Monday, May 29, 2023

संसदेची ऐतिहासिक इमारत आणि तिचे पालटलेले रुपडे







       

जेथून भारतीय देशाचा गाडा हाकला जातो, देशासाठी  कायदे  तयार होतात आणि देश  वासियांच्या  प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या कल्याणाचे निर्णय घेतले जातात अशी इमारत म्हणजे संसद इमारत. देशाची  राजधानी दिल्लीत स्थित असलेल्या या इमारतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्याने उभ्या राहिलेल्या संसद इमारतीचे २८ में २०२३ रोजी मोठया थाटात उद्घाटन झाले. संसदेच्या जुन्या इमारतीच्याच परिसरात केवळ अडिच वर्षाच्या कालावधित (१० डिसेंबर २०२० ते २८ में २०२३)  आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात बांधून तयार झालेली ही इमारत.

जुन्या इमारतीने ब्रिटीश शासन आणि भारतीय स्वातंत्र्य व त्यानंतर स्थापन झालेली पहिली लोकसभा निवडणूक व राज्यसभा सभागृहांची पहिली बैठक हे ऐतिहासिक क्षण अनुभवले. पारतंत्र्यातील भारतदेश आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशाची प्रगती बघतानाच चीन आणि बांग्लादेश युद्ध प्रसंगी या सभागृहात घेतले गेलेले महत्वाचे निर्णय, देशाला विविध क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचीही ही इमारत साक्षीदार होती. कटू आठवण म्हणून या इमारतीने 13 डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी  हल्लाही अनुभवला. म्हणता म्हणता ही इमारत वयाच्या शतकपूर्तीकडे असताना देशातील धोरणी राजकारण्यांनी या इमारतीची अनुपयुक्तता व भविष्यातील गरजा पाहता संसदेच्या नवीन इमारतीची योजना  आखली  आणि १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यावर आणि  पुढील वर्षी १८ व्या लोकसभेच्या मुहूर्तावर या इमारतीचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

ब्रिटीशांनी  कोलकत्त्याहून  १९११ मध्ये  दिल्ली  येथे आपली  राजधानी  स्थलांतरीत केली. आणि  राजधानीचा  विचार करता येथे देशाचा  राजकारभार हाकण्यासाठी आवश्यक वास्तू निर्माणाचे कार्यही  हाती घेतले. यातूनच  राष्ट्रपती भवन, इंडियागेट, संसद भवन आदी इमारती उभारल्या गेल्या .एडवीन ल्युटन या वास्तुविशारदाने हा सर्व परिसर बांधून तयार केल्याने  या सर्व परिसराला ल्युटीएन झोन असे नामाभिदान झाले. ल्युटीएन झोनमधील प्रमुख इमारतीत संसदेच्या इमारतीचा समावेश होतो. संक्षेपात जाणून घेवूया या इमारतीच्या इतिहासाविषयी. 

१२ फेब्रुवारी १९२१ रोजी जुन्या संसदेच्या इमारतीची अर्थात कंसिल हाऊसची कोनशिला डयुक ऑफ कॅनॉट यांनी ठेवली. या इमारतीच्या बांधकामास ६ वर्ष लागले आणि १८ जानेवारी १९२७ रोजी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारी १९२७ ला या इमारतीत केंद्रीय विधानसभेच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले,हीच या इमारतीतील पहिली वहिली बैठक ठरली.  स्वातंत्र्याच्या उंबरठयावर ९ डिसेंबर १९४६ रोजी संसदेच्या इमारतीत संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. भारतीय स्वांतत्र्याची  साक्षीदार  ठरलेल्या या इमारतीत १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांकडून भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण झाले व संविधान सभेची  मध्यरात्रीची ऐतिहासिक बैठक पार पडली.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती होत असतानाच देशात पहिल्या वहिल्या लोकसभा निवडणुकीची तयारीही होत होती आणि ही इमारत स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभेच्या निर्वाचीत सदस्यांच्या आगमनासाठी आसुसली होती. निवडणुका पार पडल्या आणि १३ मे १९५२ रोजी जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अर्थात संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि जनतेतून अप्रत्यक्ष्‍ निवडून आलेल्या प्रतिनिधींचे वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेची  पहिली बैठक झाली.

3 ऑगस्ट १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी संसदेच्या ॲनेक्सची कोनशिला ठेवली तर २४ ऑक्टोबर १९७५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या ॲनेक्स इमारतीचे उद्घाटन केले. १५ ऑगस्ट १९८७ रोजी तत्कालिन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संसद ग्रंथालयाची कोनशिला ठेवली आणि ७ मे २००२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन या ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन केले.

५ मे  २००९ रोजी उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीची कोनशिला  ठेवली. तर ३१ जुलै २०१७ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन केले हीच  संसदेच्या जुन्या इमारतीच्या संबंधातील अखेरची घटना घडली.

भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली होती  तेथून काही दिवसांनी ५ ऑगस्ट २०१९ ही तारिख संसदेच्या नव्या इमारतीच्या जन्माचे मुळ ठरले. याच दिवशी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम.व्यैकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी नवीन,आधुनिक संसद इमारतीचा प्रस्ताव उभय सभागृहामध्ये ठेवला.  मंजुरीनंतर या प्रस्तावा बरहूकुम सर्व कार्यवाहीसही सुरुवात झाली. १० डिसेंबर २०२० रोजी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची कोनशिला ठेवली व अडिच वर्षांच्या अल्पावधित निर्मित या इमारतीचे २८ में २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी श्री मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन झाले.

              संसदेच्या नवीन इमारतीविषयी

          नवीन संसदेची इमारत 64,500 चौरस मिटरवर स्थित असून त्रिकोणी आकाराची आणि चार मजली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. येथील लोकसभा सभागृहात ८८८ आसन क्षमता असून राज्यसभेत ३३६ आसन क्षमता आहे. येत्या काळात परिसीमनामुळे सदस्य संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही आसन क्षमता वाढविण्यात आली आहे. सद्या लोकसभेची सदस्य संख्या ५५२ तर राज्यसभेची सदस्य संख्या  २५० (238 + राष्ट्रपतींद्वारा निवडण्यात येणारे १२ सदस्य) आहे. नवीन संसदेला ज्ञानद्वार,शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे मुख्य तीन द्वार आहेत. ही इमारत भूकंप रोधी असून संसद सदस्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानआधारीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

     या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला, कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल ‘कमळा’वर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात ‘वटवृक्ष’ हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.

ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी या सभागृहात उभारण्यात आली आहे. टाटा उद्योग समुहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने संसदेची नवीन इमारत बांधली आहे. गुजरातमधील ऑर्कीटेक्चर फर्म ‘एचसीपी’ ने  या इमारतीचे डिजाईन केले आहे. बिमल पटेल हे या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद आहेत.

एकंदरितच देशाच्या संसदेची नवीन इमारत उभारली गेली  आहे. १७ व्या लोकसभेचे या वास्तुतीतील पहिले वहिले पावसाळी/ हिवाळी अधिवेशन आणि अर्ध अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. १८व्या लोकसभेच्या सदस्यांसाठी व राज्यसभेच्या नव्या अधिवेशनासाठी २०२४ मध्ये ही वास्तू वाट पाहणार आहे. नव्या भारताच्या नव्या अपेक्षांचीपूर्ती या वास्तुतून पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा देशातील १४२ कोटी जनतेची असणार आहे.

                                           00000 

No comments:

Post a Comment