Thursday, May 11, 2023

सर्वोच्च न्यायालयातील केस पेंडंसी कमी करणारे सरन्यायाधिश न्या.अहमदी


 



भारताचे २६ वे सरन्यायाधिश न्या. मु.अ.अहमदी यांचे २३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. आज (11 मे २०२३ रोजी) सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करण्यात आली. या शोकसभेत सरन्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या  दोन न्यायाधिशांनी न्या.अहमदी यांच्या कतृत्वावर प्रकाश टाकला. त्यातील मला भावलेले व आकलन झालेले  मुद्दे येथे रेखाटत आहे.

गुजरातच्या अहमदाबाद शहरात दाऊदी बोहरा कुंटुबात अजिज मुस्सबर अहमदी यांचा जन्म झाला. वडीलही कायदेतज्ज्ञ असल्याने घरातूनच त्यांना  वारसा लाभला होता. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला (भारताचे ११वे सरन्यारयाधिश) यांच्या नंतर 1994 मध्ये ते भारताचे दुसरे मुस्लीम सरन्यायानिध झाले. सर्वोच्च न्यायालयात केसेस पेंडंसी कमी करण्यासाठी  आणि येथील कामकाजात संगणकाचा पूरेपूर वापर करण्यासाठी त्यांची तीन वर्षांची प्रशासकीय कारकिर्द गाजली. भोपाळ गॅस दुर्घनेतील त्यांच्या निकालासह, संजय दत्त यांच्या टाडा कायद्याअंतर्गत खटल्यातील जामीनासह  अडिच  हजारांवर निर्णय त्यांनी दिले.

सर्वोच्च न्यायालयातील केस पेंडंसी कमी करण्यासाठी त्यांनी अवलंबलेली व यशस्वी करून दाखविलेल्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता त्यांना इंग्लडच्या सर्वोच्च न्यायालयात पाचरण करण्यात आले होते. हा भारतीय न्याय प्रणालीचा मोठा सन्मानच ठरला. सरन्यायाधिशपदाच्या कार्यकाळात त्यांची प्रशासकीय कारकिर्द ही न्याय प्रणालीत संगणकाच्या प्रयोगाच्या आग्रहामुळे मैलाचा दगळ ठरली. त्यांनी न्याय प्रणालीत संगणकाचा उपयोग केवळ ३ टक्केच होत असल्याचे दाखवून दिले व संगणक वापराचा टक्का मोठया प्रमाणात वाढवला.  

सरन्यायाधिशाव्यतिरीक्त न्या.अहमदी यांचं व्यक्तीमत्व कुटुंबवत्सल होत. महत्वाचे निर्णय देवून आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अहमदी यांना त्यांची पत्नी अमिना खूप प्रसंगात  महत्वाचा सल्ला देत असे व मार्गदर्शन करीत असे त्यांच्या चिरंजीवानेच अधोरेखित केले आहे. तर मुलीने सांगितले आहे की कामकाजाचा व्याप आटोपून रात्री ९ वाजता अहमदी हे आम्हा मुलांसोबत टेनिस खेळत आणि आयुष्य व कायदा याचेचे विविध बारकावे समजावून सांगत. व्यवसायाला सर्वोपरी माननारे अहमदी यांचे एकतत्व होते, वडिलांच्या कार्यकाळात मुलाने सर्वोच्च न्यायालयात कार्यभार सांभाळू नये . याचा त्यांनी अंगिकार केला व आपल्या मुलास त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च्‍ा न्यायालयात कार्यकरण्यास नाकारले.

राज्यघटना, कायदा यांचा सखोल अभ्यास असणारे न्या. अहमदी यांनी आपल्या नि:पक्षपाती  निर्णयाने भारतदेशाच्या न्याय प्रणालीत अभूतपूर्व योगदान दिले आहे. न्या.अहमदी यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

                                                 ०००००

 


द केरला स्टोरी : स्वैर समीक्षण




 सिरीया, यमन, इराण आणि अफागाणिस्तानच्या युद्धजन्य भागात कार्यरत आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या एका शिबिरात लष्कराचे अधिकारी एका महिला कैद्याची चौकशी करत असलेला पहिला-वहिला सिन पडद्यावर झळकतो. चौकशी  अधिकारी  नाव  विचारताच ती सांगते, ‘सर मेरा नाम शालिनी उन्नीकृष्णन, भारत के केरला राज्य से हू’. प्रतिप्रश्न येतो, ‘रेकॉर्ड के अनुसार आप  सिरीया  की  नागरिक  हो और आपका नाम  फातिमा है’ यह आपको  कबुल है?, त्यावर शालिनी सांगते, ‘नही  मुझे  फसां कर यहां लाया गया है।’.

 केरळमधील भारतीय नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता आलेल्या या राज्याच्या वेगवेगळया भागातील  शालीनी आणि तिच्या रूममेट ‘गितांजली’ आणि ‘निमा’ ला आयएसआएस या दहशतवादी संघटनेच्या स्थानिक गटाकडून जाळयात अडकवण्यापासून सिरीयापर्यंतचा शालिनीचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. वास्तवघटनेवर आधारित हा चित्रपट असून पिडीत महिलांची कहाणी  या चित्रपटात मांडण्यात आल्याचा दावा आहे. चित्रीकरण,संगीत, गिते(मल्याळम भाषेतील हिंदी सबटायटलसह) आणि दमदार अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो व आपल्याच देशातील एक  सामाजिक समस्या  ठसठसितपणे  मांडतो. चित्रपटातील मल्याळम टोन मिश्रीत हिंदी भाषेतील संवाद ही एक जमेची बाब दिसून येते.

हा संपूर्ण चित्रपट म्हणजे शालीनीची फ्लॅशबॅक स्टोरी होय. एका केरळी  हिंदू परिवारात वाढलेल्या शालीनीचे पितृछत्र हरवले आहे. आजी आणि आईला शालीनी उच्च शिक्षणासाठी घर सोडून मोठया शहरात जात असल्याने काळजी वजा भिती आहे. भारतीय नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश आणि येथील वसतीगृहात कॉम्रेड वडिलांची  ‘गितांजली’  ही  लेक आणि  ख्रिश्चन  परंपरा  ठासून  माननारी  ‘निमा’ ही शालीनीच्या रूम मेट आहेत. चौथी रूममेट ही  ‘असिफा बा’ इस्लाम धर्म माननारी आणि आयएसआयएसची भारतातील स्थानिक एंजटही. असिफाच या तिन्ही मैत्रिणींचा ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम धर्म चांगला व त्यांचे स्वत:चे धर्म, त्यांचे कुटुंबिय वाईट असल्याचे विचार मेंदूत ठसवते. चित्रपट पुढे सरकत जातो तसा असिफाच्या चालीचाच एक भाग म्हणून  शालीनी व गितांजलीच्या आयुष्यात बॉयफ्रेंड व कॅप्टेननावाचा झिंग आणणारा मादक पदार्थ प्रवेश करतो. शालीनीला अशातच बॉयफ्रेंडकडून गर्भधारणा होते. हिंदू धर्माच्या मुलीसोबत मुस्लिम मुलगा कसा लग्न करणार? हा शालीनीच्या बॉयफ्रेंडचा सुनियोजित प्रश्न व त्यास असिफाकडून तेवढाच धर्मपरिवर्तनाचा सुनियोजित सल्ला दिला जातो. आपल्या प्रेमाची निशानी म्हणून पोटातील बाळासाठी शालीनी धर्मपरिवर्तनास तयार होते व त्या विधीही पार पाडते. लग्नानंतर बॉयफ्रेंड सोडून जातो मग पोटातील मुलाला बाप कोण? हा यक्ष प्रश्न पुन्हा शालीनी समोर उभा राहतो. मौलवीचा त्यावर तोडगा असतो की, धर्मपरिवर्तन केल्यामुळे तू घरापासून मुकलीस आणि बॉयफ्रेंडही सोडून गेला तेव्हा दुसरे लग्न मुस्लीम मुलासोबतच करणे हा पर्याय पुढे येतो. कात्रित सापडलेली शालीनी म्हणजे धर्मपरिवर्तना नंतरची ‘फातिमा’ हा पर्याय स्वीकारून पुढे जायचा निर्णय घेते. तोपर्यंत तिची रूममेट गितांजलीला आपण आयएसआयएसच्या जाळयात फसत असल्याची प्रचिती येताच ती मुस्लिम बॉयफ्रेंडला लग्नास आणि सिरीयात जाण्यास नकार देते. तिचा नकार म्हणजे आयएसआयएसला चॅलेंज असल्याचे माणून तिचा माथेफेरु बॉयफ्रेंड तिचे अश्लिल व्हिडीयो व्हायरल करते.ही बदनामी सहन न करू शकलेली गितांजली घरातच गळफास लावून घेत आयुष्य संपवते. निमा तर इस्लामला मानण्यास नकार देते म्हणून तिला ड्रिंक्समध्ये औषध घालून तिच्यावर सातत्याने बलात्कार करून बदला घेण्याचा किळसवाणा प्रकारही आयएसआयएसच्या स्थानिक रॅकेटकडून घडतो.

तोपर्यंत शालिनीच्या आयुष्याचा गुंता अधिकच अवघड होवून बसतो. पोटातील बाळाला जन्‍म देवून आपला सुखी संसार  थाटण्यासाठी पर्यायाने इस्लामच्या मार्गावर चालण्यासाठी भारतसोडून शालीनी सिरीयामध्ये येते. इथे स्थिती अजूनही भयावह असते. आयएसआयएसची मंडळी या बायकांना घरात डांबून ठेवतात. घरी बायकांचा भोग घेवून जिहादची लढाई लढण्यासाठी बायकांना महिनोन महिने वाऱ्यावर सोडण्याचा हा हिडीस प्रकार शालीनीच्या आयुष्याचा भाग होतो. आणि येथूनच तिला आपल्या हातून घडलेली चूक लक्षात येते. आपल्या मायदेशी परत जाण्याची  ठिणगी  तिच्यात पेटते. पण , दहशतवादाच्या अड्डयात पदोपदी मरणाचा धोका असताना संघर्षाचे शिवधनुष्य पेलून शालीनी सिरीयाची सीमा ओलांडते. सिमेवर बेशुध्दावस्थेत पडलेल्या शालीनीला आंतरराष्ट्रीय शांतता समुहाच्या शिबिरात आणल जात आणि  तिला लष्कराच्या चौकशीस सामोर जाव लागत. या चौकशीतूनच केरला स्टोरी अख्ख्या जगासमोर येते.

 केरला स्टोरी हा विषय गुन्ह्याच्या परिभाषेत  हयुमन ट्राफिकींग ठरतो. केरळ मध्ये दरवर्षी ३० हजार मुली बेपत्ता होतात हा विषयही या चित्रपटात येतो. या समस्सेला आळा घालण्यासाठी देशात स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. हा चित्रपट यंत्रणांच्या अक्षमतेवर बोट ठेवतो. चित्रपटात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या कुकृत्याचा परदाफाश करताना संबंधित धर्माचा आधार घेतला आहे. आणि केरळमध्ये काही ठिकाणी शरीया कायदा अंमलात असल्याचेही मांडतो. चित्रपट या माध्यमाची मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यानावार दिग्दर्शकाने साधलेला कमर्शीयल हेतूही नाकरता येत नाही. काही राज्यात या चित्रपटावर बंदी आणि काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री होतो, म्हणजे राजकीय फायदा तोटाही यात दडला आहे. चित्रपट निर्मितीच्यावेळी हा विषय डोळयासमोर ठेवूनही नियोजन झाल्याचे नाकारता येत नाही. यापूर्वीचा इतिहास बघता भारतात काही विषय घेवून प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा टायमिंगही महत्वाचा ठरतो. या चित्रपटानेही हा टायमिंग तर नाहीना साधला ही शंकाही पुढे येते. 

सरतेशेवटी या चित्रपटाने भारतीय समाजातील बदलत्या काळानुसार समोर येत असलेली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पण, मनोरंजन आणि शिक्षण हाच या चित्रपटाचा उद्देश समजून धर्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजीच प्रेक्षकांनी मोठया मनाने घेण्याची गरज असल्याचेही हा चित्रपट अधोरेखित करतो. 

                                          000000

 

 

 


 

Thursday, March 30, 2023

टाकरखेडा-संभू येथील राम नवमी उत्सव सुंदर आठवण





ज-काल आपल्या अवतीभवती लिहावं असं खूप आहे. मात्र, ते लिहिण्यासाठी आतून प्रेरित व्हावं असं फार कमी घडतं. ही बाब अधिक स्पष्ट करण्यासाठी रामनवमी निमित्त टाकरखेडा-संभू येथील राम मंदिराला दिलेली भेट हे ठसठशीत उदाहरणच ठरेल. अमरावती शहरापासून परतवाडा रस्त्यावर आष्टी फाट्याहून थोड पुढे ( आत जवळपास ४ कि.मी. अंतरावर) हे गाव आहे (अमरावती पासून २२ कि.मी. अंतर).आमचे सन्मित्र श्री. दिनेश बकाले यांच्यामुळे या मंदिराला भेट देण्याचा व दर्शनाचा योग आला. मंदिरात प्रवेश करताच येथील राम, लक्ष्मण आणि जानकी अर्थात सीता यांच्या  संगमरवरी दगडातील लोभस व सुंदर आखीव व रेखीव मुर्त्या बघून प्रथमतः चित्त प्रसन्न होत. मंदिराचा गाभारा सागवान लाकडाचा. अगदी सुंदर नक्षीकाम केलेला. त्यावर एक गच्चीसदृश्य माळा. हे सर्व बघून आमच्या अचलपूर शहरातील सुलतानपुरा येथील दत्त मंदिराची अर्थात चखाभूलीच्या मंदिराचीच आठवण झाली. चखाभुली मंदिराची डिट्टो कॉपी ठराव एवढं हे मंदिर सेम टू सेम. बरं, टाकरखेडा-संभू हे गाव म्हणजे आमचे प्रिय दादा श्री. संदीप गणगणे, श्री. सचिन गणगणे आणि सौ.वर्षाताई गणगणे-दहीकर यांचं आजोळ. याचंही लगेच स्मरण झालं. एकदम मनात विचार आला या भावंडही या मंदिरात आपल्या बालपणीचे सुंदर क्षण जगले असतील. म्हणून लगेच फोटो काढून ते आमच्या  ‘नातेसंबंध’ या व्हाट्सअप ग्रुप वरही शेअर केले. आणि यात तिघाही भावंडांना फोटोतील हे मंदिर ओळखण्याची विनंती केली. त्यांनीही तितक्याच  तत्परतेने सकारात्मक उत्तर दिले. तेव्हा या गोष्टीवरील विश्वास अधिक घट्ट झाला की, आपण ज्या वास्तू, शहर व गावात काही अनमोल क्षण घालवलेले असतात ते आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आठवणीच्या कुप्पीत जपून ठेवलेले असतात.

  गावातील तरुणांच ‘राममंदिर’ व ‘रामनवमीउत्सवाचं’ प्रेम

             मंदिरात निवांत बसलो असता चार तरुण मुलं तिथे आले. त्यांचा संवाद आपसूक कानावर पडत होता. त्यांनी या उत्सवासाठी नागपूर, पुणे, मुंबईतील शिक्षण व नौकरी निमित्ताने हलवलेला तळ आता टाकरखेडा-संभू या आपल्या गावी ठोकला होता. या मुला- मुलींनीनी मंदिरावरील रात्रीची विद्युत रोषणाई आणि उत्तम- उत्तम फोटो आणि व्हिडिओ यांची सोशल मीडियावर रील, स्टेटस व अन्य माध्यमातून केलेली प्रसिद्धी ते आपसात शेअर करत होते. आधुनिक काळातही तरुणांना आपलं गाव, आपले उत्सव, सण याविषयी असणारा जिव्हाळा पाहून एक सकारात्मक विश्वास दुणावला.


दानपेटी मुक्त आणि वाचनालय युक्त मंदिर

मंदिर परिसरातच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचनालय आहे. वाचनालयाचा फलक बघून खरोखर मंदिरातून अशी वाचनालये निर्माण होत राहिल्यास या वास्तुंचा खरा सदुपयोग होईल हा कित्येक  वर्षांपासूनचा माझ्या मनातला विचार प्रत्यक्ष मूर्त स्वरूप घेतानाचं चित्र मनाला खूपच भावलं. इथेच दुसरं फलक होता 'मंदिरात दानपेटी नाही आणि ( between the line- कोणाला दान देण्याची बळजबरीही नाही) दान द्यावयाचे असल्यास स्वखुशीने पावती फाडावी' .मंदिरातील दानपेटी हा विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनातून जनतेच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला 'मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे....' या प्रसिद्ध भजनातच काय तो सार आपणा सर्वांना कळेल.  'देवाला पैसे दान करून, सोनं वाहून आपण मोठे होतो की देव!' हे एक मला नेहमीच पडलेल कोडं सुटायच्यादिशेने दानपेटी विरहित मंदिर हे एक आश्वासक पाऊल ठरेल.

सप्ताहानिमित्ताने स्तुत्य उपक्रमांचे आयोजन

 

गावोगावी हरिनामसप्ताह होतात. पण टाकरखेडा संभूचा रामनवमी सप्ताह काही औरच भासला. कार्यक्रम पत्रिकेत विषय होते 'शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आदर्श गावच्या सरपंचाचे (जिल्हा संभाजीनगर ( जुने औरंगाबाद)) मार्गदर्शन, नेत्र तपासणी शिबिर. आणि या सप्ताहाचे काल्याचे किर्तन माझे सन्मित्र आणि एका शिबिरात आम्ही शिकलेले विद्यार्थी दर्यापूर येथील ह.भ.प. सागर महाराज परिहार यांचं नाव वाचून तर या सर्व सकारात्मक ऊर्जेचा कळसच गाठल्याचा सुखद अनुभव शिदोरी रुपात घेवून आम्ही या गावाचा निरोप घेला.

 

                                                                          ००००००




Friday, February 24, 2023

नागपुरी बोलीचा प्रत्यक्ष परिचय होताना


 

शनिवारी सकाळी माझी ऑफिसकडे जायची वेळ. रस्त्याने दोन कामकरी महिलांचा संवाद कानावर पडला. ‘लय बुव्हारा हा बई शनिवार,सामोरच्या आफिसात एक माणूस भी नाई रात ना जी’. पुढे सिटीबस मधील प्रवासात महिला कंटक्टरचा एका मुलीवर शब्दप्रहार ‘भयताळवाणाची पोट्टी, जराय नय समजत इले’. ऑटोने प्रवास करताना एका  महिलेचा मोबाईलवर  सुरू असलेला संवाद व त्यातील कानावर पडलेले काही अनकट शब्द असे, "लता मंगेशकरात  गेलतो(बर्डी येथे स्थित लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्टचे इस्पीतळ)(पुरुष वाचक संबोधन, गेलतो)).....कास्ट काढाची हाय (कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे).... २ हजार रूपये पाटविन (पाठविन एवजी)...फोन काटून लाव.... सुंतीचा हात कसा हाय , आता?... टाके तोडलेन का ?.... माई पोट्टी बडी हुशार हाय .... सोड मनल १७ काम अन चल मनल त्याले" ही तीन केवळ प्रातिनिधीक उदाहरण दिली. या शहरातील वास्तव्यात दररोज कानावर पडणाऱ्या शब्दांमध्ये च्यलनबे,च्यालाका,होना जी,सामोर, म्हणल व्हत ना ...... हे शब्द थोडयाफार फरकाने नित्याचेच.

 

     हे सर्व शब्‍द म्हणजे येथील नागपुरी बोलीचा ठेवा म्हणता येईल. या निमित्ताने नुकतेच वर्धा येथे पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘विदर्भातील बोली भाषा’ विषयावरील परिसंवादातील तज्ज्ञांनी मांडेल्या विचारांचा झिस्ट देणारी माझी बातमी शेअर करीत आहे. या परिसंवादात प्रकाश एदलाबादकर यांनी बोली हीच भाषेची आई असल्याचे निरीक्षण मांडले.त्यांनी नागपुरी बोलीचे विविधांगी रूप उलगडून सांगितले. नागपूरमध्ये बोलली जाणारी ही भाषा समाजातील उच्च ते निम्न अशा सर्वच वर्गात बोलली जाते. ग. त्र्य. माडखोलकर, दोडके यांनी नागपुरी भाषेत केलेल्या संशोधन कार्याचाही त्यांनी आढावा घेतला.

 वऱ्हाडी , झाडी व नागपुरी आदि विदर्भातील बोलींनी मराठी भाषेच्या सौदर्यांत भर घातली व भाषा विज्ञानात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, न्यूनगंडापोटी  या  बोलींचा वापर कमी झाला आहे. विदर्भातील कोरकू बोली तर विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे निरिक्षण ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साहित्य संमेलनात साहित्यिकांनी मांडले. तर प्रमाण भाषेचा आग्रह सोडून स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता प्रभावी वापर व्हावा. 'बोली अकादमी' स्थापन व्हावी ,'आदिवासी बोलींचे कोश' निर्माण  व्हावे, असा आश्वासक सूर ‘विदर्भातील बोली-भाषा विषयावरिल परिसंवादात निघाला.

 

                 ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याचं दिवशी आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सतीश तराळ यांनी भूषविले. डॉ. मनोहर नरांजे, डॉ.श्याम मोहकर,डॉ. पुरुषोत्तम माळोदे आणि प्रकाश एदलाबादकर या भाषा अभ्यासकांनी परिसंवादात सहभाग घेतला.

 

          डॉ. तराळ यांनी  परिसंवादातील सहभागी वक्त्यांच्या विचारांचा सार काढून विचार मांडले. विदर्भातील वऱ्हाडी ,झाडी या प्रमुख बोली असून नागपुरी,गोंडी,कोरकु,माडिया आदि बोलीही या भागात बोलल्या जातात. प्रमाण भाषेच्या अवाजवी आग्रहामुळे आणि न्यूनगंडामुळे या बोलींसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.विदर्भातील कोरकू बोली सद्या विलुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. स्वत:च्या बोलीचा न्यूनगंड न बाळगता या बोलींचा प्रभावी वापर व्हावा.तसेच, बोलींच्या विकासासाठी व त्यांच्या साहित्यिक समृद्धतेसाठी  बोली अकादमी स्थापन व्हावी  आणि आदिवासी बोलींचे कोश निर्माण व्हावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

 

      डॉ.तराळ म्हणाले, जॉर्ज गियर्सन यांच्या ‘लिंग्वेस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ या ग्रंथात भारतात १७९ भाषा आणि ५४४ बोली आहेत असे म्हटले होते. पण, २००१ मध्ये झालेल्या भाषिक पाहणीत २२२ भाषा आणि २३४ बोली आहेत असे म्हटले होते.म्हणजे दरम्यानच्या काळात ५७ भाषा आणि ३१० बोली लुप्त झाल्या.संपूर्ण जगातच भाषा लुप्त होत आहेत मात्र, भाषा लुप्त होण्याचा वेग भारतात जास्त आहे. जागतिकीकरणाचा भाषेवर खूप जास्त परिणाम होत असतो.जागतिकीकरणाची भाषा हीच जगाची भाषा होते सद्या इंग्रजी ही जागतिकीकरणाची भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात मराठीला २३०० वर्षाचा जुना इतिहास असल्याचे आणि या भाषेत ५२ बोली असल्याचे नमूद केले आहे.प्रत्यक्षात भाषा अभ्यासक मराठीच्या १५० बोली असल्याचे मानतात याचाच अर्थ मराठीतील १०० बोली लुप्त झाल्याचेही डॉ.तराळ यांनी सांगितले.

    

     डॉ. मनोहर नरांजे यांनी आपल्या संबोधनात वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांनी व्यापलेला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील भूभाग आणि येथील मानव समुहांनी समृद्ध केलेल्या बोलीभाषांच्या भाषिक व्यवहारावर प्रकाश टाकला. विदर्भातील बोली या मराठी भाषेचा निर्झर झरा आहेत. वऱ्हाडी आणि झाडी बोलींनी विदर्भातील भाषिक व्यवहरात दिलेले योगदान महत्वाचे आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ 'लीळाचरित्र' आणि मराठीतील आद्य काव्यसंग्रह 'विवेक सिंधू' मध्ये वऱ्हाडी आणि झाडी बोली दिसून येतात असे निरीक्षण त्यांनी मांडले. चंद्रपूरचा राजा रामसिंह याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

 

   डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भातील बोरी, नागपुरी या बोलीभाषेतील स्वनिम, रुपिम या तांत्रिक भाषा परिमानांचा अन्य भाषांशी तुलनात्मक संबंध उलगडून दाखवला. या बोलिंमध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेतील वर्णांच्या उच्चाराशी आढळणारी भिन्नता त्यांनी 'च', 'ज' आणि 'झ' या वर्णांची उदाहरणे देवून पटवून दिली.

 

    डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी विदर्भातील बोली भाषांनी या भागाला सांस्कृतिक पुढारलेपण मिळवून दिल्याचे सांगितले. डॉ. ना. गो. कालेलकर लिखित 'बोली आणि भाषा' या ग्रंथातील दाखले देत त्यांनी बोली विषयीचे गैर समज आणि वास्तव याबाबत भाष्य केले. भूप्रदेश व जाती नुसार विदर्भात बोलिंची निर्मिती झाल्याचे सांगत त्यांनी कोष्टी,हळबी, गोंडी, माडिया या बोलिंवर प्रकाश टाकला.

    

                                ०००००

नागपुराच्या वैभवातील कोंदण ‘जीपीओ’



 

नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स परिसरात डौलान उभी असलेली ही मुख्य टपाल कार्यालयाची अर्थात जीपिओची ऐतिहासिक इमारत.१९२१ मध्ये बांधून पूर्ण झालेली ही इमारत आज त्याच दिमाखात उभी आहे.वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीमुळ या इमारतीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

 

नागपूर शहरातील ४० टपाल कार्यालयांच नियंत्रण या ठिकाणाहून होतं.

 

या इमारतीवरील घड्याळ हे इथल वैशिष्ट्य.तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल गेल्या १०२  वर्षांपासून हे घड्याळ सुरूय.दर दोन वर्षातून एकदा घड्याळाला चावी भरली जाते. आणि चावी भरणारा माणूसही नागपुरात एकमेव.

 

येथील फीलाटली विभागात विशिष्ट प्रकारचं कार्य चालत.इथ नियमित आणि कोमोमॉरेटिव्ह अशी दोन टपाल तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एवढंच काय तर सर्वसामान्य माणसाला आपलं टपाल तिकीट काढण्याची सोयही या विभागान करून दिलीय.

 

जुन्याकाळी टपाल सेवा देताना पोस्टमनच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारी शस्त्रही इथ बघायला मिळतात.

 

टपालसेवे व्यतिरिक्त या कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या विविध बचत योजनाही चालविल्या जातात.  ऑनलाइन बँकिंग तसेच एटीएम ची सुविधाही इथ उपलब्ध आहे.

 

सकाळी १० वाजता कामाला सुरूवात होण्याआधी सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची प्रथाही इथल वैशिष्ट्य.

 

नऊ एकर परिसरात डौलान उभी असलेली ही इमारत आजही सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहे आणि नागपूरच भूषण वाढवीत आहे .

                                                0000


 

मौल्यवान ठेवा जपणारे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय



 

                              

 

नागपूरच्या वैभवात भर टाकणारी महत्त्वाची वास्तू म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय.ब्रिटिश काळात मध्यभारतात निर्माण झालेल्या संग्रहालयापैकी सर्वात जुन व अग्रणी संग्रहालय म्हणून याचा लौकिक आहे.

 

नागपूरचे ब्रिटिशकालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल आणि शिक्षणतज्ज्ञ फादर रेव्हरंड हिस्लॉफ यांच्या पुढाकारान १८६३मध्ये हे संग्रहालय स्थापन झालं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासनाच्या विविध विभागांतर्गत हे संग्रहालय नियंत्रित होत असे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मध्यप्रांत शासनाच्या शिक्षण विभागाकड हे नियंत्रण गेलं.तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या पुरातत्व विभागाकड ही जबाबदारी आली.

 

   या संग्रहालयात एकूण १० दालनांमध्ये दुर्मिळ ठेवा प्रदर्शित व संरक्षित करण्यात आला आहे. ब्रिटिश काळातच या संग्रहालयात  वस्तू संकलित करण्यात आल्या. ब्रिटिश अधिकारी,स्थानिक व्यक्ती आणि जमीनदार यांच्याकडून या वस्तू संग्रहालयास प्राप्त झाल्या.

 

    संग्रहालयात प्रवेश करताच निसर्ग इतिहास दालन इथ येणाऱ्यांचं डोलान स्वागत करत. इथ दुर्मिळ डायनासोरची हाड, भूगर्भीय प्रारुपातील खनिज, जीवाश्म प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

प्राणी,पक्षी व सरीसृप दालन या संग्रहालयाच खास आकर्षण आहे. इथ जलजिवही प्रदर्शित करण्यात आली आहेत.

 

चित्रकला दालनात व्यक्तिचित्र,रचनाचित्र,अमूर्तचित्र, निसर्गचित्र बघायला मिळतात. पुरातत्वदालनात विदर्भातील निवडक पुरातत्वीय उत्खननात प्राप्त वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. शस्त्र दालनात शस्त्रांचे विविध प्रकार बघायला  मिळतात. शिलालेख दालनात मौर्य ते मराठा कालखंडातील शिलालेख प्रदर्शित करण्यात आले आहेत. हस्तशिल्प दालनात भारताच्या वेगवेगळ्या भागातील हस्तशिल्प दिसून येते. सर्वार्थान सर्वांग सुंदर अस आदिवासी कला व संस्कृती दालना इथ भेट देणाऱ्यास आदिवासिंच्या समृद्धतेची ग्वाही पटवून देत. या संग्रहालयाला २०१३मध्ये दीडशे वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने उभारण्यात आलेल नागपूर वारसा दालन हे या संग्रहालयातील खास कोंदणच ठरलय.

 

 

                                                 0000

Wednesday, February 8, 2023

सर्वसामान्यांचा लाडका ‘मुगल गार्डन’ ते ‘अमृत उद्यान’

            ‘नावात काय ठेवले आहे!’, ‘नामही काफी है !’ या उक्तींमध्ये ‘नावातच सर्वकाही’ हे ॲडीशन करण्याचा मोह काही आवरला नाही. गेल्या काही वर्षात देशाची राजधानी दिल्लीत महत्वाच्या वास्तू व संस्थांच्या नावात झालेल्या बदलांचा मी साक्षीदार आहे. या बदलांमध्ये प्रातिनिधीकपणे सांगायचे तर प्रधानमंत्री महोदयांचे निवासस्थान ‘७, रेस कोर्स’चे नाव झाले ‘लोककल्याण मार्ग’,‘योजना आयोगा’चे ‘निती आयोग’, संसदेची नवी इमारत झाली ‘सेंटर व्हिस्टा’, राष्ट्रपती भवनासमोरील विजयचौक ते इंडियागेट हा जवळपास ३ कि.मी.चा मार्ग ‘राजपथ’हून ‘कर्तव्यपथ’ झाला. याच ओळीत आता राष्ट्रपती भवनाचे ‘मुगल गार्डन’ हे ‘अमृत उद्यान’ झाले. पूर्वाश्रमीच्या मुगल गार्डनला सहपरिवार, मित्र, विभागाचे अधिकारी आणि आप्तेष्टांसह भेट देण्याचा व तिथली भव्यता,सौंदर्य डोळयात साठवण्याचा अनुभव आला. म्हणूनच या उद्यानाविषयी लिहावं असं मनापासून वाटलं, तोच हा लिखानाचा घाटही घातला. 

                        दिल्लीतील वास्तव्यात फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच दोन महत्वाचे आयोजन डोळयासमोर येत असतं. हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात आयोजित होणारा ‘सुरजकुंड इंटरनॅशनल क्राफ्ट मेला’ आणि सर्वसामान्यांसाठी जवळपास महिना-दीड महिना खुला राहणारा राष्ट्रपती भवनाच्या १५ एकर परिसरातील मुगल गार्डनचा ‘उद्यानउत्सव’.भारतदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत २८ जानेवारी २०२३ रोजी मुगल गार्डनचे नाव बदलून ‘अमृत उद्यान’ करण्यात आले. आणि नाव बदलानंतर आपल्या कार्यकाळातील पहिल्या-वहिल्या उद्यानउत्सवाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना मिळाला हेही खास आहे. राष्ट्रपती भवन एस्टेट हे ३३० एकरावर वसलेले एक छोटेगावचं असून येथे ५ एकरावर राष्ट्रपती भवनाची इमारत तर याच इमारतीच्या मागच्या भागात १५ एकर विस्तीर्ण परिसरात उद्यान आहे. 

                 राष्ट्रपती भवन बांधणारे वास्तुविशारद ‘सर एडविन लुटियन्स’ यांनी १९१७ मध्ये या उद्यानाचा आराखडा तयार केला. जम्मू आणि काश्मीरमधील मुगल उद्यान,आग्र्याच्या ताजमहाल परिसरातील उद्यान आणि भारत आणि फारशीमधील लघू चित्रांपासून प्रेरीत होवून उद्यान तयार करण्यात आले आहे. उद्यानातील वास्तु उभारणीसाठी भारतीय आणि पाश्चिमात्य वास्तुशैलीचा तर बागकामासाठी मोगल शैली आणि ब्रिटिश पुष्पउद्यान शैलीचा वापर करण्यात आला आहे. बागकाम विभागाचे संचालक विल्यम मस्टो यांच्या मार्गदर्शनात १९२८-२९ दरम्यान या उद्यानात प्रत्यक्षपणे वृक्षारोपण करण्यात आले. आयाताकार, लंबाकृती आणि वृत्ताकार अशा एकूण तीन आकारात हे उद्यान विभागले आहे.या उद्यानात ठिक-ठिकाणी वास्तु शिल्पाचे उत्तम नमुने आढळतात. विशेषत: मोगलकालीन नाल्या, छोटे-छोटे ओटे, पुष्पाकृती झाड, युरोपियन क्यारियो,लॉन यांचे प्रतिबिंब दिसून येते.

 ‘गुलाब पुष्प’ ; उद्यानाचे खास आकर्षण 

                     या उद्यानात १५९ प्रजातींचे गुलाब पुष्प बघायला मिळतात. हे गुलाब मुख्यत्वे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उमलतात. या गुलाबांमध्ये अडोरा,मृणालीनी,ताजमहल,आयफेल टॉवर, मॉर्डन आर्ट, सेंटीमेंटल, ओक्लाहोमा(काळा गुलाब),बेलामी, ब्लॅक लेडी, पॅराडाइज,ब्लुमून, लेडी एक्स या प्रजातींचा समावेश होतो. उद्यानातील गुलाबांना प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींचे नाव देण्यात आले आहेत.मदर टेरेसा, राजा राम मोहन रॉय, मि.लिंकन, जॉन एफ केनडी,जवाहर,क्वीन एलिजाबेथ,क्रिश्चियन डियोर या नावांचे गुलाब पुष्प या ठिकाणी बघायला मिळतात. महाभारतातील अर्जुन आणि भिम या पात्रांचीही नावे गुलाबांना देण्यात आली आहेत.

 अशी आहे अन्य पुष्प संपत्ती 

             यासोबतच टयूलिप्स, एशियाटिक लिली, डेफोडिल,ह्यासिंथ आणि इतर ऋतुमानानुसार पुष्प या उद्यानाचे सौंदर्य आणि वैभव वाढवत आहेत.आकर्षक कंदीय पुष्पझाडे आणि शीत ऋतुमध्ये उमलणाऱ्या पुष्पांच्या ७० पेक्षा अधिक प्रजाती या उद्यानात आहेत. कागते (बोगेनविला) पुष्पांच्या १०१ जाती पैकी ६० जाती येथे दिसून येतात. एलिसम,डेजी आणि फँसी आदी पुष्पलताही येथे दिसून येतात. या उद्यानाच्या निर्मितीवेळी कोलकत्ता येथून दूब गवत आणून लावण्यात आले. मोलश्री,गोल्डन रेन, टॉर्च या पुष्प वृक्षांसह पुष्प लतांच्या ५० प्रजाती आहेत. 

राष्ट्रपती महोदयांच्या सूचनांनी उद्यानाच्या सौदर्यांत भर  

                स्वतंत्रभारताचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी हे राष्ट्रपतीभवनात वास्तव्य करणारे पहिले भारतीय होते. भारतदेश अन्नधान्यानात स्वयंपूर्ण नसल्याचे पाहून या समस्येतून मुक्ती मिळविण्याची सांकेतिक बाब म्हणून उद्यानात सी. राजगोपालाचारी यांच्या सूचनेनुसार गव्हाची शेती होत असे. राष्ट्रपती के.आर.नारायण यांच्या सूचनेद्वारे भूजल आणि वर्षा जलसंचयाचे कार्य या उद्यानात करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या उद्यानात औषधी उद्यान,दृष्टीबाधितांसाठी स्पर्श आणि सुंगधीय उद्यान, संगीतमय उद्यान,जैव उर्जा उद्यान, आध्यात्मिक तथा पोषण उद्यानांचा समावेश करण्यात आला.नवीकरणीय उर्जेच्या माध्यमातून उद्यानात वीजेची उपलब्धता ,बोन्साय उद्यान हे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार सुरु झाले. राष्ट्रपती भवानाचे हे सुंदर व भव्य उद्यान सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राष्ट्रपतीभवनाचा उद्यानउत्सव सर्व सामान्यांसाठी खुला करून देण्यात येत असे. तसेच, राष्ट्रपती भवनाला भेट देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एकूण तीन सर्कीटमध्ये तिसरे सर्कीट हे पूर्वाश्रमीच्या मुगल व आताच्या अमृतउद्यानाचे आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पुढील सहा महिन्यांपर्यंत हे सर्कीट जनतेसाठी खुले असते. यावर्षी ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश व अन्य न्यायाधिशांच्या उपस्थितीत या उद्यानउत्सवाचे उद्घाटन झाले. २६ मार्च २०२३ पर्यंत देशभरातील सर्वसामान्य जनतेस या उद्यानाला भेट देता येणार आहे. 
                                                                  ००००