| ||
| देशाच्या राजधानी दिल्लीत दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उत्सव दिमाखात साजरे होतात. प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्रता दिन. दोन्हीही उत्सव देशवासियांचे ऊर अभिमानाने भरून यावे या ताकदीचे. प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी रोजी राजपथावर (इंडियागेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा जवळपास साडेतीन किमी मुख्य रस्ता) देशाच्या शस्त्रसज्जतेचे व सांस्कृतिक वैविध्यतेतून एकतेचे दर्शन घडवितो. दरवर्षी या कार्यक्रमास बाहेरील देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची परंपरा आहे. यावर्षी प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत. त्यामुळे देशाभिमान वाढविणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजपथावरील पथसंचलनात भारताच्या विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी बहुतांश वेळा प्रथम क्रमांक मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी राज्याच्या वतीने ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राचा यावर्षीचा चित्ररथ कसा आहे?, याआधीच्या चित्ररथांची संकल्पना काय होती ? आणि राज्य सरकारकडून चित्ररथासाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावापासून ते राजपथावरच्या पथसंचलनातील सहभागापर्यंतची संपूर्ण प्रकिया काय आहे हे जाणून घेऊ या. राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत नौदल, वायुदल आणि सेनेचा बँड आणि सैनिक पथकाचे तसेच विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथाचे पथसंचलन पार पडते. राजपथावरील पथसंचलनात चित्ररथ प्रदर्शनाची सुरुवात १९५२ ला झाली. त्यावेळी फक्त ५ चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात वाढ होऊन आतापर्यंत हा आकडा राज्यांचे जवळपास १६ तर विविध मंत्रालयांचे साधारण ६ असे एकूण २२ चित्ररथ असा होता. यावर्षी विविध राज्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता १६ राज्यांचे तर ९ विविध मंत्रालयांचे चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहे. गेल्या ६५ वर्षातील हा एक विक्रमही म्हणता येईल. महाराष्ट्राचा चित्ररथ हा ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. वारीत सगळया जाती धर्माचे लोक असतात यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असतो. महत्वाचे म्हणजे भारतात ज्या धार्मिक यात्रा आहेत, त्यापेक्षा पंढरीची वारी ही वेगळी आहे. येथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पिडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो. असा हा निरागस दृष्टीकोण असलेला भला मोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. केवळ ग्लॅमर नसल्याने पंढरपूरची वारी देशाला कळू शकली नाही. म्हणून राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने हा विषय संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीसमोर लावून धरण्यात आला. अखेर त्यास मंजुरी मिळाली. या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे दैवत अन् तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन घडणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 65 कारागिरांनी अतिशय देखणा चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री दाखविण्यात आली आहे. मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर दाखविण्यात आले आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मुर्ती बसविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पतका, टाळ-मृदंग, विणेसह वारीत सहभागी 130 वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. या चित्ररथावर ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.... तुला साद आली, तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली...., वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली’ या गीतावर टाळ-मृंदग, वीणेच्या गजरात पंढरीची वारी सादर होणार आहेत. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कलाकारांचा चमू वारीतील सहभागी वारकऱ्यांचे नृत्यप्रकारांचे सादरीकरण राजपथावर करणार आहेत. राज्याच्या वतीने अशी पार पडते प्रक्रिया महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचालनालयाचे कार्य पार पडते एकुण हे १० टप्पे असतात. देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चित्ररथाबातचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र येते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यसरकारकडून चित्ररथा संदर्भातील प्रस्ताव पाठविला जातो. सप्टेंबर महिन्यात पहिली बैठक यात राज्याला किमान ४ - ५ विषय मांडायला सांगतात. नंतर त्यातील एक विषय निवडतात व त्यावर काम करायला सांगतात. नंतर ऑक्टोबरमधे दोन बैठका होतात यात पहिल्या बैठकीत विषय विस्ताराने मांडायला सांगतात. एकुणात तिसऱ्या बैठकीत राज्यातर्फे देण्यात आलेल्या संकल्पनेचे प्रारुप सादर करावे लागते. त्यातील ३-४ प्रारुपांपैकी एक प्रारुप निवडले जाते वा नवीन प्रारुप तयार करण्याच्या सूचना केल्या जातात. निवड समितीमध्ये चित्रपट, साहित्य, चित्रकला, स्थापत्य आदी विषयातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ असल्याने जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत चालणाऱ्या १० ते १२ बैठकांमध्ये राज्यातर्फे आपल्या चित्ररथाबाबत बाजु मांडण्यासाठी वैचारीक वादावादी भांडण होवून अखेर चित्ररथाची प्रतिकृती आणि चित्ररथासोबतच्या कला आविष्काराच्या सादरीकरणास मान्यता मिळते. येथूनच चित्ररथाच्या बांधणी व कला सादरीकरणाच्या तयारीला सुरुवात होते. त्यासाठी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट भागातील राष्ट्रीय रंगशालेच्या शिबीरात चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावाचे काम सुरु होते. संरक्षण मंत्रालयाकडून चित्ररथास अशी मिळते मान्यता चित्ररथाची निवड करताना नाविन्यपूर्ण विषय, विविध राज्यांतील संस्कृतिचे दर्शन, ईशान्येकडील राज्य व जम्मू आणि काश्मिर राज्याला जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या राज्यातील कला संस्कृति देशबांधवांना कळावी आणि या राज्यांनाही आपण भारत देशाच्या टोकाच्या भागात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना येऊ नये, हा यामागील उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती सांगतात. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने राज्याला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात येते. त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालया तर्फे ११ सदस्यीय समिती नेमण्यात येते. या समितीत संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि कला, दिग्दर्शन, स्थापत्य आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. राज्यांकडून एक ते दीड पानांचा चित्ररथासंबंधीत आलेख मागविला जातो. आपत्तीजनक संकल्पनाना कात्री लावली जाते तर काही संकल्पनांना सुधार करण्याचे निर्देश समितीकडून दिले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेतली जाते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चित्ररथाच्या प्रतीकृतीला मान्यता दिली जाते. निवड समितीची शेवटची बैठक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते याचवेळी चित्ररथांची अंतिम निवड केली जाते. पथसंचलनाचा कालावधी बघता एकूण २२ चित्ररथ असावेत याची काळजी घेतली जाते. यात देशातील एकूण २९ राज्यांपैकी १६ राज्यांचे चित्ररथ तर विविध केंद्रीय मंत्रालयाचे ६ चित्ररथ निवडले जातात. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नव्यानेच निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याचा चित्ररथ आणि प्रथमच २५ चित्ररथ आहेत. महाराष्ट्राच्या चित्ररथांवर एक दृष्टीक्षेप महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. १९९३ ते १९९५ असा सलग ३ वर्ष प्रथम क्रमांकाच्या मानासह बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. दर्जेदार चित्ररथाची हिच परंपरा कायम ठेवत यावर्षी 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य की, चित्ररथाची प्रतिकृती त्याची बांधणी आणि सादरीकरणासाठीचे कलाकार हे राज्यातूनच दिल्लीत पाठवले जातात. अन्य राज्यांच्याबाबतीत तसे घडताना दिसत नाही म्हणूनच महाराष्ट्राचा चित्ररथ बहुतांशवेळा पुरस्कार विजेता ठरतो. राज्याच्या वतीने सर्वप्रथम १९७१ मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवार आधारीत चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला. ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ या संकल्पनेवरील १९८० मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. १९८३ मध्ये राज्यातर्फे प्रदर्शित ‘बैल पोळा’ विषयावरील चित्ररथाला सुध्दा प्रथम पारितोषिक मिळाले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. १९८८ मधे राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला’ याला द्वितीय पारितोषीक मिळाले होते. ‘लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषीक मिळवून दिले. २००७ मधे ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तृतिय तर २००९ मधे ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे. दर्जेदार चित्ररथाची हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी राजपथावर 'पंढरीची वारी' दर्शविणारा चित्ररथ देशबांधवाचे कौतुक मिळवत प्रथम पारितोषीकावरही आपली मुद्रा उमटेल हा विश्वास आहे. रितेश मो. भुयार उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र ,नवी दिल्ली. |
Tuesday, January 27, 2015
राजपथाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची शान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment