ही घटना आहे साधारण 11 डिसेंबर 2014ची.परराज्यात युगल जोडप्याला फिरण्यास व निवासास अडचणी येऊ नये म्हणून लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नगरपरिषदेत विवाह प्रमाणपत्र बनविण्यात व्यस्त असलेले आम्ही. तिथल्या वेळखाऊ प्रोसिजरमध्ये एवढे व्यग्र झालो की सायंकाळी ७ वाजता अमरावतीहुन आपली ट्रेन आहे याचं भानच राहिल नाही. नगरपरिषद कार्यालय (परतवाडा) येथून विवाह प्रमाणपत्राच्या प्रत घेऊन आम्ही अचलपूरला (माझं गाव) आलो. बॅग आधीच भरल्या होत्या त्या घेतल्या व बसमध्ये बसलो आणि वलगावपर्यंत आल्यावर कळलं की आता आपल्याला अमरावती स्टेशनहून निघणारी अंबा एक्स्प्रेस ट्रेन कुठल्याही परिस्थितीत पकडता येणार नाही. म्हणून भात्यातलं ब्रम्हास्त्र उपसण्याचा निर्णय घेतला.अमरावतीच्या शेगाव नाक्यावर बस पोहोचली आणि माझी नवपरिणीत सहचारिणी सोनाली आणि मी दोघेही बसमधून उतरलो. तिथेच आमच्या दिमतीला एक स्कुटी येऊन उभी राहिली. स्कुटीच्या सारथ्यासाठी मी सज्ज झालो. सहचरणी, मी, ती आणि आमची आठवड्याभराची कपड्यांची बॅग या लवाजाम्यासह आम्ही बडनेरा रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झालो. इकडे अमरावती स्टेशनहून अंबा रेल्वे गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली आणि आता आमची शर्यत याच रेल्वेगाडी सोबत होती. ती रुळावरून धावू लागली तर स्कुटीहून मिळेल ते सिग्नल तोडत रस्त्यावरील गर्दीला तुडवत आमचा प्रवास सुरू होता. (कृपया,असे वाहतूक नियम तोडू नये)
बडनेरा स्टेशन आलं. स्कुटी पार्क केली. माझ्या हाती बॅग, सहचरणीला प्रोत्साहन देत ,'पळा वहिनी पळा, वहिनी पळा'च्या ती आरोळ्या देत होती. आम्ही स्टेशनच्या फुटवेअर ब्रिजवर पोहोचलो आणि आमच्यासमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं. मोठ्या सायासान बडनेरा स्टेशनला सापडलेली अंबा रेल्वे आता रुळावरून निघाली होती. फुटवेअर ब्रिज व नंतर पायऱ्या उतरून ही ट्रेन पकडणे हे चॅलेंज चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा वेगळं नव्हतं.पण, ध्येय प्राप्तीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची आजपर्यंतची माझी धडपड इथेही काम करीत होती.ट्रेनकडे सरसावलो. बॅग स्टेशनवर खालीच ठेवली. ट्रेनच्या एसी डब्यात शिरलो व दारात उभा राहिलो. सहचारिणीला हात दिला आणि तिला डब्यात आत खेचलं. तिकडून आवाज आला, 'दादा बॅग राहिली ,ही घे बॅग!',तिने बॅग फेकली अचूक झेल घेऊन ती बॅग मी रेल्वेच्या डब्यात घेतली. गाडीने वेग घेतला तशी स्टेशनवर उभी असलेली ती आम्हाला दोन्ही हाताने अगदी मनापासून निरोप देत होती. यापूर्वी उल्लेख केलेलं हेच ते माझं ब्रम्हास्त्र 'मधु'. त्या दिवशी तिच्यामुळेच आमच्या हनिमूनच्या प्रवासाची इमारत ढासळता ढासळता सावरली. तीच आमची ,लाडकी मधु.
नुकताच 3 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा विवाह संपन्न झाला. तिच्याशी जुळलेलं हे नातं खूपच खास ठरलं. आम्ही दोघं आणि आमच कोकरू स्वरित असे तिघेही मधुच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असणाऱ्या तिचा साखरपुडा, मेहंदी, हळदी, संगीत आणि विवाह या सर्व आनंदात सहभागी राहिलो. विवाह बंधनाच्या प्रवासातील हे सर्व प्रसंग अटेंड करण्याची ही माझ्या आयुष्यातली आजपर्यंतची पहिली वेळही ठरली आणि त्याच भाग्यही मधु मुळेच मिळालं.
दीर्घकाळ आजोळ,अमरावती, पुणे, दिल्ली असा प्रवास केल्याने आपल्या गोतावळ्यातील माणसांसोबत आनंदाचे क्षण एंजॉय करायला खूपच कमी वेळ मिळाला.अशा कमीवेळात युवा पिढीशी जुळलेल्यापैकी प्रतिनिधिक नातं म्हणजे मधुशी जुळलेलं एक छान नातं. खूप कमी वेळा मधुशी भेटणं झालं, या सर्व भेटीगाठींमध्ये जे आकलन झालं त्यातून उलगडणारा हा मधूचा पूर्णत्वाकडील प्रवास.
बहुदा इंजिनिअरिंग करायला अमरावतीला असताना परिचय झाला मधुचा, तेंव्हा मी दिल्लीला होतो. लग्नापूर्वी एक छोटी शस्त्रक्रिया झाली माझ्यावर अमरावतीला त्यावेळेस आमच्या काकुंकडे एक-दोन दिवस मुक्काम होता माझा, तेंव्हा ही सगळी यंगिस्तान भावंड भेटली. या भावंडांच आपसातील ट्युनिंग वाखाणण्या सारखं होतं. राखी पौर्णिमा,भाऊबीज , वा. सी. काळे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन व त्यात या सर्वांचा आपल्या घरच्या सदस्यांबरोबर घडणारा मेळाही मला नेहमीच भावला. त्यात मधुही आपली स्पेस तयार करत मोठी होत गेली. आई शिक्षकीपेशात असल्याने 'मोहित' आणि 'मधू ' या दोघांच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. मग भविष्याचा विचार करता अमरावतीतच त्यांनी टुमदार घर बांधलं. याची रचनाही मुलांच्या मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्यही आईने दिल होतच.
इकडे मी, शासकीय नोकरीत रुजू झालो तेंव्हा घरच्यांनी छोटेखानी रोडगे पार्टी आयोजित केली होती आमच्या शेतावर. जवळच्या लोकांना बोलवलं होत तेंव्हा मधु आवर्जून आली होती. मग माझ्या लग्नातही हजेरी लावली तिने.
मधुच शिक्षण होत असताना करिअरकडेही तिचं पुरेपूर लक्ष होत. भावंड जस जशी वेगवेगळ्या क्षेत्रात झेप घेत होती तसा तिनेही आपला स्पेस शोधून काढला व कमावती झाली. आता तिचा आत्मविश्वास दुणावला होता. 'लग्न' या सुंदर नात्याच्या बंधणाला स्वीकारण्यासही ती सज्ज झाली. कांदे- पोह्यांच्या अनेक बैठकाही तिने अनुभवल्या. अन् तिच्या स्वप्नातला राजकुमार हा प्रथमेशरावांच्या रूपाने तिच्या आयुष्यात आला. पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला.साखरपुडा आनंदाने पार पडला. लग्नास अवकास असल्याने दोघांना एकमेकास समजण्यास थोडा अवधीही मिळाला.
साखरपुडा व पुढे लग्नानिमित्ताने जमलेले सगळे आप्त स्वकीय व त्यांची बडदास्त राखण्यापासून आपली हौस- मौज पूर्ण करण्यातही ती सक्रिय होती. लग्नानिमित्त कराव्या लागणाऱ्या सर्व बारीक-सारीक बाबींच तिनं उत्तम नियोजन केलं. प्रत्यक्ष त्या जबाबदाऱ्या पार पाडत इतरांकडून ती कामे तिने नीट करून घेतली. मेहंदी, हळद आणि संगीत या तिन्हीच चोख नियोजन आणि या प्रसंगांचा पूर्ण आनंद ती घेत होती. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत संगीत कार्यक्रमात नवरी म्हणून भावी जोडीदार आणि सासरकडील मंडळी समोर मधुने दिलेले डान्स परफॉर्मन्स हे तर लाजवाब होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पदोपदी झळकत होता.
लग्नही वेळेत लागल व शानदार या शब्दाला साजेसा हा सोहळाही संस्मरणीय ठरला. तुडुंब गर्दीने खचाखच भरलेले मंगल कार्यालय व नवरी- नवरदेवास आशीर्वाद देण्यासाठी बराच काळ लागलेली लांब रांग मग सप्तपदी, कन्यादान व पाठवणी असा खूपच देखणा सोहळा कायमच डोळ्यात व मनात भरून गेला.
या उत्तम सोहळ्यानंतर आई आणि धाकट्या भावाने मधुला दिलेला निरोप आता फक्त तिच्या वडिलांच्या नसण्याची अपूर्णता दर्शवत होता. पण, आयुष्याची एक यशस्वी पारी पूर्ण करणारी लेक बघून तिचे वडीलही स्वर्गातून या लेकीचा अभिमानच बाळगत असतील यात तिळमात्र शंका नाही.
मधुचा स्वतःला सिद्ध करण्याचा एकटीचा प्रवास आता संपला व जोडीदारासोबतचा प्रवास आता सुरू झाला आहे. माहेर व आप्त स्वकीयाकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवर ती हा जीवनाचा सुंदर टप्पाही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडेल, त्यासाठी 'मधु' तुला मनापासून शुभेच्छा!.
आमची आयर्नलेडी काकू
इंजीनियरिंगच शिक्षण घेताना मधु आपल्या आत्याकडे वास्तव्यास होती. त्याच आमच्या आदरणीय व आयर्नलेडी काकु प्रतिभा नामदेवराव भुयार. काकुंमुळेच मधु नावाच्या या सालस पात्राचा आम्हाला परिचय झाला. एकामागून एक दुःखाचे प्रसंग ओढवले तरी जराही नडगमगता धैर्याने जीवनाची वाट चालत राहणारी 'आमची काकु' म्हणजे मायेची पाखर आणि स्वभावाने मऊ मेणाचा गोळा. काकुच आमचा कृतिशील आदर्श.सेवानिवृत्त झाल्या तरी सेवेत असणाऱ्या आम्हाला लाजवणारा उत्साह व दिनक्रम त्या अजूनही पाळतात. सतत नवनवीन शिकत राहतात. चांगुलपणाच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. नातेवाईकांना सतत जोडून ठेवतात, त्यांच्या सुख दुःखात कायम सहभागी असतात. आम्हाला खूप माया लावतात. सर्वार्थाने ग्रेट असणाऱ्या आमच्या काकूंना प्रणाम करत या लेखनप्रपंचास विराम.
00000











