नवी दिल्ली : महाराष्ट्रातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती तसेच राज्याने विविध क्षेत्रात केलेला विकास महाराष्ट्र दालनात मांडण्यात आला आहे. भारत पर्वची अपेक्षित संकल्पनाच येथे प्रत्यक्ष बघायला मिळाली, अशी भावना संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
डॉ.भामरे यांनी ‘भारत पर्व’ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनास भेट दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दिल्लीतील प्रतिनिधी सुनिल कुगिंरी यांनी डॉ. भामरे यांचे स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने येथील राजपथ लॉनवर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेणारे आणि देश विकासात राज्याचे योगदान दर्शविणाऱ्या डिजीटल दालनास डॉ. भामरे यांनी भेट दिली. याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार त्यांनी काढले. तसेच राज्यातील क्रांतीकारक, समाजसुधारक आणि थोर महापुरुषांची माहिती आकर्षक पद्धतीने येथे मांडण्यात आली आहे. यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील जनतेला महाराष्ट्रातील थोर पुरुषांची माहिती मिळते. देशातील विविध राज्यांचा गौरवपूर्ण इतिहास व महापुरुषांचे योगदान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश भारत पर्व या प्रदर्शनाचा असून महाराष्ट्र दालनात ही संकल्पना प्रत्यक्षात मांडण्यात आली आहे. याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.
येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील हस्तकला दालनासही डॉ.भामरे यांनी भेट दिली. राज्यातील लघु उद्योजकांच्या पैठणी साड्या, वारली पेटींग, लाखेच्या बांगड्या, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे प्रदर्शनास व विक्रीस मांडण्यात आल्या आहेत. डॉ. भामरे यांनी या दालनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन लघु उद्योजकांशी संवाद साधला व त्यांची आस्थेने चौकशी केली.
महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाचे कौतुक
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी महाराष्ट्र दालनातील महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंकाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जून पाहणी केली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी डॉ. भामरे यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य अंक भेट स्वरूपात दिले. डॉ.भामरे यांनी यावेळी महाराष्ट्र फूड स्टॉलला भेट देऊन मिसळ-पावचा आस्वाद घेतला.
नवी दिल्ली : ‘भारत पर्व’मध्ये महाराष्ट्राच्या लघु उद्योजकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती, हस्तकला दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपल्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या आहेत. महाराष्ट्र दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून लघु उद्योजकांच्या हस्तकलेचे प्रदर्शन व विक्री येथे सुरु आहे. राज्यातील लघु उद्योजकांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उद्योजकांच्या वस्तूचीं मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याबद्दल ते समाधान व्यक्त करीत आहेत. प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनात गर्दी केली आहे.
पैठणीसह अन्य साड्या येथे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. याविषयी राज्याच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे हस्तकलाकार जितेंद्र परदेशी सांगतात, पैठणीसह महाराष्ट्रातील साड्यांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून या प्रदर्शनामध्ये राज्य शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाने आम्हाला सहभागाची संधी दिली आहे. महाराष्ट्र दालनास भेट देणाऱ्या महिलांची पुणेरी कॉटन साडीला विशेष मागणी आहे. साडीची रंगसंगती, रचना उत्तम असल्याने आणि ही साडी परिधान करण्यास खूपच सोयीची असल्याने ही साडी महिलांना पसंत पडत आहे. दिल्लीतील प्रदर्शनात सहभागी होताना आम्ही येथील बाजारपेठेचे आणि महिलांच्या आवडी-निवडीचा आधी अभ्यास करून सज्जतेने या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.
सोलापूरचे लघु उद्योजक राजेंद्र अंकम गेल्या 36 वर्षांपासून विणकर क्षेत्रात आहेत. महाराष्ट्र दालनात त्यांनी वॉल हॅकिंगच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीस ठेवल्या आहेत. कटवर्क, बॅग, पोट्रेट, सुतापासून तयार केलेली विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींची तयार केलेली व्यक्तीचित्रे येथे आहेत. श्री.अंकम महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाशी गेल्या सात वर्षांपासून जुळले असून प्रगती मैदान, दिल्ली हाटनंतर आता राजपथवर आपल्या वस्तूंची प्रदर्शन व विक्री करत आहेत. याठिकाणी आपल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाल्याबद्दल ते समाधानी आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे महमद इकबाल लखेरा आणि अफझल जावेद लखेरा यांचा लाखेच्या बांगड्यांचा व्यवसाय आहे. त्यांनीही महाराष्ट्र दालनात वैविध्यपूर्ण बांगड्या प्रदर्शन व विक्रीसाठी महाराष्ट्र दालनात ठेवल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. घरातील महिलाही या व्यवसायात मदत करीत असल्याचे ते सांगतात. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडाळाशी ते मागील वर्षी जुळले आहेत. पहिल्यांदाच ते दिल्लीतील प्रदर्शनात भाग घेत आहेत. त्यांना येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत असल्यामुळे ते आनंद व्यक्त करत आहेत. या प्रदर्शनाच्या उर्वरित दिवसात मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रगती मैदान आणि दिल्ली हाट येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बानगे येथील लघु उद्योजक राजेंद्र शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणांचा स्टॉल येथे आहे. गणतंत्र दिवसाचे पथसंचलन ज्या राजपथावर होते आणि प्रत्येक भारतीयांचे मन स्वाभिमानाने भरुन येते. तेथे कोल्हापुरी चप्पल विक्री व प्रदर्शन करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणतात. कोल्हापुरी चप्पलला प्रचंड मागणी असून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट व दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून कोल्हापुरी चप्पलची माहिती ग्राहकांना मिळाली असल्याचे ते सांगतात. याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे येथील त्यांचे गुरु आनंदा रावण त्यांच्यासोबत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या मोखाळा तालुक्यातील वासाळा येथील लघु उद्योजक विठ्ठल डगळ यांच्या वारली पेंटिंगचा स्टॉल येथे बघायला मिळतो. गेल्या चार वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाशी गेल्या दोन वर्षांपासून ते जोडले गेले आहेत. याआधी दिल्ली हाट येथे त्यांनी प्रदर्शनात भाग घेतला व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. राजपथावरील ‘भारत पर्व’ या प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. डगळ सांगतात.
नवी दिल्ली : ‘भारत पर्व’ मध्ये महाराष्ट्र दालनास पर्यटक व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात महाराष्ट्राच्या दालनास 15 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटीग, पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या आदी महाराष्ट्रातील हस्तकलांना दिल्लीत येणारे पर्यटक व दिल्लीकर ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी व सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे दिल्लीकर आणि दिल्लीस येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी ‘भारत पर्व’ प्रदर्शनास बघायला मिळाली. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा तिसरा दिवस असून प्रदर्शनास भेट देणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास गर्दी केली. इथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने राज्यातील लघुउद्योजक व हस्तकलाकारांच्या कामांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. पुणेरी कॉटन साडी, लाखेच्या बांगड्या, वारली पेंटीग आणि कोल्हापुरी चप्पल स्टॉलवर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचे चित्र होते.
केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्ह्याच्या दूरस्थ शिक्षण समन्वयक डॉ.रेणू सांगतात, त्यांना पुणेरी पॅटर्नची कॉटन साडी फार आवडली. त्या सध्या दिल्लीत फिरायला आल्या असून भारत पर्व प्रदर्शनीत त्यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनास भेट दिली. या दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या पैठणीसह राज्यातील साड्यांचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. डॉ.रेणु सांगतात, ‘पुणेरी पॅटर्न कॉटन साडीची रंग संगती आणि रचना उत्तम असल्याने ही साडी आवडली म्हणूनच मी ही साडी खरेदी केली. महाराष्ट्राच्या साड्यांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत असून महाराष्ट्र दालनात प्रत्यक्ष खरेदीची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील आर.के.पुरम भागातील रहिवाशी लता पाराशर यांनी मोठ्या प्रमाणात लाखेच्या बांगड्या खरेदी केल्या. त्यांच्या सोबत त्यांच्या अन्य तीन मैत्रिणींनीही बांगड्या घेतल्या. श्रीमती पाराशर म्हणाल्या, लाखाच्या बांगड्यांची गुणवत्ता भावली. उत्तम रंग, कलाकुसर आणि परवडणारी किंमत यामुळे या बांगड्या आम्ही सर्व मैत्रिनींनी विकत घेतल्या आणि आमच्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्यासाठीही या बांगड्यांची विशेष खरेदी करुन घेतली. भारत पर्वच्या निमित्ताने विविध राज्यांच्या कलावस्तु खरेदी करायला मिळत आहे त्यात महाराष्ट्रातील हस्तकला आम्हाला विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील उत्तमनगर येथे राहणारे अमरप्रकाश जोशी यांनी कोल्हापूरी चप्पल खेरदी केली. हिंदी चित्रपटामधून मला कोल्हापूरी चप्पलची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरी चप्पलबाबत माझ्या वाचनातही आले होते. आज महाराष्ट्र दालनात कोल्हापूरी चप्पल खरेदी करण्याची संधी मिळाली त्याचा आनंद असल्याचे ओमप्रकाश सांगतात.
नवी दिल्ली : “भारत पर्व” मध्ये दिल्लीतील मराठी भाषिकांनी महाराष्ट्र दालनाला भेट देण्यासाठी आज एकच गर्दी केली. दालनातील विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून ते आपल्या मुलांना महाराष्ट्राची ओळख करून देत असल्याचे चित्र आज दिसून आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर देशाचा गौरपूर्ण इतिहास व वैविद्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस असून महाराष्ट्राच्या दालनांना प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रापासून दूर दिल्लीत नौकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र दालन आकर्षण ठरत आहे. आपल्या मुलांना महाराष्ट्राचे दर्शन घडविण्यासाठी त्यांची एकच गर्दी येथे बघायला मिळाली.
महाराष्ट्र दालनात ताडोबा जंगलात फिरणारा वाघ एल.ए.डी वॉलवर बघून हितेश राजपाल हे रिध्दीमा या आपल्या मुलीला व त्रिशय या मुलाला सांगतात, “हा ताडेाबा जंगलातील वाघ आहे. या सोबतच ते ताडोबा जंगलाविषयी माहिती देतात. दालनात पुढे, ‘फेस रिकगनेशन स्क्रीन’समोर आल्यावर या मुलांना मराठमोळा फेटा, पुणेरी पगडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिधान करून देतात आणि त्याचे महत्त्व समजावून सांगतात. पुढे येथे ठेवण्यात आलेल्या “पझल गेम” द्वारे लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची चित्र जोडून या महापुरुषांची माहिती देतात तसेच, येथे लावण्यात आलेल्या दुसऱ्या एका स्क्रीनसमोर उभे राहून “व्हर्च्युयल टुरिझम”च्या माध्यमातून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन, गणपती पुळे व तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील सफर घडवतात आणि आपल्या मुलांना महाराष्ट्राची माहिती देतात.
हितेश राजपाल हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी असून सध्या दिल्लीत विदेश मंत्रालयात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. “महाराष्ट्र दालनाला भेट दिल्यानंतर महाराष्ट्रात आल्याचा अनुभव मिळत असल्याचे” ते सांगतात. या दालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन घडविण्यात आलेले महाराष्ट्राचे दर्शन आमच्या मुलांसाठी दिल्लीत महाराष्ट्र बघण्याची मोठी पर्वणी असल्याचे त्यांनी सांगितले.
महेश पाटील हे मुळचे औरंगाबादचे रहिवासी असून सध्या दिल्ली पोलीसच्या विशेष तपास शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी आपली मुलगी आकृती आणि मुलगा ऋषी यांना महाराष्ट्र दालन दाखवायला आणले आणि महाराष्ट्राचे दर्शन घडवीले. महाराष्ट्राबद्दल मुलांना जास्तीत-जास्त माहिती देऊन महाराष्ट्राविषयीची जिज्ञासा पूर्ण करण्याची संधीच मला या माध्यमातून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांना महाराष्ट्रीयन व्यजंनाची चवही चाखायला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरचे निलेश देशमुख हे सध्या दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दी विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आपला मुलगा कार्तिक याला महाराष्ट्र दालन दाखवून त्याचा आवडता प्राणी वाघ दाखवला. निलेश देशमुख सांगतात,“कार्तिकला ताडोबा जंगल बघण्याची आंतरिक इच्छा होती आणि आज त्याला इथे प्रत्यक्ष ताडोबातील वाघासोबत खेळाता आले. महाराष्ट्रापासून लांब असलो तरी “भारत पर्व” तील महाराष्ट्र दालनात प्रदर्शीत करण्यात आलेल्या विविध उप्रकमाद्वारे माझ्या प्रमाणेच इतर पालकांना आपल्या मुलांना महाराष्ट्राची सैर घडविण्याचा आनंद मिळत असल्याची भावना श्री देशमुख व्यक्त करतात.
नवी दिल्ली : देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे प्रसिध्द व्यंजन पुरण पोळी आणि मराठीबाणा दर्शविणारी पुणेरी पगडी येथे येणाऱ्यांचे आकर्षण ठरले. राज्याच्या विकासाची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड व लोकराज्यला तरूणांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
भारत देशाच्या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दालनांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे तीन दालने या ठिकाणी आहेत. पहिल्याच दिवशी जवळपास ३ हजार प्रेक्षकांनी या दालनांना भेट दिली. पुरण पोळी, पुणेरी पगडी प्रेक्षकांचे आकर्षण ठरले तर राज्य शासनाचे मुखपत्र महाराष्ट्र अहेड आणि लोकराज्य ला तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
येथे देशाच्या विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचे दालन उभारण्यात आले असून महाराष्ट्राच्या खाद्य दालनाला भेट देणाऱ्या खवय्यांसाठी पुरण पोळी महत्वादाचे आकर्षण ठरले आहे. या स्टॉलवर पुरण पोळीचा आस्वाद घेणारे, मुळचे उत्तर प्रदेशातील अलाहबादचे आणि दिल्लीत नोकरी करणारे अम्बरीश श्रीवास्तव सांगतात, ‘शिक्षणासाठी पुण्याला असताना मी पुरण पोळीचा आस्वाद घेतला होता. भारत पर्व प्रदर्शात महाराष्ट्राच्या स्टॉलवर दिल्लीत पुरण पोळी खाण्याचा आनंद मनाला सुखावून गेला’. श्रीवास्तव पुढे सांगतात, माझ्यामते पुरण पोळी ही देशातील सर्वोतम ‘स्वीट डीश’ आहे.
महाराष्ट्र राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणाऱ्या डिजिटल दालनाला भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यात शालेय मुलांचे आकर्षण ठरत आहे, एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून परिधान करण्यात येणारी पुणेरी पगडी.
दिल्लीला लागूनच असणाऱ्या उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील कौशांबी येथील ८ वीत शिकणारा माहित गुप्ता म्हणतो, एलइडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालून मला खूप आंनद झाला. मी, पहिल्यांदाच असा प्रयोग बघितला. मला इतिहासात आवड आहे. लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालत असल्याचे मी अभ्यासले आहे. महाराष्ट्र दालनात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणेरी पगडी घालण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे माहित सांगतो. ब्लु टूथच्या माध्यमातून पुणेरी पगडी परिधान केलेला फोटो माहित ने आपल्या मोबाईलमधे घेतला त्याचाही त्याला खूप आनंद झाला.
महाराष्ट्र शासनाच्या विकास कामांची व विविध योजनांची माहिती देणारे शासनाचे मुखपत्र ‘महाराष्ट्र अहेड’ आणि ‘लोकराज्य’ला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुळचा बिहार मधील भागलपूरचा महंमद आफताब आलम, सध्या दिल्लीत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत आहे. आफताब सांगतो, ‘महाराष्ट्र अहेड’ मधून महाराष्ट्राची इंतभूत माहिती मिळते आणि राज्याच्या विकास कामांची माहिती मिळते त्यामुळे माझ्या प्रमाणेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्यासांठी हे मासिक खूपच उपयुक्त आहे. दिनांक १८ ऑगस्ट पर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंत ‘भारत पर्व’ ला भेट देता येणार आहे.
नवी दिल्ली : देशाच्या प्रगतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनास शुक्रवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. १७ राज्यांनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्राने आपल्या जडण घडणीचे दर्शन या प्रदर्शनात घडविले आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने येथील राजपथावरील लॉन वर दिनांक १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत देशाचा गौरपूर्ण इतिहास दर्शविणाऱ्या ‘भारत पर्व’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. केंद्रीय नगर विकास, माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा, माहिती व प्रसारण मंत्री राज्यमंत्री राजवर्धन सिंह यावेळी उपस्थित होते.
विविध हस्तकला, खाद्य पदार्थ आणि विविध क्षेत्रातील उपलब्धी दर्शविणारी राज्यांची दालने याठिकाणी आहेत. महाराष्ट्राची तीन दालने या ठिकाणी आहेत. राज्याचा विविध क्षेत्रातील विकास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे डिजीटल दालन लक्ष वेधून घेते. या ठिकाणी ‘मेकइन महाराष्ट्रा’च्या माध्यमातून राज्यात झालेली गुंतवणूक व विकास हे आकर्षक पॅनलच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे. महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकांचे देश विकासातील योगदान, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासह लोकमान्य टिळक आणि स्वातंतत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कला, संस्कृती आदींमध्ये राज्याचे योगदान दर्शविणारे आकर्षक पॅनल येथे आहेत.
डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सफर
दालनात शिरताच मोठी एलइडी दिसते. ‘व्हर्च्युअल टुरीजम’च्या माध्यमातून शिर्डी येथील साई बाबा मंदीर, बीबी का मखबरा, अंजीठा-वेरूळ लेण्या आणि तारकर्ली समुद्र किनाऱ्याची सफर येथे भेट देणाऱ्यांना करण्यास मिळते. अन्य एका एलइडीवर ‘फेस रिकग्नेशन तंत्रज्ञाना’च्या माध्यमातून पुणेरी पगडी, महाराष्ट्राचा फेटा परिधान करण्याचा आनंद घेता येतो . विशेष म्हणजे याची छायाचित्रे ब्लूटूथ व वायफायच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या मोबाईलमध्ये घेण्याची सोय करून देण्यात आली आहे. उभी स्क्रीन उभारून चित्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लोकमान्य टिळक, छत्रपती शाहू महाराज आदी महा पुरूषांचे चित्र देण्यात आले आहेत. ‘ऑगमेटीक रियॅलीटी’ या तंत्रज्ञानाचा प्रयोग करून राज्यातील ताडोबा अभयारण्यात वाघाला कुरवाळण्याचा अनुभव येथे मिळतो.
राज्यातील हस्तकला दर्शविणारे दालनही येथे उभारण्यात आले आहे. पैठणी साड्या, वारली पेटींग, लाखाच्या बांगड्या, कोल्हापूरी चपला आदी वस्तू येथे बघायला मिळते. महाराष्ट्रातील लज्जतदार व्यंजनही येथे येणाऱ्या प्रेक्षकांना चाखता येतात. त्यासाठी महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचे दालन उभारण्यात आले आहे. पुरण पोळी, साबुदाना खिचडी, साबुदाना वडा, पीठलं भाकरी, भरली वांगी, वडा पाव आदी मराठमोळी व्यंजन येथे उपलब्ध आहेत. दिनांक १८ ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजे पर्यंत ‘भारत पर्व’ला भेट देता येणार आहे.
पर्यटन मंत्री डॉ.महेश शर्मांची महाराष्ट्र दालनास भेट; लोकराज्य अंकाचे कौतुक
केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यांनी भारत पर्वचे उद्घाटन झाल्यानंतर महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दालनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र लोकराज्य अंकाच्या स्टॉलची आवर्जुन पाहणी केली. लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड या अंकाच्या मांडणीचे त्यांनी कौतुक केले. डॉ.शर्मा यांना लोकराज्य व महाराष्ट्र अंक भेट स्वरूपात देण्यात आले.