नुकतीच म्हणजे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला पद्मपुरस्कार या मानाच्या नागरी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कला, उद्योग, क्रीडा, वैद्यकीय आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस या सन्मानाने गौरविण्यात येते. यावर्षी देशातील १०६ मान्यवरांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.यात १ पद्मविभूषण,३ पद्मभूषण आणि ७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने पद्मपुरस्कारा विषयी माहिती देण्याचा प्रयत्न. (दिल्लीतील पत्रकारिता आणि शासनसेवेतील नोकरीत बहुतेकवेळा माझ्याकडे पद्मपुरस्काराच्या बातमीची जबाबदारी आल्याने या अनुभवातून हा लेखनप्रपंच करीत आहे )
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे २५ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तातकडीने वाट पाहत असतात. त्याप्रमाणे आपआपल्या दैनिकात,वृत्तसंस्था, वृत्त वाहिन्या आदिंमध्ये जागा आरक्षित केली जाते. पद्मपुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे साधापणे रात्री ९ वाजता नंतर जाहीर होतात आणि अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या https://www.mha.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करू देण्यात येते. शेवटपर्यंत या पुरस्कार विजेत्यांच्या यादिची गुप्तता पाळण्यात येत असल्याने ब्रेकींग न्यूजला इथे पूर्णपणे ब्रेक बसतो.
एकदा यादी जाहीर झाली की, माध्यम प्रतिनिधी संबंधित माध्यमांच्या बातमीमुल्यानुसार बातमी लेखन,सादरीकरण करतात. त्याबरहुकूम प्रसारमाध्यम,सोशल मिडीयावर पोस्ट पडणे सुरु होते. देशातील मानाचा पुरस्कार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. तेव्हा जाणून घेवूया पद्मपुरस्कारा विषयी.....
अशी झाली सुरुवात
सर्वप्रथम १९५४ मध्ये देशात ‘भारतरत्न’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने पद्मपुरस्काराची सुरुवात झाली. ८ जानेवारी १९५५ रोजीच्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार या पुरस्कारात ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ या पुरस्कारांची भर पडली.
भारतरत्न पुरस्काराची शिफारस आणि आतापर्यंतचे पुरस्कार प्राप्त मान्यवर
प्रधानमंत्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची शिफारस राष्ट्रपतींना करतात. त्यानंतर भारतरत्न पुरस्कारांची घोषणा राष्ट्रपतींच्या मान्यतेने केंद्रीय गृह मंत्रालय करते. एका वर्षी जास्तीत-जास्त तीन व्यक्तींना हा पुरस्कार घोषित करण्याची अट आहे. आतापर्यंत एकूण ४८ मान्यवरांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
२०१९ ला शेवटचा भारतरत्न
वर्ष २०१९ पर्यंत भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानंर गेल्या चार वर्षांपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही. २०१९ मध्ये नानाजी देशमुख (महाराष्ट्र) आणि डॉ.भूपेण हजारिका (आसाम) यांना मरणोत्तर आणि माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. आतापर्यंत सहा वेळा म्हणजेच १९५४,१९५५,१९९१,१९९२,१९९७ आणि २०१९ या एकाच वर्षी तीन भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. या नियमाला अपवाद म्हणून १९९९ मध्ये एकाच वर्षी चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. १९९९मध्ये पंडित रवि शंकर (यु.एस.ए.),प्रा.अमर्त्य सेन (यु.के.), गोपिनाथ बोर्डिलोई (आसाम) आणि जयप्रकाश नारायण (बिहार) यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला होता. १९५४ मध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार तामीळनाडूतील तीन मान्यवरांना सर्वश्री डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर व्यंकट रमण यांना जाहीर झाला होता.
सर्वाधिक ९ भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्राला
धोंडो केशव कर्वे (१९५८), डॉ. पांडुरंग वामन काणे (१९६३), आचार्य विनोबा भावे (१९८३), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990), जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (१९९२),लता मंगेशकर (2001), पं.भिमसेन जोशी (2009), सचिन तेंडुलकर(2014) आणि नानाजी देशमुख (२०१९) या महाराष्ट्रातील ९ मान्यवारांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशला ८, तामीळनाडूला ७, दिल्लीला ५,पश्चिम बंगालला ४, गुजरातला ३, कर्नाटक,आसाम आणि बिहारला प्रत्येकी २ तर तेलंगणा आणि ओडिशाला प्रत्येकी १ भारतरत्न पुरस्कार प्रदा करण्यात आला.
परदेशातील चौघांना भारतरत्न
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला (1990) आणि भारतीय स्वातंत्र्य लढयात मोलाचे योगदान देणारे पाकिस्तानी नागरीक (फाळणी नंतर) खान अब्दुल गफ्फार खान(1987) यांना प्रदान करण्यात आला.भारतीय वंशाचे शास्त्रीय संगीतातील विख्यात कलाकार पं.रविशंकर (युएसए) आणि भारतीय वंशाचे थोर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन (युके) यांना वर्ष १९९९ मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पद्म पुरस्काराची शिफारस
भारतरत्न व्यतीरिक्त पद्मविभूषण,पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांची शिफारस पद्मपुरस्कार समिती करते. प्रधानमंत्री दरवर्षी ही समिती स्थापन करतात. या समितीचे अध्यक्ष कॅबीनेट सचिव असतात तर प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव,गृह सचिव आणि राष्ट्रपतींचे सचिव हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.याबरोबरच कला,क्रीडा,अर्थ अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही या समितीत समावेश असतो.
पद्मविभूषणाच्या जोडीला 1955 पासून पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत ३३१ पद्मविभूषण,१३०३ पद्मभूषण आणि ३४२१ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सात वर्ष पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत
१९७८ आणि १९७९ ही दोन वर्षे तसेच १९९३ ते १९९७ पर्यंत सलग पाच वर्ष पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती.
पद्म पुरस्काराबाबत महत्वाच्या तारखा
#पद्मपुरस्कारासाठी अर्ज करण्याची किंवा प्रस्ताव पाठविण्याची तारिख: दरवर्षी १ मे ते १५ सप्टेंबर
#पद्मपुरस्कारांची घोषणा : दरवर्षी २५ जानेवारी रोजी
#पद्म पुरस्काराचे वितरण : दरवर्षी दोन ते तीन टप्प्यात मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान पार पडते
# राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्मपुरस्कार प्रदान करण्यात येतात.
०००००

No comments:
Post a Comment