Monday, July 17, 2017

अनुपम्य आणि हृदय सोहळा : महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार व गप्पा











आज आमच्या कार्यालयाला महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट दिली, त्यांचा सत्कार आणि अनौपचारीक गप्पा असा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रख्यात शाहीरासमोर पोवाडा गाण्याची , प्रश्न विचारण्याची मिळालेली संधी आणि माझ्या गावी अचलपूरला आल्याची बाबासाहेबांनी सांगितलेली आठवण सदैव स्मरणात राहून गेली. हा अनुपम्य आणि हृदय सोहळाच म्हणेन मी.


                      बाबासाहेबांच्या स्वागतासाठी वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. वृध्दापकाळामुळे(वय वर्षे ९६) बाबासाहेब दमले मात्र उत्साह तरूणांना लाजवेल असाच आहे. कार्यालयात त्यांचे आगमन झाले आणि आम्ही वेळेवरच बाबासाहेंबांना पोवाडयाने मानवंदना देण्याचा वेळेवर प्लॅन आखला. मंचावर बाबासाहेबांचे आगमन झाले माझ्याकडेच सूत्रसंचालनाची धुरा असल्याने , कार्यक्रमाची अल्प प्रस्तावणा तयार करून मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरा-घरांमध्ये पोचविणा-या शिवशाहिरांना महाराजांच्या पोवाडयानेच मानवंदना देण्याची आमचा मनोदय आहे, बाबासाहेबांनी परवाणगी दिली. आणि वाघच होता.. कापत सुटला मोगलाना तरी औरंग्या नुसता बघत होता..... हा पोवाडा गायला मी सुरुवात केली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे आणि ग्रंथालय लिपीक निलेश देशमुख यांनी जीर जी ... साठी साथ दिली. लोकवाड:मय त्यातही पोवाडयाचा विशेष अभ्यास असणा-या शाहीरासमोर पोवाडा सादर करण्याचं धाडस पूर्ण झाल होत.बाबासाहेबांचा सत्कार झाला व त्यांच्या संबोधनास सुरूवात झाली. त्यानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. मी पहिलाच प्रश्न विचारला, बाबासाहेब आपणास छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरोघरी पोचविण्याची प्रेरणा आणि उर्जा कुठून मिळाली, त्यावर त्यांचे उत्तर होते या प्रश्नाने माझी अवस्था बंद पाण्याची बाटली उलटी केल्यानंतर पाणी खाली पडण्यास लागणारा वेळा आणि स्थिती जशी होते तशीच झालीय मग त्यांनी या प्रश्नाचे सवीस्तर उत्तरही दिले.


                       कार्यक्रम आटोपला, बाबासाहेबांना परत न्यायला येणारी गाडी यायची होती , तेवढया वेळात ते आमच्या कार्यालय प्रमुखांच्या कॅबीन मध्ये बसले. तिथे त्यांच्याशी आम्ही अनौपचारीक गप्पा मारताना आप-आपल्या गावाचे नाव व ओळख दिली. मी सांगितले, आदरणीय बाबासाहेब मी, इलीचपूर अर्थात अचलपूरचा. आमच्या गावला भले मोठे परकोट आहेत, चार मोठाले दरवाजे आहेत अस सर्व मी वर्णन करित असताना, बाबासाहेबांना काही आठवल. ते म्हणाले, वर्ष १९५५ मध्ये मी अचलपूरला व्याख्यानासाठी गेलो होतो कुठले तरी विठ्ठल मंदीर होते, मी एकटाच. ज्यांनी माझ व्याख्यान आयोजित केल ते आयोजकही नाहीत आणि श्रोतेही नाहित.  तरीही, व्याख्यान सुरु केल. हा प्रसंग कसा अजूनही चटकन आठवला त्यांना वयाच्या ९६ व्या वर्षी एवढी स्मरणशक्ती पाहून शिवशाहीरापुढे नत झालो. याच महीन्यात बाबासाहेब २९ जुलैला ९६ वर्ष पूर्ण करतात आहेत त्याआधी त्यांची ही भेट अविस्मरणीय तर आहेच तसेच हा सोहळा अनुपम्य व हृदय असाच ठरला.
                                                                          


या  कार्यक्रमाची  मी  लिहीलेली  व कार्यालयाच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेली बातमी दैनिक प्रभात मध्ये प्रकाशित झाली लिंक वर उपलब्ध
 
      


 

Tuesday, July 4, 2017

गरिबांना घरकुल देण्यात सातारा जिल्ह्याचा देशात मान मिळवून देणारे डॉ. राजेश देशमुख


मंगळवार, २० जून, २०१७


अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा. गरिबीमुळे आपल्या देशातील ग्रामीण भागात अजूनही लोकांना राहायला हक्काचे घर नाही. म्हणूनच, मागील वर्षापासून केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)' राबविण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात या योजनेच्या अंमलबजवाणीस सुरुवात झाली. सातारा जिल्ह्याने आघाडी घेत अवघ्या ६ महिन्याच्या कालावधीत केंद्राच्या सर्व निकषांचे पालन करून प्रत्यक्षात १,९१३ घरकुले बांधून पूर्ण केली. जिल्ह्यात या योजनेचे १५१४५ लाभार्थी असून ११,८२५ पात्र लाभार्थ्यांची नोंद आवास प्रणालीत करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या अंमलबजावणीत सातारा जिल्हा महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. देशातही आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या सातारा जिल्ह्याला नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्रालयाच्या वार्षीक कार्यक्रमात या विभागाचे मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राज्यमंत्री रामकृपाल यादव यांच्या हस्ते सुवर्ण व रजत पदकाने सन्मानित करण्यात आले. या यशाचे शिल्पकार तथा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी साधलेला हा संवाद महान्यूज नेटभेटसाठी.
राष्ट्रीय पातळीवर सातारा जिल्ह्याच्या सन्मानासाठी सर्वप्रथम आपले अभिनंदन. हा पुरस्कार स्वीकारताना काय भावना आहेत ?
धन्यवाद, आम्ही पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री आवास योजना(ग्रा.)’ राबविली. परिणामी, आमचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला, याचा अत्यानंद आहे. पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गोर-गरिबांना हक्काची घरे मिळवून देण्याकामी आणखी जोमाने कार्य करण्याची ऊर्जा या पुरस्कारामुळे मिळाल्याचे मी मानतो.

योजनेच्या अंमलबजावणीला कशी सुरुवात झाली. लाभार्थ्यांचे निकष कसे पूर्ण झाले?

साधारणत: मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र शासनाने ही योजना देशभर राबविण्याची घोषणा केली. घोषणा होताच आम्ही कामाला लागलो. या योजनेसाठी ठरवून देण्यात आलेल्या १३ निकषांचा आम्ही अभ्यास केला. सोप्या भाषेत हे निकष सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्ही त्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये तशी माहिती दिली. तसेच त्या-त्या गावातील गरीब व गरजवंत लोकांची नावे ठरवून ग्रामसभेने एकमताने ठराव केले. पात्र झालेल्या लाभार्थींना जिल्हा समितीमार्फत अंतिम मान्यता दिली. लाभार्थ्यांसाठी ठरविण्यात आलेले निकष पूर्ण करून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अशी सकारात्मक सुरुवात झाली. 

केंद्र शासनाच्या अन्य योजनांचा मेळ घालून अर्थात कृती संगमातून ही योजना राबविण्यात येते त्याबद्दल काय सांगाल ?

केंद्र शासनाच्या तीन योजनांच्या निधीतून या योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिला जातो. यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) माध्यमातून प्रती लाभार्थ्याला रूपये १,२०,०००, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून रूपये १२,००० आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच्या माध्यमातून रूपये १७,२८० उपलब्ध करून दिले जातात. रोजगार हमी योजनेतून लाभार्थीला स्वतः च्या घरकुलावर काम करण्याची संधी तर मिळालीच आणि या कामाच्या मोबदल्यात मजुरी सुद्धा उपलब्ध करून दिली.

सातारा जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्याचे गमक काय सांगाल?

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला तत्काळ सुरुवात करून ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान आम्ही जिल्ह्यातील ११ ब्लॉकमध्ये पात्र कुटुंबातील महिलांच्या नावे प्रस्ताव करून त्याची नोंदणी आवास प्रणालीत सुरु केली. लाभार्थींच्या योजनेच्या माहितीविषयी कार्यशाळा घेतल्या. अवघ्या सहा महिन्यात प्रत्यक्षात १९१३ घरे बांधून पूर्ण केली. निकषानुसार १५,१४५ पात्र लाभार्थ्यांची यादी करण्यात आली. त्यातील ११,८२५ पात्र लाभार्थीची आवास प्रणालीत आजअखेर नोंदणी केली. जिल्ह्याने नरेगामध्ये १,६३,२८५ मनुष्य दिन निर्मिती (रोजगार) केली आहे. या कामात आम्ही लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, उपग्रहाद्वारे निरीक्षण (जिओ टॅगिंग), लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी उपलब्ध करून देणे, घरकुलांना मंजुरी देणे या कामात सातारा जिल्हा राज्यात प्रथम ठरला. देश पातळीवर दोन श्रेणीत सुवर्ण व रजत पुरस्काराने सन्मान झाला. वर उल्लेख केलेले आमचे काम यासाठी लाभार्थी - ग्रामपंचायत - तालुका - जिल्हा या प्रत्येक टप्प्यावर एकमेकात असलेला सातत्यपूर्ण समन्वय (PMAY-G TEAM SATARA) हेच मी आमच्या यशाचे गमक मानतो.
सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागातही आपण ही योजना प्रभावीपणे राबविली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महोदयांनीही या गावांना भेट दिली आहे. याबद्दल काय सांगाल?

मुख्यमंत्री महोदयांनी कोरेगाव तालुक्यातील धामनेर या आदिवासी पाड्यास प्रत्यक्ष भेट देऊन याठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधकामास भेट दिली. तेथील आदिवासी महिला लाभार्थींशी चर्चा केली. ही घटना आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यानंतर कोयना धरणाच्या परिक्षेत्रातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यांतर्गत येणाऱ्या दुर्गम भागात जवळपास ४५ घरे आम्ही या योजनेअंतर्गत बांधली आहेत. या ठिकाणी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लाभार्थींना बोटीच्या माध्यमातून बांधकाम साहित्याचा पुरवठा करून कामे पूर्ण केली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रा.) सातारा जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. आपल्या कुशल मार्गदर्शनाने हे कार्य घडून आले. पुढेही या योजनेच्या माध्यमातून राज्यात व देशात एक आदर्श निर्माण व्हावा त्यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
bhuyar.ritesh@gmail.com