हॅलो ब्रेव्ह गर्ल ………
ऑफिसला
पोचायची लगबग, अशात जीपीओ चौकात(नागपुरातील सिव्हील लाईन परिसर) आलो सिग्नल लागल्याने
एकामागोमाग पाच स्कुल बस उभ्या होत्या. रसत्याच्याकडेला शिस्तीत पायी जाणारा मी एव्हाना
कानावर पडलेल्या एका हाकेने स्तिमीत झालो , सांदिपनी शाळेच्या बसमधील जेमतेम पहिल्या
दुसरीतील शाळकऱ्यांमधील निर्वाकार ,निरागस मुलींनी हात उंचावून ‘हाय अंकल,हाय अंकल…’
म्हणत साद दिली. त्याला हलके स्मीत करून प्रतिसाद देत ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल्स’ म्हणत
मी पुढे जात होतो. आता पाचही स्कुलबसमधून तीच हाक तोच उत्साह आणि त्याला माझा सारखा
प्रतिसाद देण सुरु होतं. चिमुरडया मुलींना दिलेला आजचा प्रतिसाद हा माझ्यासाठी खास
होता कारण, नुकतेच एक लेक्चर देवून आलो आणि त्यात मुली महिलांवरील अत्याचाराच्या घटना
थांबवायच्या असतील तर आपल्याला त्यांच्यासोबत वागण्यात जाणीवपूर्वक बदल करावा लागेल
असं मी म्हणालो. मुलींसाठी इंटेलिजंट,ब्रेव्ह
आदी शद्ब उच्चारणे हा माझ्या लेक्चरमधील एक भाग होता त्या स्कुलबस मधील मुलींच्या हाकेला
ओ देतांना हॅलो ब्रेव्ह गर्ल म्हणून मी स्वत: पासून त्याची सुरुवात केल्याचं समाधान
मला लाभलं.
आपल्या दैनंदिन जीवनात मुली किंवा महिलांप्रतीच्या भावना वा वागणुकीतून बराच परिणाम घडतो
असे मला वाटते. म्हणजे घरात अमक्या गोष्टी मुलींनीच करायच्या तमक्या गोष्टी फक्त मुलांनीच
करायच्या असतात तो मुलींचा प्रांत नाही असे दंडक आपणच निर्माण करून माणूस म्हणून त्यांचं अस्तीत्व नाकारल असतं. आणि मुलगी म्हणून
तिच्याकडून वागण्याच्या अपेक्षांचा डोंगर उभा करून ठेवलेला असतो. मग ती तशी वागली नाही
तर मग ती वाईट किंवा उरमट असे सोयीचे शेरेही आपण चिटकवून मोकळे होतो. माझा तर एका गोष्टीवर
ठाम विश्वास आहे की, ‘मुलगा- मुलगी ही निसर्गाने किंवा शरीर विज्ञानाने घडणारी गोष्ट
आहे जी एक सुदृढ समाज निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आहे.त्याचा जसा आदर होतो तसा तिचाही
आदर व्हायला हवा आणि त्याची सुरुवातही स्वत:च्या घरातून व्हावी लागेल. सजग पालक म्हणून
मुलगा मुलगी भेद न करता सर्व संधी सेवा समान उपलब्ध करून द्याव्या लागतील.’
या सोबतच
एक महत्वाची बाब निरीक्षणातून पुढे आली की, मुलींना सुंदर,सालस,निरागस आणि टोकाचं सागांयच
झाल तर सेक्सी असे बिरुद लावली जातात. आणि ती ही त्या बिरुदाला साजेशी सुंदर,सालस,निरागस
व सेक्सी दिसण्याकडे वागण्याकडे कसोसीने लक्ष देते.
आता मुलींना मुलांच्या खांद्याला खांदा
लावून चालण्यासाठी आपल्यालाही ही बिरुद बदलावी लागतील इंटेलिंजंट, ब्रेव्ह, शार्प,
टॅलेंटेड असे बुरुद लावावी लागतील जेणे करून या बिरुदावल्या त्यांच्या जगण्याचा भाग
होतील व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याही धडपडतील. नाही तर देवत्व बहाल करून तिची आराधना, पुजा करणारा समाज मंदिरातून आल्यावर
तिलाच काय वागणूक देतो हेही सांगणे नलगे.
माणूस म्हणून स्त्रिचा स्वीकार आणि तिच्या
प्रती आदरातूनच हा प्रवास एका सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतो. त्यासाठी स्वत:पासून
व सजगतेने सुरुवात व्हावी लागेल. आजच्या ‘हॅलो ब्रेव्ह गर्ल’ या संबोंधनाने का होईना
एक नवी सुरुवात झाली आहे. हा संदेश आता सर्वदूर पोचवून त्याला व्यापक स्वरुप द्यायचे
आहे.
००००००

No comments:
Post a Comment