दिल्लीतील थंडी काही अर्थाने टोकाचीच.
ऑफीस
होत. त्यात कळल तत्कालीन महिला व बालकल्याण विकास मंत्री वर्षा गायकवाड
दिल्लीत आल्या आहेत . मग त्यांची बैठक कुठे व कशासाठी आहे याची माहिती
घ्रेण्यासाठी घाईघाईतच फोन लावले. त्यातून
कळल की, लोधी रोडवरील इडिया इंटरनॅशनल सेंटरला एक बैठक आहे. ऑफीसची
गाडी आणि फोटोग्राफरला घेऊन बैठकस्थळी पोहचण्यासाठी निघालो. मंत्री महोदय
येण्या आधीच पोहचलो. हे दिल्लीतील Unicef च कार्यालय
होत. भडक मेकअप,
उत्तमसाडी,
केशसंभार,
आणि
भक्कम शरीरयष्टी असलेली एक व्यक्ती डोळयासमोर आली आणि
लगेच डोळयासमोरून ओझरती निघून गेली ती व्यक्ती होती ‘लक्ष्मी
नारायण त्रिपाठी’. बैठकीचा विषय होता ‘महाराष्ट्रात
महिला धोरण तयार करण्याचे काम आणि त्यात तृतीय पंथींयाचा सहभाग व त्यांच्या विषयी
धोरण’.
लक्ष्मी नारायण
त्रिपाठी, यांच्याशी या बैठकीनिमित्त गप्पा मारण्याची संधी मिळाली. तोपर्यंत
ही व्यक्ती कोण? तीचं कार्यक्षेत्र याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ
होतो. मंत्री महोदयांशी लक्ष्मीचा सरळ आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद आणि या
कार्यालयात unicef च्या अधिका-यांसोबत वागण्या बोलण्यातून लक्ष्मी
विषयी एक वेगळच इंप्रेशन माझ्या मनात तयार झाल. ही व्यक्ती काहीतरी वेगळी आणि प्रंचड
प्रतिभा असणारी व्यक्ती असल्याच सारख जाणवत होत. मग या
बैठकीसंदर्भात काही फोटोग्राफ काढण्याचे निर्देश मी फोटोग्राफरला केलेत. आणि
बैठकीविषयी माहिती विचारायला मंत्रीमहोदयांकडे गेलो त्यांनीही मला ओझरती माहिती
दिली. पण अजूनही
माझ्या आयडीया काही स्पष्ट होत नव्हत्या त्यात मंत्रीमहोदयांची आणखी काही बैठक आहे
का ? तस असेल तर
ती ही कव्हर करावी लागेल असा दुसरा प्रश्नही डोक्यात होताच. तितक्यात
लक्ष्मी ही मंत्री महोदयांना निरोप देण्यासाठी आली. निरोप देऊन झाल्यानंतर मी लगेचच
त्यांच्याशी बोलता झालो. मॅडम म्हणत मी सुरूवात केली. ही
बैठक त्यातील आपली भूमिका? त्या उत्तरल्या महाराष्ट्रात महिला धोरण
तयार करण्यात येत आहे त्यात तृतीय पंथीयाचाही सहभाग असावा असच आम्हा तृतीयपंथीयांची
मागणी आहे. राज्य शासन त्याबाबत अनुकुल असून unicef च्या
मदतीने आम्हाला यात आवश्यक मदत करण्याच्या शक्यतांवर ही बैठक होती. 'ओके डियर, आय गॉट लेट हा माझा नंबर घे आणि काही विचारायच असल्यास फोन कर' असं म्हणून ऑडीगाडीतून
लक्ष्मी निघून गेली. मग मी ऑफीसमधे आलो आणि सर्वात आधी गुगलवर सर्च
केल लक्ष्मी नारायण त्रिपाठी. तर भला मोठा परिचय समोर आला.
लक्ष्मी नारायण त्रिपाठी हा ठाण्यातील एका उच्च्ाभ्रू कुटुंबात जन्मलेला पण
नैसर्गिकरित्या आलेल वेगळपण. पण यावर मात करत आपल्या सारख्या
देश-विदेशातील असंख्य सहका-यांसाठी लढा देणारा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर
त्यांच नेतृत्व करणारा अर्थात करणारी लक्ष्मी. उत्तम नर्तक, इंग्रजी- हिंदी
व मराठीवर हुकमत असणारी, विविध संघटनांशी जुळलेली, चित्रपट,
नाटकांमधे
भूमिका वठवलेली, राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी जिच्या
कामाची दखल घेतली. जिने व जिच्यावर पुस्तक लिहीली गेली त्याही
पेक्षा जिला आदर्श ठेवून असंख्यांनी स्वत:ला सावरल अशी लक्ष्मी.
आज (दिनांक ९
जानेवारी २०१६ ) दिल्ली अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळयात वाणी
प्रकाशनाच्या दालनात माझ्या हाती एक पुस्तक लागलं. त्याच नावं ‘मै हिजडा लक्ष्मी’ हे लक्ष्मी नारायण त्रिपाठीवरील
आत्मचरित्रात्मक पुस्तक होत. या पुस्तकावर ओझरती नजर मारली तेव्हा
लक्ष्मीसोबत झालेल्या भेटीची आठवण मनात तरळली
पुस्तकात लक्ष्मीचे लहानपनीचे तारूण्यातील
व विविध आंदोलनातील सहभागांचे छायाचित्र दिसले. मग हळूच
पुस्तकात डोकावल तेव्हा ओळ वाचण्यात आली , ‘ वयाच्या ७
व्या वर्षी माझे पहिल्यांदा शारीरिक शोषण झाले. नात्यातील
एका लग्न समारंभात मी गेलो होतो. एका मुलाने माझ्या निरागसपणाचा फायदा घेत
माझ्यावर जबरदस्ती केली. मग जेव्हाही त्या नातेवाईकांकडे जायचो
तेव्हा हा प्रकार सतत होयी सतत ३ वर्ष हा अन्याय मी सहन करीत राहिलों. खूप
वेदना होत होत्या. पण यातून सुटका करण्यासाठी स्वत:च धाडस करून
विरोध केला. त्याचा परिणाम झाला. मग
घरातल्यांनीही मोठया मनान माझ्या नैसर्गीक भावभावना व शरीरिची ठेवन लक्षात घेऊन
मला मुला पेक्षा मुलगी म्हणून माझ्यात प्रबळ भावनांना वाट मोकळी करून दिली.
यातून
घडत गेलेली लक्ष्मी या पुस्तकात मांडली आहे.’
लक्ष्मीशी भेट
झाल्यानंतर तीने फोन नंबरही दिला. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
एखाद
दिवशी भेटून तिच्या आंदोलनाविषयी, झुंजीविषयी जाणून घेण्याची इच्छा होती.
पण त्यानंतर लक्ष्मीची भेट झालीच नाही.
दिल्लीतील भेटीत समाजाने नाकारलेल्या अशा
लोकांमधील सर्वोच्च प्रतिभेच्या व्यक्तीशी भेट झाल्याचा तो क्षण माझ समाजातील या
प्रश्नाविषयी ज्ञानात भर घालून गेला. लक्ष्मीच्या निमित्ताने आता इथे एक अनुहत
उल्लेख करावासावाटतो. १० फेब्रुवारी ते १० मार्च २०११ या कालावधीत
केंद्र सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालयांतर्गंत कार्य करणा-या दिल्लीतील अशोक
रोडवरील ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात’ आयोजित
देशातील विविध राज्यांतील लोककलांतून मांडण्यात आलेला ‘महाभारत
महोत्सव’. या महोत्सवात मी महाराष्ट्रातील नारदिय किर्तन परंपरेचे दर्शन
घडविणा-या चमुचा समन्वयक म्हणून काम पाहिल, तेव्हा या महोत्सवात सहभागी
तामीळनाडूतील ५० तृतीय पंथींयाचा सहभाग असलेल्या चमुशी माझा परिचय झाला. यात
सहभागी प्रत्येकाची वेगळी स्टोरी होती. पण मला माझ्या चमुच
प्रतिनिधीत्व करताना आणि सोबतच माझा दैंनंदिन पत्रकारितेचा व्यवसाय सांभाळताना तृतीयपंथींयांच्या चमुशी संवाद साधण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र
काही प्रशासकीय बाबींसाठी मला माझ्या चमुचे प्रश्न सोडविताना या चमुलाही मदत करता
आली त्यातच या चमुतील काहींशी संवाद करता आला. बहुतेक जण आपल्याकुटुंबापासून लांब राहतात
पण कुटुंबाच्या वहनात मोलाची जबाबदारी पाळतात, त्यांना
पोलीसांकडून व काही वेळा ग्राहकांकडून मारपीट होत असल्याचे ते सांगत होते. त्यांच्यात
रूढ असलेली गुरु-शिष्य परंपरा, तामीळनाडू
सरकारचे या लोकांसाठी शिथील असलेले शैक्षणीक धोरण व त्यांना देण्यात आलेल्या अन्य
सोयीसुविधा परिणामी यातील बहुतेक लोकांनी पूर्ण
केलेले पदवीपर्यंतचे शिक्षण, समाजाच्या
मुख्यप्रवाहात येण्यासाठी त्यांची असलेली धडपड अशा विविध गोष्टी मला त्यांच्या
सेाबतच्या संवादातून कळल्या.
हा सर्व लेखन प्रपंच
करत असताना, समाज म्हणून आपल असलेल वेगळपण.
यात कुणाला आपली जाती, धर्म निम्न असल्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची
भावना तर निसर्गानेच वेगळपण बहाल केलेल्या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांच वेगळपण
नाकारणा-या समाजात आपण राहत असल्याचा व त्यात आपल्या वागण्याला किती मर्यादा असतात
याची सारखी जाणीव होते. समाजाने
नाकारलेल्या पण ताठ मानेने जगणा-या लक्ष्मी सारख्या असंख्य माणसांना सलाम.

No comments:
Post a Comment