Wednesday, February 11, 2026

…ती ‘आई’ होती म्हणुनी…



    गोठयात उभी एक गाय जिने दोन दिवसांपासून चारा खानं सोडला आणि दुसरीकडे तिच्या कालवडीच्या डोळयातून ओघवत असलेले अश्रू पाहतांनाचा क्षण बरच काही सूचवून आणि शिकवून गेला. मुक्या प्राण्यांना भावना असतात आणि जे हात त्यांची नेहमी काळजी घ्यायचे चारा व पाणी दयायचे ते आता दिसेनासे झाल्याने त्यांची ही अवस्था झाली होती. ती व्यक्ती म्हणजे आमची सर्वांची लाडकी ‘बुट्टी’ अर्थात जयश्री भुयार-नवले. तिचे अकाली निघून जाणे (गुरुवार,५ फेब्रुवारी २०२६- वय ४२ वर्ष ७ महिने) हे तिच्या तीन मुली आणि पतीला (आमचे जावई) जसे पोरके करणारे होते तसेच ते आम्हा भुयार परिवारालाही मुलगी सोडून गेल्याचे अपरमित दु:ख देणारे ठरले.

         मुळात तिच्या जाण्याने एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुलींना आई, पतीला पत्नी , सासुला सून पोरकी झाली आहे तसे ती बहिणी, आई, काकु,भाऊ असा मोठा आप्त परिवार पोरका करून गेली आहे. गावात सर्वांना मदत करणारी , बोलकी आणि धाडसी महिला म्हणून ओळख असणाऱ्या जयश्रीने स्वकृत्वाने आपली ओळख निर्माण केली. रुढ अर्थाने नोकरी, राजकारण,शिक्षण आदी क्षेत्रातील वावरानेच माणसाची ओळख निर्माण होते हे आपण पाहतो. मात्र, कतृत्व आणि मितभाषी स्वभाव या गुणांआधारेही तुम्ही स्वत:ची छाप पाळता व सर्वप्रिय होता हे जयश्रीच्या अकाली जाण्याने समाजातील विविध लोकांच्या प्रतिक्रियांमधून अधोरेखित झाले.

         तिच्या जाण्याने घरातील गुरं, शेजारची गोंडस लहानगी चिऊ, ज्योत मंदिराचा भव्य सप्ताह आणि तिच्या पोटची लेकरं हे कायमचे पोरके झाले होते. चिऊचा वावर सतत जयश्रीच्या घरात व्हायचा व आपल्या तीन मुलींचा उत्तम सांभाळ करणारी ही माऊली आता चिऊचीही काळजी घेऊ लागली. तिला खेळवू लागली. त्यांना एकमेकींचा लळाच लागला होता. ज्या गिरणीच्या भरवश्यावर जयश्रीने संसाराचा रथ लिलया पेलला आणि स्वप्नातील घर प्रत्यक्षात उभारल त्या गिरणीतच चिऊ कितीदा दळणाचे पीठ खात असे व जयश्रीही त्याची परवानगी देवून चिऊच्या चेहऱ्यावर पिठाची रांगोळी काढत असे. जेमतेम दीड दोन वर्षांची चिऊ जिला हे आनंदाचे क्षण हवे हवेसे वाटत होते त्याला आता कायमचा थांबा बसला. कालांतराने ती मोठी होईल तेव्हा तिला या आनंदाच्या क्षणाबद्दल कोणी सांगेलही. पण, आताच्या घडीला ती संभ्रमात पडली असेल. तिचे बालसुलभ मन आता त्या क्षणांचा आनंद घ्यायला मुसमुसले असेल. तसेच गोठयातील त्या माय-लेकरांचेही झाले असेल.त्यांचा सांभाळ करणारे हात आज त्यांच्या आजुबाजुला दिसत नसल्याने त्यांची तगमग सुरु आहे. त्यांच्या सभोवताली आधी असलेलं आनंदी वातावरण आता दु:खात परावर्तीत झाल्याचे त्या मुक्या जिवांना प्रकर्षाने जाणवत असल्यानेच एकीने चारा खानं सोडून तर दुसरीने आसवांना वाट मोकळी करुन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

       ‘ज्योत मंदिर’ हे पणज गाव आणि पंचक्रोशितील ( जि.अकोला,ता.अकोट) प्रसिद्ध धार्मिक स्थळ ठरत आहे.या ठिकाणी तुपाचा सतत तेवत राहणारा दिवा येथे येणाऱ्या भाविकांना सतत तेवत राहण्याची ऊर्जा देवून जातो. घराच्या भिंतीलाच लागूण असणाऱ्या या ज्योत मंदिराशी जयश्रीचं भावनिक व धार्मिक नात जुळलं होतं. जेव्हा केंव्हा तिच्याशी बोलण व्हायचं तेंव्हा तिच्या बोलण्यात या मंदिराचा आवर्जुन उल्लेख येत असे आणि त्यासोबतच या मंदिरात दर्शनासाठी ये असे निमंत्रण वजा आवाहनही असे. याच मंदिराचा उत्सव येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार होता, विशेष म्हणजे याच उत्सवादरम्यान जयश्रीचा जाहीर सत्कारही होणार होता. तो आता कधिही होणार नाही हे कटुसत्य सर्वांनाच पचवता येत नाहीये. या मंदिरासाठी काही जागा जयश्रीच्याच पुढाकार व आग्रहाने देण्यात आली म्हणूनच दात्यांच्या यादित तिचे नाव कोरले गेले आहे.आणि आता या उत्सवासाठी जवळपास 35 गव्हाच्या पोत्यांच्या दळणापैकी तिने जाण्याच्या दिवसापर्यंत जवळपास 25 पोते गव्हाचे दळण दळले होते व उर्वरीत दळणही ती नि:शुल्क दळणार होती. जागा दान देणे व नि:शुल्क दळण दळून या उत्सवाला हातभार लावण्यामुळे तिचा सत्कार होणार होता. मात्र,या उत्सवाच्या चार दिवस आधी तिच्या दुर्देवी निधनामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करून जयश्रीप्रती कृतज्ञभाव दर्शविला. उत्सवासाठी तयार करण्यात आलेले मिष्ठान्न (बुंदी) नजिकच्या मंदिरांमध्ये गजानन महाराज प्रगटदिन कार्यक्रमासाठी व शेगाव येथील गजाजन महाराज मंदिरात कणकेची पोती पाठविण्यात आली.

       घरावर कोसळल संकट 

        आई गेल्याने तिची तीन पिल्लं आता कायमची पोरकी झाली आहेत. मोठी मुलगी  श्रुतिका (छकुली) धाय मोकलून रडत होती व आई वर गुदरलेला हा प्रसंग सांगत असतानाच जयश्रीचा समजुतदारपणा व धाडसी स्वभाव तिच्या व्यक्तीमत्वात दिसून आला. तिने सांगितले की, गिरणीच्याच भरवशावर आईने हे घर उभं केल आणि त्यापूर्वी आमच्या जावई बाप्पुंनीही याचा तोंडभरून उल्लेख केला होता. गेल्या आठवडाभरापर्यंत तिने या घराचे उर्वरित बांधकाम,छपाई,रंगरंगोटी करून घेतली.या घरात गेल्या वर्षी आम्ही आईसोबत दसरा,दिवाळी असे सर्व सण साजरे केले. प्रत्येक दिवाळीला एक ड्रेस आमच्या वाटयाला येत असे यावेळी हात सैल करून आईने आम्हा तिघिंना प्रत्येकी दोन ड्रेस घेतले. बाबांचा वाढदिवस दणक्यात केला, रोडग्यांचं (कणकेच्या गोळयापासून बनविण्यात येणारा पोळी वर्गीय पदार्थ) जेवण दिलं. रात्रीचे जेवण आटोपल्यावर माझ्या दोन्ही धाकटया बहिणींसोबत ती एकाच मोबाईलवर रिल पाहत असे. एवढयात ती स्वत:वर आणि आमच्यावरही खूप खर्च करायला लागली होती. दु:खद बाब म्हणजे माझी दुसऱ्या क्रमांकाची बहिण गौरीचा वाढदिवस आई गेली त्याच दिवशी होता. त्या उद्विगनेतून तिने तर देव्हाऱ्यातील देव फेकून देत राग व दु:ख व्यक्त केले होते. सर्वात धाकटी रेणुकाही आई गेल्याच्या धक्क्यातून सावरली नाही अजून. मी आयबीपीएस अर्थांत बॅंकींगची परिक्षा दिली प्रिलिमरी एक्झाम पास केली आता मेन्स आहे. पण, नाही देणार मी एक्झाम माझ मनच उडून गेलं आता काही करण्याबाबत. यावर आम्ही सांगितलं की, 'आता तुला थोरली बहिण म्हणून आईच्या जागी त्यांना धिर दयायचा आहे व त्यांचा सांभाळ करायचा आहे.' आणि तुला आयबीपिएस मेन्स दिलीच पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आम्ही तिला आश्वस्त केले.

      आता पोरकी झालेली ही तीनं पील्लं आपलं आयुष्य केवळ आईने दिलेल्या संस्काराच्या पुंजीतून जगणार आहेत.पतीवर मात्र आता घर चालविण्याची व आईची पाखर या पिल्लांवर घालण्यी दुहेरी जबाबदारी पडली आहे. 

           पती हाच परमेश्वर ; कृतीशील परिचय 

जयश्रीच्या मुली सांगतात की, 'आमची आई फारशी देवपूजेत रमायची नाही. मात्र, दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आमच्या वडिलांचे दर्शन घेऊनच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे'. तिची ही कृतीतर अल्प शिक्षण झालं असलं तरी तिची विचारसरणी ही काळाच्या पुढे जाणारी होती हे दर्शविते. यातून मुलींनाही आपसूक बाळकडू मिळाले व खरा देव माणसात आहे ही संतांची शिकवण तिने कृतीतून मुलींना दिली हे ठळकपणे दिसून येते. ती शरीर यष्टीने जाड होती, पण याच तिला अजिबात वाईट वाटायचं नाही. आम्ही गंमतीने तिला याबाबत खोड काढायचो तेव्हा ती त्याच आत्मविश्वाने सांगायची , आमच्या यांना मी आहे तशीच आवडते मग मला इतरांच काही देणं घेण नाही.' या दोन्ही कृतीतून पती-पत्नी मधील संमजसपणा ,प्रेम व नात्याची घट्ट वीण ठळकपणे दिसते.

     सासु बाईंनाही प्रेमळ व होतकरु सुनेच्या नसन्याची सल त्यांच्या यजमानांच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. पण या सर्वांना या अपरमीत दु:खातून सावरुन सक्षमपणे उभे रहावे लागणार आहे व जयश्रीच्या आठवणी व तिच्या चांगुलपणाची चळवळ पुढे घेऊन जावी लागेल.  

              ही वाट दूर जाते

         आम्ही सर्व भावंड अचलपुरातील (जि. अमरावती) विलायतपुरा भागातील दानाखोरीत लहानाची मोठी झालो. बालपणात भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. माझे मोठेबाबा दिवंगत अर्जुनराव भुयार आणि मोठी आई श्रीमती सरला भुयार यांच्या पोटी पाच मुलींनी जन्म घेतला. श्री. अर्जुनरावांनी स्वत:ची चहाची टपरी उघडून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून इमाने इतबारे काम करून संसाराचा गाडा ओढला. 

     घरी अठरा विश्वे दारिद्र्य आणि त्यात पाच लेकींचा सांभाळ त्यांचे शिक्षण अशी जबाबदारी आली. मी तेंव्हा मामांकडे शिकायला होतो. मग उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अचलपूरला माझ्या गावी यायचो तेंव्हा आम्ही सर्व भावंड सोबत खेळायचो. विशेष करून मी या बहिणींच्या गोतावळ्यात असायचो. मला आठवते तेंव्हा पत्त्यांचा खेळ खेळायचो आम्ही (बिटफुल बहुदा) तेंव्हा जयश्रीचा खेळात जास्त उत्साह असे. घरा शेजारीच आमची वाडी (छोटे शेत) होती तिथेही आम्ही सर्व भावंड खेळायला जायचो. पुढे शिक्षणासाठी माझा प्रवास एका गावातून दुसऱ्या असं सुरू होत. तस तसा मी अचलपूर पासून लांब जात होतो. अशात इकडे या पाच बहिणी थोड बहुत जुजबी शिक्षण घेऊन लग्न या आयुष्यातील महत्वाच्या जबाबदारीला सामोऱ्या गेल्या. गरीब परिस्थिती असताना चांगली स्थळ आली व एका मागून एक लग्नाची जबाबदारी पार पडत गेली .पाच बहिणी पैकी जयश्रीच लग्न क्रमाने तिसरं.

      आता मी मामाकडे शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील भास्कर महाराज संस्थान, द्वारकेश्वर येथे वारकरी शिक्षण व सर्वांगीण विकास शिबिरात जायचो. अशातच जयश्रीच्या आग्रहाखातर तिचं नुकतंच लग्न झालं असताना शिबिरातून गावी परतताना तिच्या पणज या गावी गेल्याचं मला आठवतं. तिचे सुविध्य पती (आमचे जावई) सासू-सासरे, दीर अशा सर्वांशी गप्पा झाल्या. लग्नानंतर आपल्या घरी भाऊ आल्याचा आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होत. उन्हाळा असल्याने माझ्यासाठी आंब्याच्या रसाचा खास पाहुणचार केला होता ते स्मरते (तेंव्हा कदाचित इयत्ता १२ वीत असेन, मी.).

        पुढे शिक्षणासाठी अमरावती, पुणे अन् नोकरीसाठी दिल्ली असा प्रवास करत मी अचलपूरपासून अधिक लांब जात गेलो. शासकीय नोकरीत आलो. लग्न झालं. आमच्या घरात मुलांमध्ये माझच पहिलं लग्न. त्यामुळे आमच्या बहिणींना लग्न एन्जॉय करायची नामी संधी. यात जयश्रीने सर्वात जास्त मज्जा केल्याचे मी बघितले. मांडवात नवरदेव जाण्यापूर्वी व गावात मिरवणुकी दरम्यान जयश्रीने माझा हात धरून अक्षरशः कमाल डान्स केल्याचे मला आठवते. लग्नाच्या त्या दोन-तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये तिने धमाल डान्स केल्याचे व पुढेही माझ्या नंतर झालेल्या माझ्या भावांच्या लग्नामध्येही तिचा उत्साह आणि ठसकेबाज डान्स सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी होती. तिचं वागणं- बोलणं खूपच मोकळ धाकळ आणि स्पष्ट होतं. 

     परत विधिवत चतुर्भुज झाल्यानंतर (लग्न झाल्यावर) मी दिल्लीत गेलो. मग अधे-मधे दिवाळीत वगैरे भाऊबीजेला जयश्रीची भेट व्हायची. आता दिल्लीहून परतलो नागपुरात नोकरीत व्यग्र झालो. अशात भेट झाली तेव्हा जयश्री म्हणायची, 'आता आपल्या भागात आला बरं झालं !आता तरी ये आमच्याकडे मुक्कामी.' दिल्लीहून नागपूरला येऊन मला तीन वर्ष झाली. मात्र, तिच्याकडे जायचा योग आला नाही. आणि आता तिच्याकडे जावं लागलं तेव्हा तिच हे जग सोडून गेली होती. हे तिचं जायचं वय नव्हतं.अजून आयुष्याचा बराच चित्रपट बाकी होता त्या आधीच तीने इंटरवल साधला आणि आम्हा सर्वांना पोरक व निशब्द करून गेली, एवढ्यात तुला श्रद्धांजली वाहण्याचं धाडसच नाही होत.

    तुझ्या जाण्याने तुझी तीन पिल्लं आणि तुझ्या घरातील गाय वासरु यांना थेट झळ पोहोचली. तुझ्याशी या सर्वांचा असलेला भावनिक व मायेचा संबंध याची मोजदात नाही.

  आई सोडून गेल्याने तिच्या लेकरांची होणारी हिच तगमग मांडण्यासाठी कवी ग्रेस यांच्या कवितेचा आधार घेऊन येथे थांबतो.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो

त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता.....


                                             ००००००

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार ; 352 तालुक्यात सकारात्मक बदल !



 






 कोणत्याही राज्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी भुजलाचा स्तर चांगला असणे गरजेचे असते. भूजलस्तर सुधार म्हणजे दुष्काळापासून मुक्तता हा मंत्र ठरला आहे. राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा हाच ध्यास व मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उराशी बाळगून वर्ष 2015 च्या सुरुवातीलाच ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून भूजलस्तर वाढून राज्यात दुष्काळी भागाची स्थिती सुधारली. या कार्यक्रमाला जोड म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वात राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’,‘अटल भूजल योजना’ आणि ‘जलजीवन मिशन’ ची अंमलबजावणीही प्रभावीपणे होत आहे. परिणामी केंद्रशासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिते प्रमाणे विहित कार्यपद्धतीत अंतर्गत भूजल दुष्काळ निर्देशांकानुसार वर्ष 2025 अखेर राज्यातील 353 तालुक्यांपैकी 352 तालुक्यात दुष्काळ नसल्याचे व भूजल तूट वर्गवारी सामान्य असल्याची आणि मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर 1.52 मिटरने वाढल्याची सुवार्ता पुढे आली आहे. 

      राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत शेतीच आहे तर 82 टक्के भूभाग हा पावसावर अवलंबून आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील काही गावांमध्ये अनिश्चित व अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन लोकांच्या राहणीमानावर आणि शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत असल्याचे चित्र होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळीत होणारी तूट भरून काढण्यासाठी व या सर्व परिस्थितीत कृतीशील कार्याद्वारे बदल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 26 जानेवारी 2015 रोजी राज्यात ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यास सुरुवात झाली. 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उदिष्टातून लोकसहभागाद्वारे सूक्ष्म सिंचन आणि पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात झाली. स्थानिक जलप्रवाहांना मोठया जलप्रवाहांशी आणि नैसर्गिक प्रवाह उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जलवाहिन्या तयार करून जलप्रवाहांशी जोडण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाची आवक होऊन हे पाणी संवर्धनासाठी सूक्ष्म जलसाठयांमध्ये वाहून नेण्यात येऊ लागले. उपलब्ध जलप्रवाहांचे पुनरुज्जीवन करण्यावर आणि गावांमध्ये नवीन जलप्रवाह निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

        नद्यांच्या तळांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यावर भर देण्यात आला. पाण्याची झिरपण रोखण्यासाठी तलाव, तळी, शेततळे आणि कालव्यांमधून गाळ काढण्यात आला. चेकडॅम, कालवे, लहान तलाव आणि सार्वजनिक व खाजगी विहीरी बांधण्यात आल्या. पावसाच्या पाण्याची साठवण करण्यात आली. विशेष करून दुष्काळी भागात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. शेतीसाठी कार्यक्षमतेने पाणी वापराबाबत जागरुकता निर्माण करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आणि मोठया प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले. परिणामी 2019 पर्यंत राज्यात अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन 19 हजार 655 गावे कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त झाले. याकाळातच 22 हजार 539 गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या 6 लाख 32 हजार 896 कामांद्वारे 27 लाख 8 हजार 279 टीएमसी जलसाठा क्षमता निर्माण होऊन 39 लाख 4 हजार 394 हेक्टर सिंचन क्षमतेचा भूभाग निर्माण झाला. याद्वारे 29 हजार 544 गावांना पाणी पुरवठा करण्याचे लक्ष पूर्ण झाले. लक्षणीय यशानंतर पुन्हा 3 जानेवारी 2023 पासून राज्यात ‘जलशिवार योजना’ (2.0) सुरु करण्यात आली.

    प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने वर्ष 2015-16 पासून 'प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना' सुरू केली. राज्याच्या 34 जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्याच्या 60:40 हिश्श्याच्या अर्थसाहाय्याद्वारे ही योजना सुरु आहे. 

         माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जन्मदिनी 25 डिसेंबर 2019 रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या 78 जिल्ह्यांमधील कायम दुर्भिक्ष असणाऱ्या 8350 ग्राामपंचायतीसाठी 'अटल भूजल योजना’ सुरु केली. जागतिक बँकेच्या सहकार्यातून केंद्र शासनाने या योजनेसाठी 6000 कोटी रुपयांस मंजुरी दिली होती. लोकसहभागातून या योजनेत अंतर्भूत सर्व 78 जिल्ह्यांमधील 8350 ग्राामपंचायतींचा भूजल आराखडाही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

        ‘जल जीवन मिशन’ या केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या योजनेमुळेही ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण घराला सुरक्षित, शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी नळजोडणीद्वारे नियमितपणे उपलब्ध करुन देण्याचा उद्देश यशस्वी होताना दिसत आहे.15 ऑगस्ट 2019 रोजी सुरु झालेल्या या योजनेनुसार राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन’ सुरु करण्यात आले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच अन्य विभागांच्या समन्वयाने व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या मान्यतेने जल जीवन मिशन चे जिल्हास्तरीय आराखडे तयार करण्यात येतात.

 या सर्व प्रयत्नांतून राज्यातील दुष्काळी परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल दुष्काळ निर्देशांकात ते प्रकर्शाने दिसते. त्याविषयी जाणून घेवूया.

अशी होते भूजल पातळी जाहीर

   राज्याच्या महसूल व वनविभागाचा ७ ऑक्टोबर २०१७ चा शासन निर्णय आणि केंद्र शासनाची दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ च्या अनुषंगाने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने वनस्पती निर्देशांक, मृद आर्दता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेण्यात येतात.

      यातील जलविषयक निर्देशांक हा राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत व पुणे स्थित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) द्वारे तयार करण्यात येतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक गरजांसाठी भूजलाचे सर्वेक्षण, संशोधन, नियोजन आणि विकास करणारी ही यंत्रणा तालुका निहाय भूजल दुष्काळ निर्देशांक तयार करून या निर्देशांकाचे मूल्य व त्यानुसार भूजल तुटीची वर्गवारी दर तीन महिन्याने जाहीर करते.

     राज्यात एकुण 3920 निरिक्षण विहिरी स्थिर भूजल पातळीच्या मोजपासाठी स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ऑक्टोबर 2025 मध्ये 3665 निरीक्षण विहिरींची माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार वर्ष 2025 चा भूजल पातळी निर्देशांक काढण्यात आला आहे. यात राज्यातील 33 जिल्ह्यांतील 352 तालुक्यांमध्ये भूजल पातळी 0.15.च्या आत असून भूजल तुटीची वर्गवारी सामान्य असून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात हा निर्देशांक 0.16 ते 0.30 दरम्यान असल्याने भूजल तुटीची वर्गवारी सौम्य वर्गात समाविष्ट आहे. 0.60 पर्यंत एकूण पाच स्तरांमध्ये भूजल पातळी निर्देशांकानुसार सामान्य, सौम्य, मध्यम, गंभीर आणि अती गंभीर अशी भूजल तुटीची वर्गवारी काढण्यात येते.

भूजल स्तरात 1.52 मिटरने वाढ

मागील दहा वर्षांच्या तुलनेत भूजल स्तर 1.52 मिटरने वाढला असून राज्याच्या दृष्टीने ही महत्वाची उपलब्धी आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील कोणताच तालुका मध्यम, गंभीर आणि अती गंभीर भूजल तुटीच्या वर्गात नसल्याने हे सकारात्मक चित्र आहे.

     भूजल पातळी निर्देशांकानुसार भुजलाच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील समजल्या जाणाऱ्या विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडल्याचे दिसून येते. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमधील सर्वच तालुके सामान्य भूजल तुटीच्या श्रेणीत आहेत. त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्येही भूजल तूट स्थिर असून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमधील तालुक्यांचा यात समावेश आहे.



              भुगर्भातील जल हे शाश्वत आहे. शेती, पिण्यासाठी, पर्यावरण आणि उद्योगासाठी आपणास ते वर्तमानकाळात टिकवून भविष्यासाठीही राखून ठेवायचे आहे. त्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने सुरु झालेली ‘जलयुक्त शिवार योजना’ आणि राज्यातील दुष्काळ कायमचा नष्ट करण्यासाठी‘नदी जोड प्रकल्प’ राबविण्याच्या कामालाही गती प्राप्त झाली आहे. त्याचा परिणाम होऊन झालेले बदल भूजल पातळी निर्देशांकातील आकडयांद्वारे अधिक स्पष्ट झाले आहेत. या योजनांसह केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने राज्य मार्गक्रमण करीत आहे.


रितेश मो.भुयार,
माहिती अधिकारी, 
 माहिती व जनसंपर्क नागपूर.

               ०००००