Wednesday, January 18, 2023
वॉक कुत्र्याचा व मालक-मालकीनचा
भारतात वाढते नागरीकरण हे महानगरांमधील जीवनशैलीत बदल घेवून आले आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा असणाऱ्या ‘अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या’च्या अगदी विरूद्ध महानगर आणि मोठया शहरांमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा बंगला, गाडी, नोकर आणि आपसूकच कुत्रे. शहरी व महानगरांतील जीवनात सोकॉल्ड श्रीमंतांमध्ये मूलभूत गरजांशिवाय स्टेटस सिम्बॉल म्हणून येणाऱ्या गरजांची तर गिनतीच नाही. पण त्यांच्या मूलभूत गरजांतील एक म्हणजे कुत्री पाळणे व त्यांच्यासोबत मालक-मालकीनबाई यांचा मॉर्निंग वॉक. (आज नेमकं नागपूरच्या सिव्हिल लाईन्स रस्याालने ऑफिसकडे जाताना ‘वॉक विथ डॉग’ दोन चार वेळा लागोलग बघण्यात आला , त्यातून सुचलेले स्फुरलेले हे स्पुट लिखाण)
‘भाग मिल्खा भाग’ हा बॉलीवुडमधील धावकाच्या यशावर आधारित चरित्र चित्रपट असूदे किंवा ‘सुल्तान’ पैहलवानीवर भाष्य करणारा चित्रपट. हे चित्रपट सर्वसामान्यांना वॉक व तत्सम शारीरिक कसरती करण्यास प्रेरक ठरतात. तसे ते सोकॉल्ड पैसेवाल्यांना वेब सेरिज या त्यांच्या बेसिक माहितीच्या स्त्रोतापासून ते अगणीत स्त्रोतांपासून मिळालेल्या माहितीतून ‘वॉक विथ डॉग’ या संकल्पनेसाठी प्रेरित करीत असावे हा एक कयास जो सत्याच्या एकदम जवळ असल्याचा माझा भाबळा समज.
देशाची राजधानी दिल्ली ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणे, उपराजधानी नागपूरसह अमरावती,नाशिक,औरंगाबाद आदी शहरांमधील सकाळचे चित्र ‘वॉक विथ डॉग’चा दिसून येतो. हा वॉक पण, काही साधा नसतो बर का!. म्हणजे ब्रँडेड आणि ओघाणेच महाग ट्रॅक सूट, मालकीनबाईंचा हल्का मेकअप तर मालकांस शोभणारा रुबाबदार पेहराव तर आलाच. याला कारणही लक्षात आलंच असेल ते म्हणजे रस्त्यावर डॉग सोबत वॉक करताना कोणते मालक व मालकिन सरस ठरतात याची आपसूक व छुपी स्पर्धा. या वॉकचं मुख्य आकर्षण असणारे कुत्रे हा आणखी पुढचा विषय. कुत्र्यांचे ब्रिडही आंतरराष्ट्रीय मानकात बसणारे उच्च प्रतिचे असावे लागतात. नाहीतर वॉक करतांना होणाऱ्या चर्चेत मालकाची अब्रू नको निघायला हवी की स्वस्त व हलक्या प्रतीचा कुत्रा पाळतो ते. लाखांचे कुत्रे व त्यांच्यासोबत कोटयाधिश मालक-मालकीन असे चित्र देशाच्या महानरांमधून आढळून येते. वाढत्या नागरीकरणाचाच आता हे एक अविभाज्य अंग म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
कुत्रे, मालक, मालकिन व चर्चा
बहुदा कॉर्पोरेट, बिजनेस क्षेत्रातील ही मंडळी असल्याने ते ‘वॉक विथ डॉग’ करताना त्यांच्या चर्चेचे विषय हे आपआपले क्षेत्र नराहता डॉग सेंट्रीक होतात. कुणाचा डॉग किती महागडा व किती वैशिष्टयपूर्ण यावर चर्चा करता करता वॉक पूर्ण होतो. मधे-मधे या विशेष डॉगला नैसर्गिक गुणधर्मानुसार ब्रेक घ्यायचा असतो तेव्हा त्यांच्या स्वभावानुसार एवढया मोठया मालकालाही नराहवून ब्रेक घ्यावा लागतो. मग विषय होतो आजकाल आमच्या डॉगीचे पोटच नीट राहत नाही, तुमच्या डॉगीचा डॉक कोणता?,त्याच्या जेवणाची हॅबीट,जेवणातील घटक अशा सर्व बारीक-सारीक विषयांवर चर्वित चर्वण घडते. त्यात डॉगीचा नैसर्गिक कार्यक्रम आटोपला की मग पुन्हा ‘वॉक विथ डॉग’ ची रपेट होवून विसावतेही. हा संवाद डॉग मालकिनींमध्ये वेगळया पातळीवर होतो ते इथे अधिक स्पष्ट नकरने लगे.
बापडया बेवारस कुत्र्यांचं काय?
थ्री इडिएट चित्रपटात आमीर खान आपल्या मित्रांची भिती घालवण्यासाठी ‘ऑल इज वेल’ म्हणत पहारा देणाऱ्या रात्रपहारेकऱ्याची गोष्ट सांगतो. या पहारेकऱ्याच्या महतकार्यात त्याला मदत करणाऱ्या Stray Dog अर्थात बेवारस कुत्र्याची महती तेवढी झाकोळली जाते.वॉक विथ डॉगचे भाग्य ज्या कुत्र्यांना लाभत नाही त्या सर्वांची गणती या श्रेणीत होते. यांच्या नशिबी परक्यांच्या भाकरीच्या वा तत्सम तुकडयावर गुजराण करण्याची वेळ येते. आणि कोणीही यावे ‘हड’ म्हणत वा दगड भिरकावून पळवावे अस पाचवीला पुजलेलं जीनं येतं. ‘आकाश मंडप पृथ्वी आसणं’ म्हणत रस्त्याच्या कडेला आसरा शोधणाऱ्या अशा बेवारस कुत्र्यांना कधी भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनस्वारांच्या फाजीलपणाचे बळी जावे लागते.
तात्पर्य, “‘वॉक विथ डॉग’ चा अनुभव घेणारा कुत्रा तुपाशी आणि बेवारस कुत्रा तो उपाशी”. श्वानांचे हे उदाहरण आपल्या आजच्या सोकॉल्ड पुढारलेल्या समाजाच्या बेगडी जगण्यातील फोलपणा अधोरेखित करतं एवढच काय ते सिद्ध होतं, हे माझं प्राजंळ मत मांडून येथेच पूर्ण विराम देतो.
०००००
Tuesday, January 17, 2023
जानेवारी महिन्याचा पहिला पंधरवडा आणि सणासुधीचा गोडवा
‘भारत माझा देश आहे ...... या देशातील सर्व परंपरांचा मला अभिमान आहे .....’ अशी प्रतिज्ञा घेत आपल्या शालेय जीवनाला सुरुवात होते. पण, या प्रतिज्ञेतील वाक्यांचा किंवा शब्दांचा अनुभव यायला व घ्यायला वयाने व अनुभवाने मोठे व्हावे लागते. तेव्हाचं आपल्याला वैविद्यपूर्ण भारतदेश आणि त्याच्या समृद्ध परंपराचा परिचय होतो. वर्षारंभी पहिल्याच पंधरवडयात देशाच्या विविध भागात साजरे होणारे लोहडी, बिहु, भोगी मकरसंक्रात आणि पोंगल हे सण याचे प्रातिधिक उदाहरण सांगता येईल. हे सर्व सण सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश आदी अंतराळातील बदल तसेच शेतीतील कापणीचा आणि पेरणीचा आनंद व्यक्त करणारे असल्याचा समानधागा सापडतो.
सणांच्या या ओळीत क्रमाने पहिला येणारा ‘लोहडी’ हा सण मुख्यत्वे पंजाब,हरियाणा दिल्लीसह उत्तर भारतात साजरा होतो. हा सण पांरपरिकरित्या शेतीतील पिकांची कापणी आणि रब्बीच्या पिकांची पेरणीशी संबंधित आहे. लोहडी ही होळी प्रमाणे लाकडं जाळून साजरी करतात. लोहडीच्या अग्नित रब्बीच्या पिकांच्या रुपात तीळ,रेवडी,भूईमुगाच्या शेंगा ,गुळ अर्पण केले जाते. मान्यतेप्रमाणे या वस्तू लोहडीला अर्पित करून सूर्य आणि अग्नि देवतेप्रती आभार व्यक्त करण्यात येतात पीक चांगली येवू देत व नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे अशी प्रार्थनाही असते.घरात येणाऱ्या सून किंवा बाळ या नवागतांच्या स्वागतासाठीही लोहडीचा सण साजरा होतो.
याच वेळी देशाच्या नेऋत्य भागातील आसाममध्ये बिहू सण साजरा होतो. यास भोगाली किंवा माघ बिहू म्हणतात पिकांच्या कापणीच्या आनंदाशी हा सण जोडला आहे.आसमी लोक मुख्यतः शेतीवर अवलंबून असल्याने, शेतात झालेल्या चांगल्या पिकाबद्दल देवाकडे आभार व्यक्त करण्यासाठी हा बिहू सण साजरा केला जातो. (वर्षभरात तीन बिहू सण आसामात साजरे होतात. रोंगाली किंवा बोहाग बिहू : हा एप्रिल महिन्यात साजरा होतो. हा मुख्यत: पेरणीचा सण आहे. कोंगाली किंवा काटी बिहू: हा ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो आणि तो पिकांचे रक्षण तसेच झाडाझुडपांच्या संरक्षणाची तसेच विविध गोष्टीत अंतर्भूत असलेल्या आत्मतत्त्वाची पूजा यांच्याशी जोडलेला आहे. भोगाली किंवा माघ बिहू: हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो जो पिकांच्या कापणीच्या कामाशी जोडलेला आहे.)
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. सामान्यपणे १३ जानेवारी रोजी भोगी सण साजरा होतो. तामीळनाडू, आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.तामीळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. भोगी सणाला लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. या सणाला शेतात मटार,गाजर,वांगी,तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी तयार करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.
‘मकर संक्रांती’ हा भारतभर साजरा होणारा सण जानेवारी महिन्यातील पहिल्या पंधरवडयाचे खास आकर्षण. भारतदेशा प्रमाणेच शेजारील नेपाळमध्येही मकर संक्रांती साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.
तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात, उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे. पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. भारत आणि नेपाळमधील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी हा भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
‘पोंगल’ हा तामीळनाडूत साजरा होणारा सण. देशात यावेळी मकरसंक्राती आणि लोहडीची धुमधामही असते. जानेवारी महिन्याच्या १४ किंवा १५ तारखेला पोंगल सण साजरा होतो. उत्तर भारतात नववर्षाची सुरूवात चैत्र प्रतिपदेपासून होते तसे दक्षिण भारतात सुर्याच्या उत्तरायणात पोंगल सणापासून नववर्षाचा आरंभ होतो. पोंगल सणाचा संबंध कृषी आणि शेतीशी निगडीत आहे. पिकपाणी चांगले झाल्याचा उत्सव हा पोंगल सण साजरा करून केला जातो. हा सण जवळजवळ चार दिवसांपर्यत साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचे महत्व असते. क्रमाने भोगी पोंगल, थाई पोंगल, मट्टू पोंगल आणि कान्नुम पोंगल हे या सणाचे चार दिवस होत.
००००
Thursday, January 12, 2023
नागपूरचा पक्षी ‘ओरियंट हनी बझर्ड’
भारतदेशाचा राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ तर महाराष्ट्राचा राज्य् पक्षी ‘हरियाल (हारोळी) याच ओळीत नागपूर शहराचा पक्षी ‘ओरियंट हनी बझर्ड’ हा होय. शहराच्या सिव्हील लाइन्स भागात जीपीओ चौकात Bird of Nagpur नावाने पक्षाची एक भली मोठी लोह प्रतिमा दिसली म्हणून या पक्षाची माहिती मिळवून येथे ही माहिती देण्याचा प्रयत्न. या पक्षाला क्रेस्टेड हनी बझर्ड नावानेही ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव पेरनीस प्टीलोऱ्हानक्स (Pernis ptilorhyncus) आहे. हा पक्षी ॲक्सीपीट्रीडाई (Accipitridae) कुटुंबातील एक शिकारी पक्षी असून या प्रजातीत पतंग, गरुड आणि हॅरियर सारख्या अन्य पक्षांचा समावेश होतो. या प्रजातीस ओरियंट हनी बझर्ड हे नामाभिदान प्राप्त झाले आहे. नावाव्यतीरिक्त ही प्रजाती ब्युटीओ बझर्ड प्रजातीच्या पक्षांशी संबंधीत नाही मात्र, वर्गीकरणानुसार पतंगांच्या जवळची प्रजाती आहे.
या पक्षाची मान लांब तर त्याचं डोक लहान (कबुतराप्रमाणे) असतं तर त्याची शेपटी सपाट असते. या पक्षाचे डोके तेवढे आकर्षक व मजबुत नसते म्हणजेच मोठी शेपूट बारकंस डोक असा त्याचा आकार दिसतो. या पक्षाच्या शरीराचा वरचा भाग तपकिरी असतो तर उर्वरीत शरिराच्या खालचा भाग हा फिकट तपकिरी रंगाचा असतो. गळयाचा रंग गडद असतो. शरीराच्या रंगाच्या मदतीनेच या पक्षातील नर व मादा ओळखता येतो. नराचे डोके निळसर-तपकिरी तर मादीचे डोके तपकीरी रंगाचे असते. मादा ही नराच्या तुलनेत आकाराने थोडी मोठी आणि रंगाने गळद असते. नराची शेपटी काळी आणि त्यावर पांढरे पट्टे आढळतात.
०००
Wednesday, January 11, 2023
‘घरा-घरात राहिबाई निर्माण व्हावी’ ; ‘गावोगावी बीज बँक’
(छायाचित्रे : श्री. राकेश वाटेकर,नागपूर)
निरक्षरता,दारीद्रय,पायाभूत सुविधांसह साधनसुविधांचा पूर्ण अभाव असताना उदात्त ध्येयाने सातत्यपूर्ण कार्य करून १५२ वाणांचा संग्रह करणारी बीजमाता राहिबाई पोपेरे या जेव्हा ‘पद्मश्री’ आणि ‘नारीशक्ती’ पुरस्काराला गौण मानून आपली इच्छा प्रगट करतात आणि त्या क्षणाचा मी साक्षीदार होतो. त्यांचा मनोदय, ‘घराघरात राहिबाई निर्माण व्हावी’ ; ‘गावोगावी बीज बँक’. प्रसंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमधील(३ ते ७ जानेवारी २०२३) महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन (५ जानेवारी २०२३) समारंभातील राहिबाईंचे मनोगत.
अंगात लाल भरजरी लुगड,नाकात मोठीजात नथ,कपाळावर त्याचं नथीला शोभावं आणि सभागृहात बसलेल्या शेवटच्या व्यक्तीलाही दिसेल एवढया आकाराच कुंकु लेलेली, काळया-सावळया रंगाची मध्यम शरीर यष्टीची कराऱ्याबाण्याची व्यक्ती सभागृहातील पोडियमवर येते (पायातील चप्पल मंचावरच काढून) बीजमाता म्हणून महाराष्ट्रासह भारत व जगाला ओळख झालेलं हे व्यक्तीमत्व म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरे.
राहिबाई , आपल्या संघर्षाचा पट उलगडत होत्या. वडिलांना आपल्या संघार्षाचा नायक म्हणून अभिमानाने उल्लेख करणाऱ्या राहिबाई आपल्या एकूण ८ भावंडांचा उल्लेख करतात. लहानपणीच मातृछत्र हरवल्याची दु:खद बाब मांडतांना वडिलांनी दिलेल्या संस्कारी शिकवणुकीचाही त्या अभिमान बाळगतात. दुर्गम भागात असलेले गाव आणि कमालीचे दारिद्रय यामुळे अशिक्षीतपणाचा शिक्का माथी बसल्याचा उल्लेखही त्या करतात. लहानवयात लग्न होवून त्या सासरी आल्या. पण, आयुष्यातील संघर्ष थांबतच नव्हता.
रात्री बाळंतपणे ; सकाळी घरातील कामे
राहिबाईंच्या संसारवेलीवर चार फुल फुलली. बाळंतपणासाठी आजच्या काळाप्रमाणे गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासूनच दगदग टाळण्यापासून सुरु होणारी काळजी ते बाळंतपणानंतर सक्तीची दोन महिन्यांची विश्रांती याला राहिबाई तद्दन अपवाद. ‘माझी एकूण चार बाळंतपण झाली, रात्री बाळ जन्माला यायचं अण दुसऱ्या दिवशी मी सार्वजनिक पाणवठयावर पाण्याची घागर भरायला जायची’ हे राहिबाईंचे वक्तव्य त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढवून जाते.
असा सुरु झाला बीजमातेचा प्रवास....
घरात मुलगा आजारी पडला. अगदी मरणाच्या दारात पोचला. त्याला कारण ठरले विषयुक्त अन्नधान्यातून झालेली बाधा. आणि याच प्रसंगातून राहिबाई यांनी ‘जुन्या गावराण बी-बियाण्यांचा शोध व संग्रह आणि विषमुक्त अन्न’ हे जीवनाचे ध्येय बनवले. लहानपणापासूनच काळया आईच्या अंगाखांद्यावर बाळगणारी राहीबाई आता याच काळया आईने दिलेल्या मौल्यवान अन्नाचा ठेवा शोधू लागली. आपल्या घरातील गोठयातच बीजबँक तयार केली. आजुबाजुच्या परिसरातील वेगवेगळया भाज्या,फळांची बी मिळवण व त्याला स्वत:च निर्माण केलेल्या संरक्षक पध्दतीने साठवून ठेवणं हा प्रवास सुरु झाला. म्हणता म्हणता या बीजबँकेत बी -बियाण्यांचे १५२ अस्सल देशी वाण संग्रही झाले. एव्हाना प्रसारमाध्यमांची नजरही राहिबाईंच्या कामावर गेली. त्याची दखल सरकारनेही घेतली.केंद्रशासनाच्या मानाच्या ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने आणि केंद्राच्याच महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या ‘नारीशक्ती’ राष्ट्रीय पुरस्काराने राहिबाईंचा गौरव झाला. एका राजकीय पुढाऱ्याने तर राहिबाईंना घरही बांधून दिल आणि राहिबाईंच्या आग्रहाने त्या नेत्याने हेलिकॉप्टरद्वारे गावात प्रवास केला व गावात हेलिकॉप्टर आणण्याचा आपला मनोदय पूर्ण केल्याचा किस्सा सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून आला.
तथाकथीत आधुनिक जीवनशैलीच्या नावावर मानसाच्या जीवनपद्धतीत झालेला बदल आणि त्यामुळे त्याच्या जेवणाच्या ताटात आलेले विषयुक्त अन्न हे चित्र राहिबाईंना बदलायचे आहे. नवीन बी-बियाण्यांच्या नावाने आवई पेटवत आपण जुन्या पारंपरिक देशी वाणाचाच करीत असलेलो नायनाट थांबवण्यासाठी व ही वाण टिकवून ठेवण्यासाठी बीजबँकेची निर्मिती करण्यासोबतच हे ज्ञान सर्वसमान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्यही राहिबाई करीत आाहेत. त्यांच्या या कार्यात शेकडो हात जुळले आहेत. या कार्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे. देशी वाणाचा शोध व त्याचे संवर्धन करण्याबरोबरच जीवामृत निर्मिती , सेंद्रीय शेती व रसायणे मुक्त शेतीसाठी ही संस्था कार्यरत आहे. आपल्या कार्याची फलशृती होत असल्याचा व हे कार्य पुढे नेण्याचा विश्वासही राहिबाई बोलून दाखवतात.
पुरस्कार नको, माझं काम पुढे घेवून जा बस्स....
मनोगताच्या शेवटाकडे येताना राहिबाई स्तब्ध झाल्या. सभागृहात उपस्थित देशभरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची नरज आणि कानही पुन्हा पोडियमकडे केंद्रीत झाले. मला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला. तेथून काही महिन्यांनी त्यांच्याच हस्ते नारीशक्ती पुरस्कारही मिळाला. यावेळी मात्र राष्ट्रपतींनी न राहवून मला बोलवले आणि गप्पा मारत त्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पद्मश्री पुरस्कर वितरण कार्यक्रमाच्यावेळी मला बीजबॅकेची संकल्पना कशी सुचली आणि यासाठी प्रशिक्षण घेतले होते का?असे प्रश्न केल्याचा अनुभव कथन करतांनाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद फार काळ दिसला नाही. राहिबाईंनी दीर्घ श्वास घेतला आणि सांगत्या झाल्या, मी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या या आयोजनात तीन वेगवेगळया मंचाहून मनोगत मांडले .पण, मला एकाही पत्रकाराने भविष्यातील योजनांबद्दल विचारले नाही ! म्हणूनच मी आपणा सर्वांसमोर माझी इच्छा प्रगट करते. ‘मला असे पुरस्कार नकोत ! त्या परिस माझे काम पुढे जावे, घराघरात राहिबाई निर्माण व्हावी आणि गावोगावी बीज बँक तयार व्हावी.’
या वाक्यानंतर सभागृहात टाळयांचा कडकडाट आणि उपस्थितांकडून स्टँडिंग ओव्हेशन हे चित्र पाहून एक हृद्य आठवण माझ्या स्मृतीपटलावर कोरून घेतली व धन्य झालो.
०००००
असे शहर, अशी व्यक्तीमत्वे !
नागपूर सिव्हील लाईन्सचा भाग म्हणजे महत्वाच्या कार्यालयांचा राबता असलेला आहे तसाच तो विविध वैशिष्टययुक्त आहे. त्यातील एक वैशिष्टय म्हणजे, या रस्त्याच्या दुतर्फा असलेले नागपूर शहारातील महान व्यक्तीमत्वांचे अर्धाकृतीपुतळे. बोले पेट्रोलपंपापासून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य चौकापर्यंत (जीपीओ चौक) येताना रस्त्याच्या दुतर्फा एकूण ८ अर्धाकृती पुतळे उभारण्यात आले आहेत. नागपूर शहराला वेगळी ओळख देणाऱ्या या व्यक्तीमत्वांच्या दर्शनानेच जणू धन्यत्वाची भावना मनात येते.या शहरापासून अपरिचित व थोडया अर्थाने आगंतुकांना शहराच्या व्यक्तीमत्वांचा परिचय करून देण्याची ही संकल्पना भारीच वाटली बुवा.....
बोले पेट्रोलपंपाकडून येताना डाव्या बाजुला चार आणि उजव्या बाजुला चार असे एकूण आठ अर्धाकृतीपुतळे उभारण्यात आले आहेत. डाव्याबाजुला पहिले दर्शन घडते ज्येष्ठ माकप नेते ए.बी.बर्धन यांचे. तत्कालीन बंग्लादेशच्या बारिसाल परगण्यात जन्मलेले बर्धन यांचे बालपण वडिलांच्या रेल्वेतील नोकरीमुळे नागपुरातच गेले. नागपूर विद्यापीठातून पदवी घेत बर्धन यांनी 1957 मध्ये नागपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक जिकंल्याचा गौरवशाली इतिहास आहे.
रस्त्याच्या उजव्या बाजुला आपणास प्रथम दर्शन घडते पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे. 'मानवता हाच खरा धर्म' हा संदेश देणारे विद्वान, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख हे मुळचे अकोला जिल्ह्यातील कानसेवनीगावचे रहिवासी. गुजरातूनमधून स्थलांतरीत झालेले पारेख कुटुंब नोकरीच्या शोधात नागपुरात आले. वयाच्या १९व्या वर्षी मौलाना पारेख यांनी 'होली कुरान' चा सोप्या ऊर्दूत केलेला अनुवाद १९५२ साली 'इझी डिक्शनरी ऑफ कुरान' या नावाने प्रकाशित झाला.
याच ओळीत पुढे पद्मश्री डॉ. बी. एस. चौबे यांचे दर्शन घडते. विद्यार्थी प्रिय शिक्षक, वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आणि गरीबांचे डॉक्टर म्हणून डॉ. बालस्वरुप एस. चौबे यांची ख्याती. मुळचे वाशिम येथील डॉ चौबे यांनी नागपुरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्रात पदवी पूर्ण केली. डॉ. चौबे हे भारतातील प्रख्यात किडनी विकारतज्ज्ञ होते.
रस्त्याच्या डाव्या बाजुला आरबीआय कर्मचारी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारा लगत कविश्रेष्ठ माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांनी मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे ४५ वर्षं अधिराज्य गाजवले. ‘दुःखाचा महाकवी’ असं बिरुद मिरवणा-या कवी ग्रेस यांना निधनाच्या एक महिन्या आधी (फेब्रुवारी 2012) अत्यंत मानाच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं(या प्रसंगाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार). कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी. १९६७ मध्ये 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतरची पुढची चार दशकं कविता व ललितलेखांच्या माध्यमातून त्यांच्या सृजनाचा झरा अखंड वाहत राहिला. ‘राजपुत्र आणि डार्लिंग’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’, ‘सांजभयाच्यासाजणी’ हे कवितासंग्रह ; ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘मृगजळाचे बांधकाम’, ‘कावळे उडाले स्वामी’ हे ललितलेख संग्रह ही ग्रेस यांची मराठी साहित्याला मिळालेली अमुल्य ठेवं.
पुढे याच रस्त्यावर ग्रेस यांचा पुतळा ओलांडल्यानंतर राजाराणी चौक लागतो. या चौकातून जीपीओ चौकाकडे जाताना उजव्या हातावर आपणास लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळयाचे दर्शन घडते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात माधव अणे उपाख्य लोकनायक बापूजी अणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते वेगळ्या विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जन्मलेले अणे यांनी पुढे नागपुरातील मॉरिस कॉलेजमधून पदवी घेतली. १९३३ साली ते काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष झाले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारतदेशाचा मानाचा नागरी सन्मान 'पद्मविभूषण' तर त्यांच्या 'तिलकयशोर्णव' या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
याच रस्त्याच्या डाव्या बाजुला सुमतीताई सुकळीकर यांचे दर्शन घडते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जन्मलेल्या सुकळीकर विवाहानंतर नागपुरातील रामदासपेठेत स्थायिक झाल्या.त्यांनी महिलांच्या प्रश्नांना हात घालत त्यांना एकजुट करण्याचे काम केले. त्यांनी निवडणूकही लढवली. त्या गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होत्या. हैद्राबाद हाऊस अर्थात मुख्यमंत्रिसचिवालयासमोर आपणास मा. गो. वैद्य अर्थात माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे दर्शन घडते. वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेले मा.गो.वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालतेबोलते विद्यापीठ समजले जात. त्यांनी स्वयंसेवक,शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, शेतकरी, समाजजीवन, कुटुंबप्रमुख या सर्व भूमिका चफकलपणे निभवल्या.
याच ओळीत विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांच्या अर्धाकृती पुतळयाने या सुंदर उपक्रमाचा सामारोप होतो. जांबुवंतराव नागपुरातील अग्रवाल लेआऊट परिसरात राहत असतं. प्रकृतीसाठी शासकीय रुग्णालयातच उपचार घेणे, आपल्या विरोधात वृत्तपत्रात काहीही छापून आले तरी खुलासा करायचा नाही आणि वाढदिवस साजरा करायचा नाही ही आयुष्याची तीन सूत्रे त्यांनी कायाम पाळली होती. पालिका शाळेत शारिरीक शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन यवतमाळात नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवाहरलाल दर्डांचा पराभव करणाऱ्या जांबुवंतरावांनी राजकारणाच्या रंगमंचावर फॉरवर्ड ब्लॉक पक्षामध्ये प्रवेश केला. कृषी विद्यापीठ विदर्भात झाल्याशिवाय विधिमंडळात पाय ठेवणार नाही !, असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात पाच बळी गेल्यावर अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झाले. तेव्हापासून मात्र धोटे विदर्भवादी झाले आणि स्वतंत्र विदर्भासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले. तीनदा आमदार व एकदा खासदार राहिलेल्या धोटे यांनी दोनदा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवही पाहिला.उत्कृष्ट नट, लेखक, नेता,वक्ता असलेल्या धोटेंनी ‘जागो’ हा हिदी चित्रपट काढला आणि ‘बलिदान’ हे वर्तमानपत्रही सुरू केले होते.
ओरियंट हनी बझर्डची सुबक लोह प्रतिमा
विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वळण्यासाठी जीपीओ चौक लागतो. या चौकात आपल्याला नागपूर शहाराच्या पक्षाच्या(Bird of Nagpur) सुबक लोह प्रतिमेचे दर्शन घडते. ओरियंट हनी बझर्ड हा नागपूरचा पक्षी लोहाच्या खास कलाकृतीने येथे आपले लक्ष वेधून घेतो.
00000
असाही विरोधाभास
नागपूर शहरातील प्रशासकीय अड्डा म्हणता येईल असा महत्वाचा परिसर आणि इथे अनुभवलेला विरोधाभास मांडण्याचा मोह काही आवरेना म्हणून खरडत आहे. त्याच झाल अस!, शहरातील माझ्या मुक्कामाच्या ठिकाणाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निघताना मला भोले पेट्रोल पंपाला उतरून सिव्हील लाईन्सचा ऑटो घ्यावा लागतो. पुढे ऑटो जिथे थांबतो तोच महाराष्ट्रातील एका दिग्गज राजकीय नेत्याचा बंगाला आहे. आता काल ज्या बंगल्यासमोर उतरलो तिथे स्मशान शांतता होती. बंगल्यापुढील वृक्ष, वेली, त्याची पाने फुले सुध्दा रुष्टली होती. मुख्य रस्त्यापासून नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापासून तर बंगल्याच्या पहिल्या-वहिल्या हॉलपर्यंत तरी स्मशान शांततेचे हे वातावरण कायम असल्याचे चित्र होते.
आज मात्र चित्र भलतेच वेगळे होते. आठवडयाचा पहिला दिवस सोमवार दि.१२ डिसेंबर २०२२ तीच जागा, तोच बंगला. मात्र, वातावरण जल्लोशाचं होतं. बंगल्यासमोर मानसांची गर्दी दिसत होती व त्यातील प्रत्येकजन एकमेकाला गुलाल लावण्यात व मिठाई भरवण्यात व्यस्त होता. ढोल -ताशांच्या गजराने परिसर दणानून गेला होता. बंगल्यासमोरील वृक्ष, वेली, त्याची पाने फुले सुध्दा आता टवटवीत व उत्साही दिसत होती. हा आनंद होता या बंगल्याच्या मालकाला उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीनाचा.
०००००
Tuesday, November 15, 2022
यंत्र आणि वेळेची ऐसीतैसी
मानवी प्रगतीच्या अनेक मानदंडापैकी एक म्हणजे यंत्र. या साधनाने मानवाच्या प्रगतीत जेवढी मोलाची भूमिका वठवली तेवढेच मानवाचे नुकसानही झाले आहे, याचा प्रत्ययच आज एस.टी. बसमध्ये आला. परतवाड्याहून अकोल्यासाठी निघालेली ही बस आपल्या नियत प्रवसादरम्यान अचानक थांबली. कुणाला ऑफिसला पोचायचय, कुणाला कोर्टाची तारीख ,लग्न अटेंड करायची लगबग तर विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज व क्लासेस अटेंड करण्याची घाई असल्याने या बसच्या अकोल्यात पोचण्याच्या बेताने आखलेले सर्व नियोजन खटक्यात कोलमडले.
गाडीचे वाहक आपल्याजवळ असलेल्या तिकीट यंत्रात काही तरी सारखे उघड झाप करतायेत हे पाहून एव्हाना शांत झालेल्या सर्व प्रवाशांना कळून चुकले होते की ‘तिकीट मशीन’मुळे बस प्रवासात मोठा अडसर निर्माण झाला आहे.
‘तिकीट मशीन’ने वाहकाला फोडला घाम
तापमानातील घटीमुळे वातावरणात गारवा वाढूलागल्याचा परिणाम गाडीतील प्रवाशांच्या अंगातील गरम कपड्यांनी अधोरेखित होत असताना बसच्या वाहकाला दरदरून फुटलेला घाम काही आता प्रवाश्यांच्या नजरेतून लपून राहिला नव्हता. तिकीट मशीनने मध्येच पुकारलेला संप मात्र, या वाहक महोदयांच्या यांत्रिक कौशल्याची परीक्षा ठरत होता. त्यांच्या अवाक्या बाहेर गेलेला विषय आता एसटीच्या तांत्रिक सहायकाकडे गेला अर्थात वाहकांनी तंत्रसहायकाला फोन केला. आता मात्र, सर्वांना प्रतिक्षा लागून राहिली ती तंत्रसहायकाची . साहेब कधी येणार तुमचा तंत्रसहायक अशा बसमध्ये बसलेल्या प्रवशांच्या प्रश्नाला वाहकाच उत्तर येणार हो ५ -१० मिनिटांत. तेवढयात वाहकसाहेंबांचे तिकीट मशीन उगडझाप करण्याचेच प्रयत्न फळाला आलेत आणि अशी तशी रुसलेली मशीन काम करती झाली. तीन चार तिकट देवून झाल्यानंतर आता बराच काळ थांबलेली एसटीबस मार्गस्थ होईल अशी आशा प्रवाशांना लागलीतीच आशा केविलवाणी ठरावी अशी घटना घडली. म्हणजे, अचानक तंत्र सहायकाची एंट्री झाली. सायासाने कार्यरत झालेल्या तिकीट मशीनवर आता तंत्र सहायकाने सोपस्कारम्हणून प्रयोग सुरु केले.अशात प्रवशांमधून पुन्हा एक आरोळी आली , ‘साहेब सुरळीत सुरु झालेल्या तिकीट मशीनला आता काय नवीन ट्रिटमेंट देताय?’ त्यावर वाहक महोदयांचे उत्तर , अहो ही तात्पुरती सुरु झाली होती मशीन आता इथून पुढे अकोल्या पर्यंतच्या प्रवासात ही तिकीट मशीन बंद पडू नये म्हणून तंत्रसहायक नीट तपासून कार्यवाही करीत आहेत, पाहतो तर काय या मशीनने आता तंत्रसहायकालाही पुरता घाम फोडला होता, त्यांनीही एसटीबसप्रवास विलंबात हातभार लावून सोपस्कार आटोपलेत. आणि जवळपास २५ मिनिटांच्या खंडानंतर या सर्व कार्यकलापाची बाजुला राहून नुसती गंमत बघणारे एसटीबसच्या चालकांनी भिष्मप्रतिज्ञा घेत गाडी सुरु केली. एव्हाना तुम्हालाही कल्पना आलीच असेल की, प्रवासास विलंबानंतर चालकांनी कोणती भिष्म प्रतिज्ञा केली असेल तर . अगदी बरोबर ते म्हणाले, ‘जरी तिकीट मशीनच्या बिघाडामुळे बस प्रवासास २५ मिनिटांचा खोडा असला तरी आपल्या मौल्यवान वेळेची भरपाई करून देत मी आपणा सर्वांना अकोला बसस्थानकात नियत वेळेनुसार म्हणजेच सकाळी ११.०० पोहचवेन. ’ आता दर्यापूर ते अकोला हा म्हैसांग मार्गे बसगाडीचा प्रवास मात्र सुसाट वेगाने झाला आणि बसचालकाने दिलेला शब्द पाळला गेला. बस प्रवाशांना झालेला मनस्ताप व एसटीच्यासेवे बद्दल निर्माण झालेली नकारात्मक प्रतिक्रिया क्षणात बदलली व सर्व प्रवशांना नियत वेळेनुसार व नियोजनानुसार आप-आपले काम पारपाडण्याचा मार्गही प्रशस्थ झाला. या प्रवशांमध्ये असलेला मी सुध्दा सर्व निरीक्षण टिपून शब्दब्ध करून आपल्यापुढे मांडले. सद्या अकोला येथे नोकरी निमित्त ये-जा करण्यासाठी विविध संपर्क माध्यमांचा उपयोग करणारा मी पहिल्यांदा या प्रवासावर लिहिता झालो, त्यासाठी सर्वांचे आभारही तर मानलेच पाहिजे. मंडळी आभार.
०००००
Subscribe to:
Posts (Atom)





















