Wednesday, January 11, 2023

असे शहर, अशी व्यक्तीमत्वे !

नागपूर सिव्हील लाईन्सचा भाग म्हणजे महत्वाच्या कार्यालयांचा राबता असलेला आहे तसाच तो विविध वैशिष्टययुक्त आहे. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे, या रस्त्याच्या दुतर्फा असलेले नागपूर शहारातील महान व्यक्तीमत्वांचे अर्धाकृतीपुतळे. बोले पेट्रोलपंपापासून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य चौकापर्यंत (जीपीओ चौक) येताना रस्त्याच्या दुतर्फा एकूण ८ अर्धाकृती पुतळे उभारण्यात आले आहेत. नागपूर शहराला वेगळी ओळख देणाऱ्या या व्यक्तीमत्वांच्या दर्शनानेच जणू धन्यत्वाची भावना मनात येते.या शहरापासून अपरिचित व थोडया अर्थाने आगंतुकांना शहराच्या व्यक्तीमत्वांचा परिचय करून देण्याची ही संकल्पना भारीच वाटली बुवा..... बोले पेट्रोलपंपाकडून येताना डाव्या बाजुला चार आणि उजव्या बाजुला चार असे एकूण आठ अर्धाकृतीपुतळे उभारण्यात आले आहेत. डाव्याबाजुला पहिले दर्शन घडते ज्येष्ठ माकप नेते ए.बी.बर्धन यांचे. तत्कालीन बंग्लादेशच्या बारिसाल परगण्यात जन्मलेले बर्धन यांचे बालपण वडिलांच्या रेल्वेतील नोकरीमुळे नागपुरातच गेले. नागपूर विद्यापीठातून पदवी घेत बर्धन यांनी 1957 मध्ये नागपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक जिकंल्याचा गौरवशाली इतिहास आहे. रस्त्याच्या उजव्या बाजुला आपणास प्रथम दर्शन घडते पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे. 'मानवता हाच खरा धर्म' हा संदेश देणारे विद्वान, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख हे मुळचे अकोला जिल्ह्यातील कानसेवनीगावचे रहिवासी. गुजरातूनमधून स्थलांतरीत झालेले पारेख कुटुंब नोकरीच्या शोधात नागपुरात आले. वयाच्या १९व्या वर्षी मौलाना पारेख यांनी 'होली कुरान' चा सोप्या ऊर्दूत केलेला अनुवाद १९५२ साली 'इझी डिक्शनरी ऑफ कुरान' या नावाने प्रकाशित झाला. याच ओळीत पुढे पद्मश्री डॉ. बी. एस. चौबे यांचे दर्शन घडते. विद्यार्थी प्रिय शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आणि गरीबांचे डॉक्टर म्हणून डॉ. बालस्वरुप एस. चौबे यांची ख्याती. मुळचे वाशिम येथील डॉ चौबे यांनी नागपुरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्रात पदवी पूर्ण केली. डॉ. चौबे हे भारतातील प्रख्यात किडनी विकारतज्ज्ञ होते. रस्त्याच्या डाव्या बाजुला आरबीआय कर्मचारी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारा लगत कविश्रेष्ठ माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांनी मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे ४५ वर्षं अधिराज्य गाजवले. ‘दुःखाचा महाकवी’ असं बिरुद मिरवणा-या कवी ग्रेस यांना निधनाच्या एक महिन्या आधी (फेब्रुवारी 2012) अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं(या प्रसंगाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार). कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी. १९६७ मध्ये 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतरची पुढची चार दशकं कविता व ललितलेखांच्या माध्यमातून त्यांच्या सृजनाचा झरा अखंड वाहत राहिला. ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’, ‘सांजभयाच्यासाजणी’ हे कवितासंग्रह ; ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘मृगजळाचे बांधकाम’, ‘कावळे उडाले स्वामी’ हे ललितलेख संग्रह ही ग्रेस यांची मराठी साहित्याला मिळालेली अमुल्य ठेवं. पुढे याच रस्त्यावर ग्रेस यांचा पुतळा ओलांडल्यानंतर राजाराणी चौक लागतो. या चौकातून जीपीओ चौकाकडे जाताना उजव्या हातावर आपणास लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळयाचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात माधव अणे उपाख्य लोकनायक बापूजी अणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जन्मलेले अणे यांनी पुढे नागपुरातील मॉरिस कॉलेजमधून पदवी घेतली. १९३३ साली ते काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष झाले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारतदेशाचा मानाचा नागरी सन्मान 'पद्मविभूषण' तर त्यांच्या 'तिलकयशोर्णव' या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. याच रस्त्याच्या डाव्या बाजुला सुमतीताई सुकळीकर यांचे दर्शन घडते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जन्मलेल्या सुकळीकर विवाहानंतर नागपुरातील रामदासपेठेत स्थायिक झाल्या.त्यांनी महिलांच्या प्रश्नांना हात घालत त्यांना एकजुट करण्याचे काम केले. त्यांनी निवडणूकही लढवली. त्या गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होत्या. हैद्राबाद हाऊस अर्थात मुख्यमंत्रिसचिवालयासमोर आपणास मा. गो. वैद्य अर्थात माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे दर्शन घडते. वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेले मा.गो.वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालतेबोलते विद्यापीठ समजले जात. त्यांनी स्वयंसेवक,शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, शेतकरी, समाजजीवन, कुटुंबप्रमुख या सर्व भूमिका चफकलपणे निभवल्या. याच ओळीत विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्या अर्धाकृती पुतळयाने या सुंदर उपक्रमाचा सामारोप होतो. जांबुवंतराव नागपुरातील अग्रवाल लेआऊट परिसरात राहत असतं. प्रकृतीसाठी शासकीय रुग्णालयातच उपचार घेणे, आपल्या विरोधात वृत्तपत्रात काहीही छापून आले तरी खुलासा करायचा नाही आणि वाढदिवस साजरा करायचा नाही ही आयुष्याची तीन सूत्रे त्यांनी कायाम पाळली होती. पालिका शाळेत शारिरीक शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन यवतमाळात नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवाहरलाल दर्डांचा पराभव करणाऱ्या जांबुवंतरावांनी राजकारणाच्या रंगमंचावर फॉरवर्ड ब्लॉक पक्षामध्ये प्रवेश केला. कृषी विद्यापीठ विदर्भात झाल्याशिवाय विधिमंडळात पाय ठेवणार नाही !, असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पाच बळी गेल्यावर अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झाले. तेव्हापासून मात्र धोटे विदर्भवादी झाले आणि स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. तीनदा आमदार व एकदा खासदार राहिलेल्या धोटे यांनी दोनदा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवही पाहिला.उत्कृष्ट नट, लेखक, नेता,वक्ता असलेल्या धोटेंनी ‘जागो’ हा हिदी चित्रपट काढला आणि ‘बलिदान’ हे वर्तमानपत्रही सुरू केले होते. ओरियंट हनी बझर्डची सुबक लोह प्रतिमा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वळण्यासाठी जीपीओ चौक लागतो. या चौकात आपल्याला नागपूर शहाराच्या पक्षाच्या(Bird of Nagpur) सुबक लोह प्रतिमेचे दर्शन घडते. ओरियंट हनी बझर्ड हा नागपूरचा पक्षी लोहाच्या खास कलाकृतीने येथे आपले लक्ष वेधून घेतो. 00000

No comments:

Post a Comment