आपुले मरण पाहिले
म्या डोळा……..
प्रसंग आहे नागपूर-अमरावती रोडवरील दाभा परिसरातील
मारुती शो रुम अर्थात सेवा येथील. दाभ्यातून आलो व येथील टी पॉईंटवर सिटी बस किंवा
ऑटो घेवून कार्यालय जवळ करण्याचा दररोजच्या शिरस्ता आजही काही वेगळा नव्हता. ऑटोला
हात दिला तसा तो थांबलाही. ऑटोत आधिच डबल डेकरच्या व्यवस्थेमुळे सहा लोक कोंबली असल्याने
माझ्या वाटयाला चालकाजवळ बसण्याचाच पर्याय होता. हे पाहून मी ही त्याच्या डाव्या बाजुने
जावून बसण्याच्या बेतात होतो. पण चालक महाशय म्हणाले, त्या बाजुला या अर्थात त्यांच्या
उजव्या बाजुला जावून बसायच होत. ऑटोला समोरुन वळसा घालून बसण्याच्या बेतात निघालो तोच ऑटोमागून भरधाव वेगाने एक कार आली, थोडा टाईमींग
जर का चुकला असता तर अनर्थ टळला नसताच. असा हा बाका प्रसंग स्वत:वर गुदरल्याने ‘आपुले
मरण पाहिले म्या डोळा..’ असाच हा काहीसा अनुभव
आला. ऑटोत बसताना चालकाला ओरडलो तर तोच माझ्यावर डाफरत म्हणाला, तुम्हाला बघून बसता
नाही येत का!
सहप्रवासी हेच या घटनेचे मुकदर्शक.ऑटोत बसलो आणि
बर्डीकडे प्रवास सुरु झाला. या प्रवासात घडलेल्या प्रसंगाचे चिंतन करत राहिलो. त्यातून
निष्कर्ष हाती आला की, ‘दुर्घटना घडली असती आणि याचे कारण ठरले असते तिघांचा बेजबाबदारपणा.’
त्याचे विश्लेषण करू जाता पहिली बेजबाबदार व्यक्ती ठरते ऑटोचालक. चरितार्थासाठी ऑटो
चालविण्याचे कर्तव्य हे प्रवाशांची सुरक्षा आपल्यावर असल्याच्या जबाबदारीतूनच पूर्णत्वास
जाते याचा बहुतांशवेळी विसर पडलेला जाणवतो. मग चालक कोणत्याही वाहनाचा असो नियम सारखाच.
म्हणजे वाहतुकीच्या नियमानुसार ऑटो चालकाने प्रवाशाला आपल्या शेजारील जागा देताना
सर्वप्रथम डाव्या बाजुच्या जागेवर प्रवाशास बसायला सांगावे. (कारण रस्त्याने येणारी
वाहणेही उजव्याबाजुने येवून पुढे जात असतात आणि अशात काही अनुचीत घडल्यास प्रवाशाचे
रक्षण होईल.)
मग तुम्हाला वाटेल की मुळात ऑटोचालकाने आपल्या सिटवर
अन्य प्रवाशांना बसविणे हेच प्रथमत: वाहतूक नियमाचे उल्लंघन ठरते. मान्य. पण, वाढून
ठेवलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्वचजण अधिक मिळविण्याच्या शर्यतीत
आपल्याला पुढे ठेवण्यात धन्यता मानतात, त्यामुळे चार-दोन प्रवासी जास्त बसवून त्याने
आपली दिवसाची आमदनी वाढवणेही त्या अर्थाने गैर नसावी. पण अर्थारजनात जबाबदारीही तर महत्वाची आहेच ना ! त्याच काय ? प्रवाशांची ने-आण
करणे एवढेच काम नसून त्यांना सुरक्षित गंतव्यस्थळी पोचविणे या जबाबादारीतून आलेले ते
कर्तव्य आहे. याचा बहुतेकांना विसर पडतो, तो मात्र पडालयला नको. तो जसा आज या ऑटो चालकाला
पडला आणि त्यातून अनर्थ होताहोता टळला. त्याची
जाणीव मी त्याला ऑटोतून उतरताना सर्व सह प्रवशांसमोर करून देताना म्हटलेले वाक्य असे,
‘भाऊ पुढच्यावेळी प्रवाशाला उजव्या बाजुने बसण्याचा हट्ट टाळा आणि दुसऱ्यासह स्वत:चा
जीव वाचवा, जबाबदार चालक व्हा.’ यावर तो काही उत्तरतो का याची वाट पाहत मी प्रवास भाडं
दिलं मात्र, त्यावर चकार शद्ब न काढता त्याने मान डोलवली अन मी मार्गस्थ झालो.
दुसरा बेजबाबदार ,मी. ऑटोत बसण्यासाठी निघताना मागच्या
बाजुने कोणते वाहन येत आहे किंवा नाही याची शाहनिशा करूनच मी ऑटोत बसायला हवे होते.
अशात अनर्थ झाला असता तर मी एक जबाबदार नागरीक ,मुलगा, नवरा, बाप, भाऊ खचितच ठरलो असतो.
आपणही कोणाचे कोणीतरी आहोत त्यामुळे आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने आपण त्यांच्यापासून
कायमचे दुरावू शकतो याची प्रकर्षाने जाणीव झाली. यापुढे काळजी घेण्याचा मनोमन निश्चय
केला.
तिसरी बेजबाबदार
व्यक्ती म्हणजे, मागून भरधाव वेगाने येणारा कार चालक. आपण ज्या रस्त्याने जात आहोत.
तिथे प्रत्येक चौक, टी पॉईंट व तत्सम थांबे लक्षात घेता गाडीचा वेग कमी ठेवणे ही प्रत्येक
वाहन चालकाची जबाबदारी आहे. त्याचा विसर पडला की इतरांचा घात करून संबंधित व्यक्तींसह
सर्वांच्या आयुष्यात कायम जिव्हारी बसणारा शद्ब ‘अपघात’ उच्चारणे व स्वीकारण्याची अपरिहार्यताच
तेवढी उरते.
सरते शेवटी, “आयुष्य
सुंदर आहे तसेच ते पाण्याच्या बुडबुड्यासम आहे.” याची
प्रचिती आपल्याला कधिही येवू शकते . ते टाळण्यासाठी मात्र सर्वांनाच जबाबदार बणावे
लागेल हा या प्रसंगातील धडा तेवढा शिल्लक राहतो.
००००००

No comments:
Post a Comment