Wednesday, December 31, 2025

डॉ. पाखमोडेंच्या निधनाने देव माणूस गेला





         कित्येक वेळा शोक संदेश व शुभेच्छा संदेश लिहिण्याचे प्रसंग आलेत. त्यात सतत येणारे शब्द लिहित गेलो. पण, आज स्वतः प्रचिती घेऊन एका तज्ज्ञ डॉक्टरांविषयी हे शब्द तंतोतंत खरे ठरतात हे अनुभवातून सांगू शकतो. नागपूर येथील सुप्रसिद्ध मेंदू व मज्जारज्जू शस्त्रक्रिया तज्ज्ञ (न्यूरोसर्जन) 
तथा न्युरॉन हॉस्पीटलचे संचालक  डॉ. चंद्रशेखर पाखमोडे हे खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवन देणारे माणसातील 'देव' होते. त्यांच्या अकाली निधनाने असंख्य रुग्णांचे व पर्यायाने समाजाचे नुकसान झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात विरळा असणाऱ्या कुशल व संवेदनशील व्यक्तिमत्वाचा आदर्श वस्तुपाठ होते डॉ.पाखमोडे. त्यांनी आमच्या साळभावाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढले व आमच्या प्रमाणेच असंख्य रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ते 'देव' ठरले आणि 'मरावे परी किर्ती रूपे उरावे.' या म्हणीलाही तंतोतंत खरे ठरणारे व्यक्तिमत्व ठरले.

         ही घटना आहे १८ जून २०२५ च्या मध्यरात्रीची. एका अपघातात गंभीर जखमी झालेले माझे साळभाऊ श्री. प्रकाश मसने हे घटना स्थळापासूनच कोमात (निश्चेतनावस्था) होते. तीन दिवस सतत उपचार सुरू असताना सर्वांच्या सल्ल्याने आम्ही त्यांना नागपूरच्या धंतोली भागातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केल. मध्यरात्री आयसीयुमध्ये दाखल केल्यावर आमच्या रुग्णाला क्लीन सेव्ह पासून व्हेंटिलेशन आणि औषधोपचार सुरु झाला आणि आवश्यक ती औपचारीक कागदोपत्री कार्यवाही पार पाडून आम्ही आयसीयुमधून बाहेर पडलो. सकाळ झाली आणि ७.३० ते ८.०० वाजेदरम्यान लाल भडक रंगाची जग्वार कार स्वत: ड्राईव्ह करत न्युरॉनच्या मुख्य गेटवर गाडी थांबली आणि त्यातून राजबींड व्यक्त्तीमत्व गाडीतून बाहेर पडले तसेच आजु बाजुचे लोक म्हणू लागले डॉक्टरसाहब आ गये. अन् आम्हीही आयसीयुकडे आमच्या पेशंटच्या बाबतीत जाणून घ्यायला निघालो. ५व्या माळयावरील आयसीयु समोर आमच्या प्रमाणेच अन्य रुग्णांचे नातेवाईक उभे होते. डॉक्टर साहेब नेहमीच्या ‍‍शिरस्त्याप्रमाणे हॉस्पिटलच्या पहिल्या माळयावरील गणपतीच्या मंदिरात दर्शन व स्त्रोत्र पठण करून थेट ८व्या माळयावर पायऱ्या चढून गेले व तसेच ते रुग्ण तपासून ५व्या माळयावर आले. स्वत: आयसीयुमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर नातेवाईकांना बोलवल गेल तसे आम्ही आत गेलो. तेव्हाच डॉ. पाखमोडे यांचा पहिला परिचय झाला. त्यांनी आमच्या रुग्णासमोरच आम्हाला सांगितल, “रुग्ण अत्यवस्थ आहे,एमआरआय करावा लागेल त्यानंतरच शस्त्रक्रिया करावी लागेल किंवा कसे हे ठरवता येईल” एवढ बोलून ते निघून गेले. सायंकाळी एमआरआय झाल्यावर त्यांनी आयसीयुमधील संबंधित डॉक्टरला रिपोर्ट बद्दल सांगितले व आम्ही त्यांच्याकडून समजून घेतले तेव्हा कळले की आमच्या रुग्णाच्या एमआरआय रिपोर्ट नुसार शस्त्रक्रिया करावी लागणार नाही . दुसऱ्या दिवशी डॉ.पाखमोडे यांनी सांगितले शस्त्रक्रिया करावी लागणार नाही ही बाब आश्वासक आहे मात्र मेंदूवर सुज आहे त्यामुळे धोका टळलेला नाही.   

     मग दुसऱ्या दिवसापासूनच कोमामध्ये असतानाही आमच्या पेशंटला न्युरो फिजीओ थेरपी सुरु करण्यात आली व हळू-हळू तब्येतीत सुधारणा होत होती. अखेर आठवडाभऱ्याने आमच्या पेशंटने डोळे उघडले व आयसीयुमधून आम्ही बाहेर आलो अशात न्युरो फिजोओ थेरपी सुरुच होती. दररोज डॉक्टरसाहेबांचा आयसीयु आणि वॉर्डमधील राऊंड व त्यांच्याशी आमच्या पेशंटच्या तब्येती बद्दल बालेण व्हायचं. आमच्या पेशंटच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, त्यांची स्मृती आली नव्हती. हळू हळू स्मृती येईल, औषधी व प्रत्यक्ष पेंशटची काळजी घेवून पेशंट बरे होण्याचे प्रमाण वाढेल असा विश्वास त्यांनी दिला व आमच्या पेशंटला डिस्चार्जही दिला. मग दर महिन्याला नागपूरला येवून डॉक्टरसाहेबांची ओपीडी व त्यातील त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व उपचार सुरु आहेत मागील भेटीत त्यांनी सांगितले की तुमचे पेशंट ९५ टक्के बरे झाले आहेत,दोन वर्षांनी एमआरआय करू तेव्हा त्यांना सुरु असलेल्या काही अनिवार्य गोळया सुरु ठेवायच्या की कशा ते ठरवू. येत्या २०२६च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडयात डॉक्टर साहेबांकडे तपासणीसाठी यायचे होते. पण ३१ डिसेंबर २०२५लाच ते या जगाला अलविदा करून गेले. आणि आमच्या पेशंट प्रमाणे असंख्य पेंशटला आपल्या कुशल उपचारापासून पोरके करून गेले. दूर दूरहून आलेले रुग्ण येथे डॉक्टरांच्या उत्तम उपचाराने व त्यांच्या संवेदनशील स्वभावाने बरे होवून घरी जात असल्याची प्रचिती आम्ही घेतली.

 ‘न्युरॉन’ हे मध्यभारतातील मेंदू व मज्जारज्जू संबंधित आजारावरील सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे. मार्च २०१४ मध्ये डॉ. चंद्रशेखर पाखमोडे आणि मेंदू शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गिरी यांनी सुरु केलेल्या या हॉस्पिटलमध्ये विदर्भ आणि मध्यप्रेदश,छत्तीसगड,राजस्थान या राज्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. अत्यंत क्लिस्ट अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून कित्तेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अपघातात मेंदूला मार लागून गंभीर प्रकृती झालेले रुग्ण येथे बरे झाल्याचे असंख्य उदाहरण आहेत. 


डॉ.पाखमोडे यांनी स्वत:ला आपल्या व्यवसायात एवढे व्यस्त करून घेतले होते की त्यांच्या दिवसाची सुरुवात धंतोली पोलीस स्टेशन शेजारील न्युरॉन हॉस्पिटल मधील रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठीच्या राऊंड पासून होत असे. मग आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियाही होत असत आणि त्यांची ओपीडी ज्यात साधारण किमान २०० रुग्णांचा समावेश असे ती ओपीडी कधी कधी सायंकाळी ७ वाजता सुरु होवून रात्री उशिरापर्यंत चालत असे. स्वत:ला झोकून रुग्णसेवेचे व्रत सांभाळणारे डॉ.पाखमोडे आज या जगात नाहीत. मात्र, जग सोडून जाण्याचं हे त्यांच वय नव्हतं अजून त्यांच्याकडून रुग्ण सेवा घडून असंख्य रुग्णांचे प्राण वाचले असते.पण, प्रकृतीला ते मान्‍य नव्हतं.आज सकाळीच हृदय विकाराच्या धक्याने त्यांचे निधन झाल्याची वार्ता धडकली. समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती. ज्या रुग्णांना त्यांनी प्राणदान दिले त्यांना ही वार्ता कळताच त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनाही हा दुख:द धक्का बसला.

 दुपारी नागपूर ग्रामीण मधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलण झालं. त्यांनी सांगितलं की ,'डॉक्टरसाहेब हे शिवाजी सायन्समधील व पुढे जीएमसी अर्थात नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांचे बॅचमेट आहेत'. डॉक्टरसाहेब मनोभावे रुग्ण सेवा करतात. कदाचित कामाच्या ताणाने त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला असेल असे त्यांचे म्हणने होते. आमच्या नातेवाईकांनीही सकाळी डॉक्टर साहेबांच्या निधनाची वार्ता कळवली व एवढे तज्ज्ञ डॉक्टर व आपल्यासाठी देव माणूस ठरलेले डॉक्टर साहेब जाण्याचे दु:ख व्यक्त केले. योगा शिकवणाऱ्या आमच्या नातेवाईकांनी तर योगाक्लास मध्ये डॉ.पाखमोडे यांना श्रद्धांजली वाहिली.

         डॉ. पाखमोडे हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील लाखनी (सलोटी)  येथील निवासी. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (मेडिकल ) एमबीबीएस आणि एम.सी.एच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयातून न्यूरोसर्जरीचे उच्च शिक्षण घेतले. नागपूर येथील मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पाच वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांनी ‘न्युरॉन’ ची स्थापना केली.३१डिसेंबर २०२५ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले तेथे सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान त्यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी डॉ. मनिषा, मुलगा डॉ. अद्वैत आणि मुलगी अनन्या असा परिवार आहे.

    नागपुरातील मोक्षधाम येथील दहनघाटावर गेलो इथेही वैद्यकीय, राजकीय, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य जनतेची अलोट गर्दी होती त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूकही ठप्प झाली होती. इथे पोचलो  तेव्हा दहनघाट कार्यालयातील  कर्मचारी सांगत होता, 'अरे कल रात को तो डॉक्टर साहब ने मेरी बिटिया को पढाया मेरी बेटी डॉक्टरी पढ रही है. दुसरा कर्मचारी म्हणाला,'बहुत होशियार डॉक्टर थे वे ओर भले आदमी भि. सुबह मेरा भाई रास्ते से गुजर रहा था तो रास्ते में डॉ. पाखमोडे सर की कार उसे क्रॉस हुयी थी'. तत्पूर्वी, रामदास पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी जात असताना वाटेत काही व्यक्तींचा घोळका क्रॉस झाला. त्यातील एक व्यक्ती म्हणाले, ‘जिसने जान बचायी ऐसे डॉक्टरसाहब का अंतिम दर्शन लेने आये है हम’. त्याच भावना माझ्याही होत्या. डॉक्टरसाहेब आता कधीच भेटणार नव्हते. पण त्यांच अंत्यदर्शन घेवून आम्हा नातेवाईकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञभाव व्यक्त करण्यासाठी मीही गेलो होतो. येथील हॅप्पीहाईट अपार्टमेंट खाली सर्व शोकाकुल जनतेची गर्दी दिसली. गर्दीत पुढे गेलो तेव्हा डोक्यावर कुंकवाचा टिळा आणि अंगात डॉ. चंद्रशेखर पाखमोडे लिहिलेल्या न्युरॉन हॉस्पिटलच्या ॲप्रॉनमधील डॉक्टरसाहेब फक्त झोपले आहेत असच वाटत होतं, बाकी त्यांचा चेहरा तसाच निर्विकार होता.आपल्या रुग्णसेवेचा आदर्श कायम समाजासमोर राहील व त्यातून वैद्यकीय क्षेत्र अधिक बळकट होत राहिल असे म्हणताना रुग्णांची आस्थेने विचारपुस करणारा व त्यांना आदरयुक्त वागणूक देणारा डॉ. पाखमोडे सरांसारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही अशा प्रांजळ भावना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
                 ००००००

 

 

 

No comments:

Post a Comment