Friday, July 29, 2022

माणुसकी @50-50

‘माणसा-माणसा कधी होशील माणूस…’ ही बहिणाबाई चौधरींची आर्जव आणि ‘माणूस द्या मज माणूस द्या ही भिक मागता हरि दिसला…’ हे संत तुकाडोजी महाराजांचे भजन आठवणे मला औचित्याचे वाटले. प्रसंगही तसा म्हणजे मला अनुभवाअंती आजच्या युगातील माणुसकी व्यवहारी ठरत असल्याचे व त्यात 50% माणुसकी आणि 50% स्वार्थ आहे हे आढळून आले, म्हणूनच या लिखानाला मथडा देताना ‘माणुसकी @50-50’ ही ओळ सुचली. आता मूळ विषयाकडे वळतो. मी, बायको मुलासह नुकताच मसुरीला जावून आलो तिथला हा अनुभव. मसुरीहून आम्ही उत्तराखंड रोडवेजच्या बसने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ही बस आता उत्तराखंडच्या राजधानीत येवून धडकली तसेच वरुण राजाने जोरदार बॅटींग केली त्यामुळे देहरादूनच्या रस्तोरस्ती पाणी साचल्याचे चित्र होते. आम्ही रेल्वेस्टेशनला पोचलो आणि आमची दिल्लीसाठीची व्होल्वो आयएसबीटी अर्थात अंतरराज्यीय बस स्थानकाहून असल्याने आम्ही आयएसबीटीसाठी स्थानिक शेअर रिक्षा घेतला. आमचा ऑटो आयएसबीटीला पोचला रिक्षा चालकाला २०० रूपयांची नोटी दिली त्याने पैसे परत देताना एक मळकट नोट दिल्याचे मला निदर्शनास आल्याने ही नोट बदलायची म्हणून मी हातातील पैस्यांचे पाकीट खाली ऑटोच्या सीटवर ठेवले. रिक्षा चालकाने दिलेल्या नोटांपैकी ही मळकट नोट शोधू लागलो मग ती नोट बदलून घेत आम्ही ऑटोतून बाहेर पडलो. रस्त्यावर पावसाचे पाणी साचले असल्याने आधी सर्व एका जागी थांबलो मग लक्षात आले की आपले पैस्यांचे पाकीट नाही म्हणजे ते ऑटोतच राहिले हेही लक्षात आले तसाच तो ऑटो शोधायला मी सुसाट वेगाने रस्त्याने निघालो. मात्र, प्रयत्न अयशस्वी ठरला. मग तिथे उभ्या असलेल्या एका पोलीसाला हा वृत्तांत कथन केला तेव्हा त्याने शेजारील पोलीस चौकीत जावून सीसीटीव्ही फुटेजहून संबंधी ऑटोची माहिती कळेल असे सांगितले. मग पोलीस चौकीत गेलो तिथे विनंती करताच मनोज सिंह चौहान या पोलिसाने चौकितील स्क्रीनवर संबंधीत कॅमेराचे फुटेज रन केले साधारण ५.१० वा.ची घटना असल्याचे सांगितल्याने त्याआधीचे १५ मिनिटांपासूनचे संबंधीत फुटेज त्यांनी रन केले. शेवटी ५.१५ ला तो ऑटो स्क्रीनवर सापडला. पण, त्या ऑटोची नंबर प्लेटच दिसत नव्हती. मग चौहान साहेबांनी स्क्रीनहूनच फोटो घेत ऑटो युनियनच्या व्हॉटसअपग्रुपवर हा फोटो शेअर केला. आणि म्हणाले, ‘आप यही रुक जाओ एक दो ड्राईवर आऐगे उनकी पहचान करना’. आता घडयाळीत ५.५५ वाजले होते आणि दिल्लीसाठी आमची व्होल्वो बरोबर ६.०० वाजताची होती. मी म्हटल, ‘सर हमे निकलना होगा ड्राईवरोकी पहचान मै व्हीडीओ कॉल से कर लुगा’ असे म्हणत मी चौहान साहेबांचा फोन नंबर मोबाईलमध्ये फिड करून आयएसबीटीकडे वळलो आता प्राप्त परिस्थिती नुसार आम्ही दिल्लीकडे निघालो. कहानी मे ट्विस्ट या सर्व घटनाक्रमानंतर कहानी मे ट्विस्ट म्हणावा असे घडले. आम्ही देहरादूनहून साधाारण ३० कि.मी अंतरावर आलो असतांना एक फोन आला व ती व्यक्ती म्हणाली, ‘आप मसुरी में जिस होटल में रुके थे वहासे बोल रहा हुं जी, देहरादून मे आपका मनीपर्स ऑटो में छुटा था वो किसी महिला को मिला है और उस पर्स में आपने हमारे होटल का कार्ड रखा था उससे नंबर लेकर उस महिलाने फोन मिलाया है’. हे ऐकूण माझा जीव भांडयात पडला तोपर्यंत खबरदारी म्हणून मी पर्समधील एसबीआय बँकेचे डेबीट कार्ड टेंपररी ब्लॉक करून ठेवले होते. इतक्यात हॉटेलमधील त्या गृहस्थाकडून संबंधीत महिलेचा मोबाईल नंबर घेतला व त्या महिलेस फोन केला व त्या महिलेनेही तुमचे पैस्यांचे पॉकीट मला सापडले असल्याचे सांगून मला आश्वस्थ केले. त्या महिलेचे नाव विचारले तर ती म्हणाली मै दिपीका. मग त्यांना माझा दिल्लीतील निवासी पत्ता पाठवून मी म्हणालो की या पत्त्यावर मला आपण माझे पैस्यांचे पाकीट पाठवून द्या ती महिलाही म्हणाली उद्या पाठवून देईल पोस्टाने . त्या महिलेस मी व्हॉटस्अपवर पत्ताही पाठवला व सहकार्यासाठी आभारही मानले. या घटनेनंतर माझ्या निवासी पत्त्यावर स्पीडपोस्टाने माझे पैस्यांचे पाकीट सुखरुप आले त्यात माझे एक डेबीटकार्ड, एक क्रेडीट कार्ड , आधार व पॅन कार्ड माझे व बायकोची पासपोर्ट साईज फोटो अशा सर्व गोष्टी होत्या. पण, या पाकीटात असलेल्या एकूण २५०० रुपयांपैकी केवळ ५२० रूपये परत आले होते. म्हणजे या महिलेने पाकीट परत करून ५० टक्के माणुसकी दाखवली पण पाकीटातून पैसे काढून स्वत:चा स्वार्थही सिध्द केला .आता तुम्हाला मी या लिखानास दिलेल्या मथडयाचा अर्थ कळला असेलच. (सोबत काही फोटो देत आहे. ज्यात पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज मध्ये आढलेल्या ऑटोचा फोटो, त्या महिलेसोबत झालेल्या व्हॉटस्अप संवादाचे स्क्रीन शॉट, त्या महिलेने पाठविलेल्या स्पीड पोस्ट पॅकींग आणि प्रत्यक्ष पॅकीट मिळाल्या नंतर त्यातील ऐवजाचे फोटो दिले आहेत.) ००००

No comments:

Post a Comment