| ||
| राष्ट्रपती पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत सोमवारी राजपथावर पार पडलेल्या 66 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात महाराष्ट्राचे दमदार प्रदर्शन बघायला मिळाले. ‘पंढरीची वारी’ दर्शविणारा चित्ररथ, गोंधळनृत्य आणि लेझिमच्या ठेक्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. वीरता पुरस्कार प्राप्त अश्विनी उघडेचे अभिवादन, एनसीसी पथकाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा अमन जगताप आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करणारी खुशबू जोशी हे ही या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले. प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी शहरात कोसळलेला पाऊस, जोडीला असलेली थंडी यास न जुमानता दिल्लीकर व देश-विदेशातून राजपथावर अलोट जनसमुदाय जमला. वातावरण निवळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजपथावर आगमन होऊन इंडिया गेट स्थित अमर जवान ज्योतीला देशबांधवाकडून आदरांजली वाहिली. यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामांचे राजपथावर आगमन झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि 21 तोफांच्या सलामीने प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनास राजपथावर सुरूवात झाली. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री यावेळी उपस्थित होते. भारताची शस्त्र सज्जता दर्शविणाऱ्या सेनेच्या तीनही दलांचे आकर्षक चित्ररथ, सेनेच्या सैनिकांचे आणि बॅंड पथकांचे पथसंचलन, सीमा सुरक्षा दळाचे घोडदळ, उंटदळ यांचे पथसंचलन आणि बायकर्सच्या चित्तथरारक कसरती उपस्थितांच्या टाळ्या मिळवत होते. विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या चित्ररथांच्या पथसंचलनास सुरुवात होताच उपस्थितांचा उत्साह टिपेला पोचल्याचे चित्र होते. ‘पंढरपूरची वारी’ दर्शविणाऱ्या चित्ररथाचे राजपथावरील आगमन उपस्थितांच्या जोरदार टाळ्या मिळवून गेले. या चित्ररथाच्या दर्शनी भागात तुळस घेऊन वारीला निघालेली स्त्री, पंढरपूरचे प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मंदीर, रिंगन घालणारे घोडे आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या आकर्षक प्रतिमा. चित्ररथा सोबत 31 कलाकारांनी ‘विठ्ठल विठ्ठलच्या’ गजरावर घेतलेला ठेका पाहता विंगेत बसलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी उभे राहून अभिवादन केले. असामान्य शौर्य दाखविणाऱ्या देशभरातील वीरता पुरस्कार प्राप्त 24 मुला-मुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. बिबट्याच्या तावडीतून धाकट्या बहिणीला वाचविणाऱ्या अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावच्या अश्विनी उघडेचा वीर बालकांमधील समावेश महाराष्ट्राचा गौरव ठरला. एनसीसी कॅडेट्सच्या राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा अमन जगताप कौतुकाचा विषय ठरला. अहमदनगर महाविद्यालय अहमदनगरच्या अमन जगतापची महाराष्ट्राच्या एकूण 113 एनसीसी कॅडेट्स सह 2700 कॅडेट्समधून निवड झाली होती. अमनने 300 सदस्यीय कॅडेट्सचे नेतृत्व केले. तर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या शाह महाविद्यालयाच्या खुशबु जोशीने महाराष्ट्राला नेतृत्वाचा दुहेरी मान मिळवून दिला. महाराष्ट्र व गोव्यातील 15 स्वयंसेवकासह 160 सदस्यीय एनएसएस पथकाची खुशबू जोशी ही महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा मिळवलेली उपलब्धी आहे. धनंजराज मुंडे याने गेल्यावर्षी राजपथावर एनएसएस पथकाचे तर धनराज लहाने याने एनसीसी पथकाचे नेतृत्व केले होते. महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गोंधळ नृत्याच्या सादरीकरणाला यावेळी उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. दिल्लीतील जनकपुरी येथील शासकीय कन्या शाळेच्या 180 मुलींनी गोंधळनृत्य सादर केले. नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या 180 मुलींनी खेळ व क्रीडावृत्तीच्या प्रसाराचे प्रतिक असणाऱ्या लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. पांरपरिक वेशभूषेतील या मुलींनी सादर केलेल्या लेझीम नृत्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. सीमा सुरक्षा दळाच्या बायकर्स आणि वायुदळाच्या चित्तथरारक कसरतीनंतर राष्ट्रगीताने राजपथावरील पथसंचलनाची सांगता झाली. -रितेश भुयार |
Tuesday, January 27, 2015
राजपथावर महाराष्ट्राचे दमदार प्रदर्शन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment