Wednesday, October 30, 2013

आई- वडीलांप्रती कृतज्ञता

खरे तरे 'आई असते जन्म भराची शिदोरी जी सरतही नाही अन उतरतही नाही' अगदी चपखल वर्णन केलय फमुंनी आपल्या कवीतेत आणि बाप हे कॅरेक्टरही माणसाच्या आयुष्यात तेवढच महत्वाच म्हणूनच तर डॉ. नरेंद्र जाधवांना 'आमचा बाप अन आम्ही' लिहावसं वाटल. आता आई-बापाच महत्व वर्णन करणार्‍या या दोन प्रातिनिधीक कलाकृतींचा संदर्भ देवून मूळ मुद्याकडे वळतो. माणसाला जन्म देणारे आणि त्याला जीवन मार्गावर चालण्यास सक्षम करणारे आई-बाप हे प्रत्येकच माणसाला कृतज्ञता व्यक्त करणार्‍या व्यक्ती. खरे तर त्यांच्या पासून लांब राहण्याची मला 20 वर्षांची सवय झाली. पण दूर राहूनही त्यांनी दिलेले संस्कार अण ताठ माणेन जगण्याच बळ शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणूनच त्यांच ऋण जिथे जिथे म्हणून जाहीररित्या व्यक्त करता येईल ते अगदी डोळसपणे केल. मग ते महाविद्यालयीन जीवनात शोध प्रंबंधाच्या अर्पण पत्रिकेतील त्यांचा उल्लेख असो किंवा त्यांच्या नावातील आध्याक्षरांनी तयार होणार्‍या टोपण नावाने(वनमोती-आईच नाव वनमाला तर वडलांच नाव मोतीरामजी)  लिखान करण्याची संधी.
                         पहिलं लिखान छापून आलयं राजकारण्यांबाबत आणि राजकारण्यांचीच मुलाखत करून ज्या राजकारण्याची बातमी करून मी सर्वात पहिली बायलाईन मीळवली होती ती सुध्दा एकाच दिवशी 11 आवृत्यांमध्ये तीही लीड स्टोरी. असो, हा केवळ योगायोग आहे तुर्तास ती मुलाखत येथे देत आहे. कृपया मुलाखतीच्या तळातील नावावर(पत्रकारितेच्या भाषेत क्रेडीट लाईन) लक्षद्या .
 

Tuesday, October 15, 2013

शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशी पहिलीच मुलाखत




 शासकीय नोकरितील पहिल्याच दिवशीचं पहिलंच काम :
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या(DGIPR) उपसंपादक पदाच्या निवड प्रक्रियेतील अंतिम यादी 14 फेब्रूवारी अर्थात 'व्हालेंटाईन डे' ला जाहीर झाली. तेव्हा मी इलेक्ट्रानीक मॉनिटरींग सेंटर(EMMC) या दिल्लीस्थित, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्थ काम करणार्‍या विभागात डयुटीवर होतो. त्यावेळेस मी 'IBN लोकमत' या वृत्त वाहिनी वरील एका डिबेटबाबत आलेल्या तक्रारीवर काम करीत होतो. माझं नाव DGIPR च्या अंतीम यादीत असल्याचं कळताचं खूप आनंद झाला. तसेच, आई-बाबांना फोन करून बातमी कळवली. आणि EMMC च्या उपस्थित सर्व मित्रांनाही बातमी कळवली. अन पहिल्यांदा या ऑफिस मध्ये आनंदाच्या भरात मी चक्क कामच केलं नाही.
   त्याचवेळी सेटच्या(State Eligibility Test) परिक्षेचा फॉर्म भरला असल्याने गावाकडे जाण्याचा प्लॅन होताच. 17 फेब्रूवारीला ही परिक्षा होणार होती, त्यामुळे सर्व आवरून आणि EMMC राजीनामा देण्यासाठी 15 दिवस आधी दयावयाची नोटीस देवून गावाकडे निघालो. आज अख्या आयुष्याची मेहनत फळाला आल्याचा आनंद घरी परतताना होता.आजचा ट्रेनचा प्रवास अर्थात दिनांक 15 फेब्रूचा प्रवास त्याअर्थानेच माझ्यासाठी थोडा स्पेशल होता. अन 16 ला घरी पोचलो. आंघोड, जेवन आटोपून थोडं निवांत बसलो. तोच, पोस्टमन आला त्याच्याहातात 'माझी ऑर्डर' होती. अन 'पोस्टींग' होत. My Always Loving Delhi. मग काय! एक-दोन जाणकारांना फोन लावला अन सेटची परिक्षा न देताच दिल्लीला परत जावून कामावर रूजू होण्याचा निर्णय घेतला. ट्रेनचं तिकीटही बूक केल.आयुष्यात पहिल्यांदाच अस घडल की घरी गेलो अन लगेच परतलो नुसता प्रवास अन प्रवास. पातालकोट या मला नव्यानेच शोध लागलेल्या ट्रेनने बैतूल व्हाया दिल्लीच्या प्रवासाठी निघालो. ट्रेन लेट होती म्हणून पोचलीही दिल्लीत लेट. तेव्हा रूमवर न जाता थेट महाराष्ट्र परिचय केंद्र या माझ्या जीवनातील पहिल्या सरकारी कार्यालयात पोचलो सकाळी 9 वाजता, 18 फेब्रूवारी2013 ला. अन सर्वात आधी रूजू अहवाल दिला. येथील बॉसला मॅसेज करून तसं कळवलं. मग शेजारील कटींगच्या दुकानात कटींग व दाडी आटोपून थोडा फ्रेश झालो.  सोबत असलेल्या बॅगमध्ये कपडे होतेच ते परिधान करून आज पहिल्याच दिवशी काय खास न्यूज करता येईल ते बघितल. कळल की उद्या 19 फेब्रूवारीला साहित्य अकादमीचे पुरस्कार वितरीत होणार आहेत. तेव्हा महाराष्ट्रातून ज्यांना हा पुरस्कार मिळणारं ते महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रसिध्द कथाकार जयंत पवार यांची मुलाखात केली तीही साहित्य अकादमीच्या सभागृहात जावून. 
 हाच माझ्या शासकीय नोकरीतील पहिला आनंदमय दिन. ती मुलाखात येथे देत आहे.
  ...................................................................
 सोमवार, 18 फेब्रुवारी, २०१३


लिखाण अधिक सकस आणि दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत -- जयंत पवार
                                                 




देशभरातील विविध प्रादेशिक भाषांतील साहित्यिक योगदानासाठी देण्यात येणा-या 2012 च्या साहित्य अकादमी पुरस्कारावर मराठी भाषेची पताका उंचवणारे साहित्यिक जयंत पवारांना " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " या लघुकथासंग्रहासाठी सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आनंदापेक्षाही आश्चर्य, संकोच व भिती यांचा त्रिवेणी संगम वाटतो अशा भावना व्यक्त करणारे मुळचे नाटय लेखनाच्या प्रांतात मुशाफिरी करणारे जयंत पवार कथेसारख्या लिखाणाच्या वेगळया पठडीला आपलेसे करतात. आणि तीच कलाकृती देशातील साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जाणा-या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवडली जाते हेच त्यांच्या लिखाणाचे वेगळेपण. कथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकूण मराठी साहित्यिकांमध्ये 1973 साली नामवंत लेखक व कथाकार जी.ए.कुलकर्णी नंतर दुसरा मान मिळवणारे जयंत पवार यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून साधलेला हा संवाद.

प्रश्न : साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना आहेत ?
उत्तर :
पुरस्कार मिळाल्याबद्दल मनात आनंद आहे. पण त्याहीपेक्षा आश्चर्य या गोष्टीचं वाटत की, मी मुळात नाटय लेखन करतो. आणि कथा लेखनाच्या प्रारंभीच मला हा पुरस्कार मिळत आहे. संकोच या गोष्टीचा वाटतो की माझ्यापेक्षा ताकदीचे कथा लेखक मराठी भाषेत आहेत आणि अशा स्थितीत मला कामाची पावती मिळते.या पुरस्कारामुळे वाचकांकडून माझ्या बद्दल अपेक्षा वाढल्यामुळे त्या पूर्ण करु शकेल का, याचे दडपण येऊन थोडी भीती सुध्दा वाटते.

प्रश्न : मूळ नाटय लिखानाचा पिंड सोडून कथेकडे कसे वळलात आणि कथा लेखनाचा प्रांत कसा वाटतो ?
उत्तर
: मी जरी आजपर्यंत नाटय लिखाण केले असले आणि अधांतर’, ‘काय डेंजर वार सुटलय’, ‘टेंशनच्या स्वप्नात ट्रेनया माझ्या नाटकांना वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असले तरी मला कथा लेखनाचा प्रांत तेवढाच प्रिय आहे. माझ्यामते तुम्ही एकदा नाटक लिहीले की, ते प्रेक्षकांसमोर येईपर्यंत मूळ संहितेत बराच बदल झालेला असतो. पण, कथा लेखनात तुम्ही एकदा कथा लिहिल्या की, त्या थेट वाचकांपर्यंत पोहचतात व इथे लेखक आणि वाचक यांचा थेट संवाद घडून येतो. माझ्या कथा लेखनामध्ये माणसांचे गुंतागुंत होत चाललेले आयुष्य मांडण्याचा प्रयत्न आहे. नामवंत कथाकार भाऊ पाद्ये यांनी कथा लेखनात घालून दिलेल्या काही मर्यादा व साच्यांना समोर ठेऊन मी कथा लेखन करतो. आणि ही पध्दती आता इतर लेखकही स्वीकारत आहेत.

प्रश्न : पुरस्कार प्राप्त " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " लघुकथा संग्रहाविषयी काय सांगाल ?
उत्तर :
या कथा संग्रहात मुंबई महानगारातील कामगार, कष्टकरी, अधिकारी आदीच्या जगण्यातील गुंतागुंतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कथेत निवेदन शैलीचा वेग-वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्नही या कथा संग्रहात केला आहे.

प्रश्न : या कथा संग्रहातील तुम्हाला आवडलेल्या कथा कोणत्या ?
उत्तर :
मुंबईतील फिनीक्स टेक्सटाईल मिलच्या ठिकाणी उभा असलेला आजचा मॉल हे कथासूत्र घेऊन या मिलमध्ये काम करणा-या कामगारांच्या चार पिढयांच्या जीवनाचे स्थित्यंतर असणारी " फिनीक्सच्या राखेतून उठला मोर " आणि " एका रोमहर्षक लढयाचा गाढीव इतिहास " या दोन कथा मला फारच भावतात.

प्रश्न : सध्या काय लिखाण सुरु आहे ?
उत्तर :
सध्या मी एक नाटक लिहायला घेतले आहे.

प्रश्न : पत्रकारितेच्या व्यस्ततेत नाटय व अन्य लेखनाला न्याय देण्याच्या आपल्या सूत्राला कसे मांडाल ?
उत्तर :
एक नाटक लिहायला मला साधारण पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. एक लेखक म्हणून समाजाचे चित्र उघडया डोळयाने बघणेही तेवढेच महत्वाचे असते आणि त्यासाठी बातम्यांव्यतिरिक्त टीव्ही न पाहणे, फेसबुक, ब्लॉग न लिहिणे यातून वेळ वाचवून मी, तो वेळ लिखानाचे संदर्भ गोळा करणे आणि निरीक्षणासाठी देतो.

प्रश्न: भारतातील रंगभूमीच्या स्थितीबाबत काय सांगाल?
उत्तर:
भारतात मराठी रंगभूमीनंतर पश्चिम बंगालची रंगभूमी श्रेष्ठ आहे. पण या बंगाली रंगभूमीला मध्यंतरी मरगळ आली.सद्य:स्थितीत केरळ आणि तामिळनाडूतील रंगभूमीसुध्दा ताकदीने पुढे येत आहेत.

प्रश्न: देशात सध्या कोणत्या भाषेत चांगले व मोठया प्रमाणात साहित्य लिखाण होत आहे?
उत्तर:
माझ्यामते सध्या आपल्या देशात हिंदी भाषेत विपुल प्रमाणात व दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे.

प्रश्न: मराठी भाषेत तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे का आणि त्यांच्या लिखाणाबद्दल काय वाटते?
उत्तर:
हो, मराठी भाषेत मोठया प्रमाणात तरुण लेखकांची फळी उभी राहत आहे. मला येथे अधोरेखित करायला पाहिजे की खलिस्तान चळवळ, बाबरी मस्जीद, जागतिकीकरण या चालू शतकाच्या 80-90 च्या दशकात घडलेल्या घटनांनंतर मराठी भाषेत तरुण लेखकांची एक मोठी फळी निर्माण झाली. आणि समाजातील विविध घटना व प्रश्नांना त्यांच्या लिखानातून वाचा फुटली.

प्रश्न : नव्या लेखकांना काय संदेश आहे !
उत्तर :
मेहनतीला पर्याय नाही. आपले लिखाण आपणच निरखून वाचनं व ते आणखी सकस होण्यासाठी प्रयत्नरत राहावे लागेल. यातच काय तो संदेश आला.

प्रश्न : पुरस्कारानंतर आता पुढे काय ?
उत्तर :
पुरस्काराने मी मुळीच हुरळून गेलेलो नाही. यापुढेही माझ्या लेखनावर प्रेम करणा-या वाचक प्रेक्षकांना उत्तमोत्तम साहित्य सादर करणे व त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे यावर माझा भर राहील.

प्रश्न : दिल्लीत पुरस्कार स्वीकारतांना काय भावना आहेत ?
उत्तर :
देशभरातील साहित्यिकांचा सन्मान देशाच्या राजधानीत होत आहे. देशभरातील विविध भाषेतील दर्जेदार साहित्यात मराठी साहित्याचे प्रतिनिधीत्व करायला मिळत आहे हा ख-या अर्थाने मराठी लेखन, वाचन करणा-या व बोलणा-या तमाम मराठी जणांचा सन्मानच राजधानी दिल्ली दरबारी होत आहे. याचा मनस्वी अभिमान वाटतो.


Thursday, October 10, 2013

विज्ञान प्रदर्शनी


  डोक्यात शिरणार्‍या नवीन-नवीन कल्पना अन मग त्याचाच पिश्चा पूरवून त्याचा एक प्रयोग घडून प्रत्यक्षात येण, अन समाजाच्या उपयोगी पडनं, अशी मोठी चेन ज्या विषयाला आहे ते म्हणजे विज्ञान. मग याच ध्येयाने प्रेरित होवून कार्य केलेली आईनस्टाईन, गॅलीलीओ ते अगदी एपीजे अब्दुल कलाम, जयंत नारळीकरांपर्यंत शास्त्रज्ञांची अशी माेठी फळी सांगता येईल. तसेच, आपणही प्रत्येक जण आपल्या आजुबाजूच्या परिसराच्या सततच्या वावराने काहीना काही शोधत असतो. शालेय जीवनात ही ओढ असण आणि त्यास शालेय विज्ञान प्रदर्शनी सारख व्यासपीठ मिळन त्यातही भारी. अभ्यास सांभाळून अशा प्रदर्शीनींमध्ये सहभाग घेण म्हणजे आपली मांडणी कला आणि वक्तृत्वाची खरी कसोटी असते. अन हे ज्याला जमल तो बाल शास्त्रज्ञ होण्यास वा निदान त्या दृष्टीने त्याचे पाऊल पडण्यास सुरुवात होत असते. मी ही तसा प्रयत्न केला होता 6 वी‍त असताना. महात्मा  ज्योतिबा फुले विद्यालय विहीगाव या शाळेच प्रतिनिधीत्व अंजनगाव सुर्जी येथे आयोजित तालुक्का स्तरीय स्पर्धेतला तो माझा सहभाग. प्रयोगाच नाव 'मुळासकट रोपट उपटून काढण्याचे यंत्र'. लोखंडी बादलीला समसमान चिरा देवून तयार केलेले हे यंत्र आणि तिथेच माझ्यातील बाल शास्त्रज्ञ शांत झाला. पुढे माझ्या शिकवणीला येणार्‍या विद्यार्थीनीला 'घरगुती कुकरचे मॉडेल' बनवून देण्यात केलेली मदत येवढाच काय तो शालेय विज्ञान प्रदर्शनीशी आलेला संबंध. आणि आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर थेट राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीचे वार्तांकण करण्यासाठी गेलो असतानाचा हा खास वृतांत.   

       केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने आयोजित तिसर्‍या राष्ट्रीय शालेय विज्ञान प्रदर्शनीत पश्चिम विभागातून महाराष्ट्राच्या क्षितीज महाजनच्या अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठीया प्रयोगाने प्रथम तर सुरेश पवार ने तयार केलेली आधुनिक बैलगाडी या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली.
           येथील प्रगती मैदानावर 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. त्यात देशभरातून एकूण 5 विभागातून 935 प्रयोग सादर करण्यात आले होते. महाराष्ट्रातून एकूण 99 प्रयोग सादर करण्यात आले होते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांचा मिळून पश्चिम विभाग तयार करण्यात आला. या विभागातून महाराष्ट्राच्या नागपूर येथील मुंडले इंग्लीश स्कुलचा इयत्ता 9 वीत शिकणारा विद्यार्थी क्षितीज महाजन ने तयार केलेली अंध व्यक्तिंना उपयुक्त ठरणारी काठीया प्रयोगाने प्रथम क्रमांक पटकवला. क्षितीजने ही काठी बनवण्यासाठी स्वत: नागपुरातील द ब्लाईंड बॉईज इन्स्टिटयुटमध्ये जावून तेथील अंध विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांना दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणी समजून घेतल्या आणि येथूनच सेन्सर चा उपयोग करून अंधाना उपयुक्त ठरणार्‍या काठीच्या प्रयोगाचा जन्म झाला. आपल्या शिक्षकांशी चर्चा करून, विविध पुस्तक वाचून व इंटरनेटहून माहिती गोळा करून क्षितीजने सेंसरचा वापर करून ही काठी तयार केली. दिशा दर्शक काठीच्या माध्यमातून अंध व्यक्तिला रस्ता कळतो त्यासाठी त्या व्यक्तिच्या गळयात सेंसर अडकवण्यात येतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिच्या मदतीशिवायही अंध व्यक्ती घराबाहेर जाऊन आपले काम सुरळीतपणे पार पाडू शकतात.
              कोल्हापूर जिल्हयातील, करवीर तालुक्यातील, कसबा आराळे येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सुरेश पवार याने तयार केलेल्या आधुनिक बैलगाडी च्या प्रयोगाने दुसरा क्रमांक पटकावून कौतुकाची थाप मिळवली आहे. आजपर्यंत चारचाकी व दुचाकी गाडयांमध्ये बरेच प्रयोग झालेत. पण, देशातील शेतकर्‍यांची बैलगाडी मात्र या प्रयोगांपासून लांबच होती. सुरेश पवार ने आपल्या भागातील शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आधुनिक बैलगाडीचा प्रयोग तयार केला. त्यात बैलगाडीचा अपघात झाल्यावर बैलगाडीच्या काप्त्या आवळल्याने बैलांचा फासी लागून होणारा मृत्यू टाळण्यासाठी गाडीवानाच्या हाताशी एक यंत्र बसवले आहे. ज्यामुळे अपघाताच्यावेळी काप्‍त्या सुटून बैल सुरक्षीत बाहेर पळू शकतात.या  बैलगाडीच्या पुढच्या भागात एक चाक बसवून बैलांच्या खांद्यांवर येणारा भार कमी करण्यात आला आहे. बैलगाडीच्या चाकाद्वारे तयार होणार्‍या गतीज उर्जेचा उपयोग करून बैलगाडीला पुढील बाजुला दिवे बसविण्यात आले आहे तसेच मागच्या बाजुला इंडिकेटर बसविण्यात आले आहे. त्यामुळे रात्री बैलगाडीवर कोणती गाडी आदळून अपघात होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. बैलगाडीच्या चाकालाच करवत व हत्यारांना धार लावणारे एंब्री यंत्रही बसविण्यात आले आहे.
       याखेरीस सांगली जिल्हयातील,जत तालुक्यातील, कुंभारी येथील न्यू इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी स्वप्नील पाटील ने तयार केलेला इलेक्ट्रो सेल्यूलर एक्स्प्लोजीव रिमोट इन बाय हयूमन इलेक्ट्रिक जनरेटर, अहमदनगर जिल्हयातील, संगमनेर येथील सर डी.एम.पेटीट विद्यालयाचा विद्यार्थी विशाल गुर्रप याने तयार केलेला एसएमएस द्वारे मोटार पंप सुरु करण्याचा प्रयोग हे प्रयोगही या विज्ञान प्रदर्शनीतचे विशेष आकर्षन ठरले.                                  

Wednesday, October 9, 2013

विदेशी मुलींचा दिल्ली गणेशोत्सवातील सहभाग

उत्सवाला देश, भाषा वा प्रांत यांच्या सिमा नसतात हे आपण बरेचदा वाचतो वा ओघा-ओघात बोलून जातो. पण त्याची प्रचिती घेतली म्हणजे हा विश्वास अजून दृढ होतो. असाच अनुभवास आलेला किस्सा आपल्या समोर मांडतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने आम्ही अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाचे आयोजन केले होते. मी दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत आणि देशाच्या वेगवेगळया भागातून आलेल्या माझ्या मित्रांना यासाठी आमंत्रित केले होते. त्यातील बहुतेकांनी दांडया मारल्या बहुतेक आले आणि यमुनेत गणेशाचे विसर्जन करेपर्यंत आमच्या सोबत होते. "यार मस्त लगा आप लोगों के साथ गणेश विसर्जन में शरीक होकर" अशा बोलक्या प्रतिक्रीया होत्या मित्रांच्या.
                                पण आनंदाचा कळस तर तेव्हा गाठला की, आम्हाला बाहेरूनच न्याहाळणार्‍या दोन विदेशी मुलींना मी आमच्या उत्सवात सामील होण्याची विनंती केली आणि त्यांनी ही ती मान्य करून आमच्या सोबत ताशे आणि झांज पथकाच्या ठेक्यावर ठुमके मारलेत. जवळपास पाऊन तास त्यांनी आमच्या सोबत घालवला. काय होत्या त्यांच्या भावना जाणून घेवूया त्यांच्याच कडून या Vedio च्या माध्यमातून.

Saturday, October 5, 2013

कपाशीची शेती धावत समालोचन



क्रिकेटचे मराठी समालोचन ऐकने हा माझा आवडता छंद.
मामांकडे शिक्षणासाठी होतो तेव्हा तिथे क्रिकेटची स्पर्धा असायची त्यात माझे मामा अविनाश पोटदुखे झकास मराठी समालोचन करायचे. पुढे पत्रकारीतेत आलो अन या समालोचनाचे पूर्वाश्रमींचे संस्कार उपयोगी आलेत.

Thursday, October 3, 2013

अनोखा सफर 'शाहरूखच्या आझादी एक्सप्रेसचा'



शाहरूख खान माझा आवडता नट. त्याच्या नैसर्गीक अभिनयाचा मी खूप चाहता आहे. त्याच्याशी अशी वादळी भेट होईल अस काही अपेक्षीत नव्हत. पण, ती भेट झाली. भेटीच वैशिष्टय अस की आमची ही भेट व वार्तालाप तमाम प्रेक्षकांनी बघीतला. आता तुमची फारशी उत्सूकता न तानता सांगतो, 14 ऑगस्ट2013 रोजी इंडिया टीव्हीच्या स्टुडिओमध्ये(या वृत्त वाहिनीचा आपकी अदालत हा प्रसिध्द कार्यक्रमही याच स्टुडिओत चित्रीत होतो) रात्री 3 ते 4 वाजे दरम्यान चित्रीत झालेला कार्यक्रम 'शाहरुख की आजादी एक्सप्रेस' आणि त्यात विविध राज्यांच्या चमुनी शाहरुखशी संवाद साधावयाचा होता. आणि महाराष्ट्राच्या 15 सदस्यीय चमुच नेतृत्व होत माझ्याकडे.  
स्टुडिओत रात्री 9 वाजताच मराठमोळया वेशात  दाखल झालेलो आम्ही आणि आमच्या सारखेच पंजाब, तामीळनाडू, केरळ आदी राज्यांच्या चमूचे सदस्य खूप वैतागलो होतो शाहरूखची वाट बघून. घडयाळीचे काटे फिरत होते 10 , 11, 12 तस-तसे सर्वांना पेंगायला येत होत. पण शाहरूखच्या दर्शणाची ओढ सर्वांनाच होती. आम्हाला 1 वाजता मुख्य स्टुडिओत सोडण्यात आल. तिथेही शाहरूखची वाट बघण्यात दीड तास गेला आण्‍िा रात्री 2.30 वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुपर स्टार बादशा शाहरूख एकदाचा अवतरला. त्यात कार्यक्रम सुरु झाला आणि ज्या- त्या मुली शाहरुखला विनवनी करू लागल्या. शाहरूख I am your fan & I want to hug you, want to dance with you, कोणीतर शाहरूखला लूंगी परिधान केली तर कोणी डान्स शिकवला. आधीच वेळ एवढा झालेला. त्यात लोक असले प्रकार करताताहेत त्यामुळे आता इथे महाराष्ट् कसा Represent करवा हा प्रश्न होता. शेवटी प्रतिकूल परिस्थितीत माईक हाती घेतला. मै रितेश भुयार महाराष्ट्र से आया हु. सर आप महाराष्ट्र में रहते है. इस का गर्व है हमें हम सब अपने प्रांत का लिबाज पहन के आए है , हम यहा चाहेंगे की आप हमारे साथ महाराष्ट्र गित गाए, त्यावर शाहरूख उत्तरला. यार मुझे ताे इतनी खास मराठी आती नही. केवल एक Sentence आता है" सावधान पुढे गतिरोधक आहे." फिर भी मै प्रयास करता हू महाराष्ट्र गित गाने का. त्यानेही ही गायल आमच्यासोबत गान. त्यानंतर  थेट शाहरूखच्या गोटातच प्रश्न टाकला. ' दिपीका के साथ आप दो बार हिट हूए. काजोल के साथ कटरिना के साथ भी. कई हिरोईन के साथ आपकी अच्छि बनती है , इस के पिछे क्या केमेस्ट्री है.' या प्रश्नाच समर्पक उत्तर दिल शाहरूख ने. कार्यक्रम आटोपला पहाटे 4 वाजता अन आम्ही शाहरूखच्या आझादी एक्सप्रेसचा प्रवास आटोपून घर जवळ केल.