Friday, August 23, 2024

‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 





‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’

 मी, तसा खरा खुरा २४ तास जनसेवक. दररोज अगणीत वेगवेगळे चेहरे असलेले व चेहऱ्यावर मुखवटे म्हणजे हेलमेट पांघरलेले वाटसरू सतत मला भेटतात.आज यात आणखी भर पडली ती बॅनर,पोस्टर्स अन् झेंड्यांची. एका नेत्याच्या नागपुरातील आगमनासाठी हे शहर सज्ज असल्याचे लिहिलेले संदेश सर्वत्र झडकत आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जाताना मला मागच्या वर्षी याच शहरात आयोजित सी-२० (जी -२०अंतर्गत) परिषदेसाठी माझ्या आजुबाजूला करण्यात आलेले सुशोभिकरण ठळकपणे आठवते.परदेशी पाहुण्यांना हे शहर आणि विशेषकरून आमचा परिसर सुंदर नेटका दिसावा म्हणून बऱ्याच गोष्टींची रेलचेल होती. महागडे सिंथेटिक पट्टे, हिरव्या लुसलुसीत गवताच्या चादरी पसरविण्यात आल्या, झाडांवरील खास रोषणाई , परबोला असे कितीतरी प्रकार मी नव्यानेच बघितले. शहरातील तरुणाई हे सुशोभिकरण आप-आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पोचवित होते आणि माझ्या अवतीभोवती माणसांचा पूर त्याकाळात मी बघितला.

यानंतर शहरात पार पडणारा हिवाळी अधिवेशनाचा वार्षिक उत्सव तर मला फारच प्रिय. या काळात माझ्या आजुबाजुला प्रशासकीय गाडयांचा ताफा,मंत्र्यांच्या गाडयांचे हॉर्न , शासकीय नस्त्यांनी लोडेड  वाहन असा हा काळ.त्याच काळात आपआपल्या नेत्यांचे होर्डिंग्ज,बॅनर ,झेंडे लावणारे सर्व राजकीय पक्ष याकाळात माझी जास्तच दखल घेतात. मग जत्रा उठल्यावर जसे पाल पांगतात. तसे सर्व आल्यामार्गी आपआपल्या गंतव्यस्थळी परतल्यानंतर मी आपला तोच पाढे पंधरा करत नित्यक्रमात गुंतून  जातो. निवडणुका,नेत्यांचे वाढदिवस,वेगवेगळे आयोजन असली की तेच रेलचेल मी अनुभवतो. आणि आता ते नित्याचेच झाले.

एरवी काही महनिय व्यक्तीमत्वांच्या धुळखात पडलेल्या व जयंतीच्या दिवशी तेवढे स्वच्छ होणाऱ्या पुतळयांखेरीज, राजा राणी आणि नागपूरचा स्थानिय पक्षी एवढाचा माझा गोतावळा आमच्यातच आम्ही मशगुल असतो. माझ्या जन्माचा शोध घेता एक गोष्ट लक्षात आली की, मी एक साधा जमिनीचा तुकडा. मग कुण्या नेत्या, अधिकाऱ्याच सुपिक डोक्यात आलेल्या कल्पनेतून कोण्या अभियंत्याने मला आकार देण्याचा प्रयत्न केला . आणि त्यावर रेती, माती, डांबर असे तत्सम जिन्नस वापरून मला तयार केला आणि असे तसे माझे बाडसे घातले, होय मी सिव्हील लाईन्स परिसरातील रस्ता बोलतोय.(बोले पेट्रोलपंप चौक ते उच्च न्यायालय चौक हा रस्ता).

                                          00000000

  

 

आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

 




आपुले मरण पाहिले म्या डोळा……..

प्रसंग आहे नागपूर-अमरावती रोडवरील दाभा परिसरातील मारुती शो रुम अर्थात सेवा येथील. दाभ्यातून आलो व येथील टी पॉईंटवर सिटी बस किंवा ऑटो घेवून कार्यालय जवळ करण्याचा दररोजच्या शिरस्ता आजही काही वेगळा नव्हता. ऑटोला हात दिला तसा तो थांबलाही. ऑटोत आधिच डबल डेकरच्या व्यवस्थेमुळे सहा लोक कोंबली असल्याने माझ्या वाटयाला चालकाजवळ बसण्याचाच पर्याय होता. हे पाहून मी ही त्याच्या डाव्या बाजुने जावून बसण्याच्या बेतात होतो. पण चालक महाशय म्हणाले, त्या बाजुला या अर्थात त्यांच्या उजव्या बाजुला जावून बसायच होत. ऑटोला समोरुन वळसा घालून बसण्याच्या बेतात निघालो तोच  ऑटोमागून भरधाव वेगाने एक कार आली, थोडा टाईमींग जर का चुकला असता तर अनर्थ टळला नसताच. असा हा बाका प्रसंग स्वत:वर गुदरल्याने ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा..’ असाच  हा काहीसा अनुभव आला. ऑटोत बसताना चालकाला ओरडलो तर तोच माझ्यावर डाफरत म्हणाला, तुम्हाला बघून बसता नाही येत का!

सहप्रवासी हेच या घटनेचे मुकदर्शक.ऑटोत बसलो आणि बर्डीकडे प्रवास सुरु झाला. या प्रवासात घडलेल्या प्रसंगाचे चिंतन करत राहिलो. त्यातून निष्कर्ष हाती आला की, ‘दुर्घटना घडली असती आणि याचे कारण ठरले असते तिघांचा बेजबाबदारपणा.’ त्याचे विश्लेषण करू जाता पहिली बेजबाबदार व्यक्ती ठरते ऑटोचालक. चरितार्थासाठी ऑटो चालविण्याचे कर्तव्य हे प्रवाशांची सुरक्षा आपल्यावर असल्याच्या जबाबदारीतूनच पूर्णत्वास जाते याचा बहुतांशवेळी विसर पडलेला जाणवतो. मग चालक कोणत्याही वाहनाचा असो नियम सारखाच. म्‍हणजे वाहतुकीच्या नियमानुसार ऑटो चालकाने प्रवाशाला आपल्या शेजारील जागा देताना सर्वप्रथम डाव्या बाजुच्या जागेवर प्रवाशास बसायला सांगावे. (कारण रस्त्याने येणारी वाहणेही उजव्याबाजुने येवून पुढे जात असतात आणि अशात काही अनुचीत घडल्यास प्रवाशाचे रक्षण होईल.)

मग तुम्हाला वाटेल की मुळात ऑटोचालकाने आपल्या सिटवर अन्य प्रवाशांना बसविणे हेच प्रथमत: वाहतूक नियमाचे उल्लंघन ठरते. मान्य. पण, वाढून ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्वचजण अधिक मिळविण्याच्या शर्यतीत आपल्याला पुढे ठेवण्यात धन्यता मानतात, त्यामुळे चार-दोन प्रवासी जास्त बसवून त्याने आपली दिवसाची आमदनी वाढवणेही त्या अर्थाने गैर नसावी. पण अर्थारजनात जबाबदारीही  तर महत्वाची आहेच ना ! त्याच काय ? प्रवाशांची ने-आण करणे एवढेच काम नसून त्यांना सुरक्षित गंतव्यस्थळी पोचविणे या जबाबादारीतून आलेले ते कर्तव्य आहे. याचा बहुतेकांना विसर पडतो, तो मात्र पडालयला नको. तो जसा आज या ऑटो चालकाला पडला आणि त्यातून अनर्थ होताहोता टळला.  त्याची जाणीव मी त्याला ऑटोतून उतरताना सर्व सह प्रवशांसमोर करून देताना म्हटलेले वाक्य असे, ‘भाऊ पुढच्यावेळी प्रवाशाला उजव्या बाजुने बसण्याचा हट्ट टाळा आणि दुसऱ्यासह स्वत:चा जीव वाचवा, जबाबदार चालक व्हा.’ यावर तो काही उत्तरतो का याची वाट पाहत मी प्रवास भाडं दिलं मात्र, त्यावर चकार शद्ब न काढता त्याने मान डोलवली अन मी मार्गस्थ झालो.

दुसरा बेजबाबदार ,मी. ऑटोत बसण्यासाठी निघताना मागच्या बाजुने कोणते वाहन येत आहे किंवा नाही याची शाहनिशा करूनच मी ऑटोत बसायला हवे होते. अशात अनर्थ झाला असता तर मी एक जबाबदार नागरीक ,मुलगा, नवरा, बाप, भाऊ खचितच ठरलो असतो. आपणही कोणाचे कोणीतरी आहोत त्यामुळे आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने आपण त्यांच्यापासून कायमचे दुरावू शकतो याची प्रकर्षाने जाणीव झाली. यापुढे काळजी घेण्याचा मनोमन निश्चय केला.

   तिसरी बेजबाबदार व्यक्ती म्हणजे, मागून भरधाव वेगाने येणारा कार चालक. आपण ज्या रस्त्याने जात आहोत. तिथे प्रत्येक चौक, टी पॉईंट व तत्सम थांबे लक्षात घेता गाडीचा वेग कमी ठेवणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे. त्याचा विसर पडला की इतरांचा घात करून संबंधित व्यक्तींसह सर्वांच्या आयुष्यात कायम जिव्हारी बसणारा शद्ब ‘अपघात’ उच्चारणे व स्वीकारण्याची अपरिहार्यताच तेवढी उरते.

सरते शेवटी, आयुष्य सुंदर आहे तसेच ते पाण्याच्या बुडबुड्यासम आहे. याची प्रचिती आपल्याला कधिही येवू शकते . ते टाळण्यासाठी मात्र सर्वांनाच जबाबदार बणावे लागेल हा या प्रसंगातील धडा तेवढा शिल्लक राहतो.

                                             ००००००

Wednesday, August 21, 2024

हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

 





हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

            ऑफिसला पोचायची लगबग, अशात जीपीओ चौकात(नागपुरातील सिव्हील लाईन परिसर) आलो सिग्नल लागल्याने एकामागोमाग पाच स्कुल बस उभ्या होत्या. रसत्याच्याकडेला शिस्तीत पायी जाणारा मी एव्हाना कानावर पडलेल्या एका हाकेने स्तिमीत झालो , सांदिपनी शाळेच्या बसमधील जेमतेम पहिल्या दुसरीतील शाळकऱ्यांमधील निर्वाकार ,निरागस मुलींनी हात उंचावून ‘हाय अंकल,हाय अंकल…’ म्हणत साद दिली. त्याला हलके स्मीत करून प्रतिसाद देत ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल्स’ म्हणत मी पुढे जात होतो. आता पाचही स्कुलबसमधून तीच हाक तोच उत्साह आणि त्याला माझा सारखा प्रतिसाद देण सुरु होतं. चिमुरडया मुलींना दिलेला आजचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खास होता कारण, नुकतेच एक लेक्चर देवून आलो आणि त्यात मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत वागण्यात जाणीवपूर्वक बदल करावा लागेल असं मी म्हणालो. मुलींसाठी  इंटेलिजंट,ब्रेव्ह आदी शद्ब उच्चारणे हा माझ्या लेक्चरमधील एक भाग होता त्या स्कुलबस मधील मुलींच्या हाकेला ओ देतांना हॅलो ब्रेव्ह गर्ल म्हणून मी स्वत: पासून त्याची सुरुवात केल्याचं समाधान मला लाभलं.

            आपल्या दैनंदिन जीवनात मुली किंवा महिलांप्रतीच्या भावना वा वागणुकीतून बराच परिणाम घडतो असे मला वाटते. म्हणजे घरात अमक्या गोष्टी मुलींनीच करायच्या तमक्या गोष्टी फक्त मुलांनीच करायच्या असतात तो मुलींचा प्रांत नाही असे दंडक आपणच निर्माण करून माणूस म्हणून त्यांचं अस्तीत्व नाकारल असतं. आणि मुलगी म्हणून तिच्याकडून वागण्याच्या अपेक्षांचा डोंगर उभा करून ठेवलेला असतो. मग ती तशी वागली नाही तर मग ती वाईट किंवा उरमट असे सोयीचे शेरेही आपण चिटकवून मोकळे होतो. माझा तर एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, ‘मुलगा- मुलगी ही निसर्गाने किंवा शरीर विज्ञानाने घडणारी गोष्ट आहे जी एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे.त्याचा जसा आदर होतो तसा तिचाही आदर व्हायला हवा आणि त्याची सुरुवातही स्वत:च्या घरातून व्हावी लागेल. सजग पालक म्हणून मुलगा मुलगी भेद न करता सर्व संधी सेवा समान उपलब्ध करून द्याव्या लागतील.’

 या सोबतच एक महत्वाची बाब निरीक्षणातून पुढे आली की, मुलींना सुंदर,सालस,निरागस आणि टोकाचं सागांयच झाल तर सेक्सी असे बिरुद लावली जातात. आणि ती ही त्या बिरुदाला साजेशी सुंदर,सालस,निरागस व सेक्सी दिसण्याकडे वागण्याकडे कसोसीने लक्ष देते.

            आता मुलींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी आपल्यालाही ही बिरुद बदलावी लागतील इंटेलिंजंट, ब्रेव्ह, शार्प, टॅलेंटेड असे बुरुद लावावी लागतील जेणे करून या बिरुदावल्या त्यांच्या जगण्याचा भाग होतील व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याही धडपडतील. नाही तर देवत्व बहाल करून  तिची आराधना, पुजा करणारा समाज मंदिरातून आल्यावर तिलाच काय वागणूक देतो हेही सांगणे नलगे.

            माणूस म्हणून स्त्रिचा स्वीकार आणि तिच्या प्रती आदरातूनच हा प्रवास एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी स्वत:पासून व सजगतेने सुरुवात व्हावी लागेल. आजच्या ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल’ या संबोंधनाने का होईना एक नवी सुरुवात झाली आहे. हा संदेश आता सर्वदूर पोचवून त्याला व्यापक स्वरुप द्यायचे आहे.

                                                         ००००००