Saturday, April 4, 2026
गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’
Wednesday, February 11, 2026
…ती ‘आई’ होती म्हणुनी…
गोठयात उभी एक गाय जिने दोन दिवसांपासून चारा खानं सोडला आणि दुसरीकडे तिच्या कालवडीच्या डोळयातून ओघवत असलेले अश्रू पाहतांनाचा क्षण बरच काही सूचवून आणि शिकवून गेला. मुक्या प्राण्यांना भावना असतात आणि जे हात त्यांची नेहमी काळजी घ्यायचे चारा व पाणी दयायचे ते आता दिसेनासे झाल्याने त्यांची ही अवस्था झाली होती. ती व्यक्ती म्हणजे आमची सर्वांची लाडकी ‘बुट्टी’ अर्थात जयश्री भुयार-नवले. तिचे अकाली निघून जाणे (गुरुवार,५ फेब्रुवारी २०२६- वय ४२ वर्ष ७ महिने) हे तिच्या तीन मुली आणि पतीला (आमचे जावई) जसे पोरके करणारे होते तसेच ते आम्हा भुयार परिवारालाही मुलगी सोडून गेल्याचे अपरमित दु:ख देणारे ठरले.
मुळात तिच्या जाण्याने एक न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुलींना आई, पतीला पत्नी , सासुला सून पोरकी झाली आहे तसे ती बहिणी, आई, काकु,भाऊ असा मोठा आप्त परिवार पोरका करून गेली आहे. गावात सर्वांना मदत करणारी , बोलकी आणि धाडसी महिला म्हणून ओळख असणाऱ्या जयश्रीने स्वकृत्वाने आपली ओळख निर्माण केली. रुढ अर्थाने नोकरी, राजकारण,शिक्षण आदी क्षेत्रातील वावरानेच माणसाची ओळख निर्माण होते हे आपण पाहतो. मात्र, कतृत्व आणि मितभाषी स्वभाव या गुणांआधारेही तुम्ही स्वत:ची छाप पाळता व सर्वप्रिय होता हे जयश्रीच्या अकाली जाण्याने समाजातील विविध लोकांच्या प्रतिक्रियांमधून अधोरेखित झाले.
तिच्या जाण्याने घरातील गुरं, शेजारची गोंडस लहानगी चिऊ, ज्योत मंदिराचा भव्य सप्ताह आणि तिच्या पोटची लेकरं हे कायमचे पोरके झाले होते. चिऊचा वावर सतत जयश्रीच्या घरात व्हायचा व आपल्या तीन मुलींचा उत्तम सांभाळ करणारी ही माऊली आता चिऊचीही काळजी घेऊ लागली. तिला खेळवू लागली. त्यांना एकमेकींचा लळाच लागला होता. ज्या गिरणीच्या भरवश्यावर जयश्रीने संसाराचा रथ लिलया पेलला आणि स्वप्नातील घर प्रत्यक्षात उभारल त्या गिरणीतच चिऊ कितीदा दळणाचे पीठ खात असे व जयश्रीही त्याची परवानगी देवून चिऊच्या चेहऱ्यावर पिठाची रांगोळी काढत असे. जेमतेम दीड दोन वर्षांची चिऊ जिला हे आनंदाचे क्षण हवे हवेसे वाटत होते त्याला आता कायमचा थांबा बसला. कालांतराने ती मोठी होईल तेव्हा तिला या आनंदाच्या क्षणाबद्दल कोणी सांगेलही. पण, आताच्या घडीला ती संभ्रमात पडली असेल. तिचे बालसुलभ मन आता त्या क्षणांचा आनंद घ्यायला मुसमुसले असेल. तसेच गोठयातील त्या माय-लेकरांचेही झाले असेल.त्यांचा सांभाळ करणारे हात आज त्यांच्या आजुबाजुला दिसत नसल्याने त्यांची तगमग सुरु आहे. त्यांच्या सभोवताली आधी असलेलं आनंदी वातावरण आता दु:खात परावर्तीत झाल्याचे त्या मुक्या जिवांना प्रकर्षाने जाणवत असल्यानेच एकीने चारा खानं सोडून तर दुसरीने आसवांना वाट मोकळी करुन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘ज्योत मंदिर’ हे पणज गाव आणि पंचक्रोशितील ( जि.अकोला,ता.अकोट) प्रसिद्ध धार्मिक स्थळ ठरत आहे.या ठिकाणी तुपाचा सतत तेवत राहणारा दिवा येथे येणाऱ्या भाविकांना सतत तेवत राहण्याची ऊर्जा देवून जातो. घराच्या भिंतीलाच लागूण असणाऱ्या या ज्योत मंदिराशी जयश्रीचं भावनिक व धार्मिक नात जुळलं होतं. जेव्हा केंव्हा तिच्याशी बोलण व्हायचं तेंव्हा तिच्या बोलण्यात या मंदिराचा आवर्जुन उल्लेख येत असे आणि त्यासोबतच या मंदिरात दर्शनासाठी ये असे निमंत्रण वजा आवाहनही असे. याच मंदिराचा उत्सव येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार होता, विशेष म्हणजे याच उत्सवादरम्यान जयश्रीचा जाहीर सत्कारही होणार होता. तो आता कधिही होणार नाही हे कटुसत्य सर्वांनाच पचवता येत नाहीये. या मंदिरासाठी काही जागा जयश्रीच्याच पुढाकार व आग्रहाने देण्यात आली म्हणूनच दात्यांच्या यादित तिचे नाव कोरले गेले आहे.आणि आता या उत्सवासाठी जवळपास 35 गव्हाच्या पोत्यांच्या दळणापैकी तिने जाण्याच्या दिवसापर्यंत जवळपास 25 पोते गव्हाचे दळण दळले होते व उर्वरीत दळणही ती नि:शुल्क दळणार होती. जागा दान देणे व नि:शुल्क दळण दळून या उत्सवाला हातभार लावण्यामुळे तिचा सत्कार होणार होता. मात्र,या उत्सवाच्या चार दिवस आधी तिच्या दुर्देवी निधनामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करून जयश्रीप्रती कृतज्ञभाव दर्शविला. उत्सवासाठी तयार करण्यात आलेले मिष्ठान्न (बुंदी) नजिकच्या मंदिरांमध्ये गजानन महाराज प्रगटदिन कार्यक्रमासाठी व शेगाव येथील गजाजन महाराज मंदिरात कणकेची पोती पाठविण्यात आली.
घरावर कोसळल संकट
आई गेल्याने तिची तीन पिल्लं आता कायमची पोरकी झाली आहेत. मोठी मुलगी श्रुतिका (छकुली) धाय मोकलून रडत होती व आई वर गुदरलेला हा प्रसंग सांगत असतानाच जयश्रीचा समजुतदारपणा व धाडसी स्वभाव तिच्या व्यक्तीमत्वात दिसून आला. तिने सांगितले की, गिरणीच्याच भरवशावर आईने हे घर उभं केल आणि त्यापूर्वी आमच्या जावई बाप्पुंनीही याचा तोंडभरून उल्लेख केला होता. गेल्या आठवडाभरापर्यंत तिने या घराचे उर्वरित बांधकाम,छपाई,रंगरंगोटी करून घेतली.या घरात गेल्या वर्षी आम्ही आईसोबत दसरा,दिवाळी असे सर्व सण साजरे केले. प्रत्येक दिवाळीला एक ड्रेस आमच्या वाटयाला येत असे यावेळी हात सैल करून आईने आम्हा तिघिंना प्रत्येकी दोन ड्रेस घेतले. बाबांचा वाढदिवस दणक्यात केला, रोडग्यांचं (कणकेच्या गोळयापासून बनविण्यात येणारा पोळी वर्गीय पदार्थ) जेवण दिलं. रात्रीचे जेवण आटोपल्यावर माझ्या दोन्ही धाकटया बहिणींसोबत ती एकाच मोबाईलवर रिल पाहत असे. एवढयात ती स्वत:वर आणि आमच्यावरही खूप खर्च करायला लागली होती. दु:खद बाब म्हणजे माझी दुसऱ्या क्रमांकाची बहिण गौरीचा वाढदिवस आई गेली त्याच दिवशी होता. त्या उद्विगनेतून तिने तर देव्हाऱ्यातील देव फेकून देत राग व दु:ख व्यक्त केले होते. सर्वात धाकटी रेणुकाही आई गेल्याच्या धक्क्यातून सावरली नाही अजून. मी आयबीपीएस अर्थांत बॅंकींगची परिक्षा दिली प्रिलिमरी एक्झाम पास केली आता मेन्स आहे. पण, नाही देणार मी एक्झाम माझ मनच उडून गेलं आता काही करण्याबाबत. यावर आम्ही सांगितलं की, 'आता तुला थोरली बहिण म्हणून आईच्या जागी त्यांना धिर दयायचा आहे व त्यांचा सांभाळ करायचा आहे.' आणि तुला आयबीपिएस मेन्स दिलीच पाहिजे यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आम्ही तिला आश्वस्त केले.
आता पोरकी झालेली ही तीनं पील्लं आपलं आयुष्य केवळ आईने दिलेल्या संस्काराच्या पुंजीतून जगणार आहेत.पतीवर मात्र आता घर चालविण्याची व आईची पाखर या पिल्लांवर घालण्यी दुहेरी जबाबदारी पडली आहे.
पती हाच परमेश्वर ; कृतीशील परिचय
जयश्रीच्या मुली सांगतात की, 'आमची आई फारशी देवपूजेत रमायची नाही. मात्र, दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आमच्या वडिलांचे दर्शन घेऊनच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे'. तिची ही कृतीतर अल्प शिक्षण झालं असलं तरी तिची विचारसरणी ही काळाच्या पुढे जाणारी होती हे दर्शविते. यातून मुलींनाही आपसूक बाळकडू मिळाले व खरा देव माणसात आहे ही संतांची शिकवण तिने कृतीतून मुलींना दिली हे ठळकपणे दिसून येते. ती शरीर यष्टीने जाड होती, पण याच तिला अजिबात वाईट वाटायचं नाही. आम्ही गंमतीने तिला याबाबत खोड काढायचो तेव्हा ती त्याच आत्मविश्वाने सांगायची , आमच्या यांना मी आहे तशीच आवडते मग मला इतरांच काही देणं घेण नाही.' या दोन्ही कृतीतून पती-पत्नी मधील संमजसपणा ,प्रेम व नात्याची घट्ट वीण ठळकपणे दिसते.
सासु बाईंनाही प्रेमळ व होतकरु सुनेच्या नसन्याची सल त्यांच्या यजमानांच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. पण या सर्वांना या अपरमीत दु:खातून सावरुन सक्षमपणे उभे रहावे लागणार आहे व जयश्रीच्या आठवणी व तिच्या चांगुलपणाची चळवळ पुढे घेऊन जावी लागेल.
ही वाट दूर जाते
आम्ही सर्व भावंड अचलपुरातील (जि. अमरावती) विलायतपुरा भागातील दानाखोरीत लहानाची मोठी झालो. बालपणात भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट होत गेली. माझे मोठेबाबा दिवंगत अर्जुनराव भुयार आणि मोठी आई श्रीमती सरला भुयार यांच्या पोटी पाच मुलींनी जन्म घेतला. श्री. अर्जुनरावांनी स्वत:ची चहाची टपरी उघडून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून इमाने इतबारे काम करून संसाराचा गाडा ओढला.
घरी अठरा विश्वे दारिद्र्य आणि त्यात पाच लेकींचा सांभाळ त्यांचे शिक्षण अशी जबाबदारी आली. मी तेंव्हा मामांकडे शिकायला होतो. मग उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये अचलपूरला माझ्या गावी यायचो तेंव्हा आम्ही सर्व भावंड सोबत खेळायचो. विशेष करून मी या बहिणींच्या गोतावळ्यात असायचो. मला आठवते तेंव्हा पत्त्यांचा खेळ खेळायचो आम्ही (बिटफुल बहुदा) तेंव्हा जयश्रीचा खेळात जास्त उत्साह असे. घरा शेजारीच आमची वाडी (छोटे शेत) होती तिथेही आम्ही सर्व भावंड खेळायला जायचो. पुढे शिक्षणासाठी माझा प्रवास एका गावातून दुसऱ्या असं सुरू होत. तस तसा मी अचलपूर पासून लांब जात होतो. अशात इकडे या पाच बहिणी थोड बहुत जुजबी शिक्षण घेऊन लग्न या आयुष्यातील महत्वाच्या जबाबदारीला सामोऱ्या गेल्या. गरीब परिस्थिती असताना चांगली स्थळ आली व एका मागून एक लग्नाची जबाबदारी पार पडत गेली .पाच बहिणी पैकी जयश्रीच लग्न क्रमाने तिसरं.
आता मी मामाकडे शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील भास्कर महाराज संस्थान, द्वारकेश्वर येथे वारकरी शिक्षण व सर्वांगीण विकास शिबिरात जायचो. अशातच जयश्रीच्या आग्रहाखातर तिचं नुकतंच लग्न झालं असताना शिबिरातून गावी परतताना तिच्या पणज या गावी गेल्याचं मला आठवतं. तिचे सुविध्य पती (आमचे जावई) सासू-सासरे, दीर अशा सर्वांशी गप्पा झाल्या. लग्नानंतर आपल्या घरी भाऊ आल्याचा आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होत. उन्हाळा असल्याने माझ्यासाठी आंब्याच्या रसाचा खास पाहुणचार केला होता ते स्मरते (तेंव्हा कदाचित इयत्ता १२ वीत असेन, मी.).
पुढे शिक्षणासाठी अमरावती, पुणे अन् नोकरीसाठी दिल्ली असा प्रवास करत मी अचलपूरपासून अधिक लांब जात गेलो. शासकीय नोकरीत आलो. लग्न झालं. आमच्या घरात मुलांमध्ये माझच पहिलं लग्न. त्यामुळे आमच्या बहिणींना लग्न एन्जॉय करायची नामी संधी. यात जयश्रीने सर्वात जास्त मज्जा केल्याचे मी बघितले. मांडवात नवरदेव जाण्यापूर्वी व गावात मिरवणुकी दरम्यान जयश्रीने माझा हात धरून अक्षरशः कमाल डान्स केल्याचे मला आठवते. लग्नाच्या त्या दोन-तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये तिने धमाल डान्स केल्याचे व पुढेही माझ्या नंतर झालेल्या माझ्या भावांच्या लग्नामध्येही तिचा उत्साह आणि ठसकेबाज डान्स सर्वांसाठी एक वेगळी पर्वणी होती. तिचं वागणं- बोलणं खूपच मोकळ धाकळ आणि स्पष्ट होतं.
परत विधिवत चतुर्भुज झाल्यानंतर (लग्न झाल्यावर) मी दिल्लीत गेलो. मग अधे-मधे दिवाळीत वगैरे भाऊबीजेला जयश्रीची भेट व्हायची. आता दिल्लीहून परतलो नागपुरात नोकरीत व्यग्र झालो. अशात भेट झाली तेव्हा जयश्री म्हणायची, 'आता आपल्या भागात आला बरं झालं !आता तरी ये आमच्याकडे मुक्कामी.' दिल्लीहून नागपूरला येऊन मला तीन वर्ष झाली. मात्र, तिच्याकडे जायचा योग आला नाही. आणि आता तिच्याकडे जावं लागलं तेव्हा तिच हे जग सोडून गेली होती. हे तिचं जायचं वय नव्हतं.अजून आयुष्याचा बराच चित्रपट बाकी होता त्या आधीच तीने इंटरवल साधला आणि आम्हा सर्वांना पोरक व निशब्द करून गेली, एवढ्यात तुला श्रद्धांजली वाहण्याचं धाडसच नाही होत.
तुझ्या जाण्याने तुझी तीन पिल्लं आणि तुझ्या घरातील गाय वासरु यांना थेट झळ पोहोचली. तुझ्याशी या सर्वांचा असलेला भावनिक व मायेचा संबंध याची मोजदात नाही.
आई सोडून गेल्याने तिच्या लेकरांची होणारी हिच तगमग मांडण्यासाठी कवी ग्रेस यांच्या कवितेचा आधार घेऊन येथे थांबतो.
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता.....
००००००
मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार ; 352 तालुक्यात सकारात्मक बदल !
Friday, January 16, 2026
‘हिंद दी चादर’ गुरु तेगबहादुर साहिब यांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण
विशेष लेख :
‘हिंद दी चादर’,श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत गेल्यावर्षी ७ डिसेंबर रोजी झालेल्या देखण्या आयोजनानंतर २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड येथे भव्य अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी स्वाभीमान आणि देश रक्षणासाठी दिलेले बलिदान अनन्य साधारण आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यांनीही देशासाठी शहादत दिली. हा गौरवशाली इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे स्मरण करणारा आणि गुरुंनी देशासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकणारा हा लेख…
कश्मीरचा सुभेदार हा शिखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांच्या मदतीसाठी गेला. ‘ना पेह देना ! ना पेह सेना’ म्हणत (घाबरायचे नाही व घाबरवयाचेही नाही) कश्मीरींच्या रक्षणासाठी गुरु तेगबहादुर साहिब यांनी थेट तत्कालीन सत्तेला आवाहन दिले व दिल्लीकडे कुच केली. आग्रा येथेच तेगबहादुरांना अटक करण्यात आली.दिल्लीला आणून त्यांना धर्मांतराची बळजबरी करण्यात आली. गुरु तेगबहादुरांनी त्यास नकार देऊन लाल किल्ल्यासमोरील चांदणीचौकात बलिदान दिले. त्यांचे हे बलिदान इतिहासात अमर झाले व भारतभूमीचे कवच म्हणून त्यांना ‘हिंद दी चादर’म्हणून ओळखले जाते. सत्य व अहिंसेचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी बलिदान देऊन मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला.
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या सोबत अनेक समाज उभे होते विशेषत: सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात मोलाचे योगदान देत तेगबहादुर साहेबांनी दिलेल्या देश व मानवतेच्या रक्षणाची शिकवण सर्वदूर पोचवली. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाल गुरु तेग बहादुरांच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरुनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील चांदणी चौकात सीसगंज गुरुद्वारा सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे. याच ठिकाणी गुरु तेगबहादुरांनी तत्कालीन सत्तेला आपल्या प्राणांच्या आहुतीतून भारतीयांच्या एकीचा व सद्भावनेचा संदेश दिला. २५ मे १६७५ रोजी सत्ताधाऱ्यांच्या आज्ञेनुसार गुरु तेगबहादुरांचे शिर अमानुषपणे धडापासून वेगळे करण्यात आले आणि ‘जो कोणी तेगबहादुरांचे उत्तर कार्य पार पाडेल त्याला व त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा करण्यात येईल,’ असा फतवा काढला.
अशा दहशतीच्या वातावरणामध्ये ढवळून निघालेले भारतीय मन नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी धडपडू लागले. सत्तेची अवाज्ञा करून भाई जेतासिंह यांनी त्यांचे ‘शिर’आनंदसाहेब दरबार येथे शिखांचे दहावे गुरू आणि गुरू तेगबहादुरांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांच्या सुपूर्द केले. इकडे भाई लखीशाह बंजारा यांनी मुलगा नाथईय्याजी यांच्या मदतीने गुरू तेगबहादुरांचे ‘धड’ दिल्लीतीलच रकाबगंज गावात आणले व आपल्या राहत्या घरात ते ठेवून घरालाच अग्नी दिला. त्यानंतर त्याच ठिकाणी पवित्र अस्थी जमिनीत पुरल्या आज तिथेच ‘रकाबगंज गुरुद्वारा’उभा आहे.
त्याग व शौर्याचे प्रतीक ‘सीसगंज’ आणि ‘रकाबगंज’ गुरुद्वारा
सरदार बघेलसिंह यांनी १७८३ मध्ये दिल्ली सर करून लाल किल्ल्यावर कब्जा मिळवला आणि गुरू तेगबहादुरांच्या शहीदस्थळी सीसगंज गुरूद्वारा बांधण्यात आला. पुढे १९३० रोजी याच गुरूद्वाऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. स्वधर्माची ज्योत भारतीयांमध्ये तेवत ठेवण्याकरिता व प्रसंगी बलिदान देण्याचा संदेश देणारा सीसगंज गुरूद्वारा भारतीयांचे मुख्य श्रद्धास्थान ठरले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसात स्थित सीसगंज गुरुद्वारा हा दिगंबर जैन अतिशय क्षेत्र लालमंदिरापासून सुरु होणाऱ्या चांदणीचौकाकडील रस्त्यावर आहे, तर संसद भवनाच्या मागील भागात रकाबगंज गुरुद्वारा स्थित आहे.
शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. गुरु तेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू असून सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत. तेगबहादुरांचा जन्म अमृतसर येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी यांच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्युनंतर बकाला येथे जाऊन विरक्त वृत्तीने राहू लागले.
शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या निधनानंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून गादीवर बसविण्यात आले. त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तिथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांचे पुत्र गोविंदसिंह यांचा जन्म झाला. पुढे शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह म्हणून ते उदयास आले.
तेगबहादुर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचे बलिदान
देशहितासाठी प्राणांचे बलिदान देणारे गुरु तेग बहादुर यांनी मोठा आदर्श घालून दिला. त्यांचीच शिकवण पुढे घेऊन जात त्यांच्या कुटुंबीयांनीही बलिदान दिले. आनंदपूरच्या लढायांनंतर सरदार वजीर खानाने गुरू गोविंदसिंग यांच्यावर हल्ला केला.यात मोठे दोन साहिबजादे अजीतसिंग आणि जुझारसिंग यांनी सरदाराच्या सैन्यासमोर शौर्याने लढत वीरगती प्राप्त केली. छोटे साहिबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांना त्यांच्या आजी माता गुजरीजींसोबत सरहिंदच्या थडग्यात कैद करण्यात आले. वजीर खानाने त्यांना थंडीच्या रात्री उघड्यावर ठेवले आणि नंतर जिवंतपणे भिंतीत बंद करून मारले. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने २१ ते २७ डिसेंबर हा 'बलिदान सप्ताह' आणि २६ डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' म्हणून घोषित केला व देशभर तो साजरा केला जात आहे. शिखांचे दहावे व शेवटचे गुरु, गुरु गोविंद सिंग यांनी १४ युद्धे लढली. १७०८ मध्ये नांदेड येथे देश रक्षणासाठी लढताना ते शहीद झाले.
गुरु तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या सद्विचारांचा प्रसार केला. त्यांनी विविध विषयांवर ११६ पद्ये रचली. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी गुरु ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शबद’ (स्तोत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. अहिंसा व सत्याचे प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी प्राण त्याग करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श भारतीयांना घालून दिला. त्यांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुर साहिब यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यावर्षी भारतभर मोठया प्रमाणात विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत नागपूर येथील नारा परिसरातील सुरेश चंद्र सुरी मैदानावर ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्यावर भारतीय डाक विभागामार्फत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले. विदर्भ आणि छत्तीसगढ मधील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मीकी आणि सिंधी समाजबांधवानी एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम साजरा केला.
श्री हुजूर साहिब नांदेड
शीखांचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, 'सब सिक्खन को हुकम हे गुरू मान्यो ग्रंथ साहिब' असा उपदेश दिला होता. हा मानवतेचा संदेश घरोघरी पोचविण्यासाठी व श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्यागाची शिकवण समाजाच्या सर्व घटकांत पोचविण्याच्या उद्देशाने नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारीला शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये देहरुपी गुरु जाऊन गुरुग्रंथ साहिबची स्थापना झाली. नांदेड येथील बंदासिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या प्रेरणेने पंजाबात जाऊन परकियांशी लढा दिला व प्रशासक बनले. त्यांनी सरहिंद जिंकून शेतकऱ्यांना जमीन मालकीचा अधिकार दिला आणि स्वराज्याची पायाभरणी केली.
गुरू गोविंद सिंग यांनी १७०६ मध्ये ‘जफरनामा’ हे पत्र लिहून सत्ता प्रमुखाला नैतिकतेचे आव्हान दिले. हे पत्र फारसी भाषेत असून, त्यात सत्ताधिशांच्या विश्वासघातकी वर्तनाचा, जुलूमांचा आणि शीखांवर केलेल्या अत्याचारांचा समाचार घेतला. पत्र वाचून बादशाहने गुरूजींना सन्मानाने आणण्याचा आदेश दिला, पण गुरूजींनी ते नाकारले. हे पत्र शीख इतिहासातील विजयाचे प्रतीक मानले जाते.
मराठवाडयातील नरसी नामदेव हे थोर वारकरी संत, संत नामदेवांचे जन्म गावही याच भागात आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या विस्ताराकरिता देशभ्रमण केले. पंजाबात गेले असता त्यांच्या उद्बोधनाने सर्व समाज भारावला त्यांच्या ६१ अभंगांचा शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा देशरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन तसेच शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, वाल्मिकी उदासीन आणि गुरुनानक नामदेव संगत, तखत नांदेड गुरुसाहेब यांचा समावेश असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना आणि मराठवाडयातील शीख व अन्य समाज बांधव मोठया संख्येने यात सहभागी होणार आहेत. गुरु तेगबहादुरांच्या कार्याची महती पोचविण्यासाठी प्रत्येक शाळा,महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, गीते, डाक्युमेंटरी प्रदर्शीत करण्यात येत आहेत. या सर्व आयोजनातून ‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे महान विचार आणि अजोड कर्तृत्वाचा परिचय जनतेला होणार आहे.
रितेश मो.भुयार,
माहिती अधिकारी,
माहिती व जनसंपर्क, नागपूर.
००००००
Wednesday, January 14, 2026
Wednesday, December 31, 2025
डॉ. पाखमोडेंच्या निधनाने देव माणूस गेला
Monday, December 29, 2025
आईला पर्याय नाही व नसेलही हे ठासून सांगणारे 'उत्तर'
‘आई’ विषयावर मोठ-मोठया साहित्यकृती जन्माला आल्या व त्यांनी वाचकांच्या मनावर अधिराज्यही गाजवले. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ घराघरात पोचली तर याच कलाकृतीवर तयार झालेला थोर साहित्यिक प्र.के.अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ चित्रपटाने मराठीचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही पटकाविला. रंगभूमीवर ‘श्यामची मम्मी’ही आले. अन् आता सरत्या वर्ष २०२५ मध्ये (१२ डिसेंबर) क्षितीज पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी गीतकार व पटकथाकाराच्या पहिल्या-वहिल्या दिग्दर्शनात प्रदर्शित झालेला ‘उत्तर’ हा चित्रपट ‘आई’ या माणसाच्या जीवनातील अविभाज्य पात्राला ‘एआय’ चा पर्याय कसा असू शकत नाही हे ठासून सांगतो.
आजकाल सर्व क्षेत्रात जोरकसपणे सुरु असलेला एआयचा वापर आता मानवी नाती जपण्यासाठीही उपयोगात येईल की काय ! ही भिती बाळगणाऱ्या सर्वांसाठीच ‘उत्तर’ हा चित्रपट नवी दृष्टी देतो. दिग्दर्शकाने ही भिती दूर करण्यासाठी जगातील सर्वप्रिय नातं ‘आई’ व तिची माया हेच निवडलं ही त्यात एक जमेची बाब. चित्रपटाच कथानक पुण्याच्या एका जुन्या चाळीतील छोटयाशा फ्लॅट सदृष्य खोलीतून सुरु होतं. आणि महाविद्यालय व कोकणातील एक छोट गाव एवढयातच फिरतं. चित्रपटातील पहिला व शेवटचा सिन अगदी कट-टू-कट सूचक व म्हणूनच जबरदस्त झाला आहे.
उमा महेश भालेराव या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील निवेदिका.पतीच्या निधनानंतर एकुलता एक लेक निनाद/नन्न्याची जबाबदारी त्यांच्यावरच येवून पडते. दोघा मायलेकांच्या संवादातून सुरु झालेली चित्रपटाची सुरुवात नन्न्याचं तारुण्य सुलभ मन व त्यात त्याला हवी असलेली प्रायव्हसी आणि आईला आपल्या मुलाला घडवण्याचा प्रवास व त्यात मुलाकडून मिळणारा तोडका प्रतिसाद अशा द्वंद्वात चित्रपट पुढं सरकत जातो. बाल वयापासून सोबत असणारी त्याची मैत्रिण आणि तो एका डिजीटल फेस्टसाठी प्रोजेक्ट तयार करण्याची प्रक्रियाही चित्रपटात आली आहे. नन्न्याला दर दोन तासाने फोन करून सतत त्याच्या काळजी पोटी सल्ला देणारी व घरात लहान सहान गोष्टीत त्याची काळजी घेणारी उमा एकदा चक्कर येऊन घराच्या जिन्यात कोसळते. आणि उपचारा दरम्यान कराव्या लागणाऱ्या विविध तपासण्यादरम्यान तिला आपल आयुष्य केवळ तीन-चार महिन्यात संपणार हे कळतं मात्र, ते नन्न्याला सांगण्याच धाळसंच करत नाही. अशात नन्न्याला आपला एआय प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आईच्या आवाजाची गरज असते व त्या निमित्त तो आई जवळ राहणार असतो यामुळे उमा सुखावते मात्र नन्न्या आपल्या प्रोजेक्टसाठीच तिच्या आवाजात तिच्या सूचना या प्राँप्ट म्हणून तयार करतो. अशात उमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या बहिणीकडे जाण्याची इच्छा होते व कोकणात बहिणीकडेच तिचे निधन होते. उमाचे उत्तर कार्य आटोपून नन्न्या घरी येतो. अशात चाळीतील शेजारी व त्याची मैत्रिण सांत्वणासाठी येतात पण त्याला सांत्वनेची गरज नसल्याचे त्याचे तुसडेपणाचे वागणेही मायलेकाच्या नात्यातील आगळाच विरोधाभास अधोरेखीत करते.
आई नसली तरी नन्न्याला आता फारसा फरक पडत नाही. 'अनमिस' नावाचे एआय मॉडेल तयार केल्याने तो आता घरात उपमा बनवण्यापासून सर्व प्राँम्ट देवून उमाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. कॉलेजकडून त्याचा प्रोजेक्टची निवड होताना परिक्षक दुसऱ्या परिक्षकाला सांगतात की याची आई गेली आहे नुकतीच त्यावर नन्न्या म्हणतो की ,“माझ्या टॅलेंटहून मला जज करा माझ्या परिस्थितीहून नाही.” हा डायलॉग प्रेकक्षकांना चटका लावून जातो पुढे आईच्या एका पत्रातूनच नन्न्याला अनमीसमधील अपडेट सुचते व त्याच्या जोरावरच त्याचा प्रोजेक्ट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरतो. अर्थात नन्न्याला उमाची गजर वाटत नाही मात्र त्याच्या यशाची प्रेरणाही उमाच असते हेही क्षितीज पटवर्धन यांनी सुजान प्रेक्षकांना या कलाकृतीतून दाखविले आहे.
‘आई’ शब्दाला साधर्म्य असणारा ‘ए, आय’ हा आईला हाक मारणारा ग्रामीण महाराष्ट्रातील शब्द कायम पर्याय असू शकतो मात्र, आधुनिक तंत्रज्ञानातील कृत्रिक बुद्धीमत्ता अर्थात ‘एआय’ हा पर्याय ठरू शकत नाही, हे या चित्रपटातील शेवटचं दृष् सूचवतं. ज्यात नायक चाळीत भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करताना पिशवी सोबत नसल्याने सवयी प्रमाणे गच्चीकडे पाहून आईला पिशवीसाठी हाक मारतो. मात्र, आई सोडून गेल्याची जाणीव होत असताना गच्चीतून आई जी पिशवी भिरकवायची ती पिशवी दिसते. यावेळी नायकाला आईसोबतचा संवाद आठवतो, ‘आई तुला वारा का ग आवडतो?’ त्यावर तीच मार्मीक उत्तर की ‘तो आपल्या प्रिय लोकांची आठवण करून देतो’ अस आठवत असतानाच गच्चीतील पिशवी वाऱ्याने खाली थेट नायकाच्या हातात पडून जाते व इथेच चित्रपट संपतो.
चित्रपटाची तांत्रिक बाराखडी उत्तम जमली आहे. पहिल्या फ्रेमपासून जनसंवादातील प्रभावी संवाद घडविण्याची किमया कॅमेरातून साधली आहे. बर्गर,कोंड्रींक, उपमा ते कोकणातील जेवणाची थाडी आणि हापूस आंब्यांचा चित्रपटातील यथोचित वापर सांस्कृतिक गुंफण दर्शवितो.चित्रपटातील एकमेव गीत आणि तेही रटाळवान होणार नाही त्यातच कथानक पुढे सरकत जाईल याची काळजी घेण्यात आली आहे.चाळीतील जीवन व त्यातील पात्रही उत्तम रेखाटली आहेत.'एआय' शी संबंधित सर्व आज्ञावलीचा उत्तम अभ्यास करून दिग्दर्शकाने हा विषय खूपच बखुबी मांडला आहे .गंभीर विषय अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या गळी उतरवताना बहुतेक वेळा प्रेक्षकांचा कंठ दाटून येतो. हिच काय ती या चित्रपटातील उनीव म्हणून बळजबरीने बोट ठेवावं अशी बाब.
ही कथा एकल महिलेच्या भावनिक संघर्षाची जेवढी म्हणून वाटते त्यात ती एकल पाल्याच्या भावनांचा विचार करणारी व त्यालाही झुकत माप देणारी वाटते. गेल्यावर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलांचा प्रश्न मांडणारा हरिष इथापे दिग्दर्शीत आणि श्याम पेठकर यांच्या पटकथा लेखनातील ‘तेरवं’ चित्रपटही बघितला.विदर्भातील कलाकारांना घेऊन केलेला तो आगळा प्रयोग होता.त्या चित्रपटाला तेवढे व्यावसायीक यश मिळाले असेल असे जाणवत नाही.पण एकापेक्षा एक सरस गाणी,पटकथा,रंगभूमीवरील नाटकं देणारा क्षितिज पटवर्धन यांचा चित्रपटातील पहिला प्रयोग नक्कीच यशस्वी झाला म्हणता येईल. नागपुरातील तीन सिनेमागृहात सतत आठवडाभर दिवसाला आठ शो हाऊस फुल्ल झाल्याचा व मलाही प्रयत्न करताना तिसऱ्या दिवशी तिकीट मिळालं यातच काय ते चित्रपटाच्या यशाचं गमक सांगता येईल.मात्र,विविध सामाजिक परिस्थितीशी झगडत असलेल्या एकल महिलांचा प्रश्नही समाजाच्या डोळयात अंजन घालण्याचे काम करतो व समाजाला आरसाही दाखवतो.
उमा भालेरावांच्या रुपाने रेणुका शहाणे यांनी रंगवलेली ‘आई’, आपल्या आई-वडिलांचा कलेचा वारसा लाभलेला अभिनय बेर्डे याने अप्रतिम अभिनयातून रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या सोबत दिग्गज अभिनय केला आहे.ऋता दुगुळेनेही नन्न्याच्या मैत्रिणीची भूमिका सुंदरपणे वठविली आहे.
या चित्रपटाचा पटकथाकार व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन हा माझा पुणे विद्यापिठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन अभ्यासक्रमातील बॅचमेट.मध्यंतरी दिल्लीत त्याची सपत्नीक भेट झाली होती. यशोशिखरावर असताना त्याने अजुनही आपल्यातील माणूसपण जपल आहे. त्याची पत्नी प्राचीही त्याची बेस्ट मॅच आहे.असो, तर क्षितिजच्या चित्रपट दिग्दर्शनातील या पहिल्याच अफलातून प्रयोगाने मित्र म्हणून त्याचा खूप हेवा व आदर वाटतो.मित्रा मराठी चित्रपट सृष्टीला समृद्ध करण्यात तुझा मोलाचा वाटा ठरो याच शुभेच्छा !
000000





































