Friday, July 29, 2022

प्रसाद लेलो भैय्या

ऑफिसच्या जवळ रस्ता ओलांडून अगदी पोहचणारच होतो तर या रस्त्यावरच कानावर आवाज पडला ‘प्रसाद लेलो भैय्या’. रस्त्याच्याकडेला एक कार उभी होती आणि या कारमधील एक सद्गृहस्थ हातात छोटा वेलपॅक्ड पेपर डबा हातात घेवून रस्ताहून ये जा करणाऱ्या माणसांना प्रसादाचा हा डबा देत होते. तर या कारच्या पहिल्या सिटवर बसलेली महिला आपल्याकडे असलेल्या भल्यामोठया पृष्ठाच्या डब्यातून असे छोटे डबे काढून देत होती. म्हणता म्हणता कार शेजारी माणसांचे मोहोड निर्माण झाले व केवळ पाच मिनिटात प्रसाद वाटप संपले. हा सर्व प्रकार मी डोळयात टिपत होतो , म्हटल यावर काही लिहाव यासाठीच मोबाईल कॅमेरामध्ये फोटोही टिपत होतो. हे स्थळ सोडून ऑफिसकडे जाण्यासाठी थोडा पुढे आल्यावर या डब्यातून बुंदीचे लाडू खानारी मंडळी दिसली विषय इथेच संपला. दिल्ली आणि प्रसाद लंगर आदिंचे समीकरण. दिल्लीच्या विविध गुण वैशिष्टयांपैकी एक म्हणावा असा लंगर किंवा प्रसाद वाटपाचा उपक्रम. उदाहरणादाखल एखाद्या मार्केटमध्ये व्यापारी पैसे गोळा करून लंगर लावतात. आता लंगर म्हणजे काय? हा विषय विषद करतो. लंगर म्हणजे अन्नदान. लंगरचा मेन्यू जवळपास फिक्स असतो ‘आलू सब्जी ओर पुरी’ तसेच ‘सब्जी कचोडी’, शिरा आणि सोबतीला असे पॅकींगवाले लड्डूही. काही मंदिराच्या परिसरात पाण्याच्या बाटल्या वाटण्याचा लंगरही निदर्शनास येतो. लंगर कोण लावतो व लंगर कोण खातो ? देवाला नवस केलेले मंडळी ,देवाच्या नावाने दान करावे म्हणून पुढाकार घेणारी मंडळी आणि गोरगरिबांना दान करावे म्हणून काही मंडळी तर आपल्याकडून अनवधानाने झालेल्या पापाचे क्षालन होण्यासाठी असे लंगर लावतात. मात्र, ज्यांना गरज नाही अर्थात सुस्थितीतील मंडळीच या लंगरचा जास्त आस्वाद घेताना दिसतात. मुद्दा अजून स्पष्ट करतो, म्हणजे अशा अन्नदानाचा लाभ हा ज्यांना अन्न मिळत नाही,उपाशी आहेत अशा मंडळींना हा लाभ मिळावा मात्र, पोट भरलेली मंडळीच या लंगरचे लाभार्थी असल्याचे माझे निरिक्षण. अजनात्यापणी झालेली चूक व तिच्या भिती पोटी पापक्षालन म्हणून, देवभोळेपणातून आणि दानाच्याभावनेतून हे लंगर किंवा प्रसाद वाटपाचे दिल्लीतील गल्लो गल्ली चालनारे कार्यक्रम या शहराच्या स्वभाव वैशिष्टयाचा अविभाज्य भाग म्हटले तरी वावगे होणार नाही. ००००

डेथ बॉडीची तिकीट कन्फर्म नाही

आपण रेल्वे किंवा विमानाने कुठे जात असू तेव्हा तिकीट कन्फर्म न होण्याचे अनुभव आपण स्वत: घेतलेले असतात व बरेचदा अन्य लोकांकडूनही ऐकले असतात. पण, याही पुढे जावून डेथ बॉडीचीही तिकीट कन्फर्म नसल्याची माहिती पहिल्यांदा मी ऐकली व चाटच पडलो की. त्याच झाल असं की, देशाच्या टोकावरील राज्यातील एका धार्मिक स्थळावर ढगफुटी झाली व त्यात महाराष्ट्रातील भावीक असण्याची शक्यता असल्याने याबाबत अपडेट माहिती व वृत्त देण्याचे आमच्या मुख्यालयाकडून सांगण्यात आले व तसा संदेश कार्यालयाकडून मला प्राप्त झाला. मग महाराष्ट्र सदनाकडे याची विचारणा केली असता तेथून माहिती आली हो या दुर्घटनेत मृत झाालेल्या महाराष्ट्राच्या एका भाविकाची डेथ बॉडी दिल्ली विमानतळावर आली आहे. प्रशासनाकडून प्राप्त सूचनेनुसार ही बॉडी महाराष्ट्रातील इच्छित स्थळी पाठविण्यात येईल त्यासाठी आम्ही एका प्रायव्हेट विमानाचं तिकीटही बुक केल आहे मात्र, डेथ बॉडीची तिकीट अजून पर्यंत कन्फ्रम नाही. ‍ि माहिती अशी एखादी डेथबॉडी विमानाने न्यायची असेल तर विमानाद्वारे प्रवाशांचे सामान वाहून नेण्याच्या डिक्कीमधून ही डेथबॉडी वाहून नेली जाते. शवपेटीमध्ये ही व्यवस्थीत पॅक केली जाते व यासाठी तिकीट काढावी लागते. जी खूप जास्त असते. जसे दिल्लीहून पुणे येथे ही डेथबॉडी घेवून जाण्यासाठी ३० हजार रूपये खर्च आला. ०००००

‘जेव्हा पिलर पुजला जातो’

ऑफिस शेजारील पी.ब्लॉककडे जाणारा रस्ता ओलांडून ऑफिसला पोहचण्याच्या लगबगीत असतानाचं बघितलेलं चित्र काहीसं असं होत. एक गृहस्थ पी.ब्लॉकच्या अगदी टोकावरील भागात स्थित एसबीआय एटीएम समोरच्या पिलरला चहुबाजुंनी नमस्कार करीत होता. आश्चर्य वाटून माझे पाय तिथेच स्थिरावले. म्हटल आता पूर्ण चित्रपटच बघावा. या गृहस्थांनी नमस्कार आटोपल्यानंतर थेट हातात झाडू घेतला व त्या पिलर शेजारील छोटासा परिसर झाडूने स्वच्छ करण्यास सुरुवात केली. चित्रपट पूर्ण होण्याच्या आतच मला या चित्रपटाची सर्व स्टोरी क्लियर झाल्याने मी आता तिथून निघालो. या घटनेनं माझं विचारचक्र सुरु झाल आणि WORK IS WORSHIP या इंग्रजी म्हणीवर येवून थबकल.पिलरला चहुबाजूनी नमस्कार करणारा हा गृहस्थ म्हणजे एक प्रामाणिक फेरीवाला जो त्याचं पिलरच्या शेजारी आपलं दुकान थाटतो व यातूनच त्याचा उदनिर्वाह व कुटुंबही चालत असेल कदाचित. म्हणूनच विना भाडेखर्चाच व निसर्गाने भरभरून कुलींग व नॉनकुलींगची व्यवस्थेसह एसीने परिपूर्ण अस हे दुकान ज्या पिलरच्या छायेत उभ आहे नव्हे तर तो पिलरच त्याच्या दुकानाची निशाणी आहे. अशा पिलरला त्या फेरिवाल्याने नतमस्तक होण म्हणजे कामाला सुरुवात करण्‍याआधी आपल्या श्रध्दास्थानाला नमन करणेच असल्याचा बोध मला विचारचक्राअंती झाला. ही घटना आश्चर्यकारकही होती . ००००००

साक्षात्कारी कोवीड / कोविडचा साक्षात्कार

(तब्बल वर्षभराने ही पोस्ट अपलोड करतोय) गेल्या वर्षभरापासून जगाने ज्या महामारीला तिच्या दिव्यत्वाची प्रचिती आल्याने ढोपरापासून कोपरापर्यंत हात टेकले त्या कोवीडने अखेर २६ एप्रिल २०२१ रोजी मला साक्षात्कार दिला. प्राप्तस्थितीत आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या दोन जिवांसाठी ही लढाई लढायची हा एकच धागा धरून लढा सुरु झाला. दिल्लीतून डॉ. महेश वाघमारे आणि नागपुरातून डॉ. अभिजित खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धांगिनीने स्वत: कोविडग्रस्त असताना हा लढा जिकीरीने लढवला व मला आणि तिलाही मरणाच्या दाढेतून सहिसलामत बाहेर काढले अशा आधुनिक सावित्रीला सर्वप्रथम मानाचा मुजरा. दुपारपासूनच अंग-प्रत्यांग दुखायला लागले त्यात आमच्या कार्यालयाच्यावीतने आयोजित ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेतील ३७ वे पुष्प’. या कार्यक्रमाच्या live संबंधीत माहिती वॉटसपवर शेअर करणे आदी व त्यानंतर हे व्याख्यान माझ्याहाती रात्री ७.१५ ला आल्यानंतर ते पूर्णपण ऐकूण त्याची विस्तृत बातमी करण्याचा व ती मीडियाला मेलवर पाठविणे व सोशल मीडियावर अपलोड करणे हा सर्व क्रियाकलाप रात्री ११.३० पर्यंत पुरला. आता मात्र ,अंग दुखीसह ,डोकेदुखी,गळा दुखी आणि अल्प ताप प्रकर्षाने जाणवू लागला. यात आमचे छोटे सरकार (मुलगा) वाटचं बघत होते बाबा कधी ऑफिसच्याकामातून मोकळे होतात आणि आपल्याला जवळ घेतात. मग काय अशातच मोर्चा किचनकडे वळला व हाती आले ते हादळून झाले. तोवर आमचे सरकार(अर्धांगिनी) दिवसभराच्या घरातील कामाने दमछाक होवून बिछान्यावर आडवे झाले होते. मुलासोबत मस्ती-मस्करी आटोपून सरकारांच्या आदेशानुसार (व त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार काही -नाही, ‘तुम्हाला उन्हं लागलं म्हणून अंग दुखत असेल ! वैगेरे आडाखे सुरु झाले होते.) गरम पाण्याच्या गुळण्या केल्या, अर्धी क्रोसीन टॅबलेट गिळली व डोक्याला बाम चोळून गुमान डोळे मिटले वेळ रात्री १ वाजताची. अरे जन्म बंदीवास ; होम आयसोलेशनचा निर्णय २७ एप्रिलचा अख्खा दिवस हा , उन्हांचा त्रास असेल असा ठाम समज तयार होवून त्यानुंषगाने घरात मिळेल तो प्रयोग माझ्यावर सुरु होता. आता त्रास असह्य होत असतांना तीन प्रिय व्यक्तींशी याच रात्री मोबाईलहूनच झालेला संवाद हा कोविडमहाराजांच्या साक्षात्कारातून बाहेर पडण्याच्या दिशेने सुरु झालेला योग्य प्रवासही ठरला. (एव्हाना हा कोविड साक्षात्कार असावा हे मात्र चित्र स्पष्ट नव्हते). यातील एक प्रिय व्यक्ती होती माझे दिल्लीतील एकेकाळचे खास मार्गदर्शक व जे शासकीय नोकरतीतून सेवानिवृत्त झाल्यावरही तसुभरही प्रेम कमी न होवू देता सतत विविध विषयांवर मार्गदर्शन करीत असतात असे श्री पाठक साहेब. पाठकसाहेबांना मीच फोन केला व त्यांना घडलेला प्रकार सांगितला तोच त्यांची प्रतिक्रिया, रितेशबाबु इसे हलके मे मत लो ‘तू, लवर बायको मुलापासून लांब हो व स्वत:ला आयसोलेट कर.’. पाठक साहेबांच्या सांगण्यानुसार विषयाचे गांभिर्य लक्षात आले व आता मात्र मनाची तयारी झाली होती ‘मोर्चा, होम आयसोलेशन’. यात आमचे खूप स्नेही व आमचे दिल्लीतील सेंकड होम असणारे आदरणीय विकास झाडे व भारती झाडे मॅडम यांचेही प्रेमळ आदेश झाले, ‘ लवकर स्वत:ला होम कॉरंटाईन कर व तुला औषधांची यादी पाठवतो कोविड प्रोटोकॉलचे पालन करा काटेकोरपणे !,’ आम्ही तुमच्या सोबत आहोत. कधीही फोन करा. आता मात्र आमच्या जिवात-जीव आला होता. यात आणखी भर पडली ती म्हणजे डॉ. महेश वाघमारे या सज्जन गृहस्थाच्या मोलाच्या डॉक्टरी सल्ल्याची. त्यांनी काल पासूनची माझी लक्षणे काय होती याची माहिती घेतली व माझं म्हणनं शांतपणे ऐकूण घेत तेवढयाच मृदूपणे त्यांनी सांगितले तुम्हाला वॉटस्अपवर औषध पाठवले आहे तेवढे घेवून या सोबतीला मिळाले तर ऑक्सीमिटर, नेबुलायजर, बुडोसोनाईड इन्हेलरही घेवून ठेवा. मग काय रात्री औषध विकत घ्यायला वनवन सुरु झाली तीन मेडिकल शोधले पण औषध मिळेणा रात्री ९.३० वाजता एका मेडिकल समोर दोन भल्या मोठया रांगा त्यात औषध खरेदी केल. घरी आलो व औषधी घेतल्या व होम आयसोलेशनची पहिली रात्र संपली. आरटीपीसीआर व ब्लड टेस्ट २८ एप्रिलला आणखी एका प्रेमळ व्यक्तीचा फोन, त्या अर्थातच अनुताई. त्यांचा जिवनाचा अनुभव व आपल्या माणसांप्रती असलेला ममत्वभाव याची आम्हाला सारखी प्रचिती येत असते पण यावेळी त्यांनीही ९०० कि.मी.हून खूप महत्वाची भूमिका निभवली. त्या म्हणाल्या , मी तुम्हाला डॉ अभिजित खेरडे यांचा मोबाईल नंबर पाठवला आहे त्यांच्यासोबत बोलून घ्या. डॉ खेरडे हे सध्या आपल्या जबाबदारीसह नात्यातील कोविडग्रस्तांनाही या आजारातून सुरक्षितरित्या बाहेर काढत आहेत एवढी पुसटशी कल्पना अनुताईंनी दिली. मग डॉ. खेरडेंना फोन केला, हा माणूस म्हणजे डॉक्टरातील देवपणाची अनुभूती देणाऱ्या डॉ वाघमारेंनंतर प्रथमच मला आपलासा वाटलेला पण शिस्तप्रिय व आपल्या प्रोफेशनशी प्रामाणिक असलेला देवमाणूस. डॉ खेरडे थेट विषयावर आले म्हटले काय लक्षण आहेत ? कधी पासून आलेत लक्षण असे म्हणून त्यांनी सूचना केली आरटीपीसीआर आणि ब्लड टेस्ट (5 प्रकारच्या) तेवढया करून घ्या तोवर सध्या काय औषध घेता ते ऐकूण घेत त्यांनी डॉ.वाघमारेंच्या औषधाला ग्रीन सिग्नल दिला व फोन कट केला. मिशन टेस्ट/व्यवसाय आणि संसर्गाची भिती भल्या दुपारी बॅटरी रिक्षा धरला. दिल्लीत लॉकडाऊन असल्याने रिक्षा चालकानेही मुख्य रस्ते बंद असल्याने दिल्लीकी गल्लीयोंका दर्शन घडवत पॅथलॉजी सेंटर समोर आणून सोडलं. इथे मात्र तोबा गर्दी चक्क लॅब सेंटरच्या अमोरा समोरील बिल्डींग समोर पेंडॉल उभारले होते. एवढयात स्थितीचा कानोसा घेत आरटीपीसीआर टेस्ट कुठे होते ते बघितले तिथे कळले केवळ १० मिनीटे राहिली आहेत तसाच फॉर्म भरून रांगेत लागलो. एम्बुलंसमध्ये पीपीईकीट परिधान केलेल्या दोन नर्स सँपल घेता होत्या मी ही नाक व तोडांतील स्वॅब दिला व या आधी केलेल्या दोन टेस्ट प्रमाणे आताचीही आरटीपीसीआर नेगेटीव्ह येईल या विश्वासाने उर्वरीत ब्लड टेस्ट करायला लॅबच्या दुसऱ्या बिल्डींगकडे वळलो. तिथेही भला मोठा पेंडॉल. खुर्च्यांमध्ये बसलेले व चेहऱ्यावर संताप व टेंशनचे सर्व भाव टिपत मी लॅबमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो तोच पुकारा झाला आप कोवीड पेशंट हो क्या मी नाही म्हटल तोच त्याने मला आत प्रवेश दिला. आत लॅबमध्ये आलो तर वेटींग लिस्ट व इथेही गर्दी. कोणी कुणालाही खेटून पुढे काय जातो, लोक काऊंटरवरला खेटून उभे काय राहतात ,यातच ब्लड टेस्टमध्ये कंशेशन मिळावे म्हणून रिशेप्शनवरील अंटेंडनला फोन देत इतरांना तात्कळत ठेवणारे बाप्पेही होतेच. तर दुसऱ्या बाजुला कोविड काळात आपल्या आईच्या गर्भातूनच हा सर्व गोंधळ अनुभवनारे निरागस गर्भ व त्यांच्या आयाही अल्ट्रासाऊंडसाठी रांगेत उभ्या होत्या. तर व्हीलचेअरवर डोळे घट्टमिटून व तोंडाला ऑक्सीजन लावलेली ५० -५५ वर्षांची आंटी तिच्या मागे काळजी करत केवीलवाना चेहरा घेवून उभा असलेला मुलगा व सून. अशात मी ही ब्लड टेस्ट आटोपली. घरी आलो आंघोळ केली (तीच होम आयसोलेशनमधली पहिलीच व पुढील १५ दिवसांपर्यंत एकमेव आंघोळ) आज आयसोलेशनचा दुसरा दिवस व रात्र संपली. ..आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह ; अखेर साक्षात्कार घडला २९ एप्रिल रोजी सकाळी ७.४५ वाजता मेसेज आला व त्याला जोडून असलेली लिंक ओपन केली तो आरटीपीसीआर रिपोर्ट होता . लगबगीने रिपोर्ट रिझल्टवर नजर टाकली ती नजर काही हटता हटे ना ! एकदा नाही दोन दा नाही किती तरी वेळा तो शब्द नीट वाचला पण शब्द तोच होता covid positive. आता दोन मिनिट शांत झालो. स्वत:ला सावरलं या स्थितीत आपल्यावर अवलंबून असलेल्या दोन जिवांसाठी आपल्याला जगलं पाहिजे हाच एक विचार डोळयासमोर आला व मनोमन तस ठरवलं. अर्धांगिनीला रिपोर्ट बद्दल सांगितलं. अगं माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. दोघेही एकमेकांकडे बघत शांत झालो. हा रिपोर्ट लगेच दोन्ही डॉक्टरांना पाठवला, त्यांच्याशी बोलन झाल. डॉ वाघमारे म्हणाले काही नाही माईल्ड आहे व्हाल तुम्ही नीट. तर डॉ. खेरडे म्हणाले, ‘रिपोर्ट मधील काऊंटला काही अर्थ नाही तुम्ही कोवीड पॉझिटिव्ह आहात हे रिपोर्टमध्ये सरळ दिसते आहे. तुमच्या ब्लड रिपोर्टची वाट आहे ते आले की आपण पुढची दिशा ठरवू. तोवर तुमच्या मिसेस व मुलाचीही आरटीपीसीआर करून घ्या असे डॉ खेरडेंनी सांगितल्यावर असंख्य प्रश्न डोळयासमोर उभे राहिले. कालच मी पॉझीटिव्ह असताना पॅथलॉजीमध्ये सहज वावरलो मी किती लोकांना बाधा केली असेल ? त्यात बायको व मुलाला पर टेस्टसाठी कसे पाठवावे? ते योग्य राहिलं का? असा विचार करीत असतानाच आतून आवाज आला मी नाही टेस्ट करणार व स्वरितलाही नाही नेणार बाहेर टेस्ट करायला खरच होत तिचही. डॉ वाघमारेही तेच म्हणाले , बाहेर वातावरण नीट नाही त्यात टेस्टसाठी बाहेर पडणं धोक्याचं ठरेल. मग आम्ही डॉ. खेरडेंचा सल्ला परिस्थितीचा अंदाज घेवून नाकारला व डॉ वाघमारे यांच्या सांगण्यानुसार मला सुरु असलेली कोवीड उपचाराची सर्व औषध अर्धांगिनीलाही सुरु केली. अशात ब्लड रिपोर्टही आले तेच डॉक्टरांना फॉरवर्ड केले. डॉ खेरडेंसोबत फोनवर बोलन झाल ते म्हटले, ‘रिपोर्ट नॉर्मल आहे. तुमच्या मिसेसची केली हा आरटीपीसीआर टेस्ट? असा त्यांचा अलगद प्रश्न आला . मी नाही म्हणालो, त्यावर त्यांनी भात्यातील बाण काढून सांगितले, ‘तुमच्या मिसेसही १०० टक्के पॉझीटिव्ह आहेत’. आता काय त्यांच्या बोलण्याला चॅलेंजच नव्हते कारण, नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ते गेल्या वर्षभरापासून कोवीड रूग्णांवरच उपचार करीत आहेत त्यांच्या अनुभवी वचनापुढे अवाक्षर न काढता आहे त्या स्थितीला सामोरे जाण्याचे आम्ही ठरविले (‘एक पर एक कोरोना पॉझिटीव्ह फ्री’, या न्यायाने म्हणता येईल हव तर.). कार्यालय प्रमुख व कार्यालयातील इतर सकारी यांना मेसेजकरून कळवलं व त्याच दिवशी ऑफिसला रितसर मेल करून रिपोर्ट पाठवून कोविड पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली. या दिवशी मी घरी ,सासरी व आजोळी फोन करून कळवलं. अख्खा दिवस मी लोकांशी बोलत होतो जे कोवीडग्रस्त होवून बरे झाले त्या सर्व जवळच्या व्यक्तींशी बोलून पुसटशी स्ट्रॅटेजी ठरवली. आणि या जुजबी शस्त्रास्त्रांनिशी ‘झुंज’ सुरु झाली. …जेव्हा कोविड रूग्णच घराबाहेर पडतो आतापर्यंत कोवीड संदर्भात काही वार्ता ऐकूणच होतो , आता प्रत्यक्ष अनुभवाची वेळ होती. २९ एप्रिलला रिपोर्ट आला त्याच दिवशी डॉक्टरांनी आहे त्या औषधांमध्ये आणखी काही औषध ॲड केली ती आणने क्रमप्राप्त होते म्हणजे साधारण पुढील १५ दिवसांचे आम्हा दोघांचे औषध आणने हा आमच्या समोरचा यक्ष प्रश्न होता. त्यासाठी ऑनलाईन मेडिसीन मिळविण्याचे सर्व केलेले प्रयन्त अयशस्वी झाले,वानगी दाखल त्यातील काही प्रतिक्रिया , ‘सर आप जो कह रहे हो उसमें से केवल दो ही दवाईयां हमारे पास हमारे अगले शॉप पर पुछीए फोन करके’ तिथे फोन केला तर तिथेही तसेच मिळते जुळते उत्तर. आता आम्ही राहत असू त्या अपार्टमेंट मधील आमच्या घरमालकांना फोन करून विचारले व त्यांना या निमित्ताने मी संक्रमीत झाल्याची माहितीही दिली. त्यावर त्यांनी स्वत: सिनीअर सिटीझन असल्याने औषध आणून देण्यास स्वत:ची असमर्थता दर्शवत शेजारच्या एका मेडिकलचा संपर्क क्रमांक दिला. मेडिकलमधील सदगृहस्थाने औषधांची नावे वाटस्अपवर पाठवायला सांगितली तेथून तास भर मी त्या मेडिकलच्या सततसंपर्कात होतो त्यांचे अंतिम उत्तर, ‘सर आपको चाहिए उसमें से एक फ्ॅबीफ्लु दवाई छोडकर बाकी दवाईयां है हमारे पास लेकीन हम आपके घर पर नही पहुचा सके आपको किसे भेजना होगा’. माझ्या समोर पेच असा की, अर्धांगिनीला आहे त्या स्थितीत बाहेर पाठवून माझ्या दिमतीला असलेला खंदाहात निखळून जाईल. मग काय स्वत:च जखमी सैनिक रंणांगणार उतरण्याशिवाय पर्याय नव्हता मग झाला निर्णय मीच औषध आणायला बाहेर पडायचं. आमच्या तीन माळयांच्या अपार्टमेंटमध्ये मी एकटाच संक्रमीत आणि आमचं कुटुंब सोडल्यास येथील सर्व रहिवाशी सिनीयर सिटीझन म्हणून ते माझ्यापासून संक्रमीत होणार नाहीत ही काळजी घ्यायची होती. आणि दुसरे म्हणजे औषधी घ्यायला बाहेर गेलो तेव्हा माझ्यापासून इतरांना संक्रमण होणार नाही याची काळजी मलाच घ्यायची होती. इतरांच्या लेखी मी सर्वसामान्यच होतो पण बाहेर पडल्यावर आपण एका अर्थाने ‘सुसाईड बाँम्बर’ आहो असं मला सारख वाटत होत. आयुर्वेदिक व ॲलोपॅथी अशा एकूण तीन मेडीकलमधून औषधी गोळा करून घरी परतलो. कोविड व ब्लड टेस्ट करिता (२८ एप्रिल) लाही कोवीडग्रस्त असलेला मी बाहेर पडलो होतोच टेस्टसह औषधी , फळ, दूध आणि भाजीही आणली त्या दिवशी. आणि उपचार सुरु झाल्यानंतर तब्येतीचा रिव्हीयु घेण्यासाठी डॉ.खेरडे यांच्या सूचनेनुसार (६ एप्रिल) ब्लड टेस्ट करायच्या होत्या म्हटल आतातरी होम कलेक्शन हा ब्लड टेस्टचा पर्याय निवडावा तसे ‘लाल पॅथ’ आणि ‘फार्मा इजी’ यांच्याशी फोनहून बोलने केले पण या दोन्ही एजंशीकडून उत्तर आल सब स्लॉट बुक है १० अप्रेल को हो पायेगा ब्लड सँपल होम कलेक्शन. यानंतर ‘एचओडी’ या संस्थेला फोन लावला ते म्हटले ८ अप्रेल को हो पाएगा होम कलेक्शन. डॉक्टरांना ही हकीकत सांगितली ते म्हटले उशिर नको आजच करा टेस्ट. मग काय कोवीडग्रस्त असलेला मी तिसऱ्यांदा बाहेर पडलो आताही कडक लॉकलाडाऊनमुळे रस्ते बंद असल्याने आडवळणाने पोहोचलो. असे हे ‘होम आयसोलेशन’ घरात बंदिवानाप्रमाणे जगणे वाटयाला येणे म्हणजे ‘होम आयसोलेशन’ हे माझं अनुभवांती झालेलं मत. या काळात रोज सकाळी उठल्याबरोबर प्यायला गरम पाणी ते होत नाही तोच गुळण्या करण्यासाठी तुरटीच्या पाण्याचे दोन ग्लास माझ्या पुढयात यायचे. मग नेबुलायझरचा कडक वाफारा त्यानंतर नाष्टा सोबत ड्राय फ्रुट्स मग लगेच औषधी (खूप सा-या व खूप प्रकारच्या). या काळात खूप थकवा जाणवत असल्याने लगेच बिछाण्यात जाव लागे मग परत जेवनाचं ताट समोर येई या सर्वांसोबत दिवसभर गरमचं पाणी प्यायला मिळत असे. परत अंथरूणात लोळण होत असे मग सायंकाळी चालता आल तर थोडी पावल पावली. सायंकाळी फ्रुट्सचा नाष्टा. रात्री जेवन व औषध. दर चार तासाला ऑक्सिजन लेवल आणि ताप मोजून तशी नोंद घ्यावी लागे. दिवसातून तीनवेळा गरम पाण्याच्या गुळण्या व तेवढयाच वेळेस प्यायला काढा आणि दोन वेळा वाफ . हा सर्व प्रकार आमचे सरकारही नाका तोंडाला घट्ट मास्क घालून आणि मी ही चारपट मास्क नाकातोंडाला गुंडाळून याचकाप्रमाणे आमच्या भाडयाच्या घराला विभागणाऱ्या दारावर उभेराहून स्वीकारत असे. एकाच घरात आम्ही विभागलो होतो बायको, मुलगा एका बाजुला व मी दुसऱ्या बाजुला. मुलगा तर लांबूनच दिसत होता, तो सारखा म्हणायचा, ‘बाबा घरात कधी येता? बाबा कधी ठिक होता तुम्ही? . याही पुढे जावून आम्ही घरातल्या घरात फोनवर संभाषण करीत असू हाही अनुभव आम्हाला कोवीडच्या साक्षात्काराने मिळाला. होम आयसोलेशनच्या काळात काही तरी क्रिएटीव्ह करता आले तर बघा, या काळात भरपूर वाचा, ऐका व बघा अशा प्रेमळ सूचना मिळाल्या फोनहून पण यातील एकावरही अंमल झाला नाही याकाळात ,त्याला कारणही तसेच याकाळात मन:स्थिती आणि शरीर या दोन्ही बाबी रुग्णापासून पुरत्या लांब असतात. होम आयसोलेशन मध्ये घेतलेल जेवन नाष्टा आदी खाद्य व पेय याची काहीही चव नसते म्हणून हे सर्व आपण खात असलो तरी ते फक्त गीळणे एवढेच ठरते. तोंडाला चव बरेचदा तर कडवटपणाच असतो तोंडाला तसेच नाकाला गंध येत नाही त्यामुळे या सर्वकाळात आपण किती वेगळया जगात आहोत आणि हे आपल्यासोबत काय घडत आहे असेच सारखे वाटत राहते. या काळात फक्त अंथरूणाला पाठ लागलेली असते मात्र डोळयाला अजिबात झोप नसते ही आणखी भरीस भर. लांब का असेना पण आपले लोक आपल्या सोबत आहेत याचा आधार असल्याने हॉस्पिटलाईज झाल्यापेक्षा होम आयसोलेशनचा न टाळता येणारा जाच सहन करता येऊ शकतो अशी प्रचितीही या निमित्ताने आली. आयसोलेश आणि विशेष श्रवणभक्ती या काळात जेव्हां थोड बर वाटलं तेंव्हा वि.वा.शिरवाडकारांच्या ‘आहे आणि नाही’ या लघुनिबंध संग्रहातील काही निबंध तसेच ‘किनारा’ काव्य संग्रहातील काही कविता वाचल्या. प्रा.रामशेवाळकर,बाबा महाराज सातारकर यांची काही निरूपण ऐकली. ‘मुंगी उडाली आकाशी’ या कादंबरीचे अभिवाचन ऐकले. प्रख्यात गायक भिमसेन जोशी, हरीहरन आणि जगजितसिंह यांच्या निवडक रचना ऐकल्या. व.पु काळे आणि प्रा. रविराज माने यांचे कथाकथन ऐकले. एफएम ९२.७ वर निलेश मिश्रा यांच्या ‘यादों का इडिएट बॉक्स’मधील अविट हिंदी कथा ऐकल्या. याशिवाय काही युटयूब चॅनेलला भेट दिली यात युवा गायक महेश काळे, राहुल देशपांडे यांच्यासह केंब्रीज विद्यापीठातील डॉ. अलि अबदल , सुलेखा तळवलकर यांचे (दिल के करीब हा विशेष मुलाखतींचा समावेश असलेले चॅनेल), उर्मिला निंबाळकर यांचे युटयूब व इंस्टाग्राम चॅनेलचा समावेश आहे. या सर्वांचा कळस ठरला ‘गिता परिवार’ प्रणीत ऑनलाईन गितासंथा वर्गात श्रीमदभगवद्गीतेचा ७वा अध्याय गुरुवर्य श्री. जय मुंडे यांच्या मार्गदर्शनात शिकण्याची मिळालेली संधी. दिवसाची सुरुवात निवडक योगासने आणि श्रीमदभगवद्गीतेचे श्लोक कानावर पडून होत असल्याने हा सर्वकाळ दु:खद काळ खूप सुखावह झाला. डॉक्टरद्वयांचे परफेक्ट गायडंस कोविड विरूध्दच्या लढाईत तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचा अचूक सल्ला फार मोलाचा व तुमचा जीव वाचविणारा ठरतो. त्यात आमचे भाग्य, आम्हाला एक नव्हे तर चक्क दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये दिल्ली येथे कार्यरत डॉ. महेश वाघमारे यांना तर अगदी पहिला फोन केला व त्यांना लक्षण सांगितले तसा त्यांनी धिर देत औषध सांगितली नंतर कळले की ती औषध कोविडग्रस्तांसाठी वापरतात. देशात जिथे जिथे आरोग्य विषक काही क्रायसीस घडतो तिथे आरोग्य मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकात डॉ. वाघमारे यांचा सतत सहभाग असतो अर्थात त्यांना फोन केला तेव्हा ते एक तर कुठल्या राज्याच्या दौरावर असतात नाही तर नुकतेच कुठल्या राज्याच्या दौऱ्याहून आलेले असतात. डॉ. वाघमारे यांचा माझा परिचय दिल्लीतलाच ते मुळचे सोलापूरचे. येथील जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात कार्यरत असता पासूनच माझा त्यांचा परिचय आहे पुढे आम्ही एकामेकांसोबत कनेक्ट राहिलो. त्यांचे आणि माझे कार्यक्षेत्र वेगळे होते तरीही दिल्लीत महाराष्ट्र आणि मराठी हा आमच्यातील एक महत्वाचा दुवा होता . आम्ही बॅचलरचे चतुर्भुज झालो, आता मात्र वाटल आमच्या दोघांच्या भुजा कशा असतील व आमचा कनेक्ट तर तुटणार नाही ना ? पण आम्हा दोघांच्या अर्धागिंनीनी लगेच मैत्री करून आमचा हा कनेक्ट अजून मजबूत केला. आता आम्हा दोघांच्या चिरंजिवांनी यात भर टाकली. इन शॉर्ट, ‘मी आणि डॉक्टरसाहेब , त्यांची अर्धांगिनी आणि आमची, त्यांचे चिरंजीव व आमचे हे सर्व मित्र-मैत्रिणी आहेत असं आमचं हे प्रेमळ नातही आहे. त्यामुळेच कोविड काळात डॉक्टर वाघमारे यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे व दररोजच्या विचारपूस व सल्ला सूचना यातून बराच धिर येत असे आणि इकडे या दोघिंचीही चर्चा मसलत व मागदर्शनाची देवानघेवान होत असे. हा या काळातील खूप धिर देणारा टप्पा होता. जोडीला आणखी एक तज्ज्ञ डॉक्टर होते डॉ. अभिषेक खेरडे. डॉ. खेरडे हे आमचे नातेवाईक पण कोविडच्या निमित्ताने त्यांचा माझा पहिला वहिला संबंध व संपर्क झाला. माझ्या आकडसासूबाई अणुताई यांच्या प्रयत्नाने मला हा लाभ मिळाला. नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ते गेल्या वर्षभरापासून कोवीड रूग्णांवरच उपचार करीत आहेत व त्यांच्या कामासोबतच आमच्या नात्यांमधील कोविडग्रस्त आप्तांना टेलीमेडिसीनच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचे महत कार्यही ते पार पाडत आहेत. माझ्या कोविडग्रस्तकाळात डॉ.खेरडे यांच्याशी झालेल्या संभाषणाहून ते एक शिस्तप्रिय, कामाचे भोक्ते आणि मृदुभाषी व्यक्ती असल्याचा माझा अनुभव. त्यांना पहिला फोन केला तेव्हा त्यांनी लक्षण ऐकूण घेत, ‘तुम्ही, तत्काळ आरटीपीसीआर आणि ५ ब्लड टेस्ट करा’ अशा सूचना केल्या. त्यानुसारच आरटीपीसीआर टेस्ट केली व तिचा रिझल्ट डॉक्टरांना फोन करून कळवला ते म्हटले कोवीड हा कोवीडच आहे त्याची प्रतवारी करत बसु नका आपण लवकर उपचार सुरु करू तोवर तुम्ही पत्नी व मुलाचीही टेस्ट करून घ्या, ते दोघेही पॉझिटीव्ह असण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या या संभाषणाने मला पत्रकारितेतील भाषेनुसार ‘बिट्वीन द लाईन’ कळली होती. पुढे होम आयसोलेशनच्या काळात दररोज डॉ. खेरडे यांना फोन करून रिव्हीयू देत असे व त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधी घेत असे. होम आयसोलेशनच्या १० व्या दिवशी त्यांनी पुन्हा ५ ब्लड टेस्ट करायला सांगितल्या या टेस्टही नॉर्मल आहेत असे सांगुन त्यांनी पुढील एक आठवडा होम आयसोलेट राहण्याच्या सूचना केल्या व औषधेही सांगितली. अखेर हा १७ दिवसांचा होम आयसोलेशनचा काळ डॉ. वाघमारे आणि डॉ.खेरडे या एमडी डॉक्टरद्वयांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केला व १८ व्या दिवशी गृहप्रवेश केला. ॲक्युप्रेशरतज्ज्ञ व आयुर्वेदाचार्य अविनाश मामांचाही मोठा आधार कोविड प्रोटोकॉलनुसार ॲलोपॅथीचा औषधोपचार सुरु असतानाच यांस ॲक्युप्रेशर आणि आयुर्वेदाची तितकीच जोड माझे मामा (मी त्यांना बहाल केलेली पदवी, वैद्यखडीवाले अवि मामा) श्री अविनाश पोटदुखे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभली. तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या तसेच या पाण्याची जलनेती, अमृतधारा तेलाचा वाफारा तसेच रोग प्रतिकारशक्तीसाठी गिलोयवटी आणि उत्तम पाचणासाठी उदरामृत वटी आदींच्या वापराबाबत मामांनी या काळात सातत्याने मार्गदर्शन करून व कोवीड कशा पध्दतीने शरीराला हानी पोहचवतो हे त्यांनी त्यांच्या दीर्घ तपश्चर्येतून मिळविलेल्या ॲनॉटॉमीच्या ज्ञानातून फार सहज समजावून सांगितल्याने या दु:खाच्या काळात धिरासाह प्रभावी उपचार ठरला. अवि मामा हे आमचे फॅमीली डॉक्टरपेक्षाही एखादे पद असेल तर त्या पदाचे धनी आहेत. आम्हाला आरोग्य विषयक कोणतीही समस्या निर्माण झाल्यास आम्हाला मामांचा आधार असतो व तसा आमचा त्यांना फोन जातो. आमच्या प्रत्येक समस्येचे अगदी सखोल मार्गदर्शनासह सटील समाधान हे आम्हाला आतापर्यंत त्यांच्याकडू मिळत आले आहे. कोविड काळातही त्यांचे हे मार्गदर्शन व धिर खूप मोलाचा ठरला. अवि मामांनी दुर्मिळ पुस्तकांचे वाचन,निरीक्षण आणि स्वयंमअध्ययनकरत औषधांचे नवनवीन संशोधन केले आहे व त्याचा यशस्वी वापर करून घरतील व नात्यातील आणि आतातर महाराष्ट्रातीतलही रूग्ण बरे केल्याची त्यांची ख्याती आहे. श्री पाठक साहेब या सर्व कठीण समयी अगदी न विसरता फोन करून तब्येतीचा हाल जाणून घेत होते व सतत आहार,औषधी व आराम आदिंविषयी मार्गदर्शन करीत होते. कोवीड मधून बाहेर पडल्यावरही त्यांनी सतत काळजीपोटी विचारपुस केली हे माझ्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले जे मी कायम स्मरणात ठेवेन व यासाठी कृतज्ञ राहील ज्ञान अज्ञातपणे ज्यांची या कठीण काळात मदत झाली असेल त्यांचाही मी कायम ऋणी राहील याच नोटवर थांबतो. ००००००

Thursday, January 27, 2022

वर्ष २०२२ च्या सुरुवातीला कामाची शाबासी

प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे पथसंचलन व त्याबाबात बातमी आणि ट्विटरच्या माध्यमातून राबविलेल्या प्रसिध्दी मोहिमेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक डॉ.बिभीषण चवरे यांनी कामाची शाबासी दिली. तर दुसरा प्रसंग म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कार्यालयाच्या ट्विटर हँडलहून मराठी भाषेचे वैशिष्टय विषद करणा-या मोहिमेचे कौतुक राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाचे सदस्य तथा भारतीय परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी, पासपोर्टमॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिल्लीतील मराठी अधिका-यांच्या वॉटसॲप ग्रुपवर केलेले कौतुक व याग्रुपवर वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे कौतुकाची थाप.तिसरा प्रसंग म्हणजे कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनासाठी केंद्र व राज्य शासनात दिल्लीत कार्यरत मराठी अधिकारी व पत्रकार यांच्याकडून वि.वा.शिरवाडकर यांच्या साहित्याचे वाचन करून घेणे व त्यास कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांहून प्रसारित करणे. व या संदर्भात मी पसृत केलेल्या बातमीवर आमच्या विभागाचे सचिव तथा महासंचालक यांची ‘Excellent Initiative’ अशी शाबासी. या तिन्हीबाबी वर्षारंभी घडताहेत त्यामुळे एक नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे व यापुढेही उत्तमोत्तम कार्य करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

Wednesday, January 12, 2022

बालशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारिता के जनक

स्वतंत्रता से पूर्व भारत के विविध प्रांतों में जली पत्रकारिता की मशाल से अज्ञान, कुरितीयों का अंधेरा हट कर आज उन प्रांतों के विकास में पत्रकारिता अहम भूमिका अदा कर रही है. देश के प्रगत राज्य महाराष्ट्र में प्रतिभाशाली तथा बहुमुखी व्यक्तित्व के धनी बालशास्त्री जांभेकर ने ६ जनवरी १८३२ को ‘दर्पण’ पत्रिका निकालकर मराठी पत्रकारिता की नीव रखी. इसलिये ,६ जनवरी ‘मराठी पत्रकारिता दिन’ के रूप में मनाया जाता है. इस उपलक्ष्य में मराठी पत्रकारिता के जनक के रुप में बालशास्त्री जांभेकर के कार्य पर प्रकाश डालता यह लेख. आजसे ठीक दस साल बाद मराठी पत्रकारिता अपनी स्थापना के २०० साल पुरे करने जा रही है. प्रिंट से शुरु हुए मराठी पत्रकारिता के इस सफर ने दुनिया में हो रहे सभी बदलाओं को समेटकर इलेक्ट्रॉनिक,डिजीटल,सोशल मीडिया ऐसे सभी विधाओं में अपनी विशेष छवी बनायी है. वर्तमान में प्रगति के शिखर पर विराजित मराठी पत्रकारिता की बुनियाद रखने का दौर देखा जाए तो बालशास्त्री जांभेकरजी ने १९वी सदी में ब्रिटिश काल में ‘दर्पण पत्रिका’ शुरु की. रत्नागिरी जिले के पोंभुर्ले गाव में जन्मे जांभेकरजी ने पत्रिका शुरु करने से पूर्व अंग्रेजी व संस्कृत भाषा का ज्ञान प्राप्त किया. इसके साथ ही गणित एवं शास्त्र जैसे विषयों में भी हुकमत हासिल की. अनेक भारतीय तथा परदेशी भाषाओं का उन्होंने अभ्यास किया. इन योग्यताओं के साथ उन्होंने ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’के ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोट के युवराज के अध्यापक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट के पहले असिस्टंट प्रोफसर, अध्यापन प्रशाला (नॉर्मल स्कूल) के निदेशक, ‘जस्टिस ऑफ द पीस’जैसे पदों पर कार्य किया. ‍ि इसी कार्य को आगे ले जाते हुए कुल ३४ साल के जीवन काल में जांभेकरजी ने अपनी आयु के २० वे साल में ६ जनवरी १८३२ को मुंबई में ‘दर्पण पाक्षिक पत्रिका’ शुरु की. यह दौर जो की अंग्रजो के शासन का था ओर राष्ट्रभक्ति हेतु समाज को प्रबुध्द बनाने के लिए लोगों का हित तथा उन्‍हें शिक्षा देणे के महान उद्देशसे उन्होंने यह पत्रिका का कार्य आरंभ किया. इस पत्रिका के पहले संस्करण में ही उन्होंने कहा, ‘स्वदेश के लोगों में परदेश की शिक्षा प्रणाली का अधिक अध्ययन हो तथा इस देश का उत्थान व यहां के लोगों के कल्याण के बारे में बात करने के लिए मंच उपलब्ध कराने हेतु और लोगों को वर्तमान स्थिति का ज्ञान कराना उद्देश है. अंग्रेज हुकुमत को भारतियों की भावना पहुंचाने तथा यहां के लोगों को अंग्रेजी भाषा का ज्ञान प्राप्त हो इस लिए उन्होंने इस पत्रिका को मराठी के साथ अंग्रेजी में भी प्रकाशित किया. इस पत्रिका में उन्होंने अपने सहयोगी भाऊ महाजन के मदद से मराठी और स्वयं अंग्रेजी विभाग की जिम्मेदारी संभाली. खुद के पैसों से उन्होंने यह पत्रिका कुल आठ साल तक प्रकाशित की ओर इस पुरे कार्यकाल में उन्होंने विज्ञापन का सहारा नही लिया. उस जमाने में इस पत्रिका के ३०० सबस्क्रायबर थे. इस पत्रिका में ग्रहों-तारोंसहित, इंग्लंड में हो रहे राजनितीक सुधार,महिला शिक्षा, जातीभेद का विरोध, विधवाओं के पुनर्विवाह, हिंदू , इसाई आदि धर्मो के बारे में व नाटय शाला को बढावा देने जैसे विषय सम्मिलीत हुआ करते थे. दर्पण अखबार से ज्यादा मतपत्रिका के रूप में लोकप्रिय हुयी. उस दौर में शुरु हुए प्रिंटिंग का सही उपयोग कर उन्होंने समाज को जागरुक करने का कार्य किया. इस पत्रिका के माध्यम से उन्होंने शिक्षा तथा मनोरंजन का कार्य किया. यह पत्रिका अंग्रेजी शिक्षा का मराठी में ज्ञान देने का माध्यम साबित हुआ. सार्वजनिक जीवन में विचार मंथन करने के लिए अखबार को शक्ती मान कर इसका उपयोग उन्होंने समाज में बदलाव के लिए किया. दर्पण को उन्होंने समाज परिवर्तन का शास्त्र तथा शस्त्र के रुप में प्रयोग किया. २५ जून १८४० को दर्पण का आखरी संस्करण प्राकशित हुआ. इसके बाद १९४० में जांभेकरजी ने दिग्दर्शन मासिक पत्रिका शुरु की लेकिन दर्पण के जैसे पाठकों को वह भायी नही. यह ज्यादा लोकप्रिय न होने के कारणों का विचार किया जाए तो मासिक पत्रिका अनियमीत रुप से प्रकाशित होती रही. शास्त्रीय विषयों पर इस मासिक पत्रिका में चर्चा होती रही तथा विभिन्न विषयों का मंथन होना भी रहा. यह मासिक पत्रिका लगभग ४ साल प्रकाशित होती रही. सामाजिक सहुकार को ध्यान में रखकर शुरु हुए दर्पण पत्रिकाने महाराष्ट्र को विचारों की पुंजी प्रदान की जिससे प्रगल्भ महाराष्ट्र निर्माण होने में मदद हुयी .इसी कारण ६ जनवरी को मराठी पत्रकारिता दिन के रुप में मनाया जाता है , जो की बहुत ही योग्य है. रितेश भुयार, उपसंपादक , महाराष्ट्र सूचना केंद्र, नई दिल्ली हमारे ट्वीटर हँडल को फॉलो करे : http://twitter.com/MahaMicHindi ००००००

Monday, September 20, 2021

कोरोना विरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर

विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड१९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे. कोविड१९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका वठवत असून त्यांना आधार देत आले आहेत. राज्याने आरोग्य यंत्रणा बळकट करून हा लढा अधिक भक्कम केला परिणामी रुग्ण संख्येत घट झाली व रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. लसीकरणातही राज्याने देशात आघाडी घेतली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून कोरानाची संभाव्य तिसरी लाट परतवून लावण्याची तयारी केली आहे. राज्याने कोविड१९ च्या व्यवस्थापनासाठी केलेल्या यशस्वी कार्यवाहीवर प्रकाश टाकणारा हा लेख. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा राज्याच्या हातात योग्यती साधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती. मात्र, सव्वावर्षांत बऱ्याच साधनसामग्रीची उपलब्धता करण्यात आली. कोविड केअर सेंटर्स ,बेड्स,आयसीयू सुविधा,व्हेंटिलेटर्स,औषधी,मास्क,ऑक्सिजन उपकरणे अशा अनेक बाबी राज्याने उभारल्या. या सुविधा वाढविताना टाळेबंदीसह काही निर्बंधही लावले, याचाच सुपरिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात आलेल्या कोरानाच्या दुसऱ्या लाटेने आव्हान वाढवले. विशेषत: ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड झाली. मात्र, राज्याने तातडीने ‘मिशन ऑक्सिजन’ सुरु करून दररोज १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीसह ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष ठेवले. लसीकरणामध्ये महाराष्ट्राने दोन्ही डोस देण्यात देशात पहिले तर एकूण डोस देण्यात दुसरे स्थान मिळवून ६ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात यावर्षी कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला दिवसाकाठी ६० हजार रुग्ण संख्या झाली. याचा सामना करण्याकरिता उपचाराच्या सुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता,संसंर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले परिणामी जून महिन्यापासून राज्यातील कोरानाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत घट होवू लागली व आज हा आकडा ३ ते ४ हजारांच्या घरात आला आहे. राज्य शासनाने पहिली लाट थोपवताना उभारलेल्या सुविधांच्या जोडीला यावेळी उपचाराच्या नव्याने सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राज्यात उपलब्ध सुविधांवर एक नजर राज्यात ६०९ चाचणी प्रयोग शाळा आणि ५ हजारांहून अधिक कोविड केअर सेंटर्स आहेत. आजपर्यंत कोराना उपचाराच्या ६ हजार ९५९ सुविधा असून यात ४ लाख ९७ हजार ९७ आयसोलेशन खाटांचा (आयसीयू खाटा वगळून) समावेश आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ऑक्सिजन खाटा आहेत. राज्यात ३६ हजार ७०२ आसीयू खाटा असून १४ हजार २४५ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णांसाठी ३ लाख ५१ हजार ३३० खाटा उपलब्ध आहेत. कोविड संशयित रुग्णांसाठी १ लाख २७ हजार ७२१ आयसोलेशन खाटा, १५ लाख ८६ हजार ९६ पीपीई कीट आणि २६ लाख १८ हजार ८६० एन९५ मास्क उपलब्ध आहेत. मिशन ऑक्सिजनची घौडदौड कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात येत आहे. दररोज १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून ही क्षमता ३ हजार मेट्रीक टन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यक ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसवण्यात येत आहे. जून अखेर पर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लान्ट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती झाली. राज्यातील साखर कारखाने, पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी पाहता राज्याने अन्य राज्यांमधून ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन घेतला. आर्थिक पाठबळ कोरोना संसर्गाच्या संकटांचा निकराने सामना करण्याकरिता राज्यशासनाने आर्थिक पाठबळ दिले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३ हजार ३०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. राज्यातील ३५० आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रत्येक १ कोटी प्रमाणे ३५० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे . रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत . तुलनेने ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. लसीकरणात अव्वल राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त लसीनुसार राज्यात दररोज सुमारे ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४ टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला आतापर्यंत लस मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविड कृतीदलाची स्थापना ; ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात कोराना संसंर्गाची लाट आली तसे या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब‍ कल्याण मंत्री राजेश टापे यांच्यासह संबंधित विभागांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली. कोरोना संसर्गाची लाट थोपवून धरण्यासाठी व परतवून लावण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या राज्य कोविड कृतीदलाची स्थापना करण्यात आली. या कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींचा यात समावेश आहे. कोरानाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचे कृती दल तयार केले असून या १४ सदस्यीय कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु आहेत. मुख्यमंत्री महोदय कायम या कृतीदलांच्या संपर्कात असून त्यांनी या कृतीदलांच्यावतीने वेळोवेळी आयोजित परिषदांमध्ये सहभाग घेवून मार्गदर्शन केले आहे. संभाव्य तिस-या लाटेची तयारी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने नुकतेच ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संसर्गाविरूध्दच्या युध्दात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी आदी कोरोना योद्धे हे शस्त्र असल्याचे सांगितले. राज्यातील रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री,औषध उपलब्धतेबाबतही लक्ष देण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले. राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेसह सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांची पालकत्वाची भूमिका राज्यात सुरु झालेल्या कोरोना संसर्गापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत व त्यांना धीर देत आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोनाकाळात वेळोवेळी जनतेशी संवाद साधला. राज्यातील वृत्त वाहिन्यांद्वारेही घराघरात पोहचलेल्या या संवादातून त्यांनी राज्यशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रसंगी राज्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी दै‍नंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह नियम पाळण्याविषयीही ते मार्गदर्शन करीत आहेत. जनतेसोबतच्या संवादातच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ या महत्वाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी हे दोन उपक्रम सुरु केले. कोरोनास्थितीत डळमळीत झालेली स्थिती सावरून राज्याला पुन्हा उभेकरण्यासाठी त्यांनी याच मंचावून ‘मिशन बिगिन अगेन’ आणि ‘ब्रेक दि चेन’ या कार्यक्रमांची घोषणा केली. ‘ब्रेक दि चेन’ निर्बंधकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. राज्यात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी सुरु आहे. इतिहासकाळापासून विविध संकटांवर समर्थपणे मात करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या थोर पंरपरेला साजेशे कार्य करत राज्यशासन कोरोना संसर्गाचा नेटाने मुकाबला करत या संकटावर मात करण्याच्या दिशेने समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात मोठया प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या सुविधा व गतीमान पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक अन्य महत्चाच्या उपाययोजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र हे संभाव्य तिसऱ्या लाटेलाही परतवून लावण्यासाठी सज्ज होत आहे. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic 00000 रितेश मोतीरामजी भुयार, उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.