Wednesday, January 14, 2026

सांस्कृतिक वैभव

 आपलं मंत्रालय या मासिकातील प्रकाशित लेख.



Wednesday, December 31, 2025

डॉ. पाखमोडेंच्या निधनाने देव माणूस गेला





         कित्येक वेळा शोक संदेश व शुभेच्छा संदेश लिहिण्याचे प्रसंग आलेत. त्यात सतत येणारे शब्द लिहित गेलो. पण, आज स्वतः प्रचिती घेऊन एका तज्ज्ञ डॉक्टरांविषयी हे शब्द तंतोतंत खरे ठरतात हे अनुभवातून सांगू शकतो. नागपूर येथील सुप्रसिद्ध मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ज्ञ (न्यूरोसर्जन) 
तथा न्युरॉन हॉस्पीटलचे संचालक  डॉ. चंद्रशेखर पाखमोडे हे खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवन देणारे माणसातील 'देव' होते. त्यांच्या अकाली निधनाने असंख्य रुग्णांचे व पर्यायाने समाजाचे नुकसान झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात विरळा असणाऱ्या कुशल व संवेदनशील व्यक्तिमत्वाचा आदर्श वस्तुपाठ होते डॉ.पाखमोडे. त्यांनी आमच्या साळभावाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढले व आमच्या प्रमाणेच असंख्य रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ते 'देव' ठरले आणि 'मरावे परी किर्ती रूपे उरावे.' या म्हणीलाही तंतोतंत खरे ठरणारे व्यक्तिमत्व ठरले.

         ही घटना आहे १८ जून २०२५ च्या मध्यरात्रीची. एका अपघातात गंभीर जखमी झालेले माझे साळभाऊ श्री. प्रकाश मसने हे घटना स्थळापासूनच कोमात (निश्चेतनावस्था) होते. तीन दिवस सतत उपचार सुरू असताना सर्वांच्या सल्ल्याने आम्ही त्यांना नागपूरच्या धंतोली भागातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केल. मध्यरात्री आयसीयुमध्ये दाखल केल्यावर आमच्या रुग्णाला क्लीन सेव्ह पासून व्हेंटिलेशन आणि औषधोपचार सुरु झाला आणि आवश्यक ती औपचारीक कागदोपत्री कार्यवाही पार पाडून आम्ही आयसीयुमधून बाहेर पडलो. सकाळ झाली आणि ७.३० ते ८.०० वाजेदरम्यान लाल भडक रंगाची जग्वार कार स्वत: ड्राईव्ह करत न्युरॉनच्या मुख्य गेटवर गाडी थांबली आणि त्यातून राजबींड व्यक्त्तीमत्व गाडीतून बाहेर पडले तसेच आजु बाजुचे लोक म्हणू लागले डॉक्टरसाहब आ गये. अन् आम्हीही आयसीयुकडे आमच्या पेशंटच्या बाबतीत जाणून घ्यायला निघालो. ५व्या माळयावरील आयसीयु समोर आमच्या प्रमाणेच अन्य रुग्णांचे नातेवाईक उभे होते. डॉक्टर साहेब नेहमीच्या ‍‍शिरस्त्याप्रमाणे हॉस्पिटलच्या पहिल्या माळयावरील गणपतीच्या मंदिरात दर्शन व स्त्रोत्र पठण करून थेट ८व्या माळयावर पायऱ्या चढून गेले व तसेच ते रुग्ण तपासून ५व्या माळयावर आले. स्वत: आयसीयुमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर नातेवाईकांना बोलवल गेल तसे आम्ही आत गेलो. तेव्हाच डॉ. पाखमोडे यांचा पहिला परिचय झाला. त्यांनी आमच्या रुग्णासमोरच आम्हाला सांगितल, “रुग्ण अत्यवस्थ आहे,एमआरआय करावा लागेल त्यानंतरच शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा कसे हे ठरवता येईल” एवढ बोलून ते निघून गेले. सायंकाळी एमआरआय झाल्यावर त्यांनी आयसीयुमधील संबंधित डॉक्टरला रिपोर्ट बद्दल सांगितले व आम्ही त्यांच्याकडून समजून घेतले तेव्हा कळले की आमच्या रुग्णाच्या एमआरआय रिपोर्ट नुसार शस्त्रक्रिया करावी लागणार नाही . दुसऱ्या दिवशी डॉ.पाखमोडे यांनी सांगितले शस्त्रक्रिया करावी लागणार नाही ही बाब आश्वासक आहे मात्र मेंदूवर सुज आहे त्यामुळे धोका टळलेला नाही.   

     मग दुसऱ्या दिवसापासूनच कोमामध्ये असतानाही आमच्या पेशंटला न्युरो फिजीओ थेरपी सुरु करण्यात आली व हळू-हळू तब्येतीत सुधारणा होत होती. अखेर आठवडाभऱ्याने आमच्या पेशंटने डोळे उघडले व आयसीयुमधून आम्ही बाहेर आलो अशात न्युरो फिजोओ थेरपी सुरुच होती. दररोज डॉक्टरसाहेबांचा आयसीयु आणि वॉर्डमधील राऊंड व त्यांच्याशी आमच्या पेशंटच्या तब्येती बद्दल बालेण व्हायचं. आमच्या पेशंटच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, त्यांची स्मृती आली नव्हती. हळू हळू स्मृती येईल, औषधी व प्रत्यक्ष पेंशटची काळजी घेवून पेशंट बरे होण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास त्यांनी दिला व आमच्या पेशंटला डिस्चार्जही दिला. मग दर महिन्याला नागपूरला येवून डॉक्टरसाहेबांची ओपीडी व त्यातील त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व उपचार सुरु आहेत मागील भेटीत त्यांनी सांगितले की तुमचे पेशंट ९५ टक्के बरे झाले आहेत,दोन वर्षांनी एमआरआय करू तेव्हा त्यांना सुरु असलेल्या काही अनिवार्य गोळया सुरु ठेवायच्या की कशा ते ठरवू. येत्या २०२६च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात डॉक्टर साहेबांकडे तपासणीसाठी यायचे होते. पण ३१ डिसेंबर २०२५लाच ते या जगाला अलविदा करून गेले. आणि आमच्या पेशंट प्रमाणे असंख्य पेंशटला आपल्या कुशल उपचारापासून पोरके करून गेले. दूर दूरहून आलेले रुग्ण येथे डॉक्टरांच्या उत्तम उपचाराने व त्यांच्या संवेदनशील स्वभावाने बरे होवून घरी जात असल्याची प्रचिती आम्ही घेतली.

 ‘न्युरॉन’ हे मध्यभारतातील मेंदू व मज्जारज्जू संबंधित आजारावरील सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे. मार्च २०१४ मध्ये डॉ. चंद्रशेखर पाखमोडे आणि मेंदू शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गिरी यांनी सुरु केलेल्या या हॉस्पिटलमध्ये विदर्भ आणि मध्यप्रेदश,छत्तीसगड,राजस्थान या राज्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. अत्यंत क्लिस्ट अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून कित्तेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अपघातात मेंदूला मार लागून गंभीर प्रकृती झालेले रुग्ण येथे बरे झाल्याचे असंख्य उदाहरण आहेत. 


डॉ.पाखमोडे यांनी स्वत:ला आपल्या व्यवसायात एवढे व्यस्त करून घेतले होते की त्यांच्या दिवसाची सुरुवात धंतोली पोलीस स्टेशन शेजारील न्युरॉन हॉस्पिटल मधील रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठीच्या राऊंड पासून होत असे. मग आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियाही होत असत आणि त्यांची ओपीडी ज्यात साधारण किमान २०० रुग्णांचा समावेश असे ती ओपीडी कधी कधी सायंकाळी ७ वाजता सुरु होवून रात्री उशिरापर्यंत चालत असे. स्वत:ला झोकून रुग्णसेवेचे व्रत सांभाळणारे डॉ.पाखमोडे आज या जगात नाहीत. मात्र, जग सोडून जाण्याचं हे त्यांच वय नव्हतं अजून त्यांच्याकडून रुग्ण सेवा घडून असंख्य रुग्णांचे प्राण वाचले असते.पण, प्रकृतीला ते मान्‍य नव्हतं.आज सकाळीच हृदय विकाराच्या धक्याने त्यांचे निधन झाल्याची वार्ता धडकली. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती. ज्या रुग्णांना त्यांनी प्राणदान दिले त्यांना ही वार्ता कळताच त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनाही हा दुख:द धक्का बसला.

 दुपारी नागपूर ग्रामीण मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलण झालं. त्यांनी सांगितलं की ,'डॉक्टरसाहेब हे शिवाजी सायन्समधील व पुढे जीएमसी अर्थात नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांचे बॅचमेट आहेत'. डॉक्टरसाहेब मनोभावे रुग्ण सेवा करतात. कदाचित कामाच्या ताणाने त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला असेल असे त्यांचे म्हणने होते. आमच्या नातेवाईकांनीही सकाळी डॉक्टर साहेबांच्या निधनाची वार्ता कळवली व एवढे तज्ज्ञ डॉक्टर व आपल्यासाठी देव माणूस ठरलेले डॉक्टर साहेब जाण्याचे दु:ख व्यक्त केले. योगा शिकवणाऱ्या आमच्या नातेवाईकांनी तर योगाक्लास मध्ये डॉ.पाखमोडे यांना श्रद्धांजली वाहिली.

         डॉ. पाखमोडे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील लाखनी (सलोटी)  येथील निवासी. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (मेडिकल ) एमबीबीएस आणि एम.सी.एच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयातून न्यूरोसर्जरीचे उच्च शिक्षण घेतले. नागपूर येथील मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पाच वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांनी ‘न्युरॉन’ ची स्थापना केली.३१डिसेंबर २०२५ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले तेथे सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान त्यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी डॉ. मनिषा, मुलगा डॉ. अद्वैत आणि मुलगी अनन्या असा परिवार आहे.

    नागपुरातील मोक्षधाम येथील दहनघाटावर गेलो इथेही वैद्यकीय, राजकीय, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य जनतेची अलोट गर्दी होती त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूकही ठप्प झाली होती. इथे पोचलो  तेव्हा दहनघाट कार्यालयातील  कर्मचारी सांगत होता, 'अरे कल रात को तो डॉक्टर साहब ने मेरी बिटिया को पढाया मेरी बेटी डॉक्टरी पढ रही है. दुसरा कर्मचारी म्हणाला,'बहुत होशियार डॉक्टर थे वे ओर भले आदमी भि. सुबह मेरा भाई रास्ते से गुजर रहा था तो रास्ते में डॉ. पाखमोडे सर की कार उसे क्रॉस हुयी थी'. तत्पूर्वी, रामदास पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी जात असताना वाटेत काही व्यक्तींचा घोळका क्रॉस झाला. त्यातील एक व्यक्ती म्हणाले, ‘जिसने जान बचायी ऐसे डॉक्टरसाहब का अंतिम दर्शन लेने आये है हम’. त्याच भावना माझ्याही होत्या. डॉक्टरसाहेब आता कधीच भेटणार नव्हते. पण त्यांच अंत्यदर्शन घेवून आम्हा नातेवाईकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मीही गेलो होतो. येथील हॅप्पीहाईट अपार्टमेंट खाली सर्व शोकाकुल जनतेची गर्दी दिसली. गर्दीत पुढे गेलो तेव्हा डोक्यावर कुंकवाचा टिळा आणि अंगात डॉ. चंद्रशेखर पाखमोडे लिहिलेल्या न्युरॉन हॉस्पिटलच्या ॲप्रॉनमधील डॉक्टरसाहेब फक्त झोपले आहेत असच वाटत होतं, बाकी त्यांचा चेहरा तसाच निर्विकार होता.आपल्या रुग्णसेवेचा आदर्श कायम समाजासमोर राहील व त्यातून वैद्यकीय क्षेत्र अधिक बळकट होत राहिल असे म्हणताना रुग्णांची आस्थेने विचारपुस करणारा व त्यांना आदरयुक्त वागणूक देणारा डॉ. पाखमोडे सरांसारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही अशा प्रांजळ भावना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
                 ००००००

 

 

 

Monday, December 29, 2025

आईला पर्याय नाही व नसेलही हे ठासून सांगणारे 'उत्तर'


‘आई’ विषयावर मोठ-मोठया साहित्यकृती जन्माला आल्या व त्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्यही गाजवले. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ घराघरात पोचली तर याच कलाकृतीवर तयार झालेला थोर साहित्यिक प्र.के.अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाने मराठीचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही पटकाविला. रंगभूमीवर ‘श्यामची मम्मी’ही आले. अन् आता सरत्या वर्ष २०२५ मध्ये (१२ डिसेंबर) क्षितीज पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी गीतकार व पटकथाकाराच्या पहिल्या-वहिल्या दिग्दर्शनात प्रदर्शित झालेला ‘उत्तर’ हा चित्रपट ‘आई’ या माणसाच्या जीवनातील अविभाज्य पात्राला ‘एआय’ चा पर्याय कसा असू शकत नाही हे ठासून सांगतो.

आजकाल सर्व क्षेत्रात जोरकसपणे सुरु असलेला एआयचा वापर आता मानवी नाती जपण्यासाठीही उपयोगात येईल की काय ! ही भिती बाळगणाऱ्या सर्वांसाठीच ‘उत्तर’ हा चित्रपट नवी दृष्टी देतो. दिग्दर्शकाने ही भिती दूर करण्यासाठी जगातील सर्वप्रिय नातं ‘आई’ व तिची माया हेच निवडलं ही त्यात एक जमेची बाब. चित्रपटाच कथानक पुण्याच्या एका जुन्या चाळीतील छोटयाशा फ्लॅट सदृष्य खोलीतून सुरु होतं. आणि महाविद्यालय व कोकणातील एक छोट गाव एवढयातच फिरतं. चित्रपटातील पहिला व शेवटचा सिन अगदी कट-टू-कट सूचक व म्हणूनच जबरदस्त झाला आहे.  

उमा महेश भालेराव या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील निवेदिका.पतीच्या निधनानंतर एकुलता एक लेक निनाद/नन्न्याची जबाबदारी त्यांच्यावरच येवून पडते. दोघा मायलेकांच्या संवादातून सुरु झालेली चित्रपटाची सुरुवात नन्न्याचं तारुण्य सुलभ मन व त्यात त्याला हवी असलेली प्रायव्हसी आणि आईला आपल्या मुलाला घडवण्याचा प्रवास व त्यात मुलाकडून मिळणारा तोडका प्रतिसाद अशा द्वंद्वात चित्रपट पुढं सरकत जातो. बाल वयापासून सोबत असणारी त्याची मैत्रिण आणि तो एका डिजीटल फेस्टसाठी प्रोजेक्ट तयार करण्याची प्रक्रियाही चित्रपटात आली आहे. नन्न्याला दर दोन तासाने फोन करून सतत त्याच्या काळजी पोटी सल्ला देणारी व घरात लहान सहान गोष्टीत त्याची काळजी घेणारी उमा एकदा चक्कर येऊन घराच्या जिन्यात कोसळते. आणि उपचारा दरम्यान कराव्या लागणाऱ्या विविध तपासण्यादरम्यान तिला आपल आयुष्य केवळ तीन-चार महिन्यात संपणार हे कळतं मात्र, ते नन्न्याला सांगण्याच धाळसंच करत नाही. अशात नन्न्याला आपला एआय प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आईच्या आवाजाची गरज असते व त्या निमित्त तो आई जवळ राहणार असतो यामुळे उमा सुखावते मात्र नन्न्या आपल्या प्रोजेक्टसाठीच तिच्या आवाजात तिच्या सूचना या प्राँप्ट म्हणून तयार करतो. अशात उमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या बहिणीकडे जाण्याची इच्छा होते व कोकणात बहिणीकडेच तिचे निधन होते. उमाचे उत्तर कार्य आटोपून नन्न्या घरी येतो. अशात चाळीतील शेजारी व त्याची मैत्रिण सांत्वणासाठी येतात पण त्याला सांत्वनेची गरज नसल्याचे त्याचे तुसडेपणाचे वागणेही मायलेकाच्या नात्यातील आगळाच विरोधाभास अधोरेखीत करते.

  आई नसली तरी नन्न्याला आता फारसा फरक पडत नाही. 'अनमिस' नावाचे एआय मॉडेल तयार केल्याने तो आता घरात उपमा बनवण्यापासून सर्व प्राँम्ट देवून उमाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजकडून त्याचा प्रोजेक्टची निवड होताना परिक्षक दुसऱ्या परिक्षकाला सांगतात की याची आई गेली आहे नुकतीच त्यावर नन्न्या म्हणतो की ,माझ्या टॅलेंटहून मला जज करा माझ्या परिस्थितीहून नाही. हा डायलॉग प्रेकक्षकांना चटका लावून जातो पुढे आईच्या एका पत्रातूनच नन्न्याला अनमीसमधील अपडेट सुचते व त्याच्या जोरावरच त्याचा प्रोजेक्ट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरतो. अर्थात नन्न्याला उमाची गजर वाटत नाही मात्र त्याच्या यशाची प्रेरणाही उमाच असते हेही क्षितीज पटवर्धन यांनी सुजान प्रेक्षकांना या कलाकृतीतून दाखविले आहे.

‘आई’ शब्दाला साधर्म्य असणारा ‘ए, आय’ हा आईला हाक मारणारा ग्रामीण महाराष्ट्रातील शब्द कायम पर्याय असू शकतो मात्र, आधुनिक तंत्रज्ञानातील कृत्रिक बुद्धीमत्ता अर्थात ‘एआय’ हा पर्याय ठरू शकत नाही, हे या चित्रपटातील शेवटचं दृष् सूचवतं. ज्यात नायक चाळीत भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करताना पिशवी सोबत नसल्याने सवयी प्रमाणे गच्चीकडे पाहून आईला पिशवीसाठी हाक मारतो. मात्र, आई सोडून गेल्याची जाणीव होत असताना गच्चीतून आई जी पिशवी भिरकवायची ती पिशवी दिसते. यावेळी नायकाला आईसोबतचा संवाद आठवतो, ‘आई तुला वारा का ग आवडतो?’ त्यावर तीच मार्मीक उत्तर की ‘तो आपल्या प्रिय लोकांची आठवण करून देतो’ अस आठवत असतानाच गच्चीतील पिशवी वाऱ्याने खाली थेट नायकाच्या हातात पडून जाते व इथेच चित्रपट संपतो. 

चित्रपटाची तांत्रिक बाराखडी उत्तम जमली आहे. पहिल्या फ्रेमपासून जनसंवादातील प्रभावी संवाद घडविण्याची किमया कॅमेरातून साधली आहे. बर्गर,कोंड्रींक, उपमा ते कोकणातील जेवणाची थाडी आणि हापूस आंब्यांचा चित्रपटातील यथोचित वापर सांस्कृतिक गुंफण दर्शवितो.चित्रपटातील एकमेव गीत आणि तेही रटाळवान होणार नाही त्यातच कथानक पुढे सरकत जाईल याची काळजी घेण्यात आली आहे.चाळीतील जीवन व त्यातील पात्रही उत्तम रेखाटली आहेत.'एआय' शी संबंधित सर्व आज्ञावलीचा उत्तम अभ्यास करून दिग्दर्शकाने हा विषय खूपच बखुबी मांडला आहे .गंभीर विषय अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या गळी उतरवताना बहुतेक वेळा प्रेक्षकांचा कंठ दाटून येतो. हिच काय ती या चित्रपटातील उनीव म्हणून बळजबरीने बोट ठेवावं अशी बाब.

ही कथा एकल महिलेच्या भावनिक संघर्षाची जेवढी म्हणून वाटते त्यात ती एकल पाल्याच्या भावनांचा विचार करणारी व त्यालाही झुकत माप देणारी वाटते. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांचा प्रश्न मांडणारा हरिष इथापे दिग्दर्शीत आणि श्याम पेठकर यांच्या पटकथा लेखनातील ‘तेरवं’ चित्रपटही बघितला.विदर्भातील कलाकारांना घेऊन केलेला तो आगळा प्रयोग होता.त्या चित्रपटाला तेवढे व्यावसायीक यश मिळाले असेल असे जाणवत नाही.पण एकापेक्षा एक सरस गाणी,पटकथा,रंगभूमीवरील नाटकं देणारा क्षितिज पटवर्धन यांचा चित्रपटातील पहिला प्रयोग नक्कीच यशस्वी झाला म्हणता येईल. नागपुरातील तीन सिनेमागृहात सतत आठवडाभर दिवसाला आठ शो हाऊस फुल्ल झाल्याचा व मलाही प्रयत्न करताना तिसऱ्या दिवशी तिकीट मिळालं यातच काय ते चित्रपटाच्या यशाचं गमक सांगता येईल.मात्र,विविध सामाजिक परिस्थितीशी झगडत असलेल्या एकल महिलांचा प्रश्नही समाजाच्या डोळयात अंजन घालण्याचे काम करतो व समाजाला आरसाही दाखवतो.

उमा भालेरावांच्या रुपाने रेणुका शहाणे यांनी रंगवलेली ‘आई’, आपल्या आई-वडिलांचा कलेचा वारसा लाभलेला अभिनय बेर्डे याने अप्रतिम अभिनयातून रेणुका शहाणे  आणि निर्मिती सावंत यांच्या सोबत दिग्गज अभिनय केला आहे.ऋता दुगुळेनेही नन्न्याच्या मैत्रिणीची भूमिका सुंदरपणे वठविली आहे. 

या चित्रपटाचा पटकथाकार व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन हा माझा पुणे विद्यापिठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन अभ्यासक्रमातील बॅचमेट.मध्यंतरी दिल्लीत त्याची सपत्नीक भेट झाली होती. यशोशिखरावर असताना त्याने अजुनही  आपल्यातील माणूसपण जपल आहे. त्याची पत्नी प्राचीही त्याची बेस्‍ट मॅच आहे.असो, तर क्षितिजच्या चित्रपट दिग्दर्शनातील या पहिल्याच अफलातून प्रयोगाने मित्र म्हणून त्याचा खूप हेवा व आदर वाटतो.मित्रा मराठी चित्रपट सृष्टीला समृद्ध करण्यात तुझा मोलाचा वाटा ठरो याच शुभेच्छा !

                                 000000   

 

Friday, December 26, 2025

त्याग, शौर्य आणि श्रध्देची महान परंपरा:‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब









यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील वृत्तपत्रात प्रकाशित लेख

 ____________________________________________

 विशेष लेख :

त्याग, शौर्य आणि श्रध्देची महान परंपरा:‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब

      ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या औचित्याने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख..

    मोगलांच्या अनन्वीत अत्याचारामुळे कश्मीरचा सुभेदार आपला हिंदू धर्म धोक्यात आल्याने शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची मदत घेण्यास जातात व ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) हिंदू धर्मियांना मुस्लीम होण्यापासून वाचविण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी गुरु तेगबहादुर साहिब थेट मोगल बादशाह औरंगजेबाशी टक्कर घेत दिल्लीकडे कुच करतात. औरंगजेब घात करून तेगबहादुरांना आग्रा येथे अटक करतात. दिल्लीला आणून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात. धर्मस्वाभिमानी गुरु तेगबहादुरांनी धर्मपरिवर्तनास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात ते बलिदान देतात. त्यांचे हे बलिदान इतिहासात अमर होते भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी धर्मासाठी बलिदान देवून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. दिल्लीच्या चांदणी चौकातील त्यांच्या शहिदस्थळी १७८३ मध्ये सरदार बघेलसिंग यांनी त्याग, शौर्य आणि श्रद्धेचा तेजपुंज असणाऱ्या सीसगंज गुरुद्वारा बांधला. 

       श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या धर्म व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास,भाई सतीदास आणि भाई दयाल गुरुजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरु निष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांना धर्मांतर विरोधात आवाज उठविण्याचा प्रेरणास्त्रोत ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी मोगलांना आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी औरंगजेबाच्या आज्ञेनुसार जल्लाद जलालुद्दीन याने गुरु तेगबहादुरांचे शिर धडापासून वेगळे केले. आणि फतवा काढण्यात आला की, ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार पाडेल त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे तुकडे करून दिल्लीच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारांवर लटकविले जातील.’अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी धडपडू लागले. औरंगजेबाची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे ‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांना सुपूर्द केले. आणि इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज गुरूद्वारा’ उभा आहे.

   सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला. आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. तो हाच गुरूद्वारा स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व धर्मांतराविरूद्ध आवाज बुलंद करण्याचा व त्यासाठी प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. भल्यामोठ्या परिसरात उभारण्यात आलेल्या या गुरूद्वाऱ्यामध्ये देश-विदेशातील सर्व धर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने मथ्था टेकण्यासाठी येतात व येथून प्रेरणा घेतात. या गुरूद्वाऱ्यामधील ‘वृक्ष’ आणि ‘विहिर’ हे ही प्रेरणादायी आहे. या वृक्षाच्या खालीच गुरू तेगबहादुर यांनी स्वधर्माभिमानासाठी प्राणाची आहूती दिली. शेजारी असलेल्या विहिरीला भावीक नतमस्तक होतात. गुरू तेगबहादुर कैदेत असताना या पवित्र विहिरीतील पाण्याचा उपयोग दिनचर्या व पिण्याकरिता करीत असत. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे. तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित आहे.

    शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्यूनंतर बकाला येथे जाऊन विरक्तवृत्तीने राहू लागले. 

      शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह याचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह म्हणून ते उदयास आले. 

       गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी धर्मासाठी प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

     शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आखलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सर्व धर्म समाभावाची भूमी नागपूर येथे होत आहे.

     ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील  नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या विशेष कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांची प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. शीख,सिकलीगर,बंजारा,लबाना,मोहयाल,वाल्मिकी आणि सिंधी समाजाचे लोक एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा करणार आहेत.

       श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा धर्मरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने आयोजित या विशेष कार्यक्रमाचे नागपूर नंतर नवी मुंबई येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि २४ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. नागपूरसह अन्य ठिकाणी आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमातून ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कर्तुत्व आणि विचारांचा परिचय जनतेला होणार आहे.                                                                              

              रितेश मो.भुयार,

            माहिती अधिकारी, 

    माहिती व जनसंपर्क, नागपूर.

                                         

           ००००००

Wednesday, December 24, 2025

मुके आभाळ अन् मायेची पाखर



       त्याने आईच्या हातातील 'आपली बस' ची (नागपूर मनपा संचालीत सिटी बस सेवा) तिकीट घेतली आणि त्यातील आकडयांना तो जेमतेम तीन वर्षांचा चिमुरडा डोळयांशी साधर्म्य दाखवून आईला खुनावत होता. तो सांगत होता या तिकीटावरील वेटोळे आकडे हे माणसांच्या डोळयाप्रमाणे आहेत. पुढे आई मुलातील हा संवाद  माझ्या सारख्या बस प्रवाश्याला खुपच सुखावून गेला. त्यात ते खटयाळ बालक आईला खुनावून सांगु लागलं ही तिकीट फेकु का गाडीच्या बाहेर? त्यावर त्याची आई सांगत होती बाळा ही एसी गाडी आहे आणि त्याच्या खिडक्याही बंदिस्त आहेत तुला तिकीट नाही फेकता येणार. हा मुलगा ‘मुक’ होता पण त्याच्या आईची मायेची पाखर यत्किंचितही कमी जाणवत नव्हती. गाडीतून उतरताच आईचा हात धरत हा मुलगा शेजारच्या गाडीवरील समोशाकडे अंगुली निर्देशकरीत आईला समोसा मागण्याचा हट्ट करत होता एवढयात आईने त्यास नकार देत पुढची वाट धरली. हा सर्व प्रसंग बघत असताना मला, जन्मत: मुक मुलांच्या जगण्यातील प्रश्नांबाबत थोडावेळ विचार मनात आला. आणि मग बराचकाळ यावर चिंतनही केल. 

आमच्या अचलपुरातील(माझं गाव) दानाखोरीभागात असाच एक अंबाडकरांचा मुलगा होता नाव ‘अनिल’ त्याची प्रतिकृती डोळयासमोर आली. आणि त्याला लोक त्याच्या नावाने न ओळखता ‘मुका’ या नावाने संबोधित असत हेही ठळकपणे आठवलं.सदरा-पायजामा अन् कधी पँट-शर्ट घालनारा हा तरुण आपल्या वडिलांसोबत शेतीची काम करीत असे. शेतीच्या कामात तो उजवाच होता. काही सार्वजनिक कार्यक्रमातही तो सहभागी असे हे पुसटस आठवतं.  पण, सामान्य मुलांच्या तुलनेत तो मुलगा चेष्टेचा विषयच जास्त ठरत असे हे मला आठवते. पुढे लग्नही झालं मात्र, समाजाच्याच अवहेलनेतून त्याने विष प्राषण करून आयुष्य संपविल्याचे कळले. 


  

आजोळी माझा चुलत मामा हिंमतराव पोटदुखे यांचा मुलगाही मला आठवतो. एका-पाठोपाठ मुलीच जन्माला येताहेत म्हणून मुलाच्या आशेवर असणाऱ्या हिमंतरावांना तिसरी संतती झाली, नाकी-डोळी अगदी चांगला असणारा व आईप्रमाणेचा गौर वर्णीय मुलगा 'सुयोग' जन्मत: मुक होता. त्यामुळे पुत्र प्राप्तीने सुखावणाऱ्या हिंमतरावांची हिमंत मात्र मुक मुलगा स्वीकारताना खचली असेल. विशेष मुलांच्या शाळेत गावापासून जवळपास ७ते८ कि.मी. अंतरावर (कापूसतळणी) या मुलाला शालेय शिक्षण पूर्ण करावं लागलं. काल परवा अमरावतीच्या तापडीया मॉलमधील रिलायंस ट्रेंड शॉपमध्ये अटेंडंस म्हणून काम करणारा  हा मुलगा मला ओळखून थेट माझ्या पुढयात उभा राहिला. खानाखुनांनीच आपली ओळख सांगत होता. त्याची आत्मीयता बघून ओळख पटायला मला वेळ लागला नाही. मी ही तेवढयापुरता त्याच्याशी मुक संवाद साधून पुढे गेलो. आता त्याच शॉपमध्ये जातो तेव्हा माझी नजर त्याला शोधते. मात्र, तो काही दिसत नाही. त्याने खूप आरोप्यागत वाटतं की त्या मुलाची आपल्यासोबत बोलण्याची एवढी ओढ होती. मात्र, आपण ती न ओळखता तुसडेपणाने वागलो याचं खूप वाईट वाटत होतं. 

           माझ्या दिल्लीतीतील वास्तव्यात (१४ वर्ष) मेट्रो ट्रेन आणि बस स्टॉप वर मुक -बधिर मुल-मुली दिसायची. त्यांचा आपसातील संवाद आणि आपल्याच जगात गुंतण्याचा व पर्यायाने समाजाने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवल्याचे अनेक प्रसंग बघितले आहेत.


    समाजाने अशा मुक मुलांना कायमच दिलेली दुय्यमपणाची वागणूक व अशा विपरीत परिस्थितीत आपले आभाळ शोधून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या अशा असंख्य मुला-मुलींचा हेवा वाटतो व त्यांच्याविषयी अपार आदरही वाटतो. जरी मुके असले तरी त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर घातलेल्या मायेच्या पाखरेतून ही मुलं आपलं आभाळ शोधण्यासाठी सतत संघर्ष करतात काहिंना ते गवसतं तर काहिंना गवसण्याआधीच मुक रहावं लागतं.

                    ००००


Friday, December 12, 2025

दिग्विजयी अर्जुन ; अनिरुद्ध अष्टपुत्रे सर


 

  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील ३० वर्षांच्या उत्कृष्ट कार्यकाळानंतर या वर्षाचा शेवटचा दिवसचं आपल्या शासकीय नोकरीचा समारोप अनुभवणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा महासंचालनालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे हे खऱ्या अर्थाने ‘आपण सारे अर्जुन’ या व.पुंच्या पुस्तकातील संकल्पनेनुसार दिग्विजयी अर्जुन ठरतात. 

   मुळात पत्रकारितेचा पींड असणाऱ्या अष्टपुत्रे सरांनी महासंचालनालयाची परीक्षा व मुलाखत दिली आणि ते  पुन्हा आपल्या पत्रकारितेत रममाण झाले. दोन वर्षांनी अंतिम निकाल लागला आणि १९९५ मध्ये ते अधिकारी म्हणून माहिती खात्यात रुजु झाले. तेंव्हापासून सुरु झालेला हा प्रवास सतत या विभागाला व त्यांनाही समृद्ध करीत गेला. जिल्हा माहिती अधिकारी आणि तब्बल ६ मुख्यमंत्री आणि १ उपमुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा हा प्रवास विशेष उल्लेखनीय ठरला. 

   मला सरांचा थेट सहवास लाभला नाही. मात्र, फोनवर बोलणे व्हायचे व व्हाट्अपच्या माध्यमातूनही संपर्कात असायचो. साधारणत: २०१५ साली घुमान (पंजाब) येथील ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या वेळी मला त्यांचा फोन आला आणि तत्कालीन राज्य शासनाला वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने तिथे आमच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे पंजाबी भाषेतील बॅनरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रदर्शनाबाबत त्यांनी माहिती घेतली. याबाबत मी केलेल्या बातमीचं त्यांनी कौतुक केलं. पुढे ठाणे जिल्हा माहिती अधिकारी असताना अंगणवाडी सेविकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या बातमीसाठी त्यांचा फोन आला. त्यांनी बातमीतील व्यक्तींची नावे आणि गावांच्या नावाबाबतही मला व्हाट्सअपद्वारे दुरुस्त्या सूचविल्या. पण, ते सांगतानाही या बातमीत चुकीची माहिती जायला नको एवढेच वाटते! अस, त्यांनी  त्यावेळी नमूद केल्याच आजही आठवतं. 

  पुढे, रशियाने युक्रेनवर हल्ला प्रारंभ केला आणि युक्रेनमधील भारतीयांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी दिल्लीस्थित  त्या त्या राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांनी दिल्ली विमानतळावरून विद्यार्थी व नागरीकांना स्वगृही पाठविण्याची मोहिम राबविली होती. महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र सदनाने हे कार्य हाती घेतले होते व त्याची सर्व प्रसिद्धीची धुरा महाराष्ट्र परिचय केंद्राने हाताळली व त्या व्यवस्थेचा मी एक भाग होतो. युक्रेनहून मध्यरात्री आलेले विमान व त्यातील महाराष्ट्राचे विद्यार्थी ही बातमी आम्ही मध्यरात्री ३ वाजता विमानतळाहूनच दिली. याबाबत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला अवगत करीत होतो. यावेळी अष्टपुत्रे साहेबांनी आमच्या टिमचे तोंड भरून कौतुक केले व तसा व्हाट्सअप संदेशही केला. 

     

  त्यांना सहकुटुंब दिल्लीला फिरायला यायच होतं त्यावेळी त्यांच्यासोबत फोनवर व व्हाट्सअपवर सतत बोलणं होत असे. त्यातून साहेबांच्या मृदू व प्रेमळ स्वभावाचं दर्शन घडलं. २०२२ मध्ये माझी पदोन्नती झाली तेंव्हाही साहेबांनी आवर्जून मेसेज करून अभिनंदन केलं. २०२३ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सरांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली. त्याचवेळी मला व्हर्टीगोचा त्रास सुरु झाला होता. अशात ते आस्थेनं माझी चौकशी करीत होते. त्यामुळे या त्रासातून बाहेर निघायला मदतच झाली. 

   आता समजून घेवूया ‘दिग्विजयी अर्जुन’ या त्यांना मी दिलेल्या बिरुदाविषयी. ‘कुरुक्षेत्र’ हे प्रत्येकाच्या आत असलेलं ताण-तणाव, जबाबदारी, ऑफिस पॉलिटिक्स आणि जीवघेणी स्पर्धा असते. या कुरुक्षेत्रावर ‘कौरव’ आणि ‘पांडवां’ पैकी एकाची निवड करण्याचा प्रसंगही येतो. नकारात्मक विचार, अहम्, आळस आणि भूतकाळ यांच्यापासून दूर राहणे म्हणजे कौरवांचा त्याग करणे आणि धैर्य, नितिमत्ता आणि प्रेम यांचा स्वीकार करणे म्हणजे पांडवांचा संग करणे होय. या प्रवासात शांत बुद्धी, विवेक आणि संयमरुपी कृष्णाचे मार्गदर्शन घेत पुढे जाण्याचा क्रम कुरुक्षेत्रावर यश रुपी दिग्विजयी अर्जुन ठरतो. हे सर्व वर्णन अष्टपुत्रे सरांबद्दल वरिष्ठांकडून ऐकलेल्या चांगुलपणाला चपखल बसते आणि म्हणूनच ते दिग्विजयी अर्जुन ठरतात. सर, आपणास सेवानिवृत्ती नंतर निरोगी व सुखी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!


0000

Saturday, November 22, 2025

मधु ; एक प्रवास पूर्णत्वाकडे



     ही घटना आहे साधारण 11 डिसेंबर 2014ची.परराज्यात युगल जोडप्याला फिरण्यास व निवासास अडचणी येऊ नये म्हणून लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नगरपरिषदेत विवाह प्रमाणपत्र बनविण्यात व्यस्त असलेले आम्ही. तिथल्या वेळखाऊ प्रोसिजरमध्ये एवढे व्यग्र झालो की सायंकाळी ७ वाजता अमरावतीहुन आपली ट्रेन आहे याचं भानच राहिल नाही. नगरपरिषद कार्यालय (परतवाडा) येथून विवाह प्रमाणपत्राच्या प्रत घेऊन आम्ही अचलपूरला (माझं गाव) आलो. बॅग आधीच भरल्या होत्या त्या घेतल्या व बसमध्ये बसलो आणि वलगावपर्यंत आल्यावर कळलं की आता आपल्याला अमरावती स्टेशनहून निघणारी अंबा एक्स्प्रेस ट्रेन कुठल्याही परिस्थितीत पकडता येणार नाही. म्हणून भात्यातलं ब्रम्हास्त्र उपसण्याचा निर्णय घेतला.अमरावतीच्या शेगाव नाक्यावर बस पोहोचली आणि माझी नवपरिणीत सहचारिणी सोनाली आणि मी दोघेही बसमधून उतरलो. तिथेच आमच्या दिमतीला एक स्कुटी येऊन उभी राहिली. स्कुटीच्या सारथ्यासाठी मी सज्ज झालो. सहचरणी, मी, ती आणि आमची आठवड्याभराची कपड्यांची बॅग या लवाजाम्यासह आम्ही  बडनेरा रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झालो. इकडे अमरावती स्टेशनहून अंबा रेल्वे गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली आणि आता आमची शर्यत याच रेल्वेगाडी सोबत होती. ती रुळावरून धावू लागली तर स्कुटीहून मिळेल ते सिग्नल तोडत रस्त्यावरील गर्दीला तुडवत आमचा प्रवास सुरू होता. (कृपया,असे वाहतूक नियम तोडू नये)

  (चित्र : ए.आय. साभार)

बडनेरा स्टेशन आलं. स्कुटी पार्क केली. माझ्या हाती बॅग, सहचरणीला प्रोत्साहन देत ,'पळा वहिनी पळा, वहिनी पळा'च्या ती आरोळ्या देत होती. आम्ही स्टेशनच्या फुटवेअर ब्रिजवर पोहोचलो आणि आमच्यासमोर आणखी एक मोठं संकट उभं ठाकलं. मोठ्या सायासान बडनेरा स्टेशनला सापडलेली अंबा रेल्वे आता रुळावरून निघाली होती. फुटवेअर ब्रिज व नंतर पायऱ्या उतरून ही ट्रेन पकडणे हे चॅलेंज चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा वेगळं नव्हतं.पण, ध्येय प्राप्तीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची आजपर्यंतची माझी धडपड इथेही काम करीत होती.ट्रेनकडे सरसावलो. बॅग स्टेशनवर खालीच ठेवली. ट्रेनच्या एसी डब्यात शिरलो व दारात उभा राहिलो. सहचारिणीला हात दिला आणि तिला डब्यात आत खेचलं. तिकडून आवाज आला, 'दादा बॅग राहिली ,ही घे बॅग!',तिने बॅग फेकली अचूक झेल घेऊन ती बॅग मी रेल्वेच्या डब्यात घेतली. गाडीने वेग घेतला तशी स्टेशनवर उभी असलेली ती आम्हाला दोन्ही हाताने अगदी मनापासून निरोप देत होती. यापूर्वी उल्लेख केलेलं हेच ते माझं ब्रम्हास्त्र 'मधु'. त्या दिवशी तिच्यामुळेच आमच्या हनिमूनच्या प्रवासाची इमारत ढासळता ढासळता सावरली. तीच आमची ,लाडकी मधु. 

      नुकताच 3 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा विवाह संपन्न झाला. तिच्याशी जुळलेलं हे नातं खूपच खास ठरलं. आम्ही दोघं आणि आमच कोकरू स्वरित असे तिघेही मधुच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण असणाऱ्या तिचा साखरपुडा, मेहंदी, हळदी, संगीत आणि विवाह या सर्व आनंदात सहभागी राहिलो. विवाह बंधनाच्या प्रवासातील हे सर्व प्रसंग अटेंड करण्याची ही माझ्या आयुष्यातली आजपर्यंतची पहिली वेळही ठरली आणि त्याच भाग्यही मधु मुळेच मिळालं. 

      दीर्घकाळ आजोळ,अमरावती, पुणे, दिल्ली असा प्रवास केल्याने आपल्या गोतावळ्यातील माणसांसोबत आनंदाचे क्षण एंजॉय करायला खूपच कमी वेळ मिळाला.अशा कमीवेळात युवा पिढीशी जुळलेल्यापैकी प्रतिनिधिक नातं म्हणजे मधुशी जुळलेलं एक छान नातं. खूप कमी वेळा मधुशी भेटणं झालं, या सर्व भेटीगाठींमध्ये जे आकलन झालं त्यातून उलगडणारा हा मधूचा पूर्णत्वाकडील प्रवास.

        बहुदा इंजिनिअरिंग करायला अमरावतीला असताना परिचय झाला मधुचा, तेंव्हा मी दिल्लीला होतो. लग्नापूर्वी एक छोटी शस्त्रक्रिया झाली माझ्यावर अमरावतीला त्यावेळेस आमच्या काकुंकडे एक-दोन दिवस मुक्काम होता माझा, तेंव्हा ही सगळी यंगिस्तान भावंड भेटली. या भावंडांच आपसातील ट्युनिंग वाखाणण्या सारखं होतं. राखी पौर्णिमा,भाऊबीज , वा. सी. काळे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमांचे आयोजन व त्यात या सर्वांचा आपल्या घरच्या सदस्यांबरोबर घडणारा मेळाही मला नेहमीच भावला. त्यात मधुही आपली स्पेस तयार करत मोठी होत गेली. आई शिक्षकीपेशात असल्याने 'मोहित' आणि 'मधू ' या दोघांच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. मग भविष्याचा विचार करता अमरावतीतच त्यांनी टुमदार घर बांधलं. याची रचनाही मुलांच्या मनाप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्यही आईने दिल होतच.

       इकडे मी, शासकीय नोकरीत रुजू झालो तेंव्हा घरच्यांनी छोटेखानी रोडगे पार्टी आयोजित केली होती आमच्या शेतावर. जवळच्या लोकांना बोलवलं होत तेंव्हा मधु आवर्जून आली होती. मग माझ्या लग्नातही हजेरी लावली तिने. 

     मधुच शिक्षण होत असताना करिअरकडेही तिचं पुरेपूर लक्ष होत. भावंड जस जशी वेगवेगळ्या क्षेत्रात झेप घेत होती तसा तिनेही आपला स्पेस शोधून काढला व कमावती झाली. आता तिचा आत्मविश्वास दुणावला होता. 'लग्न' या सुंदर नात्याच्या बंधणाला स्वीकारण्यासही ती सज्ज झाली. कांदे- पोह्यांच्या अनेक बैठकाही तिने अनुभवल्या. अन् तिच्या स्वप्नातला राजकुमार हा प्रथमेशरावांच्या रूपाने तिच्या आयुष्यात आला. पाहणीचा कार्यक्रम संपन्न झाला.साखरपुडा आनंदाने पार पडला. लग्नास अवकास असल्याने दोघांना एकमेकास समजण्यास थोडा अवधीही मिळाला.

       साखरपुडा व पुढे लग्नानिमित्ताने जमलेले सगळे आप्त स्वकीय व त्यांची बडदास्त राखण्यापासून आपली हौस- मौज पूर्ण करण्यातही ती सक्रिय होती. लग्नानिमित्त कराव्या लागणाऱ्या सर्व बारीक-सारीक बाबींच तिनं उत्तम नियोजन केलं. प्रत्यक्ष त्या जबाबदाऱ्या पार पाडत इतरांकडून ती कामे तिने नीट करून घेतली. मेहंदी, हळद आणि संगीत या तिन्हीच चोख नियोजन आणि या प्रसंगांचा पूर्ण आनंद ती घेत होती. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत संगीत कार्यक्रमात नवरी म्हणून भावी जोडीदार आणि सासरकडील मंडळी समोर मधुने दिलेले डान्स परफॉर्मन्स हे तर लाजवाब होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास पदोपदी झळकत होता.



     लग्नही वेळेत लागल व शानदार या शब्दाला साजेसा हा सोहळाही संस्मरणीय ठरला. तुडुंब गर्दीने खचाखच भरलेले मंगल कार्यालय व नवरी- नवरदेवास आशीर्वाद देण्यासाठी बराच काळ लागलेली लांब रांग मग सप्तपदी, कन्यादान व पाठवणी असा खूपच देखणा सोहळा कायमच डोळ्यात व मनात भरून गेला. 

        या उत्तम सोहळ्यानंतर आई आणि धाकट्या भावाने मधुला दिलेला निरोप आता फक्त तिच्या वडिलांच्या नसण्याची अपूर्णता दर्शवत होता. पण, आयुष्याची एक यशस्वी पारी पूर्ण करणारी लेक बघून तिचे वडीलही स्वर्गातून या लेकीचा अभिमानच बाळगत असतील यात तिळमात्र शंका नाही.

           मधुचा स्वतःला सिद्ध करण्याचा एकटीचा प्रवास आता संपला व जोडीदारासोबतचा प्रवास आता सुरू झाला आहे. माहेर व आप्त स्वकीयाकडून मिळालेल्या संस्काराच्या शिदोरीवर ती हा जीवनाचा सुंदर टप्पाही तेवढ्याच जबाबदारीने पार पाडेल, त्यासाठी 'मधु' तुला मनापासून शुभेच्छा!.

  आमची  आयर्नलेडी काकू

 इंजीनियरिंगच शिक्षण घेताना मधु आपल्या आत्याकडे वास्तव्यास होती. त्याच आमच्या आदरणीय व आयर्नलेडी काकु प्रतिभा नामदेवराव भुयार. काकुंमुळेच मधु नावाच्या या सालस पात्राचा आम्हाला परिचय झाला. एकामागून एक दुःखाचे प्रसंग ओढवले तरी जराही नडगमगता धैर्याने जीवनाची वाट चालत राहणारी 'आमची काकु' म्हणजे मायेची पाखर आणि स्वभावाने मऊ मेणाचा गोळा. काकुच आमचा कृतिशील आदर्श.सेवानिवृत्त झाल्या तरी सेवेत असणाऱ्या आम्हाला लाजवणारा उत्साह व दिनक्रम त्या अजूनही पाळतात. सतत नवनवीन शिकत राहतात. चांगुलपणाच्या विविध उपक्रमात सहभागी असतात. नातेवाईकांना सतत जोडून ठेवतात, त्यांच्या सुख दुःखात कायम सहभागी असतात. आम्हाला खूप माया लावतात. सर्वार्थाने ग्रेट असणाऱ्या आमच्या काकूंना प्रणाम करत या लेखनप्रपंचास विराम.

                 00000