Friday, January 29, 2016

महाराष्ट्र एनसीसीला देशातील तिस-या सर्वोत्तम संचालनालयाचा मान



नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कोर्प्स(एनसीसी)ला देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा तिस-या क्रमांचा मान मिळाला आहे. पंतप्रधान बॅनरचा मान पंजाब,चंदीगढ, हरियाणा व हिमाचल प्रदेश या संयुक्त संचालनालयाला  तर उपविजेतेपदाचा मान कर्नाटक व गोवा या संयुक्त संचालनालयाला मिळाला आहे.

              येथील छावनीभागातील गॅरीसन परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कारांची घोषणा व पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह, संरक्षण सचिव जी.मोहन कुमार, लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह, वायुसेना प्रमुख एअरचिफ मार्शल अरूप राह, नौसेना प्रमुख ॲडमीरल आर.के.धवन आणि एनसीसीचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल अनिरुध्द चतुर्वेदी मंचावर उपस्थित होते.

               पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील २१०० एनएसएस कॅडेटसना संबोधित केले.ते म्हणाले, देशात नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा झाला. स्वतंत्र भारत देशाने राज्यघटना स्वीकारली म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना दिली ज्यामुळे विविध भाषा, संस्कृतीने नटलेला भारत देश एकसंध राहीला आहे. तूम्ही देशाच्या विविध भागातून प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी आला.याठिकाणी आयोजित महीनाभराच्या शिबीरात चांगल्या गोष्टी शिकलात.  विविध भागातून आलेल्या देश -विदेशातील मित्रांशी तूमचा संवाद झाला. हा अनुभव तुम्हाला आयुष्याची शिदोरी ठरेल. सर्वजन आपआपल्या गावी जाताना स्वच्छता व देशप्रेमाचा संदेश आपल्या परिसरात विस्तार करा व देशसेवेचे व्रत कायम पाळा असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

           तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसमधे महाराष्ट्रातील ९ कॅडेटसचा  सहभाग होता. यावेळी पंतप्रधानांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्याच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले. ५० एनसीसी कॅडेटसचा सहभाग असणा-या महाराष्ट्राच्या पथकाचे नेतृत्च महेश पांडव ने तर ध्वजवाहन देवयानी पागीरे ने केले. बांग्लादेश, भुटान, कझाकीस्तान, नेपाळ, रशिया,श्रीलंका आणि व्हिएतनाम येथील एनसीसी कॅडेटसनेही या पथसंचालनालयात भाग घेतला. यावेळी पथसंचलनात सहभागी एनसीसीच्या लष्कर, वायूदल, नौदल, क्रीडा आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणा-या आकर्षक चित्र रथांना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. दिल्ली एनसीसी संचालनालयाच्या कॅडेटसनी यावेळी परॉसेलींगचे तर विविध संचालनालयाच्या ६०० कॅडेटसनी योगासनांचे प्रात्याक्षीक सादर केले. पंतप्रधानांच्या हस्ते  पंतप्रधान बॅनर पुरस्कार वितरण करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. हमसभ भारतीय है या एनसीसीगीतानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

             एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील गॅरीसन परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन केले. १ जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. तर पंतप्रधान रॅलीने आज या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या २१०० कॅडेट्स यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील ११४ एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील २५ कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर 9 कॅडेटसची  पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.  

                        या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी केली. गेल्या 25 वर्षांपैकी 17 वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणा-या महाराष्ट्राला यावर्षी तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या संघाचे प्रमुख कर्नल निखिल कुलकर्णी आणि उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे हे आहेत .                 

                                                              ००००००

Thursday, January 28, 2016

राजपथावर महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन : 67 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजपथावर पार पडलेल्या 67 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले. राजपथावर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जतेसोबतच महाराष्ट्राच्यावतीने सादर ‘साेंगी मुखवटा’या लोकनृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील 3 बालके, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करणारा आसीफ शेख हे ही या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले.

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी देशाच्या राजधानीत पसरलेले धुके, जोडीला असलेली कडाक्याची थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. 10 वाजताच्या सुमारास राजपथावर सुर्यकिरणांच्या आगमनाने वातावरण निवळले यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन झाले. देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तेवत राहणाऱ्या इंडियागेटस्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पंतप्रधानांनी देशवासियांच्यावतीने आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसिस्को ओलांद आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे राजपथावर आगमन झाले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर, राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. भारतीय पॅराशुट रेजीमेंटचे लांसनायक मोहननाथ गोस्वामी यांच्या अभुतपूर्व शौर्य व बलिदानासाठी मरणोत्तर जाहीर सर्वोच्च शौर्यपदक अशोक चक्र त्यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
 राजपथावर प्रथमच विदेशी सैन्याच आणि श्वान पथकाचे पथसंचलन

यानंतर राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनास सुरूवात झाली. राजपथावरील पथसंचलनाच्या इतिहासात प्रथमच विदेशातील सैन्यांनी पथसंचलन केल्याचा अनुभव देशावासियांना आला. ‘सांद्रानील’ ची धून वाजवणाऱ्या फ्रांस सैन्याच्या बँड पथकाचे राजपथावर सर्वप्रथम आगमन झाले व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. त्यानंतर फ्रांस सैन्याच्या 75 सैनिकांचा समावेश असणाऱ्या शिस्तबद्ध सैन्य पथकाचे पथसंचलन झाले. लष्कराच्या विविध रेजीमेंटच्या पथसंचलनानंतर राजपथावर लष्कराच्या श्वान पथकाचे शानदार पथसंचलन झाले. या दोनही पथसंचलनाने राजपथावर इतिहास रचला.

भारताची शस्त्र सज्जता दर्शविणाऱ्या सेनेच्या तीनही दळांचे आकर्षक चित्ररथ, सेनेच्या सैनिकांचे आणि बॅंड पथकांचे पथसंचलन, सीमा सुरक्षा दळाचे घोडदळ, उंटदळ यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांच्या टाळ्या मिळवत होते.

वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या 16 राज्यांचे आणि केंद्रांतील मंत्रालयांनी तयार केलेल्या आकर्षक चित्ररथांच्या पथसंचलनाने उपस्थितांचा उत्साह टिपेला पोचल्याचे चित्र होते.

असामान्य शौर्य दाखविणाऱ्या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 25 मुला-मुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. शौर्याचा परिचय देणाऱ्या व मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’ जाहीर नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धेची आई रेखा सहस्त्रबुद्धे यांच्यासह जळगांव जिल्ह्यातील कोथळी येथील निलेश भील, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेचा वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरचा मोहीत दळवी या महाराष्ट्रातील शूर बालकांचा यात समावेश होता.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाच्या राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद येथील शासकीय कला व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख आसीफ ने महाराष्ट्राला नेतृत्वाचा मान मिळवून दिला. महाराष्ट्र व गोव्यातील स्वयंसेवकासह देशातील 160 सदस्यीय एनएसएस पथकाचे आसीफ ने नेतृत्व केले. ही महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा मिळवलेली उपलब्धी आहे. याआधी वर्ष 2014 मधे धनजराज मुंडे याने राजपथावर एनएसएस पथकाचे तर धनराज लहाने याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते. वर्ष 2015 मधे खुशबू जोशी हिने राजपथावर एनएसएस पथकाचे तर अमन जगताप याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते.

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या शालेय मुला-मुलींनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या प्रसिद्ध ‘साेंगी मुखवटा’ लोक नृत्याच्या सादरीकरणाला यावेळी उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. पांरपरिक वेशभुषेतील या मुलींनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सीमा सुरक्षा दळाच्या बायकर्स आणि वायुदळाच्या चित्तथरारक कसरतीनंतर राष्‍ट्रगीताने राजपथावरील पथसंचलनाची सांगता झाली.

पद्म पुरस्कार जाहीर : महाराष्ट्राला १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १०पद्मश्री ; धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण




नवी दिल्ली 
:  केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने सोमवारी वर्ष २०१६’ च्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील ११२ मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमधे १ पद्म विभूषण, ५ पद्मभूषण तर १० पद्मश्री असे एकूण १६ पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील मान्यवरांना जाहीर झाले आहेत. देशातील उद्योग व व्यापार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या धिरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला.

देशातील प्रतिष्ठीत नागरी पुरस्कार म्हणून गणल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची यादी आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केली. कला, व्यापार, उद्योग, सामाजिक कार्य, सार्वजनिक क्षेत्र, विज्ञान-अभियांत्रिकी, औषध,साहित्य-शिक्षण, क्रीडा, नागरीसेवा इत्यादी क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देणाऱ्या देशातील ११२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. तीन श्रेणींमध्ये जाहीर झालेल्या या पुरस्कारात १० पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ८३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा तर १० अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ४ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जाहीर महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे.

पुरस्काराचे नाव
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे
कार्यक्षेत्र



पद्मविभूषण
धिरूभाई अंबानी (मरणोत्तर)
व्यापार आणि उद्योग



पद्मभूषण
अनुपम खैर
कला  चित्रपट

उदित नारायण झा
कला- पार्श्व गायन

प्रा.एन.एस.रामानुज टाटाचार्य
साहित्य - शिक्षण

स्वामी तेजोमयानंद
अध्यात्म

हाफिज कॉन्ट्रक्टर
वास्तूशास्त्र



द्मश्री
अजय देवगण
कला  चित्रपट

प्रियंका चोपडा
कला  चित्रपट

मधुर भांडारकर
कला  चित्रपट दिग्दर्शन व निर्मिती

पियुष पांडे
जाहिरात व संवाद

सुभाष पालेकर
शेती

ॲड.उज्वल निकम
सार्वजनिक क्षेत्र

प्रा.(डॉ.) गणपती दादासाहेब यादव
विज्ञान व अभियांत्रिकी

सुधाकर ओलवे
समाजसेवा

दिलीप संघवी
व्यापार आणि उद्योग

डॉ.केकी होरमुसजी घरडा
व्यापार आणि उद्योग

Friday, January 22, 2016

महाराष्ट्राच्या शूर वीर बालकांची देशाने घेतली दखल



शूरविरांचा महाराष्ट्र म्हणून देशाला ओळख आहे. या मातीत मुलांवर होणारे साहस व सामाजिक भान जपण्याचे संस्कार देशवासियांना नुकतेच बघायला मिळाले. प्रसंग, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणा आणि यात महाराष्ट्रातील चार बालकांच्या समावेशाचा. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय बालकल्याण परिषदेने वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा केली त्यात देशातील ३ मुली व २२ मुलांसह २५ बालकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. त्यांचा थोडक्यात परिचय...
शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा ‘भारत पुरस्कार’ नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यातील कोथळीच्या निलेश भिल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना २४ जानेवारी रोजी या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच, २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात सहभाग घेऊन देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना हे बालक अभिवादन करणार आहेत.

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी पंप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच राजपथावरील पथसंचालनात हे बालक सहभागी होतात. महाराष्ट्रातील ३ शूर बालकांसह गौरव सहस्त्रबुध्देची आई पुरस्कार वितरण व प्रजासत्ताक दिन सोहळयात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल नजीब जंग आणि भारताचे उपराष्‍ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांनी या बालकांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधला आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतही हे शूर बालक संवाद साधणार आहेत.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील बालकांच्या शौर्याबद्दल

नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला आपल्या ४ मित्रांसह अंबाझरी तलावजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहीले. प्राणाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच गौरव पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गौरवची आई रेखा कवडूजी सहस्त्रबुध्दे हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणाऱ्या निलेश रेवाराम भिल याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत दर्शनासाठी आलेला मुलगा मंदिरा समोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला. हे चित्र मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलेश भिलच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन त्याने मुलाचे प्राण वाचविले. निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणाऱ्या वैभव रामेश्वर घंगारे ला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैभव हा २६ जुलै २०१४ ला गावातील नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. तो पुढे एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपजवळ अडकला. तिथे उभ्या असणाऱ्या लोकांपैकी सुहासच्या मदतीला कोणीच धजावले नाही मात्र वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.

मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणाऱ्या मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. २५ एप्रिल २०१५ ला आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुटीत आलेल्या कृष्णा पाष्टे ही मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता बुडत होती. तिने आपल्या मैत्रीणीला हात मागितला, पण तिला पोहता येत नसल्याने मैत्रीणीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन कृष्णाचे प्राण वाचविले व तिला नजिकच्या इस्पितळात भरती केले. मोहीतच्या आई वडीलांचे निधन झाले असून आत्याकडे राहणारा मोहीत वाळकेश्वर येथील महानगर पालिकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.

३ मुली आणि २२ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते. महाराष्ट्रातील चार बालकांना मिळणारा हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या शूर वीर बालकांची देशाने घेतली दखलच म्हणावी लागेल.

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Monday, January 18, 2016

राजधानीत महाराष्ट्राचा दुहेरी गौरव



दिल्लीत कडाक्याच्या थंडीने जोर धरलाय. त्यामुळे धुक्याशी सामना करत आम्ही कार्यालयाच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहचलो ते सकाळी साडेनऊच्या सुमारास. औचित्य, केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन’सप्ताहास सुरुवात आणि तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देशातील सर्वोत्तम राज्याचा महाराष्ट्राला मिळालेला बहुमान. तर इयत्ता 9 वीत शिकणाऱ्‍या महाराष्ट्रातील प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. वर्षभर विविध क्षेत्रात राजधानीत घडणाऱ्‍या महाराष्ट्राच्या गौरवापेक्षा हा गौरव वेगळाच होता. कारण इथे राज्यातील ‘प्रशासन आणि शिक्षण’ असा दुहेरी सन्मान होता. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात टिपताना दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत महाराष्ट्राचा दुहेरी सन्मान पाहून ऊर गौरवाने भरून आला.

राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पद म्हणून संबोधल्या जाणाऱ्‍या मुख्य सचिवांनी अर्थात स्वाधिन क्षत्रिय साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर याचवेळी अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्‍या प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन सप्ताह १६ -३१ जानेवरी २०१६” या देशव्यापी कार्यक्रमाचे केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मागील वर्षी तेल व वायू संवर्धन सप्ताहापासून देशात वर्षभरात अमंलबजावणी झालेल्या उत्तम कामासाठी मोठ्या राज्यांपैकी फक्त एका राज्याचा सन्मान करण्यात आला. मागील वर्षात महाराष्ट्रात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला. केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला.

गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मध्ये तेल व वायू संवर्धन पंधरवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रात जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.

तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी १हजार २२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांमधे इंधन वापर व तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी ४२० शिबिरे आयोजित करण्यात आली. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२ हजार ५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. उद्योग क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६ हजार १५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे गेल्या वर्षात राज्यात एकूण २० हजार ४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याची किमया महाराष्ट्राने केली परिणामी मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला.

पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने राज्य सरकारांच्या कामांप्रमाणेच देशातील विविध राज्यांमधे विद्यार्थ्यांमधे तेल व वायू संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी निबंध स्पर्धांचे आयोजन केले. सप्टेंबर २०१५ मधे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम निकालातून प्रत्येक राज्यातून एका विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड करण्यात आली. मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदीया शाळेच्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या प्रार्थना रानडेला हा पुरस्कार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रार्थनाला ३० हजार रूपये रोख, एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला. तसेच, प्रार्थनाला केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने यावर्षी जून महिन्यात जपानमध्ये अभ्यास सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे.

प्रार्थना या यशाबद्दल सांगते, ‘ मी हा निबंध लिहिला तेव्हा मला वाटलंही नव्हतं की माझी निवड होऊन मला राष्ट्रीय सन्मान मिळेल. मी ५वी पासूनच निबंध लेखन स्पर्धेत भाग घेत आली त्यातील हे सर्वोच्च यश आहे. मला मंत्रालय जपानच्या अभ्यास सहलीसाठी पाठवित आहे. या सहलीमधे तेल व वायू संवर्धनासाठी जपानमधे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून आपल्या राज्यात व देशात त्याचा कसा फायदा होऊ शकेल यावर अभ्यास करेन. मी माझ्या घरापासून त्याच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न करेन. माझं शहर, माझा जिल्हा, राज्य व देश सुंदर बनविण्यासाठी मला या पुरस्कार स्वरुप मिळालेल्या सोयींचा उपयोग करेन.’ प्रार्थनाचे विचार ऐकत असताना डिआरडीओच्या सभागृहात उपस्थित तिचे डॉक्टर वडील प्रवीण रानडे व निवृत्त शासकीय कर्मचारी आई प्रतिक्षा रानडे, शाळेच्या शिक्षिका शोभा पालवे यांच्यासह माझा ऊर स्वाभीमानाने भरून आला. महाराष्ट्राचा हा असा दुहेरी सन्मान सदैव आठवणींच्या कप्प्यात जपावा असाच होता.

रितेश मोतीरामजी भुयार, 
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Wednesday, January 13, 2016

महाराष्ट्रभूषण पाडगांवकरांना आदरांजली




मंगेश पाडगांवकरांच्या रचनांनी मला शालेय जीवनापासूनच वेड लावल होत. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावेया गीताच्या प्रेमात पडून मला गायन शिकण्याची अतीव इच्छा झाली. या नंतर पाडगांवकरांच्या ब-याच रचना त्यातील भाव आणि प्रतीक ही वयानुसार आणि अनुभवानुसार आणखी खास समजायला लागली आणि त्यांच्या काव्यातील माधुर्य आणख्रीच भावू लागल.  पाडगांवकराचं गीत त्याला यशवंत देवांचं संगीत आणि अरूण दाते यांचा स्वरसाज चढलेल्या अनेक गीतांनी मराठी रसीकां प्रमाणेच माझ्या मनावरही गारूड केल. ‘शुक्रतारा मंद वारा, भातकुलीच्या खेळामधली राजा आणिक राणी,अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रिती’ ,  ‘दिवस तुझे हे फुलायचे झोपाडया वाचून झुलायचेहे मला त्याकाळी आणि आजही भावलेली गीते.
                याच गीतांना त्याच दिग्गजांकडून ऐकण्याची अनोखी संधी मला लाभली आणि तीही दिल्लीत हे माझ महदभाग्य. दिल्लीतील वास्तव्यात ज्या दिग्गजांना जवळून बघण्याची ऐकण्याची सधी मिळाली त्यात अरूण दाते. येथील कमानी सभागृहात गणेशोत्सवकाळात दाते यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. वार्ध्यक्याने त्यांचा आवाज क्षिण झाला होता मात्र पाडगांवकरांचा भाव रसिकांपर्यंत पोचवण्यात ते कमालीचे यशस्वी झाले. (गावाकडे परतवाडा येथे आयोजित कार्यक्रमात अरूण दातेंना ऐकण्याची संधी मिळाली त्यात अगदी टापटीप गायन मनाला भिडून गेले होते).यावेळी पाडगांवकरांच निवेदन असत तर आणखी मजा आली असती अस सारख वाटत होत. हे चित्र बघण्याच स्वप्न तर पूर्ण झाल नाही. मात्र, पाडगांवकरांच्या काव्यावर आधारीत आणि स्वत: पाडगांवकरांनी सादर केलेल्या कविता व सोबत त्यांची मुलाखत अशी मेजवाणी गणेशोत्सव काळातच श्रीराम सेंटर या दिल्लीतील सभागहात मिळाल.
                या कार्यक्रमात काव्य निर्मितीचा एक प्रसंग जो स्वत: पाडगांवकरांनी सांगितला होता तो कायम स्मरणात राहणारा आणि पाडगांवकरांविषयी आठवण म्हणून हदयाच्या कप्प्यात कायम जपावा असा क्षण. ‘ दिवस तूझे हे फुलायचे या गीताच्या निर्मितीबाबत सांगताना पाडगांवकर म्हणाले होते, या गीताच्या शेवटचे कडवे मला बदलवावे लागले. त्‌याचे झाले असे, माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, बाबा या गीतातील शेवटच कडव जरा अश्लील वाटते. हे ऐकूण मी ताडकण उडालो आणि त्याला विचारल , ते कस?. मुलगा म्हणाला,माझ्या ग घ्रराच्या पाशी तू थांब नागडे जराशी अशी ही ओळ झाली आहे. मुलाचं म्हणन मला पटल आणि मी ते वाक्य सुट केल माझ्या ग घराच्या पाशी तू थांब ना गडे जराशी अस केल आणि हे गीत गातांना गायकांनीही याबाबत काळजी घेण्यास सांगितले. हा किस्सा ऐकूण सभागहात एकच हशा पिकला. पण गीत निर्मिती प्रक्र‍ियेत पाडगांवकर किती चौकस असत याचा अनुभव आला. लहाणग्यांसाठी लिहीलेल सांगसांग भोलानाथ हे बालगीत असोयाशिवाय प्रेम गीत विरह गीत , राजकीय व सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा त्यांचा उदासबोध हा काव्य संग्रह असो किंवा कबीरांच्या दोहयांचा त्यांनी केलेला भावानुवाद असो पाडगांवकरांच्या सच्च्या व कलंदर कवी व्यक्तीत्वाच्या छटा त्यातून दिसून येतात. जरी हा कलंदर कवी आपल्यातून गेला असला तरी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून ते चिरकाल आपल्यात राहतील हयाच भावना त्यांना आदरांजली वाहताना उदधृत होतात.

लक्ष्मी नारायणाची भेट



       दिल्लीतील थंडी काही अर्थाने टोकाचीच. ऑफीस होत. त्यात कळल तत्कालीन महिला व बालकल्याण विकास मंत्री वर्षा गायकवाड दिल्लीत आल्या आहेत . मग त्यांची बैठक कुठे व कशासाठी आहे याची माहिती घ्रेण्यासाठी घाईघाईतच फोन लावलेत्यातून कळल की, लोधी रोडवरील इडिया इंटरनॅशनल सेंटरला एक बैठक आहे. ऑफीसची गाडी आणि फोटोग्राफरला घेऊन बैठकस्थळी पोहचण्यासाठी निघालो. मंत्री महोदय येण्या आधीच पोहचलो. हे दिल्लीतील Unicef च कार्यालय होत.  भडक मेकअप, उत्तमसाडी, केशसंभार, आणि भक्कम शरीरयष्टी असलेली एक व्यक्ती डोळयासमोर आली आणि लगेच डोळयासमोरून ओझरती निघून गेली ती व्यक्ती होती लक्ष्मी नारायण त्रिपाठी’. बैठकीचा विषय होता महाराष्ट्रात महिला धोरण तयार करण्याचे काम आणि त्यात तृतीय पंथींयाचा सहभाग व त्यांच्या विषयी धोरण’.
                लक्ष्मी नारायण त्रिपाठी, यांच्याशी या बैठकीनिमित्त गप्पा मारण्याची संधी मिळाली. तोपर्यंत ही व्यक्ती कोण? तीचं कार्यक्षेत्र याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मंत्री महोदयांशी लक्ष्मीचा सरळ आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि या कार्यालयात unicef च्या अधिका-यांसोबत वागण्या बोलण्यातून लक्ष्मी विषयी एक वेगळच इंप्रेशन माझ्या मनात तयार झालही व्यक्ती काहीतरी वेगळी आणि प्रंचड प्रतिभा असणारी व्यक्ती असल्याच सारख जाणवत होत. मग या बैठकीसंदर्भात काही फोटोग्राफ काढण्याचे निर्देश मी फोटोग्राफरला केलेत. आणि बैठकीविषयी माहिती विचारायला मंत्रीमहोदयांकडे गेलो त्यांनीही मला ओझरती माहिती दिलीपण अजूनही माझ्या आयडीया काही स्पष्ट होत नव्हत्या त्यात मंत्रीमहोदयांची आणखी काही बैठक आहे का  ? तस असेल तर ती ही कव्हर करावी लागेल असा दुसरा प्रश्नही डोक्यात होताच. तितक्यात लक्ष्मी ही मंत्री महोदयांना निरोप देण्यासाठी आलीनिरोप देऊन झाल्यानंतर मी लगेचच त्यांच्याशी बोलता झालो. मॅडम म्हणत मी सुरूवात केली. ही बैठक त्यातील आपली भूमिका? त्या उत्तरल्या महाराष्ट्रात महिला धोरण तयार करण्यात येत आहे त्यात तृतीय पंथीयाचाही सहभाग असावा असच आम्हा तृतीयपंथीयांची मागणी आहे. राज्य शासन त्याबाबत अनुकुल असून unicef च्या मदतीने आम्हाला यात आवश्यक मदत करण्याच्या शक्यतांवर ही बैठक होती. 'ओके डियर, आय गॉट लेट हा माझा नंबर घे आणि काही विचारायच असल्यास फोन कर' असं म्हणून ऑडीगाडीतून लक्ष्मी  निघून गेली.  मग मी ऑफीसमधे आलो आणि सर्वात आधी गुगलवर सर्च केल लक्ष्मी नारायण त्रिपाठी. तर भला मोठा परिचय समोर आला. लक्ष्मी नारायण त्रिपाठी हा ठाण्यातील एका उच्च्‍ाभ्रू कुटुंबात जन्मलेला पण नैसर्गिकरित्या आलेल वेगळपण. पण यावर मात करत आपल्या सारख्या देश-विदेशातील असंख्य सहका-यांसाठी लढा देणारा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच नेतृत्व करणारा अर्थात करणारी लक्ष्मी. उत्तम नर्तकइंग्रजी- हिंदी व मराठीवर हुकमत असणारी, विविध संघटनांशी जुळलेली, चित्रपट, नाटकांमधे भूमिका वठवलेली, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी जिच्या कामाची दखल घेतली. जिने व जिच्यावर पुस्तक लिहीली गेली त्याही पेक्षा जिला आदर्श ठेवून असंख्यांनी स्वत:ला सावरल अशी लक्ष्मी.  
       आज (दिनांक ९ जानेवारी २०१६ ) दिल्ली अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळयात वाणी प्रकाशनाच्या दालनात माझ्या हाती एक पुस्तक लागलं. त्याच नावं  मै हिजडा लक्ष्मी’  हे लक्ष्मी नारायण त्रिपाठीवरील आत्मचरित्रात्मक पुस्तक होत. या पुस्तकावर ओझरती नजर मारली तेव्हा लक्ष्मीसोबत झालेल्या भेटीची आठवण मनात तरळली
                 पुस्तकात लक्ष्मीचे लहानपनीचे तारूण्यातील व विविध आंदोलनातील सहभागांचे छायाचित्र दिसले. मग हळूच पुस्तकात डोकावल तेव्हा ओळ वाचण्यात आली , ‘ वयाच्या ७ व्या वर्षी माझे पहिल्यांदा शारीरिक शोषण झाले. नात्यातील एका लग्न समारंभात मी गेलो होतो. एका मुलाने माझ्या निरागसपणाचा फायदा घेत माझ्यावर जबरदस्ती केली. मग जेव्हाही त्या नातेवाईकांकडे जायचो तेव्हा हा प्रकार सतत होयी सतत ३ वर्ष हा अन्याय मी सहन करीत राहिलों. खूप वेदना होत होत्या. पण यातून सुटका करण्यासाठी स्वत:च धाडस करून विरोध केला. त्याचा परिणाम झाला. मग घरातल्यांनीही मोठया मनान माझ्या नैसर्गीक भावभावना व शरीरिची ठेवन लक्षात घेऊन मला मुला पेक्षा मुलगी म्हणून माझ्यात प्रबळ भावनांना वाट मोकळी करून दिली. यातून घडत गेलेली लक्ष्मी या पुस्तकात मांडली आहे.’
                लक्ष्मीशी भेट झाल्यानंतर तीने फोन नंबरही दिला. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एखाद दिवशी भेटून तिच्या आंदोलनाविषयी, झुंजीविषयी जाणून घेण्याची इच्छा होती.  पण त्यानंतर लक्ष्मीची भेट झालीच नाही.
दिल्लीतील भेटीत समाजाने नाकारलेल्या अशा लोकांमधील सर्वोच्च प्रतिभेच्या व्यक्तीशी भेट झाल्याचा तो क्षण माझ समाजातील या प्रश्नाविषयी ज्ञानात भर घालून गेला. लक्ष्मीच्या निमित्ताने आता इथे एक अनुहत उल्लेख करावासावाटतो. १० फेब्रुवारी ते १० मार्च २०११ या कालावधीत केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयांतर्गंत कार्य करणा-या दिल्लीतील अशोक रोडवरील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित देशातील विविध राज्यांतील लोककलांतून मांडण्यात आलेला महाभारत महोत्सव’. या महोत्सवात मी महाराष्ट्रातील नारदिय किर्तन परंपरेचे दर्शन घडविणा-या चमुचा समन्वयक म्हणून काम पाहिल, तेव्हा या महोत्सवात सहभागी तामीळनाडूतील ५० तृतीय पंथींयाचा सहभाग असलेल्या चमुशी माझा परिचय झाला. यात सहभागी प्रत्येकाची वेगळी स्टोरी होती. पण मला माझ्या चमुच प्रतिनिधीत्व करताना आणि सोबतच माझा दैंनंदिन पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळताना तृतीयपंथींयांच्या चमुशी संवाद साधण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र काही प्रशासकीय बाबींसाठी मला माझ्या चमुचे प्रश्न सोडविताना या चमुलाही मदत करता आली त्यातच या चमुतील काहींशी संवाद करता आलाबहुतेक जण आपल्याकुटुंबापासून लांब राहतात पण कुटुंबाच्या वहनात मोलाची जबाबदारी पाळतात, त्यांना पोलीसांकडून व काही वेळा ग्राहकांकडून मारपीट होत असल्याचे ते सांगत होते. त्यांच्यात रूढ असलेली गुरु-शिष्य परंपरा, तामीळनाडू सरकारचे या लोकांसाठी शिथील असलेले शैक्षणीक धोरण व त्यांना देण्यात आलेल्या अन्य सोयीसुविधा परिणामी यातील बहुतेक लोकांनी पूर्ण केलेले पदवीपर्यंतचे शिक्षणसमाजाच्या मुख्यप्रवाहात येण्यासाठी त्यांची असलेली धडपड अशा विविध गोष्टी मला त्यांच्या सेाबतच्या संवादातून कळल्या.

                हा सर्व लेखन प्रपंच करत असताना, समाज म्हणून आपल असलेल वेगळपण. यात कुणाला आपली जाती, धर्म निम्न असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना तर निसर्गानेच वेगळपण बहाल केलेल्या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांच वेगळपण नाकारणा-या समाजात आपण राहत असल्याचा व त्यात आपल्या वागण्याला किती मर्यादा असतात याची सारखी जाणीव होतेसमाजाने नाकारलेल्या पण ताठ मानेने जगणा-या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांना सलाम.