जाणकार म्हणतात आणि माझाही विश्वास आहे की, स्थानिक लोक व तेथील संस्कृती समजून घ्यायची असेल तर त्या-त्या भागातील बस गाड्यांचा प्रवास हा सुखकर ठरतो. मग आम्हीही निघालो (अर्धांगिनी,चिरंजीव आणि मी) मालवणहून रत्नागिरीला महामंडळाच्या बसनेच.
सतत नागमोडी वळण घेणारे डांबरी व सुस्थितील रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा आंबे, काजू आणि नारळाची झाडे. आम्ही बसलो जलद गती गाडीत आणि प्रत्येक थांबा घेत प्रवाशांची ने-आण करणारी ही सामान्य गाडी भासावी अशी हिची गती.
जेष्ठ नागरिक सुविधेचा लाभ जणू आपला अधिकार असल्याच्या व तशी जाणीव असणारे हाफ सदरा व हाफ पँट मधील ज्येष्ठ नागरिक, रानफुले तर कुठे प्लास्टिकचे गजरे माळलेल्या स्त्रिया, शाळकरी मुल-मुली यांची सतत चढ-उतर असणारा बस प्रवास.
ही गाडी म्हणजे कोकणच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंबच जणू. कोणी एम.आर.आय/ एक्सरे ची रिपोर्ट सोबत घेऊन जामसंडे व मीठबावं सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल स्टॉपवर उतरली यात लेकुरवाळ्या व ज्येष्ठ महिलांचाच समावेश दिसून येतो.
भाळी लालभडक कुंकवाचा बारीकसा टीळा व त्यात ठासून दिसणारी अक्षत ल्यालेल्या व कोकणी पेहरावातील महिला प्रामुख्याने बसने वस्तुंची काही तरी ने आण करतानाचे चित्र दिसून येते. यात पिकलेला व गाडीभर घमघमाट सुटलेला फणस, बारदाण्यात भरलेली नारळ वाहून नेणाऱ्या स्त्रिया दिसून येतात. तर बेसिक मोबाईल फोन कानाला लावून जोरजोरात फोनवर बोलणारे व आपलं कोकणीतील संभाषण ऐकवणारे ज्येष्ठही मजेशीर आहेत.
या प्रवासात बहुतेक आढळून येणाऱ्या खाड्या आणि त्यात सुरू असलेले राज-रोस अवैध वाळू उत्खननही (स्थानिकांकडून प्राप्त माहितीनुसार) आढळून येते. तर खाडीत स्थानिक लोक काठीने मासेमारी करताना तर महिला समुद्री जीव वेचतानाही दिसून आली. जागो- जागी कातळ जमीन (वने) दिसून येते. या जमिनीतून निघणारा 'चिरा' नावाचा दगड जो येथे बहुतांश घर बांधणीत वापरतात. या जमिनीला चिरा दगडाच्याच छोट्याशा संरक्षक भिंतीही दिसून येतात. (येथून दगड काढण्यासाठी शासनाची रीतसर परवानगी लागते असे लोक सांगतात).
प्रवासात दिसलेल्या शाळा सुंदर व सुस्थितीतील इमारती असलेल्या दिसून येतात व बसचा प्रवास करणाऱ्यामध्ये निम्मे प्रवासी हे शाळकरी असल्याचे दिसले.(आजच शाळा सुरू झाल्या आहेत).रस्ते अरुंद असल्याने एकाचवेळी जास्त गाड्या रस्त्यावर आल्यास लगेच भला मोठा जामही अनुभवास येतो.
...आणि वल्ली सापडली
प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांचे कोकणातील व्यक्तींच्या स्वभाव गुणावर आधारित पुस्तक 'व्यक्ती आणि वल्ली' वाचनात आले होते. आज अशाच एक वल्लीचे दर्शन घडले.
प्रवासाची सुरुवातच एका वल्लीच्या भेटीने झाली. मालवण बस डेपोत हाफ पँट आणि लांब सदरा फोल्ड केलेला व हातामध्ये कुरकुरेच पाकीट असलेली एक व्यक्ती जी तेथे बसची वाट बघत बसलेल्या प्रवाशांची तगमग बघता व त्यांना धावते समालोचन (Live Commentary) ऐकवणारी वल्ली. 'आगाराच्या फलाट क्रमांक 4 वर कुडाळ गाडी लागली आहे, त्याच्या शेजारी ओरस गाडीही आहे प्रवाशांनी गाडीकडे प्रस्थान करावे', 'रत्नागिरी देवगड मार्गे बस थोड्याचवेळाय फलाट क्रमांक 6 वर लागणार आहे पण त्याचा ड्रायव्हर सध्या हरवला आहे त्यामुळे गाडीला उशीर होईल' अशी मिश्किल कोटी करणारी ही वल्ली आम्ही उभे असू तिथे आले अन् स्वरितकडे (आमचा चिरंजीव) कटाक्ष टाकत समालोचन करते झाले, 'कोणत्याच वस्तूचा हट्ट न करणारा डेपोत एक शांत मुलगा दिसला आहे अन् हळूच डोक्यावर हात ठेवत बेटा चांगला अभ्यास कर,मोठा हो' म्हणत पुढे जातो व परत सांगू लागतो 'चला ऑटोरिक्षा इथे गर्दी करू नका आणि ऑटो स्टँडलाच ऑटो लावा.' पेहरावाणे नीट- नेटकी ही वल्ली एक तर पूर्वाश्रमी एसटी खात्यात असावी नाही तर त्यांच मानसिक संतुलन ढासळल असावं अस वाटतं, मात्र कोणीही त्यांच्या अशा धावत्या समलोचनाचा त्रागा करून घेत नसल्याचे व एक विरंगुळा म्हणून यास बघत असल्याचे निरीक्षण.
मालवण ते रत्नागिरी बस प्रवासात प्रामुख्याने आसरा, मीठबावं, कुणकेश्वर,जामसंडे,देवगड (तालुक्याचे ठिकाण व नगरपंचायत),देवरूखवाडी, कात्रादेवी, पावस आदी महत्वाची गावे लागतात. कुठे जोरदार पावसाची बॅटिंग अन् कुठे वरून राजाचा तीक्ष्ण कटाक्ष अनुभवत येथील भूप्रदेश, व्यक्ती त्यांचे निरीक्षण करत ५ तासांचा 'प्रवासे सर्व सुखानां..' असा आमचा हा प्रवास अखेर रत्नागिरी बस स्थानकात येऊन स्थिरावला.
००००००


