Friday, June 17, 2016

असेही घडते





स्थळ  महाराष्ट्र सदनाचे व्हिआपी डायनींग. वेळ सायंकाळ ७.१५ वाजता ची . प्रसंग होता पत्रकार परिषदेचा. आम्ही कार्यालयाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते सर्व पत्रकार आलेत मी दुस-या रांगेत बसलो होतो. कोणी पत्रकार येणार म्हणून मी मुद्दाम मागे बसलो होतो. एवढयात राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री  सुधीर मुनगंटीवर आले व त्यांना खूर्ची खाली दिसताच त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकत मानेनंच पुढील खुर्चीवर बसण्यास सांगितले. हा प्रसंग म्हणजे ध्यानी मनी नसताना एकदम ओढवलेली अतिरीक्त जबाबदारीच होती.  पण अनपेक्षित असल्याने असेही घडते हा नवा अनुभव गाठीशी आला.   


  दिनांक १५ जून २०१६ रोजी राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री  यांचा दिल्ली शासकीय दौरा सकाळी ९.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  भेटी पासून सुरु झाला. मंत्री महोदयांनी दिवसभर विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि राज्याच्या विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. या भेटीत  राज्याच्या हिताच्या दृष्टीने  विविध महत्वाचे निर्णय व करारही झाले. या सर्वांची माहिती देण्यासाठीच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

मंत्रिमहोदयां सोबत कदम ताल ; एक अविस्मरणीय अनुभव

                            (येथे देण्यात आलेले छायाचित्र हे इंग्लडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांचे आहे.)

                              
                        अहो इथून गडकरी साहेबांच्या कार्यालयात आपल्याला पायी जाता येईल का? हा राज्याच्या कॅबीनेट मंत्री महोदयांचा मला सवाल ! तेवढयाच समय सूचकतेने आणि विचारपूर्वक व तत्काळ मी दिलेल उत्तर, हो सर, नक्की जाता येईल.’ स्थळ, दिल्लीतील श्रमशक्ती भवन अर्थात केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाची इमारत याच इमारतीत कामगार मंत्रालयही आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे नदीजोड प्रकल्पाच्या विशेष समितीच्या ९ व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. ही माहिती कळताच मी मंत्रालयात पोहचलो तेच कळल की, साहेब बैठक आटोपून खाली स्वागतकक्षाकडे येत आहेत. तोच निर्णय घेतला स्वागतकक्षाजवळच थांबायच. थोडया वेळात मंत्री महोदय आले. त्यांना नमस्कार केला. औपचारीक गप्पांनंतर त्यांनी विचारल की आपल्याला गडकरी साहेबांकडे पायी जाता येऊ शकते का? मी एैकल त्यांच मंत्रालय इथेच आहे . मी या भागात पत्रकारिता केली असल्याने मला माहिती होत की, या मंत्रालयाच्या मागील दाराने आरबीआय,पीटीआयच्या कार्यालयांकडून गडकरी साहेबांच्या परिवहन भवन या मंत्रालयात जाता येतं.


            मंत्रीमहोदयांनी ड्रायव्हरला सांगितले आप गडकरी साहब के मंत्रालय में जाकर खडी करो गाडी, हम पैदल ही जाएंगे ड्रायव्हर म्हटला जी सर’. मंत्री महोदय, महाराष्ट्र सदनाचे राजशिष्टाचार अधिकारी आणि मी  असे आम्ही तिघेही पायी निघालो. गिरीष महाजन हे शरीरयष्टीने सदृढ आणि तंदूरुस्त असल्याने त्यांना अस out of box जाऊन वागन आवडत. त्यांच्यासोबत चालणे म्हणजे मलाही आपला चालण्याचा वेग वाढवावा लागला. बघता बघता आरबीआय, पीटीआय ‍बिल्डींग क्रॉस करून आम्ही परिवहन भवन अर्थात गडकरी साहेबांच्या कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर आलो. तिथेच पोलीसांनी विचारण्याच्या आत मी सांगितले यह हमारे मंत्रीसाहब है महाराष्ट्र के जो गडकरी साहब से मिलने जा रहे है. आता याच दारातून मोटारीने आत जाणारे मंत्री व त्यांच्यासोबत सुरक्षेचा ताफा  पाहणारे हे पोलीस महोदयही अवाक झाले की, चक्क महाराष्ट्रा राज्याचे  मंत्री महोदय पायी येऊन केंद्रीय मंत्र्यांना  भेटायला जातात. ६ मजली मंत्रालयाच्या इमारतीच्या  तळ मजल्यावरही एकदा तपासणी होते तिथेही मी पुढे गेलो आणि सांगितलं, यह हमारे मंत्रीसाहब हे जो गडकरी साहब से मिलने आए है. तसेच साहेबांना लीफ्टने घेऊन गडकरी साहेबांच्या ऑफीसकडे गेलो . गडकरी साहेबांना यायला उशिर होता तोच मंत्रीमहोदयांना गडकरी साहेबांच्या चेंबर मधे बसविण्यात आले. मग मी ही त्यांच्यासोबत गेलो. मंत्रीमहोदयांशी बोलून बातमी घेतली आणि त्यांची रजा घेऊन मी कार्यालयात परतलो.   

रमजान महिना आणि जामा मस्जिदीतील उत्साह


सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीना सुरु आहे. देशातील सर्वात मोठी मस्जीद म्हणून ओळख असणा-या दिल्लीतील ऐतिहासिक जामा मस्जिद येथे रमजान निमित्त उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. देश-विदेशातून दिल्ली भेटीसाठी येणा-या विविध धर्मियांची जामा मस्जिद येथील लगबग राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यास पुरक ठरत आहे. पवीत्र रमजान निमित्ताने जामा मस्जिद समोरील मिना बाजार ,चांदणी चौक, नयी सडक या बाजारपेठांसह परिसरातील गल्या तर शेवय्या, खजूर, सुखामेवा या खाद्य पदार्थांसह टोप्या, अत्तर आदी वस्तूंनी फुलल्या आहेत.

इस्लाम कॅलेंडर नुसार रमजान हा वर्षातील नववा महिना पवीत्र मानला जातो. या महीन्यात संयम आणि दान वृत्ती वाढविण्यासाठी व धार्मीक कार्यातून मानवीय भावना वृध्दींगत करण्याचा संदेश देण्यासाठी रोजेअर्थात उपवास ठेवण्यात येतात. मुस्लीम धर्मामधे रमजान महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यातील उपवासानंतर चंद्र दर्शन झाल्यावर ईद उल फित्र साजरी होऊन रमजानचा समारोप होतो. यावर्षी इंग्रजी कॅलेंडरच्या जून महिन्यातच हा रमजान आला आहे. सध्या देशाच्या विविध भागांसह देशाच्या राजधानीतही उन्हाचा प्रकोप आहे. अशात दिवसभर आपले नियमीत व्यवहार सांभाळून नमाज अदा करणा-यांची नियमीत लगबग सध्या जामा मस्जिम मधे बघायला मिळत आहे. सायंकाळची नमाज अदाकरून उपवास सोडणा-यांच्या गर्दीने मस्जिदीच्या वरांडयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
 
जामा मस्जिदीचा परिसर हा सर्वधर्म समभावाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा आहे. पंतप्रधानांचे देशाला संबोधन ज्या ऐतिहासीक लाल किल्याहून केले जाते तो लाल किल्ला, चांदणी चौकातील प्रसिध्द जैन मंदिर आणि शिख धर्मियांच्या त्याग व बलिदानाची ओळख पटवून देणारा शिषगंज गुरुद्वारा याच परिसरात आहे. त्यामुळे इथे माणसांची दिवसभर वर्दळ असते. याच परिसरात देशातील सर्वात मोठी जामा मस्जिद आहे आणि प्रसिध्द मिना बाजार आहे.

आग्रा येथील ताज महाल या स्वर्गसुंदर वास्तूनंतर मोगल बादशाह शहांजहांने दिल्लीतील आपल्या वास्तव्यादरम्यान १६५६ मधे ऐतिहासिक जामा मस्जिदीची स्थापना केली. ही मस्जिद म्हणजे हिंदू व मुस्लीम  वास्तू कलेचा उत्तम नमुना आहे.  लाल दगडांनी निर्मीत दोन भल्या उंच मिनार आणि काळया पांढ-या संगमरवरी दगडांनी निर्मीत तीन मोठाली घुमट आणि चार स्तंभ येथे येणा-या प्रत्येकाच्या डोळयात भरावे एवढया सुबक आहेत. हात पाय धुण्यासाठी मस्जिदीच्या १०० मिटर एैसपैस व्हरांडयातील भला मोठा हौद. इथे एकाच वेळी १०० जण हात-पाय धूवू शकतात. महिला, पुरुष आणि लहान चिमुरडयांपासून ते वयोजेष्ठ इथे शिस्तीत हात पाय धूवून नमाज अदा करायला मुख्य मस्जिद मधे जातात. मस्जिदीचे प्रार्थना स्थळ विशालकाय आहे  २६० खांब आणि ११ मेहराबांवर निर्मित प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी  एकाच वेळी हजारो भाविकांना नमाज अदा करण्यासाठी पुरेल एवढी जागा इथे आहे. प्रार्थनास्थळ आणि व्हरांडा मिळून एकाचवेळी इथे २५ हजार भाविक नमाज अदा करू शकतात या वरून देशातील सर्वात मोठी मस्जिद असल्याचा प्रत्यय येतो. व्हरांडयातच काही ठिकाणी महिलांना बसण्याची  व कुराण पठण  करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.

सायंकाळची नमाज झाल्यानंतर मस्जिदीच्या आजुबाजुचा परिसर माणसांनी गजबजू लागतो. मिना बाजार, चांदणी चौक आणि नयी सडक भागातील खाद्य पदार्थांच्या दुकानांवर लोकांच्या रांगाच-रांगा लागतात. फळ फळावळ, खाद्य पदार्थांच्या थाळींसह सर्वजन मस्जिदीत प्रवेश करतात. मस्जिदीला एकूण तीन दार आहेत आणि प्रत्येक दारावर प्रेवशाच्यावेळेस सर्वांना सुरक्षा तपासणीतून जावे लागते. पादत्राणे आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, इथे स्वच्छतेची पूरेपूर काळजी घेण्यात आली आहे. हात-पाय स्वच्छ धुवून सर्वांची नमाज अदा करण्यासाठी लगबग आणि निर्वाण शांतता असचं चित्र असतं सायंकाळच्या नमाजच्या वेळी. नमाज आटोपल्यानंतर व्हरांडयात सतरंजी, चटई टाकण्याची सर्वांची घाई सुरु होते. बघता बघता येथे कुटुंबच्या कुटुंब एकोप्याने गप्पा गोष्टींमधे आणि सोबत सोबत खाण्याचे व्यंजन काढण्यात व्यस्त असतात. इथे रोजेदारांना(रोजा ठेवणारे)सामाजिक संस्थांकडून उपवास सोडण्यासाठी निंबू सरबत, फळ फळावळ आदी अगदी सिस्थित वाटण्यात येते. अगदी ८ ते १० वर्षांच्या मुला मुलींपासून वयोवृध्द  रोजे ठेवत असल्याचे चित्र बघायला मिळते.  

रमजान निमित्त जामा मस्जिदचा परिसर धार्मिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने ओतप्रोत भरलेला व भारलेला आहे. वैविद्यपूर्ण भारत देशाचे हे एक अनन्यसाधारण वैशिष्टय अनुभवन्याची परवणीच या निमित्ताने मिळत आहे.           


                                                     00000

राज्याच्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा पंतप्रधानांकडे पाठपुरावा


       दे श भरात दुष्काळाचे संकट आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळया उपाय योजना आखत आहे. तरीही केंद्र सरकारची मदत ही निश्चितच उपयोगी असते. केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीसाठी सदैव हात पुढे केला आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील तीन राज्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासन करीत असलेले उपाय आणि केंद्राकडून झालेली व अपेक्षित मदत याबाबत या बैठकीत  राज्याच्यावतीने समर्थ बाजू मांडली . पंतप्रधानांनी तिनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलसंधारणाचे कामे करण्याबाबत या बैठकीत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक करीत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापन व जलसंधारणासाठी अवलंबीलेल्या विविध मार्गांपासून धडा घेण्याबाबतही पंतप्रधानांनी या बैठकीत सूचना दिल्या.   
            बैठकीच्या दिवशी राष्ट्रपती भवनाच्या अगदी लागून असणा-या रायसिना हील वरील पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयात सकाळपासूनच वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांच्या हालचाली सुरु झाल्या. सकाळी ९.४५ वाजता पीएमओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत पंतप्रधानांची बैठक सुरु झाली. ही बैठक आटोपल्या नंतर दुपारी ठिक १ वाजता महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीस पोहचले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी या बैठकीस मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
 राज्याकडून  पुरवणी प्रस्ताव देण्यास मंजुरी
            मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्यातील दुष्काळाच्या स्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली असून राज्याला ज्यादा आर्थिक मदतीची गरज असल्याचे  त्यांनी या बैठकीत सांगितले. राज्यातील 11 हजार गावे नव्याने दुष्काळग्रस्त झाली आहेत, त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी पुरवणी प्रस्ताव सादर करण्याची राज्याची विनंती या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापूर्वी राज्याने केंद्र शासनाकडे 4 हजार 500 कोटीची मागणी केली होती त्यापैकी 3 हजार 50 कोटी केंद्र शासनाने राज्याला  दिले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत महाराष्ट्र राज्याला मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाने पुढच्या सहा आठवड्यांचा मान्सून पूर्व कृती आराखडा तयार केला असून यामध्ये पावसाळ्या पूर्वी करावयाच्या कामांचा समावेश आहे.
 दुष्काळावरील दिर्घकालीन उपाय योजनांसाठी  शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा कार्यक्रम राज्याने तयार केला आहे. यामध्ये शेतक-यांना  सिंचनाची सोय उपलब्ध करुन देऊन त्यांचे पावसावरील अवलंबित्व कमी करायचे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या  प्रमाणात विकेंद्रीत पाण्याचे साठे  तयार करुन जलसंचय वाढवायचा यावर भर देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेचे मुळ हे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत वितरीत होणा-या निधीत वाढ  केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासन मिळून दरवर्षी या योजनेवर 5 हजार कोटी रुपये खर्च केले पाहिजेत. या योजनेसाठी  सर्वाधिक मदत राज्याला मिळावी अशी मागणी  मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.
 प्रधानमंत्री कृषी  सिंचन योजनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितले, या योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे 26 प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची  सिंचन क्षमता 10 लाख हेक्टर आहे. या प्रकल्पाची किमंत 20 हजार कोटी रुपये आहे. या प्रकल्पाची  किमंत ठरविण्याचे वर्ष 2014-15 धरण्यात   यावे. जमीन अधिग्रहणासाठी लागणारा निधी यातून वगळण्यात यावा अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली. 
              विदर्भ व मराठवाड्यासाठी 7 हजार कोटीचे प्रकल्प
विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शाश्वत सिंचन व्यवस्था उभी करण्यासाठी राज्य शासनाने 7 हजार कोटी रुपयांचे  प्रकल्प तयार केले आहेत. हे प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतात त्यामुळे केंद्र शासनाने ही रक्कम राज्याला द्यावी अशी मागणी, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या बैठकीत केली. पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण तालुक्यात काही योजना येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतात अशा योजनांसाठी केंद्र शासनाने 2 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

महाराष्ट्राचा वित्तीय आराखडा 15 हजार कोटीने वाढवावा
महाराष्ट्रात 1 कोटी 36 लाख खातेदार शेतक-यां पैकी 58 लाख शेतकरी कर्ज घेत आहेत. उर्वरित शेतकरी क्रेडिट (ऋण) नियोजनात अद्याप आले नाहीत यासाठी राज्याचा वित्तीय ऋण आराखडा 15 हजार कोटीने वाढविण्यात यावा जेणेकरुन 20 लाख नवीन शेतकरी क्रेडिट नियोजनात समाविष्ट करता येऊ शकतील. ज्या शेतक-यांचा समावेश कर्ज बुडविणा-यांच्या यादीत झाला आहे अशा शेतक-यांना क्रेडिट सिस्टमच्या मुळ प्रवाहात आणले पाहिजे. वर्ष 2012 ते 2016 या काळात कर्ज बुडविणा-यांच्या यादीत समाविष्ट झालेल्या सर्व शेतक-यांना क्रेडिट सिस्टममध्ये आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात यावी व यासाठी लागणारा 3 हजार कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक बँक करणार 4 हजार गावांना मदत
विदर्भ व मराठवाड्यातील 4 हजार गावांमध्ये सिंचन व्यवस्था उभी करणे, पीक पध्दतीचे नियोजन करणे व बाजारपेठेशी ती जोडणे असा पथदर्शी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला आहे. या प्रकल्पास जागतिक बँक मदत करण्यास तयार आहे, यासाठी अर्थिक व्यवहार मंत्रालयामार्फत प्रस्ताव सादर करण्यात यावा असे जागतिक बँकेने सूचविले होते. राज्य शासनाने तयार केलेल्या या प्रस्तावास कृषी विभागाने मान्यता दिली असून आता हा प्रस्ताव आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावास मंजूरी मिळेल व तो जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल  व जागतिक बँक त्यास मंजूरी  मिळेल.  
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्राने 74 लाख हेक्टर जमीन विम्याखाली आणली आहे. महाराष्ट्र सध्या 27 टक्के शेतकरी विमाधारक आहेत. सध्याची विमा योजना शेतक-यांच्या हिताची असून अधिकाधिक शेतकरी या योजनेखाली आणण्याचा राज्याचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्र्यांनी  या बैठकीत स्पष्ट केले.  
                                                                000000