‘उन्हाळे-पावसाळे पाहिलेला जनसेवक’
मी, तसा
खरा खुरा २४ तास जनसेवक. दररोज अगणीत वेगवेगळे चेहरे असलेले व चेहऱ्यावर मुखवटे म्हणजे
हेलमेट पांघरलेले वाटसरू सतत मला भेटतात.आज यात आणखी भर पडली ती बॅनर,पोस्टर्स अन्
झेंड्यांची. एका नेत्याच्या नागपुरातील आगमनासाठी हे शहर सज्ज असल्याचे लिहिलेले संदेश
सर्वत्र झडकत आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जाताना मला मागच्या वर्षी याच शहरात आयोजित सी-२०
(जी -२०अंतर्गत) परिषदेसाठी माझ्या आजुबाजूला करण्यात आलेले सुशोभिकरण ठळकपणे आठवते.परदेशी
पाहुण्यांना हे शहर आणि विशेषकरून आमचा परिसर सुंदर नेटका दिसावा म्हणून बऱ्याच गोष्टींची
रेलचेल होती. महागडे सिंथेटिक पट्टे, हिरव्या लुसलुसीत गवताच्या चादरी पसरविण्यात आल्या,
झाडांवरील खास रोषणाई , परबोला असे कितीतरी प्रकार मी नव्यानेच बघितले. शहरातील तरुणाई
हे सुशोभिकरण आप-आपल्या मोबाईलमध्ये टिपून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर पोचवित
होते आणि माझ्या अवतीभोवती माणसांचा पूर त्याकाळात मी बघितला.
यानंतर शहरात पार पडणारा हिवाळी अधिवेशनाचा वार्षिक
उत्सव तर मला फारच प्रिय. या काळात माझ्या आजुबाजुला प्रशासकीय गाडयांचा ताफा,मंत्र्यांच्या
गाडयांचे हॉर्न , शासकीय नस्त्यांनी लोडेड
वाहन असा हा काळ.त्याच काळात आपआपल्या नेत्यांचे होर्डिंग्ज,बॅनर ,झेंडे लावणारे
सर्व राजकीय पक्ष याकाळात माझी जास्तच दखल घेतात. मग जत्रा उठल्यावर जसे पाल पांगतात.
तसे सर्व आल्यामार्गी आपआपल्या गंतव्यस्थळी परतल्यानंतर मी आपला तोच पाढे पंधरा करत
नित्यक्रमात गुंतून जातो. निवडणुका,नेत्यांचे
वाढदिवस,वेगवेगळे आयोजन असली की तेच रेलचेल मी अनुभवतो. आणि आता ते नित्याचेच झाले.
एरवी काही महनिय व्यक्तीमत्वांच्या धुळखात पडलेल्या
व जयंतीच्या दिवशी तेवढे स्वच्छ होणाऱ्या पुतळयांखेरीज, राजा राणी आणि नागपूरचा स्थानिय
पक्षी एवढाचा माझा गोतावळा आमच्यातच आम्ही मशगुल असतो. माझ्या जन्माचा शोध घेता एक
गोष्ट लक्षात आली की, मी एक साधा जमिनीचा तुकडा. मग कुण्या नेत्या, अधिकाऱ्याच सुपिक
डोक्यात आलेल्या कल्पनेतून कोण्या अभियंत्याने मला आकार देण्याचा प्रयत्न केला . आणि
त्यावर रेती, माती, डांबर असे तत्सम जिन्नस वापरून मला तयार केला आणि असे तसे माझे
बाडसे घातले, होय मी सिव्हील लाईन्स परिसरातील रस्ता बोलतोय.(बोले पेट्रोलपंप चौक ते
उच्च न्यायालय चौक हा रस्ता).
00000000

No comments:
Post a Comment