Wednesday, August 21, 2024

हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

 





हॅलो ब्रेव्ह गर्ल ………

            ऑफिसला पोचायची लगबग, अशात जीपीओ चौकात(नागपुरातील सिव्हील लाईन परिसर) आलो सिग्नल लागल्याने एकामागोमाग पाच स्कुल बस उभ्या होत्या. रसत्याच्याकडेला शिस्तीत पायी जाणारा मी एव्हाना कानावर पडलेल्या एका हाकेने स्तिमीत झालो , सांदिपनी शाळेच्या बसमधील जेमतेम पहिल्या दुसरीतील शाळकऱ्यांमधील निर्वाकार ,निरागस मुलींनी हात उंचावून ‘हाय अंकल,हाय अंकल…’ म्हणत साद दिली. त्याला हलके स्मीत करून प्रतिसाद देत ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल्स’ म्हणत मी पुढे जात होतो. आता पाचही स्कुलबसमधून तीच हाक तोच उत्साह आणि त्याला माझा सारखा प्रतिसाद देण सुरु होतं. चिमुरडया मुलींना दिलेला आजचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खास होता कारण, नुकतेच एक लेक्चर देवून आलो आणि त्यात मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत वागण्यात जाणीवपूर्वक बदल करावा लागेल असं मी म्हणालो. मुलींसाठी  इंटेलिजंट,ब्रेव्ह आदी शद्ब उच्चारणे हा माझ्या लेक्चरमधील एक भाग होता त्या स्कुलबस मधील मुलींच्या हाकेला ओ देतांना हॅलो ब्रेव्ह गर्ल म्हणून मी स्वत: पासून त्याची सुरुवात केल्याचं समाधान मला लाभलं.

            आपल्या दैनंदिन जीवनात मुली किंवा महिलांप्रतीच्या भावना वा वागणुकीतून बराच परिणाम घडतो असे मला वाटते. म्हणजे घरात अमक्या गोष्टी मुलींनीच करायच्या तमक्या गोष्टी फक्त मुलांनीच करायच्या असतात तो मुलींचा प्रांत नाही असे दंडक आपणच निर्माण करून माणूस म्हणून त्यांचं अस्तीत्व नाकारल असतं. आणि मुलगी म्हणून तिच्याकडून वागण्याच्या अपेक्षांचा डोंगर उभा करून ठेवलेला असतो. मग ती तशी वागली नाही तर मग ती वाईट किंवा उरमट असे सोयीचे शेरेही आपण चिटकवून मोकळे होतो. माझा तर एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, ‘मुलगा- मुलगी ही निसर्गाने किंवा शरीर विज्ञानाने घडणारी गोष्ट आहे जी एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे.त्याचा जसा आदर होतो तसा तिचाही आदर व्हायला हवा आणि त्याची सुरुवातही स्वत:च्या घरातून व्हावी लागेल. सजग पालक म्हणून मुलगा मुलगी भेद न करता सर्व संधी सेवा समान उपलब्ध करून द्याव्या लागतील.’

 या सोबतच एक महत्वाची बाब निरीक्षणातून पुढे आली की, मुलींना सुंदर,सालस,निरागस आणि टोकाचं सागांयच झाल तर सेक्सी असे बिरुद लावली जातात. आणि ती ही त्या बिरुदाला साजेशी सुंदर,सालस,निरागस व सेक्सी दिसण्याकडे वागण्याकडे कसोसीने लक्ष देते.

            आता मुलींना मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी आपल्यालाही ही बिरुद बदलावी लागतील इंटेलिंजंट, ब्रेव्ह, शार्प, टॅलेंटेड असे बुरुद लावावी लागतील जेणे करून या बिरुदावल्या त्यांच्या जगण्याचा भाग होतील व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याही धडपडतील. नाही तर देवत्व बहाल करून  तिची आराधना, पुजा करणारा समाज मंदिरातून आल्यावर तिलाच काय वागणूक देतो हेही सांगणे नलगे.

            माणूस म्हणून स्त्रिचा स्वीकार आणि तिच्या प्रती आदरातूनच हा प्रवास एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी स्वत:पासून व सजगतेने सुरुवात व्हावी लागेल. आजच्या ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल’ या संबोंधनाने का होईना एक नवी सुरुवात झाली आहे. हा संदेश आता सर्वदूर पोचवून त्याला व्यापक स्वरुप द्यायचे आहे.

                                                         ००००००   

   


Friday, March 8, 2024

विदर्भाच्या गुणी कलाकारांनी 'तेरवं' चित्रपटातून मांडली एकल महिलांची संघर्ष गाथा






               कुटुंब,समाज आणि शासकीय यंत्रणा यांच्याशी निकराचा लढा देत कायमचा संघर्ष अनुभवणाऱ्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल महिलांचा यशस्वी संघर्ष  दिग्दर्शक हरिष इथापे यांनी 'तेरवं' या चित्रपटाद्वारे मांडला आहे. चित्रपटाच्या एकूण निर्मिती प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष एकल महिलांसह विदर्भातील जवळपास ९० टक्के कलाकारांचा सहभाग, चित्रपटातील लोकेशन्स, चित्रीकरण आणि खास वैदर्भीय भाषेतील श्याम पेठकर यांची पटकथा ही या चित्रपटाची बलस्थानं ठरली आहेत.

      विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उभा राहिला आणि हा सामाजिक प्रश्न कसा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य,नाट्य निर्मिती आदी माध्यमातून भाष्य झाले आहे. मुळात ‘तेरवं’ या मूळ नाटकातून निर्माण झालेला ‘तेरवं’ हा चित्रपट एकल महिलांच्या प्रश्नांची महत्वाची व दुर्लक्षित बाजू अधोरेखित करतो. परिस्थितीला शरणांगती पत्करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवांना कुटुंबात मिळणारी कष्टप्रद वागणूक, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि सरकारी यंत्रणांमध्ये तिला हक्क मिळविण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आला नव्हता. हे शिव धनुष्य लिलया पेलण्याचं काम निर्माते  नरेंद्र जिचकार यांच्या पुढाकाराने उभ राहिलं.

       नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांचे तंत्र वेग-वेगळे असल्याने बऱ्याच ठिकाणी या फॉरमॅटमध्ये येणाऱ्या अडचणी व काही ठिकाणी दिग्दर्शकाला घ्यावं लागलेलं स्वातंत्र्य अशी उत्तम सरमिसळ करत हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

    चित्रपटाची सुरुवातच गावाच्या वेशीवरील रोहित्रावर ( ट्रान्सफॉर्मर) चढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दृष्याने होते.गावातील लोक त्या शेतकऱ्याला खाली काढतात आणि ही शेतकरी आत्महत्या नोंदवून घेण्यासाठी तथाकथित दलालाची व शेतकऱ्याच्या भावाची उठाठेव सुरू असते. पतीच्या आत्महत्येची बातमी शेतकऱ्याच्या पत्निला कळताच तिने फोडलेला हंबरडा असं कथानक पुढे सरकत जातं. दलालाने उसकवल्यामुळे तहसिल कार्यालयासमोर प्रेत ठेवून आंदोलन करणारे लोक अस दृष्य असताना चित्रपटाची नायिका जनाचा प्रवेश होतो आणि तहसिलदाराला भेटून ही मागणी चुकीची आहे आणि यासाठी शेतकऱ्याच्या भावाने दलाला किती पैसे दिले हे वास्तव ती पुढे आणते आणि हे प्रेत उचलून त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे सांगते. इकडे विधवा झालेल्या महिलेला तेरव मंडळ तेरवीचं आमंत्रण देतात . 

                  तेरवीच्या दिवशी या विधवेला आपल्या तेरव मंडळात आणून  तिच्या आयुष्यात फार मोठे आभाळ कोसळल्याची तिच्या मनाची घालमेल दूर करून  साडी-चोळी देत तिच्या मनावरील ओझं कमी करण्याचं काम जनाच्या तेरव मंडळातील सर्व महिला करतात आणि त्या विधवेला बळ देतात.मात्र, नवऱ्याच्या  तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दीर आणि सासू शेतीच्या कागदपत्रावर बळजबरीने स्वाक्षरी घेऊन तिला घराबाहेर काढतात.हा विषय दाखवताना जनाचं पूर्व आयुष्यही या चित्रपटात डोकावत.जनाला मुळात दोन भावंड. एक बहीण एक भाऊ. आई सर्पदंशाने गेलेली. जनाला शिकायचं होतं, बिएड करायचं होतं.मात्र, शेतकरी व वयोवृध्द वडिलांची हलाखीची परिस्थिती असल्याने ते जनाला शिकवू शकत नाहीत आणि तिचं लग्न लावून देतात.

        सासरी जाऊन जनाच्या व्यक्तिमत्वातील करारी बाणा, तिचा संघर्ष यास पतीची साथ मिळते आणि ती व्यवस्थेसोबत संघर्ष करते. हे सर्व कथानक पुढ सरकत जातं.कथानकामध्ये दिग्दर्शकाने भुलाबाईची (भोंडल) गाणी, पाऊस पडवा  म्हणून  'धोंडी धोंडी पाणी दे' असं म्हणत गावोगावी निघणाऱ्या धोंड्या, अशा ग्रामीण परंपरा चित्रपटांमध्ये उत्तमरित्या पेरल्या आहेत.

     वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे बहिणीला शिक्षण न करता लग्न करावं लागल म्हणून 'ज्या घरात मला शिक्षण मिळत नाही, अशा गरीब शेतकऱ्याच्या घरात मला जन्माला घालू नको,देवा.' असं म्हणत आत्महत्या करणारी जनाची बहीण. आणि आपल्या नणंद  सोबत हा प्रकार घडू नये म्हणून तिला शिक्षणासाठी आपल्या सासू-सासऱ्याचा विरोध पत्करून बाहेरगावी पाठविणाऱ्या जनाचा करारी बाणा पटकथेतून आणि नायिकेच्या तोंडी आलेल्या समर्पक संवादातून अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

        स्व.राजा बढे ,श्याम पेठकर आणि ज्ञानेश वाकुडकर यांची गीते या चित्रपटातील आणखी एक बलस्थान असून ती समयोचितपणे मांडण्यात आली आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवांना एकजुट करून बचतगट, दारूबंदी सारखे उपक्रम राबवत या एकल महिलांची पॉवर बॅंक म्हणून जना या चित्रपटात प्रेक्षकांच्या समोर येते. यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन, प्रशासन आणि राजकारणी  यांच्याकडून अपेक्षित असलेली भूमिका परखडपणे मांडणारी जना या चित्रपटाच्या केंद्राभोवती आहे. या सर्व संघर्षात तिची  गांधीवादी विचारांवरील श्रद्धा या चित्रपटाच्या समारोपात दिसून येते.

     जनाची भूमिका वठवणाऱ्या किरण खोजे आणि तिच्या पतिच्या भूमिकेत संदीप पाठक व  भासऱ्याच्या भूमिकेत किरण माने या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार या चित्रपटात तेवढ्याच दमदारपणे अभिनय करताना दिसून येतात. संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी सबंध चित्रपटात केलेले संगीत संयोजनही या चित्रपटाला साजेसं आहे.
     
    विदर्भात घडणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या बातम्या ,प्रत्यक्ष प्रसंग अशा घटना बघणारे, निरीक्षण करणारे आणि यातून अस्वस्थ होणारी अशी सर्व मंडळी चित्रपटाच्या पठकथेपासून तर निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने हा चित्रपट व यातील विषय आणखी जोरकसपणे व प्रभावीपणे मांडल्या गेल्याचेही निरीक्षण आपसूक नोंदवले जाते.

    एक सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. नागपूरच्या बर्डी परिसरातील इंटरनेटि मॉलमध्ये 'तेरवं' चित्रपटाचा 6 मार्च रोजी प्रीमियर शो आयोजित करण्यात आला त्याला हजेरी लावली. यानिमित्ताने या चित्रपटाचे रसग्रहण केले आहे. 8 मार्च या जागतिक महिलादिनी हा चित्रपट राज्यातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश मो.भुयार
            ००००





 

Monday, February 5, 2024

सुर्योदय' योजनेतून घरावर होणार ऊर्जानिर्मिती ; ग्राहक होणार वीज निर्माता


 

स्वच्छ आणि प्रदुषण विरहीत ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणून सौर ऊर्जा सर्वज्ञात आहे. याचा सामान्य जनतेला उपयोग व्हावा म्हणून केंद्र शासनाने जानेवारी २०२४ मध्ये 'सुर्योदय' योजना जाहीर केली.या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. केंद्राकडून सौर पॅनेलसाठी ४० टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार असल्याने  वीज ग्राहकांसाठी ही फायदेशीर ठरू शकते.

  प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीसाठी देशात एक कोटी घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याच्या या योजनेचा उद्देश आहे.या योजनेत राज्यातील पुणे,नाशिक ,छत्रपती संभाजीनगर, नांदेड,लातूर,नागपूर आणि अकोला जिल्ह्याचा समावेश. सोलर पॅनल खरेदीसाठी ग्राहकांना ४० टक्के अनुदान सौरऊर्जा निर्मितीसाठी 'सुर्योदय' रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून ४० टक्के अनुदान मिळते. तीन किलोवॅट क्षमते पर्यंतचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे १ लाख ५७ हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ५४,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास १ लाख ३ हजार रुपये खर्च येतो.

         सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी-कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

      सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर २० टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना सुविधा हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तथापि औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करीत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.

रूफ टॉप सोलरसाठी बँक कर्ज देते :-

      सुर्योदय योजनेत छतावर रूफ टॉप सोलर बसविण्यासाठी कोणत्याही बँकेकडून  हप्त्यावर (EMI) कर्ज उपलब्ध होऊ शकते. रूफ टॉप सोलर बसविल्यामुळे शुन्य होणारे वीज बिलाचे पैसे ग्राहक बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरू शकते.त्यामुळे ग्राहकांना अधिक सुलभरीतने आर्थिक भुर्दंडाविना रूफ टॉप सोलर बसविता येऊ शकते.

योजनेची वैशिष्ट्ये

१. घरगुती बिलात मोठी बचत

२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा  लाभ

३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान

४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान

५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान.

६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार.

००००

Wednesday, June 7, 2023

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न …..


 


‘आई, बहीण आणि पत्नी  म्हणून  ‘स्त्री’ च असणं  स्वीकाहार्य  या व्यतिरीक्त ‘स्त्री’च अस्तीत्व हे पुरुषांच्या मनमानी विचारांवर अवलंबून अर्थात पराबलंबी आहे. समाजाची ही मानसिकता जोवर कृतीशीलरित्या बदलणार नाही तोवर  महिला अत्याचाराच्या घटनांना पूर्ण विराम लागणार नाही. आणि त्याची सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरातून व्हावी लागेल’,असं माझं प्राजंळ व सुस्पष्ट मत (तेच फक्त मी व्यक्त करू शकतो आणि कृती करू शकतो).

हा विषय आज खरडायला तशा दोन प्रातिनिधिक घटना कारणीभूत ठरल्या. केरळ उच्च न्यायालयाने  ‘रेहाना फातिमा केस’ मध्ये ‘महिलांचे शरीर हे त्यांची स्वायत्त मालकी’ असल्याची बाब नोंदवत तथाकथित संस्कृती रक्षकांना चपराक लगावली आहे. तर दुसरी मनाला हेलावून टाकणारी घटना आहे अकोल्याच्या पत्रकाराची मुंबईत शिकणारी  मुलगी वसतीगृहात मृतावस्थेत आढळल्याची . 

केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रेहाना फातिमा या महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मॉडेलही आहेत. त्यांनी २०२०मध्ये सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती. फातिमा यांच्या शरीराच्या वरील निर्वस्त्र भागावर त्यांच्या मुला-मुलींनी पेंटींग केल्याची ही पोस्ट. या कृत्याविरोधात तथाकथीत संस्कृतिरक्षकांनी कोर्टात केस केली. जिल्हा सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्याअंतर्गत रेहाना फातिमा यांना दोषी ठरवल. रेहाना यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे खटकवले. आणि सरतेशेवटी  6 जून 2023 रोजी न्या. कौसर इडप्पागाथ यांच्या खंडपिठाने निर्णय दिला,‘  आईच्या शरीराच्या वरच्याभागावर तिच्या स्वत:च्या मुलांनी केलेले पेंटींग हा एक कला प्रकल्प असून यास वास्तव किंवा लैंगिंक भावना उद्दीप्त करणारी कृती समजू नये. स्वत:च्या शरीराबद्दल निर्णय घेण्यासाठी महिला स्वायत्त असून हा मूलभूत अधिकाराचा  गाभा आहे जो लैंगिक समानता आणि  गोपनियता प्रदान करतो. ’  

मुंबईत शिक्षणासाठी गेलेली अकोल्याच्या एका पत्रकाराची मुलगी शासकीय वसतीगृहात वास्तव्यास होती. नामांकित संस्थेतून ती पॉलिटेक्नीकचे शिक्षण पूर्ण करीत होती. अचानक 6 जून 2023 रोजी वसतीगृहात त्या मुलीचा विवस्त्र मृतदेह आढळला.आणि त्याच वसतीगृहातील सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची बाबही पुढे आली आहे.  

या दोन्ही घटनांमध्ये महिलांकडे समाजाचा बघण्याचा व त्यांच्यासोबतच्या वागणुकीचा किडसवाना परिचय येतो. पहिल्या घटनेत रेहाना फातिमा यांची कृती  संस्कृतीला मारक असल्याचा टेंभा मिरवून संस्कृतीरक्षणासाठी कोर्टात जाण्याचा घाट घालणारा समाज आपणास ठसठसीतपणे दिसून येतो. रेहाना यांनी केलेली कृती ही त्यांची वैयक्तिक  बाब  म्हणून  न स्वीकारता संस्कृतीवरील संकट समजणारा समाज जेव्हा ही कृती सार्वजनिक करतो तेव्हा त्यास जबाबदार समाज म्हणावे का? असा प्रश्न निर्माण होतोच.पण अशा शक्तींना अडवून धरण्यासाठी न्यायव्यवस्थेने या मनोवृत्तीला वेळीच घातलेली वेसण महत्वपूर्ण ठरते.

दुसऱ्या घटनेची पूर्ण माहिती अजून पुढे आलेली नाही. पण वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्तावरून ही बाब स्पष्ट आहे की वसतीगृहात मुलीवर बलात्कार झाला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आता ही कृती किती भयानक आहे याचा विचार करूया.आपल्या मुलीला शिक्षण व नोकरीसाठी  अन्य शहरात पाठविणाऱ्या पालकांच्या पायाखालची जमीन खसकवणारीही आहे. मुलींच्या वसतीगृहात मुलीवरच बलात्कार आणि हत्या होत असेल तर वसतीगृह प्रशासनावर आणि इथे नोकरीवर असणाऱ्या पुरुषांवर तरी विश्वास ठेवावा का?. मग असा विचार करता समाजात प्रत्येक ठिकाणी स्त्रिया व पुरुष असणारच  तर पुरुषांकडून अशी वागणूक मिळण ही सुद्धा एक सामाजिक समस्या म्हणून जन्माला येत असल्याचेही प्रतित होते.

          या विषयाच्या अनुषंगाणे काही संदर्भही देणे उचित ठरेल. त्यासाठी दोन दशके मागे जावूया देशाच्या इशान्येकडील राज्यात. १० जुलै २०१४ च्या रात्री मनीपूर राज्यातील बैमन कॅम्पू मयई भागात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स ॲक्ट (ASPA) नुसार रात्री एका घराला १७,असम रायफलच्या तुकडीने घेराव घातला.यानंतरचा घडलेला प्रकार हा मानवतेला काळीमा फासणारा आहे. थंगजम मनोरमा ही या घटनेतील पिडीता.एका घरात आसम रायफल तुकडीचे जवान गेले व छोटया मुलाला त्याच्या बहिणीविषयी चौकशी करु लागले.घरात पुढे शिरून मुलीच्या आईला विचारणा सुरु असतानाच थंगजम मनोरमा आली अशात  जवान तिला फरफटत घराच्या एका भागात घेवून गेले.चाकुने तिचे कपडे फाडले व तिला स्थानिक नक्षलीगटाला सहकार्य करणारी सदस्य म्हणून कबुली देण्यास भाग पाडू लागले. थंगजमच्या  मांडीवर चाकुचे वार करण्यात आले कहर तर तेव्हा झाला जेव्हा तिच्या गुप्तांगामध्ये बंदुकीच्या गोळया घालण्यात आल्या. थंगजम साठी या राज्यातील जनता रस्त्यावर आली  रक्षकच भक्षक होतानाचा अनुभव येथील महिलांनी घेतला.

 जाताजाता आणखी इतिहासातील दोन संदर्भ. हा संदर्भ आहे दोन विदुषींचा.  कर्नाटकातील अक्क महादेवी आणि जम्मू आणि काश्मिर  मधील लाल डेड. ११३० मध्ये कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील उडुतरी गावात अक्क महादेवी या मुलीचा जन्म झाला. चेन्नमल्लिकार्जुन अर्थात शंकराची ती भक्त होती . अक्क महादेवीच्या रुपावर भाडून स्थानिक जैन राजा कौशीकने तिच्या वडीलांकडे अक्कला विवाहासाठी मागणी केली व लहान वयातच तिचा विवाह झाला. शंकरालाच मनोमन पती माननाऱ्या अक्क महादेवीचे संसारात मन रमत नव्हते राजाने भरवलेल्या दरबारात तिने शंकरालाच आपण पती मानत असल्याची कबुली दिली. क्रोध अनवार होवून राजाने दिलेले आभुषणे व वस्त्रही अक्क महादेवीकडून काढून घेतले. दरबारातून विवस्त्रावस्थेतच अक्क महादेवी शंकराच्या शोधात निघाली. याच अवस्थेत जंगलात तपश्चर्येनंतर तिला आत्मानुभव झाला व लिंगैक्य होवून  चेन्नमल्लिकार्जुनासोबत ती एकाकार झाल्याची घटना सांगितली जाते. ही घटना श्री शैल येथे घडल्याने तिथे  चेन्नमल्लिकार्जुनाचे मंदिर बांधण्यात आले. या घटनेतूनही महिलेला वस्तू समजण्याचा समाजाचा दृष्टीकोण अधोरेखित होतो.

लाल डेड यांचा कार्यकाळ १३२० ते १३५५ दरम्यानचा आहे.काश्मीरातील पंडेरेथन गावात एका काश्मीरी पंडीत कुटुंबात लाल डेड उर्फ लल्लेश्वरीचा जन्म झाला. 12 व्या वर्षीचा तिचा विवाह झाला व सासरी खूप छळ सुरु झाला. सासरचा सततचा छळाला कंटाळून आणि आत्मीक शांतीच्या शोधातच  ती शंकराच्या भक्तीत लीन झाली. पुढे २६ व्या वर्षी संसाराचा व वस्त्रत्याग करून  ती जंगलांमध्ये भटकू लागली. कविता ,छंद रचू लागली. लाल डेड ने मोठया प्रमाणात साहित्य रचना केली. बुद्धीमान स्त्री म्हणून आणि काश्मीरची  शेक्सपियर म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

अक्क महादेवी आणि लाल डेड या दोन्ही विदुषींचा घरच्या मंडळींनीच छळ केला मात्र, त्यांनी परिस्थितीशी निकराचा लढा देवून आपले अस्तित्व निर्माण केले. आज आमच्या तथाकथित आधुनिक समाजात महिलांनी काय परिधान करावे, कसे वर्तन करावे असे विचार थोपवले जातात, या दोन विदुषींनी तर ११ व्या आणि १३व्या शतकात अंगावरील वस्त्रांचा  त्याग केला व अदभूत कार्य करून दाखविले. हाच समाज त्यांना आता देवत्वाचे रुप प्रदान करतो. एवढच काय तर समाजात दुर्गा,शारदा म्हणून महिलेचे उत्सव मोठया प्रमाणात साजरे होतात. मात्र,माणूस म्हणून तिला वागणूक नाकारतो. अशा समाजाचा भाग असल्याचा अभिमान बाळगून आम्हीही भिड का हिस्सा होतो या पेक्षा दुर्देव ते काय असणार !     

                                         00000

  


Monday, May 29, 2023

संसदेची ऐतिहासिक इमारत आणि तिचे पालटलेले रुपडे







       

जेथून भारतीय देशाचा गाडा हाकला जातो, देशासाठी  कायदे  तयार होतात आणि देश  वासियांच्या  प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या कल्याणाचे निर्णय घेतले जातात अशी इमारत म्हणजे संसद इमारत. देशाची  राजधानी दिल्लीत स्थित असलेल्या या इमारतीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्याने उभ्या राहिलेल्या संसद इमारतीचे २८ में २०२३ रोजी मोठया थाटात उद्घाटन झाले. संसदेच्या जुन्या इमारतीच्याच परिसरात केवळ अडिच वर्षाच्या कालावधित (१० डिसेंबर २०२० ते २८ में २०२३)  आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात बांधून तयार झालेली ही इमारत.

जुन्या इमारतीने ब्रिटीश शासन आणि भारतीय स्वातंत्र्य व त्यानंतर स्थापन झालेली पहिली लोकसभा निवडणूक व राज्यसभा सभागृहांची पहिली बैठक हे ऐतिहासिक क्षण अनुभवले. पारतंत्र्यातील भारतदेश आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशाची प्रगती बघतानाच चीन आणि बांग्लादेश युद्ध प्रसंगी या सभागृहात घेतले गेलेले महत्वाचे निर्णय, देशाला विविध क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचीही ही इमारत साक्षीदार होती. कटू आठवण म्हणून या इमारतीने 13 डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी  हल्लाही अनुभवला. म्हणता म्हणता ही इमारत वयाच्या शतकपूर्तीकडे असताना देशातील धोरणी राजकारण्यांनी या इमारतीची अनुपयुक्तता व भविष्यातील गरजा पाहता संसदेच्या नवीन इमारतीची योजना  आखली  आणि १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यावर आणि  पुढील वर्षी १८ व्या लोकसभेच्या मुहूर्तावर या इमारतीचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

ब्रिटीशांनी  कोलकत्त्याहून  १९११ मध्ये  दिल्ली  येथे आपली  राजधानी  स्थलांतरीत केली. आणि  राजधानीचा  विचार करता येथे देशाचा  राजकारभार हाकण्यासाठी आवश्यक वास्तू निर्माणाचे कार्यही  हाती घेतले. यातूनच  राष्ट्रपती भवन, इंडियागेट, संसद भवन आदी इमारती उभारल्या गेल्या .एडवीन ल्युटन या वास्तुविशारदाने हा सर्व परिसर बांधून तयार केल्याने  या सर्व परिसराला ल्युटीएन झोन असे नामाभिदान झाले. ल्युटीएन झोनमधील प्रमुख इमारतीत संसदेच्या इमारतीचा समावेश होतो. संक्षेपात जाणून घेवूया या इमारतीच्या इतिहासाविषयी. 

१२ फेब्रुवारी १९२१ रोजी जुन्या संसदेच्या इमारतीची अर्थात कंसिल हाऊसची कोनशिला डयुक ऑफ कॅनॉट यांनी ठेवली. या इमारतीच्या बांधकामास ६ वर्ष लागले आणि १८ जानेवारी १९२७ रोजी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड इर्विन यांच्या हस्ते संसदेच्या इमारतीचे उद्घाटन झाले. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारी १९२७ ला या इमारतीत केंद्रीय विधानसभेच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले,हीच या इमारतीतील पहिली वहिली बैठक ठरली.  स्वातंत्र्याच्या उंबरठयावर ९ डिसेंबर १९४६ रोजी संसदेच्या इमारतीत संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. भारतीय स्वांतत्र्याची  साक्षीदार  ठरलेल्या या इमारतीत १४ आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांकडून भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण झाले व संविधान सभेची  मध्यरात्रीची ऐतिहासिक बैठक पार पडली.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती होत असतानाच देशात पहिल्या वहिल्या लोकसभा निवडणुकीची तयारीही होत होती आणि ही इमारत स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभेच्या निर्वाचीत सदस्यांच्या आगमनासाठी आसुसली होती. निवडणुका पार पडल्या आणि १३ मे १९५२ रोजी जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अर्थात संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि जनतेतून अप्रत्यक्ष्‍ निवडून आलेल्या प्रतिनिधींचे वरिष्ठ सभागृह अर्थात राज्यसभेची  पहिली बैठक झाली.

3 ऑगस्ट १९७० रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी संसदेच्या ॲनेक्सची कोनशिला ठेवली तर २४ ऑक्टोबर १९७५ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या ॲनेक्स इमारतीचे उद्घाटन केले. १५ ऑगस्ट १९८७ रोजी तत्कालिन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी संसद ग्रंथालयाची कोनशिला ठेवली आणि ७ मे २००२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन या ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन केले.

५ मे  २००९ रोजी उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीची कोनशिला  ठेवली. तर ३१ जुलै २०१७ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी संसदेच्या ॲनेक्सच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन केले हीच  संसदेच्या जुन्या इमारतीच्या संबंधातील अखेरची घटना घडली.

भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली होती  तेथून काही दिवसांनी ५ ऑगस्ट २०१९ ही तारिख संसदेच्या नव्या इमारतीच्या जन्माचे मुळ ठरले. याच दिवशी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम.व्यैकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी नवीन,आधुनिक संसद इमारतीचा प्रस्ताव उभय सभागृहामध्ये ठेवला.  मंजुरीनंतर या प्रस्तावा बरहूकुम सर्व कार्यवाहीसही सुरुवात झाली. १० डिसेंबर २०२० रोजी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची कोनशिला ठेवली व अडिच वर्षांच्या अल्पावधित निर्मित या इमारतीचे २८ में २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी श्री मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन झाले.

              संसदेच्या नवीन इमारतीविषयी

          नवीन संसदेची इमारत 64,500 चौरस मिटरवर स्थित असून त्रिकोणी आकाराची आणि चार मजली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. येथील लोकसभा सभागृहात ८८८ आसन क्षमता असून राज्यसभेत ३३६ आसन क्षमता आहे. येत्या काळात परिसीमनामुळे सदस्य संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता ही आसन क्षमता वाढविण्यात आली आहे. सद्या लोकसभेची सदस्य संख्या ५५२ तर राज्यसभेची सदस्य संख्या  २५० (238 + राष्ट्रपतींद्वारा निवडण्यात येणारे १२ सदस्य) आहे. नवीन संसदेला ज्ञानद्वार,शक्ती द्वार आणि कर्मद्वार असे मुख्य तीन द्वार आहेत. ही इमारत भूकंप रोधी असून संसद सदस्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानआधारीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

     या वास्तूमध्ये वारसा तसेच स्थापत्य, कला, कौशल्य, संस्कृती तसेच संविधानाचे स्वरही आहेत. लोकसभेत राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ तर राज्यसभेत राष्ट्रीय फूल ‘कमळा’वर आधारित संकल्पनेवर अंतर्गत सजावट केली आहे. संसदेच्या आवारात ‘वटवृक्ष’ हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. नवीन इमारतीमध्ये देशाच्या विविध भागांतील वैशिष्ट्यांचा अंतर्भाव केला आहे. राजस्थानमधील ग्रॅनाइट, महाराष्ट्रातील लाकूड आणि भधोई कारागिरांनी तयार केलेल्या गालिच्याचा वापर सजावटीसाठी करण्यात आला आहे.

ही वास्तू उभारताना 60,000 श्रमिकांना रोजगार मिळाला. त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारी नवीन गॅलरी या सभागृहात उभारण्यात आली आहे. टाटा उद्योग समुहातील टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने संसदेची नवीन इमारत बांधली आहे. गुजरातमधील ऑर्कीटेक्चर फर्म ‘एचसीपी’ ने  या इमारतीचे डिजाईन केले आहे. बिमल पटेल हे या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद आहेत.

एकंदरितच देशाच्या संसदेची नवीन इमारत उभारली गेली  आहे. १७ व्या लोकसभेचे या वास्तुतीतील पहिले वहिले पावसाळी/ हिवाळी अधिवेशन आणि अर्ध अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. १८व्या लोकसभेच्या सदस्यांसाठी व राज्यसभेच्या नव्या अधिवेशनासाठी २०२४ मध्ये ही वास्तू वाट पाहणार आहे. नव्या भारताच्या नव्या अपेक्षांचीपूर्ती या वास्तुतून पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा देशातील १४२ कोटी जनतेची असणार आहे.

                                           00000 

Wednesday, May 17, 2023

असा हा बृहन्महाराष्ट्र माझा



जुना लेख (वर्ष अंदाजे २०१४-१५)

महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांमध्ये देशात अग्रगण्य मान मिळवीत आहे. महाराष्ट्राबाहेर देशभरातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास असणारे मराठी माणस राज्याचा हा मान सन्मानाने उंचवीत आहेत. महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र अर्थात बृहन्महाराष्ट्र ही त्याची ओळख. नोकरी, व्यवसाय, उद्योग आदींसाठी देशातील अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्रीयन जनता स्थायीक झाली. मराठी कला, संस्कृती जपण्यासाठी त्यांनी त्या-त्या राज्यांमध्ये मराठी संस्था स्थापन केल्या. आपला मराठी बाणा, मायबोली आणि सांस्कृतिक वारसा परप्रांतात टिकवून ठेवणा-या या संस्थांनी महाराष्ट्रातून येणा-या जनतेसाठी राहण्याची सोयही उपलब्ध करून दिली. बृहन्महाराष्ट्र मंडळ ही  देशभरांत कार्यरत सुमारे एकहजरांहून अधिक बृहन्महाराष्ट्र संस्थांची शिखर संस्था. मराठी सण, उत्सव साजरे करत राज्याची कला, संस्कृती व पंरपरा जपण्याचे  व  तिचा विस्तार करण्याचे महनीय काम  या संस्थांनी समर्थपणे केले आहे. या संस्थाच्या कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने या संस्थाना वेळोवेळी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

        देशभरात जवळपास प्रत्येक राज्यांमध्येच अशी मराठी मंडळ असून त्यांची वार्षीक अधिवेशनही होतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या बृहन्महाराष्ट्र मंडळांचे पदसिध्द अध्यक्ष असतात त्यामुळे या अधिवेशनाला बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी उपस्थितीती लावली आहे. महाराष्ट्रा बाहेर अन्य राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाटय संमेलन यांच्यासह अन्य महत्वपूर्ण आयोजनातही या संस्थांचा मोलाचा सहभाग असतो .

                                       एक नजर इतिहासावर

सतराव्या-अठराव्या शतकात मराठयांचे राज्य संपूर्ण भारत भर परसले होते. श्री. शहाजी महाराजांनी दक्षिणेकडे चढाई केली आजचे म्हैसूर त्यावेळी मराठयांनी जिंकले होते. त्यामुळे या संस्थानचे बरेच दिवाण मराठी भाषिक होते. राघोबा दादांनी उत्तरेकडे अटकेपार मराठी सत्तेचा झेंडा रोवला तर नागपूरच्या भोसल्यांनी बिहार, ओरिसा, बंगालकडे स्वा-या करून मराठी राज्याच्या कक्षा रूंदावल्या. त्यामुळे ग्वाल्हेर, बडोदे, इंदूर, देवास, धार इ. त्यावेळच्या मराठी राज्यांत मराठी माणसे मोठया प्रमाणावर स्थायिक झाले. पानीपतच्या दुस-या युध्दात मराठयांचा झालेला निसटता पराभाव आणि दिल्लीवर तख्त राखन्याची हुकलेली संधी ही सर्वज्ञात आहे. त्यावेळी महाराष्ट्रातून आलेले  आणि युध्दात वाचलेले मराठी सैन्यातील लोक याच भागात (हरियाणा) स्थायिक झाले. नंतरच्या शतकात ब्रिटीशांचे राज्य आले व उद्योग धंघ्यासाठी, नोकरी निमित्ताने मराठी माणसे पर प्रांतात जाऊ लागली. बघता बघता त्यांच्या कित्येक पिढयांचा जीवन काल तेथेच लोटला.  

महाराष्ट्राबाहेर  वास्तव्यास असणा-या या मराठी बांधवांनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातून महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र मंडळ अशा संस्था स्थापन झाल्या. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला  टिमरनी, झाशी, ग्वाल्हेर, उज्जैयिनी,पाटण, इंदूर, बडौदे, अजमेर,रतलाम,सागर आदी ठिकाणी या संस्था स्थापन झाल्या होत्या. मराठी शाळा, ग्रंथालये, व्यायामशाळा सुरु करून तसेच मंदिरांची स्थापना करून भजन, किर्तन आणि प्रवचन यामाध्यमातून प्रबोधकार्य  सुरु झाले  व राज्याबाहेर मराठी बाणा जपण्याचे कार्य या संस्थानी जोमाने सुरु ठेवले. १९२६ पर्यंत बृहन्महाराष्ट्रात जवळपास ५० संस्था सुरू झाल्या होत्या.     

                         बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना

कानपूर येथे १९२५ मध्ये आयोजित काँग्रेस आणि हिंदुसभा यांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब केळकर यांनी  देशभरात कार्यरत तत्कालीन बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना एकत्रित करून बृहन्महाराष्ट्र मंडळ ही  मध्यवर्ती केंद्रीय संस्था स्थापन केली. राजधानी दिल्ली मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहे.

                   बृहन्महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन

बृहन्महाराष्ट्रात कार्यरत या संस्थाच्या कामात सूत्रबध्दता आणण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाने अधिवेश भरविण्याचे ठरविले. बृहन्महाराष्ट्रातील संस्थांच्या समान उद्देशाबाबत चर्चा घडवून आणने, मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन व विस्तार करणे आदी उद्देशाने १९२६ मध्ये झांशी(उत्तरप्रदेश) येथे बृहन्महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन भरले. तात्यासाहेब करंदीकर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथूनच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यास ख-या अर्थाने सुरुवात झाली. तात्यासाहेब करंदीकर यांनी  १९२५ ते १९४५ या कालावधित मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. त्यानंतर १९४८ ते १९६५ पर्यंत काकासाहेब गाडगीळ यांनी मंडळाला नेतृत्व दिले. यानंतर महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९८० पर्यंत मंडळाचे अध्यक्षपद भुषविले. श्री. वसंत साठे यांनी १९८० ते १९९१ पर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. मध्यंतरीच्या दोन वर्षाच्या काळात श्री. शरद पवार यांनी मंडळाच्या अध्यक्षपद सांभाळले. १९९३ ते १९९६ या कालावधित श्री. वसंत साठे पुन्हा मंडळाचे अध्यक्ष झाले.

        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष राहतील असा मंडळाच्या घटनेत बदल करण्यात आला. त्यानुसार श्री. मनोहर जोशी, श्री. विलासराव देशमुख,श्री. अशोकराव चव्हाण, श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

        मंडळाची आतापर्यंत ६५  हून  अधिक  अखिल भारतीय स्वरूपाची अधिवेशने झाली आहेत. भारत देश पारतंत्र्यात असताना देशप्रेम जागविण्याचे कामही या अधिवेशनांनी केले. १९४० मध्ये कराची येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. देशातील विविध शहरांमध्ये ही अधिवेशने आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातील शहरांमध्येही अधिवेशन घेण्यात आली. थोर विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ,समाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी  अधिवेशनाची अध्यक्षता स्वीकारून मार्गदर्शन केले आहे.

                                                   प्रकाशने

विविध प्रकाशनांच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधवांना जोडण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळाने केले. सुरुवातीच्या काळात बृहन्महाराष्ट्र मासिक या नावाने नियतकालिक प्रकाशीत करण्यात येत असे. १९३५ पासून या नियतकालिकाचे नाव महाराष्ट्र विस्तारअसे करण्यात आले. १९६७ मध्ये रतलाम (मध्यप्रदेश)येथे आयोजित अधिवेशनात हे नाव बदलून मायमराठीकरण्यात आले. इंदूर येथील बृहन्महाराष्ट्र संस्थांनी या नियतकालिकाची व्यवस्थापकीय जबाबदारी स्वीकारली असून अश्विन खरे ये हा नियतकालीकाचे संपादक आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्यावतीने बृहन्महाराष्ट्र संस्था परिचय सूची हे महत्वाचे प्रकाशन करण्यात येते. यात देशभरातील मराठी संस्थांची माहिती देण्यात आली असून आतापर्यंत या पुस्तिकेच्या ४ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. सूर्यकांत कुळकर्णी यांनी पुस्तिका संपादित केल्या आहेत.

  

                                                 दिल्लीतील महाराष्ट्र

राजधानी दिल्लीत विविध मराठी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या विभागांच्यावतीने राज्याची संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे सुरु आहे.

        पहाडगंज स्थित दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १९९२ पासून महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेचे प्रादेशिक केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. संस्थेच्या आरामबाग येथील नूतन मराठी शाळेतील सभागृहात या नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. बृहन्महाराष्ट्रातील विविध राज्यातील नाटय संस्था या स्पर्धेत सहभाग घेतात. स्पर्धेत निवड झालेल्या पहिल्या तिन नाटकांना महाराष्ट्र राज्य नाट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था ही १९७२ पासून नाटय व सुगम संगीत स्पर्धा, अखिल भारतीय गद्य व संगीत नाटय स्पर्धेचे आयोजन करीत आहे. या संस्थेच्यावतीने नूतन मराठी शाळा चालविण्यात येते. ५ वी ते १२ वी पर्यंत या शाळेत शिक्षण दिले जाते या शाळेत मराठी विषय अनिवार्य आहे.

        महाराष्ट्र स्नेह-संवर्धक समाज संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव, दासनवमी, स्वातंत्र्यदिन कोजागिरी, संक्रांत आदी कार्यक्रम साजरे केले जातात. लोधी रोड स्थित वनिता समाजाच्या वतीने वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेच्यावतीने समाजातील गरीब मुलांसाठी ज्युनीअर व सिनीअर किंडर शाळा चालविण्यात येते. करोलबाग येथील फैज रोड स्थित मराठा मित्र मंडळाच्यावतीने वर्ष भर विविध सण उत्सव साजरे करण्यात येतात. झंडेवालान भागात संस्थेच्या वतीने चौगुले पब्लिक स्कुल चालविण्यात येते. ही इंग्लीश मेडीयमची शाळा असून या शाळेत पहीली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते इथे मराठी विषय अनिवार्य आहे. सार्वजनिक उत्सव समिती विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. गणेशोत्सव काळात समितीच्या वतीने महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, यशवंतराव चव्हाण स्मृति सामारोह , कोजागिरी पोर्णिमा आदी कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. याशिवाय करोलबाग स्थित राणी लक्ष्मी भगिनी समाज, जनकपुरी आणि लाजपतनगर स्थित महाराष्ट्र मित्र मंडळ, पुर्वांचल मित्र मंडळांच्या माध्यमातून वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच गणेशोत्सव काळात दिल्ली  व परिसरात जवळपास ३५ मराठी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

        महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाच्यावतीनेही मराठी भाषा व संस्कृती जपण्याचे काम प्रभावीपणे केले जाते. पत्रकार दिन, मराठी भाषा दिन, ग्रंथोत्सव, महाराष्ट्र दिनाचे आयोजन परिचय केंद्राच्यावतीने करण्यात येते. महान व्यक्तींची जयंतीचे वर्षभर साजरी करण्यात येते. महाराष्ट्रातील विविध लेखक, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी जनतेचा थेट संवाद घडवून आणण्यासाठी परिचय केंद्राच्यावतीने आयोन करण्यात येते. जनसंपर्क, वृत्त व माहिती असा मोठा डोलारा कार्यालयाच्यावतीने सांभाळला जातो. पुस्तकांचे नैमित्तिक प्रकाशन करण्यात येते, दर दोन वर्षांनी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात येणारी दिल्ली डायरी ही विविध माहितींनी परिपूर्ण पुस्तिका विशेष प्रसिध्द आहे. परिचय केंद्राचे सुसज्ज असे ग्रंथालय असून दिल्लीतील मराठी जन तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेतात.

                          बृहन्महाराष्ट्रातील महात्वाच्या संस्थाचे पत्ते

 

बृहन्महाराष्ट्र भवन,

(दिल्ली महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट) पहाडगंज पोलिस स्टेशन जवळ, नवी दिल्ली- ११००५५.

दूरघ्वनी : ०११-२३६७९००८/२३६७०५२०

वनिता समाज,

१३ इन्स्टिटयूशनल एरीया, लोदी रोड, साईबाबा मंदीर जवळ, नवी दिल्ली-११०००३.

दूरध्वनी :

सार्वजनिक उत्सव समिती,

यु-१७,ग्रीन पार्क एक्सटेंशन, नवी दिल्ली-११००१६

दूरध्वनी: ०११-२६१६७४०१, भ्रमणध्वनी ०९८९९८६२१११

महाराष्ट्र परिचय केंद्र,

ए-८, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडक सिंह मार्ग,नवी दिल्ली-११०००१.

दूरध्वनी : ०११-२३३६३७७३/ २३३६७८३०

महाराष्ट्र मित्र मंडळ, जनकपुरी, शिवनगर परिसर,सी-२बी, पॉकेट १२, जनकपुरी, नवी दिल्ली-११००५८.

०११-६४६२२२८०

(हरियाणा)

महाराष्ट्र मंडळ,गीता मंदीर, १०७७, सेक्टर-२९, फरीदाबाद-१२१००१

भ्रमणध्वनी : ९९५८८७७६८८

(हिमाचल प्रदेश)

महाराष्ट्र मंडळ,

९१, पंथाघाटी देवांजलीआयुर्वेदिक डिसपेंसरी जवळ, कसम्पटी, शिमला-१७१००९.

दूरध्वनी : ०१७७-२६२०८०८

(पंजाब)

महाराष्ट्र मंडळ, प्लॉट नं.२४७ सेक्टर १९ डी, चंडीगढ-१६००११

 

(उत्तरप्रदेश)

महाराष्ट्र समाज ८४/१६६ कटरा मकबूलगंज, लखनऊ-२२६०१८.

दूरध्वनी -०५२२-६५३४९१९, भ्रमणध्वनी ०८००९०६७१७३ (व्यवस्थापक , सदानंद जोग)

(उत्तरप्रदेश)

काशी महाराष्ट्र सेवा समिती, सी.के. २/४८, नीळकंठ स्मृति भवन, वाराणसी-२२१००१.

भ्रमणध्वनी: ०९३३५६४१२६७(अध्यक्ष-माधव रटाटे)

(उत्तर प्रदेश)

टिळक स्मारक भवन, ऑफ जी.टी.रोड, अलोपीबाग, अलाहबाद-२११००६.

दूरध्वनी : ०५३२-२६६७४११

(उत्तराखंड)

महाराष्ट्र समाज कल्याण समिती, मंगलायतन, ४४/३, कनाल रोड, जाखन , डेहरादून-२४८००९.

भ्रमणध्वनी: ०९७५९३४८५६४

(मध्यप्रदेश)

श्री. समर्थ सेवा मंडळ, नरहरी छायाएल.आय.जी.१७७ कोटरा, सुल्तानाबाद, भोपाळ-४६२००३.

दूरध्वनी:०७५५-२७६२९५०

(मध्यप्रदेश)

गाडगीळ वाडी, मेन हिंदी शाळे समोर, हाटकेश्वर वार्ड, खंडवा-४५०००१.

दूरध्वनी:०७३३-२२४९१११

(मध्यप्रदेश)

लोहामंडी स्कूलच्या बाजूला, ३१, पंचशील नगर(स्नेहनगर), इंदौर-४५२००.

 

दूरघ्वनी: ०७३१-२४४६१३२

 

 

रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक,

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली