पंचपोथी असो, पंचक्रोशीतील
कुठल्या गावी किंवा कुणाच्या घरी भजन असायचे तेव्हा तिथे आवर्जून उपस्थित राहून
तल्लीनतेने हरिभजनात रमणारा देवाचा लाडका भक्त आयुष्याच्या अंतिम समयी भगवंताच्या
नामस्मरणाने सर्वांचा निरोप घेतो. हा प्रसंग लिहीतानाही डोळे अश्रुंनी डबडबताहेत
पण, नियतीने मांडलेला हा डाव स्वीकारण्यापलीकडे काहीच नसलेले आपण पामर असल्याची
जाणीव सारखी होत असल्याचे शल्य मनाला बोचते. सर्वात मिसळणा-या व मनाने अत्यंत
निर्मळ, स्पष्ट, वडील बंधुंप्रमाणेच सतत चेह-यावर हास्य असणारे सच्चे भाविक प्रिय
नंदकिशोर काकांचे निधन झाल्याची वार्ता आली. मन पिळवटून टाकणारी ही दु:खद वार्ता
स्वीकारण्याचा डाव नियतीने माझ्या प्रमाणेच
आम्हा भुयार कुटुंबियांसमोर मांडला.

काही वर्षांपूर्वी आदरणीय
नामदेव काकांचे अचानक आमच्यातून जाण्याची जखम ताजी असतानाच त्यांचे धाकटे बंधु
आदरणीय नंदकिशोर काकांचे अकाली आमच्यातून जाने क्लेषदायी व आम्हा कुटुंबियांची
मोठी हानीच ठरली. नौकरी व शिक्षणासाठी घरापासून लांब असणारे आम्ही (चि.
अनुप्रित, कु. रेणु, सौ. सोनाली, चि. स्वरित आणि मी) तर त्यांचे अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही एवढा हा
नियतीचा क्रुर डाव. यावर्षी आम्ही दिवाळीत काकांसोबत घालवलेला मुल्यवान वेळच
त्यांचा व आमच्यातील अंतिम संवाद ठरला.
मला भेटलेले काका........
आठवतात ते दिवस तिसरी-चौथीत असू आम्ही तेव्हा...
बेगमपुरा(अचलपूर) येथे आत्याकडे जायचो आम्ही आई, मोठीआई व
आजीसह तेव्हा देवडीवर आम्ही मुद्दाम काकांच्या दुकानाकडून मोर्चा वळवायचो. अन
काकाही आम्हा लहानग्यांचा हट्ट पुरवत चॉकलेट दयायचे आम्हाला. आत्याकडे
जाण्यापेक्षा काकांकडून चॉकलेट मिळविण्यात जास्त आनंद होत असे आम्हाला. काकांनीही
आम्हाला कधीच निराष केले नाही, चॉकलेट देऊन आम्हाला खुश करण्याची त्यांची त-हा
सदैव स्मरणात राहील आम्हा भावंडांना.
म्हणता म्हणता मोठा झालो. शिक्षणासाठी घरापासून लांब
असल्याने जेव्हा-जेव्हा गावी यायचो तेव्हा काकांकडून
हाली खुशाली घेण्याची त्यांची स्टाइल भारी आवडायची आपल्याला. सुटयांमध्येही घरी
फारस राहायला मिळालच नाही त्यामुळे कमी कालावधीतील वेळेच्या सदुपयोगात काकांचा
मोठा हातभार लागायचा तो म्हणजे, ‘चला मग रितेश भाऊ आज भजनाला’या वाक्याने मग मी
ही नकारघंटा न वाजवता निघायचो काकांसोबत. काकांना भजनाचा लडा फार. घरातही भजन,अभंग,हरिपाठाच्या कॅसेटचा
संग्रह, भजन-अभंगाची स्वतंत्र वही असा सर्व लवाजमा त्यांच्याकडे होता, कधी-मधी मलाही याचा लाभ मिळत असे. काकांचे हे भजनाचे वेड आदरणीय सुनिता
काकुंनीही आपलेसे करून घेतले होते ही त्यात आणखी जमेची बाब.
काकांनी निरोप घेण्याआधी लाभलेला त्यांचा स्मरणीय
सहवास....
तब्बल १० वर्षांनी मी किर्तन सादरीकरणाचा चंग मनाशी
बांधला आणि यावर्षी (२०१७) आषाढी
एकादशी निमित्त आमच्या घरा शेजारील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात हे स्वप्न पूर्णत्वास
आणताही आल. किर्तनाकरिता टाळकरी म्हणून काकांची समर्थ साथ ही या वर्षातील ठळक
आठवण. किर्तनाचे चित्रीकरण केले
असल्याने त्यात काका मला भेटतील आणि त्या
स्वर्णीम आठवणीचा ठेवा ठरतील.

वैद्यकीय कारणास्तव मी जवळपास १ महिन्यासाठी गावी आलो
होतो (याच वर्षी) या काळात काकांचा मोठा सहवास लाभला पण,
तो सहवास शेवटचा ठरावा हे दुर्देवी. आमच्याकडे यावर्षी देवीचे घट बसले होते ,
घटाच्या आरतीसाठी काका नियमीत यायचे. घट विसर्जनासाठी काका सकाळीच उठले आम्ही तो
घट विसर्जन करून आलो पण त्यांच्या आवडीची ही घट पुजाही शेवटचीच ठरावी हे दु:खद. याच
काळात आम्ही कुळदैवत गनोजा देवी, अमरावतीची अंबादेवी आणि पिंगळादेवी असे दर्शनाला गेलो यावेळी काका आणि
काकुंचा सहवास अन धम्माल आम्हा उभयतांसह, आशिष दादा –मंजु वहिनी, उमेश व आदरणीय
सुमन मोठे आई आणि कु. निता यांच्यासाठी
स्वर्णीम ठरली. या प्रवासातील गाण्यांच्या भेंडया व त्यातील काका-काकुंचा उत्स्फुर्त
सहभाग ही स्मरणीयच.
आमच्या विलायतपु-यात यावेळी शारदोत्सवात ह.भ.प. अरबट
बुवांच किर्तन होत. टाळकरी नसल्याने काका, गणेश राऊत, दिगंबर पाटील आणि मी असा
आम्ही जोड बसवला व किर्तनात टाळकरी म्हणून साथ दिली. इथेच आम्ही काकडाआरती (प्रभात फेरी) करण्याचा संकल्प घेतला. व कार्तिक
महिन्यातील ही काकडारतीची धुरा जवळपास १० ते १२ वर्षांनंतर काकांच्या उत्साही
सहभागामुळे तळीस नेऊ शकलो. कर्मभूमिच्या हाकेमुळे मी तर हा डाव अर्ध्यावरच सोडून
दिल्लीला निघून आलो. मात्र, आदरणीय अनिल मामा आणि काकांनी ही काकडारतीची धुरा
समर्थपणे सांभाळली. याच काळात भोनखडे महाराजांकडून विठ्ठल मंदिराकडे येणा-या
दिंडीतही काका सहभागी होत मी ही काकांसोबत
जायचो. याकाळातच माकनेरपंथी भजनात मी काकांसोबत गेलो होतो. पुढे दिवाळी निमित्त
आम्हीसर्व काकांच्या दुकानात भेटलो तीच आमची
शेवटची कौटुंबिक भेट ठरली. काका-काकुंनी आमच्या स्वरित ला भेट दिलेला सुंदर
असा ड्रेस आमच्या मुलालाही कायम आठवणीत राहणार.
शेवटचा दिस गोड व्हावा...
मनुष्याचा
जन्म आणि मृत्यू कसा व कोठे होईल याचा अंदाज फास कमी असतो. ब-याच लोकांचा
अंतिम क्षण हा अपघात, हॉस्पीटल किंवा अन्य असू शकतो मात्र, आपल्या आवडत्या
कार्यातच आपला अंतिम श्वास घेतला जावा असा दुर्लभ योग क्वचित लोकांच्या वाटयाला
येतो. नंदकिशोर काका याबाबतीत फार भाग्यवान ठरले. ज्यादिवशी त्यांनी अंतिम श्वास
घेतला ते ठिकाण होते त्यांचे आवडते दत्त मंदिर आणि कार्यही होते पंचपथीचे भजन.
त्यांनी यावेळी २ भजनेही सादर केली आणि आरतीसाठी उभे राहताच त्यांना त्रास झाला.
आणि तेथून केवळ दीड तासात त्यांच निधन झाल. एका अर्थाने त्यांच्या आयुष्याचा तो
क्षण म्हणजे ‘याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस
गोड व्हावा’ या संत उक्ती प्रमाणेच ठरला.
आदरणीय
काकांस भावपूर्ण श्रध्दांजली






