Wednesday, January 18, 2023

वॉक कुत्र्याचा व मालक-मालकीनचा

भारतात वाढते नागरीकरण हे महानगरांमधील जीवनशैलीत बदल घेवून आले आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा असणाऱ्या ‘अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या’च्या अगदी विरूद्ध महानगर आणि मोठया शहरांमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा बंगला, गाडी, नोकर आणि आपसूकच कुत्रे. शहरी व महानगरांतील जीवनात सोकॉल्ड श्रीमंतांमध्ये मूलभूत गरजांशिवाय स्टेटस सिम्बॉल म्हणून येणाऱ्या गरजांची तर गिनतीच नाही. पण त्यांच्या मूलभूत गरजांतील एक म्हणजे कुत्री पाळणे व त्यांच्यासोबत मालक-मालकीनबाई यांचा मॉर्निंग वॉक. (आज नेमकं नागपूरच्या सिव्हिल लाईन्स रस्याालने ऑफिसकडे जाताना ‘वॉक विथ डॉग’ दोन चार वेळा लागोलग बघण्यात आला , त्यातून सुचलेले स्फुरलेले हे स्पुट लिखाण) ‘भाग मिल्खा भाग’ हा बॉलीवुडमधील धावकाच्या यशावर आधारित चरित्र चित्रपट असूदे किंवा ‘सुल्तान’ पैहलवानीवर भाष्य करणारा चित्रपट. हे चित्रपट सर्वसामान्यांना वॉक व तत्सम शारीरिक कसरती करण्यास प्रेरक ठरतात. तसे ते सोकॉल्ड पैसेवाल्यांना वेब सेरिज या त्यांच्या बेसिक माहितीच्या स्त्रोतापासून ते अगणीत स्त्रोतांपासून मिळालेल्या माहितीतून ‘वॉक विथ डॉग’ या संकल्पनेसाठी प्रेरित करीत असावे हा एक कयास जो सत्याच्या एकदम जवळ असल्याचा माझा भाबळा समज. देशाची राजधानी दिल्ली ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे, उपराजधानी नागपूरसह अमरावती,नाशिक,औरंगाबाद आदी शहरांमधील सकाळचे चित्र ‘वॉक विथ डॉग’चा दिसून येतो. हा वॉक पण, काही साधा नसतो बर का!. म्हणजे ब्रँडेड आणि ओघाणेच महाग ट्रॅक सूट, मालकीनबाईंचा हल्का मेकअप तर मालकांस शोभणारा रुबाबदार पेहराव तर आलाच. याला कारणही लक्षात आलंच असेल ते म्हणजे रस्त्यावर डॉग सोबत वॉक करताना कोणते मालक व मालकिन सरस ठरतात याची आपसूक व छुपी स्पर्धा. या वॉकचं मुख्य आकर्षण असणारे कुत्रे हा आणखी पुढचा विषय. कुत्र्यांचे ब्रिडही आंतरराष्ट्रीय मानकात बसणारे उच्च प्रतिचे असावे लागतात. नाहीतर वॉक करतांना होणाऱ्या चर्चेत मालकाची अब्रू नको निघायला हवी की स्वस्त व हलक्या प्रतीचा कुत्रा पाळतो ते. लाखांचे कुत्रे व त्यांच्यासोबत कोटयाधिश मालक-मालकीन असे चित्र देशाच्या महानरांमधून आढळून येते. वाढत्या नागरीकरणाचाच आता हे एक अविभाज्य अंग म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कुत्रे, मालक, मालकिन व चर्चा बहुदा कॉर्पोरेट, बिजनेस क्षेत्रातील ही मंडळी असल्याने ते ‘वॉक विथ डॉग’ करताना त्यांच्या चर्चेचे विषय हे आपआपले क्षेत्र नराहता डॉग सेंट्रीक होतात. कुणाचा डॉग किती महागडा व किती वैशिष्टयपूर्ण यावर चर्चा करता करता वॉक पूर्ण होतो. मधे-मधे या विशेष डॉगला नैसर्गिक गुणधर्मानुसार ब्रेक घ्यायचा असतो तेव्हा त्यांच्या स्वभावानुसार एवढया मोठया मालकालाही नराहवून ब्रेक घ्यावा लागतो. मग विषय होतो आजकाल आमच्या डॉगीचे पोटच नीट राहत नाही, तुमच्या डॉगीचा डॉक कोणता?,त्याच्या जेवणाची हॅबीट,जेवणातील घटक अशा सर्व बारीक-सारीक विषयांवर चर्वित चर्वण घडते. त्यात डॉगीचा नैसर्गिक कार्यक्रम आटोपला की मग पुन्हा ‘वॉक विथ डॉग’ ची रपेट होवून विसावतेही. हा संवाद डॉग मालकिनींमध्ये वेगळया पातळीवर होतो ते इथे अधिक स्पष्ट नकरने लगे. बापडया बेवारस कुत्र्यांचं काय? थ्री इडिएट चित्रपटात आमीर खान आपल्या मित्रांची भिती घालवण्यासाठी ‘ऑल इज वेल’ म्हणत पहारा देणाऱ्या रात्रपहारेकऱ्याची गोष्ट सांगतो. या पहारेकऱ्याच्या महतकार्यात त्याला मदत करणाऱ्या Stray Dog अर्थात बेवारस कुत्र्याची महती तेवढी झाकोळली जाते.वॉक विथ डॉगचे भाग्य ज्या कुत्र्यांना लाभत नाही त्या सर्वांची गणती या श्रेणीत होते. यांच्या नशिबी परक्यांच्या भाकरीच्या वा तत्सम तुकडयावर गुजराण करण्याची वेळ येते. आणि कोणीही यावे ‘हड’ म्हणत वा दगड भिरकावून पळवावे अस पाचवीला पुजलेलं जीनं येतं. ‘आकाश मंडप पृथ्वी आसणं’ म्हणत रस्त्याच्या कडेला आसरा शोधणाऱ्या अशा बेवारस कुत्र्यांना कधी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनस्वारांच्या फाजीलपणाचे बळी जावे लागते. तात्पर्य, “‘वॉक विथ डॉग’ चा अनुभव घेणारा कुत्रा तुपाशी आणि बेवारस कुत्रा तो उपाशी”. श्वानांचे हे उदाहरण आपल्या आजच्या सोकॉल्ड पुढारलेल्या समाजाच्या बेगडी जगण्यातील फोलपणा अधोरेखित करतं एवढच काय ते सिद्ध होतं, हे माझं प्राजंळ मत मांडून येथेच पूर्ण विराम देतो. ०००००

No comments:

Post a Comment