दिल्लीत कडाक्याच्या थंडीने जोर धरलाय. त्यामुळे धुक्याशी सामना करत आम्ही कार्यालयाच्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहचलो ते सकाळी साडेनऊच्या सुमारास. औचित्य, केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन’सप्ताहास सुरुवात आणि तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी देशातील सर्वोत्तम राज्याचा महाराष्ट्राला मिळालेला बहुमान. तर इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या महाराष्ट्रातील प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार. वर्षभर विविध क्षेत्रात राजधानीत घडणाऱ्या महाराष्ट्राच्या गौरवापेक्षा हा गौरव वेगळाच होता. कारण इथे राज्यातील ‘प्रशासन आणि शिक्षण’ असा दुहेरी सन्मान होता. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात टिपताना दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत महाराष्ट्राचा दुहेरी सन्मान पाहून ऊर गौरवाने भरून आला.
राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पद म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुख्य सचिवांनी अर्थात स्वाधिन क्षत्रिय साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर याचवेळी अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या प्रार्थना रानडेला मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने ‘तेल व वायू संवर्धन सप्ताह १६ -३१ जानेवरी २०१६” या देशव्यापी कार्यक्रमाचे केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मागील वर्षी तेल व वायू संवर्धन सप्ताहापासून देशात वर्षभरात अमंलबजावणी झालेल्या उत्तम कामासाठी मोठ्या राज्यांपैकी फक्त एका राज्याचा सन्मान करण्यात आला. मागील वर्षात महाराष्ट्रात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविले म्हणून मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला. केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला.
गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०१५ मध्ये तेल व वायू संवर्धन पंधरवड्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तेल व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर आदी क्षेत्रात जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.
तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी १हजार २२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांमधे इंधन वापर व तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी ४२० शिबिरे आयोजित करण्यात आली. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२ हजार ५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. उद्योग क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६ हजार १५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. अशाप्रकारे गेल्या वर्षात राज्यात एकूण २० हजार ४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याची किमया महाराष्ट्राने केली परिणामी मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून बहुमान झाला.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने राज्य सरकारांच्या कामांप्रमाणेच देशातील विविध राज्यांमधे विद्यार्थ्यांमधे तेल व वायू संवर्धनाबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी निबंध स्पर्धांचे आयोजन केले. सप्टेंबर २०१५ मधे पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम निकालातून प्रत्येक राज्यातून एका विद्यार्थी विद्यार्थीनीची निवड करण्यात आली. मराठी भाषेतील सर्वोत्तम निबंधासाठी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदीया शाळेच्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या प्रार्थना रानडेला हा पुरस्कार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रार्थनाला ३० हजार रूपये रोख, एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला. तसेच, प्रार्थनाला केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने यावर्षी जून महिन्यात जपानमध्ये अभ्यास सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे.
प्रार्थना या यशाबद्दल सांगते, ‘ मी हा निबंध लिहिला तेव्हा मला वाटलंही नव्हतं की माझी निवड होऊन मला राष्ट्रीय सन्मान मिळेल. मी ५वी पासूनच निबंध लेखन स्पर्धेत भाग घेत आली त्यातील हे सर्वोच्च यश आहे. मला मंत्रालय जपानच्या अभ्यास सहलीसाठी पाठवित आहे. या सहलीमधे तेल व वायू संवर्धनासाठी जपानमधे सुरु असलेल्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून आपल्या राज्यात व देशात त्याचा कसा फायदा होऊ शकेल यावर अभ्यास करेन. मी माझ्या घरापासून त्याच्या अमंलबजावणीसाठी प्रयत्न करेन. माझं शहर, माझा जिल्हा, राज्य व देश सुंदर बनविण्यासाठी मला या पुरस्कार स्वरुप मिळालेल्या सोयींचा उपयोग करेन.’ प्रार्थनाचे विचार ऐकत असताना डिआरडीओच्या सभागृहात उपस्थित तिचे डॉक्टर वडील प्रवीण रानडे व निवृत्त शासकीय कर्मचारी आई प्रतिक्षा रानडे, शाळेच्या शिक्षिका शोभा पालवे यांच्यासह माझा ऊर स्वाभीमानाने भरून आला. महाराष्ट्राचा हा असा दुहेरी सन्मान सदैव आठवणींच्या कप्प्यात जपावा असाच होता.
- रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

No comments:
Post a Comment