‘नावात काय ठेवले आहे!’, ‘नामही काफी है !’ या उक्तींमध्ये ‘नावातच सर्वकाही’ हे ॲडीशन करण्याचा मोह काही आवरला नाही. गेल्या काही वर्षात देशाची राजधानी दिल्लीत महत्वाच्या वास्तू व संस्थांच्या नावात झालेल्या बदलांचा मी साक्षीदार आहे. या बदलांमध्ये प्रातिनिधीकपणे सांगायचे तर प्रधानमंत्री महोदयांचे निवासस्थान ‘७, रेस कोर्स’चे नाव झाले ‘लोककल्याण मार्ग’,‘योजना आयोगा’चे ‘निती आयोग’, संसदेची नवी इमारत झाली ‘सेंटर व्हिस्टा’, राष्ट्रपती भवनासमोरील विजयचौक ते इंडियागेट हा जवळपास ३ कि.मी.चा मार्ग ‘राजपथ’हून ‘कर्तव्यपथ’ झाला. याच ओळीत आता राष्ट्रपती भवनाचे ‘मुगल गार्डन’ हे ‘अमृत उद्यान’ झाले. पूर्वाश्रमीच्या मुगल गार्डनला सहपरिवार, मित्र, विभागाचे अधिकारी आणि आप्तेष्टांसह भेट देण्याचा व तिथली भव्यता,सौंदर्य डोळयात साठवण्याचा अनुभव आला. म्हणूनच या उद्यानाविषयी लिहावं असं मनापासून वाटलं, तोच हा लिखानाचा घाटही घातला.
दिल्लीतील वास्तव्यात फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच दोन महत्वाचे आयोजन डोळयासमोर येत असतं. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात आयोजित होणारा ‘सुरजकुंड इंटरनॅशनल क्राफ्ट मेला’ आणि सर्वसामान्यांसाठी जवळपास महिना-दीड महिना खुला राहणारा राष्ट्रपती भवनाच्या १५ एकर परिसरातील मुगल गार्डनचा ‘उद्यानउत्सव’.भारतदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत २८ जानेवारी २०२३ रोजी मुगल गार्डनचे नाव बदलून ‘अमृत उद्यान’ करण्यात आले. आणि नाव बदलानंतर आपल्या कार्यकाळातील पहिल्या-वहिल्या उद्यानउत्सवाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना मिळाला हेही खास आहे.
राष्ट्रपती भवन एस्टेट हे ३३० एकरावर वसलेले एक छोटेगावचं असून येथे ५ एकरावर राष्ट्रपती भवनाची इमारत तर याच इमारतीच्या मागच्या भागात १५ एकर विस्तीर्ण परिसरात उद्यान आहे.
राष्ट्रपती भवन बांधणारे वास्तुविशारद ‘सर एडविन लुटियन्स’ यांनी १९१७ मध्ये या उद्यानाचा आराखडा तयार केला. जम्मू आणि काश्मीरमधील मुगल उद्यान,आग्र्याच्या ताजमहाल परिसरातील उद्यान आणि भारत आणि फारशीमधील लघू चित्रांपासून प्रेरीत होवून उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानातील वास्तु उभारणीसाठी भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तुशैलीचा तर बागकामासाठी मोगल शैली आणि ब्रिटिश पुष्पउद्यान शैलीचा वापर करण्यात आला आहे.
बागकाम विभागाचे संचालक विल्यम मस्टो यांच्या मार्गदर्शनात १९२८-२९ दरम्यान या उद्यानात प्रत्यक्षपणे वृक्षारोपण करण्यात आले.
आयाताकार, लंबाकृती आणि वृत्ताकार अशा एकूण तीन आकारात हे उद्यान विभागले आहे.या उद्यानात ठिक-ठिकाणी वास्तु शिल्पाचे उत्तम नमुने आढळतात. विशेषत: मोगलकालीन नाल्या, छोटे-छोटे ओटे, पुष्पाकृती झाड, युरोपियन क्यारियो,लॉन यांचे प्रतिबिंब दिसून येते.
‘गुलाब पुष्प’ ; उद्यानाचे खास आकर्षण
या उद्यानात १५९ प्रजातींचे गुलाब पुष्प बघायला मिळतात. हे गुलाब मुख्यत्वे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उमलतात. या गुलाबांमध्ये अडोरा,मृणालीनी,ताजमहल,आयफेल टॉवर, मॉर्डन आर्ट, सेंटीमेंटल, ओक्लाहोमा(काळा गुलाब),बेलामी, ब्लॅक लेडी, पॅराडाइज,ब्लुमून, लेडी एक्स या प्रजातींचा समावेश होतो.
उद्यानातील गुलाबांना प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे नाव देण्यात आले आहेत.मदर टेरेसा, राजा राम मोहन रॉय, मि.लिंकन, जॉन एफ केनडी,जवाहर,क्वीन एलिजाबेथ,क्रिश्चियन डियोर या नावांचे गुलाब पुष्प या ठिकाणी बघायला मिळतात. महाभारतातील अर्जुन आणि भिम या पात्रांचीही नावे गुलाबांना देण्यात आली आहेत.
अशी आहे अन्य पुष्प संपत्ती
यासोबतच टयूलिप्स, एशियाटिक लिली, डेफोडिल,ह्यासिंथ आणि इतर ऋतुमानानुसार पुष्प या उद्यानाचे सौंदर्य आणि वैभव वाढवत आहेत.आकर्षक कंदीय पुष्पझाडे आणि शीत ऋतुमध्ये उमलणाऱ्या पुष्पांच्या ७० पेक्षा अधिक प्रजाती या उद्यानात आहेत. कागते (बोगेनविला) पुष्पांच्या १०१ जाती पैकी ६० जाती येथे दिसून येतात.
एलिसम,डेजी आणि फँसी आदी पुष्पलताही येथे दिसून येतात. या उद्यानाच्या निर्मितीवेळी कोलकत्ता येथून दूब गवत आणून लावण्यात आले. मोलश्री,गोल्डन रेन, टॉर्च या पुष्प वृक्षांसह पुष्प लतांच्या ५० प्रजाती आहेत.
राष्ट्रपती महोदयांच्या सूचनांनी उद्यानाच्या सौदर्यांत भर
स्वतंत्रभारताचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी हे राष्ट्रपतीभवनात वास्तव्य करणारे पहिले भारतीय होते. भारतदेश अन्नधान्यानात स्वयंपूर्ण नसल्याचे पाहून या समस्येतून मुक्ती मिळविण्याची सांकेतिक बाब म्हणून उद्यानात सी. राजगोपालाचारी यांच्या सूचनेनुसार गव्हाची शेती होत असे. राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या सूचनेद्वारे भूजल आणि वर्षा जलसंचयाचे कार्य या उद्यानात करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या उद्यानात औषधी उद्यान,दृष्टीबाधितांसाठी स्पर्श आणि सुंगधीय उद्यान, संगीतमय उद्यान,जैव उर्जा उद्यान, आध्यात्मिक तथा पोषण उद्यानांचा समावेश करण्यात आला.नवीकरणीय उर्जेच्या माध्यमातून उद्यानात वीजेची उपलब्धता ,बोन्साय उद्यान हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार सुरु झाले.
राष्ट्रपती भवानाचे हे सुंदर व भव्य उद्यान सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राष्ट्रपतीभवनाचा उद्यानउत्सव सर्व सामान्यांसाठी खुला करून देण्यात येत असे. तसेच, राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एकूण तीन सर्कीटमध्ये तिसरे सर्कीट हे पूर्वाश्रमीच्या मुगल व आताच्या अमृतउद्यानाचे आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पुढील सहा महिन्यांपर्यंत हे सर्कीट जनतेसाठी खुले असते. यावर्षी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश व अन्य न्यायाधिशांच्या उपस्थितीत या उद्यानउत्सवाचे उद्घाटन झाले. २६ मार्च २०२३ पर्यंत देशभरातील सर्वसामान्य जनतेस या उद्यानाला भेट देता येणार आहे.
००००