Wednesday, April 4, 2018

मोठी उपलब्धी




 

           मोठी उपलब्धी : माननीय राष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलसाठी मराठी अनुवादाची संधी व तीच सोनं.

दिनांक २० मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती भवनातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विशेष कार्य अधिकारी अंकीत जैन यांचा दूरध्वनी आला तो मीच उचलला. त्यांनी विचारले आपले साहेब आहेत का? मी, लगेच त्यांना आमच्या कार्यालय प्रमुखांना दूरध्वनी जोडून दिला. थोडयात वेळात कार्यालय प्रमुखांनी मला बोलवून घेतले व सांगितले, राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात पद्मपुरस्कार प्रदान करण्यात येत असून त्यांनी महाराष्ट्रातील महोदयांसंदर्भात इंग्रजी ट्विट तयार केले आहेत. तेव्हा आपल्या कार्यालयास ते ट्विट मराठी भाषेत अनुवाद करावयास सांगितले आहेत, हे काम तू व्यवस्थितपणे कर. मग काय मराठी ट्टीट तयार आणि साहेबांच्या OK शे-यानंतर राष्ट्रपती भवनास पाठविले ट्वीट आणि त्या दिवशी राष्ट्रपती महोदयांच्या ट्विटर हँडलहून ते  ट्विट प्रसारीत झाले. दिनांक २ एप्रिल २०१८ रोजीही दुस-या टप्प्यातील पद्मपुरस्कार वितरणाच्यावेळी राष्ट्रपती भवनातून अशाच सूचना प्राप्त झाल्या व ठरल्या प्रमाणे मला कार्यालय प्रमुखांचा आदेश झाला व मिशन फत्ते. याठिकाणी राष्ट्रपती भवनातून प्राप्त इंग्रजी ट्विट व त्याचा अनुवाद आणि प्रत्यक्ष राष्ट्रपती महोदयांच्या  ट्विटर हँडलहून प्रसारीत झालेले ट्विट देत आहे.
 20 March 2018

Dear Sir,

As discussed, request you to kindly translate the tweets below into Marathi. Also check that the translated tweet does not exceed the 280 character limit. 

President Kovind presents Padma Vibushan to Ustad Ghulam Mustafa Khan in the field of music. Doyen of the Rampur-Sahaswan Gharana, he is a Hindustani classical singer, music director, scholar and teacher to a long list of notable singers
संगीत  क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  #राष्ट्रपतीकोविंद यांनी  रामपूर साहसवान घराण्याचे गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना  #पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हिंदुस्तानी शास्रीय गायक,संगीत दिग्दर्शक, संगीत तज्ज्ञ  व अनेक नामवंत गायकांचे गुरु म्हणून ते‍ विख्यात आहेत.
  
#PresidentKovind presents Padma Bhushan to Pandit Arvind Parikh in the field of Art (Music). A sitarist and cultural ambassador of Hindustani classical music, Pandit Parikh is former Vice President of UNESCO's International Music Council
#राष्ट्रपतीकोविंद यांनी संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंडित अरविंद पारिख यांना #पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.  सतारवादक व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे राजदूत अशी ओळख असणारे पंडित पारिख  यांनी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
#PresidentKovind presents Padma Shri to Dr Abhay Gang and Dr Rani Bang in Medicine. The duo transformed healthcare in Gadchiroli, Maharashtra, over 30 years. Their home-based newborn care model significantly reduced infant mortality and was adopted for pan-India roll out 
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ३०वर्षांहून अधिक काळ बंग दाम्पत्यांनी #गडचिरोली जिल्हयात आरोग्यसेवा प्रदान केली. नवजात शिशु संगोपणाचे त्यांचे मॉडेल बालमृत्यू रोखण्यात प्रभावी ठरले आहे.

                                                    2 April 2018
President Kovind presents Padma Shri to Shri Rameshwarlal Kabra Trade & Industry. An industrialist known for his work in rural and especially tribal India, he is part of ‘Friends of Tribal Society’ which has set up 30,000 Ekal Vidyalayas providing free education to 8 lakh children 

व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री रामेश्वरलाल काबरा यांना #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी च्या माध्यमातून त्यांनी तीस हजार एकल विद्यालये स्थापित करून आठ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले आहे.
 

President Kovind presents Padma Shri  to  Dr Gangadhar V. Panatawane for Literature & Education. A Marathi writer and pioneer of the Dalit Literary Movement, he is the founder of journal 'Asmitadarsh' among the first literary and cultural platforms of Dalit expression 
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी डॉ. गंगाधर पानतावणे (मरणोत्तर) यांना #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मराठीतील नामवंत साहित्यिक व दलित साहित्य चळवळीचे ते अग्रणी होते, त्यांनी अस्मितादर्श  नियतकालिक सुरु करून दलितांचा आवाज बुलंद केला.   

President Kovind presents Padma Shri to Shri Manoj Joshi. A versatile theatre, TV and film actor in Gujarati, Marathi & Hindi. He is famous for essaying the role of Chanakya on TV

बहुआयामी कलावंत श्री मनोज जोशी यांना कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी #राष्ट्रपतीकोविंद यांनी #पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. श्री.जोशी हे गुजराती,मराठी व हिंदी रंगभूमी,टीव्ही व चित्रपट क्षेत्रातील प्रसिध्द कलावंत असून टिव्ही वरील चाणक्य च्या भूमिकेसाठी ते प्रसिध्द आहेत.

Warm regards,
Ankit Jain
OSD (Communication)
President's Secretariat
Rashtrapati Bhavan
New Delhi-110004
+91-9711275197 | ankit.jain@rb.nic.in
                    
                                                                          ********






















Friday, March 16, 2018

राजधानीतील शिवजयंती : अनुपम्य व ऐतिहासिक सोहळा
































सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८ 

जाणता राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह समस्त जगासाठी एक मानबिंदू. आदर्श राजा म्हणून छत्रपतींनी घालून दिलेले मानदंड आजही संपूर्ण देशालाच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक ठरावे असेच आहेत. छत्रपतींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी व त्यांच्या शौर्यातून बोध घेण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम साजरा होतो. मात्र राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत यावर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान दिल्लीत आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे अनुपम्य व ऐतिहासिक सोहळा ठरला.

संसद भवन व महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन, छत्रपतींचा पाळणा, पालखी, भव्य शोभायात्रा, राष्ट्रपती महोदयांची मुख्य कार्यक्रमात उपस्थिती व ‘शिवगर्जना’ महानाट्याचा प्रयोग हे या ऐतिहासिक सोहळ्याचे खास वैशिष्ट्य.
संसद भवनाच्या आवारात छत्रपतींना अभिवादन
शिवजयंतीची पहाट संसद भवनासाठीही ऐतिहासिक ठरली. सन २००३ मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत संसदेच्या अवारामध्ये २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ वर्षात शिवजयंतीदिनी येथील छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रमच झाला नव्हता. त्यामुळेच यावर्षी येथील छत्रपतींच्या पुतळ्यास छत्रपतींचे १३ वे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुष्पहार घालून मानवंदना दिली. सोबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही छत्रपतींना अभिवादन केले आणि हा ऐतिहासिक क्षण ठरला. 

शिवभक्तीमय महाराष्ट्र सदनाचे देखणे रूपडे 
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाचा परिसर शिवभक्तांच्या गर्दीने ओसंडून निघाला होता. हजारोंच्या संख्येने केसरी फेटा, कुर्ता आणि पायजमा परिधान केलेले तरुण व वयस्क आणि नऊवारी, नथनी, अंबाडा व केसरी फेटाधारी तरूणी-महिला. सोबतीला ‘जय भवानी जय शिवाजी’ या गर्जनेने निनादून गेलेला अवघा आसमंत. महाराष्ट्र सदनाचा परिसर पूर्णपणे शिवभक्तीमय झाला होता. सदनाच्या सभागृहात शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

भव्य शोभा यात्रा
महाराष्ट्र सदनातून यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे, मावळे, नऊवारी साडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी ‘जय भवानी जय शिवाजी’अशा गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारीसमोर वेषभूषेतील अष्‍टप्रधान मंडळ आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता. ज्ञानोबा-तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा उत्साह शोभून दिसत होता. याच शोभा यात्रेत दोरखंडावर विविध आसने सादर करणाऱ्या नऊवारीतील मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारी मुले, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझीमवर सर्वांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभायात्रेचा येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर समारोप झाला.

शोभा यात्रेतील शिवभक्तांचा उत्साह इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातही कायम होता. दुपारी शोभा यात्रेच्या समारोपानंतर येथे रक्तदान शिबीर व त्यात तरूणांचा सहभाग तसेच ढोल व झांज पथकांचे प्रात्यक्षिके, वासुदेव, गोंधळ-वारकरी- दिंडी-लेझीम या लोककलांच्या सादरीकरणाने येथील वातावरण महाराष्ट्रीय संस्कृतीत न्हाहून गेले होते.

राष्ट्रपती महोदयांची उपस्थिती
राजधानीतील शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती म्हणजे या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणारे ठरले. राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व उपस्थितांना संबोधित करताना छत्रपतींचे वैविध्यपूर्ण कार्य अधोरेखीत केले. राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे भव्य आयोजन व या सोहळ्यात खास पेहराव जणू दिल्लीत मिनी कोल्हापूर अवतरल्याचा अनुभव देत आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी उपस्थितांचे कौतुक केले. या कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यासंदर्भात आपल्या भाषणात विशेष उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे आता राष्ट्रपती भवनातील उणीव भरून निघाली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, श्री शाहू छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. तर प्रेक्षकांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु उपस्थित होते.

दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान येथे ३०० कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगर्जना या महानाट्याचे सादरीकरणही झाले. एकंदरीतच राजधानी दिल्लीतील हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्यदिव्य सोहळा व त्यातून दिल्ली व परिसरातील मराठी माणसांचा दिसून आलेला एकोपा छत्रपतींच्या दिव्य व्यक्तीमत्वातून सर्वांना स्फूर्ती देऊन गेला, म्हणूनच हा सोहळा अनुपम्य व ऐतिहासिक ठरला.

-रितेश मोतीरामजी भुयार,उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.






Wednesday, February 7, 2018

दिल्लीतील पहिले वहीले कीर्तन आणि विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव




                         २००५ नंतर २०१७ मध्ये आषाढी एकादशी काळात पहिल्यांदा गावी केलेले कीर्तन आणि त्याचे फेसबुकहून लाईव्ह प्रसारण केल्याने खूप जणांना माझ्या या गुणांचा परिचय झाला त्यावेळी शुभेच्छांचा अक्षरष: पाऊस पडला. याच फेसबुक लाईव्ह मुळे दिल्लीतील बृहनमहाराष्ट्र भवनाचे सरचिटणीस विलास कानतुटे यांनी माझ्याशी स्वत: संपर्क साधून आपण तुमचे कीर्तन ठेवू असा शब्द दिला होता, मी ही तेव्हा होकार भरला होता. त्यानंतर तब्बल २ महिन्यांनी मराठी स्नेह संवर्धक समाजाचे  सी.एस. वामोरकर यांचा साधारणत: २० जानेवारीला फोन आला की, ४ फेब्रुवारीला कीर्तन आयोजित करायच तुमच. मला एकदम आश्चर्य वाटल पण मी थोडा वेळ घेतला आमचे स्नेही आदरणीय उत्तमकुमार जुळे काका व त्यांचा मुलगा आमचा दादा आशिष जुळे यांच्याशी चर्चाकेली हार्मोनियम व तबल्याच्या साथीसाठी आणि कीर्तनास होकार दिला. फक्त एकदा जुळे काकांकडे गेलो त्यांना कीर्तनाची धाटणी समजावून सांगीतली आणि मग थेट ४ फेब्रुवारी  २०१८ रोजी दासनवमी निमीत्त बृहन्महाराष्ट्र भवनात ह.भ.प. रितेश भुयार कीर्तनकार म्हणून सेवा दिली. चांगला प्रतिसाद दिला उपस्थितांनी आणि मलाही समाधान वाटल कीर्तनाचे. धांदल खूप उडाली ऑफीस घर सांभाळत कीर्तनाची तयारी करताना पण उत्तम कीर्तन करू शकलो. 





यासंदर्भात दैनिक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत प्रकाशित झालेल्या वृत्ताने तर त्या दिवशी वॉटसॲपवर कमाल केली ब-याच गृप सह आमच्या विभागाच्या ग्रुप वर सर्व वरिष्ठांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याचा कळस म्हणजे आमचे संचालक श्री. अजय अंबेकर यांनी स्वत: एसएमएस करून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यासर्वांचा एकत्रीत गोषवारा. 


हे कीर्तन पाहण्यासाठी  कृपया खालील लींक ला भेट द्या

https://www.youtube.com/watch?v=Av6_BWl3K5I&t=40s 

https://www.youtube.com/watch?v=eK4UnDYc6kY 

https://www.youtube.com/watch?v=9-dhuRKHQdk 

https://www.youtube.com/watch?v=cKyDkLnVmUs


कामाची दखल घेतली जाते तेव्हा...


आपण ज्या कामासाठी बांधिल आहोत नव्हे नव्हे ते काम आपल्या आवडीचे असल्याने आपण ते प्रामाणिकपणे आणि उत्तमच करण्याचा प्रयत्न करतो, अशात त्या कामाची पावती मिळाली तर त्याचा आनंद अतिव असतो. मलाही दिल्लीत शासनात येण्या आधी आणि शासनात आल्यावर याचा चांगला अभुनव आला.        मात्र, शासकीय सेवेतील कामाची दखल विशेषत: वृत्तांकणाची जो माझा आवडीचा प्रांत आहे त्याचा मला अत्यानंद आहे. महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधिन  क्षत्रिय यांनी धन्यवाद देत गुड असा दिलेला रिमार्क, राज्यपाल महोदयांचे जनसंपर्क अधिकारी श्री. काशिकर यांनी स्वत: मेल करून धन्यवाद मानत उत्तम काम केल्याबाबत दिलेले प्रोत्साहन हे विशेष आहे.
        






 भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केवळ माझ्या बातमी लेखनावर खूश होऊन मला स्वत:च्या कार्यालयात बोलवून घेणे. पुढे त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राशी संबंधित पासपोर्ट विभागाचे वृत्त प्रसुत करणे व त्याला प्रसार माध्यमातून चांगली प्रसिध्दी मिळण्याचा अनुभवही ग्रेट. तसेच, २०१७ च्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्र पॅवेलियनचे केलेले वृत्तांकन व त्याला मिळालेली  उत्तम प्रसिध्दी त्याची दखल स्वत: महाराष्ट्र लघु उद्योग मंडळाच्या जॉइंट एमडी श्रीमती बनसोडे यांनी कामाची केलेली तारीफही स्मरणीय ठरली. यासंदर्भातील त्यांच्या वाटसअपवरील  प्रतिक्रियांचे स्नॅपशॉट येथे देत आहे.

 


P S BURDE 
Sun, Dec 31, 2017 at 8:06 PM
Reply-To: P S BURDE
To: MIC New Delhi
dear dayanand sir and ritesh ji
it was nice to be with you at your center in delhi on 4 dec. it is too late on my part to write you. this happened as i was on tour to bhopal, satana, nagpur and chandrapur.
i am please to share the clippings of the news appeared in almost all the newspapers across the state. this wouldn't have happened without your efforts. once again thank you very much.

P.S. BURDE
General Secretary 
PARIVAAR, National Confederation of Parents' Organizations for PwIDDs, New Delhi
&
EC Member
Maharashtra State Executive Committee, Govt of Maharashtra
Co-opted EC Member
PARIVAAR SAHYADRI, the Apex Council of Parents of Persons with Intellectual and Developmental Disabilities in Maharashtra and Goa
&
Affiliate Member 
Down Syndrome International, London, UK (No.683)
&
Member
Down's Syndrome Association, UK (No.53123)

A/301, Shivashish CHS, S.V.Road, Andheri (W), MUMBAI-400058
Mob:9920447481
Email: psburde@yahoo.com

















सोनाली भुयार यांची दैनिक लोकमत दिल्ली आवृत्तीत अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया


केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ संदर्भात माझी पत्नी सोनाली भुयार हीची प्रतिक्रिया दैनिक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत प्रकाशित झाली. 



Wednesday, January 24, 2018

राष्ट्रीय युवा पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा- जव्वाद पटेल


प्रत्येकाच्या आयुष्यात युवा काळ हा अत्यंत महत्वाचा. काही करून दाखविण्याचा व आपल्या व्यक्तीमत्वाची वेगळी छाप सोडण्याचा. असेच एक व्यक्तीमत्व, आपल्या कर्तृत्वाची छाप राष्ट्रीय स्तरावर उमटविणारा अकोला येथील युवा संशोधक जव्वाद पटेल. त्यांनी सामाजिक भान आणि संशोधक वृत्ती यांची उत्तम सांगड घालून संशोधन कार्य केले. आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात केलेल्या संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल म्हणून २३ व्या वर्षीच या संशोधकाला राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच ग्रेटर नोएडा येथील गौतमबुद्ध विद्यापीठात आयोजित २२ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रदान करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत दोन हजारांहून अधिक संशोधन केले असून त्यातील दोन संशोधनाला पेटंट मिळालेली आहेत. तसेच ३९ रिसर्च पेपर्सही सादर केले आहेत. या युवा संशोधकाची नेट भेट सदरासाठी घेतलेली खास मुलाखत.




सर्वप्रथम आपले अभिनंदन, राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय?
धन्यवाद. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने देशातील युवकांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद आहे. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

आपले मूळ गाव आणि शैक्षणिक प्रवास याविषयी थोडक्यात काय सांगाल?
मी मूळचा अकोल्याचा. जुना अकोला भागात काळा मारोती रोड येथे मी राहतो. दहावी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे नंतर अकरावी आणि बारावी औरंगाबाद येथे आणि आता हैद्राबाद येथील एलआयटी संस्थेतून मी बी.टेक. करीत आहे.

तुमच्यातील संशोधक वृत्तीची सुरुवात कशी झाली?
साधारणत: चार वर्षाचा असताना पासूनच माझा संशोधनाकडे कल सुरु झाला. घरातील विविध उपकरणे एकमेकांपासून वेगळे करणे व ते पुन्हा जोडून पाहणे अशी ही सुरुवात झाली. जसजसा मोठा होत गेलो आणि संशोधनातील समज आणि आवड वाढत गेली, तसा माझ्यातील संशोधक घडत गेला. हा प्रवास आतापर्यंत मी केलेले दोन हजारांहून अधिक संशोधन, विविध ठिकाणी मी सादर केलेले ३९ रिसर्च पेपर इथपर्यंत येऊन पोहचला आहे. ‘ड्युड्रॉप डिवाईस’ आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ या माझ्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे.

राष्ट्रीय युवा पुरस्काराविषयी काय सांगाल?
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय विकास व समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना याशिवाय स्वयंसेवी संघटनांना प्रदान करण्यात येतो. समाज सेवा, आरोग्य, संशोधन, मानवाधिकार आदि क्षेत्रांसाठी २५ व्यक्तीगत व १० संस्थागत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. व्यक्तीगत पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रूपये, पदक आणि मानपत्र असे असून संस्थात्मक पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रूपये चषक आणि मानपत्र असे आहे.

आपणास ज्या संशोधन कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे, त्याविषयी काय सांगाल? 
मला समाजोपयोगी संशोधनात विशेष रस आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची आवड आणि संशोधकवृत्ती यांची सांगड घालून आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल क्षेत्रात मी केलेल्या संशोधनाची दखल राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी घेण्यात आली. आरोग्य क्षेत्रातील संशोधनात मी छातीचा कर्करोग शोधून काढणारे इपीडम्सी डिवाईस आणि रक्त नमुना न घेता मधुमेह चाचणी करणारे नॉन इनव्हेसीव शुगर डिटेक्शन डिवाईस तयार केले आहे. उर्जा क्षेत्रात सौर उर्जेवर चालणारी कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर १०० कि.मी. पर्यंत आरामात चालू शकते. जल क्षेत्रात हवेच्या आर्द्रतेपासून पाणी तयार करणारे ड्युड्रॉप डिवाईस तयार केले आहे. कृषी क्षेत्रातील संशोधनात मी रोपट्यांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत पुरविण्यासाठी उपयोगी पडणारे ॲग्रीटेक हे तंत्र विकसीत केले आहे, ज्या माध्यमातून रोपट्यांना योग्य प्रमाणात व वेळेत पाणी व खत देऊन उत्पादन क्षमता वाढविता येते.

देशभरातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी करण्यात येते. देशातील प्रतिभावान युवा शक्तीच्या उल्लेखनीय योगदानासाठी याच दिवशी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कर्तृत्वाच्या जोरावर जव्वाद पटेल यांनी हा मानाचा पुरस्कार मिळवून देशाच्या राजधानीत महाराष्ट्राची मुद्रा उमटविली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

नांदेडचा शूर बालक अब्दुल रौफच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल











 
आयुष्याच्या वळणावरील अगदी सुरुवातीचा टप्पा म्हणजे बालपण. हे वय खेळण्या-बागडण्याचं तसंच ते आपल्या भोवतालच्या वातावरणातून शिकण्याचं. या वयातच सामाजिक बांधिलकीचे संस्कार घडतात. याच वयात माणसाची शूरवृत्तीही बरेचदा दिसून येते. बालवयातील याच शूरवृत्तीचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान म्हणजे, ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’. दरवर्षी या मानाच्या पुरस्कारावर मराठी मोहर उमटते हे ही अभिमानास्पद. यावर्षी हा मान मिळवला आहे पाण्यात बुडण्यापासून दोन मुलींना वाचविणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ या बालकाने.

अब्दुल रौफच्या धाडसाची कहाणी

पार्डी गावाशेजारून वाहणाऱ्या नदीवर दोन हजार फूट लांब, 60 फूट रूंद आणि 20 फूट खोल असा एक बंधारा आहे. या बंधाऱ्यावर 30 एप्रिल 2017 ला गावातील काही महिला व मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती बंधाऱ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, ती ही बुडायला लागली. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्याही बुडू लागल्या. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. यावेळी शेताकडे निघालेल्या अब्दुल रौफ ने बंधाऱ्या जवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली.

जमावातील कोणीच पाण्यात उडी घेण्याचे धाडस दाखवत नव्हता. मात्र अशात अब्दुल रौफ ने प्रसंगावधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. 20 फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यु झाला. अब्दुल रौफ ने धाडस दाखवून दोन मुलींना बंधाऱ्यात बुडण्यापासून वाचविले. त्याच्या साहसाची नोंद घेत त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अब्दुल रौफ हा पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात 10 व्या वर्गात शिकत असून भारतीय लष्करात रूजू होऊन त्याला देशसेवा करायची आहे. त्याचे वडील होमगार्ड आहेत. अब्दुल ला एक थोरली बहीण व थोरला भाऊ आहे. 11 व्या वर्षापासूनच अब्दुल पोहणे शिकला. याशिवाय कबड्डी, हॉलीबॉल, रनिंग हे त्याचे आवडते खेळ आहेत.

शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेला अब्दुल रौफ केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. तो सध्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात सामील झाला आहे. यावर्षी आशिया खंडातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणाऱ्या दिमाखदार पथसंचलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. अब्दुल रौफ ला उघड्या जिप्सीमधून सन्मानाने या खास परदेशी पाहुण्यांसह देशातील मान्यवरांना अभिवादन करण्याची संधीही मिळणार आहे. दिल्लीच्या वास्तव्यात तो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून आशीर्वाद घेणार आहे. अब्दुल रौफच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रासह देशावासियांना प्रेरणादायी अशीच आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराविषयी
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते.

यावर्षी या पुरस्कारासाठी देशभरातून 200 अर्ज आले होते. केंद्र शासनाच्या 10 मंत्रालयासह 31 संस्थाच्या समितीने या अर्जांची छाननी केली. यातून वर्ष 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी देशातील सात मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांची निवड करण्यात आली आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.