कुटुंब,समाज आणि शासकीय यंत्रणा यांच्याशी निकराचा लढा देत कायमचा संघर्ष अनुभवणाऱ्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल महिलांचा यशस्वी संघर्ष दिग्दर्शक हरिष इथापे यांनी 'तेरवं' या चित्रपटाद्वारे मांडला आहे. चित्रपटाच्या एकूण निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष एकल महिलांसह विदर्भातील जवळपास ९० टक्के कलाकारांचा सहभाग, चित्रपटातील लोकेशन्स, चित्रीकरण आणि खास वैदर्भीय भाषेतील श्याम पेठकर यांची पटकथा ही या चित्रपटाची बलस्थानं ठरली आहेत.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला आणि हा सामाजिक प्रश्न कसा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य,नाट्य निर्मिती आदी माध्यमातून भाष्य झाले आहे. मुळात ‘तेरवं’ या मूळ नाटकातून निर्माण झालेला ‘तेरवं’ हा चित्रपट एकल महिलांच्या प्रश्नांची महत्वाची व दुर्लक्षित बाजू अधोरेखित करतो. परिस्थितीला शरणांगती पत्करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवांना कुटुंबात मिळणारी कष्टप्रद वागणूक, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सरकारी यंत्रणांमध्ये तिला हक्क मिळविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला नव्हता. हे शिव धनुष्य लिलया पेलण्याचं काम निर्माते नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने उभ राहिलं.
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचे तंत्र वेग-वेगळे असल्याने बऱ्याच ठिकाणी या फॉरमॅटमध्ये येणाऱ्या अडचणी व काही ठिकाणी दिग्दर्शकाला घ्यावं लागलेलं स्वातंत्र्य अशी उत्तम सरमिसळ करत हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
चित्रपटाची सुरुवातच गावाच्या वेशीवरील रोहित्रावर ( ट्रान्सफॉर्मर) चढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दृष्याने होते.गावातील लोक त्या शेतकऱ्याला खाली काढतात आणि ही शेतकरी आत्महत्या नोंदवून घेण्यासाठी तथाकथित दलालाची व शेतकऱ्याच्या भावाची उठाठेव सुरू असते. पतीच्या आत्महत्येची बातमी शेतकऱ्याच्या पत्निला कळताच तिने फोडलेला हंबरडा असं कथानक पुढे सरकत जातं. दलालाने उसकवल्यामुळे तहसिल कार्यालयासमोर प्रेत ठेवून आंदोलन करणारे लोक अस दृष्य असताना चित्रपटाची नायिका जनाचा प्रवेश होतो आणि तहसिलदाराला भेटून ही मागणी चुकीची आहे आणि यासाठी शेतकऱ्याच्या भावाने दलाला किती पैसे दिले हे वास्तव ती पुढे आणते आणि हे प्रेत उचलून त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे सांगते. इकडे विधवा झालेल्या महिलेला तेरव मंडळ तेरवीचं आमंत्रण देतात .
तेरवीच्या दिवशी या विधवेला आपल्या तेरव मंडळात आणून तिच्या आयुष्यात फार मोठे आभाळ कोसळल्याची तिच्या मनाची घालमेल दूर करून साडी-चोळी देत तिच्या मनावरील ओझं कमी करण्याचं काम जनाच्या तेरव मंडळातील सर्व महिला करतात आणि त्या विधवेला बळ देतात.मात्र, नवऱ्याच्या तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दीर आणि सासू शेतीच्या कागदपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी घेऊन तिला घराबाहेर काढतात.हा विषय दाखवताना जनाचं पूर्व आयुष्यही या चित्रपटात डोकावत.जनाला मुळात दोन भावंड. एक बहीण एक भाऊ. आई सर्पदंशाने गेलेली. जनाला शिकायचं होतं, बिएड करायचं होतं.मात्र, शेतकरी व वयोवृध्द वडिलांची हलाखीची परिस्थिती असल्याने ते जनाला शिकवू शकत नाहीत आणि तिचं लग्न लावून देतात.
सासरी जाऊन जनाच्या व्यक्तिमत्वातील करारी बाणा, तिचा संघर्ष यास पतीची साथ मिळते आणि ती व्यवस्थेसोबत संघर्ष करते. हे सर्व कथानक पुढ सरकत जातं.कथानकामध्ये दिग्दर्शकाने भुलाबाईची (भोंडल) गाणी, पाऊस पडवा म्हणून 'धोंडी धोंडी पाणी दे' असं म्हणत गावोगावी निघणाऱ्या धोंड्या, अशा ग्रामीण परंपरा चित्रपटांमध्ये उत्तमरित्या पेरल्या आहेत.
वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे बहिणीला शिक्षण न करता लग्न करावं लागल म्हणून 'ज्या घरात मला शिक्षण मिळत नाही, अशा गरीब शेतकऱ्याच्या घरात मला जन्माला घालू नको,देवा.' असं म्हणत आत्महत्या करणारी जनाची बहीण. आणि आपल्या नणंद सोबत हा प्रकार घडू नये म्हणून तिला शिक्षणासाठी आपल्या सासू-सासऱ्याचा विरोध पत्करून बाहेरगावी पाठविणाऱ्या जनाचा करारी बाणा पटकथेतून आणि नायिकेच्या तोंडी आलेल्या समर्पक संवादातून अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
स्व.राजा बढे ,श्याम पेठकर आणि ज्ञानेश वाकुडकर यांची गीते या चित्रपटातील आणखी एक बलस्थान असून ती समयोचितपणे मांडण्यात आली आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना एकजुट करून बचतगट, दारूबंदी सारखे उपक्रम राबवत या एकल महिलांची पॉवर बॅंक म्हणून जना या चित्रपटात प्रेक्षकांच्या समोर येते. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि राजकारणी यांच्याकडून अपेक्षित असलेली भूमिका परखडपणे मांडणारी जना या चित्रपटाच्या केंद्राभोवती आहे. या सर्व संघर्षात तिची गांधीवादी विचारांवरील श्रद्धा या चित्रपटाच्या समारोपात दिसून येते.
जनाची भूमिका वठवणाऱ्या किरण खोजे आणि तिच्या पतिच्या भूमिकेत संदीप पाठक व भासऱ्याच्या भूमिकेत किरण माने या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात तेवढ्याच दमदारपणे अभिनय करताना दिसून येतात. संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी सबंध चित्रपटात केलेले संगीत संयोजनही या चित्रपटाला साजेसं आहे.
विदर्भात घडणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ,प्रत्यक्ष प्रसंग अशा घटना बघणारे, निरीक्षण करणारे आणि यातून अस्वस्थ होणारी अशी सर्व मंडळी चित्रपटाच्या पठकथेपासून तर निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने हा चित्रपट व यातील विषय आणखी जोरकसपणे व प्रभावीपणे मांडल्या गेल्याचेही निरीक्षण आपसूक नोंदवले जाते.
एक सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. नागपूरच्या बर्डी परिसरातील इंटरनेटि मॉलमध्ये 'तेरवं' चित्रपटाचा 6 मार्च रोजी प्रीमियर शो आयोजित करण्यात आला त्याला हजेरी लावली. यानिमित्ताने या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. 8 मार्च या जागतिक महिलादिनी हा चित्रपट राज्यातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रितेश मो.भुयार
००००
