Friday, June 17, 2016

राज्याच्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा पंतप्रधानांकडे पाठपुरावा


       दे श भरात दुष्काळाचे संकट आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळया उपाय योजना आखत आहे. तरीही केंद्र सरकारची मदत ही निश्चितच उपयोगी असते. केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीसाठी सदैव हात पुढे केला आहे. याचाच एक भाग म्हणून देशातील तीन राज्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शासन करीत असलेले उपाय आणि केंद्राकडून झालेली व अपेक्षित मदत याबाबत या बैठकीत  राज्याच्यावतीने समर्थ बाजू मांडली . पंतप्रधानांनी तिनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलसंधारणाचे कामे करण्याबाबत या बैठकीत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक करीत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापन व जलसंधारणासाठी अवलंबीलेल्या विविध मार्गांपासून धडा घेण्याबाबतही पंतप्रधानांनी या बैठकीत सूचना दिल्या.   
            बैठकीच्या दिवशी राष्ट्रपती भवनाच्या अगदी लागून असणा-या रायसिना हील वरील पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयात सकाळपासूनच वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांच्या हालचाली सुरु झाल्या. सकाळी ९.४५ वाजता पीएमओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत पंतप्रधानांची बैठक सुरु झाली. ही बैठक आटोपल्या नंतर दुपारी ठिक १ वाजता महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीस पोहचले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी या बैठकीस मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
 राज्याकडून  पुरवणी प्रस्ताव देण्यास मंजुरी
            मुख्यमंत्री फडणवीस यांनी  राज्यातील दुष्काळाच्या स्थितीबाबत सादरीकरण केले. राज्यातील दुष्काळाची व्याप्ती वाढली असून राज्याला ज्यादा आर्थिक मदतीची गरज असल्याचे  त्यांनी या बैठकीत सांगितले. राज्यातील 11 हजार गावे नव्याने दुष्काळग्रस्त झाली आहेत, त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी पुरवणी प्रस्ताव सादर करण्याची राज्याची विनंती या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापूर्वी राज्याने केंद्र शासनाकडे 4 हजार 500 कोटीची मागणी केली होती त्यापैकी 3 हजार 50 कोटी केंद्र शासनाने राज्याला  दिले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत महाराष्ट्र राज्याला मिळाली आहे. केंद्र व राज्य शासनाने पुढच्या सहा आठवड्यांचा मान्सून पूर्व कृती आराखडा तयार केला असून यामध्ये पावसाळ्या पूर्वी करावयाच्या कामांचा समावेश आहे.
 दुष्काळावरील दिर्घकालीन उपाय योजनांसाठी  शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा कार्यक्रम राज्याने तयार केला आहे. यामध्ये शेतक-यांना  सिंचनाची सोय उपलब्ध करुन देऊन त्यांचे पावसावरील अवलंबित्व कमी करायचे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मोठ्या  प्रमाणात विकेंद्रीत पाण्याचे साठे  तयार करुन जलसंचय वाढवायचा यावर भर देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेचे मुळ हे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत वितरीत होणा-या निधीत वाढ  केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासन मिळून दरवर्षी या योजनेवर 5 हजार कोटी रुपये खर्च केले पाहिजेत. या योजनेसाठी  सर्वाधिक मदत राज्याला मिळावी अशी मागणी  मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.
 प्रधानमंत्री कृषी  सिंचन योजनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितले, या योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे 26 प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची  सिंचन क्षमता 10 लाख हेक्टर आहे. या प्रकल्पाची किमंत 20 हजार कोटी रुपये आहे. या प्रकल्पाची  किमंत ठरविण्याचे वर्ष 2014-15 धरण्यात   यावे. जमीन अधिग्रहणासाठी लागणारा निधी यातून वगळण्यात यावा अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केली. 
              विदर्भ व मराठवाड्यासाठी 7 हजार कोटीचे प्रकल्प
विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शाश्वत सिंचन व्यवस्था उभी करण्यासाठी राज्य शासनाने 7 हजार कोटी रुपयांचे  प्रकल्प तयार केले आहेत. हे प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतात त्यामुळे केंद्र शासनाने ही रक्कम राज्याला द्यावी अशी मागणी, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या बैठकीत केली. पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण तालुक्यात काही योजना येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण करता येऊ शकतात अशा योजनांसाठी केंद्र शासनाने 2 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

महाराष्ट्राचा वित्तीय आराखडा 15 हजार कोटीने वाढवावा
महाराष्ट्रात 1 कोटी 36 लाख खातेदार शेतक-यां पैकी 58 लाख शेतकरी कर्ज घेत आहेत. उर्वरित शेतकरी क्रेडिट (ऋण) नियोजनात अद्याप आले नाहीत यासाठी राज्याचा वित्तीय ऋण आराखडा 15 हजार कोटीने वाढविण्यात यावा जेणेकरुन 20 लाख नवीन शेतकरी क्रेडिट नियोजनात समाविष्ट करता येऊ शकतील. ज्या शेतक-यांचा समावेश कर्ज बुडविणा-यांच्या यादीत झाला आहे अशा शेतक-यांना क्रेडिट सिस्टमच्या मुळ प्रवाहात आणले पाहिजे. वर्ष 2012 ते 2016 या काळात कर्ज बुडविणा-यांच्या यादीत समाविष्ट झालेल्या सर्व शेतक-यांना क्रेडिट सिस्टममध्ये आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात यावी व यासाठी लागणारा 3 हजार कोटी रुपयांचा निधी राज्याला मिळावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जागतिक बँक करणार 4 हजार गावांना मदत
विदर्भ व मराठवाड्यातील 4 हजार गावांमध्ये सिंचन व्यवस्था उभी करणे, पीक पध्दतीचे नियोजन करणे व बाजारपेठेशी ती जोडणे असा पथदर्शी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला आहे. या प्रकल्पास जागतिक बँक मदत करण्यास तयार आहे, यासाठी अर्थिक व्यवहार मंत्रालयामार्फत प्रस्ताव सादर करण्यात यावा असे जागतिक बँकेने सूचविले होते. राज्य शासनाने तयार केलेल्या या प्रस्तावास कृषी विभागाने मान्यता दिली असून आता हा प्रस्ताव आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावास मंजूरी मिळेल व तो जागतिक बँकेकडे पाठविण्यात येईल  व जागतिक बँक त्यास मंजूरी  मिळेल.  
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्राने 74 लाख हेक्टर जमीन विम्याखाली आणली आहे. महाराष्ट्र सध्या 27 टक्के शेतकरी विमाधारक आहेत. सध्याची विमा योजना शेतक-यांच्या हिताची असून अधिकाधिक शेतकरी या योजनेखाली आणण्याचा राज्याचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्र्यांनी  या बैठकीत स्पष्ट केले.  
                                                                000000



Wednesday, April 27, 2016

भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठी तारा : अजित जोशी


 सप्रेम नमस्कार.


                या आठवडयात जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, लातूरचे पांडुरंग पोळ, हिंगोलीचे तुकाराम कासार साहेब यांना वार्तांकनाकामी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या कामात भेटलो. या शिवाय मुळचे मराठी आणि हिमाचल कॅडरचे मंडी जिल्हयाचे तरूण जिल्हाधिकारी संदीप कदम आणि सर्वोत्कृष्ठ जिल्हाधिकारी म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित मूळचे सोलपूरचे हरियाणा कॅडरचे चंदिगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी यांची भेट झाली. अजित जोशी साहेबांशी मी दिल्लीत आल्यापासून ओळखतो त्यांच्या कामाची झलक प्रत्यक्ष हरियाणात जाऊन बघितली. अजित जोशींच्या कार्यावर अल्प प्रकाश टाकणारी ही मुलाखात महान्यूज या राज्य शासनाच्या वेब पोर्टलवर प्रकाशित झाली आहे. तीच मुलाखात खास आपल्यासाठी.   

भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठी तारा : अजित जोशी

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिल रोजी नागरी सेवा दिनी’ ‘पंतप्रधान पुरस्कारदेऊन गौरविण्यात येते. केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी जनधन योजनेच्याप्रभावी अंमलबजावणीसाठी यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा बहुमान प्रशासकीय अधिकारी अजित जोशी यांना प्रदान करण्यात आला. 

अजित बाळासाहेब जोशी हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील रातंजनचे रहिवाशी. श्री.जोशी, हे २००३ च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीचे अधिकारी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात अव्वल तर देशात २९ वा क्रमांक मिळवणारे व हरियाणा कॅडरमध्ये काम करणाऱ्या श्री.जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे. महाराष्ट्राबाहेर काम करून त्यांनी महाराष्ट्राची अमीट छाप सोडली आहे. पंतप्रधान पुरस्कारमिळाल्याने त्यांची कारकीर्द उजळून निघाली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याविषयी माहिती देणारी ही नेट भेट...... 
प्रश्न : चंदीगडमधे जनधनयोजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल आपला हा सन्मान झाला, त्याविषयी थोडक्यात सांगा?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील गोर गरीब जनतेचेही बँक खाते असावे या उद्देशाने जनधनयोजना सुरु झाली. चंदीगडमधे या योजनेअंतर्गत १ लाख ९६ हजार बँक खाते उघडण्याचे उद्दिष्ट आम्हाला देण्यात आले होते. आम्ही दिलेल्या मुदतीच्या आत जनधन योजनेअंतर्गत २ लाख २० हजार बँक खाते उघडून नियत उद्दिष्टांपेक्षा उत्तम काम करून दाखवले. गरीबांकडे असलेला पैसा नेमका कुठे आहे ते कळत नसे, पण जनधनयोजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे बँक खाते उघडून त्यांचा पैसा मुख्य प्रवाहात आला. या योजनेअंतर्गत विक्रमी बँक खाते उघडून ६० कोटी रूपये बँक खात्यामधे जमा केले. स्थलांतरीत लोकांचे, आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांची बँकखाते उघडून त्यांना विमा सुरक्षा कवच प्रदान केले. गरजू व गोरगरीब जनतेला या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
प्रश्न : पंतप्रधान पुरस्कारपटकाविणे हे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याचे स्वप्न असते, स्वप्नवत असणाऱ्या या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया खडतर असते, त्याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : केंद्र शासनाच्या जनधन’, ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’, ‘स्वच्छ विद्यालयआणि मृदा परीक्षण पत्र (सॉईल हेल्थ कार्ड) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील जिल्ह्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासाठी पूर्वोत्तर व पर्वतीय राज्यांतील १४१ जिल्ह्यांचा गट, केंद्रशासित प्रदेशातील २३ जिल्हे याव्यतिरीक्त देशातील ५१३ जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला. या सर्व जिल्ह्यांमधून पहिल्या टप्प्यात ७४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या ७४ जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण व बीएसएनएल फोन कॉलच्या माध्यमातून ७ लाख ६२ हजार लोकांकडून मत मागविण्यात आले, या आधारावर ७४ पैकी ३८ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या ३८ जिल्ह्यांमधे केंद्रातून २ अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले, त्यातील २४ जिल्ह्यांची या पथकाने निवड केली. अंतिम फेरीत केंद्रसरकारचे कॅबिनेट सचिव बी.के.सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीत ज्यात बाहेरील तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता त्यांनी अंतिम १० जिल्ह्यांची निवड केली. अशा प्रकारे सर्व चाचण्यांमधे जनधन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उत्तम ठरलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीत चंदीगडची निवड झाली. 
प्रश्न : सुरुवातीला हरियाणामधे काम करताना काही अडचणी आल्यात का, त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर : माझी पहिली पोस्टींग पानिपत जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून झाली. या जिल्ह्याचा तसा महाराष्ट्राशी थेट संबंध सांगता येतो. दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी मराठे उत्तरेत आले होते. इथेच पानिपतची तिसरी लढाई झाली व त्यात मराठ्यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्राशी नाड असणाऱ्या जिल्ह्यात मला काम करायची संधी मिळाली. कामाचा पहिलाच दिवस. एक वृद्ध व्यक्ती माझ्या कॅबीन मधे आली आणि खड्या बोलीत बोलू लागली. मला न कळाल्याने मी स्वीय सहायकाला विचारले की, ही व्यक्ती नेमकं काय म्हणत आहे. मी त्यांचं काम केलं. मात्र, जाताना ती व्यक्ती म्हणाली, ‘सरकार भी कैसी अजब है, हमारी भाषा जिन्हे समजती नही ऐसे लोगो को काम में लगाती है’. पुढे काही दिवासांनी माझी बढती झाली तर त्याच गावातील लोकांनी माझी घोड्यावरून मिरवणूक काढली. या प्रसंगापासून ते आजपर्यंत मला कोणतीही अडचण आली नाही. हरियाणातले लोक रांगडे आणि परखड आहेत. 
प्रश्न : आपण पानिपत या युद्धभूमीच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला, तिथे पानिपत महोत्सव सुरु केला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..
उत्तर : पानिपतला पोस्टींग झाल्यावर मी पानिपतच्या युद्धभूमीला भेट दिली. या भूमीची दूरावस्था झाली होती. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त राखण्यासाठी ज्या युद्धभूमीवर निकराचे प्रयत्न करून प्राणपणाला लावून लढा दिला त्या भूमीचा जिर्णोद्धार करण्यासाठी मी पुढाकार घेतला, आणि तिथे स्मारक उभारले. या युद्धभूमीला सिमेंटचे कुंपन बांधून घेतले, सुशोभीकरण करून घेतले. २००६ पासून येथे दरवर्षी पानिपत महोत्सवाचेआयोजन केले जाते. यास स्थानिकांचा व महाराष्ट्रातील मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळाला. 
प्रश्न : बिहारमधील एक गाव दत्तक घेऊन आपण महाराष्ट्राच्या दातृत्च वृत्तीचे दर्शन घडविल्याचे आम्ही ऐकले आहे, त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : मराठी मातीतच दातृत्वाचे संस्कार आहेत आणि त्यामुळेच मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला तरी आपली छाप सोडू शकतो हा माझा विश्वास आहे. वर्ष २००८ मधे बिहारमधे कोसी नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणात हानी झाली. गावे वाहून गेली होती. तेव्हा मी सोनिपत जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. मी बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील मुसेहारी या अती मागास गावाला भेट दिली. हे गाव कोसी नदीच्या पुरामुळे पूर्णपणे वाहून गेले होते. आम्ही हे गाव दत्तक घेतले. या गावाला नव्याने उभे करण्यासाठी सोनिपतच्या जनतेला मी आवाहन केले. दुपारचे जेवण करू नका आणि तो पैसा आम्हाला द्या. लोकांनी हाकेला प्रतिसाद दिला. बघता बघता आबाल वृद्धांनी आमच्याकडे १ कोटी ४३ लाख रूपये जमा केले. या निधीतून आम्ही मुसेहारीत २२३ घरे उभारली. २२,००० चौरस मिटरचे रस्ते बांधले, ५० हापशा उभारल्या, प्रसाधन गृह बांधले, समाज मंदीर बांधले. त्यातूनही आमच्याकडे २० लाखांची रक्कम उरली. ती आम्ही पंतप्रधान सहायता निधीत दिली. एखाद्या राज्यातील जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या राज्यातील एखादे गाव दत्तक घेऊन ते विकसित करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग होता. या गावाचे लोकार्पण हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्या हस्ते बिहारमध्ये झाले होते. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही या उपक्रमासाठी मला जाहीर शाबासकी दिली होती.
प्रश्न : भिंडावास पक्षी अभयारण्याच्या पुनरोद्धारासाठी आपण पुढाकार घेतला, देशातील महत्वाचे पक्षी अभयारण्य म्हणून या अभयारण्याकडे पाहिले जाते. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल
उत्तर : झझ्झर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळताना माझ्या कार्यक्षेत्रात असणारे भिंडावास पक्षी अभियारण्य दुर्लक्षित होते. त्यासाठी मी परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा केली. पुढे हेच भिंडावास झझ्झर जिल्ह्यात लोकसहभागातून तयार करण्यात आलेले पक्षी अभयारण्य म्हणून नावारूपास आले. परिसरातील ७ ते ८ गावातील गावकऱ्यांनी आपल्या मालकीची जमीन या अभयारण्यासाठी दिली त्यातून ११०० एकर परिसरात हे पक्षी अभयारण्य उभे राहिले आहे. हिवाळ्यात या अभयारण्यात जवळपास अडीचशे प्रजातींचे दीड लाखांहून अधिक पक्षी येतात. विशेषत: ५० प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचाही यात समावेश असतो. भिंडवास पक्षी अभयारण्य व येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची माहिती जास्तीत-जास्त पक्षीनिरीक्षक व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी बर्डस् ऑफ भिंडावासपुस्तक आणि ई-बुक, वेबसाईट व मोबाईल
प्लीकेशन तयार केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे गेल्यावर्षी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.
झज्जर, या देशातील सर्वाधिक वीटभट्ट्या असलेल्या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री.जोशी यांनी वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या स्थलांतरीत मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या भट्टाशाळेचे तर दस्तरखुद्द दिवगंत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होते. स्थलांतरीत मजुरांची समस्या असलेल्या काही आफ्रिकन देशांमध्येही भट्टा शाळेची संकल्पना एक मॉडेल म्हणून राबविण्यात आली होती. मतदार याद्यांमधील घोळ मिटविण्यासाठी अजित जोशी यांनी पुढे आणलेली बायोमेट्रिक प्रणाली (कॉमन इलेक्ट्रोल रोल) संकल्पना चांगलीच वाखाणली गेली.
श्री.जोशी यांना अजूनही कल्पक आणि नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा व धडाडी आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कार घेऊन हरियाणा या आपल्या कर्मभूमीत कल्पक व दर्जेदार काम करणारे चंदीगडचे जिल्हाधिकारी अजित जोशी हे खऱ्या अर्थाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अनमोल मराठी तारा ठरले आहेत. श्री.जोशी यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.

रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Wednesday, April 13, 2016

समयाशी सादर व्हावे



दिल्लीत आणि तेही शासनात काम करताना ब-याचदा आयत्यावेळी प्रसंगावधान ठेवून निर्णय घ्यावे लागतात व हे करीत असताना अपेक्षित यशही मिळवावे लागते. हे समजण्यासाठी ताज उदाहरण मांडतो म्हणजे मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
प्रसंग क्र.१ :-  दुपारी ४ वाजता विज्ञान भवन येथे पंतप्रधानांच्या हस्ते व्याघ्र संवर्धनाबाबतच्या आशियाई देशांच्या मंत्र्यांच्या तिस-या परिषदेचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आणि या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असल्याने त्याचे वार्तांकण करण्यासाठी मला आयत्यावेळी म्हणजे ३.४५ वा. सांगण्यात आले. त्यानुसार कार्यालयाच्या गाडीने विज्ञानभवनाकडून फेरफटका मारला तर पंतप्रधान या कार्यक्रमात असल्याने त्यांचा सुरक्षा ताफा विज्ञानभवनाच्या बाहेर उभा होता व कोणत्या गाडीला उभे राहण्यास पूर्ण मज्जाव होता. मग अशात पहिला निर्णय आणि प्रसंगावधान होते महाराष्ट्र सदनात जाण्याचा जिथे कार्यक्रम आटोपल्या नंतर महाराष्ट्राचे मंत्री येण्याची शक्यता असू शकते. सदनात मंत्रीमहोदयांची वाट बघितली पण अशातच त्यांच्या पीएला फोन लावून विचारणा करण्याचे दुसरे प्रसंगवधान. त्यांनी सांगितले की, मी मुंबईत आहे पण मंत्रीमहोदयांसोबत असलेल्या पीएंचा मोबाईल नंबर त्यांनी दिला.त्यानुसार पीएंना फोन लावला. चौकशी केली असता मंत्रीमहोदय विज्ञानभवनातील कार्यक्रम आटोपून एका वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन थेट एअर पोर्टला जाणार असल्याच कळल. म्हणजे महाराष्ट्र सदनात मंत्रीमहोदय येणार नाहीत आणि तसेच ते परत जातील मग यात आपली बातमी ही निघून जाईल  अशी बिकट स्थिती. अशात अंतिम प्रसंगावधान राखत मंत्रीमहोदयांच्या पीएलाच मंत्री महोदयांशी बोलता येईल का बातमी बाबत ? असे विचारने संयुक्तीक होते. तशे केले आणि परिणाम आला त्यांनी होकार दिला. फोनवरूनच विविध राज्यांच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत मंत्रिमहोदयांचा सहभाग आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या मागण्या याची माहिती त्यांनी दिली.मुद्दे समजून घेत जो मुद्दा समजला नाही तो पुन्हा विचारून समजून घेण्याचे कसबपणाला लावत बातमी तयार झाली. या कार्यक्रमासाठी फोटोग्राफर लावला असल्याने फोटो तर तयार होते. पीएचा ईमेल आयडी घेतला असल्याने त्यांना आणि मंत्रिमहोदयांच्या गृह जिल्हयातील आमच्या विभागाच्या कार्यालयाप्रमुखांना, वन मंत्रालयाच्या मिडीया लायझन अधिका-याला बातमी व फोटो पाठवून फोनवर बोलून घेतलं. परिणामी दुस-या दिवशी शासनाचा अधिकृत स्त्रोत म्हणून विविध प्रसार माध्यमांमधे ती बातमी झळकली. याला म्हणायच समयाशी सादर व्हावे अर्थात प्राप्त परिस्थितीत रडत न बसता प्रसंगावधान राखून रिझल्ट ओरीएंटेड काम करणे.

विशेष व्याघ्र संरक्षण दलासाठी केंद्राने शंभर टक्के आर्थिक मदत करावी                                                                               
                                                              वनमंत्री  मुनगंटीवार
नवी दिल्ली, दि. १२ : राज्यात विशेष व्याघ्र संरक्षण दल उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून शंभर टक्के आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे वित्त व नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
            केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने  विज्ञान भवनात आयोजित विविध राज्यांच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय वने व पर्यावरण राज्य मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली.
            श्री. मुनगंटीवार म्हणाले, विशेष व्याघ्र संरक्षण दल उभारण्यासाठी केंद्र व राज्यांमधील ६०:४० या खर्चाच्या वाटया ऐवजी केंद्राकडून पूर्ण (शंभर टक्के) आर्थिक मदतमिळावी. व्याघ्र प्रकल्पाच्या आतील (कोअर एरिया)भागात वास्तव्य करणा-या नागरीकांच्या पुनर्वसनासाठी  शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणाऱ्या १० लाख रूपये मदतीसोबतच त्यांच्या शेत जमीनीला चालू बाजार भावाच्या चौपट रक्कम मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
            राज्यात व्याघ्र संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांमधील एक  व महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असणा-या चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावर पोस्टाचे तिकीट काढण्यात यावे,अशी मागणीही श्री. मुनगंटीवार यांनी केली. या सर्व मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल असे आश्वासन श्री. जावडेकर यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते व्याघ्र संवर्धनाबाबतच्या आशियाई देशातील मंत्र्यांच्या तिस-या परिषदेचेउदघाटन झाले. देश-विदेशातील वनमंत्र्यासह राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस उपस्थित होते.                                                      
                                                   00000000
सूचना : सोबत फोटो जोडले आहेत.

प्रसंग क्र.२ :-  विज्ञानभवनात केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्यावतीने  नदीजोड प्रकल्पाबाबत आयोजित बैठकीला राज्याच्यावतीने मंत्रिमहोदय उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाची माहिती त्याच दिवशी सकाळी प्राप्त झाली. मंत्रिमहोदय विमानतळाहूनच थेट या बैठकीला गेले. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा किंवा त्यांच्याकडून माहिती घेण्याचा मार्गही बंद झाला. त्यांना मध्यंतरी फोन केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. अर्थात विपरीत परिस्थिती. पण पुन्हा प्रयत्न केला मंत्रिमहोदयांसोबत असणा-या प्रोटोकॉल ऑफीसरकडून कळल की मंत्रिमहोदय महाराष्ट्र सदनात अर्धातासासाठी थांबणार आहेत आणि लगेच महाराष्ट्रासाठी रवाणा होणार आहेत. अश्यात कार्यालयाच्या गाडीने थेट सदन गाठले. इथे अजब प्रसंगाला सामोरे जावे लागेल. मंत्रिमहोदयांच्या रूमची डोअर बेल वाजवली तर स्वत:तेच दार उघडायला आले. पण, दार काही उघडत नव्हते. मग तसाच सदनाच्या रिशेप्शनवर जाऊन मास्टर चावी घेतली. तरीही दार उघडेना. मग मॅनेजरला फोन लावला त्यांनी पंब्लरला बोलविले आणि मंत्रीमहोदयांना रूम मधून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु झाले कारण त्यांचे विमान होते. काही केल्या दार उघडेना. शेवटी रूमच्या खिडकीतून मंत्रीमहोदयांना बाहेर काढण्यात यश आले. आता त्यांना सोबत घेऊन जाण्याची व त्यांना प्रोटोकॉल देण्याच्या  भूमिकेत मी आलो, मग बातमीचं काय? मंत्रीही या झाल्या प्रकाराने त्रस्त झाले होते. ते तर सरळ विमानतळावर जाणार होते. मग मी त्यांनी विनंती केली सर मला बातमी हवी होती त्यासाठी मी आपल्या गाडीत बसू? त्यांनीही होकार दिला. त्यांच्या गाडीत पुढच्या सीटवर बसून त्यांच्याकडून बैठकीतील मुद्दे समजून घेतले. अशात रस्त्यावर प्रंचड जाम होता आम्ही जाम मधे फसलो होतो. मंत्रिमहोदयांना परवानगी मागून गाडीतून बाहेर पडलो. लगेच कार्यालयाच्या वाहन चालकास त्याठिकाणी बोलवून ऑफीस गाठले आणि बातमी तयार केली. पाठवली आणि दुस-या दिवशी ती बातमी छापून सुध्दा आली.  
वृत्त विशेष क्र.  39                                                  दिनांक  08.02.2016  
       
       नार-पार- तापी- नर्मदा प्रकल्पाबाबत येत्या १६ फेब्रुवारीला मुंबईत बैठक

नवी दिल्ली, 08 : गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान नार-पार-तापी नर्मदाआणि दमनगंगा –पिंजाळ नदी जोड प्रकल्पाच्या  मुद्दयांबाबत चर्चा करण्यासाठी येत्या १६ फेब्रुवारी रोजी उभय राज्यांच्या प्रशासकीय अधिका-यांची बैठक मुंबईत होणार असल्याचा निर्णय आज येथे एका उच्च स्तरीय बैठकीत घेण्यात आला .

            केंद्रीय जलसंपदा व  नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात नदी जोड प्रकल्पाबाबतच्या विशेष समितीच्या आठव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती अध्यक्षस्थानी होत्या.  यावेळी  केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री  सांवरलाल जाट  वरिष्ठ अधिकारी तथा विविध राज्यांचे जलसंपदा मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व  जलसंपदा विभागाचे सचिव एच.टी. मेंडीगीरी उपस्थित होते.

            या बैठकीत विविध राज्यांमध्ये प्रस्तावित असलेल्या नदीजोड प्रकल्पांच्या अडचणींबाबत चर्चा झाली.  महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांदरम्यानच्या नार-पार-तापी नर्मदा आणि दमनगंगा –पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेल्या चर्चेत  श्री. गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या वाटयाचे पाणी गुजरातला देण्यात येणार नाही ही भूमिका ठामपणे मांडली. या शिवाय उभय राज्यांमधे प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाबाबतच्या मुद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षते खाली उभराज्यांच्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक बोलवून मार्ग काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

कोयना जलविद्युत प्रकल्पातील उर्वरित पाण्याचा उपयोगकरून मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्यावतीने उभारण्यात येणा-या प्रकल्पाचा प्रारूप आरखडा पूर्ण झाला असून आता सविस्तर प्रकल्प अहवालाचे कार्य सुरु असल्याची माहिती श्री. महाजन यांनी या बैठकीत दिली.मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान प्रस्तावित महाकाय पूनर्भरण प्रकल्पासाठीचे काम प्रगती पथावर असून जळगाव  आणि रावेर येथे  तज्ज्ञ अधिका-यांनी सज्ज असे कार्यालय उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ वर्षाची मूदत देण्यात आली आहे. पण, राज्यशासन येत्या ४ ते ५ महिण्यात हे काम पूर्ण करेल अशी माहिती श्री. महाजन यांनी या बैठकीत दिली.   
                                                            00000        
सूचना : सोबत छायाचित्र जोडले आहेत.


प्रसंग क्रं.३ :- महिन्याचा दुसरा शनिवार आणि त्यात कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे एका महत्वाच्या कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. (भारतीय विधी परिषद, दिल्ली आणि केंद्रीय मानवाधिकार आयोगाच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकाराचे विषय : प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावरआयोजित एक दिवशीय कार्यशाळा) अशात कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात असतानाच मोबाईलवर मॅसेज धळकला ५ वाजता मुख्यमंत्री महोदय दिल्लीत येणार आहेतमॅसेजला उत्तर दिलं OK I will be there. कार्यशाळा आटोपून थेट महाराष्ट्र सदन गाठले. तिथे चित्र असे की मुख्यमंत्री येण्यास वेळ होता. त्यांचा कार्यक्रम निश्चितपणे कळत नव्हता. मुख्यमंत्री महोदय उशिरानेच आले. तशीच माझ्या कामाची भूमिका निश्चित झाली. एक परदेशी डेलीगेशन त्यांना भेटणार असल्याचे आयत्यावेळी कळले. त्यानुसार त्या बैठकीस उपस्थित राहून मोबाईलवर फोटो घेऊन वाटसअप ग्रुपवर पाठवले. बैठकीचा विषयही फारसा कळत नव्हता. अशात त्या बैठकीस कोणी मराठी अधिकारी होते त्यांच्याकडून डिलेगशनच्या प्रमुख व चर्चेचा विषय लक्षात घेऊन बातमी तयार केली. अर्थात विपरीत परिस्थिती  मात्र प्रसंगावधान राखत कामाचा रिझल्ट आणला. ती बातमी अशी
रशियातील व्यापार मेळाव्यासाठी  मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण
नवी दिल्ली, 12 : रशियाच्या स्वर्द लोस्क प्रांताचे गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाइनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण  दिले.

गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री  फडणवीस यांची  भेट  घेतलीदिनांक 11 ते 14 जुलै 2016  दरम्यान रशियातील एकातेरेनबर्ग येथे आयोजित करण्यात येणा-याइनोप्रोम 2016’ आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे निमंत्रण यावेळी  गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. भारत या व्यापार मेळाव्याचा सहयोगी देश आहे. यावेळी झालेल्या बैठकीत  उभय नेत्यांनी  महाराष्ट्र आणि स्वर्द लोस्क प्रांता दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य  करण्याबाबत  चर्चा  केली .  
        मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गव्हर्नर येवेगेनी कुयाशेव यांना वारली  पेंटींग आणि नाशिक येथे पारपडलेल्या कुंभ मेळयाचे कॉफी टेबल बुक भेट स्वरूपात दिले .  
00000
टिप : सोबत छायाचित्र आहे.


वर उल्लेख केलेले तीन प्रातिनिधीक प्रसंग आहेत. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आपल्या हाती नसताना केवळ प्रसंगावधान राखत उत्तम काम करून रिझल्ट आणावा लागतो. आणि पदोपदी संत सावता माळी यांच्या समयाशी सादर व्हावे ....या अभंगाची प्रचिती येते हेच खरे.

Monday, April 4, 2016

चित्रपटांची मुशाफीरी





एक्सीडंटल हसबंड ही कथा आहे एका रेडीओ जॉकी मुलगी सोफीयाची. जीच लग्न जवळपास जुडलेल असतं आणि काही दिवसात ती रेडीओ होस्ट डॉ. इमा लॉइड यांच्याशी लग्नही करणार असते. ती एक प्रख्यात रेडीओ जॉकी असल्याने फोनइन कार्यक्रमात विचाराण्यात येणा-या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून लोंकाच्या  थेट संपर्कात असते. फायर ब्रिगेडचा  ड्रायव्हर पॅट्रीक सॅलव्हीनशी तिची अचानक भेट होते. आणि त्याला भेटण्यासाठी एका क्लब मधे गेली असता मद्यपान करून ती त्याला लग्नाची मागणी घालते आणि इथून तिला आपल्या ख-या जीवनसाथीच्या निवडीचा सतावत असलेला प्रश्न आणि चित्रपटाच्या शेवटी त्याच फायर ब्रिगेडच्या  ड्रायव्हर सॅल्व्हीन सोबत लग्न करण्याचा निर्णय ती घेते इथेच त्रिपट संपतो. या चित्रपटाची पटकथा मीमी हेअर क्लेअर बोनी सिकोवीझ यांची असून   ग्रिफीन डन दिग्दर्शीत हा अमेरिकन चित्रपट २००८ मधे प्रदर्शीत झाला.



बॉलीवूडचा नुकताच प्रदर्शीत चित्रपट रॉकी हॅण्डस म हा निशीकांत कामत दिग्दर्शीत आणि जॉनअब्राहमच्या जॉनअब्राहम एन्टरटेंटमेंट च्या सह निर्मितीने साकारलेला चित्रपट. ही गोव्यातील ड्रग माफीया उध्वस्त करणा-या एका जांबाज नायकाची कथा आहे. जॉनअब्राहम हा पूर्वाश्रमीचा रॉकी  जो सशस्त्र सैन्यात मोठा सक्षम अधिकारी असतो. पत्निच्या अपघाती निधनाने खचलेल्या रॉकी आणि आताचा हॅण्डसम नावाने परिचीत रॉकी हॅण्डसमच्या शेजारी राहणारी  निओमी ही निरागस मुलगी. नियोमीची आई ही बारबाला. सदैव नसेत धुत असल्याने निओमीला हॅण्डसमचा लडा लागतो. निओमीच्या आईने गोव्यातील ड्रगचा बादशहा म्हणून ओळख असणा-या खलनायकाची २ किलो वजनाची हिरॉईन चोरलेली असते. त्याचा शोध घेत निओमीची आई आणि निओमीला गुंड हॅण्डसम समोर घेऊन जातात. निओमी हॅण्डसमला रक्षणासाठी हाका मारत टाहो फोडते आणि पत्नीच्या निधनाने पुरता खचलेला हॅण्डसम निओमीला ड्रग माफीयाच्या जाळयातून सोडवून निओमी सारख्या अन्य बालकांची सुटका करून गोव्यातून ड्रग माफीयाचा नायनाट करतो आणि चित्रपट संपतो.

                वजीर हा बिजोय नांबीयार दिग्दर्शीत आणि विधू विनोद यांच्या पटकथेवर आधारित वजीर चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, फरहान अख्तर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयातून साकारलेला चित्रपट. आपल्या मुली व पत्नीला घेऊन निघालेला  दहशतवादी विरोधी पथकाचा अधिकारी दानीश अली अर्थात फरहान अख्तर आणि आपल्या मुलीच्या दु:खाने जीवन यात्रा संपविण्याच्या बेतात असताना ओंकारनाथ धर अर्थात अमीताभ बच्चन हा  फरहानला वाचवत आपल्या मुलीला आणि पत्नीला मारणा-या आणि स्वत: धर यांना अपंग करणा-या  सामाजिक न्याय मंत्र्याचा सूड घेण्याच्या कथानका भोवती फीरणारा चित्रपट. दिग्गज कलाकारांचा भरणा असून या चित्रपटाची भटृटी जमली नसल्याची रूख रूख हा चित्रपट बघून शिल्लक राहते.

या आठवडयाच्या शेवटी २ हॉलीवूडचे तर २ बॉलीवूडचे चित्रपट बघण्याचा योग आला. मार्क लेव्हीन आणि जेनीफर फ्लॅकेट या    दांपत्यांच्या पटकथा व दिग्दर्शनाचा साज चढलेल्या लिटील मॅनहॅटन या २००५ साली प्रदर्शीत अमेरिकन चित्रपटाने शेवट पर्यंत खिळवून ठेवले. १० वर्षाचा गेब्ज आणि ११ वर्षाची त्याची कराटे क्लासची मैत्रीण रोजमेरी यांच्यातील रोमँटीक भावना आणि विनोदाच्या अंगाने जाणारा हा चित्रपट. लहान मुलांच्या भावभावनांचा विशेषकरून त्यांच्यातील प्रेम भावनेचा वेध घेणारा चित्रपट आहे. कराटे क्लासमधे रोजमेरी सोबत पेअर जुळवून दिल्याने बराच खूश असणारा गेब्ज रोजमेरीच्या एकतर्फी प्रेमात पडतो आणि चित्रपटाच्या शेवटी गेब्ज तिला हीच भावना बोलून दाखवतो तर तिच उत्तर असत मी केवळ ११ वर्षांची आहे ! मी तर प्रेमाबाबत विचारही केला नाही. ’ आणि इथेच चित्रपट संपतो. मात्र, चित्रपटात  या दोघांच्या आई वडीलांच्या  वागण्यामुळे मुलांची होणारी तगमग सातत्याने दिसते यातच चिमुकल्यांच्या भावविश्वाच्या विविध छटांचेही दर्शन घडते. शेवट पर्यंत खिळवून ठेवणारा हा प्रेमसुलभ भावनांची सतत पेरण करत राहणारा असा हा चित्रपट.
       




२०१६ च्या टी २० वर वेस्टंडीस क्रिकेटचा दबदबा : स्वर्णीम कामगिरीला मानाचा मुजरा



-माझ्या नजरेतून सुक्ष्म निरीक्षण 

आम्हाला आमच्या क्रिकेट मंडळाकडून आर्थिक मदत मिळाली नाही, आम्हाला कपडयांपासून समस्या होती, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकही नवीनच अशा सर्व विपरीत परिस्थितीत, विडींज संघाच्या १५ मोह-यांनी स्वत:हून आपापल्या भूमिका वठवत संघासाठी केलेली उत्तमोत्मक कामगिरी याचा परिपाक म्हणूनच आम्ही सलग दुस-यांदा टी-२० विश्व चषकावर नाव कोरू शकलो.’ हे वक्तव्य आहे वेस्टंडिज संघाचा कर्नधार डॅरेन सॅमीच. ज्यात लपल त्यांच्या विश्वविजेतपदाच गमक. विडींज युवा, पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी २०१६ चा टी२० विश्व चषक जिंकून इतिहास घडवला.

एकेकाळी क्रिकेटच्या जगतात आपल्या गोलंदाजीने विरोधकांना धसका भरण्यास लावणा-या आणि काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात बहुदा मागच्या पायदानावर फेकल्या गेलेल्या वेस्टंडीस क्रिकेट संघांनी २०१६ मधे टी २० क्रिकेटप्रक्रारात विश्वकपवर आपले नाव कोरून जगज्जेता असल्याचे दाखवून दिले. बांग्लादेशात पारपडलेल्या  १९ वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला नमवणारा यंग वेस्टंडीसच संघ, बलाढय ऑस्ट्रेलिया संघाला नमविणारा महिला विंडींज संघ आणि इडनगार्डनवर अंतिम सामन्यात ६ चेंडूत १९ धावांची गरज असताना लागोपाठ ४ षटकार लगावत इंग्लड विरूध्द विजय मिळवून देणारा कार्लोस ब्रेथवेट या सर्व स्वर्णीम क्षणांचा आठव करून विंडीज जनता स्वत:ला भाग्यवान समजत असेल.  पुरुषांच्या विडींज संघाने सलग दुस-यांदा टी २० चा बादशहा असल्याचे सिध्द केले तर महिला व युवा संघाने प्रथमच आपल्या देशाला विश्व विजेतेपदावर विराजमान केले.

झटपट क्रिकेटचा थरार म्हणजे टी २० क्रिकेट प्रकार. जगभरात या क्रिकेटप्रकाराला मोठया प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. उत्तम रणनिती, त्याची चोख अंमलबजावणी, सांघिक भावनेतून जिददीने व लढवय्येपणाने दमदार प्रदर्शन करणारा संघच येथे बाजीमारून नेतो. २०१६ च्या टी २० विश्व चषकावर नाव कोरणारा वेस्टइंडिजचा युवा, महिला व पुरूष संघांनी  या क्रिकेट प्रकाराचे आम्ही  अनभिक्षीक्त राजे असल्याचेच जगाला दाखवून दिले. प्रतीकूल परिस्थितीलाही सामोरे जाऊन खिलाडीवृत्तीचे दर्शन घडविणा-या विडींज संघाला मानाचा मुजरा.