Thursday, March 9, 2017

कामाप्रती निष्ठा आणि जनकल्याणाच्या भावनेतून मिळते प्रेरणा : मुमताज काजी



    
                नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिलांचा परिचय केंद्रात सन्मान
नवी दिल्ली, ९ : कामाप्रती निष्ठा आणि जनकल्याणाची भावना या सुत्राने उत्तम कार्य करू शकते, पुढेही असेच कार्य करीत राहीन अशा भावना आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक मुमताज काजी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या. 
उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्तीराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुंबई येथील मुमताज काजी  यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मुमताज काजी यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणा-या मुमताज काजी यांच्या कानावर बालवयात सतत पडणारा उपनगरीय रेल्वेचा आवाज आणि  रेल्वेत काम करणा-या आजोबांकडून मिळालेली प्रेरणा या बाबी रेल्वे चालक बनण्यासाठी पुरक ठरल्या. वयाच्या १८ व्या वर्षीच उत्तम गुणांनी रेल्वेची परिक्षा उत्तीर्ण करून स्वप्नपूर्तीच्या दिशेने मुहर्तमेळ रोवल्याचे त्यांनी सांगितले. कुर्ला, भुसावळ येथे झालेले प्रशिक्षण आणि १९९१ मध्ये रेल्वेत प्रवेश असे विविध टप्पे त्यांनी यावेळी विषद केले. २००५ मध्ये बेलापूर, वाशी, पनवेल ,ठाणे या महत्वाच्या मार्गांवर रेल्वे चालक म्हणून केलेली सुरूवात आणि या कार्यात सहकारी, अधिकारी व मुंबईकरांची मिळालेली साथ यामुळेच आशियाखंडातील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचा मान मिळाल्याच्या भावना मुमताज काजी यांनी  व्यक्त केल्या. कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण उपलब्ध आहे, सर्व सहकारी आणि अधिकारी मदत करतात, यामुळेच मुंबईतील चाकरमान्यांना रेल्वेच्या माध्यमातून वेळेत पोहचविण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकते असे त्या म्हणाल्या. आपल्या कार्यामुळे महिलांना प्रेरणा मिळत असल्याचा अत्यानंद होत असून यापुढे जोमाने कार्य करणार असल्याचे त्या सांगतात.   
मुमताज काजी यांनी वयाच्या २० व्या वर्षा पासूनच डिजल लोकोमोटिव रेल्वे चालविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या साहसी कामाची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना जागतिक महिलादिनी नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. बहु प्रतिष्ठीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने १९९५ मध्ये मुमताज काजी यांना पहिली डीजल लोकोमोटिव ड्रायव्हर म्हणून समाविष्ट केले आहे.
मुमताज काजी यांच्या प्रकट मुलाखतीचे फेसबुक व ट्वीटरवर लाईव्ह प्रक्षेपण
दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरोचिफ निलेशकुमार कुलकर्णी यांनी यावेळी मुमताज काजी यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रतिष्ठीत नारी शक्ती पुरस्कार प्राप्त मुमताज काजी यांच्या कार्याचा विविधांगी वेध घेणा-या या प्रकट मुलाखतीचे कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्वीटर अकाऊंटहून थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.दर्शक या प्रकट मुलाखती आमच्या http://www.youtube.com/micnewdelhi या युटयुब अकाऊंटवरही बघू शकतात.      
                                                       0000  

Tuesday, January 24, 2017

राजपथावर ‘टिळक युग’


मंगळवार, २३ जानेवारी, २०१७
देशाच्या राजधानीत साजरा होणारा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव प्रजासत्ताक दिन. यादिवशी महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा चित्ररथ प्रदर्शित होणार आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेमुळे पारतंत्र्य काळात देशवासियांना एकजुट केले, यासह टिळकांच्या गौरवशाली योगदानाचे स्मरणच देशाला या चित्ररथाच्या माध्यमातून होणार आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाच्या प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारी रोजी राजपथावर (इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा जवळपास साडेतीन किमीचा मुख्य रस्ता) पथसंचलनाच्या माध्यमातून शस्त्र सज्जतेचे व सांस्कृतिक वैविध्यतेतून एकतेचे दर्शन घडते. राजपथावरील पथसंचलनात भारताच्या विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ हे विशेष आकर्षण असते. महाराष्ट्र राज्याच्यावतीने पथसंचलनात सहभागी होणाऱ्या चित्ररथांनी बहुतांश वेळा प्रथम क्रमांक मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत राज्याच्यावतीने ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा चित्ररथ प्रदर्शित करण्यात येत आहे.

लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंतीनिमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्व आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाला उजाळा दिला जाणार आहे. याचा सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. त्याला तेवढेच प्रबळ कारणही आहे. पारतंत्र्यात भारतीयांच्या मनात धगधगत्या स्वातंत्र्याची ज्वाला लोकमान्यांनीच प्रज्ज्वलित केली. भारतीय असंतोषाचे जनक ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. ‘मराठा’ व ‘केसरी’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून टिळकांनी केलेली जनजागृती आणि ब्रिटीशांना दिलेले सडेतोड उत्तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करून भारतीयांना संघटित करण्याचे केलेले कार्य, टिळकांवर ब्रिटीशांनी चालविलेले खटले, शिक्षण, शारीरिक शिक्षणाला टिळकांनी दिलेले प्रोत्साहन आदीं बाबींना या चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे.

चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 40 कारागिरांनी अतिशय देखना चित्ररथ उभारला आहे.

चित्ररथाची वैशिष्ट्ये 
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा 15 फुट उंचीचा पुतळा असून ते अग्रलेख लिहिताना दर्शविण्यात आले आहेत. पुतळ्याच्या मागे एक प्रिंटींग प्रेस दर्शविण्यात आली असून 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी लंडनहून मागविलेली डबल फिल्टर प्रिंटींग मशीन व त्यातून छपाई होणारे ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्र दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर दर्शविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती मुर्तीची स्थापना करतानाचे दृष्य दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवास दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात मल्लखांब आणि कुस्ती करणारी मुले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करताना दर्शविण्यात आली आहेत. लोकमान्य टिळकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यासाठी बाकावर बसलेला शाळकरी मुलगा व मुलगी दर्शविण्यात आली आहे. 
लोकमान्य टिळकांची सिंह गर्जना

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही लोकमान्य टिळकांची उद्घोषणा चित्ररथावर ऐकायला मिळणार आहे. 
राज्यातील 33 कलाकारांचे सादरीकरण 
रायगड जिल्ह्यातील उरण येथील रुद्राक्ष ग्रुपच्या 28 कलाकारांचा चमू या चित्ररथाच्या दोन्ही बाजूला ‘पयल... नमन... हो करितो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन, मी करितो कथन..’ या गितावर नृत्य सादर करणार आहेत. मुंबईतील दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराचे तीन क्रिडापटू चित्ररथावरील मल्लखांब आणि कुस्तीचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. याशिवाय प्रिंटींग प्रेसमध्ये काम करणारा कर्मचारी व गणपतीची आरती करणारी महिला या चित्ररथावर दिसणार आहे.

राजपथावरील चित्ररथांविषयी 
देशाभिमान वाढविणाऱ्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्याला विशेष महत्व आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या राजपथावरील पथसंचलनात नौदल, वायुदल आणि सेनेच्या बँड आणि सैनिक पथकाचे पथसंचलन तसेच विविध राज्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे चित्ररथाचे पथसंचलन पार पडते. राजपथावरील पथसंचलनात चित्ररथ प्रदर्शनाची सुरुवात 1952 ला झाली. त्यावेळी फक्त पाच चित्ररथ सहभागी झाले होते. यावर्षी हा आकडा राज्यांचे 17 तर विविध केंद्रीय मंत्रालयांचे सहा असे एकूण 23 चित्ररथ असा झाला आहे. 
राज्याच्या वतीने अशी पार पडते प्रक्रिया

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात चित्ररथाबातचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र येते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारकडून चित्ररथासंदर्भातील प्रस्ताव पाठविला जातो. सप्टेंबर महिन्यात पहिली बैठक यात राज्याला किमान 4-5 विषय मांडायला सांगतात. नंतर त्यातील एक विषय निवडतात व त्यावर काम करायला सांगतात. नंतर ऑक्टोबरमध्ये दोन बैठका होतात. यात पहिल्या बैठकीत विषय विस्ताराने मांडायला सांगतात. एकुणात तिसऱ्या बैठकीत राज्यातर्फे देण्यात आलेल्या संकल्पनेचे प्रारुप सादर करावे लागते. त्यातील 3-4 प्रारुपांपैकी एक प्रारुप निवडले जाते वा नवीन प्रारुप तयार करण्याच्या सूचना केल्या जातात. निवड समितीमधे चित्रपट, साहित्य, चित्रकला, स्थापत्य आदी विषयातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ असल्याने जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत चालणाऱ्या 10 ते 12 बैठकांमध्ये राज्यातर्फे आपल्या चित्ररथाबाबत बाजु मांडण्यासाठी वैचारिक वादावादी चर्चा होवून अखेर चित्ररथाची प्रतिकृती आणि चित्ररथासोबतच्या कलाकाविष्काराच्या सादरीकरणास मान्यता मिळते. येथूनच चित्ररथाच्या बांधणी व कला सादरीकरणाच्या तयारीला सुरुवात होते. त्यासाठी दिल्लीतील कॅन्टॉन्मेट भागातील राष्ट्रीय रंगशाळेच्या शिबीरात चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावाचे काम सुरु होते. 
संरक्षण मंत्रालयाकडून चित्ररथास अशी मिळते मान्यता

चित्ररथाची निवड करताना नाविन्यपूर्ण विषय, विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन, इशान्येकडील राज्य व जम्मू आणि काश्मिर राज्याला जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या राज्यातील कला संस्कृती देशबांधवांना कळावी आणि या राज्यांनाही आपण भारत देशाच्या टोकाच्या भागात असल्याने आपल्यावर अन्याय होतो, अशी भावना येऊ नये हा यामागील उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती सांगतात. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने राज्याला प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात पत्र पाठविण्यात येते. त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने 11 सदस्यीय समिती नेमण्यात येते. या समितीत संरक्षण मंत्रालयाचे सचिव आणि कला, दिग्दर्शन, स्थापत्य आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश असतो. राज्यांकडून एक ते दीड पानांचा चित्ररथासंबंधीत आलेख मागवला जातो. आपत्तीजनक संकल्पनांना कात्री लावली जाते तर काही संकल्पनांना सुधार करण्याचे निर्देश समितीकडून दिले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेतली जाते. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चित्ररथाच्या प्रतीकृतीला मान्यता दिली जाते. निवड समितीची शेवटची बैठक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाते. याचवेळी चित्ररथांची अंतिम निवड केली जाते. पथसंचलनाचा कालावधी बघता एकूण 22 चित्ररथ असावेत, याची काळजी घेतली जाते. यात देशातील एकूण 29 राज्यांपैकी 17 राज्यांचे चित्ररथ तर विविध केंद्रीय मंत्रालयाचे सहा चित्ररथ निवडले जातात. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे नव्यानेच निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याचा चित्ररथ आणि प्रथमच 23 चित्ररथ यावेळच्या पथसंचलनात आहेत. 
राष्ट्रीय रंगशाळा शिबीर

संरक्षण मंत्रालयाच्या दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट भागात भल्या मोठ्या मैदानावर चित्ररथाच्या बांधणीसाठी व कलाकारांच्या सरावासाठी राष्ट्रीय रंगशाळेची उभारणी करण्यात येऊन येथे 25 डिसेंबरपासूनच शिबीर आयोजित केले जाते. याठिकाणी कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी 2017 ला महाराष्ट्राच्या 40 कारागीरांचा चमू राज्याच्या चित्ररथाच्या बांधणीसाठी रंगशाळेत दाखल झाला. तर 6 जानेवारी 2017 पासून रायगड जिल्ह्यातील उरण येथील रुद्राक्ष ग्रुपच्या ३० कलाकारांच्या चमूने रंगशाळेत सरावाला सुरुवात केली. या शिबीरात अन्य राज्य व मंत्रालयाच्या चित्ररथ बांधणीसाठी व कला सादरीकरणासाठी 600 कलाकारांसह एकूण 1500 तांत्रिक अन्य सहायकांचा समावेश आहे.

राजपथावर महाराष्ट्राच्यावतीने प्रदर्शित झालेल्या चित्ररथावर एक दृष्टीक्षेप

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. 1993 ते 1995 असा सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाच्या मानासह बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य की, चित्ररथाची प्रतिकृती त्याची बांधणी आणि सादरीकरणासाठीचे कलाकार हे राज्यातूनच दिल्लीत पाठवले जातात. पहिला टप्पा अन्य राज्यांच्याबाबतीत तसे घडताना दिसत नाही म्हणूनच महाराष्ट्राचा चित्ररथ बहुतांशवेळा पुरस्कार विजेता ठरतो. राज्याच्या वतीने सर्वप्रथम 1971 मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ राजपथावर प्रदर्शित झाला. ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ या संकल्पनेवरील 1980 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकाविले होते. 1983 मधे राज्यातर्फे प्रदर्शित ‘बैल पोळा’ विषयावरील चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

1986 मध्ये ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास   द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. 1988 मध्ये राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ यास द्वितीय पारितोषिक मिळाले होते. ‘लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी 1993 ते 1995 असे सलग तीन वर्षे महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळवून दिले. 2007 मध्ये ‘जेजुरीचा खंडेराय’ या चित्ररथास तृतिय तर 2009 मध्ये ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. दर्जेदार चित्ररथाची हीच परंपरा कायम ठेवत 2015 मध्ये 'पंढरीची वारी' या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवत महाराष्ट्राची मुद्रा उमटवली आहे. यावर्षी ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ हा चित्ररथही महाराष्ट्राच्या चित्ररथांची गौरवशाली परंपरा कायम ठेवत प्रथम क्रमांकावर नाव कोरेल असा विश्वास आहे.

                                                                            दिनांक 28.01.2017                 
                 महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान  

 लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित`बाळ गंगाधर टिळकया महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्‍ते शनिवारी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिककार्य  संचालनालयाचे  उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

जळगावच्या निशा पाटीलच्या शौर्याचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

विविध क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राला थोर नररत्नांची परंपरा आहे. राज्यातील महापुरुषांनी गाजविलेल्या शौर्य गाथेने आपल्या देशाला सकारात्मक दिशा देण्याचं मोलाचं काम केलंय. शौर्याची हीच परंपरा राज्यातील नव्या पिढीनेही कायम ठेवली आहे. जळगांव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिच्या शौर्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ जानेवारी २०१७ रोजी तिचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याच्या शौर्याची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा होत आहे.

भारत देशाच्या वेग-वेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या ६ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून निशा पाटील हिची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली. निशा हिने सहा महिन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर काढत दाखविलेल्या साहसाची नोंद घेत तिची या पुरस्कारासाठी निवड झाली. १४ जानेवारी २०१५ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहिले. समोर घराला आग लागली आणि घरात लहानगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी घरात उडी घेतली.

घराच्या छताला आग लागलेली, पडद्यांनीही पेट घेतली आणि ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता निशाने लहानग्या पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मोठ्या मुलाला शाळेत पोहचविण्यासाठी गेलेली पूर्वीची आई, कौशल्या देशमुख परत आली तेव्हा घराला लागलेली आग आणि त्यातून सुखरूप बाहेर दिसलेली आपली लहानगी पाहून तिने निशाचे शतश: आभार मानले.

या प्रसंगानंतर गावात व परिसरात निशाच्या धाडसाचे व शौर्याचे कौतुक होत होते. भडगाव येथील निशा शिकत असलेल्या आदर्श कन्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी निशाच्या धाडसाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज केला. या अर्जासोबत उचित कागदपत्र आणि माहिती जोडली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत दिल्लीस्थित राष्ट्रीय बालकल्याण परिषदेकडे यासंबंधित पत्रव्यवहार केला. या कामी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळाली. परिणामी निशाची यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले. याचा आनंद निशाच्या शाळेत व पंचक्रोशीत साजरा करण्यात आला. या सर्व शुभेच्छा व आशीर्वाद घेऊन निशा ही थोरला भाऊ योगेश पाटीलसह राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभ आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाली.

सध्या निशा ही भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकत आहे. आठव्या वर्गात हिंदीच्या पुस्तकात ‘साहसी बालक’ या धड्यातून तिला साहसीकृत्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. निशाचे आई-वडील शेतकरी आहेत. निशाला दोन थोरले भाऊ असून भावंडामध्ये ती धाकटी आहे. ‘धावणे’ आणि ‘लांब उडी’ हे निशाचे आवडते खेळ आहेत आणि या खेळांमध्ये तिने तालुकास्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करण्याचे निशाचे ध्येय आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त बालक उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने निशाचा सम्मान झाला. मोठ्या शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेली निशा केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाली. ती सध्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात सामील झाली आहे. दिल्लीच्या वास्तव्यात निशाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून केवळ आपल्यातील धाडसाच्या जोरावर निशाने केलेले कार्य महाराष्ट्रासह देशवासियांना प्रेरणादायी असेच आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार

उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Monday, January 16, 2017

‘माझ्यातील शेफगिरी’ अशी ही आठवण

                                          
प्रसंग ऑफीसला जाण्याचा. घाईतच रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनवर आलो. सेक्युरीटी चेकसाठी मशीन मध्ये ऑफीसबॅग ठेवताच मागून आवाज आला अरे कैसे हो भाई , कहा ऑफीस निकले हो शायद, यार तुम्हारे हात की वह कटहल(फणस)की सब्जी आज भी याद आती है”.  हा एकेरी संवाद ऐकुण मी कुतुहलाने मागे पाहतो तोच ४ वर्षा पूर्वी एका ऑफीसमध्ये माझ्या सोबत काम करणारा माझा मित्र रामदिसला. अगदी ५ मिनटांच्या चालत्या -फिरत्या भेटीत आम्ही एक-मेकांची हाली खुशाली जाणून घेतली. मी ऑफीससाठी  मेट्रो घेतली तर राम त्याच्या आई आणि बहीणीला घेऊन मोतीनगरला गेला. आता मात्र ऑफीसला पोहचेपर्यंत मी फ्लॅश बॅक मध्ये गेलो. माझ्या शेफगिरीच्या मजेशीर गोष्टी आठवून मलाच माझ हसू आवरेणा आणि  माझा स्वाहभिमानही आपसूक दुनावला.
घरापासून  लांब असल्याने स्वयंपाक करण्याचे प्रसंग अनुभवने क्रमप्राप्त होते. अमरावतीला पत्रकारितेच शिक्षण घेण्यासाठी आलो तोच माझ्यातील शेफगिरीची परिक्षा सुरु झाली. रूम वर भांडयांची चण चण आणि त्यात पुरण पोळी करण्याची मला आलेली खुमखुमी हा प्रसंग मजेशीरचं. कुकर मध्ये हरब-याची डाळ शिजवली. पण, मिक्सर नसल्याने आता पुरण वाटावे(बारीक करणे) कसे ? हा प्रश्न पडला. मग काय  पातेल्यात शिजलेली हरब-याची डाळ घेतली आणि रवी घेऊन बारीक करण्याचा प्रयत्न केला.मात्र, अपयश आले काही केल्या डाळ बारिक होईना परिणामी पुरणाची पोळीच तयार होऊ शकली नाही. हे अपयश कमी होते तर काय नवीन प्रयोग म्हणून मित्रांना रोडगे(राज्याच्या काही भागात याला पानगे म्हणतात.) खाऊ घालण्याचा घाट रचला. रोडगे तयार करण्यासाठी जाडसर पिठाची आवश्यकता असते ते ही दळून आणले. आता गोव-या आणाव्या लागत होत्या , त्या पण आणून झाल्या. मात्र हे रोडगे शिजवताना जमीनीवर शिजवण्यासाठी आमच्या रूमच्या व्हरांडयात नुसती मातीदार जमीन नसल्याने (सर्वत्र फरसी पसरलेली) हा प्रयोगही अपयशी ठरला. पुढे  रोडग्यांना पर्याय म्हणून मी बिटटया हा प्रकार लिलया करायला लागलो आणि मित्रांना करून खाऊ घालू लागलो, आपसूकच त्यांच्याकडून शाबासकी मिळू लागली. पुढे पनीर नावाच्या प्रकारान माझ्या मनात गारुड घातल. मग काय प्रयोग सुरु. पालक पनीर करायला घेतले. पहीलाच प्रयोग अपयशी ठरला पण प्रयोगातून शिकलो आणि मी पालक पनीरकाजु करी या भाज्या बनवण्याच ब्रँड मिळवल. जवळच्या लोकांकडे गेलेा म्हणजे या भाज्या बनवण्याची फरमाईस मला यायला लागली. शिक्षण, स्ट्रगल आणि आवड जपण्याचा प्रांजळ प्रयत्न असा उत्तम ट्रँगल जुळून आला अमरावतीच्या वास्तव्यात.  
 पुढे  शिक्षणासाठी पुण्याला गेलो, इथे मात्र  मेसचं जेवण असल्यानं माझ्यातील शेफ पूर्णपणे शांत आणि निवांत होता. तेथून पुढे करीअरसाठी दिल्लीत आलो. इथे मेस प्रकार नव्हता आणि  दाल मखनी, दाल फ्राय, मटर पनीर, कढाई पनीर अशा भाज्या त्यात पडणारं बटर आणि भरीस भर म्हणून तंदूर रोटी (जी पचायला अवघड) त्यावर बटर यामुळे माझ्या जेवणाच तंत्रच बिघडून गेल होत. मग रूम शोधली आणि चांगल -चुंगल जेवण करण्यासाठी किचन सजवलं. पुन्हा माझ्यातील शेफगिरीला सुरुवात झाली. आता इथे टोमॅटोची चटणी,काजू करी, बैंगन भरता, सरसों का साग, अरबी  आणि  कटहल अशा भाज्या बनवण्यात मी मास्टरी मिळवली. ज्याला ज्याला जी भाजी आवडायची तो माझ्या भाज्यांचा फॅन होऊ लागला. लाडक्या वहीनीबाईंना करून खाऊ घातलेली सरसों का साग आणि मके की रोटी हा हिवाळयातील पंजाबींचा खास व्यंजन प्रकारही शाबाशी मिळवून गेला. ज्या ऑफीस मध्ये माझा मित्र राम होता तिथेच मुलींना मात्र माझ्या हातची टोमॅटोची चटणी आवडायची. त्या मुलींनी तर माझ्याकडून रेसिपी सुध्दा समजून घेतली होती. असा हा माझ्या शेफगिरीचा प्रवास लग्ना नंतर जवळपास थांबलाच. आता मी फार क्वचीत किचन मध्ये जातो , इनफॅक्ट माझी अर्धांगिनीच मला किचनमध्ये काही बनवण्याची परवानगी देत नाही. पण, तरीही तिला बर नसल किंवा मलाच काही बनवण्याच मुड झाल तर मी बनवतो काहीही आणि आता माझी अर्धांगिनीही मला शाबासकी देते. अशा रितीने माझ्या शेफगिरीच्या प्रवासात मी घडत गेलो आणि मला शाबसकी देणारे अस्सल खवय्ये व शेफची पारख असणारे बदलत गेले. But frankly speaking I still love preparing food for a change. आणि तुम्ही मनापासून जेवनं बनवलं तर ते उत्तमच बनते हा माझा अनुभव इथे नमूद करून थांबतो.
                                                        ******   

Friday, October 28, 2016

मातीशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा : वृषाली हटाळकर

                                                                  
नवी दिल्ली दि. 21 : ग्रामीण माती-संस्कृतीशी जुळलेली भूमिका करण्याची भावना अभिनेत्री वृषाली हटाळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केली .   
         केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सादरीकरणासाठी आलेल्या वृषाली हटाळकर यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी या भावना व्यक्त केल्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी वृषाली हटाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच, नृत्यांगना रोशनी उर्फ सविता म्हात्रे, लावणी सम्राट ग्रुपचे प्रमुख प्रमोद कोंदळकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार विनीत वाही  यावेळी उपस्थित होते.   
              वृषाली हटाळकर यांनी दूरशर्नच्या सहयाद्री वाहीनीवरील दामीनी या नाटकातून अभिनयाला सुरुवात झाली. त्यानंतर मी माझ्या मुलांचा, वाटा-पळवाटा आणि बरसात या नाटकात प्रमुख भूमिका केल्या. तो येतो, अब्राहम, लग्नाची वरात लंडणच्या घरात, डम-डम डिगा डिगा अशा नऊ मराठी चित्रपटात काम केले असून सहा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शिवाय तेलगू, पंजाबी, भोजपूरीसह दक्षिणेतील  चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीयो अल्बम आणि जाहीरातीही केल्या. ग्रामीण भागातून संघर्ष करून आपण अभिनय क्षेत्रात पुढे आलो असल्याने ग्रामीण माती-संस्कृती यांच्याशी जुळलेली भूमिका करण्याची इच्छा असल्याचे वृषाली हटाळकर म्हणाल्या. 
            जीवन हेच एक पुस्तक असून माणस वाचनातून मी घडत गेल्याचे हटाळकर सांगतात.  हाच, अनुभव गाठीशी घेऊन अभिनयालाही धार आली. लग्नानंतर आपली कारकीर्द बहरल्याचे त्या अभिमानाने सांगतात.  लग्नानंतर तेलगू, पंजाबी, भोजपुरी, शिंदी आणि मराठी अशा भाषांमधे नामवंत कलाकारांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नृत्य आणि गायनातही हटाळकर प्रवीण आहेत. अभिनयाच्या विविध प्रातांमध्ये अजून मोठी भरारी घ्यायची आहे त्यासाठी नवनवीन गोष्टी शिकतेय असेही वृषाली हटाळकर म्हणाल्या.  

                                                   0000000 

आदिवासी भागांच्या विकासासाठी‘श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशन’


देशातील आदिवासी भागांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध  करून देत आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाअंतर्गत श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूर्बन मिशनही योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशात येत्या तीन वर्षात ३०० क्लस्टर उभारण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे पैकी  विविध राज्यांमध्ये १०० क्लस्टर उभारण्यात येणार आहे.योजनेच्या पहिल्या टप्यात विविध चाचण्यांनंतर  ८ राज्यातील १२ आदिवासी क्लस्टर विकसीत करण्याची अंमलबजावणी सूरू झाली आहे. महाराष्ट्रातून जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगरची निवड या क्लस्टरसाठी करण्यात आली आहे. 
आदिवासीबांधव हे मुळात उत्तम कलागुणी असतात त्यांच्यातील कला विकसीत करण्यासाठी कौशल्य वृध्दी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, प्रत्येक घरात स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देणे, २४ तास स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्येक घरात स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, शाळांच्या उत्तम इमारतींचे बांधकाम करणे, आदिवासी गावांमध्ये दुग्धव्यवसायांप्रमाणे अन्य शेतीपूरक व्यवसाय विकसीत करणे, या भागात मोबाईल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागांतील गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी सडकांचे जाळे उभारणे , आदिवासी गांवाना शासन व जगाशी जोडण्यासाठी येथे ई ग्राम केंद्र उभारणे आदिंची अंमलबजावणी या कार्यक्रमांतर्गंत करण्यात येणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगढ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्यामा प्रसाद मुखर्जी नॅशनल रूरर्बन मिशनची सुरुवात झाली.
  २०११ च्या जनगनणेनुसार देशात एकूण ६६१ जिल्हे असून या योजनेसाठी यातील आदिवासीबहूल लोकसंख्येच्या १०० जिल्हयांची निवड करण्यात आली. आदिवासी बहूल १६ राज्यांतील या १०० जिल्हयांमधे उप विभाग करण्यात आले असून आदिवासी गावांची निवड करण्यासाठीएकात्मीक क्लस्टर कृती आराखडाआखण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी तीन स्तरांवर मुल्यांकन करण्यात येऊन आदिवासी गावांची निवड करण्यात येते. थोडयाफार फरकाने इतर आदिवासीगावांपेक्षा पुढारलेल्या आदिवासी गावांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यांचे मुख्य सचिव हे संबंधित राज्यातील मुख्य  निरीक्षक आहेत. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्यावतीने  २ वरिष्ठ अधिका-यांच्या देखरेखीत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी १५ कोटींचा निधी देण्यात येत आहे. एकुणातील ७० टक्के निधी हा केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यक्रमांतून उभारण्यात येत आहे.तर उर्वरित ३० टक्के निधी हा केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या क्रिटीकल गॅप फंडींगमधून देण्यात येत आहेत. आतापर्यंत केंद्राने या योजनेसाठी २०६ कोटींचा निधी वितरीत केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्या-त्या राज्यांनी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांकडे आग्रह केला आहे. तसेच विविध उद्योग समुहांनीही सीएसआरच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
(दिल्ली येथील प्रगती मैदानमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने दिनांक २६ते२८ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत आयोजित राष्ट्रीय आदिवासी कार्निव्हलमध्ये वार्तांकनासाठी गेलो असता, नॅशनल रुर्बन मिशन आणि आदिवासी विकास या विषयावर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या उपसचिव रेखा चौहान यांचे सादरीकरण आवडले त्यातील काही मुद्दे टिपले होते त्यावर आधारीत हा लेख.)

                                                ००००००



Friday, October 7, 2016

यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर भर द्या- कलावंत मनोज जोशी

नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे हस्ते राष्ट्रपती भवनात नुकतेच एका देखण्या सोहळ्यात वितरण झाले. रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जन्मलेले आणि मराठी, गुजराती व हिंदी रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन व लेखनाने आपली अमीट छाप सोडून नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारावर नाव कोरणारे प्रसिद्ध कलावंत मनोज जोशी यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मनोज जोशी यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेला नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांवरील प्रवास. खास नेट भेटच्या वाचकांसाठी. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रातील देशात सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन ! त्याला जोडूनच प्रश्न, हा पुरस्कार मिळाल्यावर आपल्या काय भावना आहेत?उत्तर : मी ज्या क्षेत्रात कामाचा पाया घातला त्याच क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा अतीव आनंद आहे. हा पुरस्कार रंगदेवतेचा प्रसाद असून मी यास रंगभूमीवरील माझ्या कामाची खऱ्या अर्थाने सुरुवात मानतो. नाटक ही साधना आहे, त्याला अंत नाही. मला अजून रंगभूमीवर खूप काम करायचे आहे. मला नाट्य क्षेत्रातील कामासाठी सदैव प्रोत्साहन देणारे माझे आई–वडिल आणि अगदी पहिल्या नाटका पासून आतापर्यंत मला साथ देणारे बॅक स्टेज आर्टीस्ट, सहकलाकार, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ कलाकार आणि माझ्यावर प्रेम करणारे दर्शक अशा सर्वांचा हा पुरस्कार असल्याचे मला वाटते त्यांच्या सहकार्याने आणि माझ्या प्रामाणीक प्रयत्नांमुळेच मी हे यश संपादन करू शकलो.

प्रश्न : आपण अभिनयाकडे कसे वळलात? आणि आपल्या पहिल्या नाटका विषयी जाणून घ्यायला आवडेल ! 
उत्तर : माझे कला क्षेत्रातील शिक्षण कोठे झाले हा तुमच्याकडून प्रश्न येण्याआधीच सांगतो की, मी NSD अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चा विद्यार्थी आहे. म्हणजे मी नैसर्गीक रित्या अभिनय शिकलो. नाट्य क्षेत्रात देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था म्हणून ख्याती असणारी दिल्लीतील एनएसडी म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयात मी प्रशिक्षण घेतलेले नाही. माझे वडील ह.भ.प. नवनीत महाराज जोशी हे प्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार आहेत. नारदीय किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत सांस्कृतिक पूल बांधण्याचे काम केले. वडीलांच्या किर्तनाला जायचो. किर्तन म्हणजे अभिनय, गायन आणि वक्तृत्व यांचा संगम. वडीलांच्या किर्तन सादरीकरणातूनच मला अभिनयाचे धडे मिळाले. वयाच्या ५ व्या वर्षी मी सर्वप्रथम शाळेत अभिनय केला तोच अभिनयाचा श्री गणेशा. गुजराती नाटक ‘ताक धिना धिन’(१९८६) हे माझ पहीलं नाटक. तर विवेक लागू दिग्दर्शीत ‘सर्वस्वी तूझीच’ (१९९५) हे माझ मराठीतील पहिल नाटक.

प्रश्न : ‘चाणक्य’ ही चरित्रभूमिका तुमच्या नावाला जुडली आहे. चाणक्य आणि मनोज जोशी हे रंगभूमीवरील समीकरण या विषयी काय सांगाल ?उत्तर : ‘चाणक्य’ या नाटकाची मध्यवर्ती भूमिका चाणक्याची असून मी ही भूमिका साकारली आहे. दर्शक, समीक्षक यांनी या भूमिकेसाठी माझे तोंडभरून कौतुक केले. वर्ष १९८६ मध्ये चाणक्य नाटक लिहायला घेतलं. त्यातील विविध साजेशे बदल त्याला जोडून अन्य बाबी अशी सर्व तयारी करून १९९० मध्ये ‘चाणक्य’ हे नाटक आम्ही गुजरातीत सुरु केलं. १९९६ पासून या नाटकांचे हिंदीत प्रयोग सुरु झाले. नाटकाचे दिग्दर्शन मी स्वत: केले आहे. आजपर्यंत या नाटकाचे ९९६ प्रयोग झाले आहेत. संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानंतर अकादमीच्यावतीने ललीत कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते व पुरस्कार प्राप्त कलाकार यात आपले सादरीकरण करतात. दिनांक ७ ऑक्टोबर २०१६ रोजी दिल्लीतील राष्ट्रीय नाटय विद्यालयात या नाटकाचा ९९७ वा प्रयोग असणार आहे. लवकरच आम्ही या नाटकाचा हजारावा प्रयोग करणार आहोत याचा अत्यंत आनंद आहे. 

प्रश्न : मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणी वरील मालिकांमधील आपल्या योगदानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल !उत्तर : मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर मी १७ नाटकांमध्ये भूमीका साकारल्या आहेत. मराठी नाटकांमध्ये ‘सर्वस्वी तूझी’, गुजरातीमध्ये ‘सुर्यवंशी’, ‘गांधी विरूध्द गांधी’ आणि हिंदी मध्ये ‘गोल माल प्यार’, ‘रंगीला’ ही नाटक सांगता येतील. माझ्या चित्रपट कारकिर्दीला १९९० पासून सुरूवात झाली असून हिंदी, मराठी, गुजराती आणि पंजाबी अशा एकूण १०२ चित्रपटांमध्ये मी भूमीका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये ‘सरफरोश’, ‘देवदास’, ‘हंगामा’, ‘गोलमाल’, ‘भागमभाग’ ‘‘फिर हेरा फेरी’, ‘चूप चूपके’ तर मराठीमध्ये ‘बालगंधर्व’ , ‘नारबाची वाडी’, ‘यलो’ असे चित्रपट सांगता येतील. माझी पहिली दूरचित्रवाणीवरील मालिका ही मराठी आहे. ‘राऊ’ या मालीकेतून माझे पदार्पण झाले. त्यानंतर ‘आभाळमाया’, ‘बंदीनी’, ‘दामीनी’, ‘आकाश पेलताना’, ‘झुंज’, ‘होणार सून मी या घरची’ अशा मराठी मालींकामध्ये काम केले. ‘माँ’, ‘एक महल हो संपनों का’, ‘जानेमन जानेमन’ आदी हिंदी दूरचित्रवाणीवरील मालीका सांगता येतील. 

प्रश्न: हल्ली सारखी एक ओरड असते की, नाटकाला वाईट दिवस आलेत. यावर आपलं मत काय ?
उत्तर : नाही, मी याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. भारतातील जनतेच्या धमण्यांमध्ये कला भिनली आहे. त्यांना उत्तम नाटक हवे आहेत. नाटक करण्याची प्रवृत्ती आणि ती स्वीकारण्याची वृत्ती वाढण्याची गरज असल्याचे मला प्राणाणीकपणे वाटते. भारताच्या कोणत्याही राज्यात गेलात तर तेथील मंदीरांमध्ये चितारण्यात आलेल्या चित्रांमध्ये आपल्याला कलेचा उत्तम नमूना सापडतो. तर माणसाच्या दैनंदिन जगण्यात नाटक असते त्यामुळे नाटकाला मरण नाही. नाटकाचे प्रयोग सादर करण्याची प्रवृत्ती मात्र वाढली पाहीजे त्याने हे क्षेत्र आणखी विकसीत होईल. यापुढे जावून मी सांगेन की, प्रत्येक राज्यांनी आपल्या शालेय अभ्यासक्रमात नाटक हा विषय समाविष्ट करावा.प्रत्येक राज्याची लोककला जीवंत राहण्यास याची मदत होईल. काही प्रसंगी शालेय अभ्यासक्रमातील इतिहासासारखा विषय नाटकाच्या आधारे शिकवल्यास विद्यार्थ्यांना हा विषय रोचक वाटेल आणि चटकन समजेल. 

प्रश्न : भारतीय रंगभूमीवर गाजलेले स्वर्गीय विजय तेंडूलकर लिखीत ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आपण हिंदीत अनुवादीत करून गुजराती रंगभूमीवर आणलं. या प्रयोगाबद्दल काय सांगाल ?उत्तर : स्वर्गीय विजय तेंडूलकर यांच्या लेखनीतून साकारलेले आणि श्रध्देय भास्कर चंदावरकर यांच्या दिग्दर्शनाने मराठीसह भारतीय रंगभूमीवर गाजलेलं घाशीराम केातवाल हे नाटक गुजराती रंगभूमीवर आणण्याचा अवघड प्रयोग मी यशस्वीपणे करू शकलो. याचं सर्वस्तरातून कौतुक झाल. मी स्वत: या नाटकाचा गुजराती अनुवाद केला. हे नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करताना मराठी कलाकार आणि त्यांच्या तोंडी गुजराती संवाद असल्याने नाटक उत्तम झाले. भास्कर चंदावरकरांनी या नाटकासाठी वापरलेले मीटर मी गुजरातीमध्येही तंतोतंत वापरले त्यामुळे ही उत्तम कलाकृती ठरली. 

प्रश्न : ‘राऊ’ ही मराठीतील मालीका, दूरचित्रवाणीवरील तूमची पहिली मालिका ठरली त्या विषयी काय आठवणी आहेत?
उत्तर : त्यावेळी मी रंगभूमीवर नाटकांमध्ये काम करायचो. एक दिवस अचानक स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर हे दिग्दर्शक निर्माते द्वय माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की या नाटकातील बाजीराव पेशवेंच्या मुख्य पात्रसाठी आम्ही तुझी निवड केली आहे. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. या दोघांनी मला ‘राऊ’ कांदबरीचे लेखक ना.स.इनामदार यांच्याकडे नेलं. ते म्हणाले अरे हा तर हुबेहूब बाजीराव शोभतो. आणि इथूनच नाटकाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या नाटकाच्या माध्यमातून मी पहील्यांदा कॅमेरा फेस केला. सतत २६ दिवस चित्रीकरण चाललं या दरम्यान संजय सुरकर मला सारखे सीन समजून सांगत असत. मी अभिमानाने सांगतो की, स्मीता तळवलकर आणि संजय सूरकर यांच्या मुळेच दूरचित्रवाणी वरील मालीका आणि चित्रपटाचां माझा पाया रचला गेला.

प्रश्न : सध्या कोणकोणती नाटक, चित्रपट व मालिकांवर काम सुरु आहे ?
उत्तर : मी सध्या रंगभूमीवर चाणक्य या नाटकांच्या प्रयोगात व्यस्त आहे. ‘१५ ऑगस्ट भागीले २६ जानेवारी’ आणि आणखी एका मराठी चित्रपटात मी भूमिका करीत आहे त्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यासोबतच एका हिंदी आणि गुजराती चित्रपटाचेही चित्रीकरण सुरु आहे, येत्या डिसेंबर महिन्याअखेर या सर्व प्रकल्पांवरील काम संपेल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न : नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांना आपण काय संदेश द्याल?
उत्तर : सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि संयम या त्रिसुत्रीवर मी या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवू शकलो. नवोदितांनीही याचं त्रिसुत्रीचा अवलंब करून पुढे जावे असा सल्ला देईन व या कामी त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. 

आपण अतिशय व्यग्रतेतून बहुमोल वेळ दिला त्यासाठी धन्यवाद ! आपल्याकडून रंगभूमीची अशीच सेवा घडत राहो व या क्षेत्रात आपण आणखी उत्तमोत्तम काम करीत राहोत या सदिच्छा. 

-रितेश मोतीरामजी भुयार,
उपसंपादक, 
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.