केंद्र सरकारच्या विविध विभागांच्यावतीने देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार, सरकारच्या विविध राष्ट्रीय परिषदांच्या वार्तांकनासाठी दिल्लीतील विज्ञान भवनात जाण्याचा योग प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह दिल्लीत कार्यरत विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागात कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही येतो. या सर्वांनी संसद भवनापासून जवळपास दोन किलो मिटर अंतरावर मौलाना आझाद मार्गवरील याच विज्ञानभवनात नुकताच महाराष्ट्राच्या गौरवाचा दिमाखदार सोहळा अनुभवला. प्रसंग होता महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले, केंद्रात सलग १० वर्ष कृषीमंत्री पदाचा पदभार सांभाळणारे व भारतीय राजकारणात पाच दशके यशस्वी कारकीर्द गाजविणारे राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिमाखदार अमृतमहोत्सवी सोहळ्याचा.
एरवी आपआपल्या पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, पक्षाचे नेते, कार्यकर्ते हे पक्षाची भक्कम बाजू मांडतात तेव्हा इतर पक्षांवर सडकून टिका करताना दिसतात. मात्र, हेच दिग्गज आणि देशातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती एकत्र आणि अगदी कौटुंबिक समारंभात जमल्याचा हा दुर्मीळ सोहळा. मंचावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि विविध राजकीय पक्षांचे प्रमुख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या देशाच्या विविध भागातून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहाच्या क्षमतेच्या तुलनेत ही संख्या जास्त असल्याने पद प्रतिष्ठा विसरून, मिळेल तिथे उभे राहून व रिकाम्या जागेत खालीच बसून हा कार्यक्रम डोळ्यात साठविणाऱ्यांची संख्याही मोठी होती.
सभागृहात सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंत मंचावरील खुर्च्यांवर मान्यवर आसनस्थ झाले. आता राष्ट्रपती महोदयांची प्रतिक्षा होती. आणि ठरलेल्या वेळेत चोख ५.३५ वाजता सभागृहात राष्ट्रपतींचे आगमन झाले, तोच उपस्थितांनी जागेवरच उभं राहत मानवंदना दिली. निवेदकाने राष्ट्रगीत होणार असल्याची घोषणा करताच सभागृहातील सर्वजण आपआपल्या जागी उभे राहिले. देशप्रेमाचे स्फुलींग जागविणाऱ्या राष्ट्रगीताने सभागृहाचे वातावरण भारावून गेले होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत काव्य पंक्तींतून शरद पवारांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख मांडत उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. आता मंचावर उपस्थित राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांचे शरद पवारांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
ध्वनी चित्रफीत
यानंतर शरद पवार यांच्या बहुआयामी व्यक्तीत्वाचा वेध घेणारी व त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारी हिंदी भाषेतील पंधरा मिनीटांची ध्वनी चित्रफीत दाखविण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडाटात यास दाद दिली.
प्रकाशन सोहळा
शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत ‘गौरव ग्रंथ’, ‘ऑन माय टर्म’ आणि ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सन्मान
राष्ट्रपतींच्या हस्ते शरद पवार यांचा स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी श्रीमती प्रतिभा पवार यांना स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. निवेदकाने शरद पवार यांना या सुखद प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली.
याप्रसंगी शरद पवार मनोगतात म्हणाले,‘मी वयाच्या अठराव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. वयाची पंचाहत्तरी, राजकीय जीवनाचे पच्चावन वर्ष आणि संसदीय जीवनाचे ४९ वर्ष अशा सर्व प्रवासात जनतेने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करतो.’ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्याप्रसंगी आई-वडीलांची आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. पंधरा मिनीटांच्या आपल्या मनोगतात त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात मान्यवरांची उद्बोधक भाषणे झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, ‘शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात विविध पक्षांचे नेते एका मंचावर उपस्थित असल्याचे चित्रच त्यांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वाचा परिचय देणारी आहे.’ पवारांशी माझा स्नेह गेल्या दोन दशकांपासून असल्याचे सांगत, देशातील तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन वाढवून त्यांची निर्यात करण्याच्याकामी पवारांनी मोलाचे योगदान दिल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे असेही त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह म्हणाले, ‘शरद पवारांनी देशाला सृजनात्मक योगदान दिले.’ महाराष्ट्रासह देशाच्या सहकार, कृषी, उद्योग व सामाजिक क्षेत्रात पवारांनी महत्वपूर्ण कार्य केल्याचे त्यांनी सांगितले. ७० च्या दशकात यशवंतराव चव्हाण देशाचे वित्तमंत्री असताना त्यांच्या आर्थिक सल्लागारपदी आपण होतो तेव्हा शरद पवारांशी पहिली भेट झाल्याचे ते म्हणाले. त्यानंतर ८० च्या दशकात आपण आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्त झाल्यापासून ते माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत पवारांचा सहवास लाभल्याचेही त्यांनी सांगितले. ‘तूम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार’ अशा शब्दात त्यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी, ‘शरद पवार हे एक अष्टपैलू राजकारणी आहेत’अशा शब्दात पवरांचा गौरव केला. कृषीमंत्री म्हणून पवारांना राज्यसभेत सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना पवारांनी नेहमी संयत भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत पाच दशक वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौऱ्यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपाशी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
‘भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे.’ अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पवार यांचा गौरव केला. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. ९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना ‘सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणने’ औचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांच्या टाळ्यांचा गडगडाट आणि कार्यकर्त्यांच्या उद्घोषणा याने विज्ञानभवन दुमदूमून गेले.
सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांचे आभार मानतांना शरद पवारांनी देशाला दिलेल्या योगदानाचे अनन्य साधारण महत्व असल्याचे सांगितले. एक मुलगी आणि जबाबदार लोक प्रतिनिधी या नात्याने मी पवार साहेबांकडून सतत शिकत आले व शिकत राहीन असे सांगून वडीलांच्या खांद्याला खांदा लावत त्यांना साथ देणाऱ्या आई प्रतिभा पवार यांच्या उदारतेचे कौतुक त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित देशातील सर्वोच्च पदस्थ महानुभाव आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या तमाम मान्यवर व नेत्यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सभागृहात उपस्थित सर्वच मान्यवर मंचा शेजारी उपस्थित महाराष्ट्राच्या व देशाच्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत होतं आणि विज्ञान भवनही आपल्या कारकिर्दीतला महाराष्ट्राच्या गौरवाचा हा दिमाखदार सोहळा आपल्या स्वर्णीम आठवणीच्या कप्यात जपून ठेवत होता.
-रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.
No comments:
Post a Comment