|
Thursday, July 28, 2016
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी राज्य शासन प्रयत्नशील - संभाजी पाटील-निलंगेकर
Sunday, July 17, 2016
‘ये दिल्ली है मेरे यार ’
करीअर घडविण्याच्या
ध्येयाने दिल्ली शहरात पाय ठेवला आणि बघता-बघता ते ध्येय साध्यही झाले. याच शहरात
शासकीय नोकरीचा श्रीगणेशा आणि वैवाहिक जीवनाची सुरुवातही झाली. पाहता-पाहता
घटनाक्रम मागे पडला आणि आठ वर्ष निघून गेले. यासर्वांमध्ये या शहारातील काही गोष्टी
ज्या मला प्रकर्षाने आवडल्या त्याचा एक वेध ‘ये दिल्ली है मेरे
यार ’.
उत्तम वाहतूक व्यवस्था –
डीटीसी अर्थात दिल्ली ट्रान्सपोर्ट सीस्टीमच्या दोन गाडया या शहरात धावतात आणि आता त्यांच्या
दिमतीला ऑरेंजबस या नारंगी रंगाच्या गाडया आल्या आहेत. या गाडयांचे वैशिष्टय
म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज बसेस यांचा कमीत कमी प्रवास खर्च आकार अर्थात कमीत कमी
तिकीट ५ रूपये आणि जास्तीत जास्त २० रूपये आहे. तर रेड बस जी एसी अर्थात
वातानुकुलीत आहे तिची किमान तिकीट १० रूपये तर कमाल २५ रूपये आहे. याला अपवाद फक्त
विमानतळ ते कश्मीरीगेट बसस्थानक हा वातानुकुलीत बसचा प्रवास ज्यात मुख्यत्वे विमान
प्रवास करून आलेले प्रवासी असतात त्याची तिकीट ८० रूपये आहे. तिकीट दर कमी
असल्याने शक्यतो कोणीच विना तिकीट प्रवास करीत नाहीत. आणि तिकीट कंडक्टर जवळ जाऊनच
तिकीट घेण्याची पध्दत इथे कसोशीने पाळली जाते. रात्रभरही डीटीसी बसेसची सेवा उपलब्ध आहे व महिलांच्या
सुरक्षेसाठी यात पोलिस रक्षक उपस्थित असतो.
या बसेस ‘सीएनजी’ अर्थात ‘कम्प्रेस नॅचरल गॅस’
या धूर विरहीत इंधनावर चालत असल्याने शहरा प्रदुषीत होण्याचा धोकाही टळतो.
मेट्रो ट्रेन डीएमआरसी
अर्थात दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने वर्ष २००२ मध्ये दिल्ली शहरात मेट्रो ट्रेन
सुरु केली. जनसामान्यांना परवडेल असा प्रवास खर्च आणि नीटनेटकी, सुरक्षीत व
वातानुकुलीत प्रवास व्यवस्था असे वर्णन करता येईल मेट्रोचे. कमीत कमी तिकीट ८
रूपये तर जास्तीत जास्त ४० रूपये प्रवासासाठी आकारला जातो. सुरक्षेच्यादृष्टीने
अत्यंत चोख व्यवस्था आहे. केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा येथे देण्यात आली आहे.
स्त्री – पुरुषांना विशेष तपासणीतून जावे लागते तर त्यांच्याकडे असणारे बॅगेजही
स्कॅनर मशीन मधून जाते. इथले सुरक्षा प्रहरी प्रंचड प्रामाणिक आणि कामाप्रती
डेडीकेटेड असल्याचे पदोपदी जाणवते ते आपल्या कामाच्या वेळेत कुणाही प्रवाश्यांशी
गप्पा मारत नाहीत किंवा त्यांनी काही खाण्यास दिले तर ते स्वीकारत नाहीत (मकरसंक्रातीला एका सुरक्षा रक्षकास प्रांजळमनाने तिळगुळ देण्याचा प्रयत्न
केला होता पण त्याने स्वीकारण्यास मना करून मी डयुटी अवर मधे काहीही स्वीकारू शकत
नाही असे सांगितले यातून मला ही माहिती कळली) मद्यपानाच्या
वस्तू, ज्वालाग्रही पदार्थ, शस्त्रास्त्र यांची कसून तपासणी केली जाते. आणि अशा
रितीने हा प्रवास सुरक्षित होण्याची खात्री पटल्या नंतर पुढे स्वच्छतेची घेण्यात
येणारी काळजी आपल्या नजरेस पडते. कुणाही प्रवाशाला मेट्रोमध्ये खाने पिने
निर्बंधीत करण्यात आाले आहे त्यामुळे इथे स्वच्छता राखण्यात मदत झाली आहे मात्र
मेट्रोस्टेशलाच काही खान्याच आउटलेट देण्यात आल्याने इथे आपली भूकही क्षमते.
कधीकाळी आपण आपल्याकडील चिज वस्तू विसरलात तर मेट्रोट्रेन मधीत सुरक्षा विभाग
त्याचीही काळजी घेते. माझे एका मेट्रोस्टेशनवर हरवलेले जॉकेट, वॉलेट आणि मोबाईल
फोन मला तातडीने आणि योग्य उलट तपासणी करून परत देण्यात आलाचा अनुभव मी घेतला आहे.(या तीनही वेगवेगळया घटना होत्या.). प्रवाशाला
काऊंरवरून टोकन घ्यावे लागते तर कस्टमर केअरबुथहून आपणास मेट्रो कार्ड काढून
सवलतीच्या दरात व टोकन काढण्यासाठी रांगेत
न लागता प्रवास करणे सोयीचे होते. असे मेट्रोकार्ड चार्ज करण्यासाठी बहुतांश मेट्रो स्टेशनवर वेंडींग
मशीनची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मेट्रो कार्ड घेताना तुमचे पैसे जमा केले
जातात कार्ड वापरून झाल्यास ते पैसे परत मिळतात.
मेट्रो कार्डचे मशीन वरील कमीत कमी रिचार्ज १०० रूपयांचे तर कस्टमर केअरहून कमीत कमी २०० रूपयांचे
रिचार्ज केले जाते.
या दोनही मेट्रो विद्युत इंधनावर चालत असल्याने प्रदूषण विरहीत
वाहतूक व्यवस्था उपलब्ध होते.
एक्सप्रेस ट्रेन – ही
मेट्रोट्रेन दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या २०११ च्या कॉमनवेल्थ गेमच्या
पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आली. विमानतळाहून येणा-या प्रवाशांना थेट शहरात पोहचता
यावे आणि विशेषत्वे त्यावेळी या
स्पर्धेसाठी येणारे परदेशी खेडाळू आणि दर्शकांना प्रवासाची सोय व्हावी हा उद्देश
होता. या स्पर्धा आटोपल्या नंतर विमानतळाहून येणारे देशी –विदेशी प्रवाशांसाठी ही
सेवा उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला रिलायन्स कंपनीने ही मेट्रेा चालविण्यास
घेतली होती. ही मेट्रो दिल्लीतील सामान्य मेट्रोट्रेन पेक्षा वेगवान आहे आणि यात
प्रवाशांचा सामान ठेवण्याची व त्यांला बसण्यास उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
रिलायंसकडे असताना या मेट्रोप्रवासासाठी जास्त तिकीट आकारण्यात येत होती म्हणून
लोकांनी याकडे पाठ फिरवली. मात्र डीएमआरसीने ही मेट्रो चालवायला घेतली तिकीट दर
कमी केले परिणामी या मेट्रोमध्येही पुरेशी गर्दी असते. अल्पदरात जलदगती, सुरक्षीत
प्रवास करण्याची उत्तम सोय असेच वर्णन या एक्सप्रेस मेट्रो ट्रेनचे करावे लागेल.
ऑटो -
ऑटो चालकाला फक्त कुठे जायचे
ते सांगून मीटर डालना भैय्या म्हटल की तुमचा ऑटो प्रवास सुरु होतो. रस्त्याच्याकडेला
कुठेही उभे राहिल्यास चटकन ऑटो उपलब्ध होतो. ऑटोचे पहिले मिटर २५ रूपये आहे जे २
कि.मी अंतरापर्यत चालते . नंतर प्रती किमीला ७ रूपये दर आकारला जातो. शहरात
रात्रीही ऑटो चालतात मात्र नाईट चार्ज हा त्यासाठी अतिरीक्त अधिभार आकारण्यात
येतो. बरेचदा ऑटोवाल्यांशी खटके उडण्याचे चान्स असतात. तुलनेने महाग असला तरी
ऑटोचा प्रवासही या शहरात सुकर असाच आहे.
हात रिक्षा : अकुशल लोकांचा
मुख्यत्वे व्यवसाय हात रिक्षा चालविणे आहे. ही लोक हात रिक्षा दिवसभरासाठी भाडयाने
घेतात. दिवसाला १०० ते २०० रूपये भाडे आकारण्यात येते. यात हात रिक्षा चालवणारा
त्याच्या परिनी होईल तेवढया खेपा करून भाडे वजा करता आपल्या उदर निर्वाहासाठी हात
रिक्षा चालकाची भूमिका वठवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतो.
मुख्यत्वे मेट्रो स्टेशन पासून आत वस्तीमध्ये जाण्यासाठी या हात रिक्षांचा खूप
उपयोग होतो यासाठी कमीकमी प्रती मानसी १० रूपये प्रवास खर्च आकारला जातो. हात
रिक्षा चालक हे बहुतांश उत्तर प्रदेश व बिहार मधले असून शारिरीक अक्षमता आणि
पोटाची खडगी या झुंजीत ते मद्यपान करण्यास मजबूर होतानाचेही चिन्ह दिसते .
त्यामुळे त्यांच्या सोबत प्रवासखर्चाबाबत बार्गेनींग न करता मुकाटयाने प्रवास करने मला मानुसकीचे
वाटते.
बॅटरी रिक्षा : वर उल्लेखीत
प्रमाणेच हा प्रवास मेट्रो स्टेशन ते नागरी वस्ती मध्ये जाण्यासाठी उपलब्ध आहे.
बॅटरी रिक्षाची तिकीट प्रती मानशी १० रूपये असून एका बॅटरी रिक्षात नियमाने ४
प्रवासी बसतात पण अवैधपणे ५ ते ६ प्रवासी बसविण्याची प्रथा रूढ आहे. बॅटरी
रिक्षाला रात्रभर चार्ज करावे लागते व दिवसभर त्याच्या बॅटरी क्षमते नुसार तो
चालवावा लागतो. काही वेळा भाडयानेही लोक बॅटरी रिक्षा चालवतात. हात रिक्षा
चालकांच्या पोटावर काही प्रमाणात बॅटरी रिक्षाने पाय दिला असला तरी दोनही रिक्षा
चालक आपआपल्या परीने अर्थार्जन करतात व शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा भार उचलतात.
टॅक्सी सेवा : मुख्यत्वे
शहरातील महत्वाचे आंतरराज्यीय बस स्थानके, विमानतळ आणि रेल्वे स्थानकारवर टॅक्सी
सेवा उपलब्ध आहे. बॅगेज जास्त असेल तर ही सेवा उपयुक्त ठरते. सध्या ओला आणि उबर या
कार सुविधा आल्याने स्वस्त दरात ऑन मोबाईल कॉल अशी कार सेवा शहरातील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
चलन – फाटक्या
मळकट कागदी नोटा इथे हदृपार आहेत. चलन व्यवहारात कोणीही फाटक्या अन मळकट नोटा देत
नहीत किंवा स्वीकारतही नाहीत. कोण्याही दुकानदाराला ५०० ची नोट दिली आणि फक्त १०
ते २० रूपये किमतीची वस्तू घेतली तरी कुरकुर न करता तो आपणास उर्वरीत पैसे परत
करतो. हा एक उत्तम गुण येथे प्रत्येकच व्यावसायीक पाळतो त्यामुळे ग्राहकांची
गैरसोय टाळली जाते.
लहानग्यांचा शिष्टाचार- कितीही टुकरट मुलगा असला तरी
आपल्या नातेवाईंकासमोर झुकुन त्याला नमस्कार करण्याची या शहरातील पध्दत मला फारच
भावली. लहान मुलां मुलींपासून ते मध्यमवयीन लोक आपल्यापेक्षा जेष्ठांना मान देतात
हा शिष्टाचार सदैव स्मरणात रहावा असाच आहे जो आपल्याकडे सध्या धूसर होत चालला आहे.
स्वस्त आणि मस्त
वैद्यकीय तपासणी – इथे
सरकारी दवाखाने उत्तम व सुसज्ज आहेत. विनामुल्य वा अत्यल्प दरात औषधोपचार पुरविले
जातात त्यामुळे लोकांची गर्दी असते. डॉग बाईट झाल्यानंतर विनामुल्य
प्रथमोपचारापासून या काळात घेतलेल्या सर्व सुया असोत किंवा अन्य एका सरकारी दवाखान्यात माझा खोकल्यावर विनामुल्य समुळ उपचार करणा-या एमडी आयुर्वेद
डॉक्टर श्रीमती अहुजा. या व्यतीरीक्त आम्ही वास्तव्यास आहे त्या भागात अगदी आरोग्य
सेवा ही इश्वर सेवा या भावनेनी आपली आरौग्य सेवा देणारी डॉ. पुरण प्रकाश त्यांची
श्नुषा डॉ. दिपीका मुलगा डॉ. गौरव आणि डेंटिस्ट मुलगा हे अत्यल्पदरात रोग्यांना
सेवा देतात. दवाखान्यात कुणालाच होईस्तोवर सुई लावली जात नही, इथे तपासणी फी आणि
त्यातच एका दिवसाचे औषधीचे ४ डोज केवळ १०० रूपयांना दिले जातात. हे डॉक्टर कुणाही
पॅथलॉजीची जाहीरात वा त्यांच्याशी व्यवसायीक संबंध ठेवत नाहीत. कमीत कमी खर्चात
लोकांना उत्तम आरोग्य सेवा देणारे हे डॉक्टर कुटुंबिया व त्यांचे समविचारी या
शहरात चालणा-या वैद्यकीय व्यवसायातील काळया बाजारात प्रामाणीक सेवेच मोठ उदाहरण
आहे.
इतरांना देण्यात येणारी स्पेस – आपल्याकडे
इतरांच्या आयुष्यात डोकवण्याची सवय मोठया प्रमाणात आढळून येते मात्र हे शहर यास
पूर्ण पणे अपवाद आहे. प्रत्येक जन आपआपल आयुष्य जगतो एकमेकांना मदत करतात मात्र,
कोणाच्याही आयुष्यात डोकावत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक स्थळी व रस्त्यावर आपल्या
प्रिय लोकांसोबत वा कुटुंबियांसोत आत्मविश्वासाने व निडरपणे वागण्याची मुभा मिळते
जे सामाजिक वातावरण निर्मळ व स्वच्छ राखण्यास मदत होते. मात्र आपल्या देशात काही
ठिकाणी तरूण तरूणी एकमेकांशी बोलत असतील तर त्यांच्याकडे संशयांच्या नजरेतून बघून
होणारे अन्य प्रकार टाळण्यासाठी इतरांना जगण्याची स्पेस देणारी दिल्लीकर सदैव
स्मरणात रहावे असेच आहेत. ही स्पेस मिळन ही तुमच्या व्यक्तीमत्व विकासासाठी उत्तम
संधी असते असा माझा अनुभव आहे.
००००००
प्रामाणिकतेचे पायीक
आपल्या आजु बाजू नेहमीच ऐकायला येते
की, समाजात अप्रामाणिकपणा वाढला आहे, सर्वीकडे भ्रष्टाचार आहे. मात्र, आजुबाजूचे
लोक त्यांच्या व्यवसायात करीत असलेले प्रामाणिक काम पाहता मला समाजात अजूनही टिकून
असलेला प्रामाणिकपणा हा आशेचा किरण वाटतो आहे.
आजच उदाहरण सांगायच तर इस्त्री बिघडल्याने ती दुरुस्त
करायला म्हणून आमच्या भागातील ‘जैन इलेक्ट्रॉनीक्स’ च्या दुकानात गेलो. इस्त्री को क्या हुआ ? त्यांनी
विचारले ! मी म्हटले, ‘अचानक करंट होना बंद हो
गया’ त्यांनी लगेच इस्त्रीची तार हाती घेऊन इस्त्री चेक केली
. त्याचा जॅक चालत नसल्याचे निदान करून त्यांनी सांगितले , ‘जॅक
लावावा लागेल’ मी विचारले. ‘ खर्च किती
येईल’ त्यावर ते म्हणाले १५० रूपये. मी
म्हटले, ओके शाम में आकर ले जाऊंगा. सायंकाळी इस्त्री आणायला
गेलो तर मी त्यांच्याकडे ५०० ची नोट दिली त्यांनी मला ४०० रूपये परत केले. मी तिथून इस्त्री घेऊन निघतोच तो पुन्हा त्यांनी मला हाक मारली आणि
म्हटले, ‘मैने आपको
और पैसे देने बाकी है’ आणि त्यांनी मला ५० रूपये परत केले आणि म्हटले,
‘थोडा तार ढिला हुआ था तो ज्यादा खर्चा नही आया’. आता त्यांचा हा प्रामाणिकपणा बघून मला मात्र हायस वाटल.
आमच्या वस्तीत असणारा एक भाजी विक्रेताही असाच. तो कधीच
अव्वाच्या सव्व पैसे आकारत नाही. जेवढा नफा त्याला त्यात अपेक्षित असतो त्या पलीकडे
तो पैसे घेत नसल्याचा माझा अनुभव आहे. तसाच आमच्या वस्तीतील चांभार काका सुध्दा
कामाचे जेवढे पैसे होत असतील तेवढेच घेतात अवाजवी पैसे ते आकारत नाहीत. आणि मी
ज्यांच्या बद्दल नेहमीच उल्लेख करतो असे डॉ. पुरणप्रकाश शर्मा आणि त्यांचे डॉक्टर
कुटुंबिय तर स्वस्तात लोकांना उत्तम
आरोग्य सेवा देण्याचे प्रामाणिक काम करीत आहेत.
ही काही प्रातिनिधीक उदाहरणे जरी असली तरी ‘बुंद बुंद से सागर बनता है’ या न्याया प्रमाणे मला हे चित्र अतिशय आश्वासक आणि प्रेरणादायी वाटतं.
आपल्या समाजात प्रत्येकानेच आपली सेवा किंवा काम हे प्रामाणिकपणे केले तर समाजातील
नकारात्मक वातावरण नष्ट होण्यास चांगलीच
मदत होईल हा माझा विश्वास दृढ होतो.
०००००
आयसीस व नक्षली कारवाया रोखण्यासाठी राज्याची महत्वपूर्ण पावले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शनिवार, १६ जुलै, २०१६
नवी दिल्ली : आयसीस या दहशतवादी संघटनेच्या व नक्षल्यांच्या कारवाया रोखण्यासाठी राज्याने महत्वाची पाऊले उचलली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रपती भवनात आयोजित 11 व्या आंतरराज्य परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह केंद्र सरकारमधील महत्वाचे मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या वतीने मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय या बैठकीस उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले, केंद्र आणि राज्याच्या समन्वयातूनच देशाला प्रगती पथावर नेण्यास मदत होईल. १४ व्या वित्त आयोगाच्या सूचनेनुसार केंद्राने राज्यांना पूर्वीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. वनीकरण भरपाई निधी व्यवस्थापन व नियोजन अर्थात केम्पा विधेयकास लोकसभेत मंजुरी मिळाली असून राज्यसभेच्या मंजुरी नंतर हा कायदा देशात लागू होणार आहे. यामुळे बँकेमधे जमा असलेला मोठा निधी राज्यांना वितरीत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ थेट जनतेला मिळावा यासाठी देशात ७९ टक्के लोकांच्या आधारकार्डांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शिता येण्यास व शासनाचे नुकसान रोखण्यास मदत होणार आहे. राज्यांनी सामाजिक सुधारणांविषयी योजनांच्या अंमलबजावणीबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी या बैठकीसाठी ठेवण्यात आलेल्या विषयांवर सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आपले विचार मांडण्याचे आवाहन केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रास्ताविक भाषण केले. राज्याने आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलली आहेत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आयसीस या दहशतवादी संघटनेमध्ये तरूणांना भरती होण्यापासून रोखण्यासाठी राज्याने यशस्वी यंत्रणा राबविली आहे. दहशतवादी कारवायांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये माहितीची देवाणघेवाण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. राज्याच्या समुद्री किनाऱ्यावर आवश्यक व आधुनिक सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षल्यांना करण्यात आलेली अटक, नक्षल शरण येण्याचे वाढलेले प्रमाण आणि पोलीस चकमकीत नक्षल्यांचा बिमोड करण्यात आला आहे. यामुळे या भागात शांतता प्रस्थापित होत आहे. तेलंगाना आणि छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने या भागात 318 आंतरराज्य कारवाया करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वस्तू व सेवाकर विधेयकाचे स्वागत; राज्याला महसूली तूट भरपाई मिळावी
केंद्राने आणलेल्या वस्तू व सेवाकराला(जीएसटी) महाराष्ट्र शासनाचे पूर्ण समर्थन आहे. राज्यात लागू केल्याने वर्षाकाठी होणारी 14 हजार कोटींची महसुली तूट निर्माण होणार आहे, ही तूट भरून काढण्यासाठी केंद्राने पुढील पाच वर्षांसाठी भरपाई द्यावी. तसेच महाराष्ट्राप्रमाणे निर्मिती क्षेत्रात अग्रेसर राज्यांना महसूल तूट भरून काढण्यासाठी जीएसटी करात एक टक्का कर अधिक लावावा, अशी सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली.
पुंछी समितीच्या अहवालाचे स्वागत
पुंछी समितीच्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री म्हणाले, सर्व राज्यांतून राज्यसभेसाठी समान सदस्य पाठविण्याची सूचना राज्य शासनाला मान्य नाही. राज्यसभेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येच्या आधारावरील राज्यांतील प्रतिनिधीत्वाची पद्धतीच सुरु ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. समितीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेला जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी न्याय विभागाच्या सक्षमीकरण व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी केंद्र सरकारकडून 50 टक्के निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
आधारकार्ड नोंदणीत राज्य अग्रेसर
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात प्रौढ जनतेची 100 टक्के आधारकार्ड नोंदणी करण्यात आली आहे. 73 टक्के जनतेचे जनधन खाते उघडण्यात आले आहे तर राज्यात दूरसंचाराची घनता 93 टक्के एवढी आणण्यात राज्य शासनाला यश आले आहे. तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा जनतेला लाभ मिळावा म्हणून ‘थेट लाभ हस्तांरणासाठी’ राज्य सरकार गतीने पुढे जात आहे. नवजात बालकाचे दवाखान्यात आधारकार्ड नोंदणी, पाच वर्षांखालील मुला-मुलींची अंगणवाडीत आधारकार्ड नोंदणी करण्याचे तसेच 18 वर्षांखालील मुला-मुलींचे शाळेतच आधारकार्ड नोंदणी करण्याची प्रक्रिया राज्यात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजीटल सुविधा व ई-लर्निंग क्षेत्रात गुंतवणूक व्हावी
देशात डिजीटल सुविधा व ई-लर्निंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, जून 2015 पासून राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देत या कार्यक्रमांतर्गत चालू वर्षाअखेर राज्यातील प्राथमिक शाळांतील 11 हजार(एकूण 65 हजारांपैकी) विद्यार्थी-विद्यार्थ्यांना 100 टक्के प्रगत करण्यात येणार आहे. अर्थात त्यांची श्रेणी पातळीवरील क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये राज्यातील 50 टक्के शाळांमध्ये तर शैक्षणिक वर्ष 2017-18 पर्यंत राज्यात सर्वच शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सक्षम पोलीस यंत्रणा
राज्यातील पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या निधीपैकी एक हजार 13 कोटींचा निधी वापरण्यात आला. पोलीस दलाच्या विकासासाठी केंद्र शासनाने वाढ करून राज्याला 60 ऐवजी 75 टक्के निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सेवा हमी कायद्याची चोख अंमलबजावणी
यावर्षी 2 ऑक्टोबरपर्यंत 328 सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यात 21ऑगष्ट 2015 ला सार्वजनिक सेवा हमी कायदा अंमलात आला असून या कायद्याअंतर्गत 328 सेवा चिन्हीत करण्यात आल्या आहेत. 26 जानेवारी 2016 पासून यातील 156 सेवा जनसामान्यांसाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुढील वर्षाअखेर राज्यातील सर्वच ग्रामपंचायती ‘वायफाय’ने जोडणार
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व तिथे संचार माध्यमे पोहोचविण्यासाठी राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना 2018 अखेर ‘ऑप्टिकल फायबर नेटवर्क’ने जोडण्याची योजना सुरु आहे. यावर्षी १ मेपासून राज्यातील नागपूर जिल्ह्यातील 5 खेडेगावांमध्ये ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आणि शाळांना 10 एमबीपीएस वायफाय स्पीडद्वारे सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वर्ष 2016-17 पर्यंत नागपूर जिल्ह्यातील सर्वच 776 ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा पुरविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. |
| 'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल. |
Subscribe to:
Posts (Atom)








