इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फताह अल सीसी यावर्षीच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या देशाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. तर १४४ जवानांचा समावेश असलेल्या इजिप्तच्या सशस्त्रदलाने याप्रसंगी आयोजित पथसंचलनात सहभाग घेतला.या निमित्ताने प्रजासत्ताक दिनी परदेशी पाहुणे आणि पथसंचलनात परदेशी पथक सहभागी होण्याच्या परंपरे विषयी माहिती देणारे हे स्फुट. (दिल्लीतील वास्तव्याच्या १४ वर्षात प्रजासत्ताकदिनी राजपथावरील (सद्याचे कर्तव्यपथ) दिमाखदार व देशप्रेमाची भावना अधिक घट्ट करणारा सोहळा अनुभवण्याची संधी मिळाल्याची कृतज्ञभावना व्यक्त करत हे लिहीत आहे.) भारतीय प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर व आता नावात बदल झाल्याने कर्तव्यपथावर आयोजित करण्यात येणाऱ्या देशाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात परदेशी पाहुणे उपस्थित राहतात.
भारतीय लोकशाहीच्या उत्सवातील प्रमुख राष्ट्रीय सण म्हणून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, केंद्रीयमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश आदि मान्यवरांच्या उपस्थितीसह या सोहळयात आणखी एक महत्वपूर्ण उपस्थिती असते ती परदेशी पाहुण्यांची.भारतदेशाच्या परराष्ट्र धोरणानुसार अलिप्त राष्ट्राच्या गटाचे (NAM)प्रतिनिधी असलेले देश तसेच समविचारी व सामरीकनितीच्यादृष्टीने महत्वाच्या देशाच्या प्रमुखाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बोलविण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांपासून यात भर पडून परदेशी सशस्त्रदलाचे पथक या सोहळयातील पथसंचलनात सहभाग घेतात.
दुसऱ्या महायुध्दानंतर जग अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमध्ये विभागले गेले. मात्र, या दोन्ही महासत्तांचे अधिपत्य न स्विकारता अलिप्त राहण्याच्या भूमिकेतून जगात अशा देशांचा गट निर्माण झाला तो म्हणजे NAM. भारतदेशाने हा गट स्थापन होण्यासाठी पुढाकार घेतला होता. पुढे भारतदेशाचे परराष्ट्र धोरणही याच घटनेच्या अनुषंगाणे विकसित होत गेले. याच दिशेने पुढे पडलेले एक पाऊल म्हणजे प्रजासत्ताक दिनी परदेशी पाहुणे म्हणून NAM च्या सदस्य देशाच्या प्रमुखाला निमंत्रित करण्याची परंपरा होय. मात्र, काहीवेळा NAM शिवाय भारताच्या परराष्ट्र धोरणातील समविचारी देशांच्या प्रमुखांना प्रजासत्ताकदिनी निमंत्रित करण्यात आल्याचे दिसून येते.
परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया
दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी परदेशी पाहुण्यांना निमंत्रित करण्याची प्रक्रिया या कार्यक्रमाच्या ६ महिने आधीपासूनच सुरु होते. साहजिकच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, मुख्यकार्यक्रमाची जबाबदारी सांभाळणारे संरक्षण मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालय व राष्ट्रपती भवनाच्या समन्वयातून हे कार्य पार पडते.
जाणून घेवूया या वर्षिच्या पाहुण्यांविषयी
NAM संघटनेच्या निर्मितीत भारताच्या खांद्याला-खांदा लावत पुढाकार घेणाऱ्या इजिप्त सोबत भारत देशाच्या मैत्रिचे हे ७५वे वर्ष आहे. भारतदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात उभय देशांच्या मैत्रिचे अमृतमहोत्सवी वर्षही या निमित्ताने साजरे होत असल्याचा योग यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पाहुण्यांच्या निमित्ताने साधण्यात आला.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दल फताह अल सीसी हे या देशाचे पुर्वाश्रमीचे संरक्षणमंत्री आणि सेना प्रमुख आहेत. २०१४ ला आर्थिक विकासाच्या मुद्यावर ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूण आले.
कर्नल महमुद मोहमद अब्दल फताह इल खारस्वी यांच्या नेतृत्वात इजिप्तच्या सशस्त्रदलाच्या १४४ जवानांचे पथक कर्तव्यपथावरील ७४व्या प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनात सहभागी झाले. या मानाच्या पथसंचलनात सहभागी होणारा इजिप्त हा चौथा देश ठरला आहे. या आधी सर्वप्रथम २०१६ मध्ये फ्रान्सने हा मान मिळविला आहे. २०१६ च्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात फ्रान्सच्या सशस्त्रदलाच्या ३५ इन्फट्री रेजिमेंटच्या ७६ सदस्यांनी सहभाग घेतला होता. फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे बँडपथक आणि त्यांनी सादर केलेली शास्त्रीय संगिताची धून हे या पहिल्या-वहिल्या परदेशी पथसंचलनाचे वैशिष्टय ठरले. त्याच्याच पुढल्यावर्षी (२०१७) संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अंगरक्षकदलाच्या( प्रेसिंडेंटल गार्ड) 149 जवानांनी या पथसंचलनात भाग घेतला होता या देशाच्या सशस्त्रदलाचे ३५ सदस्यीय बँडपथकही सहभागी झाले होते. २०२१ मध्ये बांग्लादेश सशस्त्र दलाच्या १२२ जवानांनी राजपथावरील पथसंचलनात याआधी शेवटचे दमदार पथसंचलन केले होते.
००००





No comments:
Post a Comment