Tuesday, January 17, 2023

जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवडा आणि सणासुधीचा गोडवा

‘भारत माझा देश आहे ...... या देशातील सर्व परंपरांचा मला अभिमान आहे .....’ अशी प्रतिज्ञा घेत आपल्या शालेय जीवनाला सुरुवात होते. पण, या प्रतिज्ञेतील वाक्यांचा किंवा शब्दांचा अनुभव यायला व घ्यायला वयाने व अनुभवाने मोठे व्हावे लागते. तेव्हाचं आपल्याला वैविद्यपूर्ण भारतदेश आणि त्याच्या समृद्ध परंपराचा परिचय होतो. वर्षारंभी पहिल्याच पंधरवडयात देशाच्या विविध भागात साजरे होणारे लोहडी, बिहु, भोगी मकरसंक्रात आणि पोंगल हे सण याचे प्रातिधिक उदाहरण सांगता येईल. हे सर्व सण सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश आदी अंतराळातील बदल तसेच शेतीतील कापणीचा आणि पेरणीचा आनंद व्यक्त करणारे असल्याचा समानधागा सापडतो. सणांच्या या ओळीत क्रमाने पहिला येणारा ‘लोहडी’ हा सण मुख्यत्वे पंजाब,हरियाणा दिल्लीसह उत्तर भारतात साजरा होतो. हा सण पांरपरिकरित्या शेतीतील पिकांची कापणी आणि रब्बीच्या पिकांची पेरणीशी संबंधित आहे. लोहडी ही होळी प्रमाणे लाकडं जाळून साजरी करतात. लोहडीच्या अग्नित रब्बीच्या पिकांच्या रुपात तीळ,रेवडी,भूईमुगाच्या शेंगा ,गुळ अर्पण केले जाते. मान्यतेप्रमाणे या वस्तू लोहडीला अर्पित करून सूर्य आणि अग्नि देवतेप्रती आभार व्यक्त करण्यात येतात पीक चांगली येवू देत व नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे अशी प्रार्थनाही असते.घरात येणाऱ्या सून किंवा बाळ या नवागतांच्या स्वागतासाठीही लोहडीचा सण साजरा होतो. याच वेळी देशाच्या नेऋत्य भागातील आसाममध्ये बिहू सण साजरा होतो. यास भोगाली किंवा माघ बिहू म्हणतात पिकांच्या कापणीच्या आनंदाशी हा सण जोडला आहे.आसमी लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून असल्याने, शेतात झालेल्या चांगल्या पिकाबद्दल देवाकडे आभार व्यक्त करण्यासाठी हा बिहू सण साजरा केला जातो. (वर्षभरात तीन बिहू सण आसामात साजरे होतात. रोंगाली किंवा बोहाग बिहू : हा एप्रिल महिन्यात साजरा होतो. हा मुख्यत: पेरणीचा सण आहे. कोंगाली किंवा काटी बिहू: हा ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो आणि तो पिकांचे रक्षण तसेच झाडाझुडपांच्या संरक्षणाची तसेच विविध गोष्टीत अंतर्भूत असलेल्या आत्मतत्त्वाची पूजा यांच्याशी जोडलेला आहे. भोगाली किंवा माघ बिहू: हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो जो पिकांच्या कापणीच्या कामाशी जोडलेला आहे.) भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. सामान्यपणे १३ जानेवारी रोजी भोगी सण साजरा होतो. तामीळनाडू, आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.तामीळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. भोगी सणाला लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. या सणाला शेतात मटार,गाजर,वांगी,तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते. ‘मकर संक्रांती’ हा भारतभर साजरा होणारा सण जानेवारी महिन्यातील पहिल्या पंधरवडयाचे खास आकर्षण. भारतदेशा प्रमाणेच शेजारील नेपाळमध्येही मकर संक्रांती साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे. पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. भारत आणि नेपाळमधील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी हा भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. ‘पोंगल’ हा तामीळनाडूत साजरा होणारा सण. देशात यावेळी मकरसंक्राती आणि लोहडीची धुमधामही असते. जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेला पोंगल सण साजरा होतो. उत्तर भारतात नववर्षाची सुरूवात चैत्र प्रतिपदेपासून होते तसे दक्षिण भारतात सुर्याच्या उत्तरायणात पोंगल सणापासून नववर्षाचा आरंभ होतो. पोंगल सणाचा संबंध कृषी आणि शेतीशी निगडीत आहे. पिकपाणी चांगले झाल्याचा उत्सव हा पोंगल सण साजरा करून केला जातो. हा सण जवळजवळ चार दिवसांपर्यत साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचे महत्व असते. क्रमाने भोगी पोंगल, थाई पोंगल, मट्टू पोंगल आणि कान्नुम पोंगल हे या सणाचे चार दिवस होत. ००००

No comments:

Post a Comment