आमची नातलग मंडळी दररोज आमच्याकडे भोजणासाठी येत तसेच आप्त स्वकीय व मित्रमंडळींच्या सांत्वन पर भेटीही सुरुच होत्या. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून जुळलेला आमचा अमरावती येथील ॲम्बिशीयस ग्रुप, माझ्या अपार्टमेंटच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी व अपार्टमेंटचे सदस्य आप्त स्वकीय यांनी दिलेल्या सदिच्छाभेट तसेच मेसेजेस व फोनद्वारे आलेले सांत्वनपर संदेश या दु:खद समयी दिलासा देवून गेले.
'बाबा’, तुम्ही सामाजिक जाणीवेतून जीवन जगलात. गोरगरीब आणि वंचितांना मदत करण्याची तुमची वृत्ती बेमिसालच ठरली, ज्यांना ज्यांना तुम्ही मदत केली त्यांनी आमच्या जवळ या संदर्भातील किस्से सांगून आणि काही किस्से तुम्ही स्वत: सांगितल्याने तुमच्यातील जिंदादील माणूस कळला व तस बनन्याची प्रेरणाही मिळाली. कित्तेकांचे दवाखाने त्यांची सुश्रुशा त्यांना आर्थिक मदत केली. शिक्षण, जमीन व्यवहारासाठी लागणारी शासकीय प्रमाणपत्रे व दाखले गरीब व गरजुंना मिळवून देण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असायचा, परिसरातील कित्तेक गरिबांचे अंत्यविधी तुम्ही स्वत:च्या पैशांतून केले त्यांना दशक्रीयेसाठी भटजी मिळत नव्हता तेव्हा स्वत: हे विधी पार पाडल. दुर्बल घटकाची सेवा करण्याच्या भावनेतूनच एकदा तुम्ही अचलपूर नगरपरिषदेची नगरसेवक पदासाठी निवडणूकही लढवली. पण इथे मात्र अपयश आले. आम्हीही तुम्हाला मिळालेल्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हांवर आधारीत घोषवाक्याद्वारे प्रचार केल्याचे आजही स्मरते.
पंचक्रोशीतील संत्रा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत तुमचा चांगला संवाद होता. त्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी कित्तेकदा देशाच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यात तुम्ही शेतमाल घेवून गेलात व त्याची विक्रीकरून तुम्ही शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून दिला. स्वत:ही दोन ट्रक खरेदीकरून संत्रा व कांद्या विक्रीचा व्यापार नफा व तोटयाचे गणित सांभाळून केला. शेतात संत्रा व अमराई ( ५० च्यावर विविध वाणांची आंब्याची झाडे) व पारंपरीक खरीप व रब्बीची पिकेही घेऊन नफ्या तोटयाची गणित सांभाळली.
आई-वडिल आणि आम्ही तिघ भावंड असं आमच छोट कुटुंब होत.वयाच्या १५ व्या वर्षी आमची थोरली बहिण शुभांगीताई पोलिओ आजाराशी झुंज देवून आम्हाला सोडून गेली आणि दोन्ही मुलांची आपापल्या क्षेत्रातील प्रगती, सुना व नातवंड डोळेभरून बघून आता वयाच्या सत्तरीत तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्हा दोघांची आठवण सतत येत राहील मात्र उणिव कायम भासत राहिल. तुमच्याकडून मिळलेल्या चांगल्या संस्कारातून आम्ही मार्गक्रमण करीत राहू व आमच्या नावासोबत जन्माने जोडलगेलल तुमच नाव सदैव सार्थक करीत राहू हाच विश्वास व्यक्त करून तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
००००००
















































