जाणता राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह समस्त जगासाठी एक मानबिंदू. आदर्श राजा म्हणून छत्रपतींनी घालून दिलेले मानदंड आजही संपूर्ण देशालाच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक ठरावे असेच आहेत. छत्रपतींच्या कार्याला उजाळा देण्यासाठी व त्यांच्या शौर्यातून बोध घेण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम साजरा होतो. मात्र राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत यावर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान दिल्लीत आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे अनुपम्य व ऐतिहासिक सोहळा ठरला.
संसद भवन व महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन, छत्रपतींचा पाळणा, पालखी, भव्य शोभायात्रा, राष्ट्रपती महोदयांची मुख्य कार्यक्रमात उपस्थिती व ‘शिवगर्जना’ महानाट्याचा प्रयोग हे या ऐतिहासिक सोहळ्याचे खास वैशिष्ट्य.
संसद भवनाच्या आवारात छत्रपतींना अभिवादन
शिवजयंतीची पहाट संसद भवनासाठीही ऐतिहासिक ठरली. सन २००३ मध्ये तत्कालीन लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत संसदेच्या अवारामध्ये २८ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, गेल्या १५ वर्षात शिवजयंतीदिनी येथील छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रमच झाला नव्हता. त्यामुळेच यावर्षी येथील छत्रपतींच्या पुतळ्यास छत्रपतींचे १३ वे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुष्पहार घालून मानवंदना दिली. सोबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही छत्रपतींना अभिवादन केले आणि हा ऐतिहासिक क्षण ठरला.
शिवभक्तीमय महाराष्ट्र सदनाचे देखणे रूपडे
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाचा परिसर शिवभक्तांच्या गर्दीने ओसंडून निघाला होता. हजारोंच्या संख्येने केसरी फेटा, कुर्ता आणि पायजमा परिधान केलेले तरुण व वयस्क आणि नऊवारी, नथनी, अंबाडा व केसरी फेटाधारी तरूणी-महिला. सोबतीला ‘जय भवानी जय शिवाजी’ या गर्जनेने निनादून गेलेला अवघा आसमंत. महाराष्ट्र सदनाचा परिसर पूर्णपणे शिवभक्तीमय झाला होता. सदनाच्या सभागृहात शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवाजी महाराजांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भव्य शोभा यात्रा
महाराष्ट्र सदनातून यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे, मावळे, नऊवारी साडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील मंडळी अशा सर्व लवाजम्यानिशी ‘जय भवानी जय शिवाजी’अशा गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारीसमोर वेषभूषेतील अष्टप्रधान मंडळ आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता. ज्ञानोबा-तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा उत्साह शोभून दिसत होता. याच शोभा यात्रेत दोरखंडावर विविध आसने सादर करणाऱ्या नऊवारीतील मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारी मुले, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणारे तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझीमवर सर्वांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभायात्रेचा येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर समारोप झाला.
शोभा यात्रेतील शिवभक्तांचा उत्साह इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातही कायम होता. दुपारी शोभा यात्रेच्या समारोपानंतर येथे रक्तदान शिबीर व त्यात तरूणांचा सहभाग तसेच ढोल व झांज पथकांचे प्रात्यक्षिके, वासुदेव, गोंधळ-वारकरी- दिंडी-लेझीम या लोककलांच्या सादरीकरणाने येथील वातावरण महाराष्ट्रीय संस्कृतीत न्हाहून गेले होते.
राष्ट्रपती महोदयांची उपस्थिती
राजधानीतील शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य समारंभाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती म्हणजे या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणारे ठरले. राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले व उपस्थितांना संबोधित करताना छत्रपतींचे वैविध्यपूर्ण कार्य अधोरेखीत केले. राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे भव्य आयोजन व या सोहळ्यात खास पेहराव जणू दिल्लीत मिनी कोल्हापूर अवतरल्याचा अनुभव देत आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी उपस्थितांचे कौतुक केले. या कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यासंदर्भात आपल्या भाषणात विशेष उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे आता राष्ट्रपती भवनातील उणीव भरून निघाली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, श्री शाहू छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. तर प्रेक्षकांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईट इन्फेट्री पी.जे.एस.पन्नु उपस्थित होते.
दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान येथे ३०० कलाकारांचा समावेश असलेल्या शिवगर्जना या महानाट्याचे सादरीकरणही झाले. एकंदरीतच राजधानी दिल्लीतील हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा भव्यदिव्य सोहळा व त्यातून दिल्ली व परिसरातील मराठी माणसांचा दिसून आलेला एकोपा छत्रपतींच्या दिव्य व्यक्तीमत्वातून सर्वांना स्फूर्ती देऊन गेला, म्हणूनच हा सोहळा अनुपम्य व ऐतिहासिक ठरला.
-रितेश मोतीरामजी भुयार,उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
No comments:
Post a Comment