Saturday, December 12, 2015

महाराष्ट्राच्या गौरवाचा दिमाखदार सोहळा : शरद पवार यांचा अमृतमहोत्सव





केंद्र सरकारच्या विविध विभागांच्यावतीने देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार, सरकारच्या विविध राष्ट्रीय परिषदांच्या वार्तांकनासाठी दिल्लीतील विज्ञान भवनात जाण्याचा योग प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह दिल्लीत कार्यरत विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागात कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही येतो. या सर्वांनी संसद भवनापासून जवळपास दोन किलो मिटर अंतरावर मौलाना आझाद मार्गवरील याच विज्ञानभवनात नुकताच महाराष्ट्राच्या गौरवाचा दिमाखदार सोहळा अनुभवला. प्रसंग होता महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रात सलग १० वर्ष कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळणारे व भारतीय राजकारणात पाच दशके यशस्वी कारकीर्द गाजविणारे राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळ्याचा. 

एरवी आपआपल्या पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे पक्षाची भक्कम बाजू मांडतात तेव्हा इतर पक्षांवर सडकून टिका करताना दिसतात. मात्र, हेच दिग्गज आणि देशातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती एकत्र आणि अगदी कौटुंबि‍क समारंभात जमल्याचा हा दुर्मीळ सोहळा. मंचावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या देशाच्या विविध भागातून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहाच्या क्षमतेच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याने पद प्रतिष्ठा विसरून, मिळेल तिथे उभे राहून व रिकाम्या जागेत खालीच बसून हा कार्यक्रम डोळ्यात साठविणाऱ्यांची संख्याही मोठी होती. 

सभागृहात सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंत मंचावरील खुर्च्यांवर मान्यवर आसनस्थ झाले. आता राष्ट्रपती महोदयांची प्रतिक्षा होती. आणि ठरलेल्या वेळेत चोख ५.३५ वाजता सभागृहात राष्ट्रपतींचे आगमन झाले, तोच उपस्थितांनी जागेवरच उभं राहत मानवंदना दिली. निवेदकाने राष्ट्रगीत होणार असल्याची घोषणा करताच सभागृहातील सर्वजण आपआपल्या जागी उभे राहिले. देशप्रेमाचे स्फुलींग जागविणाऱ्या राष्ट्रगीताने सभागृहाचे वातावरण भारावून गेले होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत काव्य पंक्तींतून शरद पवारांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख मांडत उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. आता मंचावर उपस्थित राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांचे शरद पवारांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. 

                                                 ध्वनी चित्रफीत
यानंतर शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तीत्वाचा वेध घेणारी व त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारी हिंदी भाषेतील पंधरा मिनीटांची ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात यास दाद दिली. 
                                                 प्रकाशन सोहळा 
शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत ‘गौरव ग्रंथ’, ‘ऑन माय टर्म’ आणि ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  
                                                     सन्मान
राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार यांचा स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रीमती प्रतिभा पवार यांना स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. निवेदकाने शरद पवार यांना या सुखद प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. 

याप्रसंगी शरद पवार मनोगतात म्हणाले,‘मी वयाच्या अठराव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. वयाची पंचाहत्तरी, राजकीय जीवनाचे पच्चावन वर्ष आणि संसदीय जीवनाचे ४९ वर्ष अशा सर्व प्रवासात जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो.’ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्याप्रसंगी आई-वडीलांची आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. पंधरा मिनीटांच्या आपल्या मनोगतात त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा दिला. 

या कार्यक्रमात मान्यवरांची उद्बोधक भाषणे झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, ‘शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात विविध पक्षांचे नेते एका मंचावर उपस्थित असल्याचे चित्रच त्यांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी आहे.’ पवारांशी माझा स्नेह गेल्या दोन दशकांपासून असल्याचे सांगत, देशातील तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढवून त्यांची निर्यात करण्याच्याकामी पवारांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे असेही त्यांनी सांगितले. 

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह म्हणाले, ‘शरद पवारांनी देशाला सृजनात्मक योगदान दिले.’ महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पवारांनी महत्वपूर्ण कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. ७० च्या दशकात यशवंतराव चव्हाण देशाचे वित्तमंत्री असताना त्यांच्या आर्थिक सल्लागारपदी आपण होतो तेव्हा शरद पवारांशी पहिली भेट झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर ८० च्या दशकात आपण आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त झाल्यापासून ते माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत पवारांचा सहवास लाभल्याचेही त्यांनी सांगितले. ‘तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ अशा शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. 

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी, ‘शरद पवार हे एक अष्टपैलू राजकारणी आहेत’अशा शब्दात पवरांचा गौरव केला. कृषीमंत्री म्हणून पवारांना राज्यसभेत सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पवारांनी नेहमी संयत भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत पाच दशक वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौऱ्यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपाशी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. 

‘भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे.’ अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवार यांचा गौरव केला. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. ९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणने’ औचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या टाळ्यांचा गडगडाट आणि कार्यकर्त्यांच्या उद्घोषणा याने विज्ञानभवन दुमदूमून गेले.

सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांचे आभार मानतांना शरद पवारांनी देशाला दिलेल्या योगदानाचे अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले. एक मुलगी आणि जबाबदार लोक प्रतिनिधी या नात्याने मी पवार साहेबांकडून सतत शिकत आले व शिकत राहीन असे सांगून वडीलांच्या खांद्याला खांदा लावत त्यांना साथ देणाऱ्या आई प्रतिभा पवार यांच्या उदारतेचे कौतुक त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित देशातील सर्वोच्च पदस्थ महानुभाव आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या तमाम मान्यवर व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सभागृहात उपस्थित सर्वच मान्यवर मंचा शेजारी उपस्थित महाराष्ट्राच्या व देशाच्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत होतं आणि विज्ञान भवनही आपल्या कारकिर्दीतला महाराष्ट्राच्या गौरवाचा हा दिमाखदार सोहळा आपल्या स्वर्णीम आठवणीच्या कप्यात जपून ठेवत होता. 

-रितेश मोतीरामजी भुयार 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 











महाराष्ट्र विधानमंडल बना ऑनलाईन प्रश्न स्वीकारणे वाला - देश का पहला विधानमंडल




           
                          
 देश में कई अच्छी योजना तथा पहल देने में महाराष्ट्र की अहम भूमिका रही है. रोजगार गारंटी स्कीम, सूचना का अधिकार आदी महत्वपूर्ण योजना इस कडी में अहम है. इसी कडी को बरकरार रखते हुए महाराष्ट्र विधानमंडल ने आधुनिक तकनिक को अपनाकर अधिवेशन के दौरान सदस्योंद्वारा ऑनलाईन प्रश्न स्वीकारना शुरु किया है. इसी के साथ ऐसी पहल करने वाला महाराष्ट्र देश का पहला राज्य बन गया है.

         राज्य की उपराजधानी नागपूर में महाराष्ट्र विधानमंडल का शितकालीन अधिवेशन प्रारंभ हुआ  है(दिनांक ७ दिसंबर २०१५ से). इस अधिवेशन से ही विधानमंडल  के निचले विधानसभा तथा वरिष्ठ सदन विधानपरिषद के सदस्योंद्वारा ऑनलाईन प्रश्न देने की पहल का क्रियान्वयन शुरु हुआ है. इसकी आधिकारीक घोषणा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागले तथा विधान परिषद सभापती रामराजे निबांलकर नाईक ने की.

 जनप्रतिनिधीयों द्वारा सदन में जनहीत के प्रश्न पुछे जाते है, जो अभी तक लिखित स्वरूप में उठाए जाते थे. लेकिन अब उल्लेखनीय सूचना, प्रस्ताव आदी लोकतंत्र के आयुधों का ऑनलाईन तरीके से प्रयोग किया जा रहा है. अधिवेशन के शुरूआत में ही सदस्योंद्वारा ४० प्रतिशत प्रश्न, प्रस्ताव ऑनलाईन तरीके से पुछे गए है. सदस्योंद्वारा इस पहल को अच्छा सहयोग मिल रहा है. नतिजन ज्यादातर सदस्यों ने लिखित प्रश्नों के बजाय ऑनलाईन प्रश्न पुछने को तवज्जो देने की बात सामने आयी है. महाराष्ट्र के इस पहल के साथ ही देश के अन्य राज्य भी इस दिशा में कदम बढाने की अपेक्षा जतायी जा रही है.   

                                                    ०००००

Monday, December 7, 2015

मुंबई हुई महिला सुरक्षा गस्त से लैंस












       विभिन्न क्षेत्र में अग्रेसर  राज्य से  पहचाने जाने वाले महाराष्ट्र की पहचान महिला सुरक्षा के मामले में भी अग्रेसर राज्य की है. राजधानी मुंबई मेंमहिला सुरक्षा गस्त वाहन दस्तों के माध्यम सें नया अध्याय जुड गया है. मुंबई पुलीस ने शहर में  सभी ९४ पुलिस थानों में आधुनिक सुविधा से लैस  महिला सुरक्षा गस्त मोबाईल वाहन तैनात किए  है.

देश के नक्षे पर मुंबई हमेशा से ही महिलाओं के लिए सुरक्षित शहर रहा है. सुरक्षा के लिए मानव संसाधन के साथ ही आधुनिक तकनिक की जरूरत को ध्यान में रख कर महिलाओं पर हो रहे अत्याचार रोखने के लिए पुलिस विविध उपायों का क्रियान्वयन कर रही है. शहर में महिलाओं को अधिक सुरक्षित माहोल प्रदान करने हेतु महिला सुरक्षा गस्त वाहन दस्ते तैनात किए गए है.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों हालही में मरिन ड्राइव्ह पुलिस जिमखाना में महिला सुरक्षा गस्त मोबाईल वाहन का लोकार्पण हुआ.

 महाराष्ट्र हमेशा से ही महिलाओं के सुरक्षा को खास तवजौ देने वाला राज्य रहा है. महिला सुरक्षा गस्त वाहन दस्ते के माध्यम से महिलाओं के खिलाफ होने वाले अपराधों पर रोंक लगाने में मदद होगी. महिला तथा बालाकों पर हो रहे अन्याय को रोंकने के लिए इन दस्तो को क्रियान्वीत किया गया है, इससे मुंबई पुलिस के शान में नया तमका लगा है. यह दस्ते पुलिस कंट्रोल रूम, महिला शिकायत निवारण कक्ष, महिला हेल्पलाइन तथा व्हॉटसएप नंबर से वायरलेस के माध्यम से जोडे गए है. महिलाओं की रक्षा करने के लिए मुस्तैद रहने वाले इन दस्तों में महिला पुलिस कर्मचारी तैनात रहेगी. कंट्रोल रूम से महिला अत्याचार कॉल आने पर यह गस्ता तत्काल प्रभाव से घटनास्थल पर दाखिल होगा.

महिला सुरक्षा गस्त वाहन दस्तों के माध्यम से महिला एवं बालकों के सुरक्षा के बारे में जागरूकता निर्माण होने में अधिक मदद होगी ऐसा विश्वास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जताया.  मुंबई शहर की बढती जनसंख्या ध्यान में रखते हुए महिला व बालकों पर होते अत्याचारों में हुई बढोतरी चिंता का विषय है. महिलाओं के लिए सुरक्षित माहोल बनाने के हेतु अपराधों का पंजिकरन एवं अपराध साबित होने की संख्या में वृध्दी होने की आवश्यकता  है जो इन दस्तों के माध्यम से पुरी होगी.

मुंबई के साथ राज्य के अन्य जिलों में भी ऐसे दस्ते बनाए जा रहे है. क्राइम एंड  क्रिमिनल ट्रैक्रिंग नेटवर्क एण्ड सिस्टीम (सीसीटीएनएस) के माध्यम से राज्य के सभी पुलीस थाने कम्प्युटर से जोडे गए है. इससे कारगर तथा सक्षम पुलीस फोर्स तैयार होने में मदद हो रही है.          

शिल्पकलेतील आभाळभर उंचीचे मराठी व्यक्तीमत्व : ‘राम सुतार’





भारत देशाचा कला व सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्राचं नाव विविध क्षेत्रात मोठ करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मुळचे धुळ्याचे व सध्या दिल्लीलगत नॉएडा शहरात वास्तव्यास असणारे जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार हे नाव अढळ ताऱ्याप्रमाणे आहे. पंजाबमधील अमृतसर येथील वार मेमोरियलमधे राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल सुतार उभारत असलेल्या जगातील सर्वात लांब १५० फुट तलवारीमुळे त्यांच नाव सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चीलं जातंय. कांस्य आणि स्टेनलेस स्टील धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या ६० टन वजनाच्या या तलवार निर्मितीचे काम प्रगतीपथावर असून येत्या जानेवारी महिन्यात ते पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम सुतार यांच्याशी मारलेल्या गप्पांतून उलगडलेला त्यांचा कला क्षेत्रातील प्रवास.

देश-विदेशातून भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला अर्थात संसदेला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरीकास राम सुतार यांच्या कामाचं सर्वांग सुंदर व सर्वोत्तम स्वरूप पहायला मिळतं ते सुतार यांच्या कलाकृतीमधून. संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तीमत्वांचे १६ पुतळे राम सुतार या मराठी शिल्पकाराने साकारले आहेत. सरासरी १६ ते १८ फुटांच्या धातू निर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे. राम सुतार यांच्या शिल्पकलेतील उंचीचा हा अल्प परिचय मिळाल्यानंतर आपणास निश्चितच उत्सुकता लागली असेल या कलावंताचे महाराष्ट्रातील मूळ गांव व त्यांचा शिल्पकलेतील प्रवास जाणून घेण्याचा. तुमच्या मनातला नेमका हाच प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते भावूक झाले.

धुळे शहरापासून २ ते ३ मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावचा माझा जन्म. वडील वंजीहंसराज सुतार हे व्यवसायाने सुतार असल्याने कलेचा संस्कार घरातूनच आला. शेतीसाठी लागणारे अवजारे, बैलगाडी आदी वस्तू माझे वडील खूपच आखिव रेखीव पद्धतीने तयार करीत असत. त्यातूनच मला चित्र रेखाटण्याची व शिल्प तयार करण्याची आवड निर्माण झाली हे सांगतानाच श्री. सुतार आपल्या शाळेच्या दिवसांमधे रमल्याचा भास होत होता. शालेय जीवनात शिक्षकांनी माझ्यातील कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते सांगतात, माझ्यातील कलाकाराची पाया भरणी झाली. गावात चौथी पर्यंत शाळा. पुढे पाचवी शिकायला म्हणून निमजाळे या गावातील शाळेत प्रवेश घेतला. सहा फुट उंचीच्या पहीलवानाचा सिमेंटचा पुतळा साकारून १९४७ मधे सुतार यांनी आयुष्यातं पहिलं शिल्प तयार केलं. १९२५ मधे जन्मलेल्या राम सुतार यांनी आजतागायत शेकडो शिल्प तयार केले असून जगातील जवळपास ८० देशात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या शिल्पासह २५० शिल्पांचा यात समावेश आहे.

पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत सुतार जाऊ लागले. इथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परिक्षाही उत्तीर्ण केल्या. त्यांच्या उत्तम कामामुळे इथेच त्यांना चित्रकलेतून पैसेही मिळू लागले. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना मॉडेल व चित्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना प्रती वस्तू पाच रूपये मिळकत मिळू लागली. आता सुतार यांना कामातही आंनद वाटू लागला. १९४८ साली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे सिमेंटचे शिल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी महात्मा गांधीचे चार फुटांचे सिमेंटचे शिल्प तयार केले. मोबदल्यात त्यांना १०० रूपये मिळाले. ही शिल्पातून मिळालेली त्यांची पहिली कमाई. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्वाचा खूप प्रभाव आहे. सुतार जेमतेम दुसरीत असतानाच गांधीजींनी त्यांच्या गावाला भेट दिल्याची घटना आजही त्यांना स्मरते. परदेशी कापडांच्या होळीत सक्रीय सहभाग घेत सुतार यांनी त्यावेळी आपल्या डोक्यातील गोल मखमलीची टोपी या होळीत टाकल्याचे ते सांगतात. पुढे महात्मा गांधींचे शिल्प उभारण्याची संधीच त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत गेली. सुतार यांच्या कलात्मक हातातून गुजारतमधील गांधीनगर येथे सचिवालयात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या अलौकीक शिल्पासाठीच त्यांना पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. 

रामकृष्ण जोशी यांच्या मदतीने राम सुतार मुंबईला गेले व माटुंग्यात राहू लागले. १९४९ मधे त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे.जे.स्कुल ऑफ आर्टमधे प्रवेश घेतला. शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला व त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केले. इथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवत मेयो पदक पटकाविले.

यानंतर त्यांनी जे.जे. म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केले. याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाने वेरूळ व अंजिठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टीस्टची परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण करून श्री. सुतार यांनी १९५४ ते १९५८ या कालावधीत या लेण्यांतील मुर्त्यांच्या डागडूजीचे काम यशस्वीपणे केले. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीस्थित केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत जाहीरात व दृष्य प्रचार संचालनालयाची (डीएव्हीपी) नोकरी स्वीकारली आणि तेव्हापासूनच ते दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीतील प्रगती मैदानावरील कृषी प्रदर्शनात श्री. सुतार यांनी उभारलेला शेतकऱ्याचा पुतळा अधिकाऱ्यांना फारच आवडला व त्यांनी लगेच श्री. सुतारांची भेट घेऊन त्यांना दोन शेतकरी जोडप्याचे दोन पुतळे बनविण्याची ऑर्डर दिली. त्यांनी शेतकरी महिला व पुरूष असे प्रत्येकी १३ फुटाचे दोन पुतळे तयार केले त्याचा मोबदला म्हणून श्री. सुतार यांना १५ हजार रुपये मिळाले. हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सरकारी नोकरीत राहून तूम्ही हे काम करू शकत नाही असा त्यांच्या डीएव्हीपीतील एल.आर.नायर या अधिकाऱ्याने सांगितले. श्री. सुतार यांनाही आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखविण्यासाठी स्वतंत्र काम करण्याची निकड भासू लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 

याच काळात तत्कालीन केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे मुख्य वास्तुविशारद श्री. जोगडेकर यांना श्री. सुतार यांच्या कामाविषयी कळताच त्यांनी श्री. सुतार यांना बोलावून घेतले. केंद्र सरकातर्फे पाच फुटांचे अशोक स्तंभ उभारण्याचे काम त्यांनी श्री. सुतार यांना सोपवले. खूप अशोक स्तंभ उभारायचे होते. पण हा प्रकल्प लवकरच बंद झाला. त्यातच त्यांना भोपाळला बोलवणे आले. मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेश व राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीवर गांधीसागर धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणासाठी दहा हजार रूपयांमधे चंबळदेवीचे ४५ फूट उंचीचे शिल्प काँक्रीटमध्ये कोरण्याचे काम त्यांनी स्वीकारले. चंबळदेवी आणि तिला कवटाळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन मुलांच्या बंधुत्वभाव व्यक्त करणारे अप्रतीम शिल्प १८ महिन्यात तयार झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा बघून प्रभावीत झालेल्या पं.नेहरूंनी श्री. सुतारांना पंजाबमधील भाक्रा धरणावर श्रमिकांची शिल्पकृती उभारण्याचा मनोदय बोलून दाखवला पण दुर्देवाने ही शिल्पकृती होऊ शकली नाही आणि त्याच ठिकाणी श्री. सुतारांनी पं. नेहरूंचा १८ फुट उंचीचा पुतळा उभारला. यानंतर संसदेच्या आवारात उभारण्यात आलेले महापुरूषांचे १६ पुतळे आणि म.गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदेशात म. गांधीचे पुतळे उभरण्याचे काम करीत जवळपास ८० देशांमधे गांधीसह इतर २५० पुतळे उभारण्याची किमया या मराठी अवलीया शिल्पकाराने केली आहे.

श्री. सुतार यांच्या कलेचा वारसा त्यांचे एकुलते एक चिरंजीव अनिल सुतार सांभाळत आहेत. अनिल यांना लहानपणापासूनच वडीलांच्या शिल्पकलेने प्रचंड वेड लावले. मुलाची शिल्पकलेतील गती पाहता श्री. सुतार यांनी अनिल यांना शिल्पकलेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. दिल्लीतच पदवी शिक्षण पूर्ण करून अनिल यांनी अमेरिकेतून शिल्पकलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाटण्यात म. गांधीचा पुर्णाकृती पुतळा आणि कोलकात्तात सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात अनिल यांनी वडीलांना सहायक शिल्पकाराची भूमिका बजावली आहे. अनिल यांनी आपल्या वडीलांना गुरूदक्षिणेच्या स्वरूपात त्यांच्या शिल्पकेलेतील प्रवासावर आधारीत दोन पुस्तक प्रकाशित केली. मुलाच्या शिल्पकलेतील गतीबाबत श्री. सुतार संतुष्ट आहेत. सध्या पंजाबमधील अमृतसर येथील वार मेमोरियलमधे राम सुतार आणि अनिल सुतार जगातील सर्वात लांब १५० फुट तलवार उभारण्याच्या कामात व्यग्र आहेत. ९१ व्या वर्षीही शिल्पकलेच्या माध्यमातून मातीशी संवाद साधण्याची श्री. सुतार यांची साधना अखंडपणे सुरु आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीला भोवऱ्याची उपमा देताना श्री. सुतार म्हणतात, ‘भोवऱ्याला जसजशी उतरण मिळेल तसतसा तो फिरत जातो आणि शेवटी एका टप्प्यावर झिंग घेतो, तसे माझ्या बाबतीत घडले आहे’. त्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी नितांत प्रेम आहे. मनात खोलवर बिंबलेले गावच्या मातीतले संस्कार घेऊनच शिल्पकलेतील हा सर्वप्रवास असल्याचे मार्मिक भाष्य करणाऱ्या आभाळभर किर्तीच्या पद्मश्री राम सुतार यांच्या कार्याला मानाचा मुजरा. 

-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Thursday, December 3, 2015

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिल्लीत छाप


सरकारचे कायदे, नियम व योजनांची चोख अंमलबजावणी करून कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची असते. या व्यवस्थेत राहून उत्तम व इतरांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव दिल्लीतील ‘जी फाईल्स’ ही संस्था करते. संस्थेने 2015 च्या वार्षिक पुरस्कारासाठी देशभरातील १० प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड केली, त्यात महाराष्ट्रातील 3 अधिकाऱ्यांचा समावेश असणं ही गौरवाची बाब आहे. पुरस्कार वितरणसमारंभात महाराष्ट्राचा गौरव आणखी वाढविणारा क्षण ठरला तो, या संस्थेने राज्याचे सुपूत्र ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा. 

नुकतेच ‘जी फाईल्स’संस्थेच्यावतीने येथील नागरी सेवा अधिकारी संस्थेत केंद्रीय खान व स्टील मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.अनिल काकोडकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाचे प्रभारी अभियंता अजय सिंघल यांना ‘असाधारण योगदान पुरस्कार’, जलसंपदा आणि रोजगार हमी योजना विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आणि विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना ‘उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, हरियाणा राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यावेळी उपस्थित होते. प्रशासकीय सेवेत कार्यरत देशातील विविध राज्यात उत्तम कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना गौरविण्याचे कार्य ‘जी फाईल्स’ ही संस्था करीत आहे. केंद्र सरकारचे माजी कॅबीनेट सचिव प्रभात कुमार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधे केंद्रीय ऊर्जा विभागाचे सचिव अनील राझदान, हरियाणाचे माजी मुख्य सचिव विष्णू भगवान आणि केंद्र सरकारच्या आंतरिक सुरक्षा विभागाचे माजी सचिव एम.बी.कौशल यांचा समावेश होता. 

डॉ.अनिल काकोडकर यांनी भारतीय विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या महत्वाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या केंद्र सरकारच्या अणु उर्जा विभागांतर्गत कार्यरत भूवनेश्वर येथील विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ.काकोडकर कार्य करीत आहेत. डॉ. काकोडकर यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात आणि विशेषत: आण्वीक संशोधन कार्यात दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अजय सिंघल यांनी जालना येथील आंतरराष्ट्रीय उपग्रह देखरेख कक्षाच्या प्रभारी अभियंता पदाची जबाबदारी नेटक्या पद्धतीने सांभाळली. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्विसेस (आयआरआरएस) च्या १९९८ च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या अजय सिंघल यांना उत्तम स्पेक्ट्रम नियंत्रण आणि परवान्यांसाठी पारदर्शी पद्धतीचा अवलंब करून नियमांचे उल्लंघन न करता राबविलेल्या उपग्रह स्पेक्ट्रम यंत्रणेसाठी गौरविण्यात आले. 

‘शेती पीक कीटक नियंत्रण’ यंत्रणेचा प्रभावीपणे अवलंब करून ‘शेती व ई- प्रशासन’ व्यवस्थेत दिलेल्या अमुल्य योगदानासाठी प्रभाकर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. २०११ साली राज्याचे कृषि आयुक्त असतांना सोयाबीनवरील किडीवर सर्वेक्षण व उपाययोजना (Cropsap) यासाठी देशपातळीवर ई-गव्हर्नन्स मधील सुवर्ण पदक देवून त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. एप्रिल, २०१५ साली या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. 

मुंबई शहरातून अंडरवर्ल्डच्या कारवायांना चाप बसविणे आणि या शहरातील स्कँडल उघड करण्याच्या महत्वपूर्ण योगदानासाठी मीरा बोरवणकर यांना जी फाईल्स पुरस्काराने गौरविण्यात आले. १९८४ मधे नाशिकच्या सहायक पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात कामाला सुरुवात केली. राज्याच्या कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक आणि आता विधी व तांत्रिक विभागाच्या महासंचालक हा त्यांचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. त्यांनी शिक्षणाचा ध्यासही सोडला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी २००९ मध्ये ‘पीएच.डी.’ पूर्ण केली. 

विज्ञान, उपग्रह सेवा, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात मोलाचं योगदान देऊन महाराष्ट्राच नाव मोठं करणाऱ्या या दिग्गजांना मानवंदना. 

-रितेश मोतीरामजी भुयार 
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

Monday, November 23, 2015

घेई छंद मकरंद ………… सामाजिक जाणीव जपणारा व जगणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे


           

कलावंत म्हटला की चित्रपट, सिरीयल, विविध शोजच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त असलेला माणूस. पण, या गोष्टीला फाटा देत ज्या समाजाने आपणास मोठ केल त्या समाजाच्या दु:खात सहभागी होऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदतीला धाऊन जात समाजबांधवांना सावरण्यास पुढे येणारा सच्चा कलावंत अशी ओळख असणारा मराठीतील सुप्रसिध्द कलावंत मकरंद अनासपुरे. सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांच्या प्रकट मुलाखातीच्या निमित्ताने कार्यक्रमात त्यांना थेट प्रश्न विचारण्याचा आणि कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा दुर्लभ योग जुडून आला.
  या कार्यक्रमात मकरंदला माझा थेट प्रश्न, मराठी चित्रपट क्षेत्रातून फक्त तूम्ही आणि नाना पाटेकर अन ज्या मुंबईत बालीवूड इंडष्ट्री असून सर्वांना या इंडष्ट्रीन मोठ केल तेथून फक्त अक्षय कुमार या नटानेच सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच दु:ख पुसण्याकरिता पुढाकार घेतला. इतरांनी मात्र हे औदार्य दाखवल नाही. आपण यास काय म्हणाल?
 यावर त्यांच उत्तर उपरोधिक अन अगदी सरळसोट म्हणूनच पटणार होत ते म्हणाले, नाना ,अक्षय आणि मी असे आम्ही तीघ वेडे आहोत. इतर वेडेही आम्हाला जुडतील याची वाट आम्ही बघतो आहे. आणि सामाजिक बांधिलकी हा व्यक्तिसापेक्ष भाग आहे त्यामुळ आपण इतरांना दोषी ठरवू शकत नाही.’ या उत्तरानंर मकरंद ने सर्वांसमक्ष माझयावरच गुगली टाकत मला प्रश्न केला, तूम्ही कोणता व्यवसाय करता? मी उत्तरलो पत्रकार आहे, शासकीय सेवेतत्यावर मकरंद म्हणाला तूम्ही किती योगदान दिल याकामी? मी म्हटल मी तर दिल नाही पण मी वेगळया पध्दतीने सामाजिक जबाबदारी जपतोय . ते  आणखी विस्ताराने सांगायची ती वेळ नव्हती म्हणून थांबलो. अन कार्यक्रम संपताच स्टेजवर मकरंदला गाठल. त्यांना सांगितल सर मी वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करून सामाजिक जबाबदारी जपण्याच काम करतोय. रस्त्याच्याकडेला पाल बांधून जीवन जगणा-या परिवारातील लहान मुला मुलींना शिकविण्याच काम ,झोपडपटटीत जाऊन तेथील मुला मुलींना शिकविण्याच काम करत मी सामाजिकभान जपलय. मकरंद म्हणाले, वा छान’.  मी त्यांना म्हणालो सर, ‘ आपल्या समाजात खुप होतकरू तरूण आहेत त्यांनाही आपण मार्गदर्शन करण्याची गरज असल्याच मला सारख जाणवत अन ते कामही मी करीत असतोआता मात्र मकरंद यांना हे मत पटल नाहीते म्हणाले, ‘ प्रत्येकात सामाजिक जाणिवा असतात व त्याच्या त्यानेच त्या स्वत: जागवायच्या असतात अन आपण काही मार्गदर्शकाच्या भूमीकेत राहून काम करायची गरज नाही let do  them .
मकरंद अनासपुरे यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच सुरु झालेला नाटय क्षेत्रातील प्रवास उलगडताना ब-याच हीडन बाबी कळल्या. ते शिकत असलेल्या महाविद्यालयात कला शाखेतील मुलांचा नाटय स्पर्धांवर असलेला एकाधिकार मोडून काढण्यासाठी विज्ञान शाखेतील मुलांचे प्रतिनिधीत्व करून मोडीत काढलेली एकाधिकारशाही, त्यानंतर विद्यापीठांतर्गत व अन्य नाटय स्पर्धांमधे मिळविलेले विविध पुरस्कार, राष्ट्रीय युवा महोत्सवात मिळवेलेले सुवर्ण पदक असे विषय उलगडतानांच मकरंद यांनी नाटक आणि राजकारण हा विषयही सांगितला. अर्थात ते ज्या गृपमधे काम करायचे त्याचा प्रमुख हा गृप मधील कलाकारांना कामाचा मोबदला म्हणून पैसे देत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. आणि येथूनच त्यांनी त्या गृप ला सोड चिठ्ठी दिली. मग मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे असा दोघांचाच गृप तयार करून त्यांनी सादर केलेले धम्माल द्वीपात्री प्रयोग. या प्रयोत रंगमंच्च सज्जा, प्रकाश संयोजन नसल्याने त्यांच्यावर होत असलेली टिका. यातून त्यांनी प्रकाश व्यवस्था, रंगमंच सज्जा याबाबी सांभाळत स्वत: दिग्दर्शन केलेले मसन जोग्याच्या चित्तर कथेवरील नाटक त्यात ऐन वेळी माचिसची काळी न सापडल्याने चिताच न पेटल्याचा प्रसंग असे एकाहून एक किस्से उलगडले जात होते.
 मकरंद आणि नानांची भेट व येथूनच मकरंद यांची मुंबईत सुरु झालेली जगण्यासाठीची धडपड थक्क करून सोडणारी आहे. नानांनी एका नाटय स्पर्धेत कुणा मोठया दिग्गज कलाकाराच्या सांगण्याहून मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई यांचे नाटय बघण्याचा प्रसंग, आमदार निवासातील मकरंद यांचे दिवस, मधेच ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांचा किस्सा ज्यात त्यांनी मकरंद अनासपुरे यांना आमदार निवासावर पडून राहण्यापेक्षा NCPA (National Council Performing Art) ला येऊन पुस्तक वाचण्याचा दिलेला सल्ला त्यातून आयुष्याला मिळालेली कलाटनी. १९९४ पासून सुरु असलेल्या स्ट्रगल ला २००६ मधे कायद्याच बोला या  चित्रपटातून मिळालेला ब्रेक व त्यानंतर ३ वर्षात ४४ चित्रपट करण्याचा मकरंद यांनी केलेला विक्रम हाही महत्वाचा टप्पा त्यांनी उलगडला. पत्नी शिल्पा, मुलगी इंद्रायणी आणि मुलगा इंद्रनील यांना त्यांचा वेळ देत कौंटुबिक जबाबदारी पार पाडत असलेला मकरंद आणि दुस-या बाजुला मराठवाडा व विदर्भातील आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीला नाना पाटेकरांच्या मदतीने  NAAM  या संस्थेच्या माध्यमातून सुरु केले काम म्हणजे मकरंद यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आलेख.   
विनोदी आणि गंभीर भुमीका करत मराठवाडयाची आपली अस्सल भाषा जपणारा व तेवढाच कौंटुबिक– सामाजिकभान जपणारा कलंदर कलावंत मकरंद अनासपुरे यांची भेट अवस्मरणीय ठरली.        
                                                       *****


डॉक्टर शर्मा कुटुंबिय आणि त्यांची सामाजिक बांधिलकी






स्वत: गौरव शर्मा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर तर त्यांची पत्नी डॉ. दिपीका शर्मा, एमबीबीएस आणि फॅमिली फिजीसियन, भाऊ डॉ. अनशुल शर्मा डेंटिस्ट आणि वडील डॉ. पुरन प्रकाश शर्मा सुध्दा एमबीबीएस आणि पेडीयाट्रीक डॉक्टर आणि प्रसिध्द सर्जन.कमीत कमी फी आकारून रूग्नांना बर करण्याचं काम अव्याहतपणे करणा-या या डॉक्टर कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी थक्क करून सोडणारी आणि तीतकीच कौतुकास्पद आहे.
क्लीनीक म्हटल की भला मोठा हॉल वा इमारत.इथे प्रवेश करताच तुम्हाला दिसेल रिशेप्शन. मग तासन तास बसाव लागणार (रूग्ण यातच अर्ध मेला होणार) अस सर्व वातावरण असत. पण शर्मा यांच्या क्लीनीक मधे अस काहीच नाही. फक्क १०x१० ची एक रूम. पण सर्वच सुविधांनी सज्ज. एसी, टीव्हीसह उपचारासाठी लागणारी आधुनिक उपकरण इथे बघायला मिळतात. एवढच काय क्लीनीक मधे येणा-या रूग्णांसाठी टाकण्यात आलेल्या सोपेवजा आसणाखाली औषधांचे बौक्स आहेत. अर्थात कमी जागेत उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी हे क्लिनीक नीट नेटक ठेवलय. या क्लीनीकच वैशिष्टय अस की रूग्णाला सुई टोचली जात नाही. औषध स्वत: डॉक्टरकडचीच. तपासणी आणि औषधांची(चार टका) फी फक्त १०० रूपयें. (जी आत्तापर्यंत फक्त ५० रूपयेच होती.). त्यात जमेची बाब ही की रूग्णांना शंभर टक्के आराम मिळणार. त्यात हे डॉक्टर कुटुंबिय रूग्णांची आस्थेन आणि नम्रपणे चौकशी करतात. रूग्णाला त्याच्या आजाराबददल नीट समजावून सांगतात आवश्यक तेव्हाच बाहेरून तपासणी वा औषधांचा सल्ला देतात. हे सगळ मी कस सांगू शकतो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला कदाचित तर त्याच उत्तर ही देवून टाकतो. ते अस की डॉक्टर जेव्हा रूग्णाला तपासतात तेव्हा ते सर्वांसमोरच तपासतात त्यामुळे वेटींगवर असलेले रूग्ण आणि प्रत्यक्ष तपासणी सुरु असलेले रूग्ण एकमेंकाना पाहू ऐकू शकतात आणि मी ही रूग्ण म्हणून या क्लिनीक मधे गेल्यानंतरच्या माझया निरीक्षणाहूनच हे सांगतोय.
आजचाच ताजा किस्सा सांगतो. मला ताप असल्यान मी क्लीनीक मधे गेलो तर इथे असलेल्या बाकांवर सर्व रूग्ण बसून होते त्यात बालरुग्णच जास्त होते. मी ही अशात क्लीनीक मधे शिरलो अन मोकळी जागा दिसताच तिथे बसलो. यावेळी पश्चिम बंगालहून दिल्ली भ्रमंतीसाठी आलेल्या एका दांपत्याच्या लहान मुलाला डॉक्टर तपासत होते त्यानंतरचा रूग्ण अर्थातच इथे उपस्थित दुस-या दांपत्याच छोट बाळ होत. बाळाला भूक लागल्यान ते आईला ओढतान करत होत आईनेही क्लीनीकमधली कमी जागा लक्षात घेता पाठ मोरी होऊन मुलाला पाजण्यास सुरुवात केली.तोच डॉक्टरच साहेबांच लक्ष गेल त्यांनी लगेच बाळाच्या वडीलाला क्लीनीक मधील पडदा पाडण्यास सांगितल तस करताच आईने आपल्या मुलाला वीना तक्रार जेवू घातल.तितक्यात वेटींग लिस्टमधे असलेल्या म्हाता-या आंटी डॉक्टरांपुडे जावून बसल्या अन सांगत्या झाल्या, मुझे ना कल से कुछ खातेही उल्टीया होने लगी है बहुत तप्लीक है. त्यावर डॉक्टरांनी थोडा विचार करत आपल्या पुढयात असलेल्या गोळयांतील ४ गोळयांची स्ट्रीप्स देत त्या कशा घ्याव्या हे समजावून सांगितल. त्यावर हिरमुसला चेहरा करत आंटी म्हणाल्या बस इतनीशी दवाई. मग डॉ. गौरव शार्मा म्हटले कोई घबराने वाली बात नही आपको जो शिकायत है उसीके वजह से आपको यह तकलीफ हुई है ये दवाई या खाने से ठिक होजाएगा चिंता करने की कोई बात नही. मग आंटीने लगेच पैसे काढण्यासाठी आपल्या जवळची पैस्यांचा मळकट बटवा काढला त्यावर डॉक्टर म्हणाले इसकी कोई जरूरत नही आंटीजी. अस म्हणताच त्या आंटीने कोणताही विचार न करता डॉक्टरांच्या डोक्यावर हात ठेवत जितेरहो बेटे असा आशिर्वाद दिला आणि डॉक्टरांनी आपली दोन्ही हात जोडत या आशिर्वादास नम्र प्रतिसाद दिला.हे चित्र माझया प्रमाणेच क्लिनीक मधे बसलेले अन्य रूग्ण बघत होते. संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास मोठाल्या तामझामच्या आजच्या दुनियेत देखाव्याला महत्व आलय आणि डॉक्टर व रूग्ण यांच्यात अवास्तव अंतर वाढत चालल आहे. त्यात सामाजिक बांधिलकी तर कोसो दूर आहे. पण शर्मा  डॉक्टर कुटुंबिय याला मोठा अपवाद आहेत आणि ते सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा करीत आहेत.         
आम्ही ज्या पहाडगंज भागात राहतो तिथेच या शर्मा डाक्टर कुटुंबियांनी आपली कर्मभूमी निश्चित केली आहे. या भागात सर्वच आर्थिक स्तरातील लोक आहेत गरीब, मध्यमवर्गीय तर श्रीमंत असे सर्वच. मग पहाडगंज भागातच दोन ठिकाणी हे कुटुंबिय रूग्ण तपासणी करतात. मोतीया खान भाग जिथे श्रीमंत लोक आहेत आणि दुसरा म्हणजे मुलतानीढांडा हा भाग जिथे मध्यमवर्गीय व गरीब आणि बहुतांश वेळा दिल्ली फिरायला आलेल्या पर्यटक रूग्णांचा राबता असतो(कारण इथे मोठया प्रमाणात हौटेल्स आहेत). डॉ. गौरव आणि दिपीका या दांपत्यांनी सर गंगाराम व तत्सम नावाजलेल्या इस्पितळात काम केल आहे त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याच्या भरवशावर त्यांना पैसा कमविणे सहज साध्य होते पण त्यांनी धन सेवे पेक्षा जन सेवेला जास्त महत्व देण्याचा निर्णय घेतला. ते सकाळी ९ ते ११ मुलतानी ढांडा भागात आपली सेवा देतात तर यानंतर ११ ते १ या वेळेत वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे रूग्ण सेवा करतात. याच क्लिनीक मधे सायंकाळी ५ ते ७ वेळेत पुन्हा हे दांपत्य आपली सेवा देतात तर वडील डॉ. पुरनप्रकाश शर्मा हे ७ ते ९ अशी सेवा देतात. हे दांपत्य सकाळी ११ते १ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मोतीयाखान येथील क्लिनीक मधे रूग्णसेवा करतात. जिथे डॉ. अनशुल शर्मा सुध्दा सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ अशी रूग्ण्‍ा सेवा करतात.
            आजार झाला अन व्यक्ती डॉक्टरकडे गेलाच नाही अस चित्र आज-काल फारच विरळा बघायला मिळत. पण, रूग्ण मिळतात म्हणून त्यांना विविध चाचण्या आणि भल्या मोठया औषधांची यादी लिहून देणा-या डॉक्टर्सचा मोठा सूळसुळाट आहे.मोठया शहरात तर एक मोठ इस्पितळ त्यात विविध विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स त्यात इस्पितळाची नॉर्मल फी मग विशेष फीज तिथेच विविध चाचण्यांची सोय असा बाजार सदृष्य प्रकार बघायला मिळतो.दुसरीकडे सरकारी नोकरदारांसाठी पॅनलवरील ठरलेले डॉक्टर्स अन त्यांच्याकडून नुसते मेडीकल बील वर सहयाकरून आपले बील काढण्याचे प्रकार तर सरकारी केंद्रीय कर्मचा-यांसाठी असलेल्या सीजीएचएस कार्डचा होत असलेला दूरूपयोग दिसून येतो.यात देवानंतर महत्वाचा दर्जा ज्या डॉक्टरला दिला जातो त्याची सामाजिक जबाबदारी कुठे आहे ? असा प्रश्न पडणे सहाजीक आहे.
           प्रत्येक जन या समाजाचा घटक म्हणून आपआपली भूमिका अदा करत असतो मग तो राजकारनी, नोकरदार, डॉक्टर, इजिनीअर, शिक्षक, पत्रकार, रिक्शा  वा बस चालक, मोलकरीन  किंवा शेतमजूर असो. या प्रत्येकानी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपली जबाबदारी पार पाडली तर हा समाज ख-या अर्थाने समृध्द होईल. डॉ. शर्मा कुटुंबिय यासाठी मार्गदर्शक ठरतील हीच आशा. अशाच सकारात्मक स्टोरीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार.
                                                       ****