Monday, December 29, 2025

आईला पर्याय नाही व नसेलही हे ठासून सांगणारे 'उत्तर'


‘आई’ विषयावर मोठ-मोठया साहित्यकृती जन्माला आल्या व त्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्यही गाजवले. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ घराघरात पोचली तर याच कलाकृतीवर तयार झालेला थोर साहित्यिक प्र.के.अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाने मराठीचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही पटकाविला. रंगभूमीवर ‘श्यामची मम्मी’ही आले. अन् आता सरत्या वर्ष २०२५ मध्ये (१२ डिसेंबर) क्षितीज पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी गीतकार व पटकथाकाराच्या पहिल्या-वहिल्या दिग्दर्शनात प्रदर्शित झालेला ‘उत्तर’ हा चित्रपट ‘आई’ या माणसाच्या जीवनातील अविभाज्य पात्राला ‘एआय’ चा पर्याय कसा असू शकत नाही हे ठासून सांगतो.

आजकाल सर्व क्षेत्रात जोरकसपणे सुरु असलेला एआयचा वापर आता मानवी नाती जपण्यासाठीही उपयोगात येईल की काय ! ही भिती बाळगणाऱ्या सर्वांसाठीच ‘उत्तर’ हा चित्रपट नवी दृष्टी देतो. दिग्दर्शकाने ही भिती दूर करण्यासाठी जगातील सर्वप्रिय नातं ‘आई’ व तिची माया हेच निवडलं ही त्यात एक जमेची बाब. चित्रपटाच कथानक पुण्याच्या एका जुन्या चाळीतील छोटयाशा फ्लॅट सदृष्य खोलीतून सुरु होतं. आणि महाविद्यालय व कोकणातील एक छोट गाव एवढयातच फिरतं. चित्रपटातील पहिला व शेवटचा सिन अगदी कट-टू-कट सूचक व म्हणूनच जबरदस्त झाला आहे.  

उमा महेश भालेराव या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील निवेदिका.पतीच्या निधनानंतर एकुलता एक लेक निनाद/नन्न्याची जबाबदारी त्यांच्यावरच येवून पडते. दोघा मायलेकांच्या संवादातून सुरु झालेली चित्रपटाची सुरुवात नन्न्याचं तारुण्य सुलभ मन व त्यात त्याला हवी असलेली प्रायव्हसी आणि आईला आपल्या मुलाला घडवण्याचा प्रवास व त्यात मुलाकडून मिळणारा तोडका प्रतिसाद अशा द्वंद्वात चित्रपट पुढं सरकत जातो. बाल वयापासून सोबत असणारी त्याची मैत्रिण आणि तो एका डिजीटल फेस्टसाठी प्रोजेक्ट तयार करण्याची प्रक्रियाही चित्रपटात आली आहे. नन्न्याला दर दोन तासाने फोन करून सतत त्याच्या काळजी पोटी सल्ला देणारी व घरात लहान सहान गोष्टीत त्याची काळजी घेणारी उमा एकदा चक्कर येऊन घराच्या जिन्यात कोसळते. आणि उपचारा दरम्यान कराव्या लागणाऱ्या विविध तपासण्यादरम्यान तिला आपल आयुष्य केवळ तीन-चार महिन्यात संपणार हे कळतं मात्र, ते नन्न्याला सांगण्याच धाळसंच करत नाही. अशात नन्न्याला आपला एआय प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आईच्या आवाजाची गरज असते व त्या निमित्त तो आई जवळ राहणार असतो यामुळे उमा सुखावते मात्र नन्न्या आपल्या प्रोजेक्टसाठीच तिच्या आवाजात तिच्या सूचना या प्राँप्ट म्हणून तयार करतो. अशात उमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या बहिणीकडे जाण्याची इच्छा होते व कोकणात बहिणीकडेच तिचे निधन होते. उमाचे उत्तर कार्य आटोपून नन्न्या घरी येतो. अशात चाळीतील शेजारी व त्याची मैत्रिण सांत्वणासाठी येतात पण त्याला सांत्वनेची गरज नसल्याचे त्याचे तुसडेपणाचे वागणेही मायलेकाच्या नात्यातील आगळाच विरोधाभास अधोरेखीत करते.

  आई नसली तरी नन्न्याला आता फारसा फरक पडत नाही. 'अनमिस' नावाचे एआय मॉडेल तयार केल्याने तो आता घरात उपमा बनवण्यापासून सर्व प्राँम्ट देवून उमाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजकडून त्याचा प्रोजेक्टची निवड होताना परिक्षक दुसऱ्या परिक्षकाला सांगतात की याची आई गेली आहे नुकतीच त्यावर नन्न्या म्हणतो की ,माझ्या टॅलेंटहून मला जज करा माझ्या परिस्थितीहून नाही. हा डायलॉग प्रेकक्षकांना चटका लावून जातो पुढे आईच्या एका पत्रातूनच नन्न्याला अनमीसमधील अपडेट सुचते व त्याच्या जोरावरच त्याचा प्रोजेक्ट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरतो. अर्थात नन्न्याला उमाची गजर वाटत नाही मात्र त्याच्या यशाची प्रेरणाही उमाच असते हेही क्षितीज पटवर्धन यांनी सुजान प्रेक्षकांना या कलाकृतीतून दाखविले आहे.

‘आई’ शब्दाला साधर्म्य असणारा ‘ए, आय’ हा आईला हाक मारणारा ग्रामीण महाराष्ट्रातील शब्द कायम पर्याय असू शकतो मात्र, आधुनिक तंत्रज्ञानातील कृत्रिक बुद्धीमत्ता अर्थात ‘एआय’ हा पर्याय ठरू शकत नाही, हे या चित्रपटातील शेवटचं दृष् सूचवतं. ज्यात नायक चाळीत भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करताना पिशवी सोबत नसल्याने सवयी प्रमाणे गच्चीकडे पाहून आईला पिशवीसाठी हाक मारतो. मात्र, आई सोडून गेल्याची जाणीव होत असताना गच्चीतून आई जी पिशवी भिरकवायची ती पिशवी दिसते. यावेळी नायकाला आईसोबतचा संवाद आठवतो, ‘आई तुला वारा का ग आवडतो?’ त्यावर तीच मार्मीक उत्तर की ‘तो आपल्या प्रिय लोकांची आठवण करून देतो’ अस आठवत असतानाच गच्चीतील पिशवी वाऱ्याने खाली थेट नायकाच्या हातात पडून जाते व इथेच चित्रपट संपतो. 

चित्रपटाची तांत्रिक बाराखडी उत्तम जमली आहे. पहिल्या फ्रेमपासून जनसंवादातील प्रभावी संवाद घडविण्याची किमया कॅमेरातून साधली आहे. बर्गर,कोंड्रींक, उपमा ते कोकणातील जेवणाची थाडी आणि हापूस आंब्यांचा चित्रपटातील यथोचित वापर सांस्कृतिक गुंफण दर्शवितो.चित्रपटातील एकमेव गीत आणि तेही रटाळवान होणार नाही त्यातच कथानक पुढे सरकत जाईल याची काळजी घेण्यात आली आहे.चाळीतील जीवन व त्यातील पात्रही उत्तम रेखाटली आहेत.'एआय' शी संबंधित सर्व आज्ञावलीचा उत्तम अभ्यास करून दिग्दर्शकाने हा विषय खूपच बखुबी मांडला आहे .गंभीर विषय अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या गळी उतरवताना बहुतेक वेळा प्रेक्षकांचा कंठ दाटून येतो. हिच काय ती या चित्रपटातील उनीव म्हणून बळजबरीने बोट ठेवावं अशी बाब.

ही कथा एकल महिलेच्या भावनिक संघर्षाची जेवढी म्हणून वाटते त्यात ती एकल पाल्याच्या भावनांचा विचार करणारी व त्यालाही झुकत माप देणारी वाटते. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांचा प्रश्न मांडणारा हरिष इथापे दिग्दर्शीत आणि श्याम पेठकर यांच्या पटकथा लेखनातील ‘तेरवं’ चित्रपटही बघितला.विदर्भातील कलाकारांना घेऊन केलेला तो आगळा प्रयोग होता.त्या चित्रपटाला तेवढे व्यावसायीक यश मिळाले असेल असे जाणवत नाही.पण एकापेक्षा एक सरस गाणी,पटकथा,रंगभूमीवरील नाटकं देणारा क्षितिज पटवर्धन यांचा चित्रपटातील पहिला प्रयोग नक्कीच यशस्वी झाला म्हणता येईल. नागपुरातील तीन सिनेमागृहात सतत आठवडाभर दिवसाला आठ शो हाऊस फुल्ल झाल्याचा व मलाही प्रयत्न करताना तिसऱ्या दिवशी तिकीट मिळालं यातच काय ते चित्रपटाच्या यशाचं गमक सांगता येईल.मात्र,विविध सामाजिक परिस्थितीशी झगडत असलेल्या एकल महिलांचा प्रश्नही समाजाच्या डोळयात अंजन घालण्याचे काम करतो व समाजाला आरसाही दाखवतो.

उमा भालेरावांच्या रुपाने रेणुका शहाणे यांनी रंगवलेली ‘आई’, आपल्या आई-वडिलांचा कलेचा वारसा लाभलेला अभिनय बेर्डे याने अप्रतिम अभिनयातून रेणुका शहाणे  आणि निर्मिती सावंत यांच्या सोबत दिग्गज अभिनय केला आहे.ऋता दुगुळेनेही नन्न्याच्या मैत्रिणीची भूमिका सुंदरपणे वठविली आहे. 

या चित्रपटाचा पटकथाकार व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन हा माझा पुणे विद्यापिठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन अभ्यासक्रमातील बॅचमेट.मध्यंतरी दिल्लीत त्याची सपत्नीक भेट झाली होती. यशोशिखरावर असताना त्याने अजुनही  आपल्यातील माणूसपण जपल आहे. त्याची पत्नी प्राचीही त्याची बेस्‍ट मॅच आहे.असो, तर क्षितिजच्या चित्रपट दिग्दर्शनातील या पहिल्याच अफलातून प्रयोगाने मित्र म्हणून त्याचा खूप हेवा व आदर वाटतो.मित्रा मराठी चित्रपट सृष्टीला समृद्ध करण्यात तुझा मोलाचा वाटा ठरो याच शुभेच्छा !

                                 000000   

 

2 comments:

  1. खूप छान लिहिलं आपण. हा विषय अगदी वेगळा आहे. त्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. फक्त एक सांगावे वाटते. तेरव चित्रपटाची कथा अतुल पेठकर नव्हे तर श्याम पेठकर यांची आहे. श्याम ने आधी या नावाने नाटक लिहिले नंतर त्यावर चित्रपट आला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद,सर. आपल्या सूचनेप्रमाणे दुरुस्ती केलीये.

      Delete