त्याने आईच्या हातातील 'आपली बस' ची (नागपूर मनपा संचालीत सिटी बस सेवा) तिकीट घेतली आणि त्यातील आकडयांना तो जेमतेम तीन वर्षांचा चिमुरडा डोळयांशी साधर्म्य दाखवून आईला खुनावत होता. तो सांगत होता या तिकीटावरील वेटोळे आकडे हे माणसांच्या डोळयाप्रमाणे आहेत. पुढे आई मुलातील हा संवाद माझ्या सारख्या बस प्रवाश्याला खुपच सुखावून गेला. त्यात ते खटयाळ बालक आईला खुनावून सांगु लागलं ही तिकीट फेकु का गाडीच्या बाहेर? त्यावर त्याची आई सांगत होती बाळा ही एसी गाडी आहे आणि त्याच्या खिडक्याही बंदिस्त आहेत तुला तिकीट नाही फेकता येणार. हा मुलगा ‘मुक’ होता पण त्याच्या आईची मायेची पाखर यत्किंचितही कमी जाणवत नव्हती. गाडीतून उतरताच आईचा हात धरत हा मुलगा शेजारच्या गाडीवरील समोशाकडे अंगुली निर्देशकरीत आईला समोसा मागण्याचा हट्ट करत होता एवढयात आईने त्यास नकार देत पुढची वाट धरली. हा सर्व प्रसंग बघत असताना मला, जन्मत: मुक मुलांच्या जगण्यातील प्रश्नांबाबत थोडावेळ विचार मनात आला. आणि मग बराचकाळ यावर चिंतनही केल.
आमच्या अचलपुरातील(माझं गाव) दानाखोरीभागात असाच एक अंबाडकरांचा मुलगा होता नाव ‘अनिल’ त्याची प्रतिकृती डोळयासमोर आली. आणि त्याला लोक त्याच्या नावाने न ओळखता ‘मुका’ या नावाने संबोधित असत हेही ठळकपणे आठवलं.सदरा-पायजामा अन् कधी पँट-शर्ट घालनारा हा तरुण आपल्या वडिलांसोबत शेतीची काम करीत असे. शेतीच्या कामात तो उजवाच होता. काही सार्वजनिक कार्यक्रमातही तो सहभागी असे हे पुसटस आठवतं. पण, सामान्य मुलांच्या तुलनेत तो मुलगा चेष्टेचा विषयच जास्त ठरत असे हे मला आठवते. पुढे लग्नही झालं मात्र, समाजाच्याच अवहेलनेतून त्याने विष प्राषण करून आयुष्य संपविल्याचे कळले.
आजोळी माझा चुलत मामा हिंमतराव पोटदुखे यांचा मुलगाही मला आठवतो. एका-पाठोपाठ मुलीच जन्माला येताहेत म्हणून मुलाच्या आशेवर असणाऱ्या हिमंतरावांना तिसरी संतती झाली, नाकी-डोळी अगदी चांगला असणारा व आईप्रमाणेचा गौर वर्णीय मुलगा 'सुयोग' जन्मत: मुक होता. त्यामुळे पुत्र प्राप्तीने सुखावणाऱ्या हिंमतरावांची हिमंत मात्र मुक मुलगा स्वीकारताना खचली असेल. विशेष मुलांच्या शाळेत गावापासून जवळपास ७ते८ कि.मी. अंतरावर (कापूसतळणी) या मुलाला शालेय शिक्षण पूर्ण करावं लागलं. काल परवा अमरावतीच्या तापडीया मॉलमधील रिलायंस ट्रेंड शॉपमध्ये अटेंडंस म्हणून काम करणारा हा मुलगा मला ओळखून थेट माझ्या पुढयात उभा राहिला. खानाखुनांनीच आपली ओळख सांगत होता. त्याची आत्मीयता बघून ओळख पटायला मला वेळ लागला नाही. मी ही तेवढयापुरता त्याच्याशी मुक संवाद साधून पुढे गेलो. आता त्याच शॉपमध्ये जातो तेव्हा माझी नजर त्याला शोधते. मात्र, तो काही दिसत नाही. त्याने खूप आरोप्यागत वाटतं की त्या मुलाची आपल्यासोबत बोलण्याची एवढी ओढ होती. मात्र, आपण ती न ओळखता तुसडेपणाने वागलो याचं खूप वाईट वाटत होतं.
माझ्या दिल्लीतीतील वास्तव्यात (१४ वर्ष) मेट्रो ट्रेन आणि बस स्टॉप वर मुक -बधिर मुल-मुली दिसायची. त्यांचा आपसातील संवाद आणि आपल्याच जगात गुंतण्याचा व पर्यायाने समाजाने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवल्याचे अनेक प्रसंग बघितले आहेत.
समाजाने अशा मुक मुलांना कायमच दिलेली दुय्यमपणाची वागणूक व अशा विपरीत परिस्थितीत आपले आभाळ शोधून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या अशा असंख्य मुला-मुलींचा हेवा वाटतो व त्यांच्याविषयी अपार आदरही वाटतो. जरी मुके असले तरी त्यांच्या पालकांनी त्यांच्यावर घातलेल्या मायेच्या पाखरेतून ही मुलं आपलं आभाळ शोधण्यासाठी सतत संघर्ष करतात काहिंना ते गवसतं तर काहिंना गवसण्याआधीच मुक रहावं लागतं.
००००




No comments:
Post a Comment