देशाच्या
राजधानीत करीअर करण्याचा घेतलेला निर्णय आणि तो प्रत्यक्षात नेण्यासाठी मला
माझ्यातील ज्या गुणाची सर्वात ज्यास्त मदत झाली असेल तर तो म्हणजे ‘अनुवाद’. ‘एक तरी अंगी असू दे
कला, नाही तर काय फुका जन्मला.’ या संत
तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या ओळी माझ्यातील अनुवाद कलेसाठी चफकल लागू पडतात. मी
काही अनुवादाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल नाही. मात्र, दिल्लीत जगण्यासाठी
संघर्षाच्या काळात पोटाचीखळगी भरण्यासाठी अनुवाद क्षेत्रात उडी घेतली. मराठी
भाषेतून हिंदी व हिंदीतून मराठी व पुढे पुढे चक्क मराठीतून इंग्रजी अनुवाद करण्याची
कला मी आत्मसात केली. चांगलाच आत्मविश्वास निर्माण झाला. आता हिंदी, मराठी व इंग्रजी
या तिनही भाषा संवादाचं माध्यम असून, त्यात आपल्याला लिलया व्यक्त होता येते हा
आत्मविश्वास आलाय.
पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येणा-या
प्राथिमीकीपासून(एफआयआर)सुरुवात
झालेल्या माझ्या अनुवाद कार्यात अनेक यशाची पाने लिहीली गेली. सरसंघचालक मोहन
भागवत यांच्या नाशिक येथील व्याख्यानावर आधारित ‘समन्वय का
आधार’ या ३० पानी पुस्तकाचे ‘समन्वयाचा
आधार’ हे पुस्तक अनुवादित केले. दिल्लीतील नामांकीत प्रभात
प्रकाशनासाठी दिवंगत राज्यसभा खासदार बाळ आपटे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारे २५०
पानांचे मराठी पुस्तक हिंदी भाषेत
अनुवादीत केले त्यासाठी प्रकाशकाने २५ हजार रूपये मानधन दिले. मात्र, त्यांना
अनुवादाची क्रेडीट लाईन मागितली होती ती दिली किंवा नाही ते बघायला मिळाले नाही. (हे पुस्तक अनुवादाचे खूप मोठे काम असल्याने व वेळेत दयावयाचे असल्याने
माझे मित्र अजित पाटील व मैत्रिण प्रियंका गौतम यांनीही काही पाने हिंदीत अनुवादीत
करून दिली होती.). ‘गोईंग टू स्कुल’
या शिक्षण क्षेत्रात कार्य करणा-या व युनेस्को सोबत जुळलेल्या
संस्थेच्या विदर्भातील प्रशिक्षण कार्यावर आधारीत डिव्हीडी कॅसेटचे
ट्रान्सक्रिप्शन कार्य, तसेच दिल्ली आयआयटी भागात कार्यरत एक एनजीओ जी
युनेस्कोसोबत जुळलेली असून पहिली ते चौथीच्या मुलांसाठी पाठयपुस्तके तयार करते या
संस्थेने तयार केलेल्या १४ पुस्तकांचे अंतिम संपादन कार्य करण्याचा अनुभव ठसठसीतपणे
आजही आठवणीत आहे.
श्रीमान सुशीलकुमार शिंदे साहेबांसाठी अनुवाद कार्य
माझ्या उमेदिच्या काळात दिल्लीतील २ कृष्णमेनन मार्ग
या तत्कालीन केंद्रीय उर्जा मंत्री व पुढे केंद्रीय गृह मंत्री श्री. सुशीलकुमार
शिंदे यांचे निवासस्थान म्हणजे माझ्यातील अनुवादकासाठी एक आधारवडच जणू.
साहेबांच्या बंगल्यावर मी कित्तेकदा हक्काने जायचो. येथील खास महाराष्ट्रीय
खानसामा व त्याच्या हातची चविष्ट कॉफी कायम स्मरणात राहील या माध्यमातून. श्री. शिंदे
साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या भाषणांचे (इंग्रजी, हिंदी व मराठी) संपादन
व कंपायलेशन करण्याचा अनुभवही आनंददायी आहे. याशिवाय शिंदे साहेबांच्यावतीने विविध
क्षेत्रातील मान्यवरांना शुभेच्छा पत्र लिहीने हा अनुभवही स्मरणीय आहे. शिंदे
साहेबांवर एक डॉक्युमेंटरी तयार झालेली त्यासाठी इती पासून ते अथ पर्यंत संपूर्ण
संशोधन व लिखानाचे कार्य व सोबतच मराठी व हिंदीतील स्क्रीप्ट लिखानाचे कार्यही
केले हा खूप छान अनुभव होता. या ठिकाणी श्री. शिंदे साहेबांच्या विश्वासातील
त्यांचे निकटवर्तीय व असीस्टंट पर्सनल सेक्रेटरी श्री. सोमनाथ घोलप यांच्यासोबत हे
सर्व अनुवाद व संपादनाचे कार्य मी पार पाडले हे ही नम्रपणे वर्णन करावेसे वाटते.

याशिवाय दिल्लीत एलआयशी व ग्राहक हक्क न्यायालयात फाइल होणा-या विविध
केसेस साठी मराठीतून हिंदी व इंग्रजीत मोठया प्रमाणात अनुवाद केला. माझ्या अनुवादाचा दर सन २००८ ते आज तागायत स्थिर आहे तो
म्हणजे मराठीतून हिंदी अनुवादासाठी प्रती पानाचा दर १५० रूपये व इंग्रजी अनुवादाचा
दर २०० रूपये. हा दर कायम ठेवण्याचा हेतु हा ही की दिल्ली सारख्या शहरात
लोकांना अनुवादाच्या रूपाने मदत करता यावी म्हणजे माझ्यातील अनुवादकाला मी कमी
व्यावसायीक व ज्यास्त सामाजिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
पार्श्वनाथ बिल्डर्स या दिल्लीतील नामांकित संस्थेने
अहमदनगर जिल्हयात शिर्डी भागात जमीन खरेदी केली होती. हे खरेदी विक्रीचे सर्व
कागदपत्र मराठीत होते व या संस्थेला सर्व कागदपत्र इंग्रजीत करून घ्यायचे होते
जवळपास ८० कागदपत्र मी इंग्रजीत अनुवादीत करून दिले, अनुवादाचा दर होता २००
प्रत्येक पान. अशाच दिल्लीतील एका कॉर्पोरेट कंपनीसाठी फार मोठे काम मी हाती
घेतले या कामावर मला स्वत:चा लॉपटॉप घ्यायचा होता, हे ध्येय समोर ठेवून अक्षरष:
रात्र रात्र भर काम केल व या कंपनीसाठी केलेल्या कामातून मी फास्ट ट्रॅकची एक
मनगटी घडयाळ( किंमत
१८०० रूपये) जी अजूनही मी वापरतो, ४ हजारांचा एक नोकिया फोन व ३५ हजारांचा लॅपटॉप खरेदी केला होता.
एनसीटीईच्या वतीने स्थापित आयोगावर भाषा सल्लागार म्हणून कार्य
दिल्लीतील आयटीओ भागात ‘राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद’ (एनसीटीई) चे कार्यालय आहे. या कार्यालयातून मला फोन आला, मग काय मी प्रत्यक्ष
भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही देशभरातील डीएड व बिएड विद्यालयांच्या इमारती उभारणीत झालेल्या
घोळाचा आढावा घेण्यासाठी देशव्यापी आयोग स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष हे
सार्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश श्री. कृष्णा आहेत. देशभरातील जवळपास ६
सीईआरटीचे अध्यक्ष या समितीचे सदस्य होते ‘महाराष्ट्रातील ‘डीएड’ व ‘बीएड’ महाविद्यालयांच्या जमीन व्यवहारातील घोळाबाबत
अचूक माहिती शोधण्यासाठी आम्हाला मराठी भाषा सल्लागार म्हणून तुमची मदत हवी आहे’. असे या संस्थेतील वरिष्ठ अधिका-यांनी
विनंती केल्यानंतर या कामासाठी मी ही होकार दिला. मग या समितीचे सदस्य मला महाराष्ट्रातील
विविध ‘डिएड’, ‘बिएड’ विद्यायलयांचे खरेदी खत दाखवत त्याबाबत मी त्यांना मराठीतून हिंदी व
इंग्रजीत विषय समजावून सांगत असे त्यानुसार ही मंडळी आपसात खलबत करून आप-आपला अहवाल तयार करीत असत. या कामासाठी दररोज ६ तासाच्या कामासाठी २५००
रूपये येण्या-जाण्याचा खर्च दुपारचे जेवन व दोन वेळ हाय टी
देण्यात येत असे. केवळ भाषा ज्ञानाच्या जोरावर मला एवढं मोठ कार्य करता आलं. हे
कार्य जवळपास ५ दिवस चालले. याकाळात देशातील एससीईआरटीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबात
व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांसोबत चर्चा व खलबतांचा अनुभव मला
समृध्द करून गेला.
दोन दिवसांचा निवासी अनुवाद
दिल्लीतील एका व्यक्तीचा मुलगा जळगावला
शिकायला होता, तिथे त्याला अफिम पिण्याच्या कारणावरून वसतीगृहातून काढण्यात आले
असे एक प्रकरण होते. वडीलांचं म्हणन होत की त्याला चुकीच्या पध्दतीने या केस मध्ये
फसविण्यात आले. त्या मुलाचे वडील मला भेटायला आले, ‘आपका मोबाईल नंबर मिला है, ‘क्या
आप मेरे बेटे पे लगाई गयी मराठी केसेस के बारे में अंग्रेजी मे ट्रान्सलेट करके
दोगे?’. असे त्यांनी निरागसपणे विचारले. त्यांची अडचण बघता
एका बापाचं दु:खही मला पहावत नव्हत, मी होकार दिला कामाला. मग पुढचे दोन दिवस
त्यांनी मला त्यांच्या घरीच निवासी ठेवून घेतलं. मग दोन दिवसात जवळपास ८० मराठी
पानांचे मी इंग्रजीत भाषांतर करून दिले. या काळात त्यांनी माझी खूप बडदास्त ठेवली.
वेळेवर कॉफी, नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवन, रात्री झोपायचे कपडे पुरविले अशी
सर्व व्यवस्था केली त्यांनी. हा ही एक अनुभव मला अनुवादाच्या कलेमुळे मिळाला.
या शिवाय खूप हाय प्रोफाईल लोकांच्या
घटस्फोटाच्या पोलीस केसेसच्या अनुवादाचे कामही केले मी, त्यातून सामाजिक प्रश्नाची
भिषणताही कळली. बहुतेक केसेस मध्ये महिलांवरील अत्याचारच दृष्टीपथास येत असे.
महाराष्ट्र परिचय केंद्रात हिंदी प्रतिवेदकपदाची कारकीर्द
सध्या
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ज्या कार्यालयात मी
उपसंपादक म्हणून कार्यरत आहे तिथेच उमेदिच्या काळात मी हिंदी भाषा प्रतिवेदक अर्थात
अनुवादक म्हणून कार्य करायचो.(जवळपास वर्षभर)
यावेळी या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात येणा-या मराठी बातम्या व
लेख राष्ट्रीय प्रसार माध्यमांपर्यंत पोचविण्यासाठी मी याच बातम्या व लेख हिंदीतून
अनुवादित करीत असे. इतर काम सांभाळून मी हे कार्य करीत असे. दर तीन महिन्यांनी या
कार्यालयासोबत माझ्या कराराचे नुतनीकरण होत असे महिन्याला मला ५ हजार रूपये मानधन
मिळत असे. त्यामुळे मागे वळून पाहताना
मज्जा येते.
एकंदरीतच अनुवाद या कलेतून मला विविध विषय
कळले व मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध शब्दांच्या छटा कळल्या. या सर्वांमुळे
मला मोठा आर्थिक आधारही झाला. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. या कार्यात जमीन व
महसुलाबाबतच्या विविध टर्मीनोलॉजी समजून घेताना मला माझे मामा मंडळ अधिकारी
श्रीयुत अविनाश पोटदुखे यांची तर माझे मित्र पोलिस निरीक्षक प्रमोद पाचकवडे यांची
सुरुवातीच्या काळात खूप मदत झाली. या शिवाय त्या-त्या वेळी त्या-त्या क्षेत्रातील
प्रत्येकांशी चर्चा करून मी माझ्याकडून उत्तम अनुवाद होइल व या जबाबदारीला न्याय
देवू शकेल याचा पूर्ण प्रयत्न केला. या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणा-या
सर्वांचा मी खूप आभारी आहे.
०००००००
























