नागपुरातील झोपडपट्टीमधील मुलांची मोट बांधुन त्यांना थेट
परदेशात फुटबॉल स्पर्धेची पर्वणी घडविणाऱ्या विजय बोरसे यांच्या कार्यावर आधारीत व
महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भुमिकेतील ‘झुंड’ चित्रपटात बाबुची भूमिका वठवणारा हरहुन्नरी कलाकार प्रियांशु छेत्री याच्या
हत्तेची बातमी आज नागपुरच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झडकली. ‘झुंड’ चित्रपटाच्या
विशेष स्क्रिनींग शो च्या वेळी प्रियांशुची प्रत्यक्ष भेट व वार्तालाप झाला होता माझा
त्यामुळे ही बातमी बघताच सकाळपासून मनात कालवा कालव सुरु होती म्हणून हा लेखन प्रपंच.
नागराज मंजुळे हे
मुळात जीवन संघर्षात घडलेले व कामातून सर्वप्रिय झालेले दिग्दर्शक.‘सैराट’ चित्रपटात
त्यांनी रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर यांना संधी देवून त्याचे सोने केले व सर्व प्रेक्षकांनीही
त्यास भरभरून प्रतिसाद दिला. ‘फँन्ड्री’तील झब्ब्या (सुरज पवार) आणि मंजुळे निर्मित
व त्यांच्या भूमिकेतील ‘नाळ’ मधील चैत्या (श्रीनिवास पोकळे) ही पात्रे म्हणजे मंजुळे
यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना दिलेली नवी ओळख होय. या प्रवासात पुढे
जात मंजुळेंनी ‘बीग बी’ यांना घेवून थेट हिंदी चित्रपट सृष्टीत झुंड चित्रपटाद्वारे
पदार्पण केलं.२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण नागपुरात
झाले या चित्रपटासाठीही मंजुळे यांनी आपला मराठी चित्रपट निर्मितीतील कित्ता कायम ठेवून
अनोळखी चेहरे आणि चक्क झोपडपट्टीतील चेहरे संपूर्ण देशासमोर ठेवले. या चेहऱ्यांमध्ये
बाबुच्या भूमिकेतील प्रियांशु छेत्री याने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली व चक्क बीग
बीं सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी त्याला मिळाली.
९ मार्च २०२२
रोजी दिल्लीतील ऑगस्ट क्रांती मार्गावरील ‘सिरीफोर्ट ऑडेटोरियम’ मध्ये विशेष स्क्रिनींग
शो आयोजित करण्यात आला होता. बीग बी वगळता नागराज मंजुळेंसह या चित्रपटातील सर्व कलाकारांनी
या शो ला हजेरी लावली होती. या शोच्या मध्यंतरात सर्व कलाकारांच्या भेटी झाल्या त्यात
प्रियांशुही भेटला. त्याच्या डोक्यातील ती टोपी,केसांना एका ठिकाणी केलेला वेगळया धाटणीतील
कलर अशा थाटातील प्रियांशु सोबत सहज गप्पा मारल्या व तेवढयाच सहज व आत्मविश्वासाने
तो प्रतिसादात्मक बोलता झाला. मी स्वत: झोपडपट्टीत राहतो व फुटबॉल खेळतो असे सांगणाऱ्या
प्रियांशुसोबत त्याच्या आवडी निवडी, चित्रपटाचे चित्रिकरण व अभिनय अशा सर्व गोष्टींवर
चर्चा झडली. उर्वरीत चित्रपट बघून आणि चित्रपटाच्या चमुचे अभिनंदन करत व स्टँडिंग ओवेशन
देवून घरी परतलो.
या घटनेला तीन वर्ष उलटून गेले व माझाही पावने तीन वर्षांचा
मुक्काम नागपुरात आहे आणि आज अचानक प्रियांशुच्या हत्तेची बातमी वाचली. प्रियांशुच्या
आयुष्यातील हा सर्व पट खूपच झटपट झाल्याचे वाटते. बातम्यांमधील मजकुराहून प्रियांशुच्या
मित्रानेच त्याची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. प्रियांशुचे दारुचे व्यसन व ते
पूर्ण करण्याकरिता कधी मधी तो चोरी करीत असल्याचेही बातमीत म्हटले आहे.
एकंदरीतच प्रियांशुने ‘झुंड’ चित्रपटात बाबुच्या भूमिकेला
न्याय दिला व प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मात्र, जीवनाच्या चित्रपटात तो परिस्थितीने
फ्लॉफ ठरला असच वाटत. आणि झुंडीत बाबु कायमचा हरवल्याचे सत्यही अधोरेखित करते.आपल्या
समाजाचे हे विदारक चित्रही त्यातून समोर आले हे बदलण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका
निभवण्याचे स्मरण करून देणारी ही घटना आहे.
00000


