Monday, August 24, 2015

‘शिव आरोग्य सेवेचे’ राजधानीत कौतुक



दिल्लीत पावसाचा जोर.. त्यात आज (दिनांक १३ ऑगस्ट २०१५) 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. पहाडगंज या मध्यवर्ती वस्तीत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा व्हॅल्यूएबल स्टुडियो. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार अरविंद सावंत आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन स्टुडिओत सकाळी ८ वाजता हजर. ही मंडळी येथील व्यवस्थेचे बारकाईने निरीक्षण करीत होते आणि याचवेळी महाराष्ट्रातील मेळघाट या दुर्गम व आदिवासी बहुल भागात सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचे एक पथक आणि मुंबईतील स्टुडिओत तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक हजर होते. या तीनही स्टुडिओंचा परस्परांमधील समन्वय स्वत: मंत्रीमहोदय जातीने बघत होते. ठरल्या वेळेप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डांचा ९.३० वाजता स्टुडिओत प्रवेश झाला. ही सर्व लगभग होती महाराष्ट्र राज्याच्या शिव आरोग्य सेवाया टेली मेडिकल कॅम्पद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याबाबतचे सादरीकरण करण्याची. 

राजधानीत पूर्वीच्या योजना आयोग आणि आता बदललेल्या निती आयोगाकडून राज्याकरिता निधी मागण्यासाठीच्या सादरीकरणाचा मी साक्षीदार. पण, राज्याच्या आरोग्य सेवेतील प्रगतीबाबत स्वत: राज्याचे आरोग्य मंत्री आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्य क्षेत्रातील प्रयोग केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सहभागी करून सादरीकरण करण्याचा हा दुर्मीळ पण राज्याच्यादृष्टीने तेवढाच महत्वाचा प्रसंग. हे सादरीकरण केंद्रीय मंत्र्याना खूपच आवडले आणि त्यांनी शिव आरोग्य सेवेचेतोंडभरून कौतुक केले.

सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्रासाठी शिव आरोग्य सेवाही योजना. आणि टेली मेडिकल कॅम्पद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णावर कशा प्रकारे उपचार करता येतील याचे यशस्वी सादरीकरण. शिव आरोग्य सेवेच्या माध्यातून महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे एक क्रांतिकारक पाऊल पुढे टाकले आहे. 
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिव आरोग्य सेवेअंतर्गतथेट प्रक्षेपणाद्वारे टेली मेडिसीनसेवेचे सादरीकरण केले. यावेळी दिल्लीतील स्टुडिओत प्रत्यक्ष केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत तर मुंबई येथील स्टुडीओत हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे, बालरोग तज्ज्ञ डॉ.अवस्थी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.स्वप्निश सावंत, उरोतज्ज्ञ डॉ.ना.म.जोशी या तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू आणि सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध आजाराने ग्रस्त रूग्ण व त्यावर उपचार करणारे डॉक्टर्स यांचा सहभाग होता.

यावेळी झालेल्या सादरीकरणाप्रसंगी सर्वप्रथम सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात तनजीम शेख रशिद या ८ महिन्यांच्या बालकाची डॉक्टरांनी तपासणीकरून आजाराची पार्श्वभूमी व विविध चाचण्यांबाबत माहिती दिली. त्यानुसार रूग्णाचे वजन कमी असून कुपोषणाची लक्षणे दिसून आले तर बालकाच्या आईचे वजनही कमी असून तिलाही कुपोषण असल्याचे लक्षण दिसून आले. त्यादृष्टीने मुंबई स्टुडीओतील तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी बाळाला सकस पोषण आहार देण्याचा, स्तनपान व परंपरागत आहार देण्याचा सल्ला देत पुढील उपचारांबाबत निर्देश दिले. बाळाच्या आईलाही पोषण आहार देण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर सादरीकरणात वयोवृद्ध महिला मिथान भिसांडरे यांच्या डोळ्याच्या आजाराबाबत निदान व उपचारांबाबत चर्चा झाली. निदानासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे कागदपत्र यावेळी प्रत्यक्ष स्क्रीनवर दिसत होती त्याआधारे तज्ज्ञ डॉक्टर्स सल्ला व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करीत होते. श्री.कृष्णा या वयोवृद्ध रूग्णाबाबत चर्चा झाली. हृदयात सारखं दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. यावेळी सेमाडोह येथील डॉक्टरांना दिल्लीतील स्टुडिओत बसलेल्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि मुंबई स्टुडीयोतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदीप राणे यांनी रूग्णाच्या छातीला टेथॅस्कोप लावण्यास सांगितला. यावेळी रूग्णाच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकायला येत होते. यावरून तज्ज्ञ डॉक्टरांनी निर्देश दिले व रूग्णाच्या इसीजी चाचणीबाबत विचारणा करून तो दाखविण्यास सांगितले. हा रिपोर्ट बघून त्यांनी पुन्हा सेमाडोह येथील डॉक्टरांना रूग्णावरील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. अर्थात रुग्णाचा रक्तदाब, ईसीजी, सीटीस्कॅन रिपोर्ट, डोळ्याच्या इमेज पाहून त्याचे निदान कसे करता येऊ शकते हे प्रत्यक्षात मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून दिसत होते.
या सादरीकरणादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी डॉक्टर व रूग्णांशी संवाद साधला. सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण आणि डॉक्टर्स तसेच मुंबई येथील स्टुडीओत बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली शिव आरोग्य सेवादुर्गम भागातील रूग्णांना संजीवनी ठरली असल्याची प्रशंसा श्री.नड्डा यांनी यावेळी केली. देशातील टेली मेडिसीनकार्यक्रमात शिव आरोग्य सेवेचेमोलाचे आणि सरस योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या कौतुकाच्या थापेने या योजनेला यशस्वी करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व मंत्रीमहोदयांचा उत्साह वाढला आणि या योजनेच्या यशस्वीतेकडे जाण्याचा राजमार्ग प्रशस्थ झाला अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. 
सादरीकरण्याच्यावेळी राज्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशसकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व होते. सर्वश्री खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अरविंद सावंत, कृपाल तुमाने आणि महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक श्रीमती आय.के. कुंदन यांची याप्रसंगी उपस्थिती राज्याचा दिल्लीतील आवाज बुलंद करण्यासाठी पुढे आलेल्या नेतृत्वाचे चित्र बघणे उर अभिमानाने भरून आणणारे होते.

रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली.

Thursday, April 23, 2015

मरण स्वस्त झालय, अन मानवी भावना ?











मराठी साहित्यात आपल्या लेखनातून मानवी भाव-भावनांचे कंगोरे उलगडून दाखवत साहित्य प्रांतात वेगळी छाप सोडणारे  लेखक आबा बागूल यांच्या 'मरण स्वस्त होत आहे' या साहित्यकृतीची आठवण व्हावी अशीच घटना काल दिनांक २२ एप्रिल २०१५ रोजी  दिल्लीतील जंतरमंतर येथे घडली. राजस्थान राज्यातील दौसा येथील शेतकरी गजेंद्र सिंह याने भर दूपारी येथील भल्या मोठया निंबाच्या झाडावर चढून आपल्याच दुपटटयाने गळफास लाऊन घेतला. हे घडत असताना त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाची सभा सुरु होती. सभेसाठी आलेले लोक, सतत इथे बंदोबस्तासाठी राहणारे जवळ पास २० ते २५ पुरूष व महिला पोलीस अन वार्तांकन करायला येणारे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अशा जवळपास १० हजार लोकांसमोर हा आत्महत्येचा थरार घडला. पण एकालाही आपल्या कर्तव्याची  अन माणुसकीची जाणीव  होऊ नये?  म्हणूनच वाटतय मरण स्वस्त झालय अन मानवी भावनांवरही आता  प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे.

                     दिल्लीत पत्रकारीतेसाठी आलो तेव्हाच जंतर मंतर येथे होणारे धरणे आंदोलन बघने, त्याची व्याप्ती समजून घेणे अन वार्तांकन करने हा नित्यक्रम असायचा. आज माझं ऑफीस जंतर मंतरच्याच परिसरात आहे. हा भाग संसद, राष्ट्रपती भवन, आकाशवाणी, पीटीआय, युएनआय, जनतादल (सं.) चे मुख्यालय, केरळ भवन यांना हाकेच्या अंतरावर आणि कॅनॉटप्लेस या दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. संसदेच्या अधिवेशनाच्यावेळी देशाच्या विविध भागातील लोकं आपल्या मागण्या सरकार दरबारी  पोचविण्यासाठी इथे धरणे आंदोलन देतात. यावेळी त्या-त्या भागातील नेते मंडळी संसदेच्या कामकाजा निमित्त दिल्लीत  उपलब्ध असल्याने धरणे आंदोलनात भाषणबाजी ही करतात. धरणे संपले की मग संबंधीत मंत्रालयाच्या मंत्र्याला किंवा सचिवाला भेटून धरणेकरी निवेदन सोपवतात. अन मग त्या निवेदनाचा पाठपुरावा करतात. धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. अन त्यानंतर त्यांना  इथे पोलिस संरक्षणही मिळते. दिल्लीतील  माझ्या वास्तव्यात  जंतर मंतर वरील समाजसेवक अन्ना हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठीचे  आणि निर्भयासाठी झालेले धरणे आंदोलन हे देश-विदेशात पोचल्या‍चे मी बघीतले. यावरून जंतर मंतरचा अन धरणे आंदोलनाचा सहसंबंध आपणास लक्षात आला असावा.
                        माझ्या दिल्लीतील ७ वर्षांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच जंतरमंतर वर आत्महत्येची घटना घडल्याचे बघीतले. पण, ही आत्महत्या एका गरीब शेतक-याची आहे. जी देशातील प्रत्येक मानसाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडणारी आहे.
                         या घटनेच्या ठिकाणच्या परिस्थितीवर प्रकाश टाकता ते अधिक स्पष्‍ट होईल. याठिकाणी आम आदमी पक्षाची भूसंपादन विषयावरील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मोठया संख्येने लोक इथे एकत्र झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी  इथे नेहमी प्रमाणे मोठया प्रमाणात पोलिस उपस्थित होते. तसेच, आम आदमी पक्षाच्या रॅलीेचे वार्तांकन करण्यासाठी आलेले प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विशेषकरून इलेक्ट्रॉनीक मिडियाचे कॅमेरामन आणि प्रिंट मिडीयाचे फोटोग्राफर इथे उपस्थित होते अन त्यांच्या देखत राजस्थानातील शेतकरी गजेंद्र सिंह याने गळफास लाऊन आपला जीवन प्रवास संपवला.  इथे अधोरेखीत करावसं वाटतं हा प्रकार घडत असताना ज्या पोलिसांनी खाकी वर्दी  परिधान करताना आपल्या विभागाच्या "शांती सेवा न्याय" या ब्रीदाला जागून कर्तव्य करण्याची शपथ घेतली होती ती पूर्ण न करता   त्यांनी नाकर्तेपणा दाखवला. ज्या 'आम आदमी पक्षाने' आपल्या पक्षाचे नावच सर्व सामान्य माणसाच्या  हितासाठी लढा देऊ या सदहेतुने देत हा पक्ष उभा केला त्याच्या एकाही सदस्याला आम आदमीचा कळवळा आला नाही . शोकांतीका तर त्याही पलीकडे आहे ही रॅली मुळात शेतक-यांच्या मागण्यासंबंधात होती. म्हणजे मुख्यमंत्र्यासहीत अन्य मंत्री व पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित  होते पण एकालाही आपल्या कर्तव्याची जाणीव झाली नाही . सर्वांनी हा आत्महत्येचा थरार घडत असताना भाषणबाजी करण्यात धन्यता मानली. इथे शेतक-यांच्या प्रश्नांची फार कमी जान असलेल्या शहरी तरूण पिढीला आत्महत्या करणारा शेतकरी दिसत असताना हा प्रसंग रोखता आला नाही. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या आत्महत्येच्या प्रत्येक क्षणाचे चित्र टिपत होते. राष्ट्रीय वृत्तपत्र पंजाब केसरी अन दैनिक जागरण चे छायाचित्रकार अनुक्रमे हरी प्रकाश आणि ध्रुव कुमार यांनीही पत्रकारीतेतील नैतिकतेला बगल देत आपल्या बेगडी कर्तव्याला प्राधान्य दिेले. ( Photo & Photo Caption in Punjab Kesari :  पहले पेड पर चढकर किया ऐलान, मोबाइल पर की किसी से बात, लिखा अंतीम पत्र, लगाई फाँसी और फंदे पर झूल गया गजेंद्र)
               हा सर्व वृत्तांत आपल्यापुढे ठेवला त्याच विश्लेषण आपणच करा. अन " मरण स्वस्त झालय अन मानवी भावना ?" या ओळीचाही अंतर्मूख होऊन विचार करा.

Monday, February 2, 2015

राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे : देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी


                                                                                                             गुरुवार, २९ जानेवारी, २०१५
प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित पथसंचलनात नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकांचे नेतृत्व करणारे अमन जगताप व खुशबू जोशी हे महाराष्ट्राचे तारे चमकले. महाराष्ट्रातर्फे देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची मिळालेली ही संधी आयुष्याला नवे वळण देणारी आणि आयुष्याच्या यशकथेची सुरूवात ठरेल, अशी भावना या दोघांनीही व्यक्त केली आहे.

अहमदनगर महाविद्यालय अहमदनगरच्या बीकॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी अमन जगताप याने पहिल्यांदाच एनसीसीत भाग घेतला. एनसीसीचे अनिवार्य कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करत अल्पावधीतच त्याने राजपथावरील पथसंचलनात देशभरातील ३०० कॅडेट्सचे नेतृत्व करण्याचे कठीणतम लक्ष्य साध्य केले. मुंबई विद्यापीठाच्या व्हीपीएमआरझेड शाह महाविद्यालयात बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुंबईच्या खुशबू जोशीनेही एनएसएसच्या १६० सदस्यीय दलाचे नेतृत्व करून महाराष्ट्राला दुहेरी बहुमान मिळवून दिला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह गणमान्य व्यक्ती व राजपथावरील अलोट जनसमूहाच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा प्रेरणादायी आणि आयुष्यभर आठवणीत राहणार असल्याचे हे दोघे सांगतात.

येथील कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरातील डिजी एनसीसी आर्मी परेड ग्राऊंडवर १ जानेवारी पासून सुरु झालेल्या देशभरातील १७ विभागातील २०७० एनसीसी कॅडेट्समधे चमकून उठण्याचे आव्हान अमन जगताप समोर होते. महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेट ठरलेल्या अमनने त्याचे शिक्षक वडील डॉ. हनुमंत जगताप यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे व आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या शिबीरात प्रवेश केला, असं तो अभिमानाने सांगतो. उत्तम ड्रील, उत्तम गायन, नृत्य आणि वक्तृत्व या अमनच्या जमेच्या बाजू. तुलनेने थोडे कमजोर असलेल्या सामान्य ज्ञानावर त्याने मनोरमा इयर बुक आणि क्रॉनीकल स्पर्धा पुस्तकाच्या माध्यमातून मात केली. त्याने शिबिरातील फ्लॅग एरिया स्पर्धेत महाराष्ट्रात साजरा होणारा गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान, संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या अभंगाचा लोक जीवनावर प्रभाव, राज्यातील गढ-किल्ले आणि बॉलीवूडबाबत माहिती देऊन प्रथम क्रमांक पटकवला. राजपथावरील पथसंचलनासाठी शिबिरात १० जानेवारी २०१५ ला एकूणातून २०० कॅडेट्सची निवड झाली. त्यातील १५० मुलांची अंतिम निवड करण्यात आली. अशाच पद्धतीने मुलींचीही निवड होऊन राजपथावर एकूण ३०० कॅडेट्स परेड करणार आणि त्यात महाराष्ट्रातील १७ मुले आणि १७ मुली असणार हेही निश्चित झाले. महाराष्ट्रातून 76 मुले आणि ३७ मुली असे एकूण ११३ एनसीसी कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले होते.

आता खरी शर्यत होती ती राजपथावरील पथ संचलनाच्या नेतृत्वासाठी कोणाची निवड होते याची. या शर्यतीत बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रातून अमन आणि कोल्हापूरचा सैफअली नदाफ हे कॅडेट्स होते. अशात नवीन आव्हान सुरु झाले. १७ जानेवारी २०१५ पासून शिबिरापासून जवळपास १० ते १२ किमी लांब अंतरावर असणाऱ्या राजपथावर प्रत्यक्ष परेड करण्याचे ते आव्हान होते. यासाठी रात्री १ वाजता उठून आम्ही सर्व आवरून २ वाजता कॅम्पमधून बाहेर पडायचो. ३.३० ला राजपथावर आल्यानंतर आमच्याकडे बंदूक असल्याने कसून तपासणी व्हायची. त्यानंतर पहाटे ४ वाजता पासून आम्ही राजपथाच्या अडीच किमी रस्त्यावर परेड करायचो. दुपारी १२ वाजता परेड करून शिबीर स्थळी पोहचायचो. १७ जानेवारीलाच माझा गळा खराब झाला, त्यामुळे राजपथावरील नेतृत्वाची संधी हुलकावनी देणार की काय असं वाटून गेलं. पण तेलकट खानं बंद करून आणि नियमीत मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून त्यावर मात केली. अखेर २३ जानेवारीच्या राजपथावरील फुल ड्रेस परेडचे नेतृत्व माझ्याकडे आले, अन् तेव्हाच मी २६ जानेवारीच्या पथसंचलनात एनसीसीचे नेतृत्व करणार हे स्पष्ट झाल्याचे अमन सांगत होता. २६ जानेवारीचा दिवस उजाडला. आता राजपथावर पाय ठेवताना वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावण्याचे ध्येय समोर ठेवून आतापर्यंतचे सर्वोत्तम संचलन केल्याचे अमन सांगतो. या शिबिरातील विविध स्पर्धा अन परेडवरील आपल्या हुकमतीमुळे आर्मीच्या बऱ्याच ऑफीसर्सशी बोलून मनातील शंका दूर झाल्या. आता आपल्याला पदवी शिक्षण पूर्ण करून आर्मीच्या आर्टेलरी विभात अधिकारी बनायचे असल्याचे सांगत त्यासाठी राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करण्याची संधी खूप मोठी उपलब्धी असल्याचेही अमन सांगतो.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पहिल्या वर्षात असतानाच खुशबू जोशीला प्रजासत्ताक दिन पथसंचलन प्रशिक्षण शिबिरातून परत आलेल्या आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्या अंगावरही प्रजासत्ताक दिनाचा कोट असावा असे सारखे वाटायचे. समाजसेवेची आवड असल्यानेच खुशबूने एनएसएसमधे भाग घेतला. नागपूर, अमरावती आणि आंध्रप्रदेशातील राजमंड्री येथील प्रजासत्ताक दिन पूर्व शिबिरात सहभाग घेऊन तिने बेस्ट एनएसएस स्वयंसेवकाचा मान मिळवला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्पोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व शिबिरात महाराष्ट्रातून सहभागी ७ मुले आणि ७ मुली आणि गोव्यातील २ मुले-मुली अशा एकूण १६ स्वयंसेवकांमधे माझा समावेश होता, असे खुशबू सांगते. देशभरातील ५ विभागातून २०० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. यातील १६० जणांची निवड राजपथावरील अंतिम पथसंचलनासाठी झाली होती. नियमित सरावात खुशबूला पथसंचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. अन् इथेच तिला राजपथावरील पथसंचलनासाठी आपली निवड होईल असे वाटले. या निवडीच्यावेळी तिला हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकी एक अशा तिघांचे आव्हान होते. खुशबू ने आलेली संधी दवडायची नाही याची खूणगाठ मनात बांधून पथसंचलनाचा सराव केला. पथसंचलनाच्या घोषणा देण्यासाठी मैदानावर जाऊन तासन् तास सराव केला. तेलकट पदार्थ वर्ज्य केले, असेही ती सांगते. खुशबूच राजपथावर एनएसएसच्या पथकाचे पथसंचलन करणार हे २३ जानेवारीच्या फुल ड्रेस परेडमधे निश्चित झाले.

“२६ जानेवारीच्या सकाळी राजपथावर पहिले पाऊल ठेवले तोच तीन वेळा माझ्या नावाची घोषणा झाली. पण मला माझं नाव आणि आडनाव ऐकू येत नव्हतं.... फक्त माझ्या वडिलांचं नारायण हे नाव ऐकायला येत होतं.... तेव्हा मला फक्त वडिलांसाठी आणि माझ्या राज्याच्या नावासाठी राजपथावर चालायचे आहे हे ठरवून मी पथसंचलनाचे नेतृत्व केले.” हे सांगताना खुशबू भावूक झाली होती. खुशबूचे वडील नारायण जोशी हे एका खाजगी कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत आहेत तर तिची आई लीना जोशी या व्यावसायिक आहेत. खुशबूला भारतीय परराष्ट्र सेवेत जायचे असून राजपथावर पथसंचलनात नेतृत्व करण्याचा अनुभव आपल्या आयुष्याला महत्वाचे वळण देणारा ठरल्याचे खुशबू सांगते.

एकूणच अमन आणि खुशबू यांनी राजपथावर एनसीसी आणि एनएसएस परेडमध्ये नेतृत्व करण्याची मिळविलेली संधी ही त्यांनी ध्येय समोर ठेवून केलेल्या परिश्रमांचे फलितच म्हणावे लागेल. त्यांनी मिळविलेले हे यश आयुष्यासाठी ठरविलेले ध्येय गाठण्यासाठीची सुरूवात ठरणार, हे निश्चित.

-रितेश मो. भुयार
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Tuesday, January 27, 2015

राजपथावर महाराष्ट्राचे दमदार प्रदर्शन


मंगळवार, २७ जानेवारी, २०१५
राष्ट्रपती पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत सोमवारी राजपथावर पार पडलेल्या 66 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे दमदार प्रदर्शन बघायला मिळाले. ‘पंढरीची वारी’ दर्शविणारा चित्ररथ, गोंधळनृत्य आणि लेझिमच्या ठेक्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. वीरता पुरस्कार प्राप्त अश्विनी उघडेचे अभिवादन, एनसीसी पथकाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा अमन जगताप आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करणारी खुशबू जोशी हे ही या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले.

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी शहरात कोसळलेला पाऊस, जोडीला असलेली थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. वातावरण निवळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन होऊन इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योतीला देशबांधवाकडून आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामांचे राजपथावर आगमन झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि 21 तोफांच्या सलामीने प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनास राजपथावर सुरूवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री यावेळी उपस्थित होते. भारताची शस्त्र सज्जता दर्शविणाऱ्या सेनेच्या तीनही दलांचे आकर्षक चित्ररथ, सेनेच्या सैनिकांचे आणि बॅंड पथकांचे पथसंचलन, सीमा सुरक्षा दळाचे घोडदळ, उंटदळ यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांच्या टाळ्या मिळवत होते.

विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या चित्ररथांच्या पथसंचलनास सुरुवात होताच उपस्थितांचा उत्साह टिपेला पोचल्याचे चित्र होते. ‘पंढरपूरची वारी’ दर्शविणाऱ्या चित्ररथाचे राजपथावरील आगमन उपस्थितांच्या जोरदार टाळ्या मिळवून गेले. या चित्ररथाच्या दर्शनी भागात तुळस घेऊन वारीला निघालेली स्त्री, पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मंदीर, रिंगन घालणारे घोडे आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या आकर्षक प्रतिमा. चित्ररथा सोबत 31 कलाकारांनी ‘विठ्ठल विठ्ठलच्या’ गजरावर घेतलेला ठेका पाहता विंगेत बसलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी उभे राहून अभिवादन केले.

असामान्य शौर्य दाखविणाऱ्या देशभरातील वीरता पुरस्कार प्राप्त 24 मुला-मुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. बिबट्याच्या तावडीतून धाकट्या बहिणीला वाचविणाऱ्या अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावच्या अश्विनी उघडेचा वीर बालकांमधील समावेश महाराष्ट्राचा गौरव ठरला.

एनसीसी कॅडेट्सच्या राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा अमन जगताप कौतुकाचा विषय ठरला. अहमदनगर महाविद्यालय अहमदनगरच्या अमन जगतापची महाराष्ट्राच्या एकूण 113 एनसीसी कॅडेट्स सह 2700 कॅडेट्समधून निवड झाली होती. अमनने 300 सदस्यीय कॅडेट्सचे नेतृत्व केले. तर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या शाह महाविद्यालयाच्या खुशबु जोशीने महाराष्ट्राला नेतृत्वाचा दुहेरी मान मिळवून दिला. महाराष्ट्र व गोव्यातील 15 स्वयंसेवकासह 160 सदस्यीय एनएसएस पथकाची खुशबू जोशी ही महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा मिळवलेली उपलब्धी आहे. धनंजराज मुंडे याने गेल्यावर्षी राजपथावर एनएसएस पथकाचे तर धनराज लहाने याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते.

महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गोंधळ नृत्याच्या सादरीकरणाला यावेळी उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जनकपुरी येथील शासकीय कन्या शाळेच्या 180 मुलींनी गोंधळनृत्य सादर केले. नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या 180 मुलींनी खेळ व क्रीडावृत्तीच्या प्रसाराचे प्रतिक असणाऱ्या लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. पांरपरिक वेशभूषेतील या मुलींनी सादर केलेल्या लेझीम नृत्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सीमा सुरक्षा दळाच्या बायकर्स आणि वायुदळाच्या चित्तथरारक कसरतीनंतर राष्‍ट्रगीताने राजपथावरील पथसंचलनाची सांगता झाली.
-रितेश भुयार

राजपथाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची शान


शनिवार, २४ जानेवारी, २०१५
देशाच्या राजधानी दिल्लीत दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव दिमाखात साजरे होतात. प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्रता दिन. दोन्हीही उत्सव देशवासियांचे ऊर अभिमानाने भरून यावे या ताकदीचे. प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी राजपथावर (इंडियागेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा जवळपास साडेतीन किमी मुख्य रस्ता) देशाच्या शस्त्रसज्जतेचे व सांस्कृतिक वैविध्यतेतून एकतेचे दर्शन घडवितो. दरवर्षी या कार्यक्रमास बाहेरील देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची परंपरा आहे.

      यावर्षी प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत. त्यामुळे देशाभिमान वाढविणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजपथावरील पथसंचलनात भारताच्या विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी बहुतांश वेळा प्रथम क्रमांक मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
        यावर्षी राज्याच्या वतीने ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचा यावर्षीचा चित्ररथ कसा आहे?, याआधीच्या चित्ररथांची संकल्पना काय होती ? आणि राज्य सरकारकडून चित्ररथासाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावापासून ते राजपथावरच्या पथसंचलनातील सहभागापर्यंतची संपूर्ण प्रकिया काय आहे हे जाणून घेऊ या.

       राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत नौदल, वायुदल आणि सेनेचा बँड आणि सैनिक पथकाचे तसेच विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथाचे पथसंचलन पार पडते. राजपथावरील पथसंचलनात चित्ररथ प्रदर्शनाची सुरुवात १९५२ ला झाली. त्यावेळी फक्त ५ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात वाढ होऊन आतापर्यंत हा आकडा राज्यांचे जवळपास १६ तर विविध मंत्रालयांचे साधारण ६ असे एकूण २२ चित्ररथ असा होता. यावर्षी विविध राज्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता १६ राज्यांचे तर ९ विविध मंत्रालयांचे चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहे. गेल्या ६५ वर्षातील हा एक विक्रमही म्हणता येईल.

       महाराष्ट्राचा चित्ररथ हा ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. वारीत सगळया जाती धर्माचे लोक असतात यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतो. महत्वाचे  म्हणजे भारतात ज्या धार्मिक यात्रा आहेत, त्यापेक्षा पंढरीची वारी ही वेगळी आहे. येथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पिडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो. असा हा निरागस दृष्टीकोण असलेला भला मोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. केवळ ग्लॅमर नसल्याने पंढरपूरची वारी देशाला कळू शकली नाही. म्हणून राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीसमोर लावून धरण्यात आला. अखेर त्यास मंजुरी मिळाली.
    या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे दैवत अन् तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन घडणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 65 कारागिरांनी अतिशय देखणा चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री दाखविण्यात आली आहे. मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर दाखविण्यात आले आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुर्ती बसविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पतका, टाळ-मृदंग, विणेसह वारीत सहभागी 130 वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. या चित्ररथावर ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.... तुला साद आली, तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली...., वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली’ या गीतावर टाळ-मृंदग, वीणेच्या गजरात पंढरीची वारी सादर होणार आहेत. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कलाकारांचा चमू वारीतील सहभागी वारकऱ्यांचे नृत्यप्रकारांचे सादरीकरण राजपथावर करणार आहेत.

राज्याच्या वतीने अशी पार पडते प्रक्रिया 
      महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचालनालयाचे कार्य पार पडते एकुण हे १० टप्पे असतात. देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चित्ररथाबातचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र येते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यसरकारकडून चित्ररथा संदर्भातील प्रस्ताव पाठविला जातो. सप्टेंबर महिन्यात पहिली बैठक यात राज्याला किमान ४ - ५ विषय मांडायला सांगतात. नंतर त्यातील एक विषय निवडतात व त्यावर काम करायला सांगतात. नंतर ऑक्टोबरमधे दोन बैठका होतात यात पहिल्या बैठकीत विषय विस्ताराने मांडायला सांगतात.
      एकुणात तिसऱ्या बैठकीत राज्यातर्फे देण्यात आलेल्या संकल्पनेचे प्रारुप सादर करावे लागते. त्यातील ३-४ प्रारुपांपैकी एक प्रारुप निवडले जाते वा नवीन प्रारुप तयार करण्याच्या सूचना केल्या जातात. निवड समितीमध्ये चित्रपट, साहित्य, चित्रकला, स्थापत्य आदी विषयातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ असल्याने जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत चालणाऱ्या १० ते १२ बैठकांमध्ये राज्यातर्फे आपल्या चित्ररथाबाबत बाजु मांडण्यासाठी वैचारीक वादावादी भांडण होवून अखेर चित्ररथाची प्रतिकृती आणि चित्ररथासोबतच्या कला आविष्काराच्या सादरीकरणास मान्यता मिळते. येथूनच चित्ररथाच्या बांधणी व कला सादरीकरणाच्या तयारीला सुरुवात होते. त्यासाठी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट भागातील राष्ट्रीय रंगशालेच्या शिबीरात चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावाचे काम सुरु होते.

संरक्षण मंत्रालयाकडून चित्ररथास अशी मिळते मान्यता 
        चित्ररथाची निवड करताना नाविन्यपूर्ण विषय, विविध राज्यांतील संस्कृतिचे दर्शन, ईशान्येकडील राज्य व जम्मू आणि काश्मिर राज्याला जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या राज्यातील कला संस्कृति देशबांधवांना कळावी आणि या राज्यांनाही आपण भारत देशाच्या टोकाच्या भागात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना येऊ नये, हा यामागील उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती सांगतात. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने राज्याला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात येते. त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालया तर्फे ११ सदस्यीय समिती नेमण्यात येते. या समितीत संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि कला, दिग्दर्शन, स्थापत्य आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. राज्यांकडून एक ते दीड पानांचा चित्ररथासंबंधीत आलेख मागविला जातो. आपत्तीजनक संकल्पनाना कात्री लावली जाते तर काही संकल्पनांना सुधार करण्याचे निर्देश समितीकडून दिले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेतली जाते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चित्ररथाच्या प्रतीकृतीला मान्यता दिली जाते. निवड समितीची शेवटची बैठक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते याचवेळी चित्ररथांची अंतिम निवड केली जाते.
       पथसंचलनाचा कालावधी बघता एकूण २२ चित्ररथ असावेत याची काळजी घेतली जाते. यात देशातील एकूण २९ राज्यांपैकी १६ राज्यांचे चित्ररथ तर विविध केंद्रीय मंत्रालयाचे ६ चित्ररथ निवडले जातात. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नव्यानेच निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याचा चित्ररथ आणि प्रथमच २५ चित्ररथ आहेत.

 महाराष्ट्राच्या चित्ररथांवर एक दृष्टीक्षेप
     महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाच्या मानासह बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. दर्जेदार चित्ररथाची हिच परंपरा कायम ठेवत यावर्षी 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे.
         महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य की, चित्ररथाची प्रतिकृती त्याची बांधणी आणि सादरीकरणासाठीचे कलाकार हे राज्यातूनच दिल्लीत पाठवले जातात. अन्य राज्यांच्याबाबतीत तसे घडताना दिसत नाही म्हणूनच महाराष्ट्राचा चित्ररथ बहुतांशवेळा पुरस्कार विजेता ठरतो. राज्याच्या वतीने सर्वप्रथम १९७१ मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवार आधारीत चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला. ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ या संकल्पनेवरील १९८० मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. १९८३ मध्ये राज्यातर्फे प्रदर्शित ‘बैल पोळा’ विषयावरील चित्ररथाला सुध्दा प्रथम पारितोषिक मिळाले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. १९८८ मधे राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला’ याला द्वितीय पारितोषीक मिळाले होते. ‘लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषीक मिळवून दिले. २००७ मधे ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तृतिय तर २००९ मधे ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे.
        दर्जेदार चित्ररथाची हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी राजपथावर 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ देशबांधवाचे कौतुक मिळवत प्रथम पारितोषीकावरही आपली मुद्रा उमटेल हा विश्वास आहे.

रितेश मो. भुयार
उपसंपादक,
महाराष्ट्र परिचय केंद्र ,नवी दिल्ली.

अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल


गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

Sunday, January 18, 2015

व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राची उद्योग झळाळी…






देशातील व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या वाणिज्य व व्यापार मंत्रालयांतर्गंत कार्य करणाऱ्या व आंतरराष्ट्रीय ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनतर्फे (आयटीपीओ) येथील प्रगती मैदानावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. दिल्लीच्या मध्यभागी स्थित प्रगती मैदान हा १२३ एकराचा परिसर म्हणजे देश-विदेशातील व्यापारी, पर्यटक, ग्राहकांना भारतातील व्यापार आणि उद्योगाचं एकत्रित दर्शन घडण्यासाठी हे महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. 

भारतीय उपखंडात अगदी सन्मानाने नाव घेतल्या जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे हे ३४ वे वर्ष. देशातील विविध राज्यातील लघु, मध्यम व महिला उद्योजकांना आपल्या उद्योग-वस्तू प्रदर्शित करण्यासाठी आणि त्या त्या राज्याचे खाद्य पदार्थ व संस्कृतीच्या देवाण-घेवाणासाठीचे मोलाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ. 

बी२बी (बिजनेस टू बिजनेस) आणि बी२सी (बिजनेस टू कंज्युमर) या विपणनाच्या महत्वाच्या संकल्पनेची प्रचिती येणारा हा मेळावा. मेळाव्याची यावर्षीची संकल्पना “महिला उद्योजकता” आहे. यात दक्षिण आफ्रिकेला भागीदार देशाचा मान देण्यात आला आहे. यावर्षीचा मेळाव्यातील फोकस देश थायलंड तर फोकस राज्याचा दर्जा दिल्ली राज्याला देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदानावर दरवर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या व्यापार मेळाव्यासाठी कायमस्वरूपी महाराष्ट्र दालन उभारण्यात आले आहे. नोव्हेंबर महिना उजाडण्याआधीच या व्यापार मेळाव्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांना महाराष्ट्र दालनाकडे आकर्षित करणारे प्रवेशद्वार तयार करणे हे एक जिकिरीचे काम. कुठल्याही राज्याच्या दालनाचे प्रवेशद्वार हे त्यावर्षी मेळाव्यासाठी निश्चित झालेल्या संकल्पनेशी सुसंगत असावे आणि त्या त्या राज्याचे प्रतिबिंब त्यात दिसावे असा एक दंडक असतो. महिला उद्योजकता संकल्पनेला अनुसरून दालनाचे प्रवेशद्वार हे महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचे मोठे कटआऊटस आणि त्याखाली ठळक अक्षरात लिहिलेली ओळ “महाराष्ट्र की रण रागिणीयां” मेळाव्याला भेट देणाऱ्यांना आकर्षित करते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, प्रतिभा पाटील, रोहिणी हट्टंगडी, अनु आगा अशा १५ मराठी महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे वैभव दर्शविणारा पुण्यातील विश्रामबाग वाड्याचा देखावा आणि त्याच्या मधोमध ठळक व सुबक अक्षरात लिहिलेला ‘महाराष्ट्र’ हा शब्द महाराष्ट्राची छाप पाडण्यास पुरे ठरावा. दालनाच्या मध्यभागी एक आई आपल्या चिमुकलीला आकाशी झेप घेण्यासाठी प्रोत्साहित करीत असलेली भली मोठी कास्यची मूर्ती म्हणजे महिलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अग्रेसर असल्याचे प्रतिक आहे.

दालनाच्या तळ मजल्यावर स्टॉल एकवर आपल्या नजरेस पडतो पालघर जिल्ह्यातील सावरेगावाहून आलेले नरसू देवजी दुमडा आणि त्यांची मुलगी रेखा यांचा स्टॉल. येथे आहेत आदिवासी जमातीचा समृध्द सांस्कृतिक वारसा दर्शविणारे तारपा नृत्य, गौरी नृत्य, कांबळी नृत्य आदींचा समावेश असलेली वारली पेंटींग. देश-विदेशातून येथे भेट देणारे पाहुणे लक्षात घेता वारली पेंटिंगने सजलेले टी शर्ट, साडया, टोप्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २० वर्षांपासून या उद्योगात असलेले दुमडा हे पहिल्यांदाच या मेळाव्यात सहभागी होत आहेत. त्यांनी परिसरातील बचत गटाच्या महिलांना वारली पेंटीगचे प्रशिक्षण दिले. परिणामी या महिला गटाने तयार केलेल्या पिशव्या व अन्य वस्तूंवर वारली पेंटीगचा साज चढला व त्या महिलांच्या उत्पादक वस्तूंना चांगला दर मिळू लागला.

दालनातील स्टॉल पाच हा आपलं लक्ष वेधून घेतो तो दोन महिला उद्योजिकांच्या विशेष कलेनं. त्यातील एक आहेत वैशाली अविनाश रिंगणे ज्यांनी इंटेरियर डिझाइनसाठी लागणाऱ्या वैविध्यपूर्ण वस्तू बनवून स्वतंत्र उद्योग थाटला. दुसऱ्या उद्योजिका आहेत रजनी शिर्के ज्यांनी अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या कशिदाकारीला आपला छंद व नंतर जीवन चरितार्थाचे व समाजकार्याचे माध्यम बनवले. कशिदाकारी जीवंत रहावी व या कलेच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे इतरही महिला सक्षम करण्याचे कार्य त्या करताहेत. स्वत: सक्षम झालेल्या शिर्के यांनी किशोरी बचत गट आणि महाविद्यालयीन मुलींना कशिदाकारीच प्रशिक्षण देत त्यांनाही स्वावलंबी बनविले. येत्या २९ नोव्हेंबरपासून इटलीतील मिलान येथे सुरू होत असलेल्या १९ व्या आंतरराष्ट्रीय हस्तकला विक्री प्रदर्शनात शिर्के या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने सहभागी होणार आहेत.

दालनाच्या स्टॉल ९ वर सुंदर, रेखीव-आखीव अशा सतार व तानपुरा आपल्या नजरेस पडतात. आणि हळूच या वाद्यांच्या तारा छेडण्यालाही आपले मन धजावते. तसेच हे आकर्षक वाद्ये दालनास भेट देणाऱ्या देश-विदेशातील कलाप्रेमींना भुरळ घालत आहेत. मिरजेच्या सतारमेकर गल्लीतील मोहसीन रियाज सतारमेकर आणि जुबेर शौकत बेडगे सांगतात, आम्ही पहिल्यांदाच दिल्लीत विक्रीसाठी वाद्य आणली आहेत. मिरजेतील सतारमेकर गल्लीतील संगीत वाद्य बनवणारी जवळपास ५०-६० दुकान आणि आमच्याकडे चालून येणारे कलाप्रेमी यापेक्षा देश विदेशातील कलाप्रेमी स्वत: आपल्या स्टॉलला भेट देवून येथील वाद्यांची माहिती जाणून घेत आहेत. इथे आम्हाला सतार व तानपुरा तयार करून देण्यासाठी ऑडर्सही मिळाल्याचे ते उत्साहाने सांगतात. हे ऐकताना या कलाकार व उद्योजकांचा चेहरा समाधानाने फुलल्याचे पदोपदी जाणवते.

या प्रातिनिधिक स्टॉल्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे व्यासपीठ महत्वाचे ठरत असल्याची प्रचिती येते. या दालनात महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, सिडको, एमसीइडीसह राज्यातील मध्यम उद्योग, लघु उद्योग, राज्याच्या विविध भागातील महिला उद्योग, महिला बचत गट, हस्तकला कारागीर यांचे ८० स्टॉल्स आहेत. यात ९७ महिला उद्योजक सहभागी झाल्या आहेत. 

मराठी पाककला आणि राज्याची संस्कृती प्रदर्शित करण्याचीही मोलाची संधी या मेळाव्यात मिळते. व्यापार मेळाव्याला भेट देणाऱ्या देश- विदेशातील पाहुण्यांना येथील फूड कोर्ट 2 मध्ये स्टॉल क्रमांक 8 वर मराठमोळ्या व्यंजनांचा आस्वाद घेण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फुड स्टॉल्सच्या माध्यमातून त्या त्या राज्यांना आपापल्या राज्यातील व्यंजन प्रदर्शित व विक्री करण्याचे व्यासपीठही हा मेळावा ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षी उत्तम व्यंजनांच्या स्टॉल्सची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात येतो. २०१२ साली महाराष्ट्र फुड स्टॉलला सर्वोत्तम व्यंजनाचा प्रथम पुरस्कारही मिळाला होता. 

दररोज सायंकाळी येथील लाल चौक खुला रंगमंचावर व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. यावर्षी व्यापार मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यात आला. मुंबई येथील ‘साईकला ग्रुप’ ने ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दर्शन घडविणाऱ्या वासुदेव, दिंडी या लोककलांच्या सादरीकरणाने उपस्थित देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. महाराष्ट्राच्या कडेकपारीत राहणाऱ्या ठाकर जमातीचे दर्शन घडविणारे नृत्य, संतांच्या आध्यात्मिक कुटींचा अर्थ उलगडणारे भारूड, श्रीकृष्णाच्या लीलावर आधारित गणगौळण, मल्लखांबाच्या कसरती आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला. 

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांना आपला उद्योग, कला आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी उपलब्ध होणारे व्यासपीठ व त्याच्या उपयोगीतेची जाण असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन केले. केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश महेता, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तारिक फारुकी, खासदार रामदास आठवले, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांची उपस्थितीही या व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे महत्व अधोरेखीत करते. उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास व्यक्त करत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन नवे धोरण आखणार असल्याची ग्वाही देणे हे मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्दिष्ट सार्थक ठरवून जाते.

-रितेश मो. भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.